Tuesday, September 17, 2013

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

प्रसादाचा सदुपयोग..

बाप्पा केव्हा आले आणि गेले ते कळलंच नाही. आता प्रत्येक घर आवराआवरीच्या तयारीस लागलं असेल. एक वेळ घर आवरता येईल; पण गणेशोत्सवानंतर घरी शिल्लक राहिलेल्या प्रसादाचं काय करायचं, हा प्रत्येकालाच पडणारा कंटाळवाणा प्रश्न. पुढील पदार्थ करून पाहा. प्रसादातून चविष्ट खाऊ तयार करा.

सप्टेंबर महिन्याचे पंधरा दिवस गणेशोत्सवाच्या धामधुमीत गेले. बाप्पासाठी नवैद्य, पै-पाहुण्यांची उठबस, नातेवाइकांकडे गणपती दर्शनासाठी जाणं यात गेले असतील. ज्यांच्याकडे गणपती येतो आणि जे गणपतीच्या दर्शनासाठी जातात, त्यांच्या घरी प्रसादच प्रसाद जमला असेल. जमलेल्या प्रसादाचं करायचं काय, हा प्रत्येकालाच पडणारा प्रश्न. प्रसाद खाऊन खाणार तरी किती आणि केवढा? या प्रसादाचा सदुपयोग करता येईल. प्रसादातून चांगले चांगले चविष्ट पदार्थ तयार करता येतात. फक्त या प्रसादात मिठाचं प्रमाण अजिबात नको. याचं कारण मूळ प्रसादात मीठ असतंच ना. थोडीशी कल्पकता वापरल्यास प्रसादातूनही उत्तम पदार्थ तयार करता येतात.

शहाळयाचं सरबत

साहित्य: शहाळयातील पाणी, वाटीवर शहाळयातील कोवळं खोबरं, एक वाटी अननसाचा रस, पाच ते सहा चमचे खडीसाखरेची भुकटी.

कृती: शहाळयातील पाणी एका पातेल्यात काढून घ्या. त्यातील कोवळं खोबरं मिक्सरमधून काढून घ्या. शहाळयाच्या पाण्यात अननसाचा रस आणि मिक्सरमधून बारीक केलेलं खोबरं एकत्र करा आणि लगेचच हे सरबत प्यावं.

गुणधर्म : निसर्गाने बनवलेलं अत्यंत र्निजतुक असं हे आरोग्यदायी पेय आहे. त्यात खनिज आणि क्षारांचं प्रमाणही भरपूर असतं. शरीरपेशींना लागणारा ऑक्सिजन शहाळयातून मिळतो. त्यामुळे लघवीचं प्रमाण वाढतं. मूत्रपिंडाचं कार्य सुरळीत चालतं. अननसात तंतुमय पदार्थाचं प्रमाण भरपूर असतं. पोट स्वच्छ राहतं. हा रस मधुमेहींसाठीही आरोग्यदायी ठरेल.

टीप : या सरबतात आंब्याचा ताजा रस किंवा फोडी कापून घातल्या तरी चालतील. आंब्याचा रस घालून केलेलं शहाळयाचं सरबत मधुमेहींनी जपूनच प्यावं.


प्रसाद पोळी

साहित्य: सुकामेवा, लाडू, पेढे, बर्फी, खडीसाखर, पंचखाद्य, तीळ, खसखस, सुंठवडा, पुरणपोळीसाठी भिजवतो त्याप्रमाणे कणकेचा भिजवलेला गोळा, वेलची-जायफळ पूड, तूप, तांदळाची पिठी.

कृती: वर सांगितलेल्या प्रसादाचे बारीक तुकडे करावेत. हा प्रसाद मिक्सरमधून काढावा. त्या प्रसादाची बारीक वस्त्रगाळ पूड झाली पाहिजे, इतका तो प्रसाद बारीक केला पाहिजे. या प्रसादात तीळ, खसखस हे पदार्थ घालण्यास विसरू नयेत. वेलची-जायफळाची पूडही घालावी. कणकेचा गोळा घ्यावा. त्यात हा प्रसाद भरावा. पुरणपोळी लाटतो त्याप्रमाणे हलक्या हाताने प्रसाद पोळी लाटून घ्यावी. ही पोळी दोन्ही बाजूने तूप लावून भाजून घ्यावी.

गुणधर्म: एरवी प्रसाद वाया जातो. त्या प्रसादाचा हा सदुपयोग. या प्रसादात वापरलेल्या वेलची आणि जायफळमुळे वातदोष कमी होतो.


फळांचा पुलाव

साहित्य: पाऊण वाटी तांदूळ, केळी, सफरचंद, अननसाचे तुकडे, डाळिंबाचे दाणे प्रत्येकी पाव वाटी, पाव वाटी संत्र्याचा रस, प्रत्येकी दोन-दोन लवंगा, वेलची आणि तमालपत्राची पानं, मोठा चमचाभर गाईचं तूप, पॉलिश न केलेली खडीसाखरेची पूड.

कृती : सर्वात आधी तांदूळ नीट निवडून, धुऊन घ्यावा. तो निथळण्यासाठी ठेवावा. जाड तळाच्या भांडयात एक मोठा चमचा तूप गरम करत ठेवावं. तापलेल्या तुपावर लवंग, वेलची आणि तमालपत्राची पानं टाकावीत. खमंग वास आल्यावर धुऊन, निथळलेला तांदूळ परतून घ्यावा. सव्वा वाटी गरम पाणी घालून भात मोकळा शिजवून घ्यावा. दुस-या भांडयात चमचाभर तूप गरम करत ठेवावं. तूप गरम झाल्यावर वर सांगितलेली फळं परतून घ्यावी. अर्धी वाटी खडीसाखरेची (पॉलिश न केलेल्या) भरड त्यात घालावी. मिश्रण पातळ झालं की, भातावर ओतावं. मिश्रण पुन्हा एकदा नीट एकत्र करून घ्यावं. गरजेनुसार त्यात संत्र्याचा रस घालावा. शितं मोकळी राहतील आणि भात नीट शिजेल इतपत रस घालावा. तव्यावर पातेलं ठेवून भात शिजू द्यावा. हा फळांचा पुलाव गरम आणि गार कसाही खायला चांगला लागतो.

गुणधर्म: फळं खाण्याचा कंटाळा असणा-यांसाठी ही सर्वोत्तम पाककृती आहे. यात वापरलेली फळं ही आहारशास्त्राच्या दृष्टीने आरोग्यदायी समजली जातात. केळं या फळाकडे पूर्णान्न म्हणून पाहिलं जातं. कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि तंतुमय पदार्थ यांचा विपुल साठा केळयात असतो. डाळिंबाचे दाणे पित्तशामक आहेत. त्यांच्यात लोहाचं प्रमाणही भरपूर आहे. अननसातही जीवनसत्त्व 'अ'चं प्रमाण आहे. शिवाय तंतुमय घटक आहे. तुपात जीवनसत्त्व 'अ'चं प्रमाण आहे.

टीप: या रेसिपीत आवडीप्रमाणे फळं घालता येतील.


पेरूचं सरबत

साहित्य: अर्धा किलो पेरू (कमी बिया असलेले आणि बेताचे पिकलेले), पाऊण किलो जाडया खडीसाखरेची साखर, पाऊण लिटर पाणी.

कृती : पातेल्यात पेरूच्या बारीक फोडी कराव्यात. त्या बुडतील इतकं पाणी पातेल्यात टाकावं. हे पातेलं गॅसवर मध्यम आचेवर ठेवावं. फोडी नरम होतील इतक्या त्या शिजवून घ्याव्यात. या फोडी पुरणयंत्रातून फिरवून घ्याव्यात. नंतर त्या गाळाव्यात. म्हणजे बिया शिल्लक राहणार नाहीत. पेरू शिजवताना राहिलेलं पाणी आणि खडीसारखेची साखर एकत्र करून पाक करून घ्यावा. पाकावर मळी येईल ती काढून टाकावी. पाक गाळून घ्यावा. पाकात पेरूचं गाळलेलं पाणी घालावं. मिश्रणाला एक उकळी येऊ द्यावी. सरबत थंड झाल्यावर बाटलीत भरून ठेवावं. हे सरबत साधारण दोन दिवस टिकतं. पाहिजे तेव्हा सरबतात पाणी घालून पिता येईल. खडीसाखरेऐवजी रसायनविरहित गुळाचा पाक करून सरबत बनवलं तरी चालतं. फक्त साखर वापरू नका.

गुणधर्म: पेरूत 'क' जीवनसत्त्वाचा विपुल साठा असतो. पित्तशामक हाही पेरूचा एक गुणधर्म आहे. कधी कधी मूत्रपिंडाचे आजार असणा-यांना पेरू खाता येत नाही. त्यांच्यासाठी हे सरबत उत्तम पर्याय ठरेल.

Read More »

आयुर्वेद आणि आहारपद्धती!

वजन वाढणं आणि कमी होणं हे आपल्या आहार, विहारावर अवलंबून असतं. आहारशास्त्रानुसार त्याचे काही नियम आहेत. ते आपण कधीच अवलंबत नाही. पण आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलेले काही उपयुक्त कानमंत्र अवलंबल्यास शरीर आपोआपच सुडौल आणि निरोगी राहतं.

घडयाळाच्या काटयावर चालणा-या आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आपण उठसूट कधीही, केव्हाही, काहीही मिळेल ते पोटात ढकलतो. कमी खाल्ल्यामुळे आपण सुडौल बांध्याचे राहू, असा आताच्या पिढीचा सर्वसामान्यपणे तयार झालेला समज आहे. पण त्यामुळे आपलं वजन कमी होत नाही. तर उलट वेळीअवेळी खाल्ल्यामुळे शरीरक्रिया सुरळीत सुरू ठेवणा-या संप्रेरकांच्या स्र्वण्यामध्ये अनियमितता निर्माण होऊन शरीरात 'बॅड फॅट (दूषित चरबी)' साचत जाऊन अकारण वजन वाढत जातं.

सर्वसाधारणपणे खाद्यपद्धतीमध्ये पाळत असलेल्या नियमांनुसार गोड पदार्थ जेवण्याच्या शेवटी खाण्याची एक पद्धत आहे. पण आयुर्वेदानुसार गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीलाच खावेत. ते शेवटी खाणं योग्य नाही. कारण अतिरिक्त चरबी वाढण्याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे. हा मुद्दा नीट समजण्यासाठी एक प्रयोग करा. एक दिवस नेहमीचं जेवण झाल्यानंतर ठरावीक प्रमाणात काहीतरी गोड पदार्थ खा. दोन दिवसांनी तोच गोड पदार्थ तेवढयाच प्रमाणात जेवणाच्या सुरुवातीला खा. आपल्या लक्षात येईल, की नेहमीपेक्षा निम्मं जेवणच आपण घेऊ शकलो. म्हणजे आपल्याला जेवढी भूक आहे, तितकंच अन्न घेण्याची आपल्या शरीराची क्षमता असते. त्यामुळे अनावश्यक व अवाजवी अन्न घेणं, हे आपोआपच टाळलं जातं. परिणामी चरबी वाढण्याचं प्रमाण कमी होतं.

जेवणानंतर पान खाण्याची पद्धतही योग्यच आहे. याचा अर्थ प्रत्येकानं पान खावं असा नाही, तर जेवणाचा शेवट गोड पदार्थानं करू नये, एवढाच अर्थ यातून घ्यावा. शरीराला हलकेपणा आणण्याचा हा अगदी सहजसोपा उपाय आयुर्वेदानं सांगितला आहे.

त्यामुळे आपला आहार, विहार योग्य ठेवला तर आपोआपच शरीर निरोगी राहतं. आयुर्वेदानं दिलेल्या माहितीच्या खजिन्यांचा जर आपण आपल्या जीवनशैलीत पुरेपूर वापर केला तर निश्चितच मन आनंदी आणि शरीर आरोग्यमय राहील, यात शंका नाही.

Read More »

अ‍ॅलर्जीपासून जरा जपून..

त्वचेवर खाज सुटणे, पुरळ उठणे, अचानक शिंका येणे, डोळ्यांना खाज सुटणे, त्वचा लाल होणे, उलटया होणे असे प्रकार हे अनेकदा अ‍ॅलर्जीमुळे होत असतात. बरेचदा आपल्याला त्याची माहिती नसते. अ‍ॅलर्जीची लक्षणे ही वेगवेगळ्या स्वरूपातील असतात. काही वेळा ती सौम्य स्वरूपाची असतात तर काही वेळा ती अतिशय तीव्र असतात. ज्याची परिणती काही वेळा अतिशय घातक रूपात अथवा मृत्यूमध्येदेखील परावर्तित होऊ शकते. कुठल्याही प्रकारची अ‍ॅलर्जी असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्याची तपासणी करून घ्यावी आणि त्वरित योग्य ते औषधोपचार करावेत.

कुठल्याही बाह्य घटकांच्या विरुद्ध शरीरातील संरक्षण संस्थेने दिलेली तीव्र स्वरूपातील प्रतिक्रिया म्हणजे अ‍ॅलर्जी होय. ही अनेक कारणांमुळे अथवा घटकांमुळे होऊ शकते. परागकण, धुलीकण, अन्नपदार्थ, कीटकांचा चावा, औषधे, बुरशीचे बिजाणू इत्यादींनी अ‍ॅलर्जी होऊ शकते. अ‍ॅलर्जीची लक्षणे विविध प्रकारे दिसून येतात. ही लक्षणं सौम्य किंवा तीव्र स्वरूपाची असली तरीही ती घातक ठरू शकतात.  सर्वसामान्यपणे अ‍ॅलर्जीचे काही ठरावीक प्रकार दिसून येतात. हे प्रकार आणि त्यामागची कारणे थोडक्यात जाणून घेऊ -

हे फिव्हर : अ‍ॅलर्जीचा हा प्रकार परागकण अथवा इतर सुक्ष्म घटकांमुळे दिसून येतो. या प्रकारामध्ये सर्दी, खाज सुटणे आणि डोळ्यातून पाणी येणे अशी लक्षणेसुद्धा दिसतात. तसेच नाकाजवळील भागात जळजळ होणे, खाजणे किंवा म्युकस अधिक प्रमाणात तयार होणे अशीही लक्षणे दिसतात. अधिक संवेदनशील व्यक्ती असेल तर त्वचेवर चट्टेही उठू शकतात.

रॅश : रॅश म्हणजे पुरळ. यामध्ये त्वचेवर काही वेळा गडद लाल रंगाचे चट्टे पडतात किंवा तेवढा भाग फुगल्यासारखा होतो. विषाणूजन्य अ‍ॅॅलर्जीमुळे, ताणतणावामुळे, सूर्यकिरणे किंवा तापमानातील बदलामुळेदेखील त्वचेवर पुरळ येऊ शकतात.

वनस्पतींची अ‍ॅलर्जी : पॉयझन आयव्ही, पॉयझन ओक, पॉयझन सुमॅक या झाडांमध्ये उरुशिओल नावाचा तेलकट रस असतो. या रसामुळे ब-याच जणांना अ‍ॅॅलर्जिक रिअ‍ॅक्शन येते. हा रस त्वचेच्या संपर्कात आल्यास पुरळ येऊन खाज सुटते. हा पुरळ काही तासांतच येतो आणि काही दिवसांपर्यंत राहतो. बागकामाचे साहित्य अथवा अन्य कुठल्याही कारणांमुळे व्यक्ती या रसाच्या संपर्कात आल्यास तिला याचा त्रास होऊ शकतो.
कीटकांचा चावा : मधमाशी, गांधीलमाशी, कुंभारमाशी, मुंग्या यासारखे कीटक आणि त्यांचा चावा यामुळे अनेकांना अ‍ॅलर्जी येऊ शकते. या कीटकांनी चावा घेतल्यानंतर त्यांच्या नांगीद्वारे विशिष्ट रस त्वचेवर सोडला जातो. त्यामुळे काही वेळा त्या ठिकाणी अल्प वेदना, सूज, लाली येऊ शकते.

पेट अ‍ॅलर्जी : काही व्यक्तींना पाळीव प्राण्यांपासून अ‍ॅलर्जीचा त्रास होतो. एखाद्या व्यक्तीची संरक्षण संस्था प्राण्यामधील ठरावीक प्रथिनांप्रति तीव्र प्रतिक्रिया दाखवते तेव्हा अशा प्रकारची अ‍ॅलर्जी होते. यामुळे नाकाच्या भागात तीव्र खाज सुटते, िशका येतात, नाक वाहते आणि इतरही लक्षणे दिसतात.

लॅटेक्स अ‍ॅलर्जी : रबरमधील प्रोटिनमुळे काही व्यक्तींना अ‍ॅलर्जी येते. यामध्ये सर्दीपासून तीव्र प्रकारच्या अ‍ॅलर्जीपर्यंत वेगवेगळे प्रकार दिसतात. काही वेळा परिस्थिती गंभीर होते तेव्हा त्वरित वैद्यकीय सेवेची गरज भासते. पातळ अथवा ताणले जाणारे रबर जे रबरी हातमोजे, फुगे इत्यादीमध्ये वापरले जाते त्यात प्रोटिन अधिक प्रमाणात असते. त्यामुळे त्यापासून काही जणांना अ‍ॅलर्जी येऊ शकते.

बुरशीची अ‍ॅलर्जी : यामध्ये प्रामुख्याने इनडोअर आणि आउटडोअर अशा बुरशीच्या प्रजाती असतात. अन्नावरची बुरशीही यासाठी कारणीभूत असते. बुरशीचे बीजकण श्वसनामार्फत शरीरात गेल्यास काही व्यक्तींच्या संरक्षण संस्थेद्वारे तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होते. याचा परिणाम म्हणून कफ होणे, डोळ्यांना खाज सुटणे यासारखी लक्षणे दिसतात. काही व्यक्तींच्या बाबतीत अस्थमादेखील अशा प्रकारच्या अ‍ॅलर्जीचा परिणाम दिसू शकतो.

सौंदर्यप्रसाधनांची अ‍ॅलर्जी : मॉइश्चरायझर, शाम्पू, डिओड्रंट, मेकअपचे सामान, कोलेजन्स आणि इतर सौंदर्यप्रसाधने आपल्या दैनंदिनीचा भाग असतात. बरेचदा अशी सौंदर्यप्रसाधने अ‍ॅॅलर्जकि रिअ‍ॅक्शनला कारणीभूत ठरतात. प्रसाधनांमध्ये वापरण्यात येणारे वेगवेगळ्या प्रकारचे सुगंध, प्रिझव्‍‌र्हेटिव्ह्ज हे अ‍ॅलर्जकि रिअ‍ॅक्शन वाढवणा-या अ‍ॅन्टजन्ससारखे काम करतात.

औषधांची अ‍ॅलर्जी : औषधांच्या अ‍ॅलर्जीमुळे एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसतात. एखाद्या औषधाविरुद्ध अ‍ॅलर्जी दिसणे ही तशी सर्वसामान्य गोष्ट आहे. मात्र या रिअ‍ॅक्शनच्या स्वरूपात वेगवेगळे प्रकार दिसून येतात. सौम्य खाज सुटणे किंवा सौम्य साइड इफेक्ट्स म्हणजे उलटया अथवा अन्नावरील वासना उडणे याबरोबरच तीव्र अ‍ॅलर्जीदेखील यामध्ये दिसून येते. ब-याच औषधांमुळे त्वचेवर बारीक पुरळ उठतात.

सलम सिकनेस : औषधे घेतल्यानंतर काही दिवसांनी दिसणारा हा अ‍ॅलर्जीचा प्रकार आहे. काही वेळा अशा प्रकारची अ‍ॅलर्जी एका आठवडयानंतर येते. एखादी लस दिल्यानंतरही अशा प्रकारची अ‍ॅलर्जी दिसू शकते. सल्फा ड्रग्ज, आकडीसाठी घेण्यात येणारी औषधे, इन्सुलीन, आयोडिनेटेड एक्स-रे कॉन्ट्रास्ट डाईज इत्यादी औषधांमुळे येणा-या अ‍ॅलर्जीसाठी कारणीभूत असणारे घटक आहेत.

एक्झिमा : हा त्वचेवर खाज निर्माण करणारा अ‍ॅलर्जीचा प्रकार आहे. लहान मुले, नवजात अर्भके आणि काही व्यक्तींना आयुष्यभर या त्रासाला सामोरे जावे लागते. अनेक प्रकाचे त्वचेचे दाह व्यक्त करणारी अ‍ॅलर्जी ही एक्झिमाची सर्वसामान्य व्याख्या आहे. त्याला डर्मिटीज असेही म्हणतात. संरक्षण संस्थेचे अनसíगक कार्य हे या अ‍ॅलर्जीचे कारण मानले जाते. एक्झिमा होण्यामागे त्वचेच्या संपर्कात येणारे काही सर्वसामान्य घटक आहेत. त्यामध्ये साबण, प्रसाधने, कपडे, डिर्टजट, दागिने आणि घाम यांचा समावेश होतो.

डोळ्यांची अ‍ॅलर्जी : डोळ्यांची अ‍ॅलर्जी ही एक सर्वसामान्य तक्रार आहे. यामुळे डोळे येणे, डोळ्यात घाण येणे, खाज सुटणे यासारखी सर्वसामान्य लक्षणे दिसून येतात. परागकण, गवत, धूळ, पाळीव प्राण्यांच्या शरीरावरील सुक्ष्म कण यामुळे ही अ‍ॅलर्जी होऊ शकते.

दुधाची अ‍ॅलर्जी : दूध आणि दुधाची वेगवेगळी उत्पादने तसेच दुधातील प्रथिने काही व्यक्तींसाठी अ‍ॅलर्जीस कारणीभूत ठरतात. अशा व्यक्तींना उलटया होणे, जुलाब होणे, पोटात कळा येणे अशी लक्षणे दूध अथवा दुग्धजन्य पदार्थ घेतल्यास लगेच दिसतात.

अन्नपदार्थाची अ‍ॅलर्जी : काही व्यक्तींना ठरावीक अन्नपदार्थाची अ‍ॅलर्जी असते. त्यामध्ये अंडी, दूध, पिनट्स आणि इतर काही अन्नपदार्थाचा समावेश असतो. या प्रकारच्या अ‍ॅलर्जीमुळे शरीरात अ‍ॅलर्जी निर्माण करणा-या इम्युनोग्लोबीन अ‍ॅण्टीबॉडीज तयार होतात. काही व्यक्तींमध्ये फारशी तीव्र लक्षणे दिसत नाहीत. अन्नाची अ‍ॅलर्जी असेल तर संरक्षण संस्था अ‍ॅण्टीबॉडीज आणि हिस्टामाईन अर्थात रक्तपेशींशी संबंधित असणारे द्रव्य तयार करतात. तसे पाहिले तर कुठल्याही अन्नामुळे अ‍ॅलर्जी होऊ शकते. पण सर्वसामान्यपणे जे अन्नपदार्थ यासाठी कारणीभूत असतात त्यामध्ये वर सांगितल्याप्रमाणे अंडी, दूध, समुद्री प्राणी, गहू इत्यादींचा समावेश असतो.

प्रतिबंधात्मक उपाय : अ‍ॅलर्जी पूर्णपणे बरी होण्यासाठी तसा कुठलाही ठोस इलाज नाही. पण एकदा अनुभव घेतल्यानंतर आपण योग्य ती काळजी घेतल्यास त्यापासून बचाव करता येतो. अ‍ॅलर्जीसाठी कारणीभूत असणा-या वेगवेगळ्या गोष्टींपासून स्वत:ला दूर ठेवणे हा त्यावरील एक सोपा उपाय आहे. त्यासाठी घरातील पाळीव प्राणी खोलीतून बाहेर ठेवावेत किंवा त्यांना रोज आंघोळ घालावी. घरातील ब्लँकेट्स, काप्रेट्स, पांघरूण रोज खोलीतून बाहेर काढावीत आणि त्यावरील धूळ झटकावी. आठवडयातून एकदा धुवावीत. ज्यामुळे घरात जास्त प्रमाणात धूळ येते अशा वस्तू अथवा घराची रचना ठेवू नये. धुळीची अ‍ॅलर्जी असल्यास विशिष्ट प्रकारच्या उशा आणि अभ्रे वापरावेत.

परागकणांची अ‍ॅलर्जी असल्यास घरात असताना खिडक्या बंद ठेवाव्यात. हवेत मोठया प्रमाणात परागकण असण्याच्या ऋतूमध्ये बाहेरून आल्यानंतर त्वरित कपडे बदलावेत. बुरशीची अ‍ॅलर्जी असल्यास घरातील ओला राहणारा भाग म्हणजे बाथरूम, सिंक इत्यादी स्वच्छ ठेवावेत.

तीव्र स्वरूपाची अ‍ॅलर्जी असल्यास घरात अ‍ॅण्टीडॉट नेहमीच असू द्यावेत. एपिनेफ्रिन हे सर्वसामान्यपणे वापरण्यात येणारे परिणामकारक औषध आहे. चटकन सापडतील अशा ठिकाणी बेनाड्रील या अ‍ॅण्टी हिस्टामाइन गोळ्या ठेवाव्यात. जवळ नेहमी मेडिकल इमर्जन्सी नंबर ठेवावा. अ‍ॅलर्जी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी सरळ झोपवावे आणि पायाखाली उशी ठेवावी. कपडे सल असावेत आणि त्या ठिकाणी हवा खेळती असावी.

सर्दी किंवा तत्सम प्रकारच्या अ‍ॅलर्जीचे लक्षण दिसत असल्यास आणि औषधांनीदेखील ती बरी होत नसल्यास चिमूटभर बेकिंग सोडा किंवा अर्धा चमचा आयोडाईज्ड् नसलेले मीठ घ्यावे, त्यात थोडे कोमट पाणी टाकावे. स्वच्छ ग्लासात हे मिश्रण घेऊन नाक आणि तोंड धुवावे. त्वचेवर पुरळ येत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्याचबरोबर गार पाण्याने शॉवर घ्यावा, कॅलामाइन लोशन लावावे. तसेच तोंडावाटे अ‍ॅन्टी हिस्टामाइन घ्यावे.

कीटकांच्या चाव्यामुळे अ‍ॅलर्जी येत असल्यास कीटकांना दूर ठेवण्याचे शक्य तितके प्रयत्न करावेत. एखाद्या कीटकाची नांगी त्वचेत राहिल्यास तीस सेकंदाच्या आत ती काढावी, जेणेकरून नांगीतील द्रव त्वचेत जाणार नाही. त्वचेवर बसलेला कीटक पूर्णपणे काढून टाकण्याचा प्रयत्न करून हा भाग कोमट पाण्याने स्वच्छ धुवावा. त्यासाठी सौम्य डिर्टजटचा वापर करावा. तसेच तोंडातून अ‍ॅन्टी हिस्टामाइन घ्यावे. अर्थात, कुठल्याही प्रकारची अ‍ॅलर्जी असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्याची तपासणी करून घ्यावी आणि त्वरित योग्य ते औषधोपचार करावेत.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe