Tuesday, December 24, 2013

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

शस्त्रक्रियेशिवाय पाठदुखीला रामराम

बदललेली जीवनशैली, आहारपद्धती आणि तासन् तास एकाच ठिकाणी बसून राहण्याने तारुण्यातच अनेक आजारांना तोंड द्यावं लागत असल्याचं अनेक सर्वेक्षणांतून समोर आलं आहे. गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत जवळजवळ ३५०हून अधिक रुग्ण पाठ आणि मानेच्या आजारांनी त्रस्त असल्याचं समजलं असून यामध्ये तरुणांचा आकडा अधिक आहे. त्यातही सर्वाधिक संख्या ही नोकरदार किंवा महिला वर्गाची आहे.
तुषार आयटी कंपनीत इंजिनीयर. कामाचे तास भरूनही दररोज त्याला काही ना काही कामानिमित्त काम करण्यासाठी थांबावं लागायचं आणि उरलेला वेळ त्याचा प्रवासात जायचा. अधिकाधिक प्रवास तो बाइकवरून करायचा. त्यामुळे ज्याची भीती होती तेच झालं. त्याला अवघ्या दोन-तीन महिन्यातच पाठदुखीच्या आजाराला सामोरं जावं लागलं. तो डॉक्टरांकडे गेला असता त्याला त्यांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला.

तुषारसारखे कित्येक तरुण-तरुणी सध्या पाठीच्या दुखण्याने त्रस्त असल्याचं की स्पाइन क्लिनिकने केलेल्या आरोग्यविषयक सर्वेक्षणात सिद्ध झालं आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे त्यांची जीवनशैली आणि आहारपद्धती. पाठीच्या दुखण्यावरील नेमकं कारण शोधण्यासाठी पारंपरिक उपचार पद्धतीत सुरुवातीला एमआरआय आणि एक्स-रे काढले जातात. परंतु, आरोग्यविषयक संशोधनाअंती सादर केलेल्या अहवालानुसार एमआरआय आणि एक्स-रे हे पाठीच्या दुखण्याचं नेमकं कारण शोधण्यात ८५ टक्के प्रकरणांत अपयशी ठरले आहेत. अशा प्रकरणांना 'अनिश्चित पाठीचं दुखणं' या प्रकारात वर्गीकृत केलं गेलं. आणि अशा गंभीर पाठदुखीवर कायमस्वरूपी उपचार करणारी पद्धतच अस्तित्वात येऊ शकली नाही. वर्षानुवर्ष कित्येक रुग्ण ही पाठदुखी सहन करीत होते. त्यांच्यासाठी मग फक्तशेवटचा एकच उपचार राहिला होता आणि तो म्हणजे मणक्यावरील शस्त्रक्रियेचा. वर्षानुवर्ष मग या शस्त्रक्रियांची संख्या वाढतच जाऊ लागली. संशोधनात केवळ १-२ टक्के पाठीच्या दुखण्यांसाठीच शस्त्रक्रिया आवश्यक असते. त्यामुळे या पाठदुखीवर काहीतरी कायमस्वरूपी उपचारांची गरज आहे. जेणेकरून दीर्घकाळापर्यंत या उपचारपद्धतीची उपयोगिता दिसून येईल आणि शस्त्रक्रिया करण्याचं प्रमाणही कमी होईल. संशोधनाअंती असंही लक्षात आलं आहे की, मानवी शरीरातील असे अनेक अवयव असतात, ज्यांची तपासणी प्रकाशचित्रीय चाचणी (इमेजिंग टेस्ट) म्हणजेच एमआरआय किंवा एक्स-रेसारख्या चाचण्यांद्वारे करता येते, तर काहींची चाचणी ही कार्यात्मक चाचण्यांद्वारे (फंक्शनल टेस्ट) केली जाते. उदा.- हृदयाची चाचणी ही अ‍ॅन्जिओग्राम (इमेजिंग टेस्ट) आणि स्ट्रेस थॅलियम टेस्ट (फंक्शनल टेस्ट) या दोन्ही प्रकारच्या चाचण्यांद्वारे केली जाते.

परंतु मणक्याच्या आजारांमध्ये केवळ एमआरआयसारखी चाचणीच अस्तित्वात आहे. दुसरं म्हणजे चिकित्सीय पद्धतीचा विचार करता मणक्याच्या आजारांमध्ये मणक्यांचा असमतोल किंवा मांसलतेतील कमतरता ही या दुखण्याची लक्षणं आहेत का, हे कार्यात्मक चाचणीद्वारे शोधणं खूपच जिकिरीचं काम होतं. कारण पाठीचा मणका हा प्रत्येक बिंदूवर जटिल अशा मांसल भागांनी जोडलेला असतो. एकदा का हा आधार कमजोर झाला की मणक्यावर अधिक भार येतो आणि मग पाठीच्या दुखण्याला सुरुवात होते.

औषधोपचार आणि अल्पकालिक उपचारपद्धती या दोन माध्यमांतून रुग्णाला पाठदुखीपासून थोडासा आराम पडावा यासाठी ब-याच चाचण्या उपलब्ध आहेत. परंतु या सर्व चाचण्या अपु-या असल्याचं जाणवलं आणि या आजाराचं नेमकं मूळ शोधणारी उपचारपद्धती आपल्याला शोधून काढली पाहिजे यावर विचारमंथन सुरू झालं. मणक्याच्या आजारावरील निदान शोधून काढण्याचं काम 'की स्पाइन क्लिनिक'ने केलं. अथक परिश्रमातून मणक्यांच्या कार्यात्मक निदानाच्या आसपास जाणारी 'अंकीय मणका विश्लेषण चाचणी' शोधून काढली. की स्पाइन क्लिनिकने या कार्यात्मक निदान चाचणीच्या उपकरणांसाठी पाश्चिमात्य अत्याधुनिक चिकित्सा प्रौद्योगिकी कंपन्यांसोबत भागीदारी केली आणि तिचा अंतर्भाव आपल्या स्वत:च्या उपचारपद्धतीत केला.

चाचण्यांमधील या नेमकेपणामुळे की स्पाइन क्लिनिकला या आजारांवर परिणामकारक आणि नेमके उपचार करण्यास मदत झाली. अन्य पारंपरिक उपचारपद्धतींमध्ये नेमकेपणा नसल्याने त्यांना यावर उपचार करण्यासाठी कित्येक महिने आणि वर्ष लागतात. पण आता 'अंकीय मणका विश्लेषण चाचणी'मुळे (डिजिटल स्पाइन अ‍ॅनालिसिस टेस्ट) या आजारावर नेमके आणि परिणामकारक उपचार करणं शक्य झालं आहे.

Read More »

धरित्रीच्या पोटात काय काय दडलंय!

अश्मयुगापासून मानव स्वत:ची भूक भागवण्यासाठी जमिनीतून कंदमुळं शोधून, सुरुवातीला कच्ची तर अग्नीचा शोध लागल्यावर ती भाजून खाऊ लागला. जसजसा मानवाचा मेंदू विकसित होत गेला, तसं कंदमुळांबद्दलच त्याचं ज्ञानही वाढत गेलं. दरम्यान त्यानं कडू चवीची कंदमुळं टाकून देत, गोडसर, रुचकर चवीची कंदमुळं खाण्यास सुरुवात केली. तशी अनेक प्रकारची कंदमुळं घराघरांत जाऊन पोहोचली.
आज आपण धरणीच्या पोटात दडलेल्या आरोग्यदायी खाद्याचा शोध घेऊया! संपूर्ण जगभरात कंदमुळांपैकी सगळ्यांचं आवडतं कंदमूळ म्हणजे बटाटा. हा जरी मातीतून उकरून काढला जात असला, तरी ते झाडाचं खोड आहे. हा कशाही प्रकारे शिजवून खाल्ला तरीही रुचकर लागतो. बटाटयामध्ये जीवनसत्त्व, कबरेदकं, प्रथिनं, साखर असे शरीराला उपयुक्त असणारे अनेक अन्नघटक आहेत. लहान मुलांच्या शरीराच्या वाढीच्या काळात तो उकडून किंवा भाजून कुस्करावा. त्या कुस्करलेल्या बटाटय़ात तूप, साखर किंवा मीठ, मीरेपूड, जीरेपूड घालून जरूर द्यावा. कच्च्या बटाटयाच्या साली शरीरावरील भाजलेल्या जखमांवरही ठेवतात. कच्च्या बटाट्याचा मिक्सरमध्ये वाटून तयार केलेल्या लगद्याचा फेसपॅक चेहेऱ्यावर लावल्याने चेहे-यावरील काळे डाग नाहीसे होऊन चेहरा उजळ होतो, तेही घरच्या घरी! मधुमेही व्यक्तींना मात्र बटाटा वर्ज्य आहे. परंतु अगदीच कधी बटाटा खावासा वाटला, तर तो गॅसवर भाजून किंवा ओव्हनमध्ये बेक करून त्यात मीरेपूड, ओवा, सुंठपूड, सैंधव आणि लिंबाचा रस हे पाचक पदार्थ एकत्र करून खाल्ल्यास तो रुचकर व पथ्यकरही होतो.

सुरण हे कंदमूळ बहुतेकांना आवडत नाही. पण त्याचा पाककौशल्यानं खाद्यपदार्थामध्ये वापर करून वेगवेगळ्या चविष्ट पाककृती तयार करता येतात व हाच नावडता सुरण नकळतपणे आवडता होतो. सुरणामध्ये भरपूर प्रमाणात कबरेदकं व क्षार, लवण, प्रथिनं आणि 'अ', 'इ' व 'क' ही जीवनसत्त्वं आहेत. सुरण हे कंदमूळ खाजरं असल्यामुळे त्याचे तुकडे किंवा काप केल्यावर कोकम, लिंबू किंवा चिंच घालून ते उकडून मग त्याचा वापर करावा. सुरणाचा सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे अर्श / मुळव्याध (पाइल्स) या रोगात होतो. अर्श व्याधी असलेल्यांनी सुरणाची भाजी, उपवासाच्या बटाट्याच्या भाजीप्रमाणे (तूप, जीरे, हिरव्या मिरच्यांचे तुकडे यांची एकत्रित फोडणी करून त्यात वाफवलेले सुरणाचे तुकडे आणि चवीनुसार साखर व मीठ घालून)करावी. ही भाजी काटेकोरपणे आठवड्यातून किमान तीन वेळा वाटीभर तरी खाल्ली जावी. वर्षभर मिळणा-या अशा या कंदमुळाचा रुचकर पद्धतीनं जरूर वापर करून घ्यावा.

कणगर हे छोट्या काकडीच्या आकाराइतकं, गडद खाकी रंगाची साल असणारं आणि या सालावर बारीक-बारीक फाटे फुटलेली मुळं असणारं कंदमूळ आहे. डिसेंबर व जानेवारी हे दोनच महिने या कंदमुळांचा हंगाम असतो. कणगर हे कंदमूळ आता अतिदुर्मीळ होत चाललं आहे. पण ज्यांना ज्यांना या कंदमुळाविषयी माहिती आहे, त्यांनी ते जिथे मिळेल तिथून आणून कुकरमध्ये उकडून वा निखारे (ओव्हन) असल्यास भाजून खावं. हे कंदमूळ त्रिदोष शामक, बुद्धी, स्मरणशक्ती आणि सप्तधातूवर्धक आहे. शालेय वा कॉलेजमधील मुलांमध्ये मेंदू अधिक कार्यान्वित असतात. अशा मुलांची मेंदूची कार्यक्षमता अधिक वाढावी यासाठी उकडलेली कणगरं कुस्करून, त्यात चमचाभर साजूक तूप आणि साखर कालवून ते खायला द्यावं. कारण उत्तम प्रकारची सर्व जीवनसत्त्व, शरीरातील विषजन्य पदार्थ शरीराबाहेर काढणारे घटक (अँटिऑक्सिडंट्स) या कणगरांमध्ये आहेत.

कोनफळ किंवा कंद या नावानं ओळखलं जाणारं कंदमूळ आहे. हे कापल्यावर किंवा उकडल्यावर जांभळ्या रंगाचं दिसतं. उकडल्यावर याचे नुसते तुकडे खायला गोडसर व रुचकर चवीचे लागतात. कोनफळातही चांगल्या दर्जाची जीवनसत्त्व, कबरेदकं, प्रथिनं व शरीरातील विषद्रव्यं खेचून बाहेर काढणारी रसायनं आहेत. उकडलेल्या कोनफळाची किसून खीर, कटलेट करतात. उंधियोसारख्या गुजराथी पद्धतीच्या मिश्र भाजीत याचा आवर्जून वापर करतात. वर्षभरात फक्त डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान हे कंदमूळ बाजारात दिसतं.

अळूच्या पानांचं कंदमूळ म्हणजे अळकुडी किंवा अरवी, हेही वर्षभर बाजारात मिळणारं कंदमूळ आहे. महाराष्ट्रीय खाद्यपदार्थामध्ये याचा फारच कमी प्रमाणात वापर होतो. पंजाबी पद्धतीच्या खाद्यपदार्थामध्ये अळकुडीपासून विविध प्रकारच्या पाककृती बनवल्या जातात. हे कंदमूळही खाजरं असतं तसंच त्याची सालं काढताना, चिरताना त्यातून चिकट स्त्राव पाझरतो. म्हणूनच त्याचा वापर करताना, ते सुरणाप्रमाणेच कोकम, लिंबू वा चिंचेच्या पाण्यात वाफवून घेतल्याने त्याचा चिकटपणा व खाजरेपणाही निघून जातो. हे कंदमूळ सप्तधातूवर्धक तसंच जीवनसत्त्वयुक्त आहे. या कंदमुळाचा उपवासाच्या पदार्थामध्येही वापर करू शकतो. हे उकडल्यावर याची कोणत्याही प्रकारचे भाजी करता येते.

ओबडधोबड अशा आकराचं कंदमूळ म्हणजे रताळं. जांभळट, गडद गुलाबीसर तर काही खाकी अशा बाहेरून दोन प्रकारच्या रंगांमध्ये, तर आतून पांढ-या रंगाचं असं हे कंदमूळ उपवासाच्या काळात म्हणजे श्रावण महिन्यापासून ते मार्गशीर्ष महिन्यापर्यंत विपुल प्रमाणात उपलब्ध होतं. रताळं नुसतं उकडून खाल्ल्यास चवीला अधिक गोडसर लागतं. रताळ्यापासून भरपूर पाककृती केल्या जातात, जसं, शिरा, खीर, रताळ्याची पोळी, गुलाबजाम असे गोडाचे पदार्थ तर उपसावाचे पॅटिस वा स्टार्ट्र्सच्या विविध प्रकारांमध्ये घट्टपणा (बाईंडिंग बेस) आणण्यासाठीही याचा वापर केला जातो. रताळ्यात उत्तम दर्जाचा तंतूमय भाग आहे, 'अ' आणि 'क' जीवनसत्त्वं, कबरेदकं, प्रथिनं व साखर हे घटक मुबलक प्रमाणात आहेत. हल्ली तर निखा-यांवर भाजलेल्या मक्याच्या कणसांप्रमाणे भाजलेल्या रताळ्याच्या गाड्याही काही ठिकाणी दिसू लागल्या आहेत. मग 'जंकफूड'पेक्षा भाजलेली रताळी घेऊन खाणं आरोग्यदृष्ट्या केव्हीही उचितच नाही का!

Read More »

सुदृढ पिढ्या घडवणारं स्तनपान

जगभरात दरवर्षी आठ लाख बालकं (तान्ही मुलं) योग्य प्रमाणात स्तनपान न मिळाल्यानं दगावतात, असं अलीकडे दिल्लीत प्रकाशित करण्यात आलेल्या जागतिक अहवालात म्हटलं आहे. स्तनपानामुळे बालमृत्यू तसंच बालकांमधील विविध आजारही टाळता येतात आणि मातांचंही अनेक आजारांपासून संरक्षण होतं. पर्यायाने आरोग्यावरील वाढता खर्च आणि याचा अर्थव्यवस्थेवर पडणारा ताणही त्यामुळे कमी करता येऊ शकतो. या पार्श्वभूमीवर, जन्मल्यापासून ते दोन वर्षापर्यंत मातांनी बाळांना स्तनपान देणं आवश्यक आहे. केवळ स्तनपानामुळेच सुदृढ पिढ्या निर्माण होतील. यासाठी स्तनपान देणं, ही प्रत्येक सुजाण आईची जबाबदारी आहे.
स्तनपान हे मातृत्वाचं एक अविभाज्य अंगच असतं. असं असूनही शारीरिक अथवा मानसिकदृष्ट्या उद्भवणा-या प्रतिकूलता, कुपोषण, नोकरदार असल्याने वेळेचा अभाव अशी व्यक्तिपरत्वे उद्भवणारी अनेक कारणं (समस्या) ही अपु-या स्तनपानाला कारणीभूत ठरतात.

जगभरात दरवर्षी १३ कोटी ५० लाख बालकं जन्माला येतात. त्यापैकी जवळपास आठ लाख बालकं (तान्ही मुलं) योग्य प्रमाणात स्तनपान न मिळाल्यामुळे दगावतात, तर आठ कोटी ३० लाख बालकं ही स्तनपानाअभावी होणा-या विविध आजारांनी ग्रस्त असतात, अशी आकडेवारीही नवी दिल्लीत प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालात देण्यात आली आहे. यामध्ये जगभरात स्तनपानविषयक अधिक जनजागृती करण्यासाठी १० लाख ८५ हजार कोटी रुपये इतक्या निधीची तरतूद व्हायला हवी, असंही सांगण्यात आलं आहे. स्तनपानामुळे मुलांचं आरोग्य सुदृढ राहण्याबरोबरच त्यांचं सर्व प्रकारच्या आजारांपासून संरक्षण होतं, हे वास्तव आहे. मात्र, असं असूनही दुसरीकडे जागतिक पातळीवर २००८ ते २०१३ या कालावधीत 'बेबी फूड (कृत्रिम अन्न)'च्या वापरामध्ये ३७ टक्क्यांनी झालेल्या वाढीबद्दलही या अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय संस्कृतीमध्ये पुरातन काळापासून स्तनपानाला महत्त्व दिलं गेलं आहे.

स्तनपानामुळे माता आणि मूल यांच्यातील आपुलकी, जिव्हाळाही वाढतो, भावबंध दृढ होतात. वैद्यकशास्त्राने हे सिद्ध केलं असूनही आज अनेक देशांमध्ये स्तनपानाबाबत अनास्था दिसते. स्तनपानविषयक जागरूकता, प्रबोधन व त्यातील आर्थिक गुंतवणूक या त्रिसूत्रीच्या अभावामुळे माता आणि बालकांना भविष्यात अनेक आरोग्यविषयक समस्यांना सामोरं जावं लागतं. तसंच साधारणत: सहा महिन्यांपासून पुढील वयाच्या मुलांकरिता बाजारात अगदी सहजपणे उपलब्ध होणारं 'बेबी फूड' मुलांना सातत्यानं दिलं गेल्यानं त्यांच्या आरोग्याला धोकाही संभवतो.

अपु-या महिन्यांची (प्री-मॅच्युअर) नवजात बालकं दगावण्याचं प्रमाणही दिवसेंदिवस वाढतंय. अशा बालकांची आईच्या गर्भाशयात पूर्ण वाढ न झाल्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्तीही इतर बालकांच्या तुलनेत खालावलेली असते. अशा बाळांना कोणत्याही प्रकारच्या अ‍ॅलर्जी तसंच जंतुसंसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका असतो. परंतु, आईचं दूध हे विशेषत: अशा बाळासाठी 'अमृत' ठरतं. कारण आईच्या दुधात स्निग्ध पदार्थ, प्रथिनं, कबरेदकं, खनिजं, जीवनसत्त्व आणि पाणी या घटकांच्या संतुलित प्रमाणासोबतच 'इम्युनोग्लोब्युलिन', 'लायसोझाइम' आणि 'बायफिड्स' ही संरक्षक द्रव्यंही असतात. ज्यामुळे बाळाला जंतुसंसर्गानं उद्भवणारे उलट्या-जुलाब, खोकला-सर्दी-पडसं, ताप अशा विकारांना आळा बसतो. आईच्या दुधाव्यतिरिक्त ही संरक्षक द्रव्यं बाहेरून देण्यात येणा-या पावडरच्या, गाई-म्हशीच्या वा इतर कोणत्याही प्रकारच्या दुधात नसतात, हे वैज्ञानिक संशोधनानं सिद्ध झालं आहे.

बाळंतपणादरम्यान होणारा मृत्यू, सिझेरियन पद्धतीनं झालेली प्रसूती वा अन्य काही समस्यांमुळे मातांना बाळाला स्तनपान करताना अडचणी येतात. या अडचणी विचारात घेऊन आता काही सरकारी तसंच खासगी रुग्णांलयांमध्ये 'ह्यूमन मिल्क बँक (मातृदुग्ध पेढ्या)' हा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

स्तनपानासाठी जागतिक पातळीवर विविध माध्यमांतून जागरूकता निर्माण केली जात आहे. याची परिणती म्हणून गेल्या साधारण ४-५ वर्षापासून ब-याच अंशी सकारात्मकता निर्माण होत आहे.

बाळंतपणानंतर येणारं पहिलं/चिकाचं पिवळसर रंगाचं दूध (कोलेस्टोम) बाळाला द्यावं की देऊ नये, यावर दुमत आहे. परंतु या दुधावर केलेल्या संशोधनाअंती त्यात दुर्मीळ पौष्टिक घटक असल्याचं सिद्ध झालं आहे.

परदेशात कार्यालयं, मॉल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स अशा सार्वजनिक व खासगी ठिकाणी, तर भारतात पंचतारांकित हॉटेल्स, काही विमानतळं किंवा काही मोठ्या मॉल्समध्ये महिलांच्या स्वच्छतागृहात बाळाला स्तनपान करता येण्यासाठी खास प्लॅटफॉर्म्स (ओट्यांसारख्या जागा) बांधण्यात आले आहेत.

नोकरदार महिलांना त्यांच्या तान्हय़ांना घरी वा इतरत्र ठेवण्याची व्यवस्था नसते. अशा महिलांसाठी त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांची बाळं सुरक्षितपणे सांभाळण्यासाठीची व्यवस्था केलेली असते. शिवाय जेव्हा-केव्हा गरज पडेल, तेव्हा त्यांना त्यांच्या बाळांना स्तनपान देण्यासाठी मुभाही देण्यात येते.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe