Tuesday, December 31, 2013

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

आरोग्यास उपयुक्त ओमेगा ३

ओमेगा ३ फॅट्टी अ‍ॅसिड्स मुलांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. मानवी मेंदूतील अंदाजे २५-३० टक्के ओमेगा फॅट्टी अ‍ॅसिडमध्ये पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्टी अ‍ॅसिड्स असतं. यामध्ये ओमेगा ३ फॅट्टी अ‍ॅसिड डीएचए आणि ओमेगा ६ फॅट्टी अ‍ॅसिड असे महत्त्वाचे घटक असतात. ते सामान्य चयापचय क्रियेसाठी आवश्यक असतात. कारण आरोग्यासाठी आवश्यक पोषणविषयक घटक त्यामध्ये असतात.
युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड, मेडिकल सेंटर वेबसाइटनुसार अटेन्शन डेफिसिट/हायपर अ‍ॅक्टिव्हिटी डिसऑर्डर (एडीएचडी) असलेल्या १०० मुलांचा अभ्यास केला असता असं आढळून आलं की, ज्यांच्या शरीरामध्ये ओमेगा ३ची पातळी कमी आहे, त्यांच्यामध्ये या समस्या जास्त होत्या. ओमेगा ३ फॅट्टी अ‍ॅसिडच्या कमी सेवनामुळे वृद्धापकाळात स्मृतिभ्रंशाचा धोका वाढू शकतो.

पोषणतज्ज्ञ समृद्धी गोयल सांगतात, ''रक्ताच्या गुठळ्यांना नियंत्रित करणं तसंच पेशी आच्छादनांची तरलता यांसारख्या अनेकविध शरीराच्या सामान्य प्रक्रियांकरिता ओमेगा ३ फॅट्टी अ‍ॅसिड शरीरात गरजेचं असतं. संशोधनानुसार असं दिसून येतं की, हे अ‍ॅसिड अनेक आरोग्यविषयक फायदे पुरवतं. ते हृदयरोग, कर्करोग, दाहक आतडय़ांचे रोग आणि संधिवातापासून संरक्षण तर करतंच, तसंच आपल्या शरीरातील दाह कमी करण्यात मदतही करतं. आपल्या रक्तप्रवाहात फिरणा-या वाईट कोलेस्टेरॉलची पातळी कमी करतं. म्हणूनच, धमन्यांमध्ये जमा झालेलं अतिरिक्त कोलेस्टेरॉल कमी होतं. ओमेगा ३ तुम्ही उदासीन, थकलेले असाल किंवा कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित होत नसेल तर त्यावर ओमेगाचा चांगला प्रभाव पडतो. याशिवाय टाइप २ मधुमेहाचा त्रास, सांध्यातील वेदना, हृदयरोग किंवा शुष्कपणा, खाज येणारी त्वचा यापासून सुटका करण्यासही मदत करतं.''

हे कशातून मिळतं?

ओमेगा ३ फॅट्टी अ‍ॅसिड सूर्यफुलाच्या बिया, अळशी बिया, चिआ बिया, अक्रोड, सोयाबिन्स इत्यादींसारख्या नट्स, मांस आणि तेलबियांतून मिळतं. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने उपयोगी ठरणा-या पदार्थाचा शाकाहारींनी नियमित समावेश करणं गरजेचं असल्याचं पोषणतज्ज्ञांचं म्हणणं आहे.

Read More »

फळे का खावीत?

अन्न आणि आहारशास्त्र या विषयावरील कोणतीही शास्त्रोक्त माहिती असलेलं पुस्तक, नियतकालीक उघडून पाहिलंत, तर त्यामध्ये 'अ‍ॅण्टी-ऑक्सिडण्ट्स (अड)' हा शब्द हमखास वाचनात येतो. सध्याच्या काळात आधुनिक आहारशास्त्रात होणा-या संशोधनानुसार फळांमध्ये मुबलक प्रमाणात असलेले हे अड, फळांमध्ये विविध स्वरूपात असतात, त्यांचा आपल्या शरीराला अनेक प्रकारे फायदा होत असतो. आपल्या आजूबाजूला उपलब्ध असणा-या भारतीय फळांमधली अ‍ॅण्टी-ऑक्सिडण्ट्स शोधा व त्यांचा जरूर फायदा घ्या.
आपल्या शरीरातील पेशींमध्ये मुक्तरेणूंना (फ्रीरॅडिकल्स – पेशींमध्ये तयार होणा-या अनावश्यक आणि विघातक स्वरूपाच्या मुक्तरेणूंची निर्मिती) प्रतिबंध करणारी यंत्रणा उपलब्ध असते. या यंत्रणेला 'अ‍ॅण्टी-ऑक्सिडण्ट यंत्रणा' म्हणतात. फळं आणि भाज्यांमध्ये अनेक प्रकारची अ‍ॅण्टी-ऑक्सिडण्ट्स असतात. 'क', 'इ' जीवनसत्त्वं, बीटाकॅरोटीन, जस्त (झिंक), तांबे, मॅग्नेशियम, सेलेनियम ही सूक्ष्म आहारद्रव्यं या यंत्रणेमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतात. याखेरीज फळांमध्ये विविध कॅरोटीन्स्, फ्लॅवेनॉइड्स, बायटेट्स अशी रसायनंही असतात. हे सर्व घटक फळांना रंग, स्वाद, रुची तर देतातच. पण आहारशास्त्रात होणा-या नवसंशोधनाद्वारे अड यंत्रणेचे गुणधर्म थोडक्यात माहीत झाले असतील.

फळांमधल्या रोगप्रतिकारक गुणांबद्दलची काही ठळक वैशिष्टयं

वयोमानानुसार डोळ्यांमध्ये मोतिबिंदू तयार होण्याच्या प्रक्रियेत फ्रीरॅडिकल्स्चा सहभाग असतो. फळांमधील 'क', 'इ' जीवनसत्त्वं, बीटाकॅरोटीनमुळे मोतिबिंदू तयार होण्याची प्रक्रिया मंदावते. फळांमध्ये असणारी ल्युटीन व झिऑझॉन्थिन या रंगद्रव्यांमुळे नेत्रपटलांचं संरक्षण होतं. टोमॅटोमध्ये असणा-या लायकोपिन या रंगद्रव्यामुळे प्रोस्टेटच्या कर्करोगावर नियंत्रण येते. अमेरिकेतील प्रसिद्ध नॅशनल अ‍ॅकॅडमीनं सादर केलेल्या अहवालामध्ये आंबट फळं, कॅरोटीनयुक्त म्हणजे पिवळ्या-केशरी रंगांची फळं खाण्यावर भर देण्यात आला आहे. द्राक्षं खाल्ल्यानं त्याच्या बियांमधील प्रोअ‍ॅथेनॉल नावाचा घटक असतो, ज्यामध्ये फ्रीरॅडिकल्सचा प्रतिकार करण्याची अधिक क्षमता असते, तो शरीराला मिळतो. दिवसभरात खाल्ली जाणारी फळं आणि आहारातून किमान ३ वेगवेगळी रंगद्रव्यं पोटात जावीत, हा सोपा उपाय लक्षात ठेवा. सर्व प्रकारच्या कॅरोटीनमुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.

फळांमधील सूक्ष्मद्रव्यं आणि अ‍ॅण्टी-ऑक्सिडण्ट्सचे औषधी उपयोग

केळं : दररोज एक केळं खाल्ल्यानं पोटाच्या आतील स्तर (म्युकस मेंब्रेल) बळकट होतो. यामुळे अम्ल किंवा अल्सरपासून संरक्षण होते. केळ्याचा प्रतिजैवकां(अ‍ॅण्टीबायोटीक्स्)प्रमाणेही उपयोग होतो. केळ्यामध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम असल्यामुळे त्याचा उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासही उपयोग होतो.

आवळा : वर्षभरात ऑक्टोबर ते जानेवारी या दरम्यान आवळ्याचा हंगाम असतो. आवळा 'क' जीवनसत्त्वाचा सर्वात मोठा स्रेत आहे. जवळपास ६०० मि. ग्रॅ. जीवनसत्त्व असतं. यामुळे रक्तातील चांगलं कोलेस्टेरॉल (एचडीएल)ची पातळी वाढून हृदय सुरक्षित राहण्यास सहाय्य होतं. आवळ्यात भरपूर प्रमाणात पोटॅशियम आहे. म्हणजे जवळपास २२५ मि. ग्रॅ. यामुळेही उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. त्याचप्रमाणं रक्तातील हिमोग्लोबिन वाढतं व साखरेचं प्रमाणही नियंत्रित राहतं. आवळा चूर्ण आणि हळद पावडर दोन्ही समप्रमाणात दिवसातून कोमट पाण्यासोबत आयुष्यभर घ्यावी. आवळ्यामध्ये उत्तम दर्जाचा तंतुयुक्त पदार्थ असल्यामुळे मलावरोधावर परिणामकारक आहे. तुरट चवीमुळे आवडीनं न खाल्ला जाणार आवळा हल्ली आवळा मावा, आवळा कॅण्डी, आवळा सरबत अशा चटपटीत रूपात मिळत असल्यानं तो आवडीनं खाल्ला जाऊ शकतो. ताज्या आवळ्यांचा रस काढून तो काचेच्या बाटलीत भरून टिकण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावा. चार चमचे रसात एक चमचा मध व चिमूटभर सैंधव मिसळून तो दिवसातून एकवेळ घ्यावा. म्हणजे तो बाधत (थंड पडत) नाही. कच्चा आवळा खाताना तो सैंधव लावून खावा.

आवळा हे एक उत्तम रसायन आहे (म्हणजे वार्ध्यक्यावस्था रोखून धरण्याचं काम व तारुण्यावस्था दीर्घकाळ टिकवण्याचं काम करतं). एका आवळ्याच्या चार फोडी करून त्या वाफेवर उकडून घ्याव्यात. वर्षभर पुरतील एवढय़ा फोडी (फ्रीजमध्ये) साठवून ठेवून आपण केव्हाही खाऊ शकतो. मोरावळा, आवळय़ाच्या किसाचा वा फोडींचा मोरंबा, लोणचं, सरबत, पाचकरस (आलं, आवळा, लिंबू यांचा एकत्रित रस) या विविध रूपातील आवळा आपण अवश्य खात राहायला हवा. सर्वात सुंदर योग कल्प म्हणजे 'च्यवनप्राश'. दररोज एक मोठा चमचा च्यवनप्राश व त्यासोबत एक कप दूध घ्यावं. अर्धा कप आवळ्याचा अंगरस, ५०० मि. ली. शुद्ध खोबरेल तेलात घोळवून ते उकळावं व सिद्ध झाल्यावर म्हणजे चुरचुरीत पापुद्रे तेलावर तरंगू लागले म्हणजे की, घरच्या घरी शुद्ध आवळ्याचं तेल तयार होतं.

हे केसांच्या मुळांना चोळून लावावं, विशेषत: ब्रह्मरंध्रावर (टाळूवर) दररोज थोडं तरी चोळावं. शांत झोप, डोळ्यांची दृष्टी सुदृढ राहण्यासाठी हे तेल अत्यंत गुणकारी आहे. फक्त आवळा चूर्ण किंवा त्रिफळा चूर्ण (हरडा, बेहडा, आवळा समप्रमाणात) यांच्या गोळ्याही आता उपलब्ध होतात.

पुढील लेखात आपण अशाच काही बहुगुणी फळांचं महत्त्व जाणून घेऊया. 'वाचकहो, नवीन वर्षात आरोग्यदायी आणि 'स्ट्रेस-फ्री' राहण्यासाठी तुम्हाला खूप-खूप शुभेच्छा!'

Read More »

हिवाळ्यातील त्रासदायक आजार

ऑक्टोबर हीट नावाने प्रसिद्ध असलेल्या कडाक्याच्या उन्हाळ्यानंतर येणा-या हवेतील गारव्याची आणि त्या लगोलग येणा-या थंडीची अनेक लोक वाट पाहात असतात. ही थंडी बहुतेकांना आवडते हे खरं. परंतु काहींना मात्र हिवाळा त्रासाचा वाटतो. लहान मुलांना ही थंडी खूप आवडते. तरुणांसाठी थंडी अनेक अ‍ॅक्टिव्हिटीजना उत्तेजन देणारी असते. मात्र वृद्धांना या महिन्यांमध्ये अनेक त्रासदायक आजारांना तोंड द्यावं लागतं.

लहान मुलांना थंडी आवडत असली तरी थंडीमुळे होणारा आणि त्यांना त्रासदायक ठरणारा आजार म्हणजे सर्दी. हिवाळ्यामधील थंड आणि कोरडी हवा ज्या वेळी नाकाच्या छिद्रांमधून आत जाते, त्या वेळी ती नाकाच्या आतील पातळ त्वचा कोरडी करून आत जाते. या भागात योग्य प्रमाणात ओलावा राहावा म्हणून शरीर आपसूकच इतर ठिकाणच्या जलीय अंशाला – पाणीसदृश घटकाला नासारंध्रांच्या ठिकाणी – नाकाच्या भोकांपर्यंत पाठवायला सुरुवात करते. याचंच रूपांतर सुरुवातीला नाकातून पाण्यासारखा स्रव येणं, नंतर शेंबूड जमणं आणि बोलीभाषेत ज्याला 'सर्दी', हिंदीत 'जुकाम' आणि संस्कृतमध्ये 'प्रतिश्याय' म्हणतात, अशा आजारात होतं. हे पाणी शरीरातील बिघडलेल्या पित्तासमवेत मिसळून बाहेर येऊ लागतं तेव्हा पिवळसर रंग येऊ लागतो. हाच स्रव थोडा कमी पातळ होत होत घट्ट होऊ लागला तर आयुर्वेदात सिंघाणक आणि बोलीभाषेत शेंबूड म्हणतात तसा बाहेर येऊ लागतो. लहान मुलांमध्ये पाण्यात अधिक वेळ खेळणं, थंड पाणी पिणं, गार वा-यात किंवा वातनुकूलित वातावरणात राहाणं ही लहान मुलांना वारंवार सर्दी होण्याची कारणं असतात.

काय उपाय कराल?

पिण्याचं पाणी गरमच वापरावं, उबदार वातावरणात राहावं, थंडी रोखणारे गरम कपडे वापरावेत, थंड पाणी बिलकुल न पिणं किंबहुना चहासारखं गरम गरम पाणीच पिणं, तुलनेने कमी ओलसर अथवा कोरडे अन्न खावं. या काळजीबरोबरच साधं तिळाचं तेल किंचित संधव घालून गरम करून छाती व पाठीला मालीश करणं फार उपयुक्त ठरतं. अशा वेळी लोकरीचे उबदार कपडे वापरणं व घराबाहेर पडण्याअगोदर कोमट केलेलं तिळाचं तेल नाकपुडयांना आतून लावणं अगत्याचं ठरतं. पोटातून घेण्याच्या औषधांमध्ये सितोपलादी चूर्ण मध किंवा लोण्याबरोबर द्यावं आणि अडुळसा, तुळस, बनफ्शा आदी औषधांनी तयार केलेल्या मिनकॉफ कफ सिरपचा वापर उपयोगी ठरतो. या सर्वामुळे गार हवेचा होणारा त्रासही ब-याच प्रमाणात कमी होतो.

दमा

कडाक्याच्या थंडीमुळे वाढणारा आणखीन एक महत्त्वाचा आजार म्हणजे दमा. याला आयुर्वेदात 'श्वासव्याधी' या नावाने ओळखलं जातं. हा आजार सुरुवातीला सर्दीनंतर खोकला आणि याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे अथवा हलगर्जीपणामुळे, सर्दी ठीक झालेली नसतानाही अपथ्य केल्याने, अधिक काळ पाण्यात किंवा दमट वातावरणात राहिल्याने, सातत्याने वातानुकूलित जागेत वावरल्यामुळे, थंड जल किंवा इतर शीत जलीय पदार्थाचं सेवन केल्याने थंड वा-यावर पुरेसं ऊन कपडे न घालता फिरल्याने, स्वभावत: शीत अर्थात् थंड असलेले पदार्थ खाण्या-जेवणात आल्याने अशा अनेक कारणांमुळे होतो. श्वास घ्यायला त्रास होणं, नाक सातत्याने चोंदलेलं राहणं, बसल्या जागीही धाप लागणं, अशी लक्षणं दिसू लागतात. हळूहळू हा आजार बळावत जातो आणि कफ वाढून होणारा दमा हा आजार जडतो.

दमा या आजारात श्रम न करताही बसल्या जागीच दम लागल्यासारखी स्थिती होऊन प्रयत्नपूर्वक श्वास घेण्याची गरज भासू लागते. या आजारामध्ये औषधोपचार घेऊनही वारंवार हाच त्रास होत राहतो आणि याला शास्त्रीय भाषेत 'दम्याचे वेग येणं' किंवा बोलीभाषेत 'दम्याचा अ‍ॅटॅक' असं म्हटलं जातं.

सर्वसाधारणपणे याची सुरुवात नाकातून पाणी गळण्यापासून होते. हळूहळू घशात कफ जमू लागतो. खूप प्रयत्न करून, खाकरून तो काढण्याचा प्रयत्न केला तरी अतिप्रयत्नांनंतर थोडासा कफ सुटतो, अत्यंत चिकट स्वरूपाचा हा कफ थोडासा बाहेर पडल्यानंतर काही काळ बरं वाटतं. पण पुन्हा तसाच त्रास सुरू होतो. सोबत श्वासोच्छ्वासाच्या क्रियेसही त्रास जाणवू लागतो. कफ सुटल्यावरचं बरं वाटणं अल्पकाळच टिकतं. पुन्हा चिकट कफ एकत्र होतो. श्वासोच्छ्वासाच्या वेळी घुरघुर वाढते, पोट फुगतं, तोंडाची चव जाते, खोकल्याची उबळ येते आणि बरंच खोकल्यानंतर थोडासा आणि तोही अत्यंत चिकट असा थोड्या प्रमाणात कफ बाहेर पडतो. तब्येत ठीक झाल्याची जाणीव होते, पण तीही थोड्या वेळापुरतीच. पुन्हा कफ जमणं, खोकल्याची उबळ येणं, दम लागणं, असं सातत्याने चालूच राहतं. कालांतराने तर छातीचा पिंजराही गोलाकार होऊ लागतो.

काय उपाय कराल?

छाती व पाठ गरम पाण्याच्या पिशवीने – गरम पाण्याने शेकल्याने तात्पुरतं बरं वाटतं आणि तेही अगदी तात्पुरतंच! साधारणत: २० ते २५ मिनिटांत श्वास घेताना घुरघुर आवाज येणं, झोपल्यावर त्रास वाढणं व उठून बसल्यावर थोडं बरं वाटणं, त्यानंतर पोट फुगल्यासारखं वाटणं, श्वास घेताना कष्ट झाल्याचं जाणवणं अशी स्पष्ट लक्षणं पुन्हा दिसू लागतात. अशा वेळी तत्काळ फायदा मिळतो तो म्हणजे छातीला व पाठीला गरम केलेल्या तेलाने मालिश करूनच. फुप्फुसांच्या आतील भागाला चिकटून असलेला चिकट कफ आतल्या भिंतींपासून सुटायला मदत होते आणि गरम पाण्याच्या पिशवीच्या मदतीने मिळालेल्या उष्णतेमुळे हा कफ पातळ होऊन सुटू लागतो. पातळ झालेला कफ मुखावाटे थुंकून टाकता येतो व आजारी व्यक्तीला आराम मिळतो.

सर्दी पडसे असो वा दमा असो – कोणताही आजार बरा होण्यासाठी औषधोपचार करताना वैद्यकीय सल्ला अवश्य घेतलाच पाहिजे. याचं कारण असं की, अनेक औषधं एका आजारात वापरता येत असली तरीही नक्की कोणतं वापरलं जावं याचबरोबर ती पूर्णत: सुरक्षित आहेत ना, याचीही खात्री करून घेणं आवश्यक असतं.

तरुण वयात ज्या व्यक्तींना वा-यावर जाऊन आल्यावर किंवा दमट जागेत बसल्यामुळे क्षयाचा त्रास होतो, त्यांनी तालिसादी चूर्ण व श्वासकुठार यांचा वापर जरूर करावा. पिण्यासाठी थंड पाणी पूर्णत: टाळावं. गरम पाण्याने गुळण्या करणं व पिण्यासाठी गरम पाणी वापरणं इष्ट आहे.

प्रौढ व्यक्तींनी दम्यासाठी छातीला मीठ घातलेलं तिळाचं तेल लावून शेकून घ्यावं व सातत्याने गरम-कोमट पाणी पिणं हे उपयोगी व लाभदायक ठरतं.

अनेकदा असं म्हटलं जातं की, आयुर्वेदिक औषधं हळूहळू काम करतात व रोग बरा होण्यास वेळ लागतो, परंतु असं सरसकट विधान चुकीचं ठरतं. उत्तम व त्वरित लाभ देणारी औषधंही आयुर्वेदात आहेत आणि तसा लाभ मिळण्यासाठी ती कोणत्या पद्धतीने बनवलेली आहेत, ती मानकीकृत (स्टँडर्डाइज्ड) आहेत किंवा नाहीत, शुद्धतेची खात्री देणारे मापदंड पाळून बनविलेली आहेत की नाहीत हे पाहणं आवश्यक असतं.

आयुर्वेद क्षेत्रात स्टँडर्डायझेशन – मानकीकरण नसल्याचं बोललं जात असलं तरी ते पूर्णपणे सत्य नाही. कच्च्या मालाच्या निवडीपासून ते त्यावर होणारे संस्कार आणि विक्रीसाठी तयार झालेलं अंतिम उत्पादन या प्रत्येकासाठी मानकीकरणाचे 'एस.डी.एस.' नावाने ओळखले जाणारे निकष उपलब्ध आहेत. या मानकांतर्गत बनविण्यात आलेल्या महालक्ष्मीविलास रस, सूतशेखर रस, श्वासकास चिंतामणी रस, लक्ष्मीविलास (नारदीय गुटी), सितोपलादी चूर्ण, तालीसादी चूर्ण, कफकुठार रस, श्वासकुठार रस, कुमारी आसव नं.१, गोदंती भस्म आदी औषधांचा वापर वैद्यकीय सल्ल्यानुसार करणं लाभदायक ठरतं. ज्या व्यक्तींना वारंवार सर्दी, पडसं होण्याची प्रवृत्ती निर्माण झाली असेल किंवा ज्यांना दम्याचा वारंवार त्रास होत असेल, अशांसाठी शरीरातील सर्व घटकांना – विशेषत: कमजोर झालेल्या फुप्फुसांना – बल मिळावं आणि वारंवार त्रास होऊ नये यासाठी सुवर्णवसंत मालती हे औषध अत्यंत उपयोगी ठरतं. पानं गळून गेलेल्या झाडांना जशी वसंत ऋतू येताच पालवी फुटते, तशीच सर्व घटक क्षीण झालेल्या शरीराला सुवर्णवसंत मालती पल्लवीत करते, पोषण देते आणि म्हणून मानकीकृत सुवर्णवसंत मालतीचं स्वामला च्यवनप्राश अवलेहाबरोबर सेवन केल्यास वारंवार सर्दी, खोकला होणा-यांना किंवा ज्यांना दम्याचा जुनाट त्रास आहे अशा व्यक्तींना पुन्हा नव्याने ताकद व जोम देणारं ठरतं. अर्थात, या सर्वासाठी वैद्यकीय सल्ला घेणं हे निश्चितच आवश्यक!

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe