आपल्याकडे तोंड येणे हा वाक्प्रचार सर्रास वापरला जातो. कोणी पटकन काही बोललं तरीदेखील 'त्याला काय तोंड आलंय' असं म्हटलं जातं. पण जेव्हा प्रत्यक्षात तोंड येतं तेव्हा मात्र त्या रुग्णाचे हाल होतात. तोंड येतं म्हणजे काय होतं तेव्हा कळतं. हे नेमकं कशामुळे होतं. त्याची कारणं काय आहेत किंवा असं होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे हे जाणून घेऊ या. त्या दिवशी चिरागला साधं जेवणही तिखट लागत होतं. इतकंच नाही तर पाणी किंवा दूध पिणंही कठीण होत होतं. त्याला तोंडच उघडता येत नव्हतं. घरगुती उपचार करूनही काहीच फरक पडत नव्हता. दोन दिवस झाले तरी काही कमी होत नाही हे लक्षात आल्यावर तो त्वरित डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी त्याला पाहून लगेच औषधं दिली. दुस-या दिवशी त्याला थोडंसं का होईना पण तोंड उघडता आलं. त्याला तोंड आलं होतं. तोंड येणे म्हणजेच माऊथ अल्सर होणे किंवा स्टेमॅटायटिस. चिरागप्रमाणेच प्रत्येकालाच कधी ना कधी या त्रासातून जावंच लागतं. लहान असो वा मोठं हा तोंड येण्याचा त्रास कधी कधी उद्भवतो. लहानपणी पटकन कोणाला उलट उत्तर दिलं की पटकन म्हटलं जायचं की, 'कसा चुरूचुरू बोलतोय बघ, तोंड आलंय त्याला.' पण हा वाक्प्रचार जेव्हा प्रत्यक्षात येतो तेव्हा त्याचा कितीतरी त्रास होतो. खूप हाल होतात. पाणी पिताना डोळ्यांतून पाणी येणे, शरीरातली उष्णता वाढणे, आळस येणे, कशात लक्ष न लागणे, सतत त्या जखमेकडे लक्ष जाणे, आवंढा गिळतानाही त्याचा त्रास होतो. याचं प्रमाण अधिक असेल तर काही रुग्णांना अशक्तपणाही येऊ शकतो. वारंवार या त्रासाला सामोरं जावं लागलं तर यामुळे बुद्धीची धार कमी होते किंवा स्मरणशक्ती कमी होते, कार्यक्षमता कमी होते. हा त्रास मोठय़ांप्रमाणेच लहानांनादेखील होऊ शकतो. या आजाराला वयाचं बंधन नसतं. अशा या अल्सरचे किंवा तोंड येण्याची कारणं काय आहेत ते पाहू या. कारणं » कुपोषण » आहारदोष किंवा चुकीची आहारपद्धती आणि जीवनशैली » जीवनसत्त्व नायसीन, रायबोफ्लॅवीन. फोलेट अॅसिड, जीवनसत्त्व सायनोक्लोमाइनच्या कमतरता » दात, जीभ, हिरडया आणि तोंडाची पुरेशी स्वच्छता नसणे, » दीर्घकाळ अँटिबायोटिक औषधाचे सेवन करणे, » कॅन्सरच्या औषधाचा दुष्परिणाम होणे » तंबाखूम दारू, गुटखा याचं सेवन करणे » मानसिक ताणतणाव » अपुरी झोप » अति मसालेदार, तिखट अन्नपदार्थाचं सेवन करणे » कमी प्रतिकारशक्ती » जीवनसत्त्वांची कमतरता » वारंवार टुथपेस्ट बदलणे » कधी कधी काही स्त्रियांना मासिक पाळीपूर्वीदेखील तोंड येतं. पण ते मर्यादित काळासाठी असतं. तोंड येणं म्हणजे नेमकं काय होतं? तोंड येतं तेव्हा जीभ, गालाचा आतील भाग, टाळू, हिरडया, जिभेच्या कडा, ओठाची आतली बाजू पूर्णत: लाल होते. काही वेळेला पांढरट, पिवळसर गोल जखमा तयार होतात. इतकंच नाही तर कधी कधी घशाच्या आत किंवा जिभेवर पांढरट थर जमा होतो. अशा वेळी तोंडातून गरम वाफा निघाल्याचं जाणवतं. जिभेच्या कडा खडबडीत होतात. तिथेही फोड येतात. कधी कधी ताप येतो किंवा अंगात कणकण जाणवते. पचनसंस्थेवर ताण पडून शौचाच्या तक्रारीही निर्माण होतात. त्याचबरोबर भूक मंदावणे, प्रतिकार शक्ती कमी होणे, इतर आजरावर सामोरे जावे लागतं. यासारख्या तक्रारी वारंवार तोंढ येण्याचे दिसून येतं. वारंवार तोंड आल्यामुळे अपचन, जुलाब, मोठया आतडयाचे विकार, मानसिक ताणतणाव अशा प्रकारांना सामोरं जावं लागतं. थोडक्यत शरीरातील ब गटातील जीवनसत्त्वांचं प्रमाण कमी झालं की त्याचा मज्जा पेशींवर परिणाम होतो. त्वचा, ओठ, गालाचा आतील भाग, जीभ आणि घसा असे पचनसंस्थेतील महत्त्वाचे पाचकरस करणा-या ग्रंथी तसंच रक्त तयार करणा-या ग्रंथींचं जीवनसत्त्व बी गटामुळे होत असतं. मात्र या जीवनसत्त्वांच्या अभावाने खंड पडतो. आणि त्यांचं कार्य बिघडतं त्यामुळे तोंड येतं. तोंड येऊ नये म्हणून काय कराल? » तोंडाची आंतरबाहय़ स्वच्छता » पान, तंबाखू, गुटखा यांसारख्या घातक घोष्टींचं सेवन पूर्णपणे बंद करावं » आहारात जीवनसत्त्व आणि चोथायुक्त पदार्थाचा समावेश करावा. » भरपूर पाणी प्यावं. दिवसभरातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे » पुरेशी झोपही आवश्यक आहे. रात्रीच्या जागरणाने शरीरात उष्णता वाढते. त्यामुळेही तोंड येतं. म्हणून किमान सहा ते सात » तास झोपणं आवश्यक आहे. » तणावरहीत जगणं आवश्यक आहे. कोणत्याही गोष्टीचा मनावर ताण आल्याने त्याच्या परिणाम आपल्या प्रकृतीवर होतो. » तोंड आलेल्या ठिकाणी ग्लिसरीन लावावं. आणि लाळ थुकून टाकावी. तोंडात कात धरल्यानेही आराम पडतो. मात्र त्वरित उपचार न झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. शरीराला आवश्यक जीवनसत्त्व कोणती? » बी १ अर्थात थायमिन » रायबोफ्लेवीन » नायसीन ही जीवनसत्त्व कोणत्या पदार्थातून मिळतील? थायमिन : सर्व प्रकारची तृणधान्य, हातसडीचा तांदूळ, कोंडयासकट गहू, मोड आलेली कडधान्य, ज्वारी आणि बाजरी. रायबोफ्लेवीन : दूध, तृणधान्य, डाळी यातून अधिक प्रमाणात मिळतं. गर्भावस्थेतील स्त्रिया, थायरॉड ग्रंथीचे आजार, संतती नियमनाच्या गोळ्यांचे सेवन करणाऱ्यांना या जीवनसत्त्वाची अधिक गरज असते. नायसीन : संमिश्र आहार. तृणधान्य आणि दूध. |
No comments:
Post a Comment