Tuesday, October 8, 2013

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

वेदनारहित जीवन

आयुर्वेदाने वेदनांकरता अतिरिक्त असलेल्या वातदोषाला जबाबदार धरले आहे. वात वाढल्याचा परिणाम हालचाली मंदावण्यावर होतो आणि एका क्षणी शरीराचे चलनवलन थंडावते. संधिवात तसेच मान, शरीर, गुडघा आणि सांधे आदी दुखण्यामागील मुख्य कारण म्हणजे शरीरात आमवात वाढणे हे होय.

शरीरातील सांधेदुखीला सुरुवात होण्यासाठी हल्ली ठरावीक वय होण्याची गरज राहिलेली नाही. चुकीच्या आहारामुळे आणि जीवनशैलीमुळे वातदोष वाढून सांधेदुखी निर्माण झालेले रुग्ण दिसत आहेत.

वातदोषाची लक्षणे कोणती आहेत?

>> गुडघ्याचे सांधे, बोटांचे सांधे, खांदे, मान किंवा पाठ यात तीव्र वेदना असल्याने ताठरता येणे

>> पायाचा घोटा, कोपर, गुडघ्याचे सांधे, बोटे यावर सूज येण्याबरोबरच स्पर्शही सहन न होणे

>> सूज न येताही सांधे वाकडे होतात आणि त्यातून येणा-या करकरीमुळे ऑस्टिओ आथ्र्रायटिस होण्याची शक्यता यातूनच जिने चढ-उतार करणे किंवा जमिनीवर खाली बसणे अशक्य.

>> काही लोकांना सायलेंट किलर असलेला ऑस्टिओपोरोसीस झाल्याने पाठ किंवा कंबर तसेच गुडघ्यातील सांध्यांमध्ये अचानकपणे फ्रॅक्चर होते. त्यामुळे पाठ, कंबर किंवा गुडघे यात वेदना जाणवतात.

>> चालताना, खूप वेळ उभे राहताना किंवा जमिनीवर बसताना त्रास होतो तसेच वेदना जाणवतात.

आहार

निश्चित आहार - सांधेदुखी, सूज किंवा ताठरपणा ही सर्व वाढलेल्या वाताची थेट लक्षणे आहेत. सुधारित आहाराने वात कमी होऊन आराम पडतो.

काय खाऊ नये - गहू आणि गव्हाशी निगडित उत्पादने. दही, चिंच आणि टोमॅटो, तेलकट पदार्थ, कच्चे सॅलड, मटण, आंबवलेले पदार्थ, गॅस निर्माण करणारी कडधान्ये म्हणजे राजमा, वाटाणा, हरभरा, पांढरा वाटणा, भेंडी, कैरी, थंडगार पाणी, शीतपेयं, थंड दूध, आइस्क्रीम इत्यादी, हे सर्व जर नियमितपणे खाल्ले तर त्यातून वात वाढतो ज्यामुळे पचनशक्ती कमी होते आणि परिणामी विषारी द्रव्ये वाढतात.

वात कमी व्हावा याकरता तुम्ही काय अधिक प्रमाणात खायला हवे - तांदूळ आणि ज्वारी, बाजरी, नाचणी यापासून केलेली भाकरी, मूगडाळ, मसूरडाळ आणि अख्खे मसूर, लाल भोपळा, पडवळ, कारलं, गाजर, बीट, कोथिंबीर, कांदा, मेथी, फळांपासून तयार केलेले पेय, सेलरी, पालक, खरबूज, मसाल्यांमध्ये आले, लसूण, लवंग, दालचिनी, काळीमिरी, कढीलिंब, वेलची.

फळे – अ‍ॅव्हाकडो, जर्दाळू, गोड द्राक्षे, सफरचंद, राय, केळं, नारळ, अंजिर, खजूर, टरबूज, पपया.

अन्य - मध, पाम शुगर, शुद्ध न केलेली साखर, तूप, लोणी आणि दूध.प्रसंगनिमित्ताने चिकन, अंडी, मासे, शिजवलेला कॉलिफ्लॉवर, ब्रोकोली, कडधान्य आणि कोबी चालू शकतो. भिजवलेली नट्स आणि नट बटर काही प्रमाणात सेवन केली तर चालतील, पण आठवडयातून दोनपेक्षा अधिक वेळा नाहीत.

घरगुती उपायांनी वातदोषामुळे निर्माण होणा-या वेदनांमध्ये मोठा फरक पडू शकतो.

>> झोपण्यापूर्वी आल्याच्या पाण्यात एक टी-स्पून कॅस्टर ऑइल घालून प्यायल्यामुळे सांधेदुखी किंवा संधिवात परिणामकारकरीत्या दूर राहू शकतो.

संधिवात विरोधी फॉम्र्यूला

एक चमचा चिंच, १/४ चमचा लसूण, १/४ चमचा ओवा, १/२ चमचा कोथिंबीर पावडर, १/२ चमचा मेथी, हे सर्व अर्धा कप पाण्यात भिजवून दिवसातून दोन वेळा घेणे

तुमच्या सांध्यांची झीज थांबवण्यासाठी पारंपरिक उपचारपद्धती

आयुर्वेदातील डिटॉक्सिफिकेशन उपचारपद्धती ही संधिवातामागील मुख्य कारण नाहीसे करण्याकरता उपयुक्त असते. यामुळे शरीरातील सर्व भागांतून विषारी द्रव्ये निघून जातात. डिटॉक्सिफिकेशनमुळे सांध्यातील गुठळय़ा तसेच सूज कमी होते, सांधे बळकट होतात, तसेच हाडांची घनता वाढते. साहजिकच वेदना, सूज, सांध्यातून येणारा करकर आवाज सर्व कमी होते. डिटॉक्सिफिकेशनमुळे सायटिका, स्पॉन्डेलायसिस, ऑस्टिओ आथ्रायटिस, ऑस्टिओपोरोसीस, पाठदुखी, मानदुखी कमी होते. तसेच फ्रोझन शोल्डर, ताठरता यापासून तात्काळ सुटका मिळण्यासाठी मर्म पद्धती वापरली जाते. मर्म ही पारंपरिक भारतीय प्रेशर थेरपी आहे, जी ब्लॉकेज काढते आणि तात्काळ आराम देते. 'लोहित्क्षा' नव्‍‌र्ह ही काखेच्या केंद्रस्थानी उजवीकडे असते. या मध्यबिंदूवर प्रेशर दिले आणि मिनिटभर त्याला दाबलेल्या अवस्थेत ठेवले आणि नंतर गोल-गोल मसाज केला की ते तातडीने काम करायला सुरुवात करते. ही मर्म थेरपी दिवसातून किमान तीन वेळा करा.- डॉ. स्मिता नरम, सहसंस्थापिका 'आयुशक्ती'

Read More »

आपले आरोग्य व आयुर्वेद

तरुण पिढी आपल्या प्रकृतिस्वास्थ्याविषयी पूर्वीच्या पिढीपेक्षाही चांगलीच सजग झालेली दिसते. विविध वर्तमानपत्रं, मासिकं, पुरवण्यांद्वारे अनेक तज्ज्ञ, डॉक्टर, वैद्य, डाएटिशियन्स लोकांना जागरूक करत असतात. यासाठी विविध पॅथीतील गुणकारी औषधंही उपलब्ध आहेत. आयुर्वेद या उपचारपद्धतीत मानवी शरीर आणि त्याचा मानसिक स्वास्थ्याशी असलेला दृढ संबंध यांचा विचार करतं आणि प्राथमिकतेने रोग होऊच नयेत यावर भर दिला जातो. त्यातूनही जर कुठला रोग बळावला, तर त्या रोगाला समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न आयुर्वेद करतं.

आपलं आरोग्य आपल्या हातात, असं म्हटलं जातं. आमच्या लहानपणी खेडयात राहत असताना गावातील मोठया घरात गेलं की, ओसरीवरील भिंतींवर छोटय़ा सुबक पाटय़ा लावलेल्या असायच्या.. त्यावर लिहिलेलं असायचं 'देही आरोग्य नांदते, भाग्य नाही या परते!' लोकांचंही आरोग्याकडे लक्ष असायचं, निसर्गाच्या सहवासात आणि शुद्ध अन्नामुळे लोकांचं आरोग्य वर्षानुर्वष चांगलं राहायचं. वृद्धत्व आल्याशिवाय सहसा कोणी आजारी पडायचं नाही, पण आता हे चित्रच पालटलं आहे. त्या वेळी वरचं खाणं म्हणून खजूर, कुरमुरे व बिस्किटांशिवाय खाद्यपदार्थ नव्हते. हल्लीच्या 'जंक फूड'नं अबालवृद्धांनाही मोहिनी घातली आहे. या पदार्थाचं वारंवार किंवा प्रमाणाबाहेर सेवन केल्यामुळे माणसाला विविध रोगांनी घेरलं आहे. माणसानं स्वार्थापोटी निसर्गाचाही नाश केल्यामुळे वातावरणात होत असलेले गंभीर बदल व बिघाड याला हातभार लावत आहेत.

असं म्हणतात की, माणूस ज्या प्रदेशात राहतो तिथल्या वनस्पतीच त्याला रोग झाला असेल, तर बरं करतात. आयुर्वेदात वनस्पतीजन्य व अनुभवजन्य अशी हजारो औषधं आहेत. अॅलोपथी, होमिओपथीमध्येही आहेत. सर्वच पद्धतींचा प्रधान हेतू रुग्णाला बरं करणं हाच आहे यात शंका नाही. आयुर्वेदातील काही औषधं आपण जर उपयोगात आणली तर ते फायद्याचं ठरू शकेल. रोगाच्या प्रारंभीच्या लक्षणांमध्ये ही औषधं वापरा. जर बरं वाटलं नाही, तर मात्र वैद्य किंवा डॉक्टरांना लगेच भेटा व त्यावर उपाय करा. लहानसहान आजारांकडे अगदीच दुर्लक्ष करण्यापेक्षा त्यावर उपाय करून शरीर सुदृढ ठेवा, कारण जीवन म्हणजे चालत राहणं आणि चालत राहणं हे सजीव असल्याचं लक्षण आहे. माणूस बसल्या जागेवरून हलेनासा झाला की, त्यानं आजारांना आमंत्रण दिलंच म्हणून समजा. प्राथमिकरीत्या आपल्याला वापरता येण्याजोग्या काही आयुर्वेदीक औषधांविषयी थोडक्यात..

महासुदर्शन काढाय/चूर्ण - कोणत्याही तापावर, सर्दीवर, भूकेसाठी एक उत्तम औषध. माझ्या असं निदर्शनास आलं की, अनेकांना याचं नावही माहीत नाही. पण हट्टी तापही यानं आटोक्यात येतो. प्रत्येक घरात संग्रही असावं, असं हे औषध आहे. लहान मुलांनाही उपयोगी आहे.

कुमारीआसव - कुमारी म्हणजे कोरफड. कोरफडीचा महत्त्वाचा गुणधर्म कफ (दीर्घकाळ टिकलेला कफ) पातळ करणं. यकृताचं आरोग्य उत्तम ठेवून त्याचं संरक्षण करतं. कावीळ होण्यास प्रतिबंधात्मक तसंच मासिक पाळीशी संबंधित हार्मोन्स (संप्रेरके) योग्य प्रमाणात स्र्वण्यातही कुमारीआसव खूपच गुणकारी आहे. याच्या नावात जरी कुमारी हा शब्द असला तरी स्त्रियांनी व मुलांनी वेगवेगळ्या कारणांसाठी हे जरूर सेवन करावं. यामध्ये लहान मुलांसाठी आणि प्रौढांसाठी असे प्रकार आहेत.

त्रिफळा चूर्ण- त्रिफळा चूर्ण म्हणजे हरडा + बेहडा + आवळा यांचं मिश्रण. हे चूर्ण बाजारात तयार मिळतं. जर बद्धकोष्ठता असेल तर गरम (कोमट) पाण्यातून रात्री झोपतेवेळी एक चमचा घेतल्यास सकाळी पोट साफ होतं. प्रत्येकानं आपल्या तब्येतीनुसार प्रमाण ठरवावं. याचा आणखी एक उपयोग माझ्या अनुभवास आला, तो म्हणजे आपल्या दंतमंजनात हे एक चमचा मिसळलं व ही पावडर दातांना लावली तर हिरडय़ा व दात खरोखरच मजबूत होतात. याचा अनुभव अनेकांना आला आहे. हे नित्य वापरावं.

कडुनिंब – या झाडाचे गुण बहुतेकांना माहीत आहेत. यापासून पंचनिंब चूर्ण हे औषध तयार करतात. अंगावर सुटलेली खाज व पुरळ जाण्यास तसंच रक्तशुद्धीस याचा उपयोग होतो. रोजच्या पिण्याच्या पाण्यात कडुनिंबाची पाच पानं उकळून ते पाणी प्यायल्यास रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

या औषधांशिवाय सितोपलादी चूर्ण, सुवर्णमालिनी वसंत, सूतशेखर, सारिवाद्यासव ही औषधं रोगपरत्वे वापरण्यासारखी आहेत. मात्र सर्व आयुर्वेदिक औषधं आरोग्यास हानिकारक नसली, तरी उपचारांदरम्यान त्यांचं घ्यायचं प्रमाण हे वैद्यांच्या सल्ल्यानंच घेणं योग्य. सुंठ, मेथी, अनंतमूळ (सारिवा), द्राक्षं इ. अनेक फळं/वनस्पतींचा वापरही आयुर्वेदात प्रामुख्यानं केला जातो. जसं द्राक्षांपासून बनवण्यात येणारं द्राक्षासव तर आवळ्यापासून तयार होणारं च्यवनप्राश हे शक्तिवर्धक कल्प, आवळा पावडर यांसारखी रसायनमुक्त औषधं ही वरदानच ठरणारी आहेत. आपण काळजीपूर्वक अभ्यास केल्यास आयुर्वेदातील वा अन्य शास्त्रांतील आपल्याच अवती-भवती असणा-या अनेक गुणकारी औषधांचा आपणास परिचय होईल. शेवटी 'सर्वे: सन्तु निरामय:' याच प्रार्थनेतून सर्वानाच शारीरिक आणि मानसिकही सुदृढ आरोग्यासाठी शुभेच्छा आहेत.

Read More »

मनाचा गुंता नकोच!

मानसिक आजारांनी ग्रस्त अशा अनेक व्यक्ती समाजात अवतीभवती वावरताना दिसतात. काही समाजाला घातक ठरतात तर काहींमुळे त्यांच्या कुटुंबाचं नुकसान होतं. आपण ज्याला मनाचे खेळ म्हणतो तिथूनच खरी मानसिक आरोग्यविषयक समस्यांना सुरुवात होते. हे मनाचे खेळ थांबवणं ज्यांना शक्य होतं ते सुदैवी कारण याच गोष्टी पुढे मानसिक स्वास्थ्याची आणि पर्यायाने पूर्ण कुटुंबाची वाताहत करतात. येत्या गुरुवारी १० ऑक्टोबरला असणा-या जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने मानसिक आरोग्य आणि मनाच्या स्वास्थ्याविषयी जाणून घेऊ या..

बॉम्बस्फोटातून सुदैवानं वाचलेल्या माणसाला टीव्ही चॅनेलवरील पत्रकारानं नेहमीचाच आणि तद्दन मूर्खपणाचा प्रश्न टाकला की आता तुम्हाला कसं वाटतंय? वास्तविक अपघात किंवा बॉम्बस्फोटातून वाचलेली कोणतीही व्यक्ती कोणत्याही भावना योग्य रीतीनं दाखवण्यासाठी मानसिकदृष्टय़ा सक्षम नसते. पण हे त्या रिपोर्टरच्या गावीही नव्हतं. परंतु समाजातदेखील असं बरेचदा होतं की मानसिक आरोग्य ठीक नसणा-या व्यक्तींना आजूबाजूची माणसं समजून घेत नाहीत आणि त्यांना योग्य उपचारही मिळत नाहीत. अशा माणसांना तुच्छतेनं वागवलं जातं. पण मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची वेळ कोणावरही येऊ शकते. सहसा भीती आणि तणावापोटी अनेकांचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आढळतं. मानसिक आरोग्यावर परिणाम करणा-या अनेक गोष्टी आजूबाजूला घडत असतात. आपण नेहमीच अनुकूल परिस्थितीत राहतो असं नाही. घडणा-या सर्व ब-या-वाईट गोष्टींचा आपण स्वत:वर किती आणि कोणत्या प्रकारे परिणाम करून घेतो यावर आपलं मानसिक स्वास्थ्य अवलंबून असतं. मनावर योग्य ताबा, निर्णयशक्ती, आकलनशक्ती अशा काही गोष्टी मानसिकरीत्या स्वस्थ असणा-या व्यक्तींमध्ये चांगल्या पद्धतीने काम करत असतात. आजकालच्या जगात कोणत्याही अनपेक्षित समस्यांना तोंड न देणं, दुस-यांना मदत न करणं, तटस्थ राहणं, दुस-यांशी फारसा संपर्क न ठेवणं अशा काही मार्गानी स्वत:चं मनस्वास्थ्य नीट ठेवायचा प्रयत्न केला जातो, पण मनुष्य हा समूहात जगणारा प्राणी आहे आणि त्यायोगे त्याने काही सामाजिक क्रियांमध्ये गुंतणं हेच आवश्यक असतं, अन्यथा मानसिक स्वास्थ्य बिघडण्याचा धोका असतो.

आजकाल भवताली घडणा-या आत्महत्यांच्या किवा बलात्काराच्या घटना आपण पाहतोय आणि ही दुर्गती कशी झाली याचा विचार करतोय. या सामाजिक दुर्गतीचं एक कारण आहे ते म्हणजे बिघडलेलं मानसिक स्वास्थ्य. अशा घटनांमधील गुन्हेगार व्यक्तीचं मानसिक आरोग्य शाबूत नसतं. कोणत्याही स्थितीत निर्णय घेण्यासाठी संतुलित मन असणं हे तुमचं मन तंदुरुस्त असल्याचं लक्षण आहे. अशा स्वस्थ मनानेच तुम्ही तुमच्या गुण-कौशल्यांचा पुरेपूर वापर करता आणि आयुष्यातील समस्यांना तोंड देता. ज्या व्यक्तींची शिकण्याची, भावना प्रकट करण्याची, परिस्थितीनुरूप वागण्याची आणि बदलांना तोंड देण्याची मानसिक स्थिती उत्तम आहे त्यांचं मानसिक स्वास्थ्य उत्तम आहे असं सर्वसाधारणपणे म्हणता येईल. व्यक्तीचं मानसिक स्वास्थ्य तसं अनेक गोष्टींशी निगडित आहे. मानसिक स्वास्थ्य चांगलं असणं किंवा बिघडणं त्यासाठी फक्त एकटीच व्यक्ती जबाबदार नसते तर मानसिक आरोग्य आजूबाजूच्या माणसांवर आणि स्थितीवरदेखील अवलंबून असतं. त्यात काही तात्पुरते तर काही वेळा कायमचे बदल किंवा बिघाड होऊ शकतात. जसं परीक्षा काळात येणारा तणाव हा थोडय़ा काळापुरता असतो, मात्र एखाद्या व्यक्तीला नाहक खूप वर्ष न्यायालयीन प्रक्रियेत अडकावं लागलं तर त्यामुळे होणारा मानसिक स्थितीतील बदल हा नकारात्मक आणि मोठय़ा काळासाठी असू शकतो. एखाद्या मोठय़ा अपघातानंतरही माणसाची स्थिती अशीच होते, ज्याला मानसशास्त्रीय भाषेत 'ट्रॉमा' म्हटलं जातं. म्हणूनच लष्करात भरती होण्यासाठी आलेल्या सैनिकांची मानसिक क्षमतेची चाचणी घेतली जाते. त्यातून कठीण संकट स्थितीमध्येही ते निर्णय घेऊ शकतील की नाही हे त्यात पाहिलं जातं.

शारीरिक आरोग्याइतकंच मानसिक आरोग्य चांगलं असणंदेखील महत्त्वाचं असतं. भावनिक ताणाशी ब-याचशा मानसिक समस्या संबंधित असतात. हल्लीच्या ताणतणावाची कार्यशैली आणि जीवनपद्धतीमुळे खरं तर मानसिक स्वास्थ्य थोडंफार विचलित होतंच. उदाहरणार्थ, काही महिलांना रात्री बाहेर फिरण्याची भीती वाटते, ही भीती कायमचा फोबिया बनून मनाला किडवून टाकण्याआधी तिच्यावर उपाययोजना झाली पाहिजे. प्रत्येक मानसिक समस्येवर उपाययोजना आहेत, समस्या सोडवण्याचे मार्ग आहेत, त्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांची किंवा समुपदेशकांची मदत घेण्यात आडकाठी करू नये. मानसोपचारतज्ज्ञ आणि समुपदेशक आपल्या मदतीसाठीच असतात. आपल्या रोजच्या आयुष्यात ताण उत्पन्न करणारे, भीती दाखवणारे असे अनेक क्षण येतच असतात मात्र त्यातून कोणती मोठी मानसिक समस्या उद्भवतेय असं वाटल्यास विचारपूर्वक त्या समस्येतून मार्ग काढणं गरजेचं असतं. इंग्रजीत 'क्लीअर युअर माइंड फ्रॉम कान्ट' असं म्हटलं जातं म्हणजेच नकारात्मक गोष्टी मनातून सर्वप्रथम काढून टाकून समस्या सोडवण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल टाकलं पाहिजे, असं या वाक्यातून सूचित केलं आहे आणि तुमचं मानसिक आरोग्य चांगलं असेल तर हे निश्चितच जमण्यासारखं आहे. मानसिक आरोग्य बिघडलं आहे हे दाखवणारी फार काही निराळी लक्षणं नसतात, मात्र व्यक्तीच्या चालण्या-बोलण्यातील, त्याच्या वागण्यातील फरक जाणवला तर हे लगेच लक्षात येऊ शकतं. मनस्वास्थ्य बिघडलं असेल तर अशा व्यक्तीच्या विचारांमध्ये, भावना प्रकट करण्यामध्ये मोठे बदल जाणवतात. अशा व्यक्तींना समुपदेशनाची, मार्गदर्शनाची गरज असते. मानसिक स्वास्थ्य बिघडलेली कोणतीही व्यक्ती योग्य उपचारांनी त्यातून पूर्ण बरी होऊ शकते.

मनाचे व्यापार फार गूढ आहेत आणि आजतागायत कोणालाही, अगदी मानसशास्त्रज्ञांनाही किंवा चिकित्सकांनाही त्याचा थांग लावणं शक्य झालेलं नाही. व्यक्तींप्रमाणे मानसिक प्रवृत्तीही बदलत जातात. वास्तविक अमूक एक असा हा अवयव म्हणजे आपलं मन आहे असं दाखवता येत नाही. पण मानसिक समस्येवर काही उपचार करून त्यातून शंभर टक्के बरं होणं हे मात्र शक्य आहे. त्यात साथ हवी ती स्वत:ची आणि कुटुंबीयांची. कितीही आपलं वाटत असलं तरी दूषित विचारांनी व्यापलेलं मन हे निश्चितच आपलं नाही हे ध्यानात ठेवून अशा मनाला ताबडतोब नियंत्रणात आणलेलं बरं. निरोगी मनाचा ठेवा हा आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा ठेवा आहे कारण निरोगी मनांशिवाय निरोगी समाजमन आणि समाजस्वास्थ्य नाही.

मन ठेवा तंदुरुस्त

>> कुटुंबीयांशी आणि मित्रपरिवाराशी सतत सुसंवाद आणि संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करा.

>>स्वत:चे गुण, क्षमता आणि कौशल्यांबाबत आत्मविश्वास असू द्या.

>>मनाला त्रासदायक अशा गोष्टी जवळच्यांना बोलून दाखवा, मनात काहीही दडवून अथवा साठवून ठेवू नका.

>> शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी उत्तम आहार आवश्यक.

>> कोणत्याही कामातून कमीत कमी पाच मिनिटांचा ब्रेक घेतलाच पाहिजे. या काळात ताण नाहीसा होईल अशा गोष्टीत मन रमवा.

>> चांगली झोप घ्या आणि आवडत्या गोष्टींमध्ये सक्रिय राहा.

मानसिक स्वास्थ्याशी निगडित काही गैरसमज

>> मानसिक रुग्ण कधीच बरे होत नाहीत.

>> सर्व मानसिक आजार आणि त्यांचे उपचार हे एकसारखेच असतात.

>> मानसिक आजार हे संसर्गजन्य असतात.

>> मानसोपचारतज्ज्ञांकडे फक्त मानसिक रुग्णांनीच जावे.

>> मानसिकदृष्टय़ा आजारी व्यक्ती ही ठार वेडी असते.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe