Tuesday, April 20, 2021

व्यंगत्वाला पांगळ बनवणारे मेजर जनरल इयान कार्डोझो...

 व्यंगत्वाला पांगळ बनवणारे मेजर जनरल इयान कार्डोझो...  


मेजर जनरल इयान कार्डोझो हे नाव ऐकलं की पहिला प्रश्न मनात येईल कि कोणाच नाव हे? भारतीय आहेत का? कारण आपली भारतीय असण्याची व्याख्या आधी आडनावा वरून सुरु होते. आपल्याकडे नको त्या लोकांना हिरो बनवण्याची घाई असते. १० शतक मारणाऱ्या खेळाडू वर शाळेत धडा येतो किंवा १०० चित्रपट करणारा हिरो मिलेनियम सुपरस्टार बनतो. कोणत्यातरी हिरोचा मुलगा बोलला की पडला ह्याची ब्रेकिंग न्यूज होते पण आपल्या जिद्दी पुढे अपंगत्वाला पांगळ करणारे मेजर जनरल इयान कार्डोझो मात्र भारतीयांना कधीच दिसत नाहीत आणि त्यांची ओळख करून घेण्याच्या फंदात भारतीय अडकत नाहीत.


 इयान कार्डोझो ५ गोरखा रायफल मध्ये १९७१ सालच्या युद्धाच्या वेळी मेजर ह्या हुद्यावर कार्यरत होते. युद्धात मेजर इयान कार्डोझो ह्यांचा पाय लँड माईन वर पडला. त्यावेळी झालेल्या स्फोटात त्यांच्या पायाला प्रचंड जखमा झाल्या. त्यांना त्या अवस्थेत जवळच्या हॉस्पिटल मध्ये नेण्यात आल. त्यांच्या पायाच्या जखमा इतक्या होत्या की पायाला गँगरीन झालं होतं. पाय कापण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नव्हता. तेव्हा मेजर इयान कार्डोझो त्यांनी तिथल्या डॉक्टर ला विचारलं  तुमच्याकडे मॉर्फीन आहे का बेशुद्ध करण्यासाठी? डॉक्टर म्हणाले नाही. मग त्यांनी विचारलं, तुम्ही माझा पाय कापू शकाल का? डॉक्टर म्हणाले आमच्याकडे ऑपरेशन करण्यासाठी काहीच साधन नाहीत की आम्ही ऑपरेशन करू शकू. एका सेकंदाचा विलंब न लावता त्यांनी जवळच असलेल्या आपल्या सैनिकाला बोलावलं आणि विचारल, “माझी खुकरी कुठे आहे”? त्याने क्षणाचा विलंब न लावता त्याने त्यांची खुकरी त्यांना आणून दिली. त्या सैनिकाला मेजर इयान कार्डोझो ह्यांनी ऑर्डर केली की ह्या खुकरी ने माझा पाय विलग कर.


 रक्ताच्या थारोळ्यात पूर्ण पाय आणि असंख्य वेदना होत असताना त्या सैनिकाला आपल्या ऑफिसर चा पाय खुकरी ने कापण्याच धैर्य झाल नाही. त्याने तसं करण्यास नकार दिला. दुसऱ्या क्षणात मेजर इयान कार्डोझो ह्यांनी खुकरी आपल्या हातात घेतली. स्वतःच्या हाताने आपला गँगरीन झालेला पाय कापल्यावर आपल्या सैनिकाला ऑर्डर केली की,  जा आता ह्याला दफन कर....  शुद्धीत असताना स्वतःचा पाय स्वतःच्या हाताने कापायला काय धैर्य लागत असेल ह्याचा आपण विचार पण करू शकत नाही. इथवर मेजर इयान कार्डोझो थांबले नाहीत. आता कापलेल्या भागावर शस्त्रक्रियेची गरज होती. कामाडींग ऑफिसर ने त्या वेळेस म्हंटल कि, “तू खूप लकी आहेस. आत्ताच आम्ही युद्धात एका पाकिस्तानी सर्जन ला बंदी बनवलं आहे. तो तुझ्यावर शस्त्रक्रिया करेल. त्यावर मेजर इयान कार्डोझो ह्यांनी सांगितल, माझा जीव गेला तरी चालेल पण माझ्यावर कोणताही पाकिस्तानी डॉक्टर शस्त्रक्रिया करणार नाही. मला माझा भारत परत हवा आहे.....  अरे कुठून येते ही देशभक्ती? हा जाज्वल्य देशाभिमान. आपण खरचं करंटे आहोत. आपल्यात ह्याच्या एक अंशाचा पण देशाचा अभिमान नाही.


 मेजर इयान कार्डोझो ह्यांना दुसरीकडे हलवण्यासाठी युद्धामुळे चॉपर हि मिळत नव्हत. तेव्हा दोन अटींवर आपल्या कामाडींग ऑफिसर ला स्वतःवर शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली. त्यातली पहिली गोष्ट होती. ती म्हणजे एक वेळ मेलो तरी चालेल पण माझ्या रक्तात पाकिस्तानी माणसाच रक्त मिसळणार नाही. दुसरी म्हणजे पूर्ण शस्त्रक्रियेच्या वेळी कामाडींग ऑफिसर म्हणजे ते स्वतः ती पूर्ण होई पर्यंत समोर उभे रहातील. ह्या मागे कारण होत की, त्याकाळी भारतीय सैनिकांना शस्त्रक्रियेच्या वेळी त्रास देण्याचे प्रकार पाकिस्तानी डॉक्टर कडून घडले होते. ह्या दोन अटींचा मान ठेवून मेजर मोहम्मद बशीर ह्यांनी मेजर इयान कार्डोझोवर शत्रक्रिया केली.


 त्या पायाच्या जागेवर मेजर इयान कार्डोझो ह्यांना लाकडी पाय बसवण्यात आला. युद्ध संपल पण पुढे काय? डॉक्टरांनी मेजर आपल्या जबाबदाऱ्या पूर्वी सारख्या पूर्ण करू शकणार नाही अस म्हणत व्यंगत्वाची जाणीव त्यांना करून दिली. पण मेजर नी हार मानली नाही. त्यांनी पुन्हा एकदा नव्या जोमाने आपली शारीरिक क्षमता वाढवायला सुरवात केली. एक लाकडाचा पाय असणारा पण दोन सामान्य पाय असणाऱ्या लोकांपेक्षा वरचढ ठरू शकतो. हे सिद्ध करण्याचा मेजर नी चंग बांधला. भारतीय सेनेच्या शारीरीक चाचण्यातून जाण्यास डॉक्टरांनी त्यांना मनाई केली. पण त्यांच्या इच्छे आणि जिद्दी पुढे डॉक्टर नमले. त्या चाचणीत मेजर इयान कार्डोझो ह्यांनी ७ ऑफिसर ना मागे टाकले. हे सातही ऑफिसर सामान्य पाय आणि फिजिकली फीट असणारे होते.


 एकदा त्यांनी आर्मी च्या व्हाईस चीफ ना विचारलं मी अजून काय करू शकतो? त्यावर ते म्हणाले माझ्यासोबत जम्मू आणि काश्मीर ला इथून चल. आर्मी व्हाईस चीफ ६००० फुट उंचीवर हेलिकॉप्टर ने पोहोचण्या आगोदर मेजर इयान कार्डोझो हे तो रस्ता पायी चढून गेले. हे बघून त्यांची केस आर्मी व्हाईस चीफ नी त्या काळी भारताचे सैन्य प्रमुख टी.एन.रैना ह्यांच्याकडे पाठवली. सैन्य प्रमुखांनी त्यांना त्यांच्या सोबत लडाख ला येण्याचा आदेश दिला. लडाख ला डोंगरात आणि बर्फात चालताना बघून सैन्य प्रमुखांनी त्यांना बटालियन ( एका बटालियन मध्ये १०० ते २०० सैनिक असतात.) ची कमांड दिली. अश्या प्रकारे भारतीय सैन्यातील पहिले अपंग कमांडिंग ऑफिसर ते बनले. त्यानंतर ही अनेक स्पर्धेत आणि कामात एखाद्या धडधाकट ऑफिसर ला लाजवेल अशी कामगिरी त्यांनी केली. त्यांच्या ह्या अतुलनीय जिद्दी ला सलाम म्हणून त्यांना ब्रिगेड ची जबाबदारी देण्यात आली. ( एका ब्रिगेड मध्ये ४००० इतके सैनिक असतात.) आपला स्वतःचा पाय का कापला अस विचारल्यावर त्यांनी सांगितल की,


 'मला लाचार व्हायचं नव्हत. त्या तुटलेल्या पायच ओझ मला व्हायचं नव्हत. पाय गेला म्हणून मी संपलो नव्हतो. माझ्यात तीच धमक बाकी होती. माझ्यात तोच सैनिक जिवंत होता. माझ्यातली विजीगिषु वृत्ती जिवंत होती. मग घाबरायचं कशाला?'


 आपल्या व्यंगत्वाला त्यांनी आपल हत्यार बनवलं. मग जे मिळवलं तो इतिहास आहे. ह्या हिरोने तरुण पिढीला जो संदेश दिला आहे. तो त्यांच्या शब्दात,


 “You have only one life to live, live it to full. You have 24 hours in a day: Pack it up”.


 व्यंगत्वाला ही पांगळ बनवणाऱ्या ह्या जिगरबाज, शूरवीर, पराक्रमी सैनिकी अधिकाऱ्याला माझा साष्टांग दंडवत. देशभक्ती काय असते ते अश्या मेजर जनरल इयान कार्डोझो च आयुष्य बघितल्यावर कळते. तुम्ही दुसऱ्या मातीचे आहात सर. आम्ही करंटे म्हणून जन्माला आलो आणि तसेच जाऊ. पण व्यंगत्वाला ही  पांगळ करणारे तुमच्या सारखे अधिकारी भारतीय सैन्यात आहेत म्हणून आज भारत अखंड आहे. तुमच्या सारख्या अधिकाऱ्यांना माझा पुन्हा एकदा साष्टांग दंडवत आणि कडक सॅल्यूट.


 जय हिंद!...


एक निरागस नवरा!

 आता घरीच असल्यामुळे बायकोला इतके कष्ट करतांना पाहिले की असं वाटतं...


जुन्या काळातील दोन - तीन बायका करण्याची पध्दत बरोबर होती...किती मेलं एकटीनंच मरमर करायची..... बघवंत नाही....  😔😔


तिच्या मदतीला आणखी एखादी बायको तरी पाहीजे?



एक निरागस नवरा!

चिमणीचा विश्वास

 🙏 घंटा उचलेपर्यंत थांबा ------ चिमणीचा विश्वास 🙏

कौरव-पांडवांमध्ये होणा-या युद्धाकरता कुरुक्षेत्राची सिद्धता करण्याचे काम सुरू होते. हत्तींच्या मदतीने विशालकाय वृक्ष भुईसपाट करण्यात येत होते. मोकळी आणि सपाट अशी युद्धभूमी तयार होत होती. एका विशाल वृक्षावर एक चिमणी आपल्या चार पिल्लांसह राहात होती. तो वृक्ष जमीनदोस्त झाला आणि तिचं घरटं, उडताही न येणा-या इवल्या पिल्लांसह कोसळलं: पण आश्चर्यकारकरीत्या ती पिल्लं अजूनही सुखरूप होती.

घाबरलेल्या, हताश चिमणीने, तेव्हाच अर्जुनासहित तिथे आलेल्या श्रीकृष्णांना पाहिले.

युद्धभूमीचे निरीक्षण करायला आणि विजयासाठी आवश्यक ती व्यूहरचना ठरविण्यासाठी ते तिथे आले होते.


दुबळ्या पंखांत, सगळी शक्ती एकवटून तिने श्रीकृष्णांच्या रथाकडे उड्डाण केले.

"हे कृष्णा, माझ्या बाळांना वाचव!  या भयंकर युद्धात ती चिरडली जातील." तिनं विनवलं.

"तुझं दु:ख मला कळतंय, पण मी निसर्गनियमात ढवळाढवळ करू शकत नाही." श्रीकृष्ण म्हणाले.

"मला इतकंच माहीत आहे, की तुम्ही माझे तारणहार आहात. माझ्या बाळांचं नशीब आता तुमच्या हातात आहे. त्यांना वाचवायचं की मरू द्यायचं, हे आता तुम्हीच ठरवा."

"कालचक्र कोणताही भेदभाव न करता फिरत राहातं," श्रीकृष्ण एखाद्या सामान्य माणसासारखं बोलत होते. असं दाखवत होते की जणू त्यांच्या हातात काहीच नाही.

"हे तत्त्वज्ञान मला कळत नाही. मला फक्त इतकंच कळतं की कालचक्र तुम्हीच आहात, मी तुम्हाला शरण आले आहे." चिमणी अत्यंत आदराने आणि विश्वासपूर्वक बोलत होती.

"मग असं कर, ३ आठवडे पुरेल इतकं अन्न तुझ्या घरट्यात गोळा कर."  श्रीकृष्णांनी सांगितलं.

सुरू असलेल्या या संभाषणाबाबत अनभिज्ञ असलेला अर्जुन चिमणीला हुसकावणार, इतक्यात श्रीकृष्ण तिच्याकडे पाहून स्मितहास्य करताना त्याला दिसले.

चिमणीने आदराने पंख फडफडवले आणि ती घरट्याकडे उडून गेली.

दोन दिवसांनंतर, शंखनाद करून युद्धारंभ करण्यापूर्वी श्रीकृष्णांनी अर्जुनाकडे त्याचं धनुष्य आणि बाण मागितले. या युद्धात लढण्यासाठी शस्त्र हातात न धरण्याची प्रतिज्ञा करणा-या श्रीकृष्णांची ही मागणी ऐकून अर्जुन दचकलाच; शिवाय आपण सर्वोत्कृष्ट धनुर्धारी आहोत याबद्दल त्याला विश्वास होता.

"मला आज्ञा करावी, माझ्या बाणांसाठी काहीही अभेद्य नाही."

अर्जुनाकडून शांतपणे धनुष्य स्वत:कडे घेत श्रीकृष्णांनी हत्तीवर नेम धरला.  पण बाणाने हत्तीला खाली पाडण्याऐवजी तो बाण हत्तीच्या गळ्याभोवतालच्या घंटेला लागला आणि काही ठिणग्या चमकल्या. एवढा सोपा नेम हुकलेला पाहून अर्जुन त्याचं चुकचुकणं लपवू शकला नाही.

"मी करू का?" अर्जुनाने आर्जव केले. 

त्याच्या त्या प्रतिक्रियेकडे दुर्लक्ष करत श्रीकृष्णांनी धनुष्यबाण त्याला परत दिले आणि आणखी काही करण्याची गरज नसल्याचं सांगितलं.

"पण तुम्ही केशव हत्तीवर वार का केलात?" अर्जुनाने विचारलं.

"कारण चिमणीचं नांदतं घरटं असणारं झाड त्याने पाडलं होतं."

"कोण कुठली चिमणी ती!" अर्जुनाला काही कळेना... "आणि एवढं होऊनही तो हत्ती सुखरूप आणि जिवंत आहे, फक्त त्याच्या गळ्यातली घंटा तेवढी उडून पडलीय."

अर्जुनाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत, श्रीकृष्णांनी त्याला शंखनाद करण्याची सूचना दिली.

युद्ध सुरू झालं, पुढच्या अठरा दिवसांत अनेकांची आयुष्यं संपली. अखेर पांडवांचा विजय झाला. परत एकदा, त्या रक्तलांछित युद्धभूमीवरून श्रीकृष्ण अर्जुनासहित फिरू लागले. अनेक योद्ध्यांची कलेवरे अंत्यसंस्कारांची वाट पाहात अजूनही तिथेच पडलेली होती. छिन्नविच्छिन्न झालेले दोन्ही बाजूंचे सैन्य, युद्धात मारले गेलेले हत्ती, रथाला जोडलेल्या अवस्थेत मरण पावलेले घोडे यांच्या प्रेतांचा तिथे खच पडला होता.

एका विशिष्ट ठिकाणी श्रीकृष्ण थांबले आणि तिथे पडलेल्या हत्तीच्या गळ्यातल्या घंटेकडे विचारमग्न होऊन पाहात राहिले.

"अर्जुना, माझ्यासाठी म्हणून तू ही घंटा उचलून बाजूला ठेवशील का?" श्रीकृष्ण म्हणाले.

या साध्याशा सूचनेने अर्जुन मात्र गोंधळात पडला. 

एवढ्या विस्तीर्ण युद्धक्षेत्रावर इतक्या बहुसंख्य इतर गोष्टींचे निवारण करणे बाकी असताना, एक क्षुल्लकसा धातूचा तुकडा उचलायला श्रीकृष्ण त्याला का सांगत असावेत, हे न कळून प्रश्नार्थक नजरेने तो श्रीकृष्णांकडे पाहू लागला.

"हां...हीच ती घंटा, मी बाण मारल्यावर हत्तीच्या गळ्यातून निसटली होती." श्रीकृष्ण म्हणाले.

अर्जुन खाली वाकला आणि कुठलाही प्रश्न न विचारता, त्याने ती जडशीळ घंटा उचलली. आणि त्यानंतर, त्याने जे पाहिले त्याने त्याचे आयुष्य कायमचे बदलले. 

एक, दोन, तीन, चार आणि पाच: चार छोट्या चिमण्यांपाठोपाठ एका प्रौढ चिमणीने पंख पसरून झेप घेतली. आनंदाने उडत उडत तिने श्रीकृष्णांना प्रदक्षिणा घातली. निखळलेल्या एका घंटेने एक पूर्ण कुटुंब वाचवले होते.

अर्जुन म्हणाला, "मला क्षमा करा, श्रीकृष्णा! मानवी अवतारातल्या तुला मर्त्य मानवासारखंच वागताना पाहून मी तुझं खरं स्वरूप विसरलो होतो."


🙏 जेव्हा काळ अटितटीचा असतो तेव्हा घंटा उचलली जाईपर्यंत थांबा, विश्वास ठेवा भगवंत सर्व व्यवस्थीतच करणार आहे.🙏

 

🔔🙏 II राम कृष्ण हरी II 🙏🔔

डोक्याला थोडा खुराक 😀

  डोक्याला थोडा खुराक 😀

कंसात जितक्या मोकळ्या जागा आहेत तितकी अक्षरे वापरून आधीचा व नंतरचा अर्थपूर्ण शब्द तयार करावेत.उदाहरणार्थ लोक(- -)दान = लोकमत,मतदान. 

1 ताव (- -)धर्म 

2 चित्र (- -)कथा 

3 कमल (- - -)बाण

4 क्षेत्र (- - -)कर्ता 

5 गो (- -)कमल 

6 शेष(- - )रिक 

7 भूत(- -)भैरव 

8 दर(- -)राष्ट्र 

9 राम(- -)बाग

10 केळ (- -)वण 

11 कला(- - -)बारी

12 शीत(- -)वादक 

13 वस्तू (- -)पान 

14 गंगा(- -)स्थळी 

15 माज (- -)कोंबडा 

16 वैताग(- -)वस्ती

17 उप(- - -)रम्य 

18 मन(-)कार 

19 काच(- -)मात्र 

20 सह(- -)क्रम

21 सनद(- -)गणती 

22 अंग(- -)दया 

23 उप(- - -)गोटे 

24 सांज(- -)कुक्कट

25 भक्त(- -)गोत

फुल आणि मिठाई एकत्र झाली आहे बघुया कोण वेगळं करून दाखवतो.

 फुल आणि मिठाई एकत्र झाली आहे बघुया कोण वेगळं करून दाखवतो.

१)ढाणीरापेतरा

२)र्फीनिबधाशिगं

३)गुभोबराजलाग

४)रईसईमजाला

५)वंबुंडुशेदीलाती

६)अजिस्टलेरबी

७)स्वंसवदबेडीनजा

८)कघीनेवरर

९)सणीफुफेदाली

१०)चुगतीररामोमो

११)ल्लामेचरलीगुस

१२)काईजुलीजुतक

१३)चंबलरोपामदा

१४)खंगुबालश्रीक्षीड

१५)रहरमोलखीगु

१६)शिरीकजापारात

१७)लाकंलीदकली

!!कृतज्ञतेचा निर्देशांक!!

 अवश्य वाचा

५० टक्के दुःख नक्कीच कमी होईल...!!💐💐


!!कृतज्ञतेचा निर्देशांक!!


असंच एकदा एक मासिक चाळताना त्यातील एका लेखामधील एका वाक्याने मला विचारमग्न केलं. आयुष्यातली सकारात्मकता याविषयावरचा तो लेख होता. मूळच्या इंग्रजीमधील लेखामधील ते वाक्य असं होतं; "Sometimes, try calculating your gratitude index in life, you will realize how lucky you are!". (कधीतरी तुमच्या आयुष्यातील कृतज्ञता निर्देशांक मोजण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही किती नशीबवान आहेत ते!). मला 'कृतज्ञतेचा निर्देशांक' ही कल्पनाच भन्नाट आवडली. जसं स्टॉक मार्केट मध्ये स्टॉक इंडेक्स किंवा ट्रेडिंग इंडेक्स असतात आणि त्यांच्या मूल्यावरून बाजाराची तब्येत ठरवली जाते, तसाच कृतज्ञताभावनेचे चढउतार मोजणारा हा कृतज्ञता निर्देशांक आपल्या मानसिकतेची तब्येत ठरवू शकेल असं मनात आलं.  लगेच माझ्या डोक्यात विचारचक्र सुरु झालं की माझ्या आयुष्यातल्या कृतज्ञता कशा मोजायच्या? कृतज्ञता निर्देशांक कसा ठरवायचा? आणि तो दैनंदिन जीवनात कसा आणायचा?. अधिक विचार केल्यावर मला काही कल्पना सुचल्या त्या अशा; 


१. माझ्या निसर्गदत्त संपदांबद्दल कृतज्ञता मानणे :

म्हणजे धडधाकट शरीर मिळालं, धडधाकट अवयव मिळाले, विचारी संवेदनशील मन मिळालं,  याबद्दल कृतज्ञता बाळगणे. मला लक्षात आलं की धडधाकट शरीर असणं, कार्यक्षम अवयव असणं हे आपण गृहीत धरतो, पण कार्यक्षम डोळ्यांची किंमत नेत्रविहीन व्यक्तींना विचारात घेतलं तर कळेल, धडधाकट हातपायांची किंमत अपंगांना विचारात घेतलं तर कळेल. संवेदनशील विचारी मनाची किंमत मनोरुग्णांची परिस्थिती पाहून कळेल. आणि एकदा हा मुद्दा लक्षात आला की निरोगी, सुदृढ शरीराबद्दल आपोआप कृतज्ञता मनात दाटून येईल. 


२. मला मिळालेल्या नात्यांच्या बाबतीत कृतज्ञता मानणे : 

आपल्याला लाभलेले माता, पिता, बहीण, भाऊ, काका, मामा, आत्या, मावशी आपलं विस्तारित कुटुंब यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगणे. ही नाती जन्म झाल्यावर आपल्याला सहज मिळतात म्हणून खूप वेळा किंमत नसते आपल्याला. छोट्या छोट्या कारणांनी रुसवे फुगवे धरतो आपण. पण या नात्यांची किंमत अनाथाश्रमात वाढणाऱ्या मुलांना पाहून कळेल. त्यांच्या डोळ्यात मायेचा एका स्पर्शासाठी आसुसलेली व्यथा दिसली की लक्षात येतं की सकाळी उठल्यावर देवाला नमस्कार करून झाल्यावर नमस्कार करण्यासाठी आईवडील असणं हे किती भाग्याचं लक्षण आहे ते. भांडायला, खेळायला, एकत्र वाढायला भावंडं असणं, हट्ट पुरवायला, लाड करायला मामा, काका, मावशी, आत्या असणं याची जाणीवपूर्वक कृतज्ञता बाळगणं इतक्या महत्वाची नाती खचितच आहेत ही. 


३. मला मिळालेल्या साधन संपदेबाबत कृतज्ञता मानणे : 

म्हणजे राहायला घर असणं, घरात सुखसोई असणं, निजायला अंथरून असणे, पांघरायला पांघरूण असणे, घालायला कपडे असणे, अभ्यासाला पुस्तक वह्या मिळणे, चांगल्या शाळेत शिक्षण मिळणे, चवीपरीने खायला मिळणे. जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी अर्थार्जनाची प्रतिष्ठित सोय असणे अशा एक नाही अनेक गोष्टीं कृतज्ञता बाळगण्यासारख्या नाहीत का? . चहा थोडा गार झाला तर चिडतो मी. पण वनवासी पाड्यावर गेलं की लक्षात येतं की मुळात जगण्याची धडपड म्हणजे काय असते. दोन वेळच्या भरपेट जेवणाची किंमत काय? थंडी वाऱ्यापासून संरक्षण मिळण्यासाठी गरम कपडे सोडाच पण किमान कपडे असणं याची किंमत किती?  या साऱ्या गोष्टी मला सहज मिळाल्या आहेत तर मी याबाबत कृतज्ञता नको का बाळगायला? 


४. माझ्या आयुष्यात आलेल्या इतर माणसांविषयी कृतज्ञता मानणे :

मला तळमळीने शिकवणारे शिक्षक, मार्गदर्शक, शेजारी पाजारी, आपले फॅमिली डॉक्टर, ड्राइवर, कामवाली मावशी, कचरा घेऊन जाणारी बाई, बिल्डिंगचा वॉचमन अशा एक नाही अनेक व्यक्तींबद्दल जाणीवपूर्वक कृतज्ञता बाळगणे महत्वाचं नाही का? 


विचार करू लागलो आणि ही यादी लांबच लांब होऊ लागली. यातून एक जाणवलं की ज्या ज्या गोष्टींमुळे माझं जीवन सुसह्य झालं आहे, सुरळीत झालं आहे, सुखावह झालं आहे त्या त्या प्रत्येक वस्तू, व्यक्ती, परिस्थितीबद्दल मनात दररोज जो कृतज्ञताभाव निर्माण होईल त्यावरून त्यादिवशीचा कृतज्ञता निर्देशांक ठरवायचा. हा कृतज्ञता निर्देशांक मला दररोज जागृत ठेवणं इतकाच नाही तर वाढत ठेवायचा प्रयत्न करायचा आहे.  त्यासाठी मी एक उपाय शोधून काढला आहे. जी जी व्यक्ती माझ्या संपर्कात येईल त्या व्यक्तीला शक्यतो संधी शोधून "धन्यवाद" देण्याचा परिपाठ अमलात आणला आहे. सकाळच्या दुधवाल्यापासून ते दररोज घरचा कचरा नेणाऱ्या बाई पर्यंत सगळ्यांना ते जेव्हा समोर येतील तेव्हा "थँक यू" असं ठरवून म्हणण्याची सवय स्वतःला लावून घेतो आहे. अगदी कुठे जात असेन आणि रिक्षा केली तर उतरल्यावर पैसे देऊन झाल्यावर रिक्षावाल्याचा खांद्यावर हलके थाप मारून आवर्जून "थँक यू" म्हणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न असतो. गम्मत म्हणून अशा किती जणांना मी दिवसभरात "थँक यू" म्हटलं याची माझ्यापुरती नोंद ठेऊन त्यादिवशीचा कृतज्ञता निर्देशांक दररोज रात्री निजण्यापूर्वी मी काढण्याचा प्रयत्न करतो. इतर कुठल्याही निर्देशांकासारखा  दररोजचा हा आकडा कमी जास्त होतो खरा पण एकूण कृतज्ञता निर्देशांकाचा महिनाभराचा आलेख (ग्राफ) हा चढता असला पाहिजे याचा प्रयत्न मात्र जरूर करतो. 


या सगळ्या खटाटोपानंतर मला स्वतःला एक मोठा फायदा असा जाणवला की ज्यांना मी धन्यवाद देतो त्या व्यक्तींना बरं वाटत असेलही मनात, पण माझ्या दृष्टिकोनातून पाहता माझं मन एका अनामिक समाधानाने भरून जातं. पाय जमिनीवर राहतात, माणसं जपली जातात आणि सर्वात महत्वाचं की या सर्व व्यक्तीत वसणाऱ्या हृदयस्थ परमेश्वरापर्यंत प्रत्येकवेळी माझं थँक यू आपोआपच पोहोचतं ...


म्हणूनच ज्याने मला हे जीवन दिले,मला जगण्यासाठी श्वास दिला,पोटासाठी अन्न दिले परमेश्वराला थँक्यू म्हणण्यासाठी मी दिवसाच्या चोवीस तासातील किमान चोवीस मिनिटे दिली पाहिजेत. भगवंताचे नामस्मरण हीच त्याच्या प्रती व्यक्त होणारी कृतज्ञता!

देववेडी-

 आस्तिक माणसं असतात, नास्तिक असतात, धड ना सश्रद्ध, ना धड अश्रद्ध माणसं असतात, अंधश्रद्धाळू, देवभोळी माणसं असतात. पण देववेडी माणसं असतात का? 

        माझ्या सासूबाईंकडे पाहिलं की 'हो' असंच उत्तर द्यावं लागेल. त्यांच्या देवावरच्या श्रद्धेबद्दल लिहायचं म्हणलं तर एक छोटेखानी पुस्तक होईल. तूर्तास त्यांच्या नैवेद्यप्रेमाबद्दल....

        सामान्य माणसाला प्रश्न पडतो, 'आज जेवायला काय?' माझ्या सासूबाईंना प्रश्न पडतो, 'आज नैवेद्याला काय?' दूधसाखर, खडीसाखर, गूळखोबरं, हे तर चिल्लेपिल्ले नैवेद्य झाले, पण घरात जो काही गोडाधोडाचा पदार्थ बनेल, फळं असतील, कोणताही उत्तम पदार्थ असेल, त्या आजतागायत एकदाही नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवलेल्या नाहीत. 

        लहान मुलांना जसा खाऊ पाहिल्यावर आनंद होतो, तसा माझ्या सासूबाईंना देवासाठी बनवलेला नैवेद्य पाहिल्यावर होतो. 

         नैवेद्य दाखवताना त्यांच्या चेहऱ्याकडे पहावं फक्त. आई जसं प्रेमाने आपल्या लेकराला भरवते त्याच ममतेने, श्रद्धेने त्या नैवेद्य दाखवतात. मी त्यांची सून म्हणून कौतुक करते आहे असं नाही, मला स्वतःला ठरवून देखील इतकं सश्रद्ध होता येणार नाही. पण देवाबद्दल इतकं प्रेम की त्याला आपल्या अस्तित्वाचा एक भाग मानून, निरपेक्ष भावाने जीवन जगण्याचं गणित जे त्यांना जमलेलं आहे, ते माझ्या पिढीतल्यांसाठी खरोखरी आश्चर्यकारक आहे. केवळ 'तेच योग्य आहे आणि प्रत्येकाने असंच असावं' असं अजिबात नाही. पण देववेड्या माणसांना परमेश्वर अंमळ जास्त सुखी ठेवतो असं मला वाटतं, कारण त्यांची श्रद्धा त्यांना जास्त rooted (याला समांतर मराठी शब्द काय असावा याचा विचार करते आहे) ठेवते... बाकी अश्रद्ध माणसाची सुद्धा कशा न कशावर तरी श्रद्धा असतेच! तो देवच असेल असं नाही. पण कोणी मान्य करतं कोणी करत नाही.

        गेली अनेक वर्ष माझ्या सासूबाई सकाळचा चहासुद्धा देवाला दाखवून मग पितायत. हा एखाद्याला वेडेपणा वाटेल, पण ज्याचं अस्तित्व एखाद्याशी घट्ट बांधलेलं असतं त्या माणसासाठी हे अगदी नॉर्मल आहे. 

        आम्ही बाहेर काही खरेदीला निघालो, की त्या आवर्जून सांगतात, "आमच्या देवाला काहीतरी आणा ग." हे म्हणजे असं झालं, की आमच्या बाळाला येताना काहीतरी खाऊ घेऊन या बरं का", इतकं ममत्व असतं त्यात. मग आपण लाडूपेढेमिठाई आणली तरी चालते किंवा अगदी तीन केळी आणली तरीही त्यांना चालतात. मुद्दा असा की देव उपाशी राहिला नाही पाहिजे. गोडाधोडाचं काही आणलं की त्या पहिलं देवाचं काढून ठेवणार, मग काय खायचंय ते खा म्हणणार. यातलं गमक इतकंच की आपण जे खातो पितो त्यातलं आधी 'त्याचं' थोडं मग आपलं. आवडते पदार्थ एकट्याने खाणं सोपं आहे, पण त्यातला थोडा भाग दुसऱ्यासाठी आधी काढून ठेवणं, मनावर संयम ठेवायला शिकवणारी यापेक्षा दुसरी अजून कोणती चांगली रीत असेल? 

        एखाद्या दिवशी उपवास असेल तर त्या आवर्जून वरईचे तांदूळ, दाण्याची आमटी, थालीपीठ, खिचडी, जे काही केलं असेल ते आधी नैवेद्य दाखवणार मग स्वतः खाणार. 

        मी त्यांना मजेत विचारते, "आई, देवाला कसले उपवास करायला लावता?" तेव्हा त्या म्हणतात, "अग बिचारा गोड खाऊन कंटाळला असेल, त्याला पण खावंसं वाटतं ना अधेमधे जरा चमचमीत उपवासाचे पदार्थ. आपल्याला लागतो ना चेंज? मग त्यालाही नको का?" तात्पर्य काय, तर तो आपल्यातलाच एक आहे, फक्त जरा जास्त स्पेशल आहे, कारण त्याला आपली काळजी आहे.

         नवरात्रात आमच्या देवीची जी काही चैन असते ती विचारू नका. त्यांची मुलं, सुना, देवीसाठी भरपूर मिठाई, फळफळावळ आणून देतात, पण याव्यतिरिक्त, नवरात्रात पूजा झाली, की त्या दररोज दुपारी कालवलेला दहीदूध सायभात असा नैवेद्य दाखवतात. यामागचा विचार काय? तर 'देवी नऊ दिवस लढाई करून दमली आहे ना, मग तिला शांत करणारं, शक्ती देणारं अन्न नको? म्हणून तिच्यासाठी हा छान कालवलेला भात.' त्यांचे स्वतःचे नऊ दिवस उपवास असतात, त्यामुळे हा नैवेद्याचा भात माझ्या वाट्याला येतो. 

       कॉलेजमधून दुपारी दमूनभागून आले की त्या नैवेद्याच्या भाताचा कुंडा माझ्या हातात आला की जणू स्वर्गसुख लाभतं! तो भात खाऊन इतकं तृप्त व्हायला होतं की दुसरं काही खावंसं वाटतंच नाही. मलादेखील ते अन्न शांतवतं, शक्ती देतं.

        देवाच्या नैवेद्यात काय जादू असते समजत नाही! पण तो वेगळाच लागतो हे खरं. सत्यनारायणाचा प्रसाद मी केलेला चांगला होतो पण माझ्या सासूबाईंनी केलेला अतिशय चांगला होतो. असं का? मला नेहमी प्रश्न पडतो. त्यात त्यांच्या भक्तीची, देवावरच्या प्रेमाची चव उतरलेली असते की काय? असणारच. 

        त्या स्वतः निस्सीम श्रीकृष्णभक्त आहेत. दर पंधरा दिवसाला जेव्हा घरात लोणी निघतं, तेव्हा आमच्या श्रीकृष्णाची काय चंगळ असेल विचार करा. चांदीची वाटी भरून लोणीसाखरेचा नैवेद्य दाखवला जातो. या नैवेद्याची चव जगातल्या कोणत्याही चीज, बटर, आणि डीपला नाही बरं का!

        इतका सगळा नैवेद्य दाखवून झाल्यावर आम्ही त्यांना कधीतरी चेष्टेत म्हणतो "अहो किती खायला घालताय तुमच्या देवाला. दमला तो खाऊन खाऊन. अजीर्ण होत असेल बिचाऱ्याला." त्यावर त्या रागावून म्हणतात, "काही अजीर्ण वगैरे होत नाही. ही काय मी घरी केलेली सुपारी पण ठेवते आहे की त्याच्यासमोर."! 😊

        प्रश्न आस्तिकतेचा किंवा नास्तिकतेचा नसतो. तर तुम्ही तुमचं काम, कर्म, आचरण किती श्रद्धेने आणि विश्वासाने करता याचा असतो.

म्हणून मी नेहमी आनंदी असतो.

 म्हणून मी नेहमी आनंदी असतो. 😊


मी भुतकाळ चघळत नाही

ना मी भविष्याची चिंता करतो, मी वर्तमानात जगतो.

म्हणून मी नेहमी आनंदी असतो. 😊


मी कुणाकडुन काडीची अपेक्षा करत नाही, मी कुणाबद्दल राग मनात धरत नाही. मी लगेच सगळ्यांसाठी मन साफ ठेवतो. 

म्हणून मी नेहमी आनंदी असतो. 😊


मी कसलाच हव्यास आणि लोभ करत नाही.

मी हायफाय राहण्यासाठी धडपडत नाही, कोणासाठी कधीच दुःखाने तडफडत नाही.

साधं राहुन आपल्या माणसांत सुखानं रमतो.

म्हणून मी नेहमी आनंदी असतो. 😊


कोण काय बोलतं ह्याचा मी कधीच विचार करत नाही,

कोणी काहीही बोललं तरी 

पुन्हा मी ते स्मरत नाही.

माझं जीवन स्वछंदी आहे, 

ते मी मजेत जगतो.

म्हणून मी नेहमी आनंदी असतो. 😊


मला पदाचा ना ज्ञानाचा

अहंकार कधी, मला ना

तुच्छतेचा विचार कधी

मनाला भावला नाही.

पाय जमिनीवर ठेऊन प्रसंगी 

अनवाणी चालतो. 

म्हणून मी नेहमी आनंदी असतो. 😊


जगायला काहीच भौतिक

सुख लागत नाही, म्हणून मी गर्वाने कधीच वागत नाही.

सगळ्यांशी प्रेमाने आदराने 

आपुलकीने वागतो.

म्हणून मी नेहमी आनंदी असतो. 😊


जन्म शाश्वत आहे तसा मृत्यू देखील शाश्वत आहे, ही मला जाणीव आहे.

माझ्यातही दोष आहेत आणि काहीतरी नक्कीच उणीवाही आहेत.


माझ्या दोष आणि उणीवा मी रोजच पाहुन सुधारण्याचा प्रयत्न करतो व ‌‌‍वरीलप्रमाणे आनंदी राहायचा प्रामाणिक प्रयत्न करतो. 

म्हणून मी नेहमी आनंदी असतो

मला वरील सर्व गोष्टी जमतातच असं नाही, पण त्या करण्याचा मी खरंच प्रामाणिक प्रयत्न करतो व आनंदी राहायचा प्रयत्न करतो.