पावसाने सध्या दडी मारली असली तरीही मागच्या महिन्यात पडून गेलेल्या आणि मधून एखादी सर आणि बाकी वेळ ऊन असं काहीसं वातावरण असल्यामुळे बरेच आजार डोकं वर काढतायेत. त्यातलाच एक आजार म्हणजे लेप्टोस्पायरोसिस. सध्या राज्यात या आजाराने धुमाकूळ घातला आहे. हळूहळू बळींच्या संख्येने ४०चा आकडा केव्हाच पार केला आहे. हा आजार नेमका काय आहे, कशामुळे तो होतो, थोडक्यात आजाराची माहिती जाणून घेऊ या. लेप्टोस्पायरोसिस हा आजार जिवाणूंमुळे होत असून तो इतर दिवसांच्या मानाने पावसाळ्यात अधिक प्रमाणात दिसून येतो. म्हणजे या दिवसांत या आजाराचं संक्रमण अधिक होतं. हा असा आजार आहे, जो आणखी काही आजारांची पैदास करतो. हे जिवाणू मानवी शरीरात थेट शिरत नाही तर म्हैस, घोडा, बकरी, कुत्ता आदी प्राण्यांच्या साहाय्याने मानवी शरीरात प्रवेश करतो. म्हणजे नेमका कसा? तर या प्राण्यांच्या मूत्र विसर्जनातून तो हवेत पसरतो. आद्र्रतेमध्ये हा जिवाणू दीर्घकाळापर्यंत जिवंत राहतो. आणि तो मानवी शरीराच्या संपर्कात आला की त्या व्यक्तीला लॅप्टोस्पायरोसिस नावाचा हा आजार होतो. प्रथमदर्शनी या आजाराची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. खरं म्हणजे हा आजार जंगली प्राण्यांमध्ये अधिक आढळतो. हे प्राणी पाळीव प्राण्यांच्या संपर्कात आल्यावर त्या पाळीव प्राण्यांना होतो. आणि त्यांच्यामार्फत मग या प्राळीव प्राण्यांचे मालकांपर्यंत हा आजार पसरतो. दूषित पाण्याच्या संपर्कात आल्यामुळेही हा आजार उद्भवतो. म्हणजे दूषित पाण्याच्या संपर्कात येणा-या व्यक्तीचे डोळे, त्वचा आणि शौचावाटे हा आजार वेगाने पसरला जातो. प्रामुख्याने या आजारात किडणीला बाधा होते. म्हणूनच या आजाराची बाधा प्रामुख्याने पूरग्रस्त भागात किंवा शेतीवाडी करणारी मंडळी तसंच अन्य रुग्णांना पटकन होते. असं असलं तरीही सध्या कानावर पडणा-या बातम्यांमुळे या दिवसांत सर्वसामान्य लोकांनीही सतर्क असणं आवश्यक आहे. काही डॉक्टरांच्या मते, हा आजार जीवघेणा आहे. ज्या व्यक्तीला या आजाराची लागण होते, त्या व्यक्तीचे वाचण्याची शक्यता कमी असते. याची लक्षणं अगदी लवकर समजली तरच त्यावर उपचार करणं अधिक सोपं असतं. याला अनेक नावं आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर ७-डे फिव्हर, हार्वेस्ट फिव्हर, फिल्ड फिव्हर, माईल्ड फिव्हर, रॅट कॅचर्स यलोज, अशी अनेक नावं आहेत. त्याचबरोबर ब्लॅक जाँडिज म्हणूनही ओळखला जातो. लक्षण » डोळे लाल होणे » डोकं, कंबर आणि पाय दुखणे हे प्रमुख लक्षण आहे. » स्नायू दुखणे » त्वचेवर रॅश येणे वेळेवर निदान न झाल्यास पुढील लक्षणं दिसतात. » मेनेन्जायटिस » कावीळ होणे, » किडणीला सूज येऊन किडणी निकामी होणे » लघवी वाटे रक्त पडणे. ही लक्षण काही ठरावीक काळामध्येच जाणवतात. उदाहरणार्थ पहिल्या ७-१२ दिवसांत याची लक्षणं दिसतात. साधारणत: ३-७ दिवसांपर्यंत आजारपण जाणवतो. यावर काही अँटिबायोटिक्स घेतली तर ही लक्षणं नष्ट होतात. ही लक्षणं पुन्हा डोकं वर काढतात. बहुतांश लोकांना अल्प काळातला आजार होतो. मात्र दुसरी पायरी ही मॅनेन्जायटिससारख्या आजाराने होते. उपाय काय कराल? वर सांगितलेली लक्षणं कोणत्याही व्यक्तीत आढळली तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क करणं आवश्यक आहे. आपल्या परिसरात गोशाळा किंवा अन्य कोणती जागा असेल तर त्या ठिकाणांची स्वच्छता करणं आवश्यक आहे. पावसात साचलेल्या पाण्यात खेळणा-या मुलांना थांबवायला हवं. किंबहुना पावसाच्या पाण्यात खेळायला पालकांनी सोडू नये. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती उत्तम असते त्यांच्या मलमूत्रविसर्जनावाटे हे जिवाणू बाहेर टाकले जातात. मात्र ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते त्यांना अशा आजाराची लागण पटकन होते. काळजी काय घ्याल? » पावसाळ्यात साचलेल्या पाण्यातून जाणं टाळावं. » तुम्हाला अशा ठिकाणी जावंच लागणार असेल तर प्रथम डॉक्टरांशी सल्लामसलत करून त्यासंबंधीची औषधं बरोबर ठेवावीत, म्हणजे तुमचा या आजारापासून बचाव होईल. » उंदीर-घुशींचा नायनाट करावा. » कच-याची त्वरित विल्हेवाट लावावी. » पूर्ण विश्रांती आणि हलका आहार घ्यावा. |
No comments:
Post a Comment