Wednesday, June 12, 2013

पुदिना कोथिंबीर पराठा, अडाई, रक्तानुबंध, बार्ली-मूग सुप


पुदिना कोथिंबीर पराठा


आता पाऊस सुरू झाला आहे. या मोसमात चटपटीत खाण्यापासून आपण स्वत:ला रोखू शकत नाही. मात्र अशा खाण्याने पोट बिघडण्याची शक्यता हमखास. पुदिना- कोथिंबीर मुळातच पचनासाठी उत्तम. त्यामुळे खमंगतेबरोबरच पौष्टिकता अनुभवायची असेल तर हा पुदिना-कोथिंबीर पराठा नक्की करून पाहा.
साहित्य :  दोन कप गव्हाचे पीठ, पाव कप पुदिना पाने (बारीक चिरून), पाव कप कोथिंबीर (बारीक चिरून), दोन मिरच्या- एकदम बारीक चिरून, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, अर्धा कप दही, एक चमचा चाट मसाला, एक चमचा गरम मसाला, चवीपुरते मीठ, तीन चमचे तेल आणि पराठे भाजण्यासाठी तेल..
कृती :  एक परातीत गव्हाचे पीठ, पुदिना, कोथिंबीर, मिरची, जिरे, ओवा, दोन चमचे तेल आणि चवीपुरते मीठ घालून एकत्रित करावे. दही घालून छान मळून घ्यावे. त्याचा गुळगुळीत गोळा बनवून त्याला बाहेरून तेलाचा हात लावावा म्हणजे पीठ सुकणार नाही. आणि साधारण अर्धा तास हा गोळा झाकून ठेवावा.
दोन. मळलेल्या पिठाचे साधारण सहा गोळे करून घ्यावे.
पातळ पोळी लाटून त्यावर थोडे तेल लावावे. त्यावर थोडा चाट मसाला आणि गरम मसाला भुरभुरावा. हातातील उघडझाप करणा-या पंख्यासारख्या घडय़ा घालाव्यात. सर्व पदर वर दिसतील अशा प्रकारे धरावे. नंतर एक टोक हातात धरून दुसरे टोक पहिल्या टोकाभोवती फिरवावे. आणि घट्ट रोल करावा. सर्व पदर वर दिसले पाहिजेत.
थोडे पीठ भुरभुरवून परत लाटावे. गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी शेकावे. भाजताना थोडे तेलही घालावे. पराठा तयार झाला की दोन्ही हातात धरून अगदी अलगद चुरगळावा म्हणजे सर्व पदर व्यवस्थित सुटतील. मात्र जोरात चुरगळू नये. अशा पद्धतीने मध्यम आकाराचे पराठे बनवावेत. गरमागरम पराठे दही किंवा लोण्याबरोबर सादर करावेत.
टीप : पुदिना कोथिंबीर पराठा डाएट पराठा करण्यासाठी तेल न घालता पराठा बनवावा. फक्त हा पराठा किंचित कोरडा होतो.

Read More »

पाऊस पायावर झेलताना..

उन्हाळा आणि हिवाळ्यात जशी चेहरा, त्वचेची काळजी महत्त्वाची तशी पावसाळ्यात पायांची. सतत पावसात भिजून तसंच ओल्या चप्पल, सॅण्डल, शूज पायात राहिल्याने जंतुसंसर्ग होण्याची शक्यता वाढते. पायांच्या नखांना सूज येणे, पायाला खाज येणं, पायाच्या तळव्यांमध्ये आणि बोटांमध्ये भेगा पडणं अशा समस्या उद्भवतात. हे त्रास टाळण्यासाठी योग्य ती काळजी आता सुरुवातीलाच घेऊयात.. शेवटी सौंदर्याच्या परिभाषते 'कोमल' पायांनाही तितकंच महत्त्व आहे..
पावसातून भिजून आल्यास पाय स्वच्छ अ‍ॅण्टिसेप्टीक लिक्विडने धुऊन घ्या आणि लगेच पायाचे तळवे, बोटांच्या मधली जागा स्वच्छ पुसून कोरडी करा.
सहा पायांच्या बोटांमध्ये अगदी छोटीशी जरी भेग पडली असेल तर पाय धुऊन कोरडे करून लगेच अ‍ॅण्टिसेप्टीक पावडर किंवा क्रीम लावा. त्यामुळे पुढे मोठा त्रास होणार नाही.
पावसाळ्यात पायाचे तळवे मऊ ठेवण्यासाठी जर तुम्ही मॉइश्चरायझर क्रीम लावून बाहेर निघत असाल, तर तसं करणं आवर्जून टाळा.
'फूट स्पा', विशेषत: 'फिश पेडिक्युअर' पावसाळ्यात करू नये, कारण ते करताना जास्त वेळ तुमचे पाय पाण्याच्या संपर्कात असतात. त्यामुळे त्वचा नरमते. आणि अशा कोमल त्वचेला इजा होण्याची शक्यता अधिक असते. त्याचबरोबर पेडिक्युअर करताना वापरण्यात आलेलं साहित्य र्निजतुक केलेलं आहे का, हाही मुद्दा महत्त्वाचा ठरतो. त्याची पडताळणी करून मगच पेडिक्युअर करावे.

घरच्याघरीही पायांची योग्य काळजी घेता येऊ शकते. लिंबाची साल घेऊन ती नखांवर चोळावी किंवा टबभर गरम पाण्यात सोडा किंवा एक चमचा मीठ टाकून पंधरा-वीस मिनिटे पाय बुडवून ठेवावेत आणि मग वापरात नसलेल्या टुथब्रशने पायांची नखं, तळवे साफ करावेत. यामुळे पायांवरचे जंतूही निघून जातात आणि नख-पेरांमध्ये साचलेला मळसुद्धा..

पायांची नखं कापलेलीच असू द्या, जेणेकरून आतमध्ये माती साचणार नाही.
बंद शुज वापरणं टाळा, त्यात पाणी साचून राहते. सॉक्स वापरणेही पावसाळ्यात टाळा. पावसातून भिजून आल्यानंतर चप्पल, सॅण्डल धुवायला विसरू नका.
नवीन चपला विकत घेत असाल तर, प्लॅस्टिक किंवा रबरापासून बनवलेल्या घ्या. पावसात त्या लवकर सुकतात आणि जास्त वेळ ओल्या राहत नाहीत.
शक्य असल्यास पावसाळ्यात झोपण्यापूर्वी ऑलिव्ह किंवा बदाम तेल लावून झोपावं.

Read More »

काल्पनिक बद्धकोष्ठता


अनेकदा पोट दुखून येतं, भरल्यासारखं वाटतं.. तेव्हा बद्धकोष्ठता आहे असं आपल्याला वाटतं. अनेकदा ही बद्धकोष्ठता काल्पनिक असते. मग त्यावर आपण जुलाबासाठीची जहाल औषधं घेतो. पण त्याने परिणाम उलटेच होतात. या त्रासाचं मूळ कारण काही वेगळंच असतं..
''विनय, तुम्ही तुमच्यासोबत आणलेल्या सगळ्या फाइल्स, रिपोर्ट्स आणि वेगवेगळ्या अनेक डॉक्टरांनी सुचविलेल्या औषधांकडे बघता मला असं वाटतं की, तुम्हाला निव्वळ बद्धकोष्ठता आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे, मी नाडीसुद्धा तपासून पाहिली. या सर्वाचा निष्कर्ष एकच आहे की, तुमचं पोट खराब आहे आणि या सर्वाचं कारण बद्धकोष्ठता हे आहे. आजतागायत तुम्ही केलेल्या चिकित्सेने (औषधोपचाराने) काही फायदा झाला नसल्यामुळे आज तुम्ही माझ्याकडे आले आहात.
पण तुम्ही तुम्हाला होणा-या त्रासाची नेमकी लक्षणं सांगितलीत तर मी काय मार्गदर्शन करावं, हे ठरू शकेल'', वैद्यराजांनी सूचना केली.
त्यावर विनय उत्तरला, ''वैद्यराज, मला वाटतं की आपण नाडीवरच बरंच काही सांगू शकता. आम्हाला बोलायचीसुद्धा गरज नाही. मला आयुर्वेदावर खूपच विश्वास आहे. आतापर्यंत मी पाच-सहा वैद्यांची भेट घेतली.
अ‍ॅलोपॅथीच्या डॉक्टरांनाही भेटून आलो. तुम्ही बद्धकोष्ठता म्हणत असाल तरी मला एकदम भरल्यासारखं, चोक-अप झाल्यासारखं होत नाही. दिवसातून दोन वेळा तरी शौचास जावं लागतं. गेली सात-आठ वर्षे मला हा त्रास आहे. पोट गच्च वाटतं. वरच्यावर शौचाला जाऊन यावंसं वाटतं. कुठे तरी मी वाचलंय की, सकाळी शौचास जाऊन आल्यावर पोट रिकामं होतं आणि हलकं वाटतं. जर पोट गच्च वाटत असेल तर त्याला 'बद्धकोष्ठता' म्हणतात. मला शौचास गेल्यावर असं वाटतं की, पोट साफ होईल. प्रेशरसुद्धा येतं, पण थांबतं.
बेंबीच्या खाली दोन बाजूस मळ साठून आहे, असं वाटत असतं. तिथे जाडपणा वाटतो आणि क्वचित दुखतंसुद्धा. गेल्या सात-आठ वर्षात अनेक वैद्यांच्या सल्ल्यानुसार, हरडा, त्रिफळा, इसबगोल यांसारखी औषधंही घेऊन पाहिली. अशा प्रकारे जुलाबाच्या औषधांमुळे शौचाला पातळ होते, ब-याचदा पाणी पण निघतं. मी अगदी थकून जातो. पण जुना साठलेला मळ निघत नाही. जुलाबासाठी स्ट्राँग औषध-एनिमासुद्धा घेऊन पाहिलं, पण पाहिजे तसा फायदा होत नाही.''
आता विनयच्या प्रोफेशनवर एक प्रकाशझोत टाकूयात. तो एक प्रोफेशनल चार्टर्ड अकाउंटंट आहे. प्रॅक्टिस उत्तमपणे सुरू आहे. खूपच व्यस्त असतो, तो आपल्या कामात. जेवणाची वेळ ठरलेली नाही. दुपारी दोन-तीन च्या मध्ये आणि रात्री ९.३०-१० च्या मध्ये जेवतो. झोपायला मात्र दररोज १२-१ वाजतात. सकाळी उशिरा उठतो आणि कुठलाही व्यायाम करत नाही. याचं कारण, त्याला वेळ मिळत नाही हे आहे. खाण्यापिण्याचा मात्र तो प्रचंड शौकीन आहे. यापूर्वी अनेक वैद्यांनी बरीच पथ्ये त्याला सुचवली. पण, 'शक्य असेल तेवढीच पथ्य मी पाळीन' हा त्याचा खाक्या. आणि आता त्याच्या या अटीवर मी त्याला औषधयोजना सुचवायची आहे खरी.
पण खरं सांगायचं तर ह्या पेशंटच्या तपासणीमध्ये कुठेही, कसल्याच प्रकारचा अडथळा, जुनाट मळ, ग्रंथी आहे.. असं वाटत नव्हतं. 'कोलोनोस्कोपी' केल्याने आतडयामध्ये जुनाट मळ, ग्रंथी स्वरूपाने अडथळा, गॅस दिसून येतो, त्यातलाही कुठला प्रकार इथे नव्हता. याव्यतिरिक्त इतर रिपोर्ट्ससुद्धा नॉर्मल आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून कधी स्वेच्छेने तर कधी वैद्यांना विचारून वरच्यावर जुलाबाचे औषध घेत राहिल्यामुळे आतडय़ांवर जुलाब घेण्याची सवय लागली. अतिप्रमाणात काम, शारीरिक ताण आणि मानसिक ताणतणावामुळेही हे घडत असतं.या सगळ्याचं मूळ शेवटी आपल्या धावपळीच्या जीवनशैलीत आहे.
त्यासाठी जीवनशैली बदलणं, ती समतोल करणं हिताचं आहे. या समतोलपणात जेवणाच्या वेळेत बदल आणणं, व्यायाम करणं तसंच योगाभ्यास करणं गरजेचं आहे. मन शांत ठेवणं आवश्यक आहे. हळूहळू जुलाब घेण्याची सवयी मोडून योग्य आहाराकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे, हे विशेष महत्त्वाचे! 


Read More »

मधुमेह आणि आयुर्वेद


आहारा-विहारामधील बेशिस्त, अनियमितता या गोष्टी ब-याच रोगांना आमंत्रण ठरतात, हे मधुमेहासारख्या व्याधींकडे पाहून लक्षात येतं. मधुमेहावर आयुर्वेदाने चिकित्सा सांगितलेली आहे. विविध नसर्गिक घटकांचा उपयोग करून मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास आयुर्वेदशास्त्र सांगते. केवळ रक्तातील साखर कमी करणे हा या चिकित्सेचा उद्देश नाही, तर त्याचबरोबर शरीराच्या झिजत चाललेल्या धातुघटकांची झीज थांबवून त्यांचे सारत्व वाढवणे हादेखील चिकित्सेचा उद्देश आहे.
गेल्या अनेक वर्षापासून मधुमेहाचं प्रमाण वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये मधुमेहाचा रुग्ण प्रत्येक पॅथीमधील उपचार करून घेण्याच्या मागे लागतो. आयुर्वेदात काही औषध आहे का, असं विचारत अनेक मधुमेही वैद्यांकडे येतात, ते भलीमोठी तपासण्यांची जंत्री घेऊनच.
अमुक महिन्यांपूर्वी रक्तातील साखर एवढी होती, आता एवढी आहे, त्याचप्रमाणे लघवीवाटे या प्रमाणात साखर जाते आहे, वगरे.. मग आयुर्वेदाची भूमिका नेमकी काय? मधुमेहासंदर्भात अर्थातच आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये इतर रोगांप्रमाणेच सविस्तर वर्णन सापडतं. त्याची कारणं, लक्षणं तसंच चिकित्सेबद्दल केलेलं मार्गदर्शन यांचा थोडक्यात आढावा घेणं गरजेचं आहे.
मुळात 'मधुमेह' हा रोग मूत्राशी संबंधित आहे, असं आयुर्वेदात म्हटलेलं आहे. मूत्राला या रोगामध्ये माधुर्य येतं आणि मूत्रप्रवृत्ती अनेक वेळा व मोठय़ा प्रमाणात होते. प्रमेह या रोगात मूत्राच्या स्वरूपात बदल होतो. मूत्रप्रवृत्ती जी स्वच्छ हवी, ती होत नाही.
निरनिराळ्या स्वरूपात ती होते आणि त्या स्वरूपानुसार प्रमेहाचे एकूण २० (वीस) प्रकार आयुर्वेदाने वर्णन केले आहेत. या प्रकारामध्ये वात, पित्त आणि कफ या तीन दोषांनुसार प्रकार आहेत. यामध्ये कफदोषामुळे होणारे दहा प्रकार, पित्तदोषामुळे होणारे सहा प्रकार आणि वातदोषामुळे होणारे चार प्रकार आहेत.
'मधुमेह' हा प्रकार वातदोषामुळे होणा-या प्रमेहाच्या चार प्रकारांपैकी एक आहे.
प्रमेहाची कारणे :
प्रमेह या रोगाची कारणं आयुर्वेद ग्रंथांमध्ये वर्णन केली आहेत. मधुमेहाला तीच लागू होतात. ही कारणे खालीलप्रमाणे -
१) खूप वेळ आराम करणं, झोप घेणं.  २)  अधिक खाण्याची सवय असणं.  ३)  दह्यासारखे स्रव वाढवणारे पदार्थ अधिक प्रमाणात खाणं.  ४)  थंड प्रदेशात राहणा-या प्राण्यांचे मांस खाणं. ५)  गुळापासून बनवलेले विविध पदार्थ जास्त प्रमाणात खाणं. ६)  अतिथंड, अतिस्निग्ध असे पदार्थ खाणं. तसंच त्यांचं प्रमाणही जास्त असणं. ७)  कफदोष वाढवणा-या इतरही पदार्थाचं अतिरिक्त सेवन करणं. ही प्रमेहाची सांगितलेली कारणं आहेत.
आज जर मधुमेही रोग्यांची नीट विचारपूस केली तर वर सांगितलेल्या कारणांपैकी काहीतरी कारण त्या रोग्यांमध्ये दिसून येतं. तेव्हा आहार-विहारामधील
बेशिस्त, अनियमितता या गोष्टी ब-याच रोगांना आमंत्रण ठरतात, हे पुन्हा एकदा या निमित्ताने लक्षात घ्यायला हवं.
प्रमेह कसा होतो?
वर सांगितलेली कारणं घडल्यामुळे शरीरामध्ये 'विकृत' कफदोष निर्माण होतो. त्याला आयुर्वेदाने 'क्लेद' अशी संज्ञा दिली आहे. या क्लेदामुळे शरीरामध्ये जडत्व येतं. कोणत्याही कामामध्ये उत्साह वाटेनासा होतो. हा क्लेद मूत्रवहनसंस्थेमध्ये जाऊन त्या ठिकाणी विकृती निर्माण करतो आणि विविध प्रकारचे मेह उत्पन्न होतात. त्यापैकी एक 'मधुमेह' होय. मधुमेही व्यक्तींमध्ये क्लेद वाढल्याने हळूहळू धातू शिथिल व्हायला लागतात. मूत्राला माधुर्य येतं. पुढे पुढे तर शरीरातील सातही धातूंचे 'ओज' शरीराबाहेर जाऊ लागते आणि म्हणूनच मधुमेही व्यक्ती चिडचिड करताना आढळतात.
काहींमध्ये एखाद्या विषयीची भीती निर्माण होते. ही लक्षणं 'ओज' कमी झाल्याने होतात. या रोगात एकूणच शरीराचं 'माधुर्य' वाढतं. ब-याच रोग्यांमध्ये तळपाय, तळहाताची आग होते. काही मधुमेहींच्या हाता-पायाला मुंग्या येतात, ते बधिर होतात. मधुमेही व्यक्तींमध्ये दोन प्रकारच्या व्यक्ती आढळतात. काही व्यक्ती स्थूल मधुमेही असतात. त्यांच्यामध्ये धातूंची विकृत स्वरूपात वृद्धी आणि शैथिल्य आढळतं. दुस-या प्रकारच्या मधुमेही व्यक्ती कृश (बारीक) असतात. या व्यक्तींमध्ये वातदोषाच्या अधिक्यामुळे धातू क्षीण होत जातात.
मधुमेही व्यक्तींमध्ये दिसणा-या लक्षणांमध्ये वारंवार मूत्रप्रवृत्तीला जाणं, अधिक तहान लागणं, अधिक भूक लागणं, घाम अधिक येणं आदींचा समावेश होतो. मधुमेहाचं निदान करताना साखरेचं रक्तातील व मूत्रातील प्रमाण पाहत असताना या इतरही लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालत नाही.
मधुमेहावर आयुर्वेदाने चिकित्सा सांगितलेली आहे. विविध नसर्गिक घटकांचा उपयोग करून मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास आयुर्वेदशास्त्र सांगतं. केवळ रक्तातील साखर कमी करणं, हा या चिकित्सेचा उद्देश नाही, तर त्याचबरोबर शरीराच्या झिजत चाललेल्या धातुघटकांची झीज थांबवून त्यांचं सारत्व वाढवणं हादेखील चिकित्सेचा उद्देश आहे.
आवळा आणि हळद ही दोन औषधं मधुमेहात श्रेष्ठ ठरतात, असं 'वानग्भट' या ग्रंथकाराने म्हटलं आहे. एकूणच प्रमेहाच्या सर्व प्रकारांवर या औषधांचा चांगला परिणाम होतो. या दोन औषधांचं चूर्ण प्रकृतीनुसार वैद्यकीय सल्ल्याने योग्य प्रमाणात घेतल्यास फायदा होतो. शिलाजीताचाही मधुमेहात काही प्रमाणात उपयोग होतो.
मधुमेहामध्ये प्रामुख्याने कडू चवीच्या वनस्पतींचा उपयोग केला जातो. शरीरातील माधुर्य यामुळे काही प्रमाणात कमी होतं. यामध्ये गुळवेल, गुड्मार, काडेचिराईत, मेथी-बीज, जांभूळ-बीज आदी अनेक द्रव्यांचा समावेश होतो. मात्र त्या व्यक्तीस कोणतं द्रव्य चिकित्सेसाठी वापरायचं, हे मात्र त्या व्यक्तीची तपासणी करून ठरवावं लागतं. केवळ ही सर्व द्रव्यं एकत्र करून ती कुणाही मधुमेही व्यक्तीने वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेणं हिताचं नाही. याखेरीज खैर व सुपारी यांचा काढा मधुमेहींना प्रशस्त सांगितलेला आहे. प्रमेह गजकेसरी नावाचं एक औषधही मधुमेहासाठी सांगितलेलं आहे.
या औषधांबरोबरच गोड पदार्थाच्या खाण्यावर आपलं संपूर्ण नियंत्रण असणं आवश्यक असतं. वैद्यकीय सल्लागाराने दिलेल्या सल्ल्यानुसार साखरेचे, गुळाचे पदार्थ, मिठाई आदी टाळणं हिताचं ठरतं. त्याचप्रमाणे योग्य प्रमाणात व्यायाम करणं, फिरायला जाणं या गोष्टीही चिकित्सेला नक्कीच पूरक ठरतात.
मधुमेही रुग्णामध्ये 'थकवा' हे लक्षण खूप मोठय़ा प्रमाणावर आढळतं.
यासाठी अश्वगंधा, शतावरी आदी वनस्पतीजन्य औषधांचा उपयोग केल्यास थकवा कमी होतो. आवळा-चूर्ण आणि हळद यांचं मिश्रण करून रात्री झोपण्यापूर्वी काही वेळ घेतल्यास त्यामुळे रात्री लघवीचं प्रमाण कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे तेलिया असणा ही वनस्पतीदेखील मधुमेहात चांगली उपयोगी पडते. गरम पाण्यामध्ये असण्याची भरड टाकून ते पाणी गाळून प्यायल्यास त्यानेही फायदा होतो. अर्थात यासाठी वैद्यकीय सल्ला आवश्यक आहे.

Read More »

झुरक्याने होतो जीवनाला परका !

तंबाखूच्या सेवनामुळे होणारे कर्करोग, फुप्फुसाचे रोग सर्वश्रुत आहेत. मात्र या आजाराचे गांभीर्य दिवसांगणिक वाढत आहे. नुकत्याच झालेल्या जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्ताने धूम्रपानामुळे उद्भवणा-या कोरोनरी अर्थात हृदयाला रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्यांसबंधित विकाराविषयीची विस्तृततामांडणारा लेख..
तंबाखू किंवा तत्सम हानिकारक गोष्टींवर अधिक कर लादून त्या गोष्टींच्या किमतींमध्ये प्रशासनाने बरीच वाढ केली आहे. मात्र त्याचा फारसा उपयोग होत असल्याचे दिसून येत नाही, असंच म्हणावं लागेल. प्रसिद्धी माध्यमांमधून १८ वर्षाखालील मुलांनी धूम्रपान करू नये, असा संदेश वारंवार दाखवण्यात येतो. अनेक प्रकारचे नियम व अटी आहेच. परंतु तंबाखूमिश्रित पदार्थाचे सेवन करून अकाली मृत्युमुखी पडलेल्या भारतातील रुग्णांची संख्या लक्ष्य वेधून घेणारी आहे. दरवर्षी होणा-या ४,४०,००० मृत्यूंपैकी २.४ लाखांपेक्षा अधिक मृत्यू हे धूम्रपान केल्यामुळे होत आहेत. धूम्रपान करणा-या व्यक्तींच्या मृत्यूस बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात. त्यात रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण होणारे अडथळे, विविध प्रकारचे कर्करोग, ऑबस्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज (obstructive pulmonary disease) हा फुप्फुसांमध्ये होणारा एक चिवट रोग यांसारख्या आजारांचा समावेश आहे.
'अथरोस्लेरोसिस (रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होणे)' हा आजार म्हणजे धूम्रपानामुळे होणा-या सर्वाधिक मृत्यूंसाठी कारणीभूत ठरणारा आजार आहे. याविषयी केल्या गेलेल्या विविध अभ्यासांतून ही बाब स्पष्ट झाली आहे की, धूम्रपान हे कोरोनरी (हृदयाला रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्यांसबंधित) हृदयविकार होण्याचे प्रमुख कारण आहे आणि त्यामुळे पुढे हृदयविकाराचा झटका येण्याचीही शक्यता बळावते. तंबाखूशी संबंधित आजार म्हणजे जागतिक स्तरावरील लोकांच्या आरोग्याशी निगडित गंभीर समस्या बनली आहे. या विषयीच्या सर्वेक्षणानुसार, जगभरात १.१ दशलक्ष व्यक्ती धूम्रपान करतात आणि धूम्रपान करत असलेल्या २५० लक्ष व्यक्ती भारतात राहतात.

हृदय आणि रक्तवाहिन्यांवर धूम्रपानाचा होणारा परिणाम:-

> तंबाखूमध्ये असलेल्या रसायनांमुळे रक्तपेशींना धोका पोहोचू शकतो. तसंच हृदयाचं कार्य, रक्तवाहिन्यांची रचना आणि त्यांच्या कार्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. अर्थातच या विपरित परिणामांमुळे अथरोस्लेरोसिस हा आजार होण्याची शक्यता अधिक वाढते.
> अथरोस्लेरोसिस (Atherosclerosis) हा एक असा आजार आहे, ज्यामुळे रक्त वाहून नेणा-या धमन्यांमध्ये मेणासारखा चिकट पदार्थ जमतो. ज्यामुळे कालांतराने हा चिकट पदार्थ घट्ट होऊन धमन्यांचा मार्ग अरुंद करतो. याचा परिणाम ऑक्सिजनने परिपूर्ण असलेलं रक्त शरीराच्या इतर भागांपर्यंत वाहून नेण्याच्या प्रक्रियेवर होतो.
> कोरोनरी रक्तवाहिन्यांमध्ये जर हा चिकट पदार्थ जमा झाला तर कोरोनरी हृदयविकार (Coronary Heart Disease- C.H.D) उद्भवतो. काही काळानंतर या सीएचडीमुळे छातीत दुखणं, हृदयविकाराचा झटका येणं, हृदय बंद पडणं, ऐरिथमियस किंवा मृत्यूपर्यंतचे प्रसंग ओढवू शकतात.
> त्यामुळे हृदय विकाराची समस्या उद्भवण्यामागे धूम्रपान हे अत्यंत महत्त्वाचं कारण आहे. त्याचबरोबर रक्तातील कोलेस्टरॉलची कमी-जास्त पातळी, उच्च रक्तदाब, वाढलेलं वजन आणि स्थूलपणा यांसारख्या समस्यादेखील तितक्याच कारणीभूत ठरू शकतात. धूम्रपानाची सवय असल्यास हृदयविकार होण्याची शक्यता अधिक वाढते.
> धूम्रपानामुळे पेरिफेरल आर्टेरियल डिसीझ (peripheral arterial disease- P.A.D.) हा आजार होण्याची शक्यताही अधिक वाढते. पी.ए.डी. या आजारामध्ये, डोके आणि इतर अवयवांकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये चिकट पदार्थ जमा होतो. त्यामुळे पी.ए.डी हा आजार असलेल्या रुग्णांमध्ये हृदयविकार, हृदयविकाराचा झटका येणं आणि स्ट्रोक यांची शक्यता अधिक असते.
> धूम्रपान कितीही कमी अधिक प्रमाणात केलं तरी त्याचे परिणाम विपरीतच होतात. काही व्यक्तींमध्ये विशेषत: गर्भनिरोधक औषधे घेणा-या महिला आणि मधुमेह असणा-यामध्ये या आजाराचं प्रमाण वाढत आहे.
> धूम्रपान करताना तोंडावाटे बाहेर फेकल्या जाणा-या धुरासही 'सेकंडहँड स्मोक' म्हणतात. 'सेकंडहँड स्मोक' हा धुराचा एक असा प्रकार आहे, जो सिगारेट, सिगार किंवा पाइपच्या जळत्या बाजूने येतो. 'सेकंडहँड स्मोक'मध्येही धूम्रपानातून शरीरात ओढल्या जाणाऱ्या अनेक रसायनांचा समावेश असतो. विशेष म्हणजे धूम्रपान करणा-या व्यक्तींना ज्याप्रमाणे हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आजाराचा धोका संभवतो, त्याचप्रमाणे धूम्रपान न करणा-या व्यक्तींना 'सेकंडहँड स्मोक'मुळे धोका उद्भवू शकतो. लहान मुलं, किशोर वयातील मुलांमध्ये भविष्यात 'सीएचडी' होण्याची शक्यताही 'सेकंडहँड स्मोक'मुळे वाढते आहे, कारण यामुळे:
> एचडीएल कोलेस्टरॉलचं प्रमाण (काहीवेळेस याला चांगलं कोलेस्टरॉल म्हटलं जातं) कमी होतं.
> रक्तदाब वाढतो.
> हृदयातील पेशींची हानी होते.
'सेकंडहँड स्मोक'मुळे उद्भवणारे धोके हे मुदतपूर्व जन्माला आलेल्या आणि रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (आरडीएस) ही समस्या असणाऱ्या नवजात बालकांमध्ये अधिक आढळतात. तसंच दम्याची प्रकृती असणा-या मुलांनाही यामुळे अधिक त्रास होऊ शकतो.


टप्प्याटप्प्याने धूम्रपान सोडले तर ..
पहिला टप्पा - २० मिनिटांनंतरतुम्ही हवा दूषित होणे थांबवू शकाल. तुमचा रक्तदाब आणि हृदयाचे ठोके कमी होतील आणि हात आणि पायांचे तापमान वाढेल.
दुसरा टप्पा –  ८ तासांनंतरतुमच्या रक्तातील कार्बन मोनोक्सॉईडची पातळी सामान्य स्थितीस येऊन तुमच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढेल.
तिसरा टप्पा - २४ तासांनंतरतुम्हाला हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होईल.
चौथा टप्पा - ४८ तासांनंतरनव्‍‌र्ह एंडिंग्जना निकोटिनच्या अभावाची सवय होईल. तसेच चव आणि वास ओळखण्याची तुमची क्षमता पूर्वपदावर येईल.
पाचवा टप्पा – २ आठवडे किंवा ३ महिन्यानंतरशरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारून व्यायाम करण्याची क्षमता वाढेल. त्याचबरोबर खोकला, सायनस कंजेशन, थकवा आणि श्वासलागणे यांसारख्या समस्यांचे प्रमाण कमी होईल.
सहावा टप्पा - १ वर्षानंतरहृदय विकार उद्भवण्याचा धोका धूम्रपान न करणा-या व्यक्तीइतकाच निम्म्याने कमी होईल.
सातवा टप्पा - ५ ते १५ वर्षानंतरधूम्रपान ज्यांनी कधीही केलेले नाही त्यांच्याइतकाच तुम्हालासुद्धा स्ट्रोकचा त्रास होण्याची शक्यता कमी होईल.
आठवा टप्पा - १० वर्षानंतरफुप्फुसांच्या आजाराने मृत्यू येण्याचा धोका हा आयुष्यभर कधीही धूम्रपान न करणा-या व्यक्तीइतकाच कमी होईल. तोंड, स्वरयंत्र,अन्ननलिका, मूत्राशय, मूत्रिपड आणि स्वादुपिंड यांसारख्या अन्य प्रकारच्या कर्करोगांची शक्यता कमी होते.

Read More »

तुम्हाला अकारण थकल्यासारखं वाटतंय?


व्यवस्थित खाणंपिणं आणि विश्रांती घेऊनही तुम्हाला दिवसभर थकवा आणि सुस्ती जाणवते का? अनेकांना ही समस्या भेडसावत असते. या समस्येची कारणं तुमच्या दिनचर्येतच आहेत. जेवणाच्या चुकीच्या वेळा, चुकीची पद्धती आणि व्यायामाचा अभाव या कारणांवर उपाययोजना करायला हव्यात.
''वैशाली आता उठशील का? आठ वाजून गेलेत. खूप उशीर झालाय. तुझे सासरे आणि नवरा दोघेही थोडयाच वेळात ऑफिसला जायला निघतील. सकाळी जेवणात काय बनवायचं हे मला सांगितलंस तर कुकर लावते. तयार होऊन किचनमध्ये ये. तुझी तब्येत तर ठीक आहे ना?''
''अरे बापरे! आठ वाजले? मला तर कळलंच नाही. लवकर लवकर बाबांसाठी ब्रेकफास्ट तयार करते. जेवणाचं नंतर बघू. हल्ली मी खूप थकते हो आई! झोपून झाल्यावरसुद्धा शरीरात स्फूर्ती वाटत नाही. अंग जड वाटतंय, जणू अनेक वर्षापासून थकलंय. सुगंधा उठली का? सध्या शाळेला सुट्टया आहेत त्यामुळे सकाळची धावपळ करावी लागणार नाही, अन्यथा आता काहीही करावसं वाटत नाहीए.''
''मला समजतं गं! लग्न होऊन या घरात आल्यापासून तू धावपळ करतेयस! पण गेल्या एक-दीड वर्षापासून मी पहातेय, पूर्वीसारखी तुझ्या अंगात स्फूर्ती नाही. पण तुझ्या बाबतीत सांगायचं तर तुझं वय कमी आहे. शारीरिक श्रम फारसे करावे लागत नाहीत. घरातली धुणे-झाडू-फरशी-भांडी या कामांसाठी मदतीला बाई आहे. सुगंधा तर स्कूल बसने जाते. घरात आपण अवघी चार माणसं आहोत. तुला आलेला थकव्याचे कारण जीवनशैली किंवा चुकीची आहारयोजना असू शकते.''
''खरं आहे आई, हल्ली मी खाण्यापिण्याच्या बाबतीत खूपच अनियमित झाले आहे. हल्ली मी चीज, आइस्क्रीम, तसंच तळलेले आणि पचायला जड पदार्थ खात असते. गेल्या दोन वर्षात माझं वजन १० किलोंनी वाढलं आहे. तुमच्यासारखं नियमित फिरायला जाणं, व्यायाम करणं हे सर्व मला जमत नाही. आम्ही रोज बाराच्या आधी झोपतही नाही आणि सकाळी सातच्या ठोक्यापर्यंत उठणंही होत नाही. रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठून तुमच्यासारखे व्यायामसुद्धा करायचे आहेत. दुपारी झोपणं थांबवायचं आहे.
तुमच्या म्हणण्याप्रमाणे मला कुठलाही आजार नाही, तरी मला हातापायाचे मांसपेशी दुखत राहतात. गुडघे दुखतात. सतत डोकं दुखत असतं. पोट जड वाटतं. तुम्ही याला आम्लामुळे 'अपक्व अवरस' होणारे लक्षण आहे. काम केल्याने थकवा येणं स्वाभाविक आहे. काम न केल्याने सुद्धा जेव्हा थकवा येतो, तेव्हा काय करावं?''
''आम्ही साठीला आलो. आमच्याशी तुमची तुलना होणार नाही. पण आमचंही जागरण होतं. झोप पूर्ण होत नाही. थकवा येतो. आमच्याने जास्त श्रम होत नाही. थोडे श्रम केल्यावर थकवा येणं, हे नैसर्गिक आहे. या वयात शरीराची बरीच झीज झालेली असते. आणि अन्य धातूंचे पोषणही होत नाही त्यामुळे थकवा वाढतो. पण मी नियमित मॉर्निग वॉक करते. थोडेच पण नियमित व्यायाम करते. तसंच आठवडय़ातून दोन-तीन वेळा शरीराचे मालिश करून घेते. वेळेत जेवते आणि खारीक, खजूर, अंजीर आणि बदाम नियमित खाते. यामुळे माझे स्वास्थ्य चांगलं राहतं. फारसा थकवा येत नाही.

तुम्ही तरुणांनीही या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. त्यात विशेष असं काही नाही. व्यवस्थित योग्य वेळी झोपणं, योग्य आहार, थोडेफार व्यायाम करणं आवश्यक आहे. तुला अ‍ॅनेमिक डिप्रेशन, इन्फेक्शन किंवा इतर कुठलेही रोग नाहीत. मासिक पाळीचा त्रास नाही. (ह्या रोगांमुळे सुस्ती येणे, थकवा येणे स्वाभाविक आहे.)

तुम्ही रात्री उशिरा जेवण घेता ते योग्य नाही. जेवण साधारण सायंकाळी आठ च्या आतच घ्यायला हवं. आणि हो, टीव्ही बघत जेवणाची जी पद्धत आहे त्यामुळे खूप नुकसान होतं. ती आधी बंद करा. त्याऐवजी थोडं खाली फिरून आलात तर शरीराला व्यायाम मिळेल. आणि त्याशिवाय ध्यान आणि प्राणायाम करणं शक्य झालं तर सुदृढ आयुष्य जगता येईल.''

Read More »

बार्ली-मूग सुप

नेहमीचे तेच तेच पदार्थ खाउन घरी कंटाळा येतो म्हणुन काही तरी दुसरे खाऊ  म्हणुन बार्ली मूग सुपची चव घेऊ. 
साहित्य : ३/४ वाटी मोड आलेले मूग, ३-४ तास पाण्यात भिजवून ठेवलेली बार्ली १/२ वाटी, दोन टोमॅटो, दोन गाजर, एक कांदा, थोडीशी पानकोबी, २/३ ठेचून घेतलेल्या लसणीच्या पाकळ्या, किसून घेतलेले आले, ५-६ कढीपत्त्याची पाने, १ चक्री-फूल, दीड चमचा मालवणी मसाला (सांबार किंवा पावभाजी मसाला चालेल), लिंबाचा रस आणि मीठ चवीप्रमाणे, १ टेबलस्पून तेल, १/२ चमचा जिरे
कृती : मोड आलेले मूग आणि बार्ली एकदा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी. दोन वेगवेगळ्या पातेल्यात थोडं पाणी घालून या दोन्ही गोष्टी प्रेशर कुकरमध्ये तीन शिटय़ा येईपर्यंत शिजवून घ्याव्यात. (दोन्ही गोष्टी एका भांडय़ात एकत्रच शिजवल्या तरी चालतील) नंतर पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे आणि चक्री-फूल घालावे. त्यानंतर ठेचलेल्या लसूण पाकळ्या, आले, गाजर, टोमॅटो, कांदा इत्यादी घालून परतावे. वरून थोडे पाणी घालून गाजर मऊ होऊपर्यंत झाकण ठेवून शिजू द्यावे.
आता त्यात कढीपत्त्याची पाने, पानकोबी, शिमला मिरची घालावेत. वरून मालवणी मसाला आणि एक ग्लास पाणी घालावे. मिश्रण उकळले की, त्यात शिजवलेली मूग आणि बार्ली घालावी. मग पळीने किंवा पावभाजीच्या चपटया चमच्याने हे मिश्रण घोटून घ्यावे. आणि झाकण ठेवून मध्यम आचेवर पंधरा मिनिटे शिजू द्यावे. अधून-मधून दोन-तीन वेळा मिश्रण ढवळावे.
आता चवीप्रमाणे यात लिंबू रस आणि मीठ घालावे. मिश्रण घट्ट वाटल्यास थोडे पाणी घालावे आणि एक उकळी आणून गॅस बंद करावा. असे हे पोटभरीचे गरम सुप तयार आहे. त्यावर बटर किंवा क्रीम, कोथिंबीर घातली की हे खूप खाण्यासाठी एकदम तयार!
टीप : मुगाऐवजी चवळी, काबुली चणे, राजमा, मुगडाळ,
मसुरडाळ वापरली तरी चालेल. तेलाऐवजी बटर वापरल्यास स्वाद अजून चांगला येतो.

Read More »

रक्तानुबंध

आपल्या शरीरात रक्त गोठणं अथवा त्याची गुठळी बनणं आणि पुन्हा ती विरघळणं ही प्रक्रिया सहज रूपात सुरू असते. रक्ताची गुठळी निसर्गत: बनण्याच्या या वैशिष्टयामुळेच जखम झाल्यानंतर रक्त वाहणं आपोआप थांबतं. जखम बरी झाल्यानंतर या गुठळ्या विरघळूनदेखील जातात. परंतु ज्या वेळी या प्रक्रियेमध्ये अडचण निर्माण होते, तेव्हा रक्ताची गुठळी तशीच राहते. दीर्घकाळ यावर उपचार न झाल्यास ते गंभीर रोगाचे रूप धारण करू शकते. ब्लड क्लॉटिंग अर्थात रक्ताची गुठळी होणं म्हणजे काय? ते कसे होते, त्याची निर्मिती आणि त्यापासून बचाव कसा करता येऊ शकतो, याबाबत जाणून घेऊ.
 आपल्या शरीरात रक्तवाहिन्यांद्वारे रक्त वाहत असते. सतत वाहणारं हे रक्त हृदयापर्यंत जातं आणि पंपिंगद्वारे शुद्ध झाल्यानंतर शरीराच्या अन्य मुख्य अवयवांकडे आणि पेशींपर्यंत पोहोचतं. हेच रक्त पुन्हा धमण्यांद्वारे हृदयाकडे पुन्हा पाठवलं जातं. हृदयापर्यंत पाठविण्याच्या या प्रक्रियेत धमण्या आकुंचन पावतात, कारण शरीराच्या पेशी रक्त परत पाठवण्यासाठी ताकद लावतात. याच वाहत्या रक्तामध्ये कधी कधी 'क्लॉट' म्हणजेच गुठळी बनते. ही रक्ताची गुठळी आपोआपच बनते. सामान्य प्रक्रियेमध्ये ही गुठळी क्षतीग्रस्त नलिकांची दुरुस्ती करण्याचं कामदेखील करते.
असं झालं नाही तर, जखम झाल्यानंतर शरीरातील रक्ताचं वाहणं रोखणं अवघड होऊन बसेल. रक्तातील प्लाझ्मामध्ये प्लेटलेटस् आणि प्रोटिन्स असतात. जखम झालेल्या ठिकाणी ते रक्ताच्या गुठळ्या निर्माण करून रक्त वाहणं रोखतात. सामान्यत: जखम बरी झाल्यानंतर रक्ताची गुठळी आपोआप विरघळते. पण रक्ताची गुठळी न विरघळणं आणि दीर्घकाळापर्यंत तशीच राहणं आरोग्यासाठी धोकादायक असतं. त्यासाठी तपासणी आणि उपचाराची गरज असते. उपचार न करता दीर्घकाळ तसेच राहिल्यास रक्ताच्या गुठळ्या धमण्या अथवा नसांमध्ये जातात आणि शरीरातील कुठल्याही भागात म्हणजे डोळे, हृदय, मेंदू, फुप्फुसे, किडनी इत्यादी ठिकाणी जाऊन त्या अवयवांचं काम बाधित करतात.
डोळे : रक्ताच्या गुठळ्या शरीराच्या कुठल्याही भागात जाऊ शकतात. ही गुठळी रक्तप्रवाहाद्वारे डोळ्यामध्ये पोहोचू शकते. ही गुठळी आपल्याला दिसेल की नाही, हे ती डोळ्यांतील कुठल्या भागात आहे यावर अवलंबून असते. यामुळे डोळ्यांमध्ये वेदना आणि नजर अस्पष्ट होणं, ही लक्षणं दिसतात. अनेकदा या गुठळ्या आपोआपच बऱ्या होतात. पण तरीही याबाबत वेळीच नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कारण बरेचदा यासाठी शस्त्रक्रियादेखील करावी लागते.
मेंदू : मेंदूमध्ये रक्ताची गुठळी असल्यास या गुठळीचा परिणाम जोपर्यंत शारीरिक क्रिया, हालचालींवर दिसत नाही तोपर्यंत त्याची चटकन माहिती होत नाही. या संकेतांमध्ये संभावित पक्षाघात, बोलणं आणि समजण्यास अडचण, चक्कर येणं इत्यादींचा समावेश होतो. अनेकदा उलटीदेखील येऊ लागते. परिस्थिती गंभीर असल्यास शस्त्रक्रिया करावी लागते.
हृदय किंवा फुप्फुसे :  ज्या वेळी फुप्फुसे किंवा हृदयामध्ये रक्ताची गुठळी बनते तेव्हा त्याची लक्षणं हृदयाचा झटका येण्यासारखीच असतात. छातीच्या भागात वेदना होतात. श्वास घ्यायला अडचण येऊ लागते आणि जबडा किंवा मानेमध्ये वेदनेचा अनुभव येऊ शकतो. पाठ आणि हातांमध्येदेखील वेदना होऊ शकतात. तसंच हृदयात गुठळी बनणं, हे हृदयाचा झटका येण्याचं कारण बनू शकतं.
पाय आणि हात :  जर रक्ताची गुठळी पाय किंवा हातामध्ये बनली तर ज्या ठिकाणी ती बनली आहे, त्याच्या खालच्या भागात आणि हाताच्या कुठल्याही भागात सूज येऊ शकते. पाय आणि हाताच्या गुठळ्यांच्या सामान्य लक्षणांमध्ये त्वचेवर लाली येणं, अधिक गरम होणं आणि अस्वस्थता इत्यादी लक्षणांचा समावेश होतो.
अस्पष्ट लक्षणं :  रक्ताच्या गुठळ्या झाल्यास अन्य प्रकारची एकत्रित लक्षणं निर्माण होऊ शकतात. यामध्ये गुडघे आणि मनगटावर कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे रेषा आणि लाल दाणे दिसतात. रक्तातील प्लेटलेट्सची संख्या अधिक प्रमाणात कमी होते. तेव्हा नाक आणि हिरडयातून रक्तस्रवदेखील होऊ शकतो. त्वचेमध्येदेखील रक्तस्रव होऊ शकतो. हा रक्तस्रव छोटयाछोटया लाल डागांच्या स्वरूपात दिसतो. या समस्येवर वेगवेगळ्या पद्धतीने इलाज केले जातात. गुठळीचे स्थान आणि रुग्णाचे आरोग्य यावर ते अवलंबून असते.
उपचार :  या समस्येसाठी अ‍ॅण्टीकोग्युलँट्स म्हणजे गुठळी बनण्यास रोखणारं औषध दिलं जातं. 'क्लॉट ब्लस्टर्स' म्हणजे रक्ताची गुठळी विरघळवणारं औषध दिलं जातं. 'कॅथेटर निर्देशित थ्रंबोलायसिस' ही अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये कॅथेटर नावाची एक लांब नळी शस्त्रक्रियेद्वारे शरीरात टाकली जाते आणि रक्ताच्या गुठळीजवळ नेली जाते. त्याठिकाणी गुठळी विरघळवणारं औषध सोडलं जातं. साकळलेलं रक्त -हास पावण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. थ्रोंबक्टॉमी – शिरेतून किंवा धमनीतून साकळलेलं रक्त वा गुठळी काढणं, यांसारखे वेगवेगळे उपचार केले जातात.

Read More »

मयुराचे पोट का दुखत होते?

सध्या लग्न आणि पाटर्य़ाचा 'सीझन' जोरात सुरू आहे. पंगतीत वा बुफेमध्ये ताव मारून जेवणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधीच.. आणि त्यासोबतच उद्भवणारे पोटासंदर्भातील विविध आजार आणि दुखणी यांनाही आयत आमंत्रणच..! पण कधी कधी पोट दुखण्याची इतर अनेक कारणंही असू शकतात. या सगळ्यांवर उपाय मात्र एकच असू शकतो.
मयुराचं आता कसं आहे? तिला आता बरं वाटतयं का? रात्री उशिरा फोनवर बोलणं झाल्यावर लगेचच फोन ठेवून दिला. म्हटलं सकाळी उठल्यावर विचारू. मयुराचं पोटं आणि ओटीपोटही खूप दुखतं होतं. फुगलंही होतं. त्यामुळे तिला नीट बसताही येतं नव्हतं आणि झोपणं तर कठीणचं होतं. रात्री साधारण तीन वाजण्याच्या सुमारास दुखायला सुरुवात झाली. सुरुवातीला वाटलं की, पाळी येणारं असेल म्हणून दुखत असावं. एरवीही मासिक पाळीच्या वेळी खूपच त्रास होत असतो. पहिल्या दिवशी खूपच दुखत असल्यामुळे 'पेनकिलर'ची गोळी घ्यावीच लागते. तशीच तिची ती गोळीही घेऊन झाली होती. पण दीड तासांनंतरही दुखणं कमी न झाल्यामुळे काळजी वाटायला लागली.
गेल्या चार-पाच दिवसांपासून तिला थोडं 'युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन'ही झालं होतं. मयुराच्या आईने त्यांच्या फॅमिली डॉक्टरला फोन केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, 'पेनकिलर घेतलेली असल्यामुळे काळजी करण्यासारखं काही कारण नाही. पोटदुखी अनेक कारणांमुळे होऊ शकते. पेनकिलरनेही दुखणं कमी झालं नाही तर सकाळी दाखवायला घेऊन या, वाटल्यास सोनोग्राफी करून पाहू या,' असं त्यांनी सांगितल्यावर मयुराच्या आई जरा निश्चिंत झाल्या. पण सकाळी दहाच्या सुमारास तिचं पोट जास्तच फुगलं, कडक झालं आणि मळमळायला लागलं.
तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये न्यावं असं त्यांना वाटायला लागलं. तितक्यात वैद्यबुवांची आठवण झाली. मी एकदा खाल्लेलं पचण्यासाठी औषध दिलं होतं. ते त्यांनी मयुराला दिलं. त्याने तिला बरं वाटलं.
अचानक असं का झालं? कशामुळे दुखत होतं. मी नेमकं काय औषध दिलं? मयुराच्या आईला प्रश्न मात्र पडले.
मी म्हणालो, तुम्ही काल संध्याकाळी लग्नाला गेला होतात. तिथे खाण्यामध्ये काही (अपथ्यकर) खाल्लं गेलं असेल? या उन्हाळ्यामध्ये मी कुठेही जेवयाला जात नाही आणि जावंच लागलं तर आमरस, बासुंदी किंवा कोणत्याही प्रकारची मिठाई तर अजिबात खात नाही.
मयुराच्या आई म्हणाल्या, 'तुम्ही म्हणता हे खरं आहे. पण आमच्या मयुराला गोड आवडत नाही. म्हणून तिच्या ताटात आमरस, बासुंदी किंवा मिठाई असे पदार्थ असूच शकत नाहीत. मला ठाऊक आहे की तिला भूक लागली नव्हती, म्हणून तिने खूपच कमी खाल्लं होतं. तरीही पोटदुखी, पोट फुगणं, उलटया झाल्यास प्रथम शंका जेवणातील पदार्थावरच येणं साहाजिकच आहे. अजीर्णपणामुळे, वाताने पोट फुगल्यामुळे, मासिक पाळीचा त्रास आदी कारणांमुळे उद्भवणा-या दुखण्यामुळे किंवा 'युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन'मुळे हे दुखणं आहे, असं आम्हाला वाटत होतं. परंतु त्याचं नक्की कारण ठरवता येतं नव्हतं.
फॅमिली डॉक्टरांनी दिलेली औषधसुद्धा घेऊन झाली. शेवटी वैद्यबुवा आठवले. तुम्हाला फोन केला.'
खरं तर फोनवर बोलून रोगाचं निदान होऊ नव्हतं. परंतु अपचन, युटीआय आणि मासिक पाळी या तिन्ही शक्यता विचारात घेऊन एक अतिशय सोपं पण तितकंच गुणकारी औषध सुचवलं. ते म्हणजे पुदिन्याचा अर्क. पुदिन्याचा अर्क या तिन्ही त्रासांवर उत्तम औषध आहे. पुदिन्याच्या अर्कासोबतच त्यामध्ये तुळस, ओवा आणि चित्रक (वनौषधी) यांचं एकत्रित मिश्रण वैद्यबुवांनी मयुराला द्यायला सांगितलं. त्यानंतर सुदैवाने तिला अध्र्या तासात खूप बर वाटलं आणि ती शांत झोपली.
पुदिना अन्न पचवतो. लघवीचं प्रमाण वाढवतो. तसंच ताप, चामडीचे विकार, खोकला, सुकलेला कफ पातळ होण्यासाठी तसंच वारंवार येणा-या उचक्या अशा विविध समस्यांवरही देता येतं.
पुदिन्याच्या चटणीचा रोजच्या आहारात समावेश केल्यास वात आणि कफ या संदर्भातील अनेक आजारांवर प्रतिबंधात्मक उपाय होतो.
पण मला सांगताना अतिशय आनंद होतोय, की मयुराला आता यापुढे पोटासंबंधित दुखण्यांवर वेगवेगळ्या प्रकारच्या 'पेनकिलर्स' घ्याव्या लागणार नाहीत. पुदिन्यामुळे मयुराची पचनशक्तीही सुधारेल. तसंच लघवीच्या इन्फेक्शनच्या आणि पाळीच्या वेळी पोटदुखीच्या त्रासापासूनही हळूहळू सुटका होईल.

Read More »

अडाई

सुट्टीच्या काळात लहान मुलं खेळायला बाहेर निघतात.पण खेळण्या बरोबरच पोष्टीक आहारांची सुद्धा त्यांना गरज असते.
साहित्य : १ भाग हरभरा डाळ (चणा डाळ), १ भाग मूग डाळ (शक्यतो साल असलेली), १ भाग उडीद डाळ (साल असलेली), १ भाग तूरडाळ, १ भाग तांदूळ (ब्राउन राइस वापरल्यास उत्तम), चार लाल सुक्या मिरच्या, २ ते ३ लसूण पाकळय़ा, २ चमचे खोबरं (ओलं किंवा सुकं खोबरं. कोणतेही चालेल), डोसे काढण्यासाठी तेल आणि चवीपुरतं मीठ.
कृती : सर्व डाळी आणि तांदूळ नीट निवडून धुऊन पाण्यात कमीत कमी सहा ते सात तास भिजत ठेवावेत. त्यात लालमिरची आणि लसूण घालावी. त्यानंतर सहा ते सात तासांनंतर त्यातलं पाणी बाजूला काढून घ्यावं. भिजवलेली धान्यं मिक्सर किंवा फूड प्रोसेसरमधून बारीक करावीत. शक्यतो जितकं बारीक करता येईल तितकं करावं. त्यात गरज लागेल तसं धान्य भिजवलेलं पाणीच घालावं. शेवटी मीठ आणि खोबरं घालावं.
अडाईसाठीचं पीठ साधारण डोशाच्या पिठासारखंच पातळ असावं. गरम नॉनस्टिक तव्यावर नेहमीच्या डोशासारखे डोसे करावेत. अडाई नेहमीच्या डोशापेक्षा थोडे जाडसर असतात. चटणीबरोबर खायला द्यावेत.
टीप : अडाईचं पीठ आंबवलं नाही तर चालतं. पण पिठात किसलेल्या भाज्या घालणार असलात तर पीठ खूप जास्त दिवस ठेवू नये.
पौष्टिक मूल्य : या रेसिपीत जीवनसत्त्व 'अ' आणि 'ब'चं प्रमाण असतं. शिवाय या पदार्थातून प्रथिनं आणि कबरेदकंही आपल्या शरीरात जातात. अडाईमध्ये भाज्या घातल्या तर फायबरचं प्रमाण वाढेल. हा तमीळ पद्धतीचा डोसा लहान मुलांना आवडेल. खोबरं आणि हरभ-यांच्या चटणीबरोबर तो चविष्ट लागतो.

Read More » 

No comments:

Post a Comment