Tuesday, April 14, 2015

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

उन्हाळ्यात घ्या बालकांची काळजी

एप्रिल महिन्यातच पारा वाढला आहे, अंगाची अक्षरश: लाही लाही होतेय. कितीही काळजी घेतली तरी या उन्हाचा थोडासा का होईना पण आपल्या तब्येतीवर परिणाम होतो. मग आपली अशी अवस्था असेल तर लहान मुलांची काय अवस्था होत असेल. अगदी नवजात किंवा एक- दोन वर्षाच्या बाळाची या उन्हाळ्यात कशी काळजी घ्यायला हवी हे जाणून घेऊ या.

उन्हाळ्याचा त्रास आपल्याला खूप होतो मग तो लहान मुलांना किती होत असेल. लहान मूल मग ते अगदी नवजात बालक असो वा पाच वर्षाच्या आतलं असो. कित्येकदा छोटया मुलांना काय होतंय आणि काय नाही याचा अंदाजच आपल्याला येत नाही.

उन्हाळ्यात आपल्याला जसं गरम होतं तसं लहान मुलांनादेखील गरम होत असतं. अगदी नवजात बालकांना तर कायमच कपडय़ांत गुंडाळून ठेवलं जातं. सगळ्याच लहान मुलांची त्वचा अतिशय नाजूक असते. अशा वेळी उन्हाळ्यापासून त्यांच्या नाजूक त्वचेचा आंतरबाहय़ बचाव कसा करता येईल हे पाहू या.

सुती कपडे घाला

आपल्या बाळाला सुती कपडे घालता येतील याकडे लक्ष द्या. तसंच हे कपडे अतिशय आरामदायी असावेत. म्हणजे ते घट्ट नसावेत. सिंथेटिक कापड वापरलं तर त्यामुळे मुलांच्या अंगात उष्णता टिकून राहते. त्यामुळे त्यांच्या अंगावर घामोळं येऊ शकतं.

आजकाल बाजारात कॉटनचे लांब हात-पाय असलेले कपडे मिळतात. त्याचा वापर करा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतंही क्रीम लावू नका. उन्हापासून वाचण्यासाठी त्याला टोपी घाला. पण ही टोपी आकाराने थोडी मोठी असावी. एकदम घट्ट घातली की त्याचा त्रासही मुलांना होतो.

दुपारच्या वेळी घरीच थांबा

लहान बाळांना दर महिन्याला डॉक्टरांकडे घेऊन जावं लागतं. पण बाळाला डॉक्टरांकडे घेऊन जाताना शक्यतो उन्हाच्या वेळी बाहेर पडू नका. पण डॉक्टरांच्या वेळेमुळे तुम्हाला बाहेर पडावंच लागलं तर तुमचं बाळ सुरक्षित आहे की नाही याची प्रथम खात्री करून घ्या. थोडं फिरायला लागला असाल तर त्याला सकाळी लवकर किंवा संध्याकाळी ऊन ओसरलं की बाहेर फिरायला घेऊन जा.

गादी बदला

लहान मुलं ज्या गादीवर झोपतात ती गादी पूर्णत: कापसाची असेल याकडे लक्ष द्या. कारण फोमच्या किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या गाद्यांमुळे त्यांना गरम होऊ शकतं. कापसाच्या गादीमुळे गरम होत नाही आणि हवाही त्यांच्यापर्यंत पोहोचते.

डायपरचा वापर कमी करा

आजकाल मुलांना डायपर घातलं जातं, मात्र उन्हाळ्यात डायपरचा वापर कमीच करावा. या डायपरमुळे घाम त्वचेवरच राहतो. त्वचा सतत ओलसर राहिल्यामुळे त्वचेवर पुरळ येणे किंवा ती लाल होणे असे विकार होऊ शकतात. म्हणून या दिवसांत डायपरचा वापर कमीच करा. त्याऐवजी कापडाचा वापर करावा. कपडयामुळे त्वचा कोरडी राहते.
चांगल्या पदार्थाचं प्रमाण वाढवा

लस्सी, मिल्क शेक, फळांचा ताजा रस(बाटलीबंद रस नव्हे) आणि नारळपाणी अशा पदार्थाचा लहान मुलांच्या आहारात समावेश करावा. तुमचं बाळ सहा महिन्यांपेक्षा लहान असेल आणि तुम्ही केवळ स्तनपान देत असाल तर तुम्हाला बाळाला अतिरिक्त पाणी देण्याची गरज पडत नाही. अगदी या दिवसांतही नाही. कारण या दुधात मुळातच पाणीच असतं.

उन्हाळ्यात मुलं मुळातच थोडया थोडया वेळाने स्तनपानाची मागणी करतात. ज्यामुळे त्यांना अधिक दूध मिळतं. आणि हे दूध त्यांना अधिक ताजंतवानं ठेवण्यास मदत होते. दुधावाटे त्यांना भरपूर प्रमाणात पाणी मिळतं. जी मुलं बाटलीने दूध पितात त्यांच्यासाठी गरम पाणी उकळून थंड केलेलं पाणी देणं हितकारक ठरतं.

बाहेरचे पदार्थ टाळाच

आईस्क्रीम, गोळा, कुल्फी किंवा फळांचा ज्यूस असे बाहेरचे, रस्त्यावरचे पदार्थ लहान मुलांना नेहमीच आकर्षित करतात. अगदीच काही नाही तर ते बाहेरचं थंडगार पाणी मागतात. म्हणूनच बाहेर पडताना त्यांचं जेवण आणि पाणी कायम तुमच्यासोबत ठेवा. बाहेर घेऊन जाताना प्लास्टिकच्या डब्याचा वापर करावा. मुलांना खायला देण्याआधी प्रथम स्वत: खाऊन बघा. खराब झालं नाही याची खात्री करा. कारण उन्हाळ्यात शिजवलेलं अन्न खराब होण्याची शक्यता असते.

उन्हाळ्यात मालिश नकोच

नवजात बालकांना मालिश करण्याची पद्धत आहे. मालिश करताना वापरलं जाणारं तेल, पेट्रोलियम जेली किंवा अन्य मॉइश्चर याचा वापर न केलेलाच बरा. तेलाने मालिश केल्याने घाम त्वचेवरच राहतो. त्यामुळे त्वचाविकार होण्याची शक्यता अधिक असते. त्यातही तुम्हाला उन्हाळ्यात मालिश करायचं असेलच तर ऑलिव्ह ऑईल किंवा नारळाच्या तेलाचा वापर करा. जे मुळातच थंड असतं. मात्र अंघोळीच्या वेळी हे तेल पूर्णत: स्वच्छ होईल, याकडे लक्ष द्यावं.

पावडरही नको

घाम येऊ नये किंवा मुलांना फ्रेश वाटावं म्हणून अंघोळ केल्यावर कित्येकदा मुलांना भरपूर पावडर लावली जाते. मात्र घाम आल्यावर त्यात पावडर मिसळली तर त्याचा त्वचेवर थर जमा होतो परिणामी अंगावर खाज उठणे असे विकार होतात. म्हणून पावडरीचा वापर करूच नका. शक्यतो डायपर आणि ओल्या जागी पावडर न लावणेच उत्तम. पावडरीचा गंध प्रत्येक श्वासागणिक येणार नाही याची काळजी घ्या. पावडर लावायचीच असेल तर ती योग्य पद्धतीने लावली जाते की नाही याची काळजी घ्या. तसंच ती नीट पसरवा.

थंड पाण्यात खेळू या

काही मुलांना पाण्यात खेळायला खूप आवडतं. अंघोळीच्या वेळी ही मुलं हमखास पाण्यात खेळण्याचा आग्रह करतात. अशा वेळी मुलांना पाण्यात खेळू द्यावं. अगदी आजूबाजूला पाणी उडेपर्यंत त्यांना मनसोक्त डुंबू द्यावं. मात्र त्यावेळी तुम्ही त्यांच्यासोबत राहणं आवश्यक आहे. सार्वजनिक स्वीमिंग पूलचा वापर करूच नका. कारण तिथलं पाणी स्वच्छ नसतं.

एअरकंडिशन किंवा कुलरचा वापर

मुलांची अंघोळ झाल्यावर त्यांना ताबडतोब एअरकंडिशन किंवा कुलरसमोर आणू नये. त्यांच्या अंगात पूर्ण कपडे आणि त्यांचे केस कोरडे असतील तेव्हाच एसी किंवा कुलर सुरू करावा. तसंच एअरकंडिशन किंवा कुलरमध्ये वावरताना त्यांच्या अंगावर सुती कपडे असणं आवश्यक आहे. नाहीतर त्यांना सर्दी होण्याची शक्यता असते. तसंच तुमचं मूल जेव्हा झोपलेलं असतं, तेव्हा एअरकंडिशन किंवा कुलरचा झोत त्याच्यावर येणार नाही याची काळजी घ्या. अशा थंड वातावरणात राहिल्यानंतर एकदम गरम वातावरणात मुलांना नेणं टाळाच. आधी एअरकंडिशन किंवा कुलर बंद करावा. त्यानंतर थोडा वेळ त्यांना त्या वातावरणात ठेवू द्यावं. थंडावा कमी झाला की मगच बाहेर आणावं.

गॉगल किंवा चष्म्याचा वापर

कित्येकदा बाहेर फिरायला जाताना पालक आपल्या मुलांना गॉगल वापरायला देतात. मात्र रस्त्यावरच्या गॉगलची खरेदी करू नका. प्रतिष्ठित ब्रँडचा किंवा यूव्ही प्रोटेक्टने उपयुक्त असावा. गॉगलची निवड तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करा.

घामोळ्यावर घरगुती उपाय

»  ताक किंवा पाणीदार दही घाम आल्याच्या जागी लावावं.

»  मुलतानी माती किंवा गुलाब पाण्याचादेखील वापर करू शकता. कारण हे दोन्ही पदार्थ मुळातच थंड असतात. दहा मिनिटांनंतर हे धुवून टाका.

»  बाजारात मिळणा-या घामोळ्यांच्या पावडरीचा मुलांसाठी वापर करू नका.

Read More »

पायातल्या पेटक्यांपासून सावधान

हिवाळ्याप्रमाणेच उन्हाळ्यातही पायात पेटके येण्याचे प्रमाण अधिक असते, हे अभ्यासातून सिद्ध झालं आहे. तुम्ही खेळाडू किंवा गर्भवती माता असाल किंवा ज्येष्ठ नागरिक असाल, रात्रीच्या वेळी – विशेषत: उन्हाळ्यात, पायात पेटके येणं हे तुमच्याकरिता नित्याचं झालं असेल. उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेमुळे पायात पेटके येण्यापासून ते जीवघेण्या उष्माघातापर्यंत कोणत्याही पद्धतीचा त्रास होऊ शकतो.

उन्हाळ्यात अनेक तरुण मंडळी आणि लहान मुलं बाहेर मैदानी खेळ खेळताना दिसतात. बाहेरच्या उष्ण वातावरणात खेळणा-या लोकांना स्नायूंचा अतिवापर झाल्याने किंवा त्यांना दुखापत झाल्याने स्नायूंमध्ये पेटके येण्याचा त्रास वारंवार उद्भवतो.

शरीरातील द्रवाचं प्रमाण कमी असताना किंवा तुमच्या शरीरातील पोटॅशियम किंवा कॅल्शिअमचं प्रमाण कमी झालं असताना खेळल्यास, शारीरिक कष्ट केल्यास स्नायूंमध्ये पेटके येण्याची शक्यता कित्येक पटीने वाढते. टेनिस किंवा गोल्फ खेळताना, पोहताना किंवा कोणत्याही प्रकारचा व्यायाम करताना स्नायूंमध्ये पेटके येऊ शकतात.

फक्त खेळाडूंना पायांमध्ये पेटके येतात असं नाही; तर, गर्भवती माता आणि ५० वर्षाहून जास्त वय असलेल्या लोकांनाही ऋतूनुसार पायांमध्ये पेटके येण्याचा त्रास होऊ शकतो आणि उन्हाळ्यामध्ये हा त्रास कित्येक पटीने वाढतो असं लक्षात आलं आहे. आकडेवारीनुसार, ५० वर्षाहून जास्त वय असलेल्या तीनपैकी एका व्यक्तीला दिवसातून किमान एकदा आणि रात्रीच्या वेळी बरेचदा पायांमध्ये पेटके येण्याचा त्रास होतो, असं दिसून आलं आहे.

उन्हाळा आणि पायांमधील पेटके यांच्यातील परस्पर संबंध कसा आहे ते पाहू या. उन्हाळ्यामध्ये हवा उष्ण असल्याने घाम येतो आणि आपल्या शरीरातील द्रवाचं प्रमाण झपाटयाने कमी होत जातं. शरीरातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियम इलेक्ट्रोलाईट्सच्या स्वरूपामध्ये घामावाटे शरीरातून बाहेर जाते. त्यामुळे शरीरात या घटकांची कमतरता निर्माण होऊन स्नायूंमध्ये पेटके येण्याचं प्रमाण वाढतं. शरीरातील द्रवाचा ऱ्हास झाल्याने हीयड्रेशनची(शरीरातील द्रवाचं प्रमाण प्रचंड कमी होण्याची) शक्यताही वाढते.

स्नायूंमध्ये गोळे येणे किंवा स्नायूंना हिसके बसणे यालाही स्नायूंमध्ये पेटके येणे असं म्हणतात. या पेटक्यांची तीव्रता जास्त असेल तर होणारी वेदनाही तितक्याच तीव्र स्वरूपाची असते. आपण झोपलेलो असताना किंवा आराम करत असताना आणि व्यायाम करत असतानाही पायांमध्ये पेटके येण्याचं प्रमाण सर्वाधिक असतं. व्यायाम करत असताना स्नायूंमध्ये पेटके आल्यास स्नायू ओढले गेल्याची भावना होऊन वेदना होऊ लागते.

उष्णतेमुळे होणा-या दुखापतींविषयी डॉक्टर मंडळी लोकांना वारंवार सावधान करत असतात. उष्णतेमुळे होणा-या दुखापतींचे मूळ समजावून घेतले तर त्याचा प्रतिबंध करता येऊ शकेल. उष्णतेमुळे होणा-या त्रासांची लक्षणं समजावून घेणं आणि त्यावर तात्काळ उपचार करण्याची समर्थता बाळगणं यामुळे उष्णतेमुळे होणा-या दुखापतींचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल. प्रतिबंधात्मक खबरदाऱ्यांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे पुरेशा प्रमाणात सेवन करणे आणि भरपूर पाणी पिणे यांचा समावेश करता येईल.

स्नायूंमध्ये पेटके आल्यास कोणते वैद्यकीय उपचार घ्यावेत?

» सर्वप्रथम तुम्ही करत असलेले काम थांबवा आणि पेटके आलेला भाग ताणण्याचा प्रयत्न करा, त्या भागाला मालिश करा.

» उष्णतेमुळे स्नायूला आराम मिळत असला तरी, वेदना वाढल्यास त्या भागावर बर्फ लावणे हितावह ठरते.

» स्नायूमध्ये अद्याप सूज असल्यास स्टिरॉईड-मुक्त, जळजळ न करणारी औषधं वेदनेपासून आराम देण्यात मदत करू शकतात.

» पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थाचं सेवन न करणे हे खेळताना स्नायूंमध्ये पेटके येण्याचं प्रमुख कारण आहे.

» बहुतेक वेळा, पाणी प्यायल्याने पेटक्यांना आराम पडतो. पण, कधी कधी फक्त पाणी पिणं पुरेसं ठरत नाही. अशा वेळी, शरीरातील खनिजांची हानी भरून काढणा-या सॉल्ट टॅब्लेट्स किंवा स्पोर्ट्स ड्रिंक्स घेणं उपयुक्त ठरतं.

स्नायूंच्या पेटक्यांपासून आराम देणा-या काही क्लृप्त्या :

» तुमच्या क्षमतेनुसार व्यायाम करा आणि त्यादृष्टीने आपल्या व्यायामामध्ये बदल करत राहा.

» व्यायाम करताना भरपूर प्रमाणात द्रव पदार्थाचं सेवन करत राहा आणि पोटॅशियमचे सेवन वाढवा (संत्र्याचा रस आणि केळी हा पोटॅशियमचा सर्वात मोठा स्रेत आहे.)

» लवचिकता वाढवण्याकरिता स्ट्रेचिंगचे व्यायाम करत राहा.

Read More »

फळांचा राजा आंबा

आंबा हे विषुवृत्तीय प्रदेशात आढळणारं झाड आणि फळ आहे. अवीट गोडीच्या या फळाला 'कोकणचा राजा' असं म्हणतात. एप्रिल ते जून हा या फळाचा मोसम आहे.

आंबा हे विषुवृत्तीय प्रदेशात आढळणारं झाड आणि फळ आहे. अवीट गोडीच्या या फळाला 'कोकणचा राजा' असं म्हणतात. एप्रिल ते जून हा या फळाचा मोसम आहे. असं असलं तरी आंब्याचा उगम नक्की कुठे झाला हे सांगता येत नाही. दक्षिण अणि दक्षिण पूर्व आशियामध्ये मोठया प्रमाणात जैववैविध्य पाहता इथेच उगम झाल्याचं मानण्यात येतं.

आंब्याला भारताच्या संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. आंबा हे भारत आणि पाकिस्तान देशांचं 'राष्ट्रीय फळ' तर बांगलादेशचं 'राष्ट्रीय झाड' आहे आणि फिलिपाइन्सचं 'राष्ट्रचिन्ह' आहे. भारतात आंब्याच्या हापूस, पायरी, तोतापुरी, केशर, फर्नाडिस, रायवळ इ. जाती आहेत. कच्च्या आंब्याला 'कैरी' असं म्हणतात, कैरीचा रंग साधारणपणे हिरवा असतो तर पूर्ण पक्व फळाचा रंग पिवळा, केशरी आणि लाल असा बदलता दिसून येतो.

ज्या बाजूला ऊन लागेल त्या बाजूला लाल रंग तर जी बाजू सावलीत असते तिथे पिवळसर रंग दिसतो. फळाच्या मध्यभागी चपटया, मध्यम आकाराची आणि लांबट कोय असते. आंबा हा वृक्ष सदारहित असतो. हे झाड अ‍ॅनाकार्डिएसी कुलातील असून त्याचं शास्त्रीय नाव मॅजिफेरा इंडिका आहे.

संस्कृतमध्ये 'आम' तर तमीळ भाषेत 'मानके' किंवा 'मानगास', इंग्रजीत 'मँगो' म्हणतात. आंब्याच्या गरात थायमीन, नायसिन, रिबोफ्लेवीन, पायरीडॉक्सीन असतं. तर खनिजांपैकी कॅल्शियम, तांब, लोह, मॅग्नेशियम, मॅगनीज आणि जस्त अधिक प्रमाणात असतं.

»  कोयीचा गर काढून चावून खाल्ल्यावर अजीर्ण, पोटदुखी, जुलाब आदी विकारांवर आराम मिळतो.

»  कोयीचे वाळलेले तुकडे चावून खाल्ल्यास आवेचे जंत नष्ट होतात.

»  ज्यांना गाडी, बस किंवा रेल्वेतून प्रवास करताना उलटी होते त्यांनी प्रवासादरम्यान आंब्याची पानं चघळावीत.

»  केसांत कोंडा किंवा खाज येत असेल त्यांनी आंब्याचा मोहोर, खोबरेल तेल आणि थोडं पाणी उकळून ते तेल टाळूला लावावं.

»  आंब्याच्या झाडाची आंतरसाल चघळल्याने दात बळकट होतात.

»  आंब्याची पानं सकाळी उठून चघळल्याने हिरडया मजबूत होतात. तसंच दातातून येणारं रक्त थांबतं.

»  नाकातून रक्त येणे, संडासवाटे रक्त जाणे, डोळ्यांची आग होणे, फुप्फुसे, आतडी, गर्भाशयातून रक्त वाहणे, अंगावरून पांढरं जाणं अशा रक्तपित्ताचा त्रास असलेल्यांनी आंब्याच्या आंतरसालीचं चूर्ण किंवा काढा सेवन करावा. आराम पडतो.

»  आंब्याची पानं चार कप पाण्यात उकळून ते पाणी एक कपभर आटवावं. हे पाणी गाळून बाटलीत ठेवावं. आणि डोळ्यांमध्ये ड्रॉप्स म्हणून वापरावं. म्हणजे डोळ्यांतून वारंवार पाणी येणे, सूज येणे, धूसर दिसणे, डोळे थकणे, रांजणवाडी आदी विकारांवर हे थेंब डोळ्यांत घातल्यास आराम पडतो.

»  कोवळ्या पानांचा लेप करून त्वचाविकारांवर लावल्यास आराम पडतो.

»  आंब्याच्या कोयीचं चूर्ण मुरगळणे, लचकणे, सूज येणे या समस्यांवरही गुणकारी आहे.

»  आंब्यात चरबी, सोडियम आणि कोलेस्टेरॉल नसतं. तसंच जीवनसत्त्व ए, बी, सी, ई, आणि केचं प्रमाण असतं. बी जीवनसत्त्व आपल्या शरीरात साठवून ठेवलं जात असल्याने सीझनमध्ये खाल्लेल्या आंब्यापासून त्याची साठवण शरीरात केली जाते.

» आंब्याच्या रेषायुक्त तंतूमध्ये डाएटरी फायबर्सचं प्रमाण अधिक असतं. म्हणूनच आंबा चोखून आणि रेषांसकट खावा.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe

No comments:

Post a Comment