Tuesday, August 27, 2013

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

रंगबिरंगी, चविष्ट, चटकदार पराठे

इडली, डोसे, उपमा, पोहे यांच्यानंतर भारतीय पारंपरिक न्याहरीत मोठया प्रमाणावर केला जाणारा खाद्यपदार्थ म्हणजे पराठे. या पराठयाचे आकार, प्रकार, रंगही निराळे. त्यामुळे पराठे आवडत नाहीत, असं सांगणारे सापडणं म्हणजे कठीणच. आहारतज्ज्ञांकडूनदेखील पौष्टिक पराठे खाण्याचा सल्ला दिला जातो.

मागे एकदा ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथांच्या व्याख्यानाला जाण्याचा योग आला. 'दुष्काळ आणि दारिद्रय' हा व्याख्यानाचा विषय होता. त्यावेळी त्यांनी एक मस्त किस्सा सांगितला. तो किस्सा 'पराठा' या खाद्यप्रकाराशी निगडित होता. बंगालमध्ये तत्कालीन दुष्काळसदृश परिस्थितीत अन्नाचा प्रचंड तुडवडा असल्यामुळे लोक ते पुरवून आणि वाचवून खायचे. तसं करण्यावाचून त्यांच्याकडे दुसरा कुठला पर्यायच नव्हता. अगदी भाजीचा खर्च वाचण्यासाठी उपलब्ध असलेल्या भाजीत कुठल्याही तृणधान्याचं पीठ कालवून रोटी नाहीतर, भाकरी हा पदार्थ केला जायचा.

अशाच प्रकारचं उदाहरण ज्येष्ठ आहारतज्ज्ञ डॉ. मालती कारवारकर यांच्याकडूनही ऐकायला मिळालं. नावडत्या भाज्या कशा आवडत्या करायच्या किंवा कशा प्रकारे केल्या जातात, ते सांगताना 'पराठे' या खाद्यपदार्थाचं उदाहरण त्यांनी दिलं. पराठयाचा वापर केवळ सकाळच्या न्याहरीत न करता दुपारच्या ते अगदी थेट रात्रीच्या जेवणात करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. संपूर्ण दिवसभरात आपल्याला विविध पदार्थ निरनिराळया अन्नघटकांचा मेळ करून खावे लागतात. अशा वेळी पराठा हा खाद्यपदार्थ सरस ठरतो. प्रथिनं, कबरेदकं आणि तंतुमय पदार्थ या अन्नातून मिळणा-या तिन्ही घटकांमधील पोषणमूल्यं पराठयांमधून एकत्रितपणे शरीराला मिळतात.

'परात' आणि 'आटा' या दोन शब्दांपासून 'पराठा' या शब्दाची व्युत्पत्ती झाली आहे. भारताप्रमाणे ब्रह्मदेश, मॉरिशस, मालदिवमध्येही पराठा या खाद्यपदार्थाचा पगडा आहे. तिथे या पदार्थाची 'पलाता', 'फराता' ही नावं आहेत. या भागात पराठे पालेभाज्यांप्रमाणे चिकन खिमा, मशरूम्स्, मासे यांच्यापासून सारण तयार करून बनवले जातात. आता आपल्याकडेही अशाच प्रकारची सारणं वापरून पराठयांच्या चवीत वाढ केली जाते. हल्ली 'हेल्थ कॉन्शिअस' झालेले लोक ओट्स, बार्ली, नाचणी यांसारख्या शरीर संरक्षक घटकांपासून बनवलेले पराठे लोक आवडीनं खायला लागले आहेत. पालेभाज्यांपासून पराठा करताना त्या बारीक चिरून वा मिक्सरमध्ये वाटून ते केले जातात. मेथी, कोथिंबीर या भाज्यांना स्वत:ची चव असते. या भाज्यांपासून पराठे तयार करताना आलं, मिरची वा फार तर लसूण एवढाच मसाला पुरतो. पालक, चाकवत, माठ या भाज्यांच्या पराठयांना जो मसाला वापराल त्याप्रमाणे चव येते. कारण या भाज्यांना स्वत:चा असा स्वाद नसतो. या भाजीत आवडीप्रमाणे गरम मसाला, गोडा मसाला, पावभाजी मसाला, धने-जि-याची पूड किंवा बडीशेपची पूड यापैकी काहीही घालायला हरकत नाही.

कोबी, फ्लॉवर, नवलकोल, बीट, मुळा, गाजर, दुधी यांसारख्या भाज्या स्वतंत्र किंवा एकत्र किसून, त्या चमचाभर शुद्ध गायीच्या तुपात परतून, त्यावर गव्हाचे पीठ पेरून सारण करता येतं. सारणात उकडलेला बटाटा कुस्करून घातल्यामुळे त्याला घट्टपणा येतो. दुधी, गाजर, बीट, लाल भोपळा किसून तसंच पाणी न घालता नुसत्या वाफेवर शिजवून गार झाल्यावर त्यात कणीक (गव्हाचं पीठ), तेल, तिखट, मीठ, मसाला, आलं-लसूण-मिरचीची पेस्ट आपल्या आवडीप्रमाणे घालून पराठे करता येतात. काही कच्च्या भाज्यांमध्ये पाण्याचा अंश जास्त असतो, त्यामुळे कणीक मळण्यासाठी त्याचा वापर करून घेतल्यास पराठे लाटताना जास्त चिकट होत नाहीत. तर असे पराठे दही, सॉस किंवा कोथिंबीर, पुदिन्याच्या हिरव्या चटणीबरोबर चविष्ट लागतात.


वांग्याचे पराठे

साहित्य - एक मध्यम आकाराचं भरिताचं वांगं, चिंचेचा कोळ, दीड ते दोन वाटया गव्हाचं पीठ, अर्धी वाटी तेल, चवीपुरतं लाल तिखट, साखर, मीठ.

कृती – वांगं भाजून त्याची सालं आणि देठ काढून घ्यावा. भाजलेल्या वांग्यांचा गर मिक्सरमधून वाटून घ्यावा. त्यात चवीनुसार मीठ, तिखट, साखर, चमचाभर चिंचेचा कोळ आणि दोन चमचे गरम केलेलं तेलं घालावं. या मिश्रणात दीड ते दोन वाटया गव्हाचं पीठ घालून कणीक मळावी. पिठाचा गोळा तयार केल्यावर त्याचे छोटे-छोटे गोळे तयार करावेत. चपाती लाटतो त्याप्रमाणे गोळा लाटावा, फार पातळ लाटू नये. चपातीप्रमाणे दोन्ही बाजूंनी चांगला शेकून घ्यावा.

फायदे - वांगं भाजल्यामुळे त्यातील पौष्टिक गुणधर्मात वाढ होते. वांग्यात लोह, कॅल्शियम आणि 'अ' जीवनसत्त्व या अन्नघटकांचं भरपूर प्रमाण आहे. वांग्यात तंतुमय पदार्थाचंही चांगलं प्रमाण असतं.


डाळीचे पराठे

साहित्य - तुरीच्या वा मुगाच्या डाळीचं वरण, मिरची-आलं-लसूण पेस्ट, आवडत असल्यास लाल तिखट, छोटी वाटी तेल, चवीपुरतं मीठ.

कृती – तुरीची किंवा मुगाची डाळ शिजवून घट्ट वरण तयार करावं. या शिजवलेल्या वरणात मिरची-आलं-लसूण पेस्ट घालावी. चवीला मीठ, आवडत असल्यास लाल तिखट आणि एक वाटी वरणाला दोन चमचे गरम तेलाचं मोहन घालावं. या मिश्रणात मावेल इतकी कणीक भिजवावी. तेलाचा हात लावून मळलेल्या कणकेचे लहान गोळे करून ते तांदळाच्या पिठीवर लाटावेत. तापलेल्या तव्यावर तेल वा तूप सोडून पराठे खरपूस भाजून घ्यावेत.

फायदे – कुठल्याही डाळीत प्रथिनांचं प्रमाण भरपूर असतं. दुपारच्या जेवणात प्रथिनं, तंतुमय पदार्थ आणि कबरेदकं या कॉम्बिनिशचा आहार शक्यतो घ्यावा. कामाच्या ठिकाणी, ऑफिसमध्ये रोज डाळ, वरण नेणं ज्यांना जमत नाही (विशेषत: फिरतीचं काम असणा-यांना), त्यांनी दुपारच्या जेवणात डाळीचे पराठे खाल्ल्यास उत्तम.


कोथिंबिरीचे पराठे

साहित्य - दोन ते अडीच वाटया गव्हाचं पीठ, पाच ते सहा चमचे मैदा, कोथिंबिरीची मध्यम आकाराची जुडी, वाटीभर तेल, आलं-मिरचीचा वाटलेला ठेचा, एका लिंबाचा रस, थोडंसं लाल तिखट, हळद, वाटीभर चणाडाळीचं खरपूस भाजलेलं पीठ, थोडीशी आमचूर पावडर, फोडणीसाठी जिरं आणि हिंग, आवडत असल्यास लसणीच्या तीन ते चार पाकळया, चवीपुरतं मीठ.

कृती – कोथिंबिरीची जुडी नीट निवडून, स्वच्छ धुवून, बारीक चिरावी. कढईत अर्धी वाटी तेलावर जिरं, हिंग, हळद घालून फोडणी करावी. त्यात चमचाभर आलं-मिरचीचा वाटलेला ठेचा घालावा. आवडत असल्यास लसणीच्या पाकळ्याही ठेचून घालाव्यात. नंतर कोथिंबीर घालून फोडणी परतून घ्यावी. मग एक वाटी डाळीच्या पिठात अर्धी-पाऊण वाटी पाणी घालावं. पीठ पाण्यात व्यवस्थित कालवून, पिठाच्या गुठळ्या फोडून घ्याव्यात. ते मिश्रण फोडणीला घातलेल्या कोथिंबिरीत ओतावं. चवीला मीठ, साखर, आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस घालून कढईतील मिश्रण व्यवस्थित परतून घ्यावं. हवं असल्यास त्यात थोडं लाल तिखट घालावं. कढईतील मिश्रणाला एक वाफ येऊ द्यावी. ही कोथिंबिरीची भाजी गार झाल्यावर हाताला मऊ लागली पाहिजे, पण चिकट असता कामा नये. भाजी थोडी झणझणीत झाली तरी चालते. भाजी तयार होईपर्यंत मधल्या वेळात कणकेत मैदा आणि किंचित मीठ घालून पराठयासाठी पीठ मळून घ्यावं. साधारण दीड ते दोन तासांनी कणकेचा तयार गोळा पुन्हा एकदा तेल-पाणी लावून मळून घ्यावा. तो चांगला सैल करावा. त्यात थोडं तेल ओतून झाकून ठेवावं. कणकेच्या गोळयाच्या तिप्पट भाजीचा गोळा घेऊन त्याच उंडा तयार करावा. तो व्यवस्थित लाटून घ्यावा. लाटताना थोडा भाकरीसारखा थापून लाटावा. म्हणजे कडा फुटणार नाहीत. आवडीप्रमाणे दोन्ही बाजूंनी तूप किंवा तेल सोडून पराठा खरपूस भाजावा.

टीप – या पराठयाप्रमाणे इतर पालेभाज्या, कोबी, फ्लॉवर, नवलकोल, बीट, मुळा, गाजर, दुधी यासारख्या भाज्या स्वतंत्र किंवा एकत्र किसून, त्या परतून घेऊन पीठ पेरून पराठयासाठी सारण तयार करता येईल.
फायदे – कोथिंबिरीमध्ये 'अ' जीवनसत्त्वाचं प्रमाण भरपूर असतं. शरीरास अतिशय उपयुक्त असा 'अँटिऑक्सिडंट' घटक हा कोथिंबिरीमध्ये असतो. लसूण हृदयासाठी चांगला असतो. शरीरातील वाईट प्रकारचं कोलेस्टेरॉल कमी करण्याचं बळ लसणात आहे. डाळीच्या पिठात प्रथिनं असतात. ती शरीरासाठी उपयुक्त असतात.


टोमॅटोचे पराठे

साहित्य - दोन ते तीन वाटया कणकेचं पीठ, दोन ते तीन चिरलेले टोमॅटो, आलं-लसूण-मिरचीची पेस्ट, गोडा मसाला, चवीनुसार तिखट, थोडीशी साखर, मीठ, अर्धी वाटी तेल.

कृती - दोन ते तीन चिरलेले टोमॅटो मिक्सरमध्ये लावून त्याची प्युरी करावी. या प्युरीत तिखट, मीठ, आलं-लसूण-मिरचीची पेस्ट, चवीपुरती साखर घालून प्युरी चांगली एकजीव करावी. प्युरीतील साखर विरघळल्यावर त्यात मावेल इतकं पीठ घालावं. तेलाचा हात लावून पीठ मळून घ्यावं. तयार गोळयाच्या पोळया लाटून त्या तूप किंवा तेलावर भाजून घ्याव्यात. या पराठयांचं वैशिष्टय म्हणजे ते मस्त गुलाबीसर रंगाचे दिसतात आणि खायलाही तितकेच चविष्ट लागतात.

फायदे - टोमॅटो या फळभाजीत टायलोस्काल्पीन नावाचं कर्करोगाला प्रतिबंध करणारं रसायन असतं. या फळभाजीत 'अ' आणि 'क' ही जीवनसत्त्वंअसतात. मात्र सगळ्यात जास्त 'क' जीवनसत्त्वाचं प्रमाण भरपूर प्रमाणात टोमॅटोमध्ये आहे. टोमॅटो 'कोलेस्टेरॉल फायटर' म्हणूनही काम करतो. हे फळाचा आहारात समावेश केल्यामुळे हृदयाचं संरक्षण होतं. तसंच हृदयाच्या स्नायूंची कार्यक्षमताही टोमॅटोमुळे वाढते.

Read More »

वजन आणि जनुकीय तपासणी

आपण काय खातो, किती प्रमाणात खातो आणि कोणत्या वेळी खातो, तसेच त्याचा शरीरावर काय परिणाम होतो, या सर्व गोष्टी आपली जनुके कोणत्या प्रकारची आहेत, यावर अवलंबून असतात. म्हणूनच स्थूलपणा कमी करण्यापूर्वी जनुकांची तपासणी हा एक चांगला प्रयत्न ठरू शकतो. वजन कमी करण्यासोबतच यामुळे भविष्यात होणारे सीएसडी, हृदयाच्या धमन्यांचे आजार, मधुमेह यांसारख्या इतर आजारांची ओळखही होऊ शकते. एकाच प्रकारच्या आहाराचा आणि जीन्सचा परिणाम वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळा पडतो. म्हणून सर्वाना वजन कमी करण्यासाठी एकाच प्रकारचा कार्यक्रम देणे योग्य ठरत नाही. जनुकीय तपासणीचे आतापर्यंत चांगले परिणाम दिसून आले आहेत.

कुठल्याही व्यक्तीची शरीरयष्टी ही आनुवंशिकतेवरून ठरत असते. बारीक, सडपातळ राहण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. मात्र गेल्या काही वर्षात केवळ शहरातच नाही, तर गावांमध्येही स्थूलपणाची समस्या वाढत असल्याचे दिसत आहे. वजन कमी करण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी केवळ १० टक्के लोकच आरोग्यसंपन्न राहून आपले वजन कमी करण्यात यशस्वी होतात. याबाबत आहारतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अनेक तरुणी वजन कमी होण्याच्या भीतीने किंवा वजन कमी करण्याच्या प्रयत्नात पौष्टिक आहारापासूनही दूर राहू लागतात. असा आहार वास्तवात त्यांच्या अ‍ॅस्ट्रोजन हार्मोन्ससाठी गरजेचा असतो. अलीकडेच अधिक प्रमाणात जिम आणि वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आजारी पडलेल्या कतरिना कैफला दोन आठवडयांसाठी बेडरेस्ट घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. हे केवळ एक उदाहरण आहे, पण त्यामागचे सत्य असे आहे की, केवळ व्यायाम करून वजन कमी करता येत नाही. व्यायामाबरोबर रोजच्या कामात खर्च होण्यासाठी आवश्यक असणा-या कॅलरीज, फॅट्स आणि काबरेहायड्रेट्स यांचा जर आहारात समावेश केला नाही तर, यामुळे आरोग्यावर दूरगामी परिणाम होतो.

आपण काय खातो, किती प्रमाणात खातो आणि कोणत्या वेळी खातो, तसेच त्याचा शरीरावर काय परिणाम होतो. या सर्व गोष्टी आपले जीन्स कोणत्या प्रकारचे आहेत, यावर अवलंबून असतात. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणा-या प्रत्येक तिस-या व्यक्तीच्या मनात विचार येतो की, आपण इतके कमी खातो तरीही वजन कमी का होत नाही? वजन कमी करण्यासाठी करण्यात येणारी सर्व प्रकारची कसरत जेनेटिक अर्थात आनुवंशिक गुणसूत्रांवर अवलंबून असते. आपले जीन्स अर्थात जनुके समजून घेणे यासाठी आवश्यक असते. वजन कमी करण्याच्या वेगवेगळ्या योजना घेऊन येणा-या काही मोठया कंपन्यांनी अलीकडेच डीएनए फिट किंवा जेनेटिक कॉन्सििलगचा विचार स्थूलपणा कमी करण्याच्या प्रयत्नात सामील केला आहे. यामागे एक ठोस आधारही आहे. जीवनसत्त्व अ, ब, बी-१२, फॉलिक अॅसिड आणि काबरेहायड्रेट्ससाठी फॅट इत्यादी घटकांनी मिळणा-या कॅलरीज जनुकांवर अवलंबून असतात. त्यासाठी जेनेटिक टेस्गटिंग करण्याचे योजले आहे. यानंतर वजन कमी करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या आहाराच्या तक्त्याचा सकारात्मक परिणाम बघायला मिळाला आहे.

कशी होते तपासणी – यासाठी तोंडातील लाळेचा नमुना तपासणीसाठी घेतला जातो. गुणसूत्रांमध्ये असणा-या न्यूक्लॉइडच्या मदतीने विशिष्ट संप्रेरक आणि जनुकांची तपासणी केली जाते, जे फॅट्स, काबरेहायड्रेट्स, प्रोटिन यासोबत मिळून वजन वाढवण्यासाठी कारणीभूत मानले जातात. जनुकांच्या तपासणीनंतर मिळालेले निष्कर्ष एए, एजी, एजी आणि जीजी या जिनोटाइपनुसार ठरवले गेले. म्हणजे समजा एडीपोनेक्टीन एक असे संप्रेरक आहे जे फॅटसोबत मिसळून कॅलरीज निर्माण करते. एडिपोनेक्टिन संप्रेरकाच्या स्तराची तपासणी ठरवते की, अमुक व्यक्तीने किती प्रमाणात फॅट्स घेतले पाहिजेत. अलीकडेच करण्यात आलेल्या अभ्यासानुसार १५०० लोकांचे निरीक्षण करण्यात आले. त्यांच्यापैकी जिममध्ये तासन्तास घाम गाळणा-या २० टक्के लोकांचे वजन जिम सोडल्यानंतर दोन ते तीन महिन्यांतच वाढल्याचे दिसून आले. तसेच १२ महिने जिममध्ये जाणा-या व्यक्तीदेखील केवळ पाच ते सहा किलो वजन कमी करू शकल्या.

जनुकांबाबत काही महत्त्वाची माहिती -

>> सीजी आणि जीजी, पीपीएआर ही जनुके जिनोटाइपची बायोमार्कर आहेत, ती एकदा वजन कमी केल्यानंतर पुन्हा वजन वाढवण्यासाठी जबाबदार असतात.

>> एफएबीपी-२ हे जनुक आहारातून शरीराला मिळणा-या फॅट्सचे ग्रहण करण्याचे कारक आहे. ते पोटाच्या लहान आतडयात आढळते. ते फॅट्स नियंत्रित करते. त्यामुळे त्याचे अधिक प्रमाण असेल तर वजन सामान्य राहते.

>> एजी आणि जीजी मार्कर ही जनुके एचडीएल किंवा चांगल्या कोलेस्टेरॉलचे मापक आहेत. अमेरिकन जर्नल ऑफ फिजियॉलॉजीद्वारे केल्या गेलेल्या अभ्यासात पीपीएआरडीए परऑक्सिजन प्रोफाइलेक्टिव्ह रिसेप्टर डेल्टा पॉलिमॉलीम हे जनुक कोलेस्टेरॉलच्या पातळीसाठी कारणीभूत असल्याचे दिसून आले.

>> ईडीएन-१ हे जनुक तणाव आणि रक्तदाब वाढण्यासाठी जबाबदार मानले गेले आहे. त्याला जीजी जिनोटाइपच्या श्रेणीमध्ये ठेवले गेले आहे. या जनुकाच्या तपासणीनंतर तणाव नियंत्रित राखण्यासाठी सहाय्यक ठरतील असे काही व्यायाम सांगितले जातात.

>> व्यायामात अलीकडे अ‍ॅरोबिक शब्दाचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. याचा अर्थ हृदयाशी निगडित व्यायामाशी जोडलेला आहे. डीएनए तपासणी दरम्यान व्हिओटूमॅक्स स्तराद्वारे हृदयाच्या सुरक्षिततेची तपासणी केली जाते. त्यावरून हृदयाचे स्नायू किती वजन उचलण्यासाठी किंवा व्यायामासाठी योग्य आहेत हे समजते. पीपीएआरजीसीआयए-१ हे जनुक व्हिओटूमॅक्सचा शोध घेते.

>> हृदयरोग आणि आघात – स्थूलपणामुळे मेंदू आणि हृदयापर्यंत रक्त पोहोचवणा-या धमन्यांमध्ये चरबी साठू लागते. यामुळे धमनीचा मार्ग रोखला जाऊ शकतो आणि ते हृदयविकाराच्या झटक्याचे कारण ठरू शकते. याव्यतिरिक्त स्थूलपणामुळे हृदयावर दाब पडतो, त्यामुळे हृदय काम करणे बंद करू शकते.

>> उच्च रक्तदाब – आपले हृदय पंपिव्दरेतील पोषक घटक आणि ऑक्सिजन शरीरातील सर्व भागापर्यंत आणि पेशींपर्यंत पोहोचवते. शरीरात अतिरिक्त चरबी जमा झाल्यामुळे रक्ताचे हे प्रमाण वाढते. त्यामुळे धमन्यांवर दाब वाढतो. त्यामुळे हृदयरोग, हृदयाचा झटका आणि किडनी निकामी होण्याची शक्यता वाढते.

>> मधुमेह - स्थूलपणामुळे शरीराद्वारे रक्तातील साखरेची पातळी संतुलित राखण्यासाठी इन्सुलिनचा वापर करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. तसेच मधुमेह हा हृदय रोग, किडनीचे आजार, अंधत्व यांसारख्या अनेक आजारांचे कारण बनू शकतो. अलीकडच्या काळात लहान वयातच अधिक वजनाच्या समस्येने ग्रस्त असणा-या मुलांची संख्या वाढल्यामुळे मोठेपणी त्यांच्यात मधुमेहाची लक्षणे दिसू लागली आहेत.

>> श्वास घेण्यात येणारी समस्या - स्थूलपणामुळे थोडेसे शारीरिक श्रम करताच धाप लागते. अचानक काही क्षणांसाठी श्वास थांबल्यामुळे श्वसनाद्वारे शरीरात जाणारी हवा बाधित होऊ लागते किंवा जोरात घरघर ऐकू येऊ लागते. श्वास बाधित झाल्यामुळे झोपेत अडचण येते आणि त्याचा परिणाम दिवसा आळस, थकवा आणि झापड येण्यात होतो.

>> कर्करोग - अधिक वजन असणा-या लोकांमध्ये कर्करोग होण्याची शक्यताही अनेकपटीने वाढते. यामुळे मोठे आतडे, छाती, गर्भाशय, स्वादुिपड, किडनी, घसा, पित्ताशयाचा कर्करोग विकसित होण्याचा धोका वाढतो. स्थूल लोकांमध्ये वाढ अधिक असल्यामुळे टय़ुमरची शक्यताही जास्त असते.

>> मेटॅबॉलिक सिंड्रोम - याचा अर्थ कंबरेचा घेर वाढणे होय. अधिक वजन आणि स्थूलपणा असणा-या एक तृतियांश लोकांमध्ये पोटाच्या खालच्या भागातील चरबी वाढणे, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल, इन्सुलिन प्रतिरोधक, गुठळ्या बनणे आणि जळजळ यांसारखी लक्षणे दिसतात. यामुळे एकाच वेळी या सर्व गोष्टी झाल्यास हृदयरोग होण्याची शक्यता वाढते.

आहार आणि व्यायामाचा तक्ता कसा बनतो ? – जेनेटिक तपासणीमध्ये आवश्यक जनुकांव्यतिरिक्त ए, ई, बी, बी-१२ जीवनसत्त्व, फॉलिक अ‍ॅसिड, ओमेगा-३ आणि बी-६ द्वारे मिळणा-या पोषणाचे मोजमाप केले जाते. म्हणजे बी-१२ हे जीवनसत्त्व अशा लोकांसाठी उपयुक्त आहे, ज्यांच्या जनुकांमध्ये एमटीएचएफआर याचा स्तर कमी बघायला मिळतो. अशा व्यक्तींच्या आहारात दूध, हिरव्या भाज्या, बिन्स, दुग्धजन्य पदार्थ यांचा समावेश करता येऊ शकतो. याच आधारावर व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे हार्मोनची पातळी नियंत्रित राहण्यास मदत मिळते. स्थूलपणा कमी करण्यापूर्वी जनुकांची तपासणी हा एक चांगला प्रयत्न ठरू शकतो. वजन कमी करण्यासोबतच यामुळे भविष्यात होणारे सीएसडी, हृदयाच्या धमन्यांचे आजार, मधुमेह यांसारख्या इतर आजारांची ओळखही होऊ शकते. थोडक्यात वजन कमी करण्यापूर्वी जनुकीय तपासणी किंवा समुपदेशन आवश्यक असते. कारण एकाच प्रकारच्या आहाराचा आणि जीन्सचा परिणाम वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळा होतो. म्हणून वजन कमी करण्यासाठी सर्वाना एकाच प्रकारचा कार्यक्रम देणे योग्य ठरत नाही. जनुकीय तपासणीचे आतापर्यंत चांगले परिणाम दिसून आले आहेत.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe