Tuesday, October 15, 2013

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

रंगरंगोटी केसांची!

केसांना रंग लावणं ही आजकाल फॅशन नाही तर हेअर स्टायिलगमधला अत्यावश्यक प्रकार मानला जातो. केस छोटे असोत वा मोठे, रंग लावून त्यांचं सौंदर्य वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र केसांवर रंग लावण्याआधी त्या उत्पादनाची आणि त्यामुळे होणा-या परिणामांची पूर्ण माहिती करून घेणं आवश्यक आहे.

स्त्रीसौंदर्याचा मुकूट म्हणजे केस. म्हणूनच केसांना अलंकाराचा दर्जा दिला जातो. लांबसडक केस सौंदर्यात भरच टाकतात. अशा सौंदर्यात भर टाकणा-या केसांची निगा राखण्यासाठी अनेक महिला नाना प्रकारची औषधं, शॅम्पू, महागातली तेलं वापरत असतात. केसांची देखभाल करण्यासाठी महिला खूप धडपड करत असतात. त्यातीलच एक प्रकार आहे तो म्हणजे केसांना रंग लावून आकर्षक बनवण्याचा. आकर्षक दिसत असले तरीही केसांना रंग केल्यावर केसांची अवस्था कशी होईल याचा विचार करून कित्येक महिला हेअर कलर लावायला घाबरतात. केसांना रंग लावल्यानंतर केस रूक्ष होऊन तुटतात, खराब होतात असा समज असतो. म्हणूनच केसांना रंग करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या टिप्सचा विचार केलात तर तुम्ही बिनधास्तपणे केस रंगवू शकता.

> रंगाची निवड करण्यापूर्वी तुमच्या केसांचा नैसर्गिक रंग, त्वचा यांचा विचार करूनच स्वत:ला शोभेल असाच रंग निवडा.

> सुरुवातीला केसांच्या दोन बटांनाच रंग लावा. एक बट हलक्या तर दुसरी गडद रंगात रंगवावी. त्यानंतर जो रंग योग्य वाटतो, तोच रंग संपूर्ण केसांना लावावा.

> सामान्य रंगाच्या त्वचेला मध्यम ब्राऊन, लाल व तपकिरी, सोनेरी रंग छान दिसतो, तर काळ्या किंवा सावळ्या त्वचेला तपकिरी, सोनेरी आणि गडद चॉकलेटी रंग खुलून दिसतात.

> केसांना रंग लावल्यानंतर चेह-यावर हलकासा मेकअप करावा. म्हणजे रंगासोबत तुमचा चेहराही उजळेल.

> केस डॅमेज होण्याची किंवा तुटण्याची भीती वाटत असेल तर रंग लावण्यापूर्वी केस एकदा हेअर स्पेशालिस्टला दाखवून त्यांचा सल्ला आवर्जून घ्यावा.

> खरं म्हणजे केस तुटणे अथवा दुभंगणे याबाबत केसांना लावलेले रंग पूर्णत: दोषी नसतात. यूवी किरणांचा परिणाम केसांवर होऊन केस दुभंगण्याची भीती अधिक असते.

> रंग लावल्यानंतर केस धुतले, की ते सुकवण्यासाठी अधिक तापलेल्या हेअर ड्रायरचा वापर करू नये. त्यामुळे केस जळून खराब होण्याची भीतीच अधिक असते. रंग लावल्यानंतर नैसर्गिक पद्धतीने केस सुकवावेत, जेणेकरून केसांचा रंग सुंदर दिसेल.

> निवडक शॅम्पू किंवा कंडिशनर लावल्याने केसांची दुर्दशा होणार नाही. सतत शॅम्पू बदलल्याने केसांवर परिणाम होतो. म्हणूनच नेहमी एकाच कंपनीचा शॅम्पू वापरा.

> केसांना रंग लावण्यापूर्वी अंडयाचा बलक केसांना लावून केसांची निगा ठेवू शकता. केस धुण्यापूर्वी केसांना अंडयाचा बलक लावून थोडा वेळ सुकू द्यावा. त्यानंतर केस धुवावेत. हा अंडयाचा बलक कंडीशनरप्रमाणे काम करून केसांना मुलायम करतो. यामुळे तुमच्या केसांचा रंग आणखी उठून दिसेलच शिवाय केसांना एक वेगळी चमक येईल. मुगाची डाळ वाटून तिची पेस्ट केसांना लावून केस धुतल्यास केस मुलायम होण्यास मदत होते.

> रंगवलेल्या केसांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते. केस मुळातच रफ असतील तर रंग लावल्यानंतर तुम्हाला त्यांची विशेष काळजी घ्यावी लागेल. मुख्य म्हणजे केसांचा यूवी किरण किंवा धुळीपासून बचाव करावा लागेल.

> केसांचा आणि भुवयांचा रंग एकमेकांपासून विरुद्ध असायला हवा. नैसर्गिक रंग लावणार असाल तर भुवयांचा आणि केसांचा रंग एकसमान होणार नाही याची काळजी घ्यावी.

> केसांच्या देखभालीसाठी केसांना नियमित तेल लावावे. आठवडयातून दोन वेळा केस धुवावेत.

> उन्हापासून केस सुरक्षित ठेवावेत. हंगामी उन्हाळ्यापेक्षा सहज येणा-या उन्हातील हानिकारक यूवी किरणांमुळे आपले केस शुष्क होण्याची शक्यता असते, यासाठी केसांचं उन्हापासून संरक्षण केलं पाहिजे.

> ब्युटीशियन्सच्या सल्ल्याने रंगाची निवड करावी. रंगामध्ये असणा-या अमोनियामुळे केस खराब होतात हे तर आपल्याला माहीतच आहे. म्हणूनच अमोनियारहित रंगांकडे आकर्षित होत असाल तर त्याबाबत आणखी माहिती मिळवा. अमोनियारहित रंगावर विश्वास असेल तर आणखी काळजी घ्यावी. कारण अमोनियारहित रंगही अमोनियाप्रमाणेच केसांसाठी हानिकारक आहेत. काही हेअर कलर उत्पादनांवर 'नो अमोनिया' किंवा 'अमोनिया फ्री' असं म्हटलं जातं. मात्र यामध्ये अमोनियाऐवजी अल्कायझर एमईएचा वापर केला जातो. सर्व स्थायी रंगांत अल्कायझरची आवश्यकता असते. जेणेकरून रंग केसांमध्ये जाऊ शकेल आणि त्यांना रंगवू शकेल. मात्र काही कंपन्या अमोनियारहित हेअर कलर सांगून त्यात अल्कायझर एमईएचा वापर करतात. स्थायी हेअर कलरप्रमाणेच रंग प्राप्त करण्याकरता एमईएमध्ये कधी कधी अमोनियाच्या तुलनेत उच्च केंद्रीकरणाचा वापर केला जातो. जो केसांसाठी हानिकारक असू शकतो. एमईए हा अल्कायझरचा घटक डमी परमनंट कलरमध्ये वापरला जातो. या अल्कायझरच्या तुलनेत अमोनिया एवढा हानिकारक नाही. रंग करताना अमोनियाचा वास येत असल्याने आपल्याला तो हानिकारक आहे असं वाटतं. मात्र अमोनिया हा अत्यंत लहान अणू असून त्याचं त्वरित बाष्पीभवन होतं. म्हणूनच त्याचा उग्र वास येतो. तुलनेत एमईएचे अणू जड असतात. ते केसांवर जास्त काळ टिकून राहतात. त्यांना केसांवरून हटवणं कठीण असतं. केसांवर जे सतत प्रक्रिया करत असतात त्यांच्यासाठी असे रंग केसांना हानिकारक आहेत.

वेल्ला हेअर कलरने केलेल्या सर्वेक्षणानुसार अमोनियारहित रंग केसांसाठी हानिकारक आहेत. वेल्ला हेअर कलर तज्ज्ञ मारिया कास्ट म्हणतात, 'एमईए आणि अमोनिया दोन्ही चांगले किंवा वाईट नाहीत, त्यांच्यातील अल्कायझरच्या अर्कावर ते अवलंबून असतं. केसांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात अमोनियारहित स्थायी कलरचे कोणतेही फायदे दिसले नाहीत. यासाठी वेल्लाने केलेल्या सर्वेक्षणानुसार अमोनियारहित रंग केसांसाठी हानिकारक नाही असं होत नाही.'

योग्य रंग आणि केसांची काळजी घ्यायची असेल तर नेहमी चांगले रंग वापरा. जेणेकरून आपल्या सौंदर्यात भरच पडेल.

Read More »

बहुगुणी कोकम सरबत

इतर कोणत्याही कृत्रिमरीत्या थंडगार केलेल्या शीतपेयांपेक्षा कोकम सरबताचे गुण आणि फायदे निश्चितच जास्त आहेत. कोकम उत्पादनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास कोकणच्या वैभवातही भर पडेल.
आजकाल पित्तखडयांच्या ऑपरेशनसाठी किमान ६० ते ८९ हजार रुपये ऑपरेशन, हॉस्पिटलमधील वास्तव्य, औषधोपचार इत्यादींसाठी खर्च होतात. शरीरात नियमित पद्धतीने पित्त निर्माण होते आणि त्याचा चयापचय या शरीरांतर्गत व्यवहाराशी संबंध येतो. खाण्यापिण्याच्या नको त्या सवयी, तेलकट, मांसाहारी पदार्थ, मसालेदार पदार्थ, आपल्या कुवतीपेक्षा जास्त खाणे किंवा अनेक अनियमित पद्धतींचा वापर इत्यादी कारणांने पित्ताची अतिरिक्त निर्मिती होते. आनुवंशिकता असेल तर पित्तनिर्मितीस चालना मिळते. आमचा या व्याधीशी संबंध आल्याने आता त्याची विशेषत्वाने जाणीव झाली. परंतु याच पित्त विकारावर अतिशय गुणकारी असं औषधी फळ आहे ते म्हणजे कोकणातील रातांबा ऊर्फ कोकम.

नियमित कोकम सरबताचे प्राशन केल्यास पित्त विकार दूर होण्यास मदत होते. रातांब्यापासून बनवलेले कोकम सरबत हे गुणांनी आणि चवीनेही अतिशय मधुर असते. आता सुरू होणा-या उष्ण दिवसांमध्ये हे सरबत जरूर प्यावे. रातांब्याचे झाड बहुगुणी आहे, म्हणूनच कोकणी आहारात कोकमांच्या सोलांचा म्हणजे आमसुलांचा वापर होतो. तसंच कोकमाच्या आगळाचाही स्वयंपाकात वापर केला जातो. कोकमामुळे अंगात शीतलता आणि माधुर्य वाढून जळजळ, दाह कमी होतो. जगाच्या बाजारात हजारो कोटी रुपयांची कृत्रिम शीतपेयांची निरुपयोगी उत्पादनं खपतात.

कोकम सरबत हे अशा कृत्रिम शीतपेयांना योग्य प्रतिस्पर्धी ठरू शकते. कोकणात कोकमाचे उत्पादन वाढवल्यास त्याचा कोकण प्रांताला फायदा होईल. कोकणातील रातांबा या पिकाचे योग्य प्रकारे जर संवर्धन झाले तर जगाला ते वरदान ठरणार आहे. पित्त विकाराने ग्रस्त असणा-या रुग्णांसाठी कोकम आणि कोकमापासून बनवलेली उत्पादने फायदेशीर आहेत. रातांब्याची हिरवी फळे काठीने झोडून जमिनीवर पाडतात आणि ती कापून त्यात मीठ घालून वाळवतात. त्याऐवजी पिकलेली रातांबा फळे झाडावरच तयार झाली तर ती अधिक मौल्यवान ठरतील. दैनंदिन आहारात कोकम सोलांचा वापर हवा. कोकमाच्या

बियांपासून बनवलेल्या तेलाचाही वापर डोळ्यांची आणि तळपायांची जळजळ कमी करण्यासाठी होतो. पित्त विकाराचे नियंत्रण करण्याची शक्ती कोकमात आहे.

Read More »

स्वास्थ्यपूर्ण कोजागरी

कोजागरी पौर्णिमा म्हटलं की चंद्राचा उत्सव, चांदण्यांचा खेळ, चंद्रकिरणांचा मनमुराद आनंद लुटण्याचं पर्व. मानवाला नेहमीच निसर्गाचं आकर्षण वाटत आलं आहे. तो निसर्गाची जोपासना आणि पूजा पिढयान् पिढया करीत आला आहे. निसर्गातील एक आकर्षण म्हणजे चंद्र. सौंदर्य, शीतलता, प्रेमाचे प्रतीक म्हणून चंद्राचे आकर्षण सर्वाना नेहमीच असतं. कोजागरी पौर्णिमेनंतर आरोग्यातही शीतलता वाढली पाहिजे, असा आहार या काळात असला पाहिजे.

कोजागरी पौर्णिमेचे आगमन ऋतूत होतं. साधारणत: या काळात पावसाचा ऋतू संपलेला असतो. निसर्ग सारा बहरून आलेला असतो. सगळीकडे कसं स्वच्छ हिरवंगार असतं. आकाशही निरभ्र असतं, हवेतील धूलिकण कमी झाल्यामुळे चांदणंही स्वच्छ आणि टिपूर पडतं. कडाक्याच्या थंडीला अजून सुरुवात व्हायची असते; परंतु हवेत थोडा गारवा असतो. दिवसभराच्या उकाडयानंतर रात्रीची हवा छान आल्हाददायक वाटते. दिवसा ऑक्टोबर हीट इतकी जाणवते जणू छोटा उन्हाळाच. या शरदाच्या उन्हाच्या तडाख्याने शरीरात पित्ताचा प्रकोप होऊन पित्त वाढते, रक्त दूषित होतं. उष्णता, पित्त व रक्त यांचे विकार संभवतात. या वाढलेल्या पित्ताला म्हणजेच शरीरातील अग्निमहाभुताला कमी करण्यासाठी शरद ऋतूमध्ये निसर्गत:च चंद्र आपल्या पूर्ण शक्तीनुसार आपली शीतलता पृथ्वीवासीयांना प्रदान करीत असतो. तसेच आयुर्वेदानुसार पित्तशमन करण्यासाठी शीत गुणांची आवश्यकता असते. तसेच गोड, कडू, तुरट रस उपयुक्त असतात. विरेचन या शोधन पंचकर्म उपयोगानेही प्रकृपित झालेले पित्त बाहेर काढावे व दूषित झालेले रक्त रक्तमोक्षणा वाटे बाहेर काढावे, असा शास्त्रादेश आहे. म्हणूनच या काळात शारदीय पंचकर्म उत्सव म्हणून विरेचन व रक्तमोक्षण प्रकल्प राबवला जातो. याचा लाभ घेऊन उष्णता – पित्त- रक्त यांचे विकार कायमचे व मुळापासून कमी व्हावे म्हणून आपल्या पूर्वजांनी कोजागरी पौर्णिमेची परंपरा सुरू केली. व्रताचे नाव दिले, धार्मिकतेच्या चौकटीत बसवले, की आपोआप माणूस त्याचे पालन करतो हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्टय़ आहे.

रक्तातील उष्णतेचे शमन व्हावे, शरीरातील प्रकृपित पित्त शांत व्हावे, याकरिता या दिवशी दुग्धप्राशन करण्याचे योजून दिलेले आहे. म्हणून कोजागरीच्या रात्री मंद-मंद वा-यात, चंद्राच्या दिव्य शीतल किरणांत आटवलेले मसाल्यांनी सिद्ध, खडीसाखर घातलेले, गुलकंद घातलेले दूध घ्यावे. परंतु आजकाल कोजागरीच्या नावाखाली नाईट पार्टीज अरेंज केल्या जातात. त्यात भरघोस प्रमाणात तळीव पदार्थ, तिखट, मसालेदार पदार्थ असतात. सोबत फ्रुट्स सॅलड, मिल्कशेक्स, कोल्डड्रिंक असे चविष्ट पदार्थ आगीत तेल ओतायचं काम करीत असतात. म्हणजेच शरीरातील प्रफुल्लित पित्त, उष्णता कमी करण्याचे सोडून वरील पित्त वाढविणारे पदार्थ खाल्ले जातात. यामुळे फायदा होण्याएवजी नुकसानच होते.

बेपर्वाईने साजरा केलेला उत्सव व पौराणिक गोष्टी अशा या दोन टोकांमध्ये खरंच लॉजिकल, बुद्धीला पटेल, असं काही शास्त्रीय कोजागरीत असेल काय? तर ते नक्कीच आहे.. समाजाच्या स्वास्थ्याची आयुर्वेदाची तत्त्वांशी सांगड घालूनच पूर्वजांनी, प्राचीन ऋषीमुनींनी धार्मिक सण, रूढी, परंपरा स्थापल्या आहेत. असा हा चंद्रोत्सव पंधरवडयानंतर येणा-या दीपोत्सवाचे आरोग्यमय तेज घेऊन येतो. म्हणूनच या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून ही कोजागरीची सुंदर रात्र प्रेमाची माणसं आणि गारव्याच्या सोबतीने साजरी करूयात.

Read More »

काळजी घेणारे बॅक्टेरिया..

आपल्या भवताली रोग पसरवणारे अनेक जीवजंतू असतात आणि या रोगजंतूच्या संपर्कात येणारी तान्ही बाळं आणि शिशू त्यांना बळी पडण्याची शक्यता सर्वात जास्त असते. मोठया माणसांची प्रतिकारशक्ती विकसित झालेली असल्याने अशा रोगजंतूशी त्यांना लढा देता येतो, मात्र नवजात अर्भकांसहीत लहान मुलांची रोग प्रतिकारशक्ती अपरिपक्व आणि विकसनशील असल्यामुळे ते आजारी पडण्याचा धोका असतो. अशा वेळी त्यांच्या मदतीला येतात ते चांगले बॅक्टेरिया जे त्यांना त्यांच्या आईकडून मिळतात आणि याला कारण असतं प्रोबायोटिक्स.

अनेकदा तुम्ही नवजात शिशूंना काचेच्या पेटीत ठेवलेलं पाहिलं असेल. त्यांची प्रतिकारशक्ती मोठया व्यक्तीपेक्षा साहजिकच कमी असल्याने अर्भकं सहजगत्या एखाद्या संसर्गजन्य रोगाला बळी पडू शकतात. परंतु तान्ह्या बाळालादेखील रोगजंतूपासून बचाव करण्यासाठी मदत करणारे बॅक्टेरिया असतात. जन्मनाळेद्वारे नवजात अर्भकास त्याच्या मातेकडून चांगले बॅक्टेरिया प्राप्त होतात. हे चांगले बॅक्टेरिया आईच्या दुधातदेखील असतात आणि विपुल प्रमाणात स्तनपान करविण्यात आलेल्या अर्भकांमध्ये या चांगल्या बॅक्टेरियांचे पुरेसे प्रमाण असते. हे चांगले बॅक्टेरिया आपल्या शरीरात सैनिकासारखे कार्य करत असतात जे आपल्या शरीराची सुरक्षाप्रणाली तत्परतेने काम करेल, असं पाहतात. तिच्या क्षमतेत वाढ करतात. ते हानिकारक मायक्रोऑर्गेनिझम्सना आपल्या शरीरात प्रत्यक्ष प्रवेश करण्यापूर्वीच मारून टाकतात.

प्रोबायोटिक्स म्हणजे शरीराचा बचाव करणा-या गोष्टींचा अंर्तभाव करून घेणारी सुरक्षा प्रणाली. यामुळे चांगले बॅक्टेरिया आपल्या लहान आतडयात फोफावतात. सामान्यपणे खाद्यान्नामध्ये मिसळण्यात येणा-या प्रोबायोटिक्सचा प्रकार हा लहान आतडयात आढळणा-या चांगल्या बॅक्टेरियासारखा असतो. हे सुरक्षित असतात आणि संपूर्ण विश्वभरात याचे फायदे ओळखले जातात. स्तनपान करविण्यात येत असलेल्या नवजात अर्भकास हे महत्त्वपूर्ण प्रोबायोटिक्स आईच्या दुधातून प्राप्त होतात. म्हणून दररोज प्रोबायोटिक्स घेतल्याने आतडयातील चांगल्या बॅक्टेरियांची सघनता वाढते आणि प्रतिकारकशक्तीसाठी मदत होते.

जन्मापासून ते सहा वर्षापर्यंतचा काळ मुलांच्या सुरक्षा तंत्रास आकार देणा-या संधीचा काळ म्हणून ओळखला जातो. म्हणूनच अ‍ॅलर्जिक त्वचारोगांसारखी परिस्थिती असो किंवा डायरिया. संपूर्ण आयुष्यभरासाठी मुलांमध्ये सर्वागीण रोगप्रतिकारशक्तीची निर्मिती करण्यासाठी जगातील डॉक्टर्स प्रोबायोटिक्सवर त्यांच्या बचावात्मक फायद्यांसाठी विश्वास ठेवतात, असे कोकिलाबेन धीरुबाई अंबानी हॉस्पिटलमधील पीआयसीयू अँड पेडियाट्रिक कार्डियाक आयसीयू येथील नेनॉटॉलॉजी कन्सलटंट डॉ. विजय जोशी यांनी सांगितले.

मानवी शरीर हे करोडोहून जास्त मायक्रोस्कोपिक जंतूंचे घर आहे आणि ते अगदी जिभेपासून, केसांपासून ते आपल्या त्वचेपर्यंत आणि रक्तात आढळतात, हे वैद्यकीय संशोधनातून स्पष्ट झाले आहे. ५०० पेक्षा अधिक विविध प्रकारचे बॅक्टेरिया जे आपल्या सखोल पाचन प्रणाली मार्गात राहतात ते आपल्या प्रकृतीसाठी फार आश्चर्यजनक कार्य करतात. हे चांगले बॅक्टेरिया लहान आतडयात राहतात आणि आपण खाल्लेल्या अन्नामधून आपल्या शरीरात प्रवेश करणा-या वाईट बॅक्टेरियाशीदेखील झुंज देतात. आतडयात राहणा-या चांगल्या आणि वाईट बॅक्टेरियातील संतुलन आरोग्य आणि चांगल्या प्रकृतीच्या निश्चितीसाठी महत्त्वपूर्ण आहे.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe