Tuesday, March 24, 2015

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

स्त्रियांमधील जननेंद्रियाचा क्षय

वार्षिक तत्त्वावर जगभरात नोंदवल्या जाणा-या क्षयाच्या एकूण प्रकरणांपैकी एक पंचमांश प्रकरणे भारतातील असल्याने भारताला क्षयापासून सर्वात जास्त धोका आहे असं म्हणता येईल.

वार्षिक तत्त्वावर जगभरात नोंदवल्या जाणा-या क्षयाच्या एकूण प्रकरणांपैकी एक पंचमांश प्रकरणे भारतातील असल्याने भारताला क्षयापासून सर्वात जास्त धोका आहे असं म्हणता येईल. भारतात आढळणा-या क्षयामध्ये सर्वसाधारण क्षयाचा प्रकार हा फुप्फुसाच्या क्षयाचा असला तरीही दरवर्षी फुप्फुसाच्या क्षयाखेरीज इतर प्रकारचा क्षय होण्याचं प्रमाणही लक्षणीय आहे.

भारतात आढळणा-या स्त्रीरोगांच्या एकूण प्रकरणांमध्ये स्त्रियांमधील जननेंद्रियाच्या क्षयाचं प्रमाण एक ते दोन टक्के आहे. ओटीपोटातील संसर्गापैकी ५ टक्केसंसर्ग हे या आजाराची परिणती असतात आणि फुप्फुसांचा क्षय असलेल्या १० टक्केप्रकरणांमध्ये अशा प्रकारचा क्षय उद्भवत असल्याचंही लक्षात आलं आहे.

हा आजार प्रामुख्याने जननक्षम वयोगटातील स्त्रियांमध्ये आढळत असला, तरी रजोनिवृत्तीनंतरही अनेक स्त्रियांना हा आजार झाल्याचं आढळून आलेलं आहे. आजकाल या आजाराच्या प्रमाणात वाढ होत असल्याचं दिसून आलं आहे, याची कारणं पुढीलप्रमाणे आहेत.

कारणं

» लोकसंख्येतील वाढ

» एचआयव्ही संसर्गामध्ये झालेली वाढ

जननेंद्रियाचा क्षय हा सर्वसाधारणपणे फुप्फुसाच्या क्षयाची परिणती म्हणून होतो. फुप्फुसातील संसर्ग रक्तावाटे मूत्रमार्ग, जननमार्ग, हाडे आणि सांध्यापर्यंत पोहोचतो.

स्त्रियांना फुप्फुसांचा क्षय असेल तर अंडवाहिनीला संसर्ग होण्याचे प्रमाण १०० टक्के, गर्भाशयाच्या अंत:स्तराला संसर्ग होण्याचं प्रमाण ५० टक्के, अंडाशयाला संसर्ग होण्याचे प्रमाण २० टक्के, ग्रीवेच्या संसर्गाचं प्रमाण ५ टक्केतर योनी आणि बाहय़जननेंद्रियाला होणा-या संसर्गाचं प्रमाण एक टक्क्याहून कमी असतं.

» जननेंद्रियाचा क्षय असलेल्या जोडीदारासोबत संभोग केल्यास संसर्गाची थेट लागण होऊ शकते.

चिकित्सेचे स्वरूप कसं असतं?

स्त्रियांमधील जननेंद्रियाच्या क्षयाची लक्षणं सहज दिसून येत नसल्याने या आजाराचं निदान करणं अवघड असतं. तसंच हा आजार झालेल्या ६० टक्केस्त्रियांना वंध्यत्व येतं आणि ऊर्वरित रुग्णांना खालील लक्षणे जाणवतात -

» ओटीपोटातील वेदना

» मासिक पाळीच्या समस्या निर्माण होतात. (मासिक पाळीच्या स्रवाला दरुगध येणे किंवा मासिक पाळी थांबणे असे विकारही संभवतात.)

निदान

» एण्डोमेट्रियल बायोप्सी

» पाळीच्या रक्ताचा संवर्ध (कल्चर ऑफ मेन्स्ट्रअल ब्लड)

» लेप्रोस्कोपी

या उपाययोजनांनी फरक पडू शकतो

उपचार योजना

एटीटी किंवा रिस्टोरेटिव्ह सर्जरी अशा दोन शस्त्रक्रिया असतात. यांना जननक्षमतेत सुधारणा करणा-या शस्त्रक्रिया असंही म्हणतात. अशा एटीटी शस्त्रक्रियेचा पूर्ण कोर्स करून आणि सुयोग्य अशी रिस्टोरेटिव्ह सर्जरी करून जननमार्गाचे कार्य पूर्ववत करता येऊ शकते.

जननेंद्रियाचा क्षय झालेल्या स्त्रीयांनी संपूर्ण उपचार योजना घेणं आवश्यक असतं. मात्र कोर्स पूर्ण केल्यावरही त्यांना गर्भधारणा होण्याची शक्यता अतिशय कमी असते. या स्त्रियांना बहुतेक वेळा एआरटी/आर्टची मदत घ्यावी लागते. आयव्हीएफ उपचार योजनेनेही अशा स्त्रियांना आशेचा किरण दाखवलेला आहे.

Read More »

ऑफिसमधलं जेवण

जेवणाचा डबा हा ऑफिसवाल्यांसाठी आवश्यक बाब आहे. तो जवळ बाळगला तरीही तो खाण्याच्या वेळा कित्येकदा अनियमित असतात. ऑफिसचा जेवणाचा डबा कसा असावा, जेवणाचे नियम ऑफिसमध्ये कसे पाळावेत हे जाणून घ्यायला हवं.

प्रत्येक जण कुठे ना कुठे काम करतं. काही जणांच्या शिफ्ट असतात. त्यामुळे कित्येक जण सकाळी, तर कित्येक जण रात्रपाळी करतात. अनेकांना दुपारची मधली शिफ्ट असते. त्याचा परिणाम आपल्या जेवणावर होतो.

जेवणाच्या वेळा बदलतात. कित्येकदा तर कामाच्या व्यापामुळे जेवणाची वेळही उटलून जाते. मग कित्येकदा जंग फुडलाच प्राधान्य दिलं जातं किंवा कॅन्टीनकडे मोर्चा वळवला जातो.

कधी कधी एकीकडे काम आणि एकीकडे जेवण करता येईल असा काहीसा डबा आणला जातो. मात्र या सगळ्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. म्हणूनच ऑफिसमध्ये असताना जेवणाच्या साधारण काय वेळा पाळाव्यात किंवा आहार कसा असावा हे जाणून घेऊया.

» चहा किंवा कॉफीने तरतरी येते, मरगळ दूर होते म्हणून कित्येक जणांना ऑफिसमध्ये कामाला सुरुवात करताना प्रथम चहा किंवा कॉफी प्यायची सवय असते. कित्येक जण दर एक दोन तासाने चहा-कॉफीचं सेवन करतात. मात्र यातील टॅनीन या घटकाने आपल्या आरोग्यावर परिणाम होतो हे कोणाच्या लक्षात येत नाही. कॅफीनमुळे रात्रीची झोप उडते, अ‍ॅसिडिटी वाढते. म्हणून दोनपेक्षा अधिक वेळा दिवसातून चहा किंवा कॉफीचं सेवन करू नये.

» अलीकडे कित्येक कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये कामाचे तास वाढले आहेत. त्यामुळे दुपारचं जेवण झाल्यावर संध्याकाळी भूक लागते. अशा वेळी कॅन्टीनकडे मोर्चा वळतो. मग अरबट-चरबट पदार्थाचं सेवन केलं जातं. रस्त्यावरील जंक फुडला प्राधान्य दिलं जातं.

» संध्याकाळच्या भुकेसाठी जवळ एखादा लहानसा बिस्किटचा पुडा, सुकामेवा, फराळचे घरगुती पदार्थ किंवा एखादं फळ जवळ बाळगावं. तसंच कुरमुरे, चणे, घरी केलेला उपमा, शिरा, इडली, शंकरपाळे असे पदार्थ खावेत. म्हणजे बाहेरच्या जंक फुडला चाप बसेल. कित्येक जण वेफर्स, चिवडा, फरसाण डब्यातून आणतात. मात्र असे पदार्थ आवश्यकतेपेक्षा अधिक खाल्ले जातात. नको असताना त्यांचं सेवन केल्यामुळे त्यांचं नीट पचन होत नाही. म्हणून भूक लागली असेल तरच या पदार्थाचं सेवन करावं.

»कित्येकदा ऑफिसमध्ये मधल्या वेळेत खाण्यासाठी बटाटावडा, भजी, समोसे असे पदार्थ खाण्याची सवय असते. बाहेरच्या पदार्थामध्ये तेलाचा दर्जा कसा असतो याचा अंदाज येत नाही. असे तेलकट पदार्थ अपचन किंवा अ‍ॅसिडिटीसारख्या आजारांना आमंत्रण देतं. मुख्य म्हणजे शरीरात आळस निर्माण होतो आणि सुस्ती येते. कामात लक्ष लागत नाही. मन एकाग्र होत नाही. त्याचा परिणाम कामावर होतो. म्हणून अशा पदार्थाचं सेवन टाळावं.

» कित्येकदा व्यवसायाच्या निमित्ताने अनेक मीटिंग्जला जाणं होतं. अशा वेळी तिथे जेवण किंवा काही पदार्थ खाल्ले जातात. अशा वेळी भरमसाट खाणं टाळावं. एक तर ते तुमच्या शिष्टाचाराला शोभणार नाही आणि त्याचा आरोग्यावर परिणाम होईल. त्यामुळे दुपारनंतर म्हणजे डबा खाऊन जाणार असाल तर अशा वेळी खाणं टाळलेलंच योग्य. अगदीच आग्रह होत असेल तर ज्यूसला प्राधान्य द्यावं.

» बरेचदा लवकर घर सोडलं जातं आणि कामावरून उशिरा घरी परतणं होतं. अशा लोकांनी तर आपल्या डब्यातून चौरस किंवा समतोल आहार कसा मिळेल याचा विचार करावा, डब्यात भाजी, पोळी आणि सलाडचा समावेश करावा. सलाड जेवण्याच्या वेळी नको असेल तर तो डबा संध्याकाळच्या वेळी ठेवावा. फळांच्या फोडी किंवा स्नॅक्स संध्याकाळच्या वेळी घ्यावेत. वाटल्यास एखादी पोळी किंवा पराठादेखील तुम्ही नंतर खाऊ शकता.

» रात्रपाळीच्या लोकांनी शक्य असल्यास घरी संपूर्ण जेवूनच जावं. वरण, भात, भाजी, पोळी आणि एखादं फळ असा आहार नियमित घ्यावा. रात्रीच्या वेळी भूक लागत असल्यास जवळ एखादं फळ ठेवावं म्हणजे आराम मिळतो.

» सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑफिसमध्ये जेवणाच्या वेळा पाळाव्यात. काही ठिकाणी जेवणाची वेळ निश्चित नसते अशा वेळी कधीही डबा खाल्ला जातो. मात्र प्रत्येकाने स्वत:च्या जेवणाची एक ठरावीक वेळ निश्चित करून घ्यावी. त्या वेळेला नियमित जेवण होईल याकडे लक्ष द्यावं.

» बरेचदा ऑफिसमध्ये काही कारणाने पार्टी आयोजित केली जाते. अशा वेळीदेखील आपल्या आहाराकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. म्हणजे अति तेलकट किंवा अति मसालेदार पदार्थ खाणं व्यर्जच करावं. त्यामुळे शरीराला हानी होत नाही. अति मसालेदार पदार्थ खाल्ल्याने त्याचा त्रास होतो. परिणामी अपचन होते.

» उन्हाळ्याच्या दिवसात दुपारच्या वेळी शक्य असल्यास ताक, दही, लस्सी किंवा थंड दुधाचा आहारात समावेश करता आला तर उत्तम. शरीर थंड राहाण्यास मदत होते.

Read More »

थुंकणे आवरा, क्षयरोग टाळा

प्राचीन काळापासून भारतीयांना असलेली थुंकण्याची सवय अजूनही कायम आहे. यासाठी कितीही कायदे केले आणि दंड आकारला तरीही त्याचा फारसा परिणाम जाणवत नाही.

प्राचीन काळापासून भारतीयांना असलेली थुंकण्याची सवय अजूनही कायम आहे. यासाठी कितीही कायदे केले आणि दंड आकारला तरीही त्याचा फारसा परिणाम जाणवत नाही. परंतु, यामुळे क्षयरोग होण्याचा वाढलेला धोका, ही आणखी चिंतेची बाब आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्याच्या प्रमाणात बरीच घट झाली असली तरी सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याची सवय जाता जात नाही.

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा सामाजिक गुन्हा घोषित करण्याची वेळ आता येऊन ठेपली असून, सामान्य नागरिक, चालक आणि पान, खर्रा खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकून कळत नकळत क्षयरोगाला निमंत्रण देणा-यांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचीदेखील नितांत गरज आहे.

थुंकण्यातून मोठय़ा प्रमाणात पसरणा-या या रोगाला प्रतिकार करायचा तर थुंकण्यावर बंदी हवीच, अशी परखड प्रतिक्रिया मुंब्रा येथील कालसेकर हॉस्पिटलचे चेस्ट फिजिशियन (क्षयरोग तज्ज्ञ) डॉ. संदीप मिस्त्री यांनी व्यक्त केली.

वैद्यकीय क्षेत्रात क्षयरोग (टी.बी.) नियंत्रणात राहावा, यासाठी सतत संशोधन सुरू आहे. असं असलं तरी क्षयरोगाचं समूळ उच्चाटन करण्यात डॉक्टरांना अद्याप यश आलं नाही. त्यामुळे भारतात प्रत्येक मिनिटाला दोन जणांना क्षयरोगाची लागण होते आणि दर दीड मिनिटाला एका रुग्णाचा बळी जात असल्याचं समोर आलं आहे.

२४ मार्च १८८२ रोजी डॉ. रॉबर्ट कॉक यांनी टी.बी.च्या जंतूंचा शोध लावला. तेव्हापासून २४ मार्च हा दिवस जागतिक टी.बी. दिन म्हणून पाळण्यात येतो.

क्षयरोगाची जास्तीत जास्त नागरिकांना माहिती व्हावी, यासाठी या दिवशी विशेष प्रयत्न केले जातात. भारतात प्रत्येक मिनिटाला दोन व्यक्ती क्षयरोगाने बाधित होतात, तर दरवर्षी सुमारे चार लाख रुग्ण क्षयरोगामुळे मृत्युमुखी पडत आहेत.

जागतिक आरोग्य संस्थेच्या अंदाजानुसार सन २०२० मध्ये जगातील अंदाजे एक अब्ज नागरिक क्षयरोगाने त्रस्त असतील. याविषयी अधिक माहिती देताना वाशी येथील स्टर्लिग वोक्हार्ट हॉस्पिटलचे अतिदक्षता विभागाचे फिजिशियन डॉ. अक्षय छल्लाणी सांगतात, 'जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल हेही सांगतो की, प्रत्येक वर्षी भारतात जवळपास तीस लाख लोकांना क्षयरोगाची लागण होते, त्यांची आरोग्य व्यवस्थेमध्ये नोंदच होत नाही. याचं प्रमुख कारण म्हणजे एक तर रोगाचं निदान होणं किंवा रोगाचं निदान होऊनही नोंद न करणे.

सरकारी आकडय़ांनुसार भारतात दरवर्षी क्षयरोगाच्या १९ लाख नवीन केसेस नोंदवल्या जातात. संपूर्ण जगात भारतामध्ये क्षयरोगाची सर्वात जास्त रुग्णसंख्या आढळते.

बसमधून प्रवास करताना, दुचाकीवरून जाताना मागेपुढे न पाहता किंवा सिग्नलवर गाडीचे दार उघडून पिचका-या मारणारे महाभागही आपण बरेच बघितले असतील. हा फक्त किळसवाण्या प्रकारापुरता विषय नसून, क्षयरोग होण्याचे (टीबी) हेच एक मुख्य कारण असल्याचे नुकतेच एका संशोधनामार्फत समोर आलं आहे.'

मुंब्रा येथील कालसेकर हॉस्पिटलचे चेस्ट फिजिशियन( क्षयरोग तज्ज्ञ) डॉ. संदीप मिस्त्री यांच्या मते, ज्या व्यक्तीला क्षयरोग (टी.बी.) असेल तो माणूस बोलला, थुंकला किंवा शिंकला तरी त्याच्या शरीरातील क्षयाचे जंतू बाहेर पडतात आणि हवेद्वारे जवळ असलेल्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात व त्या निरोगी व्यक्तीला क्षयजंतूंचा संसर्ग होतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीची रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्यास अशा व्यक्तींना क्षयरोगाची लागण होते.
एखाद्या व्यक्तीला सतत दोन आठवडय़ांपेक्षा जास्त काळ खोकला असणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप, छातीत दुखणे, रात्री घाम येणे अशी लक्षणे आढळल्यास शारीरिक तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

केस आणि नखं वगळता शरीरातील कोणत्याही भागात क्षयरोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. क्षयांच्या चारपैकी तीन रुग्णांना फुप्फुसाचा क्षयरोग असतो. तर उरलेल्यांमध्ये फुप्फुसांचं आवरण, मज्जासंस्था, लसिकाग्रंथी, जननसंस्था, उत्सर्जन संस्था, अस्थिसंस्था इत्यादी ठिकाणी प्रादुर्भाव होतो. नवीन क्षयरोग्यांनी सुरुवातीचे सहा महिने डॉक्टर्सची औषधे व्यवस्थित घेऊन तपासणी दिलेल्या वेळेत केल्यास हा आजार १०० टक्के पूर्ण बरा होतो.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe