Tuesday, August 13, 2013

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

इडल्या चवीचवींच्या..

पूर्वी साधी इडली आणि फारफार तर कांचिपुरम इडली अशा दोनच प्रकारच्या इडल्या मिळायच्या. मात्र आता विविध डाळी, धान्यं, भाज्यांच्या वापराने निरनिराळया चवीच्या पौष्टिक इडल्या तयार केल्या जात आहेत. यावरूनच 'इडली' या खाद्यपदार्थाची लोकप्रियता लक्षात येईल.

साधारणपणे सकाळच्या न्याहारीत पोहे, उपम्यानंतर घरोघरी मोठया प्रमाणावर बनवला आणि खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे, इडली. तांदूळ, उडीद डाळ, मेथी दाणे या पदार्थाचा वापर करून वाफवून तयार केलेली इडली म्हणजे पौष्टिक घटकांची परिपूर्ण शिदोरीच म्हणावी लागले. इडलीचं पीठ फुगण्यासाठी (फर्मेटेशन) ठेवल्यावर त्यातील पौष्टिक घटकांमध्ये अजूनच जास्त वाढ होते. त्यामुळे इडली खाण्याकडे आपला अधिकच कल असतो. इडलीच्या या पौष्टिक गुणधर्मामुळे आहारतज्ज्ञ, डॉक्टर सकाळच्या न्याहारीत मेदूवडा, बटाटावडापेक्षा इडलीच खावीत असा सल्ला देतात.

हल्ली फक्त उडीद डाळ, तांदूळ यांच्यापासून इडली तयार केली जात नाही, तर विविध डाळी, धान्यं, भाज्यांचा वापर करूनही इडली तयार केली जाते. त्यामुळे इडलीच्या चवीत विविधता मिळू लागली आहे. अशी विविध चवीची इडली निरनिराळया नावांनीही ओळखली जाते. म्हणजे गोव्यात कोकणी बांधव इडलीला 'सान्ना' म्हणतात. ओदिशात हाच पदार्थ 'इंदुरी पिठा' या नावाने ओळखाला जातो. तिथे उडीद डाळीच्या नावावरून इडलीला 'इंदुरी पिठा' हे नाव पडलं आहे. इडली ही फक्त सकाळच्या न्याहारीसाठी योग्य नसून ती दुपारच्या जेवणातही खाता येईल. ऑफिस, शाळेच्या डब्यातही नेता येते. फक्त ती अधिक परिपूर्ण करण्यासाठी पुढील युक्त्या कराव्यात.


साधी इडली

साहित्य : सव्वा दोन वाटया तांदूळ, पाऊणवाटी उडदाची डाळ, एक टी स्पून मेथी दाणे, अर्धी वाटी जाडे पोहे, चमाचभर घोटलेली साय, तेल, चमचाभर भाजलेलं जिरं, बारीक चिरलेले आल्याचे काप, चवीपुरतं मीठ.

कृती : डाळ, तांदूळ, पोहे आणि मेथी दाणे हे सर्व साहित्य आठ-नऊ तास भिजवावं. नंतर सर्व साहित्य रगडा किंवा मिक्सरमधून व्यवस्थित वाटून घ्यावं. साहित्य वाटताना त्यात आल्याचे काप आणि भाजलेलं जिरंही घालावं. मिश्रण १० ते १२ तासांसाठी झाकून ठेवावं. मिश्रण छान फुगून आल्यावर इडल्या तयार करता येतात. इडली करण्यापूर्वी एका वाडग्यात तेल, मीठ आणि साय एकत्र करून ते मिश्रण फेटून घ्यावं. हे फेटलेलं मिश्रण इडलीच्या पिठात घालावं. पुन्हा इडलीचं पीठ व्यवस्थित फेटून घ्यावं. इडलीपात्रात इडल्या कराव्यात. इडली पात्र तसंच कुकरच्या क्षमतेप्रमाणे साधारण १० ते २० मिनिटांत इडल्या तयार होतात.
(टीप : इडलीसाठी तांदूळ वापरताना साधा किंवा उकडा तांदूळ वापरला तरी चालतो. इडली रवा वापरण्यासही हरकत नाही. फक्त ते व्यवस्थित भिजत ठेवावेत.)

फायदे : इडलीत मेथीदाणे, आलं आणि भाजलेलं जिरं घातल्यामुळे ती पचते लवकर. मेथीत गुडघे-सांधेदुखीवर उपयुक्त संरक्षक तत्त्व असतात. पोहय़ांमुळे इडली छान फुलते. सायीने इडलीतील स्निगधता वाढते. उडदाच्या डाळीत उच्च दर्जाची प्रथिनं असतात. तांदळामुळे कबरेदकांची गरज भागते. ही इडली कुठल्याही वयोगटांसाठी खाण्याकरता चांगली.


नाचणी इडली

साहित्य : एक वाटी नाचणीचा रवा, पाऊण वाटी उडीद डाळ, तेल आणि चवीपुरतं मीठ.

कृती : नाचणीचा रवा आणि उडीद डाळ सात-आठ तासांसाठी किंवा रात्रभर एकत्रच भिजत घालावी. नाचणीचा रवा आणि उडीद डाळ व्यवस्थित उपसून घ्यावी. दोन्ही पदार्थ मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावेत. मिक्सरमधून काढलेल्या पिठात चवीपुरतं मीठ घालावं. पीठ हाताने फेसून घेऊन फुगायला ठेवावं. दहा ते बारा तासांनी ते व्यवस्थित फुगतं. फुगलेलं पीठ व्यवस्थित एकजीव करावं. त्या पिठापासून इडलीपात्रात इडल्या काढाव्यात.

फायदे : नाचणीतून शरीराला आवश्यक असणारं लोह आणि कॅल्शियम मिळतं. लहान मुलांबरोबरीने मधुमेहाचा त्रास असणारी माणसं, शरीराच्या वाढत्या वजनाची काळजी असणाऱ्यांनीही ही इडली खाण्यास काहीच हरकत नाही.


मूगडाळ इडली

साहित्य : एक वाटी मूग डाळ, अर्धी वाटी उडीद डाळ, चमाभर लिंबाचा रस, तेल आणि चवीपुरतं मीठ.

कृती : मूग डाळ आणि उडीद डाळ सात-आठ तासांसाठी किंवा रात्रभर वेगवेगळी भिजत घालावी. उपसून काढलेली उडीद डाळ खूप बारीक आणि मूग डाळ त्यामानाने जाडसर वाटावी. दोन्ही डाळींची ओली पिठं एकत्र करून त्यात चवीपुरतं मीठ घालावं. मीठ पुन्हा एकदा हाताने फेसून घेऊन फुगायला ठेवावं. सहा ते सात तासांनी इडल्या कराव्यात. इडल्या करताना फुगलेल्या पिठात लिंबाचा रस, मीठ आणि तेल घालून मिश्रण परत एकदा फेसावं. इडली पात्रात इडल्या काढाव्यात.

फायदे : मुगडाळीत सर्वोच्च दर्जाची प्रथिनं असतात. वजन नियंत्रणात ठेवणा-या मंडळींनी आहारात मुगडाळ, मोड आलेल्या मुगापासून बनवलेल्या पदार्थाचा सर्वात जास्त वापर करावा. मुगाची डाळ पित्तशामक समजली जाते. त्यामुळे ही इडली खाल्ल्यास आरोग्याला अपाय होण्यापेक्षा उपायच जास्त होईल.


इडली पिझ्झा

साहित्य : साध्या इडलीचं भिजवलेलं पीठ, किसलेलं गाजर, भिजवलेले शेंगदाणे, बारीक चिरलेली भोपळी मिरची, वाफवलेले मटार दाणे, बारीक चिरलेला कढीपत्ता, बारीक चिरलेले आल्याचे तुकडे, मोहरी, हिंग, जिरे, तेल आणि चवीपुरतं मीठ.

कृती : स्टीलच्या चपातीडब्याला आतून तेल लावावं. त्यात चवीपुरतं मीठ घालून भिजवलेलं इडलीचं पीठ पाव डब्बा भरेल इतकं घालावं. डब्यावर झाकण ठेवून रात्रभर फुगायला ठेवावं. सकाळी पीठ फुगल्यावर त्यावर किसलेलं गाजर, भिजवलेले शेंगदाणे, बारीक चिरलेली भोपळी मिरची, वाफवलेले मटारदाणे, बारीक चिरलेला कढीपत्ता, मिरचीचे व आल्याचे तुकडे घालावेत. कुकरमध्ये इडलीचा डब्बा वाफवण्यासाठी ठेवावा. खायच्या वेळी या डब्यातल्या इडलीवर आवडत असल्यास गाईचं तूप नाहीतर गाईचं लोणी घालून २०० अंश सेल्सिअसवर तापलेल्या ओव्हनमध्ये पाच मिनिटं भाजावं. ओव्हन नसेल तर तवा गरम करावा. त्यावर इडली पिझ्झा डब्बा ठेवावा. डब्यावर झाकण ठेवावं. झाकणावर तापलेली वाळू ठेवावी. पंधरा ते वीस मिनिटांनी गॅस बंद करावा. भाजलेला इडली पिझ्झा तुकडे करून खाण्यास द्यावा.

फायदे : गाजारातून 'केरोटीन' नावाचं जीवनसत्त्व मिळतं. भिजवलेल्या शेंगदाण्यात प्रथिने तसंच तंतुमय पदार्थ असतात. भोपळी मिरचीत अ‍ॅण्टि ऑक्सिडण्टयुक्त घटक पदार्थ असतात. कढीपत्त्यात अ‍ॅण्टिकोलेस्टेरोलयुक्त घटक असून त्यामुळे पदार्थ स्वादिष्टही बनतो. कढीपत्ता खाल्ल्यामुळे शरीरात वाईट प्रकारची चरबी तयार होण्यास अटकाव होतो.

Read More »

बहुगुणी अक्रोड!

मेव्यांच्या यादीतील 'अक्रोड' त्याच्यातील विविध गुणधर्मामुळे पक्षाघात, हृदयविकार याबरोबरच पुरुषांमधील प्रोस्टेट कॅन्सर आदी आजारांमधील मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी विशेष लाभदायक असल्याचे नुकतेच नव्या संशोधनातून समोर आले आहे. जागतिक पातळीवर आरोग्यक्षेत्रात ही संशोधनं फार महत्त्वाची मानली जात असल्याने सुदृढ हृदयासाठी आपल्या आहारात अक्रोडचा समावेश व्हायला हवा.

काजू, बदाम, खारीक, खजूर, जर्दाळू, सुके अंजीर.. सुक्या मेव्याच्या यादीतली ही नावं. या रुचकर सुक्या मेव्यांच्या यादीतला काहीसा कडवट मात्र आयुर्वेदिक तत्त्वांनी परिपूर्ण असा आणखी एक पदार्थ म्हणजे अक्रोड..

हा शक्तिवर्धक अक्रोड हृदयरोग, रक्तक्षय वगैरे त्रासात हितकारक असतो. तो स्मरणशक्ती वाढवण्यासही उपयुक्त आहे. ज्यांचं वजन जास्त आहे, अशांच्या आहारात अक्रोड असणं उत्तम. तो आहारात असल्याने तंतू, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, तांबे यांचाही लाभ झाल्याने संधिवातालाही प्रतिबंध होण्यास मदत होते. अक्रोडमध्ये आणखी असे गुणधर्म आहेत, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमधील लवचिकता टिकून राहते. रक्तात गाठी होण्याचं प्रमाण कमी होतं. अक्रोडच्या अशा विविध गुणधर्माबरोबरच त्याची आणखी काही वैशिष्टय़े संशोधनातून समोर आली आहेत.


पक्षाघात आणि हृदयरोगांवर उपयुक्त

एका वैद्यकीय अभ्यासातून नुकतंच समोर आलं आहे, ते म्हणजे अक्रोडचा समावेश असलेला आहार पक्षाघात आणि हृदयाशी संबंधित समस्यांमुळे होणा-या मृत्यूंचा धोका कमी करतो. 'न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन'द्वारे ऑनलाइन प्रकाशित झालेल्या स्पॅनिश प्रेडिमेड (प्रिव्हेंसियॉन कॉन दिएता मेडिटेरानिया) या जगातील सर्वात मोठया आहारविषयक चाचण्यांच्या निष्कर्षातून असं समोर आलं आहे की, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार (अमेरिकन हार्ट असोसिएशन मार्गदर्शिका) शिफारस केल्या गेलेल्या कमी चरबीयुक्त आहाराच्या तुलनेत मेव्याचा विशेषत: अक्रोडचा समावेश असलेल्या मेडिटरेनियन आहारामुळे पक्षाघात आणि हृदयाशी संबंधित (कार्डियोव्हस्क्युलर) समस्यांमुळे होणा-या मृत्यूचा धोका अनुक्रमे ३० ते ४९ टक्क्यांनी कमी होतो.

प्रेडिमेड चाचण्यांमधील ७,४४७ व्यक्तींचा (५५-८८ वर्षे) समावेश करण्यात आला होता, ज्यांचा सरासरी ४.८ वर्षे पाठपुरावा करण्यात आला होता. सहभागी व्यक्तींना तीन भिन्न गटांत विभाजित करून तीन पद्धतींचे आहार देण्यात आले होते, कमी-चरबीयुक्त आहार (नियंत्रण समूह), मेडिटरेनियन आहार ज्यांत एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलचा समावेश असतो (प्रतिदिन ५० मिली) आणि मेडिटरेनियन आहार ज्यांत प्रतिदिन ३० ग्रॅम मेव्याचा मुख्यत्वे अक्रोडांचा (१५ ग्रॅम अक्रोड, ७.५ ग्रॅम बदाम आणि ७.५ ग्रॅम हेझलनट) समावेश करण्यात आला होता. अक्रोडमुळे कोलेस्ट्रॉल दर कमी करण्यास, जळजळ कमी होण्यास आणि अंत:स्तरीय कार्यामध्ये सुधारणा होण्यास मदत झाली.

बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांतून उद्भवणा-या मृत्यूच्या कारणांमध्ये एक प्रमुख कारण हृदयविकार हे असल्याने आरोग्य क्षेत्रात जागतिक पातळीवर हे निष्कर्ष अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.

अक्रोड हा एकमेव असा घटक आहे, ज्यात मोठया प्रमाणात अल्फा-लिनोलेनिक आम्ल असते. त्याशिवाय वनस्पतीजन्य ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिडसचा समृद्ध स्रेत असून अक्रोडातून प्रचंड प्रमाणावर अँण्टिऑक्सिडण्ट्स आणि अतिरिक्त पोषकतत्त्वेही मिळतात आणि त्यांच्या सहयोगातून कार्डियोव्हस्क्युलर रोगांपासून संरक्षण करणाची क्षमता मिळते. याव्यतिरिक्त हा हृदयाची जळजळ कमी करण्यामध्ये सहाय्य करून इंडोथेलियम नावाच्या धमनीच्या सर्वात आतील स्तराला मजबूत बनवितो, ज्यामुळे हार्टअटॅक व स्ट्रोक्सचा धोका कमी होतो.


प्रोस्टेट कॅन्सरवर फायदेशीर

तसंच 'कॅन्सर इनव्हेस्टिगेशन'मध्ये प्रकाशित झालेल्या एका नव्या संशोधनानुसार, २ औंस अक्रोड खाल्ल्याने प्रोस्टेट कॅन्सर टयुमर उद्भवण्याला व त्याची वाढ होण्यालाही आळा बसू शकतो. प्रोस्टेट कॅन्सरचे पुरुषांमधील वाढते प्रमाण पाहता, अक्रोडचा समावेश असलेला आहार अधिक उपयुक्त असल्याचे सॅन अँटोनियामधील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास हेल्थ सायन्स सेंटरच्या संशोधनाने सिद्ध केलं आहे.

वरील संधोधनाने आहारातील अक्रोडचे महत्त्व अधिक अधोरेखित केलं आहे. सुदृढ हृदयासाठी आहारात अक्रोड असायला हवं. अक्रोड पचायला जड असल्याने फार शरीर मेहनत न करणा-यांनी तो नियमतपणे खाणंही चांगलं नसतं. पित्ताचा त्रास असणा-यांनीही अक्रोड जपून खावा. अक्रोडातील टेफेनॉल्स त्याच्यावरील पातळ तपकिरी सालीत असतात. त्यामुळे अक्रोड खाताना तो सालीसकट आणि शक्यतो पाण्यात भिजूत ठेवून पूर्ण भिजला की खावा. पाण्यात भिजवल्यानंतर त्यातील प्रथिनांचे रेणू पाणी शोषून घेतात आणि काही प्रमाणात त्यांचं डिनेचरेशन होतं, त्यामुळे अक्रोड पचायला सोपा होतो. अक्रोडमधील भरपूर प्रमाणात असलेलं ई-जीवनसत्त्व एका वेगळ्या स्वरूपात म्हणजे गॅमा टोकोफेरॉल या रसायनांच्या स्वरूपात असतं. संशोधनानुसार, या रसायनामुळे खासकरून पुरुषांच्या हृदयाच्या आरोग्यास हातभार लागतो. हृदयविकारापासून संरक्षण मिळत, असंही आढळलं आहे.

कुकीज, बिस्कीट, केक, आइस्क्रीम यांमध्ये अक्रोडचा वापर केलेला असतो. मात्र अक्रोड तेलाचा आहारात विशेषत्वाने समावेश असायला हवा. या तेलात एलॅजिक आम्ल हा अ‍ॅण्टिऑक्सिडण्ट्सचा स्रेत असतो. यामुळे कर्करोगाला प्रतिबंध होतो. रक्ताभिसरण उत्तम राहण्यास, रक्तवाहिन्या लवचिक राहण्यास, हृदयविकारास प्रतिबंध होण्यास, संधिवातास प्रतिबंध होण्यास या तेलाचा चांगला उपयोग होतो, असं आढळलं आहे. अक्रोडच्या तेलातील मेलटोनिन, सेलेनियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, लोह, जस्त, कॅल्शियम यांसारख्या खनिजांमुळे शरीरातील हार्मोन्सची पातळी स्थिर राहण्यास मदत होतं. या तेलाची ब आणि ई जीवनसत्त्वांमुळे त्वचेचा पोतही सुधारतो. त्वचेवरील सुरकुत्या, अकाली वार्धक्य, एक्झिमा, सोरियासिस यावर अक्रोडच्या तेलाचा चांगला उपयोग होतो. अक्रोड व त्याचं तेल दोन्ही हवाबंद डब्यात, सूर्यप्रकाश, उष्णता यापासून दूर ठेवलं तर जास्त दिवस टिकतं. नाही तर लवकर खवट होऊ लागतं.

Read More »

तुमच्या आरोग्याच्या संकल्पना काय?

अलीकडे खूपच 'हेल्थ कॉन्शिअस' होत चाललेले आपण खरंच सतत ऐकत असलेल्या आरोग्य टिप्स फॉलो करत असतो का, की त्या अशाच धुडकावून लावतो? आपण आपल्या 'सुदृढ' भविष्याची स्वप्न पाहताना दररोजच्या जगण्यात आरोग्यविषयक काही गोष्टींचा किती अवलंब करतो, हे पडताळून पाहायचंय?, तर मग खालील प्रश्नांची उत्तर द्या बरं..!

१) हॉटेलमध्ये गेल्यावर पेयांमध्ये तुम्ही कोणता पर्याय निवडता?

>> संत्र्याचा किंवा गाजराचा रस
>> डाएट कोक किंवा ज्यात साखरेचा अंतर्भाव आहे, असं पेय
>> स्मुदी
>> कॉफी-तीही एक चमचा साखरेसोबत
>> हॉट चॉकलेट

२) जिम ट्रेनरच्या सल्ल्याप्रमाणे, खालील कोणत्या गोष्टी खाणं तुम्हाला योग्य वाटतं..

>> वर्कआउटनंतर आवश्यक प्रोटिन शेक..
>> अंडय़ाचं सलाड किंवा सोया दूध शरीरासाठी उत्तम.
>> ट्रेडमिलवर कमीत कमी तासभर तरी धावलं पाहिजे. कारण तुमच्या शरीरातील चरबी जळण्याचं काम हे ४५ मिनिटे ट्रेडमिलवर मेहनत केल्यावर सुरू होतं.
>> महिलांनी वेट ट्रेनिंग टाळावी. कारण त्याचा उलटा परिणाम असा होतो की, पुरुषांप्रमाणे दंडाची बेटकुळी तयार होते आणि ते दिसायला जरा विचित्रच दिसतं.

३) कामातून ब्रेक कधी घेतला पाहिजे?

>> ९० मिनिटे सलग काम केल्यानंतर १० मिनिटांचा ब्रेक
>> तीन महिन्यांतून एकदा ब्रेक
>> जेव्हा तुम्हाला वाट्टेल तेव्हा थोडया वेळासाठीचा ब्रेक

४) झोपेचं गणित काय?

>> दिवसातून आठ तास झोपालं पाहिजे, हे निश्चित. मग ती वेळ अगदी मध्यरात्री तीन ते सकाळी ११ अशी आठ तासांची असायला काय हरकत आहे.
>> पहाटे डोळे उघडेपर्यंत झोपायचं. एखादं वेळेस झोप अर्धवट झाली तरी हरकत नाही.
>> सकाळी झोपेतून उठण्यासाठी हातात बेड-टी किंवा कॉफी यावी लागते.
>> पलंगाची मऊ गादी असली तर उत्तम म्हणजे खूप छान झोप लागते.

५) योगसाधना का गरजेची?

>> घाम न येता १० किलो वजन कमी करायचंय.
>> २० सूर्यनमस्कार कोणत्याही त्रासाशिवाय अगदी सहजपणे मारणं शक्य आहे.
>> शरीर नि मन निरोगी ठेवण्याबरोबरच ऊर्जाही वाढते.

६) कोण अधिक 'फिट' असेल?

>> अप्रत्यक्षपणे धुम्रपान होत असलेले (पॅसिव्ह स्मोकर)
>> शुद्ध शाकाहारी
>> निसर्गत:च हाडकुळा असलेला
>> कमी किंवा हलका आहार घेणारे

७) काय केल्यावर तुम्हाला लगेच बरं वाटतं?

>> हळू आणि दीर्घ श्वास घेतला की..
>> उंच टाचांच्या सॅण्डल्स काढून टाकल्या की..
>> पाठीने खुर्ची मागे करून पूर्ण शरीर तिच्यावर झेपावलं की..
>> काकडी किंवा सॅलरीच्या पानांचा ज्युस प्यायलं की..

८) जीमला जायला वेळ नाही, तर पर्याय म्हणून काय योग्य?
>> आठवडयातून तीन वेळा १५ मिनिटे चालणं
>> एकदम मॅरेथॉनसाठीच धावणं
>> सगळ्यात उत्तम- डान्स क्लास


आता तुमची सगळ्या प्रश्नांची उत्तरं मनाशी ठरवून झाली असतीलच. बर्र्र.. ती योग्य की अयोग्य हे पडताळण्यासाठी खालील गोष्टींवर नजर टाका, आणि ठरवा की खरंच आपण सुदृढ जीवनशैलीसाठी काय करायला हवं..

१) कॉफी तशी सुरक्षित आहे, पण अर्थातच दिवसातून एकदा घेतली तरच. इतर सर्वच पेय अधिक साखर, कॅफेनयुक्त आहेत.
२) यातील अंडयाचं सलाड आणि सोया दूध सर्वात उत्तम. वर्कआउटपूर्वी शेक्स घेणंही योग्य.
३) ९० मिनिटांनंतर १० मिनिटांचा ब्रेक चांगला. सोबत ताणतणावातून मुक्तता मिळण्यासाठी आठवडय़ातून एक सुट्टी हवी.
४) आठ तासांच्या झोपेबरोबरच ती योग्य वेळेची हवी. अर्थात लवकर निजे आणि लवकर उठे, अशी..
५) योग शरीर-मन निरोगी ठेवते. पण त्यामुळे तुम्ही बारीक होणं अशक्य.
६) खरं तर वरील 'फिट' संकल्पनेतील सगळेच पर्याय चुकीचे आहेत.
७) सगळेच पर्याय तुम्हाला सुखावणारे आहेत, लवकर अमलात आणा..
८) चालणं किंवा डान्स क्लास योग्य. पण अशा परिस्थितीत थेट मॅरेथॉनचा विचार करणं म्हणजे निव्वळ वेडेपणा.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe