Monday, May 20, 2013

PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS घर-अंगण

PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » घर-अंगण
पक्ष्यांचाही उन्हाळा करू सुसह्य!

झाडांमध्ये घरटं करून राहणा-या पक्ष्यांचे मधुर स्वर हीच त्यांची प्रथमत: ओळख असते. त्यांचा सुरेल आवाज आपल्या कानी पडला की, त्यादिशेने आपण त्यांचा शोध घेत राहतो. यंदाच्या उन्हाच्या काहिलीने आपल्याप्रमाणेच त्यांचा जीवही कासावीस होत असेल, त्यांचे स्वरही कोरडे पडले असतील. त्यांच्या स्वरांची मधुरता त्यांना देऊ करण्यासाठी गरज आहे, आपल्या छोटयाशा इच्छाशक्तीची! त्यांचा उन्हाळाही सुसह्य करण्यासाठी सोय करूयात त्यांच्या खाऊ-पाण्याची!

उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढतच चालला आहे. उष्माघाताने माणसांचे बळी जाऊ लागलेत. विचार करा, ही अवस्था आपल्यासारख्या सजीवांची, तर त्या बिचा-या पशु-पक्ष्यांचं काय होत असेल. आपण उन्हाची काहिली कमी व्हावी म्हणून दिवसभर खाण्या-पिण्यातून नवनवीन प्रयोग करत असतो. कधी आइस्क्रीम, कुल्फीसारखे थंड पदार्थ खा, कधी ज्युस प्या, कधी शॉवर घ्या, कधी एसीत बसा, कधी थंड हवेच्या ठिकाणी जा.. अशा एक ना अनेक उपायांची सरबत्ती सुरू असते. पण हे पक्षी मात्र कधी तोडक्या-मोडक्या आपल्या घरटयात विसावतात, तर कधी एखाद्या पाण्याच्या डबक्यात, तर कधी अगदीच खड्डयात साचलेल्या सांडपाण्यातच काय तो शरीर थंड करण्याचा प्रयोग करत असतात. सध्या दुष्काळाची परिस्थिती आपणा कोणासाठीच नवीन नाही. इथे धरणं आटली तर या छोटया-छोटया डबक्यांची काय बात!
पण मित्रहो, आपणातला संवेदनशील माणूस याप्रसंगी जागा न झाला तरच नवल!, या मुक्या पक्ष्यांसाठी आपण आपल्या घराजवळ खाण्या-पिण्याची सोय सहज करू शकतो. त्यासाठी अगदी १५-२० मिनिटे खर्ची घालावी लागतील एवढंच! आठवा ते एखादं झाडं, ज्याने तुम्हाला भर उन्हातही सावलीचं सुख देऊन कधीतरी सुखावलं असेल. झाडाच्या त्याच निसर्गभावनेने आपण आपल्यातली माणुसकी जागवू या आणि हा छोट्टयाशा प्रयत्नाने त्या मुक्या पक्ष्यांनाही सुखावण्याचा आनंद देऊयात.
या फोटोत दिसणा-या चित्राप्रमाणेच आपल्या अंगणात, घराच्या खिडकीत किंवा अगदी गॅलरीतही आपण पक्ष्यांसाठीच्या खाऊची सोय करू शकतो, कसं ते पाहा.
एका प्लॅस्टिकच्या बाटलीचा वापर करून पक्ष्यांसाठी दाण्यांच्या खाऊचं कोठारच तयार करू. प्लॅस्टिकच्या बाटलीला काही अंतरावर एकाखाली एक अशी दोन छिद्रे करा. दोन वेगवेगळ्या दिशांना चमचे राहतील अशा तऱ्हेने ते चमचे बाटलीत बसवा. वरून पक्ष्यांना द्यायचे धान्य त्या बाटलीत ओता. जसजसे पक्षी ते धान्य खातील तसतसे थोडे थोडे धान्य त्या चमच्यांमध्ये येईल आणि पक्षी ते धान्य सहज खाऊ शकतील. रोज त्या बाटलीत थोडे थोडे धान्य टाकत राहा. एवढा वेळही नसल्यास अ‍ॅक्वेरिअम शॉप्समध्ये जिथे पक्ष्यांचे पिंजरे विक्रीसाठी दालनात लटकवलेले असतात, अशा ठिकाणी अशा रेडिमेड बाटल्या मिळू शकतील.
आता या पक्ष्यांना आपण खाऊ तर दिला, पण पाणीही द्यायला हवं ना. उन्हात आपलीच अवस्था कशी सारखी तहान-तहानलेली होते. मग त्यांना किती तहान लागत असेल बरं?! म्हणूनच एका भांडयात पाणी भरून ते भांडे गॅलरीच्या कट्टयावर, कुंडयांच्या स्टँडवर, खिडकीजवळ किंवा अगदी दाराजवळही ठेवू शकता. पण अंगणात किंवा दाराजवळ असं भांड ठेवल्यास होतं काय की, जेव्हा पक्षी पाणी प्यायला येतात, तेव्हा मांजरी-बोके त्यांच्यावर हल्ला करतात, त्यासाठीच शक्यतो ते भांड हँगिंग स्वरूपात ठेवण्याचा प्रयत्न करा. किंवा एखाद्या टेबलावर उंचावरही ठेवता येतं. इथेही सजावटीच्या तुमच्या कल्पकतेला वाव आहेच.
फक्त एक लक्षात ठेवा की, ते भांड खोलगट नव्हे तर पसरट असावं. नाही तर त्या पक्ष्यांची अवस्था आपल्या गोष्टीतल्या कावळ्यासारखी व्हायची! दुसरी गोष्ट अशी की, अनेकदा कावळा हा पक्षी भाकरीसारखं एखादं अन्न त्या पाण्यात बुडवून खातो. त्यामुळे ते पाणी खराब होतं. शिवाय सतत भांडयात पाणी राहिल्याने शेवाळाचीही निर्मिती होते. त्यामुळेच पाणी वेळोवेळी बदलत राहावं व भांडंही स्वच्छ ठेवावे.
आतापर्यंत अनेक सामाजिक कार्यातून खूप बक्षिसं कमावली असतील, आज मात्र या मुक्या पक्ष्यांचे नि:शब्द आशीर्वाद मिळवू..


Read More »

किचन आग्नेय दिशेला असावे का?

पूर्वी स्वयंपाकघर केवळ जेवण बनविण्यासाठी वापरलं जाई. धुणी-भांडी, धान्य साठवण, पाण्याची भांडी या सर्वासाठी स्वतंत्र जागा असे. त्यामुळे आग्नेयला अग्नी अर्थात स्वयंपाकस्थान असावं, त्यातूनच आग्नेय दिशेला किचन असावं, असा समज दृढ झाला. मात्र अनेक वापरांसाठी असलेलं आजचं आग्नेय दिशेचं किचन हे योग्य आहे का?
वास्तुशास्त्राच्या समजुतीनुसार घराचं स्वयंपाकघर हे आग्नेय दिशेला असावं. पूर्वीच्या काळी ही संकल्पना मांडली गेली तेव्हा स्वयंपाकघरांमध्ये अग्नी प्रज्वलित होत असे. आजच्यासारखा पाण्याचा फारसा वापर होत नसे. वर्षभर लागणारी धान्यं, मसाले, तेल-तूप इत्यादी पदार्थ हे या किचनमध्ये न ठेवता वायव्य दिशेला असलेल्या साठवणीच्या जागेमध्ये ठेवले जायचे. पिण्याच्या पाण्याची भांडी आणि भांडी घासण्याची जागा ही घरासमोरील अंगणात ठेवली जायची.
प्राचीन संकल्पनांनुसार वास्तुनिर्मिती 
सध्याच्या काळात जी घरं किंवा फ्लॅट बनवले जात आहेत त्यामध्ये स्वयंपाकघरामध्येच साठवणीची जागा असते. पाण्याची भांडीही किचनच्या कट्टय़ावर ठेवली जातात. खरकटी भांडी घासण्यासाठीही सिंकचा वापर केला जातो. अनेक घरांमध्ये भांडी धुण्यासाठी किचनच्या छतावर एक छोटी सिंटेक्सची टाकीही बसवली जाते. किचनमधून बाहेर पडणा-या सांडपाण्याचा निचरा व्हावा म्हणून जमिनीमध्ये त्याचा चेंबर बनवला जातो. अशा प्रकारे आज किचनमध्ये अग्नीबरोबरच पाण्याचाही भरपूर वापर केला जातो. त्याचबरोबर पाण्याचा निचरा होण्यासाठी आग्नेय दिशेला चेंबरस्वरूपात खड्डाही खणला जातो. अशा स्थितीमध्ये किचन आग्नेय दिशेला असणं योग्य आहे का?
जेव्हा आग्नेय दिशेला पाण्याची खूप साठवण केली जाते तेव्हा तिथे राहणा-या व्यक्तीच्या आर्थिक विकासाला बाधा पोहोचू शकते असं मानलं जातं.
जर किचनला लागूनच स्टोअररूम असेल तर त्या कुटुंबातील सदस्यांना आपल्या करिअर किंवा व्यवसायात अडथळे येऊ शकतात. भविष्यासाठी हाती पैसा उरत नाही असं वास्तुसंकल्पनांप्रमाणे मानलं जातं.
पूर्व आग्नेय दिशेला कोणत्याही प्रकारचा खड्डा हा भांडण, विवाद, कलह यांसाठी कारण बनू शकतो.
स्वयंपाकघर हे आग्नेय दिशेलाच असले पाहिजे ही समजूत अनेक वास्तुशास्त्रतज्ज्ञ ब-याच काळापासून लोकांच्या मनात ठसवत आले आहेत. परंतु असं काही नाही.
बदलत्या काळानुसार, गरजेनुसार किचन वेगवेगळ्या दिशांना बनवलं तर त्याचा प्रभाव कसा पडतो ते पाहू..
ईशान्य दिशा - ईशान्य दिशेला जर किचन असेल तर वास्तुसंकल्पनांनुसार कुटुंबातील सदस्यांना यश मिळतं.
पूर्व दिशा - ज्या घराचं किचन पूर्व दिशेकडे असतं त्या घरात पैशाची आवक चांगली राहते, परंतु घरातील सगळी जबाबदारी पत्नी सांभाळत असूनही तिच्या आनंदी वृत्तीत किंचित विघ्न येऊ शकतात, असं मानलं जातं.
आग्नेय दिशा - आग्नेय दिशेतील किचन हे सगळ्यांत शुभ मानलं जातं. या दिशेतील किचनमुळे घरातील स्त्रिया या खूप आनंदी राहतात. सगळ्या प्रकारची सुखं मिळतात. आणि किचनमध्ये घराच्या मालकिणीची सत्ता चालते.
दक्षिण दिशा - दक्षिण दिशेला किचन असेल तर घरात मानसिक अस्वस्थता सतत जाणवत राहते. त्याचबरोबर घराच्या मालकाला सतत राग अनावर होतो आणि त्यामुळे त्याचं स्वास्थ्य सतत बिघडत राहतं.
नैऋत्य दिशा - ज्या घरात किचन नैऋत्य दिशेला असतं त्या घराची मालकीण ही अतिशय उत्साही आणि रोमॅण्टिक असते, परंतु मालक मात्र तिला फारसा वेळ देऊ शकत नाही त्यामुळे दोघांमध्ये थोडया कुरबुरी होऊ शकतात.
पश्चिम दिशा - पश्चिम दिशेला जर किचन असेल तर त्या घरातील सगळे व्यवहार घराची मालकीण पाहते. तिला आपल्या लेकीसुनांचं चांगलं सुख मिळतं. कुटुंबातील सगळ्या महिलांमध्ये चांगले संबंध असतात. परंतु या किचनमध्ये नेहमीच जरुरीपेक्षा जास्त खाद्यपदार्थ बनवले जातात आणि त्यामुळे अन्न वाया जातं किंवा ते वाटावं लागतं.
वायव्य दिशा – ज्या घरातील किचन हे वायव्य दिशेला असतं त्या घराचा कर्ता पुरुष हा अतिशय रोमॅण्टिक असतो आणि त्याला भरपूर मैत्रिणी असतात. परंतु घरातील मुलीला बदनामीच्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं.
उत्तर दिशा – उत्तर दिशेला किचन असणा-या घरातील स्त्रिया या बुद्धिमान आणि प्रेमळ असतात. या घरातील पुरुषही प्रामाणिकपणे आणि सचोटीने नोकरी-व्यवसाय करून चांगला पैसा कमावतात.
थोडक्यात पश्चिम आणि उत्तर दिशेला असणा-या किचनचे परिणाम खूप चांगले पाहायला मिळतात. त्यामुळे किचन बनवताना मध्य-पश्चिम किंवा मध्य-उत्तर दिशेला बनवलं तर येथे पाणीही भरपूर प्रमाणात साठवता येतं. तसंच पश्चिम दिशेचा सांडपाण्याचा पाइप हा सहजपणे उत्तर दिशेला वळवता येऊ शकतो, जेथे चेंबर बनवला जाऊ शकतो. आणि उत्तर दिशेतील चेंबर हा वास्तूसाठी अनुकूल असतो. त्यामुळे आजच्या काळात किचन हे आग्नेय दिशेलाच असलं पाहिजे हा अट्टहास आता कमी केला पाहिजे.

Read More »

एसीचा गारवा अनुभवताना..

सध्या टीव्हीच्या रिमोटपेक्षाही आपल्या हातात कोणता रिमोट आधी येत असेल तर तो एअर कंडिशनरचा! ऑफिसातल्या एसीची तर आपल्याला सवयच झालेली असते. मात्र, वाढत्या उन्हामुळे घरातही सतत एसी हवासाच वाटत असतो. या मोसमात सुखद गारवा देणारा एसी शेवटी एक कृत्रिम हवेचा स्रेतच. त्यामुळे हे यंत्र विनातक्रार सुरू राहण्यासाठी देखभाल महत्त्वाची!

यंदाच्या उन्हाळ्याचा तडका आपण अनुभवतो आहोतच. उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी जिथे म्हणून गारवा अनुभवता येईल, त्या प्रत्येक क्षणांच्या शोधात आपण असतो. आपल्याला हव्या त्या क्षणी काहीशा खर्चाने असं सुखद गारवा देणारं वातानुकूलित यंत्र अर्थात एसीने सध्या घराघरात आपल्या थंडगार वा-याच्या झडपा उघडल्या असतीलच. उन्हाळ्यात क्वचितच हा एसी बंद होत असेल. मात्र, सततचा वापर करताना ऐन उन्हाळ्यात या यंत्राने आपल्याला धोका देऊ नये, असं वाटत असल्यास योग्य वेळी योग्य ते उपाय करायला हवा,
घरात एसी बसवताना तो किती टनाचा एसी हवा हे घराची जागा तसंच सूर्यप्रकाशाची तीव्रता यावर अवलंबून असतं. तो योग्य ठिकाणी बसवला जाणंही गरजेचं आहे. एसीसाठी स्वतंत्र इलेक्ट्रिकल पॉइंट्सची आवश्यकता असते. त्याशिवाय आगीपासून बचावासाठी मिनिएचर सर्किट ब्रेकरचीही गरज असते. खिडकीत बसवायचा एसी खिडकीतल्या चौकटीत व्यवस्थित बसायला हवा नाही तर पावसाळ्यात लिकेजचा त्रास होऊ शकतो. अशा प्रकारचा एसी हा रूमच्या मधोमध उंचीवर अथवा उंचावर असावा म्हणजे संपूर्ण रूममध्ये हवा खेळती राहू शकते. एसीचं आयुष्य वाढवायचं असल्यास वेळोवेळी सव्‍‌र्हिसिंग करून कॉइल्स साफ करायला हव्यात.
समुद्रकिना-याजवळील परिसरात एसी लवकर खराब होतो. धूळ आणि हवा दोन्हींमुळे एसीची कॉइल जाम होऊ शकते. एसीच्या विरुद्ध दिशेने येणा-या वा-यामुळेदेखील मोटर डॅमेज होऊ शकते. एसीमध्ये वेदर गार्ड बसवून घेतल्यास एसीचे आयुष्य वाढू शकते. विजेच्या भारनियमनामुळे एसीची कार्यक्षमता कमी होते. अशा विभागांमध्ये वोल्टेज स्टॅबिलायझर बसवणं आत्यंतिक महत्त्वाचं आहे. विजेचा दाब कमी झाल्यास एसी रिमोट कंट्रोलने बंद न करता मेन स्विच बंद करावा. एसीच्या कुलिंग टॉवरमधील पाणी खराब अथवा हार्ड वॉटर असल्यास एसीचे आयुष्य कमी होते. त्यासाठी फ्लिटरेशन किंवा सॉफ्टनिंग प्लान्ट बसविणं गरजेचं आहे. दैनंदिन वापरातील एकूण विजेच्या ६०-७० टक्के वीज ही एसीसाठी जाते. त्याची योग्य काळजी न घेतल्यास यात १०-२० टक्क्यांची वाढ होऊ शकते.
एसी वापरतानाही विजेची बचत व्हावी यासाठी..
>एसीच्या फिल्टरची आठवडयातून एकदा तरी तपासणी व्हायला हवी.
>रूममधील तापमान विशिष्ट सेल्सिअसवर गेल्यास एसी आपोआप बंद होतो, का ते पाहावे.
>एसीच्या ट्रेमध्ये पाणी जमून राहते का ते पाहावे.
>वर्षातून दोनदा एसीची सव्‍‌र्हिसिंग व्हायला हवी.
>काही एसीमध्ये एनर्जी सेव्हिंग फिचर्स असतात उदा. फॅन, चेंज फिल्टर इंडिकेशन्स किंवा ऑटोमॅटिक टायमर्स इ.
>एसी लावल्यानंतर थोडा वेळ सिलिंग फॅन लावल्यास हवा खेळती राहू शकते. १० सें.ने तापमान कमी होण्यासही मदत होते.
>चांगली हवा असल्यास एसी बंद करावा. अगदी गरम होत असेल तरच एसी चालू करावा.
>असह्य उकाडयात रूमचे पडदे लावून घ्यावेत. अन्यथा बाहेरच्या कडक सूर्यप्रकाशामुळे कॉम्प्रेसरवर जास्त भर पडू शकतो.
>स्विचला एसीची जोडणी केलेली असताना एसीचे फिल्टर साफ करू नये.
>रोज किमान दहा मिनिटे तरी एसी लावायला हवा.
>झोपण्याच्या बेडच्या अगदी वर एसी लावता कामा नये.

Read More »

सजावटीचं संतुलन!

घर सजवण्याचा उत्साह तर खूप असतो, त्यासाठी भारंभार वस्तूंची खरेदीही केली जाते. पण एवढं करूनही सजावट काही मनासारखी होत नाही, हे शल्य अनेकांच्या मनात असतं. याला एकच कारण आहे की, या सजावटीचं संतुलन चांगल्या प्रकारे केलं गेलेलं नसतं. कोणतीही वस्तू कुठेही ठेवली की, सजावट होत नाही. उलट अशी मांडणी चांगल्या घराच्या सजावटीचा तालही बिघडवू शकते. सजावट करताना त्यातल्या वस्तूंचं संतुलन कसं करता येईल? त्यासाठी कोणत्या सोप्या आणि साध्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे याविषयी..

सीमाचं घर भलं मोठ्ठं, त्यात सजावट करायची तिला हौस. कुठे जाईल तिकडून काहीतरी नवीन वस्तू घरासाठी घेतलीच पाहिजे, असा नियम. त्यामुळे घरात सजावटीच्या वस्तू ब-याच पण तरीही तिला कायम वाटायचं की, एवढय़ा वस्तू आणूनही घर काही मनासारखं सजवता येत नाही. काहीतरी कमी पडतंय. घरातला दिवाणखाना तर सजावटीच्या दुकानाप्रमाणे वाटायला लागलाय, असं तीच बोलून दाखवायची. नंतर तिने इंटेरिअर करणा-या आपल्या एका मैत्रिणीचा सल्ला घेतला. त्यानुसार सजावट करताना कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या टाळायच्या याच्या काही टिप्स तिने घेतल्या. त्याप्रमाणे सजावट केल्यावर तिला आपलंच घर नव्याने सजवायला आनंद वाटू लागला.
ब-याच जणांचं असंच होतं. दिसली चांगली शोभेची वस्तू की घेऊन टाक, असं ते करतात. त्यामुळे घर शोपिसेसचं दुकान वाटू लागतं. भारंभार वस्तू आणल्या म्हणजे घराची सजावट चांगली होत नाही, तर त्या कशा पद्धतीने लावल्या आहेत, यावर बरंच काही अवलंबून असतं. 'सजावटीचं संतुलन' म्हणतात ते यालाच! सजावट एका विशिष्ट धोरणाने केली तर त्याची रंगत काही औरच. अशी सजावट करताना काही अगदी साध्या आणि सोप्या गोष्टींवर लक्ष दिलंत तरी यातले बरेच प्रश्न सुटू शकतात. त्यासाठी थोडी सौंदर्यदृष्टी आणि बरीचशी तंत्रं माहीत असायला हवीत.
ज्या ठिकाणी सजावट करायची आहे, तिथे कोणत्या वस्तू सजवायच्या आहेत त्या आधी बाजूला काढा. त्यातल्या कोणत्या त्या ठिकाणी चांगल्या दिसतील, याचा अंदाज घ्या. त्या ठिकाणची सजावट नसर्गिक वाटावी, असं वाटत असेल तर कोणत्याही गोष्टी तीनच्या समूहात लावाव्यात. हा सौंदर्यशास्त्राचा एक नियम आहे. जसं की कँडल किंवा फुलदाणी, फोटोफ्रेम यांनी सजावट करायची असल्यास त्या तीन किंवा दुस-या विषम संख्येत घ्याव्यात. मोठय़ा वस्तू मागे लावून लहान आकाराच्या वस्तू पुढे लावा. जसं की, भिंतीवर फोटोफ्रेम लावल्या की आधी मोठय़ा आकाराच्या कँडल लावा, त्यानंतर त्यापेक्षा कमी उंचीचा फ्लॉवरपॉट त्यासमोर ठेवा. भिंतीवर फोटोफ्रेम लावायची नसेल तर ती फ्लॉवरपॉटच्या पुढे ठेवा. एका आडव्या पट्टीत या वस्तू ठेवायच्या असतील तर एका बाजूला कँडल स्टँड, मधे फोटोफ्रेम आणि दुस-या बाजूला फ्लॉवरपॉट ठेवू शकता.
ज्या ठिकाणी सजावट करायची आहे, तिथे कोणत्या प्रकारचं फर्निचर उपलब्ध आहे, याचा आधी अंदाज घ्या. जसं की हॉलमध्ये एकसारखे दोन टी पॉय असतील तर दोन्हीवर समान सजावट करा. एकसारखे फ्लॉवरपॉट आणि फुलंही सारखीच लावा. सोफ्यावर एकसारख्या, एकाच आकाराच्या उशा ठेवा. बेडरूममध्येही हाच नियम लागतो. एकसारखे कुशन ठेवल्याने एक वेगळाच गेटअप येतो. कुशन्समध्ये तुम्ही विविधता आणू शकता. त्यात फ्लोरल डिझाइन, स्ट्रिप्स किंवा ट्रँगल अशा आकाराच्या कुशन कव्हरचा वापर करता येईल. मात्र या कुशन्स एका पॅटर्नमध्ये लावा. आधी फ्लोरल, मग स्ट्रिप्स आणि नंतर ट्रँगल असा पॅटर्न एका ठिकाणी लावला तर दुसरीकडेही तसाच फॉलो करा. तुमचं बजेट जास्त नसेल तर एकाच प्रकारच्या कुशन घेण्यापेक्षा वेगवेगळ्या आकारातल्या कुशन घ्या. त्याला घरात पायपीन किंवा मोती अगर आरसे लावून सजवा आणि त्या एकाच ऑर्डरमध्ये सजवा. पाहा, त्यातूनही काहीतरी नवीन सजावट करता येईल.
रंगसंगतीवरही लक्ष देणं गरजेचं आहे. खूप रंगीबेरंगी वस्तू एकाच ठिकाणी ठेवल्या की, कोणत्याच वस्तूकडे नीट लक्ष जात नाही. त्यामुळे शक्यतो एक किंवा दोन रंगांचा वापर करावा. जास्तीत जास्त तीन बेसिक रंगांचा वापर करावा. त्याचा चांगला परिणाम साधण्यासाठी पांढ-या रंगाच्या काचेचा वापरही अवश्य करावा. ही काच टी-पॉयचा टॉप किंवा डायनिंगचा टॉप किंवा एखादी पारदर्शी फुलदाणी अशा प्रकारचीही असू शकते.
सजावटीच्या वस्तू त्यांच्या आकाराप्रमाणेच त्यांच्या रंगानुसारही ठेवाव्यात. त्यात विरुद्ध रंग एकमेकांजवळ ठेवलेत तर अधिक चांगले दिसतील. सजावटीत एखादी कल्पना किंवा थीम देता आली तर फारच उत्तम. ही थीम तुमच्या सजावटीच्या वस्तूंमधून दिसेल. जसं की, तुम्ही बाथरूमची सजावट करताना पाणी ही थीम घेतलीत तर शंख- शिंपले, क्रिस्टल बॉल, छोटे संगमरवरी दगड यांची सजावट करता येईल. तिथल्या टाइल्सवर माशांची चित्र घेता येतील.
किचनमधली सजावट करतानाही कटलरी एकाच प्रकारची वापरली जाईल, यावर लक्ष द्या. एखाद्या प्रसंगाला एक प्रकार वापरलात तर पुढच्या वेळी नवीन सेट काढता येईल. डायनिंगची सजावट करतानाही फ्लॉवरपॉट किंवा अन्य काही शोभेच्या वस्तू ठेवणार असाल तर त्यामुळे टेबलावरच्या अन्य मांडणीला अडचण होणार नाही, याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. टेबल सजवताना त्याचे नियम पाळणंही गरजेचं आहे. घरातले पडदेही घराच्या सजावटीत मोठी भूमिका बजावत असतात. त्यांची रचनाही अनुकूल असावी. एकाच प्रकारचे पडदे वापरणं जास्त संयुक्तिक. फार तर वेगवेगळ्या खोल्यात वेगवेगळ्या प्रकारचे पडदे लावून सजावट केली जाऊ शकते. मात्र, पडद्यापुढे टेबल किंवा त्यावर शोभेच्या वस्तू अशी मांडणी करणं टाळावं.
प्रकाशयोजनेचाही सजावटीच्या संतुलनात मोठा वाटा असतो. योग्य प्रकाशयोजनेमुळे ठरावीक सजावटीच्या वस्तू उठून दिसायला मदत होते. हायलायटर किंवा स्पॉटलाइटचा वापर करून तुम्ही सजावटीला 'चार चाँद' लावू शकता. सजावट ही एक कला आहे. त्याला जितकं खुलवता येईल, तितकी ती तुमच्या सौंदर्यदृष्टीला दाद मिळवून देणारी ठरेल.
सजावटीच्या वस्तूंचे सेट तयार करा
अनेकदा सजावटीच्या अनेक गोष्टी घेतल्या जातात आणि त्या घरात कशाही पडलेल्या असतात. एकमेकांजवळ ठेवल्याने त्या दुस-या वस्तूंची शोभा घालवतात. अशा वेळी एकदा घरात नक्की किती सजावटीचं सामान आहे, याची एक यादी करा. त्यातल्या कोणत्या गोष्टी एकमेकांना पूरक आहेत, त्या एकत्र करा आणि एका वेळी तेवढय़ाच वस्तूंनी सजावट करा. बाकीच्या वस्तू बाजूला ठेवून टाका. यामुळे तुमच्या सजावटीला सुटसुटीतपणा येईल आणि काही दिवसांनी निरनिराळ्या वस्तू बाहेर काढल्याने त्या वेगळ्या सजावटीचा आनंदही घेता येईल.



Read More »

घर भाडयाने देताय? अशी वाढवा मिळकत!

आजकाल घर भाडयाने देऊन त्याचा ईएमआय परस्पर जाईल किंवा त्यातून काही अ‍ॅडिशनल 'इनकम' मिळेल, असा विचार अनेक जण करतात. घर भाडय़ाने देतानाही अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. तुमच्या घराला थोडं अधिक भाडं मिळावं किंवा ते पटकन भाडयाने जाऊन लवकर कमाई सुरू व्हावी, असं वाटत असेल तर या काही गोष्टी करून पाहायला हरकत नाही..



घर घेणं ही काही आता फार मोठी गोष्ट राहिली नाही, उलट घरात एकाहून जास्त लोक कमावणारे असतील तर त्यांच्या इनकम टॅक्स बचतीसाठी आणि थोडय़ा जादा कमाईसाठी अनेकदा 'सेकंड होम' घेण्याचा आणि ते भाडय़ाने देऊन त्यातून वाढीव इनकम मिळवण्याचा विचार केला जातो. हे मॅनेज करणं थोडं अवघड वाटू शकतं. पण योग्य नियोजन असेल तर त्यातही काही अवघड नाही.
आता हेच पाहा ना, घर भाडय़ाने देताना काही गोष्टींची थोडी काळजी घेतली तर कितीदा तरी बाजारभावापेक्षा जास्त भाडं मिळण्याची शक्यता वाढते. एक भाडेकरू गेला तरी लगेच दुसरा मिळून तुमच्या त्या घराच्या खर्चाची तजवीज करता येते. त्यासाठी तुम्ही जे घर भाडय़ाने देणार आहात, त्याची थोडी देखभाल करायला हवी.सगळ्यात आधी या घराचं रंगरूप कसं आहे, याकडे लक्ष द्या. अनेकदा पहिला भाडेकरू असताना त्या घरात आपण जात नाही. त्याच्या रंगाबद्दल फारशी पाहणी करत नाही.
पण नवीन भाडेकरू मिळवताना घराचं रंगरूप चांगलं असायला हवं. बरेच जण ब्रोकर किंवा एजंटकडे घराचं काम सोपवून मोकळे होतात. पण त्यामुळे त्याची योग्य देखभाल होईलच, याची खात्री देता येत नाही. त्यासाठी थोडा वेळ खर्च करून घराची साफसफाई करण्यावर भर द्या. त्याला चांगला रंग लावून घ्या. फिकट रंगछटा असल्यास आहे तीच जागा मोठी वाटायला मदत होते. खिडक्यांचे खटके, बिजागरे व्यवस्थित चालत आहेत की नाही, याची पाहणी करा. काचा खराब झाल्या असतील तर नवीन बसवून घ्या. त्याचबरोबर टॉयलेट आणि बाथरूमच्या स्वच्छतेकडे सगळ्यात जास्त लक्ष द्या. नवीन राहायला येणारा माणूस घराच्या स्वच्छतेने प्रभावीत झाला तर तो अन्य गोष्टींची फार काळजी करत नाही.
तुम्ही काही फर्निचरसकट घर देणार असाल तर त्याची काय परिस्थिती आहे, याची पाहणी करा. त्याची डागडुजी करा. त्याला पॉलिश करून घ्या. नवीन रंग लावून घ्या. या काही गोष्टी करायला थोडा पैसा लागतो. पण त्यामुळे तुमच्या घराची बाजारातील किंमत वाढत असते, याचीही जाणीव ठेवायला हवी. विशेषत: स्वयंपाकघरात तिथल्या ट्रॉली, सिंक या गोष्टी व्यवस्थित आहेत ना, कुठे लिकेज तर नाही, याची तपासणी अवश्य करा. अर्थात या गोष्टी तुम्ही नेमलेला एजंटही करू शकतो. पण त्या योग्य तऱ्हेने होत आहेत, याची काळजी मात्र घ्यायला हवी.
घराची जागा आणखी कशी वाढेल, यासाठीही काही गोष्टी करता येऊ शकतात. त्यात एखादं पार्टिशन घालून वेगळी रूम तयार करता येत असेल तर किंवा बाल्कनी अगर पॅसेज आत घेऊन आहे ती रूम वाढवता येत असेल तर अशा सुधारणा करायला हरकत नाही. त्यातून जास्त जागेचा क्लेम तुम्ही करू शकता. येणा-या भाडेकरूलाही त्यातून जास्त जागेचा फायदा होणार असेल तर तो भाडं वाढवायला तयार होऊ शकतो. यात भिंतीतील कपाटं करणं किंवा किचन आणि बेडरूममध्ये लॉफ्टला कपाटं करून घेऊन स्टोरेज वाढवणं, अशाही काही युक्त्या करता येतील.
बाथरूम किंवा टॉयलेटवर असलेली जागा बंद करून तिथे स्टोरेज निर्माण करणं किंवा वॉश बेसिन खाली काही कपाट तयार करणं यामुळेही स्टोरेज निर्माण होऊ शकतं. यामुळे घर घेणा-या माणसाला जास्त जागा वापरायला मिळेल, याची खात्री वाटते.घराला टेरेस किंवा गार्डन असेल तर त्याची निगाही योग्यरीतीने राखली गेली आहे, याची काळजी घ्यावी लागेल. गार्डनमध्ये टाइल्स बसवून किंवा टेरेसला वर छप्पर करून देऊन या जागेचा उपयोग होत असल्याचं पटवून देता येतं. त्यामुळे तुमच्या घराला इतरांपेक्षा जास्त भाडे मिळण्याची शक्यताही वाढते.
घराला चांगलं भाडं मिळण्यासाठी जशा घरातल्या काही बाबी महत्त्वाच्या ठरतात, तशाच त्या आजूबाजूच्या म्हणजे सोसायटीतल्याही लागू पडतात. आजकाल पार्किंगची मोठी अडचण असल्याने तुमच्याकडे किती पार्किंग उपलब्ध आहे, याची अवश्य माहिती द्या. किंवा सोसायटीत पार्किंगची काय व्यवस्था आहे, याची पाहणी करा. लाइट जाण्याच्या समस्येवर जनरेटर बॅकअपची सोय आहे का, याची माहिती भाडेकरूला द्या. किंवा तुम्ही घरात इन्व्हर्टर बसवून देत असाल तर त्याचा मेंटेनन्स कसा विभागून घ्यायचा, याची चर्चा करा. घरात अ‍ॅडिशनल पाण्याची टाकी बसवून पाण्याच्या साठवणीची सोय करणार असाल तर भाडेकरूलाही त्यात सोय वाटू शकते. दाराला एक्स्ट्रा लॉक बसवणं किंवा सेफ्टी डोअर बसवणं, या गोष्टी तुमच्या फ्लॅटला इतरांपेक्षा युनिक बनवू शकतात.
घराच्या भाडयाची आकारणी करताना त्यात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असेल, याची तपासणी करून मगच तो आकडा निश्चित करा. तुमच्या घरातल्या सोयीनुसार त्यात किती भर टाकायची आहे, याची पडताळणी करा. म्हणजे भाडेकरूला तुम्ही त्याचे विवरण देऊ शकाल. उदा. या भागात २ बीएचकेसाठी साधारण १२ हजार भाडे आकारले जाते. पण घरात अमुक एक सोयी आहेत किंवा मेंटेनन्स आम्ही भरणार असल्याने अमुक एक भाडे आहे, असे सांगणे सोपे जाते.
भाडेकरूही त्याचा अवश्य विचार करतात. हे भाडे शक्यतो तुमच्या ईएमआयचा भार कमी करणारे असावे. मात्र, वाजवीपेक्षा जास्त भाडय़ाची अपेक्षा ठेवली तर काही महिने घर मोकळे राहून तेवढे नुकसान होण्याची शक्यताच अधिक आहे.या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर घर भाडय़ाने देणं हा पारदर्शी आणि सोयीस्कर व्यवहार ठरू शकतो. त्यातून तुम्ही भाडेकरूचा विश्वासही मिळवू शकाल व एक संपत्ती निर्माण करण्याच्या दृष्टीनेही तुमचं पाऊल पुढे पडू शकेल.
जाहिरात द्या.. कमिशन वाचवा!
घर भाडय़ाने देताना अनेकदा एखादा एजंट किंवा ब्रोकर नेमला जातो. त्याला प्रत्येक भाडेकरू बदलताना कमिशन द्यावं लागतं. त्यामुळे भाडेकरू शोधण्याचा त्रास वाचतो. पण आजकालच्या जमान्यात घर भाडय़ाने देणंही मोठी गोष्ट राहिलेली नाही. कारण अनेक वृत्तपत्रांमधील घरासंबंधीच्या जाहिरातींचा वाचकवर्ग मोठा असतो. त्यामुळे या माध्यमातून तुम्ही घराची जाहिरात करू शकता. यातून थेट ग्राहकाशी तुमचा परिचय होईलच; पण घराच्या रकमेबाबतही नेमकेपणा राहील. निर्णयप्रक्रिया सुलभ होईल. तसंच एजंटना कमिशन म्हणून देण्यात येणारी रक्कम आणि जाहिरातीचा खर्च यांची तुलना केल्यास तुमचा फायदाच होईल, हे नक्की.

Read More »

गृहखरेदीतले काटे आणि सापळे

घर हा सामान्य माणसाचा मोठा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यासाठी त्याची मोठी गुंतवणूक पणाला लागत असते. त्यामुळे त्याला घर घेण्यासाठी प्रवृत्त करायला बांधकाम व्यावसायिक अनेक योजनांचे गाजर दाखवत असतो. त्यात पार्किंग सुविधामुक्त असण्यापासून ते कुटुंबाच्या सहलीपर्यंत अनेक आश्वासने असतात. कधी घर भाडयाने देण्याची हमी तर कधी ते पुन्हा विकत घेण्याचे आमिष दाखवले जाते. यातल्या कोणत्या योजना प्रत्यक्षपणे ग्राहकांच्या फायद्याच्या आहेत? त्यातले सापळे सदनिका खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या..
तीनमुनादाखल सजवलेली सदनिका पाहून रवी त्या जागेच्या अगदी प्रेमात पडला. तशाच सोयी आपल्याही घरात मिळणार आहेत, असं कळल्यावर त्याने अशा आलिशान घरात राहायची स्वप्नं पाहायला सुरुवात केली. शहराच्या जरा बाहेर असलं तरी ते घर त्याने घेण्याचं ठरवलं. ताबा मिळाल्यावर मोठया उत्साहाने तो तिथे राहायला गेला. पण प्रत्यक्षात त्याला मनासारख्या कोणत्याच सुविधा मिळाल्या नाहीत. नमुनादाखल सदनिकेप्रमाणेच सदनिका देऊ, असं बांधकाम व्यावसायिकाने सांगितलं असलं तरी प्रत्यक्षात या ठिकाणी वापरण्यात आलेला कच्चा माल कनिष्ठ दर्जाचा होता. रवीचा हिरमोड झाला खरा, पण आता घर बदलणं शक्य नव्हतं की बिल्डरवर केस करणंही शक्य नव्हतं. कारण तसा कुठे लेखी करार झालेला नव्हता. रवीसारखी कितीतरी माणसं बिल्डरच्या काही योजनांना भुलून घर खरेदी करतात, नंतर त्यांना वास्तवाची जाणीव होते.
या जगात काहीही फुकट मिळत नाही, याची जाणीव प्रत्येकाला असते. पण आकर्षक योजना तयार करून त्या ग्राहकांच्या गळी उतरवण्याच्या क्लृप्त्या आखल्या जात असतात. त्यातून घरासारखी गोष्ट माणूस कायम खरेदी करत नसल्याने त्यावर दिल्या जाणा-या योजनाही तितक्याच आकर्षक असतात. कधी बिल्डर पूर्व हप्ते भरणार असतो तर कधी भाडे मिळण्याची हमी देत असतो. कधी ठरावीक मुदतीत घर विकायचे झाल्यास बिल्डर ते घेण्यास तयार होतो तर कधी पार्किंग सुविधेचे पैसे न भरता त्याचा वापर करता येणार असतो. अशा आकर्षक योजनांची भुरळ ग्राहकांना पडली नाही, तर नवल. पण त्यातल्या खाचाखोचा समजावून घेऊन मगच त्याची चाचपणी केलेली बरी.
पार्किंग सुविधा फुकट.. अशी जाहिरात अनेक जण करत असले तरी त्यामागची मेख समजून घ्यायला हवी. कोर्टाच्या एका आदेशानुसार, बिल्डरला पार्किंगसाठी वेगळे पैसे आकारणं शक्य नाही तरी ते तसे आकारतात आणि वर तुम्हाला ते फुकट देत असल्याची बतावणी करतात. शिवाय सुपर बिल्टअप एरियात वाढ करून त्याचीही वसुली केलेली असतेच. त्यामुळे ग्राहकाला प्रत्यक्षात काहीच फुकट मिळत नाही. कधी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी आकार विकासकाकडून देण्याची हमी असते. पण त्याची वसुली बाकीच्या किमतीत केली गेली असण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी या सदनिकेची किंमत आजूबाजूच्या सदनिकांशी पडताळून पाहूनच योग्य तो निर्णय घ्यावा. काही वेळा देखभाल खर्च मोफत असल्याचेही गाजर दाखवले जाते. पण ते किती वर्षासाठी ते पाहावं. कारण पहिल्या वर्षासाठी तसेही देखभाल खर्च लागत नाही. शिवाय गृहनिर्माण संस्था नोंदणीकृत होईपर्यंत विकासकानेच ते द्यायचे असतात. अशा काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
आजकाल विकासक पूर्व हप्ते भरण्याची हमी देताना दिसतात. यात अशा लोकांचा फायदा असतो जे सध्या भाडयाने राहत आहेत आणि त्यांना भाडं आणि हप्ते दोन्हींचा बोजा नको आहे. पण त्यातले नियम पडताळून पाहावेत. साधारणपणे ही योजना पहिल्या २४ महिन्यांसाठी असते. त्यानंतरही ताबा मिळाला नाही तर हा बोजा ग्राहकांवरच येऊ शकतो. संक्रमित व्याजदर आकारले जात असतील तर दराच्या बदलाची जबाबदारी कुणाची हे आधीच ठरवून घ्यावं लागेल. अशा काही छुप्या गोष्टी लक्षात घेऊनच या योजनेचा लाभ घ्यायचा की नाही, ते ठरवावं लागेल.
भाडेरूपी उत्पन्न मिळण्याची हमीही अशीच 'युक्ती' आहे. म्हणजे बिल्डर देऊ करत असलेलं भाडं सदनिकेच्या किमतीच्या ६ ते १० टक्के असते. पण प्रत्यक्षात भाडं १२ टक्क्यांपर्यंत मिळू शकतं. शिवाय हे सगळे लिखित स्वरूपात झालं तर ठीक, नाहीतर बिल्डरने शब्द फिरवल्यास ग्राहकांच्या हातात काहीच राहत नाही. काही बिल्डर पुढील तारखेचा धनादेश देऊ करतात. पण वित्तीय अडचणीत आलेला बिल्डर ते वटवू शकेल, याची खात्री देता येत नाही.
काही वेळा ग्राहकांना विशिष्ट मुदतीत सदनिका विकायची झाल्यास बिल्डर स्वत: ती विकत घेण्याची तयारी दाखवतात. यात बिल्डर एक रक्कम सांगतो. त्यासाठी ३-५ वर्षाचा 'लॉक इन पीरिएड' देतो. झटपट सदनिका विकून पैसा उभा करायची वेळ आली तर हा पर्याय ग्राहकांना आकर्षक वाटतो. पण यातही बिल्डर शब्द न पाळण्याचा धोका आहे. शिवाय 'लॉक इन पीरिएड' असल्याने तेवढे दिवस पैसे अडकून पडतात आणि बाजारभावापेक्षा कमी भावात बिल्डर ती सदनिका परत मागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याशिवायही अनेक प्रकारच्या भेटी बिल्डरकडून दिल्या जातात. त्यात क्लबचे सदस्यत्व देणं, कुटुंबासहित प्रवासाचा खर्च देणं किंवा सोन्याची नाणी भेट म्हणून देणं वगरे अन्य पर्याय असतात. यातले काही खरंच प्रामाणिकपणे दिलेले असू शकतात. पण ती रक्कम आधीच फ्लॅटच्या किमतीत वसूल केल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे घराची रक्कम इतर घरांशी, आजूबाजूला असलेल्या फ्लॅटशी पडताळूनच त्याची शहानिशा करावी. तुम्हाला मिळत असलेली रक्कम वस्तुरूपात आहे की रोख स्वरूपात यावरही त्याचं मोजमाप करणं सोपं आहे. घराच्या किमतीत त्याची वसुली केलेली नाही ना हे पडताळणं सगळ्यात महत्त्वाचं आहे.
घरात काही सुविधा पुरवणं, हेदेखील घर घेण्यासाठी दाखवलेलं आमिष असू शकतं. या वस्तूंची बाजारातील किंमत किती, त्या कोणत्या ब्रँडच्या मिळणार आहेत आणि त्यासाठी काही लेखी करार केला जाणार आहे का, या गोष्टी पडताळून पाहायला हव्यात. मिळणारी सूट किंवा बक्षीस याबद्दल सहसा कोणी 'लिखापढी' करत नाही.
त्यामुळे या वचनांची पूर्तता न करणंही सहज होऊ शकतं. घर घेतल्यानंतर त्याचा उलगडा झाला तरी घराची खरेदी रद्द होत नाही. कारण त्यात आर्थिक आणि भावनिक गुंतवणूक झालेली असते. त्यामुळे अशी फसवणूक होण्याची शक्यता खूपच वाढते. घराबरोबर काही फुकट मिळवण्याच्या नादात, आहे ती मन:शांती हरवणार नाही, याची खात्री फक्त आणि फक्त ग्राहक म्हणून आपणच करू शकतो!

Read More »

पाहुणे येती घरा..

घरी आलेल्या पाहुण्याला प्रसन्न वाटलं पाहिजे, असं वातावरण आपल्या घरात नेहमी असावं. अनेकांच्या घरात खास पाहुण्यांसाठी वेगळी खोली असते. तिची सजावट करताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. पाहुणे नसले तरीही त्या खोलीची देखभाल करावी. असं केल्यास घरी आलेला पाहुणा प्रसन्न होऊन आपल्या घरातून बाहेर पडेल आणि जाताना तो आपल्याला शुभेच्छाही देईल.

'अतिथी देवो भव:' असं आपल्या संस्कृतीत म्हटलं आहे. आपल्या घरी येणारा प्रत्येक अतिथी हा देवाचं रूप आहे, असं समजून त्यांना वागवलं पाहिजे. त्यांचं आदरातिथ्य केलं पाहिजे. म्हणूनच पाहुण्यांची खोली सजवताना विशेष लक्षपूर्वक पद्धतीने ती सजवली पाहिजे. ज्या खोलीत पाहुणे आराम करतात, त्या वेळी त्यांना ती वेळ अतिशय चांगल्या पद्धतीने घालवता आली पाहिजे. या खोलीतील इंटेरिअर अतिशय अचूक आणि परिपूर्ण असावं. खोलीत पाहुण्यांची उत्तम सोय होऊ शकेल, अशी ती सजवावी. कारण घरात मिळालेली वागणूक कुठलाही माणूस दीर्घकाळ लक्षात ठेवतो. म्हणूनच आपल्या घरातील आदरातिथ्याचा छाप पाहुण्यांच्या मनात राहावा यासाठी काय करता येईल, ते पाहू.
'गेस्ट रूम' सजवणं खरं तर थोडंसं अवघडच काम असतं. कारण येणा-या पाहुण्यांची आणि तुमची आवड भिन्न असण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे गेस्ट रूम सजवताना आपल्या कल्पनेसोबतच तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. त्यासाठी एखाद्या व्यावसायिक डिझायनरला बोलावू शकता. सामान्यपणे सर्व व्यक्तींना आवडणा-या काही गोष्टी तुम्ही इथे सहज ठेवू शकता. या खोलीत थोडंसं आधुनिक डिझाइनचं सामान ठेवा. काहीतरी फंकी किंवा पारंपरिक वस्तू ठेवण्याचा मोह शक्यतो टाळावाच. ही खोली साधी, नेटकी आणि थोडासा अ‍ॅस्थेटिक टच असलेली असावी. या खोलीसाठी रंगांची निवड करताना फारसे नवे प्रयोग करू नयेत. प्रसन्नता वाटणारे रंग निवडावेत. जेणेकरून शांत, आल्हाददायक वातावरण तयार होईल. त्यासाठी ब्लू, व्हाइट, क्रिम, लिलॅक, पिच, ग्रीन यांपैकी कोणताही रंग निवडावा. हे रंग उत्तम आहेत. या छटा साधारणपणे बहुतेक व्यक्तींना आवडतात.
या खोलीमध्ये कोणत्या गोष्टी असणं महत्त्वपूर्ण आहे, ते जाणून घेऊ. रंगाची निवड झाल्यानंतर या खोलीसाठी तुम्ही फॅब्रिक कोणतं वापरता, हे महत्त्वाचं आहे. पडदे, कव्हर्स, बेडशीट यांच्या निवडीबाबतही थोडा विचार करावा. बेडशीट हे भिंतीच्या रंगाशी मेळ साधणारं असावं. म्हणजे त्याच रंगाचं असावं असं नाही, तर त्यात विरुद्ध रंगाची, गडद, फिक्कट रंगाची किंवा मिक्स अ‍ॅण्ड मॅच, अशी कुठलीही संगती निवडू शकता. आधुनिक आणि सुंदर डिझाइनचं बेडशीट निवडावं. जेणेकरून पाहुण्यांना त्यावर झोपताना आरामदायक वाटेल. कुशन कव्हरसाठी वेलव्हेट किंवा तत्सम सॉफ्ट फॅब्रिक वापरावं. सिंथेटिक किंवा रफ फॅब्रिक वापरू नये. तसंच मऊ, स्वच्छ टॉवेल, केणी रोब्स आणि स्लिपर्सचा एक छानसा जोडही या खोलीत ठेवावा. जेणेकरून पाहुण्यांना घरासारखं वातावरण जाणवेल. खोलीत फर्निचरची निवड करताना सर्वप्रथम बेड निवडावा. बेड शक्य तेवढा मोठा आणि मजबूत असावा. अर्थात यामध्ये आपल्या बजेटचा आणि जागेचा विचार जरूर करावा. जागा फारशी मोठी नसेल तर सोफा कम बेडची निवड करता येईल. त्यामुळे खोलीत वेगळा सोफा किंवा खुच्र्या ठेवण्याची गरज वाटणार नाही. छोटया खोलीसाठी ही रचना चांगली आहे. जागा आणि बजेट दोन्ही मोठं असेल तर स्वतंत्र सोफा अवश्य निवडावा. या खोलीमध्ये विविध आकाराच्या उशा ठेवाव्यात. म्हणजे गरजेनुसार पाहिजे ती उशी पाहुण्यांना निवडता येईल. तसंच आराम खुर्चीचाही विचार या खोलीसाठी करता येईल. हल्ली विविध आकाराच्या अतिशय सुरेख चेअर बाजारात मिळतात. त्यापैकी एकीची निवड करता येईल. या खोलीसाठी प्रकाश व्यवस्था करतानाही पाहुण्यांची सोय लक्षात घ्यावी. खोलीत भरपूर प्रकाश पडेल, अशी दिव्यांची रचना असावी. त्यासाठी पुरेशा दिव्यांचा वापर करावा. पाहुण्यांना वाचन किंवा इतर कामं व्यवस्थित करता येईल हे बघावं. त्रिकोणी रचनेत दिव्यांची रचना करावी म्हणजे सर्वत्र प्रकाश राहील. तसंच एक लॅम्पशेडही ठेवावी. यामुळे वेगवेगळ्या तीव्रतेचा प्रकाश वाढू शकेल. म्हणजे तीव्र, मध्यम आणि मंद अशा प्रकारे, बाजारात अशा लॅम्पशेड्स उपलब्ध असतात. अचानक वीज गेल्यास पाहुण्यांची गरसोय होऊ नये म्हणून या खोलीत एक इमर्जन्सी बॅटरी अवश्य ठेवावी.
गेस्ट रूममध्ये पाहुण्यांचं सामान ठेवण्यासाठी पुरेशी आणि योग्य जागा असावी. त्यासाठी रॅक किंवा एखादं छोटंसं कपाट अवश्य ठेवावं. तसंच संपूर्ण ड्रेसिंग टेबल ठेवता आलं नाही, तरी पुरेसा मोठा आरसा, कंगवा, पेस्ट या गोष्टी ठेवाव्यात. तसंच कपडे अडकवण्यासाठी हँगर्सही असावेत. टांगण्याची सोय कपाटात असेल तर उत्तम. अन्यथा हँगर लटकवण्यासाठी तशी सोय करावी.
घरात पाहुणे नसले तरी या खोलीची नियमित देखभाल अवश्य करावी. पाहुणे असताना खोलीत वाचनासाठी काहीतरी हलकं-फुलकं ठेवावं. वर्तमानपत्रं, मासिकं, कादंबरी, कथासंग्रह यापैकी काहीही ठेवता येईल. इतरही काही वस्तू तुम्ही या खोलीत ठेवू शकता. टीव्ही, घडयाळ, गजराचं घडयाळ या गोष्टी पाहुण्यांना सोयीच्या ठरणा-याच आहेत. पाहुण्यांची खोली अधिक सुसज्ज ठेवण्यासाठी त्यात मोबाइल चार्जर, टॉर्च, छोटे पेपर, पॅड, पेन, पाण्याची बाटली आणि काही फळे यांचाही समावेश करता येईल. पाहुण्यांची एवढी खातरदारी घेतली तर तेही घरातून प्रसन्न होऊन बाहेर पडतील आणि जाताना भरभरून शुभेच्छा देतील.


Read More »

द्रोणातून फुलली फुले..

दरवेळी खरीखुरी, ताजी फुलं आणून तो फ्लॉवरपॉट सजवणं हे थोडं खर्चिक कामच, नाही का? म्हणूनच मग आपण त्यासाठी कृत्रिम फुलांचा पर्याय निवडतो.
घर सजावट म्हटली की, टेबल किंवा घरातील शो-केसचा एखादा कोपरा सजवणारा फ्लॉवरपॉट हा घरात आवर्जून असतोच. पण दरवेळी खरीखुरी, ताजी फुलं आणून तो फ्लॉवरपॉट सजवणं हे थोडं खर्चिक कामच, नाही का? म्हणूनच मग आपण त्यासाठी कृत्रिम फुलांचा पर्याय निवडतो. पण तीच ती फुलं सजावटीचं नावीन्यच संपवतात. म्हणूनच आज आपण घरच्या घरी आणि करायला अतिशय सोपी अशी कागदाची कृत्रिम फुलं कशी बनवायची ते पाहणार आहोत.?
साहित्य
ही फुलं बनवण्यासाठी तुम्हाला कॉफी फिल्टरच्या पातळ कागदाचे द्रोण (जे आपण प्रसाद देण्यासाठी वापरतो), चिकटपट्टी, कात्री, दोरा, उभी पातळ तार किंवा छोट्या लाकडी काडय़ा इ. साहित्याची गरज भासेल. द्रोण हे चॉकलेटी आणि पांढ-या रंगाचे वापरल्यास रंगसंगती उठून दिसेल.


Read More »

'तथास्तु' म्हणणारा वास्तुपुरुष

माणसाचं मन जसं संवेदनशील असतं तशा वास्तूलाही काही भावना असतात. त्यामागे अनेक कथाही सांगितल्या जातात. वास्तू बांधल्यानंतर तिची शांती करणं गरजेचं आहे. 'वास्तुशांती' हा विधी पद्धतशीर व्हायला हवा, असंही सांगितलं जातं. पण त्यासाठी त्याचा विधी, त्याचा इतिहास किंवा कथा, त्याचं पूजन कशा प्रकारे करावं याची देवता, अधिदेवता, प्रत्याधीदेवता यांची पूजा कशा प्रकारची असावी, वास्तुनिक्षेप कसा करावा, याविषयी जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
'घर बघावं बांधून, अन् लग्न करावं पाहून' असा एक जुना संवाद होता. या दोन्ही गोष्टी प्रत्यक्षात येण्याकरता ज्या काही जुळवाजुळवी कराव्या लागतात, त्या त्रासाला अंत असा नसतोच. पण आता या दोन्ही गोष्टी सध्याच्या प्रगत युगात थोडय़ाफार सोप्या झालेल्या आहेत. फक्त जवळ पैसा असला की, सर्व काही आलं. पूर्वीच्या काळी पाया खोदण्यापासून ते थेट तिथे निवास करण्यापर्यंत बराच कालावधी, पैसा, वेळ लागायचा. तेव्हा कुठे तरी काम संपल्यानंतर मनाचा एक कोपरा सुखावायचा. बिल्डरला पैसे दिले की साधारणत: एक ते दोन वर्षात, कदाचित सहा महिन्यांत ताबा मिळतो. तो मिळाला की, चांगला मुहूर्त पाहून नवीन घरात वास्तुशांती करून जाण्याचा उत्साह काही औरच असतो. तेव्हा वास्तुशांती हा विधी पद्धतशीर व्हायला हवा. मात्र, त्यासाठी या विधीविषयी इत्थंभूतपणे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
वास्तूसंबंधी एक कथा सांगितली जाते ती अशी.. भगवान शंकराचं अंधकासुराशी ज्या वेळी युद्ध झालं त्या वेळी शंकराच्या घर्मबिंदूतून एक महाभूत निर्माण झालं. अंधकासुराचं रक्त प्राशन करूनही त्याची भूक शमली नाही आणि क्षुधातृप्तीसाठी त्याने घोर तप केले. त्या वेळी भगवान शंकरांनी त्याला असा वर दिला की, 'वास्तुपुरुषाची पूजा करताना जो बलिभाग दिला जाईल, तो तुला अन्न म्हणून मिळेल आणि जे लोक वास्तुपुरुषाला बली न देता वास्तू उभारतील, ती वास्तूच तुझे भक्ष्य बनेल.'
अर्थात ही पहिली कथा आहे. तशीच दुसरी एक कथा अशी सांगितली जाते..युद्धामध्ये देवांकडून दैत्यांचा पराभव झाला. या अपमानाने दैत्यगुरू भार्गव यांनी जयप्राप्तीसाठी यज्ञ केला. यज्ञ समाप्तीनंतर भार्गवाचे घर्मबिंदू यज्ञभूमीवर पडले. याच्यातून छगासुर नावाची एक शक्ती बनली. त्याने दैत्यगुरूंच्या आज्ञेवरून स्वर्गावर स्वारी करून देवांना पळवून लावले. सर्व देव भगवान शंकराला शरण गेले. त्यांनी एक भूत निर्माण करून प्रथम भार्गव आणि छगासुर यांचा नि:पात करण्याची आज्ञा दिली. भार्गवाने चतुराईने भगवान शंकराच्या कानावाटे उदरात प्रवेश केला. शंकरांनी त्याला अभय दिलं. अभय मिळताच शुक्रमार्गाद्वारे त्याने स्वत:ची सुटका करून घेतली. छगासुराला वाचविण्यासाठी त्याने शंकरास साष्टांग दंडवत घालण्याची सूचना केली. तो शंकराभिमुख म्हणजे ईशान्येकडे मस्तक करून पालथा पडला. त्या स्थितीतच त्याने एक अट घातली. ती अट अशी की, न उठता सर्व देवांना त्याच्या शरीरावर वास्तव्य करू द्यावं. भगवान शंकरांनी ही अट मान्य केली. तेव्हा कोणत्याही इमारतीचा भाग वास्तुपुरुषी असुराने व्यापलेला असतो, असे मानले जाऊ लागले. याच्या निरनिराळ्या अवयवांवर वेगवेगळ्या देवतेचं अधिष्ठान असते, असे म्हणतात. त्यांना आपण प्रसन्न करून घेतो. वास्तुपुरुषाच्या डोक्यास ब्रह्म, दोन्ही कानांमध्ये पर्जन्य आणि दिती, गळ्यात पाणी, खांद्यावर जय आणि अदिती, उजव्या बाजूस इंद्रासह पाच देवता, डाव्या भूजेत नाग, उजव्या हातात सावित्री आणि सविता, डाव्या हातात रुद्र आणि पायात पितृगण अशी वास्तुपुरुषाची स्थापना असावी, असं कल्पलेलं आहे.
बांधकाम करताना काही ठिकाणी झाडे, वृक्ष, वेली, अपरिहार्य कारणामुळे तोडल्या जातात. कीटक, अळी, पक्ष्यांची घरटी मोडली जातात. तसंच खोदकाम करताना आपण भूमीवर आघात करत असतो. या सर्वाचं प्रायश्चित्त म्हणून यांची माफी मागून वास्तुशांत हा विधी अत्यंत गंभीर आणि श्रद्धायुक्त अंत:करणाने करायचा असतो. तुम्ही गृहप्रवेशाच्या वेळी पाहुणे राऊळे, मित्र, हितचिंतक यांना बोलावू शकता.
प्रथम संकल्प, पुण्याहवाचनादी कृत्ये केल्यानंतर आचार्यपूजन करून पुढील कृत्ये त्याद्वारे केली जातात. देवतेच्या स्थापनेसाठी चौकोनी वेदी बनवून उत्तर वेदीच्या कोप-यावर लोखंडी खिळा ठोकतात. त्यावर भाताचा बळी ठेवतात. आग्नेयेस अग्नीची स्थापना करून घेतात. या सर्व रचनेला 'वास्तुमंडल' म्हणतात. ग्रहाचे आवाहन करून पूजन करतात. वेदीवर शिखी, पर्जन्य, जयंत इत्यादी ४५ देवतांचं आवाहन करतात. वास्तुपुरुषाच्या निरनिराळ्या अवयवांवर देवतांची स्थापना करायची असते. मध्यभागी वास्तुपुरुषाची प्रतिमा ठेवून इतर देवतेसह त्यांचं पूजन केलं जातं. प्रथम होमाच्या वेळी ग्रहाच्या समिधा, चरू, आज्य यांचे हवन करून वास्तुमंडल देवतेसाठी तीळ, पायस, आज्य यांच्या आहुत्या देण्यात येतात. त्याचप्रमाणे वास्तोस्पतीसुक्ताने वास्तुस्पतीसाठी बिल्वपत्राच्या आहुत्या देतात. प्रायश्चित्त होमानंतर सर्व देवतांना यथाविधी उडदासह चरूचा बली देतात. मग यजमान दाम्पत्यावर त्याच्या कुटुंबीयांसह ऋत्विज अभिषेक करतात. तिहेरी सूत घेऊन पवमान आणि रक्षान्घ ही सुक्ते म्हणतात. त्या घराभोवती ते गुंडाळताना यजमान आणि त्याची पत्नी दूध आणि पाणी यांची संततधार करतात.
वास्तुनिक्षेप आग्नेयेस करावा. तांब्याच्या लहान गड्डात (झाकणासह) किंवा अलीकडे खैराची पेटी मिळते यात सप्तधान्य, दही, भात, फुले, शेवाळ ठेवून, वास्तूची प्रतिमा पालथी ठेवून (ईशान्येकडे मस्तक आणि नैऋत्येकडे पाय) तिचा नि:क्षेप करून प्रार्थना करावी. (वास्तुप्रतिमा ब्राह्मणास दान देऊ नये.)
स-शैल सागरा पृथ्वी याथा वहासी मुद्धीनी!
तथा मां वह कल्याणा सम्पत सन्ततिभि: सह
ततस्तद्गतो पद्धत – मृद गर्त पुरयेन
पुरिते मृदाध्ये उत्तमम्
साम्ये मध्यमम्। न्युने त्वधमं फलं विन्ह्यान!
या मंत्राचा अर्थ असा आहे. हे वास्तुपुरुषा, तू ज्याप्रमाणे पर्वत आणि सागर यांना शिरावर वाहतोस त्याचप्रमाणे कल्याण, संपत्ती आणि संततीसह मला तुझ्या मस्तकावर धारण कर. जुन्या वास्तूतील काही बदल केले असल्यास वास्तुशांती करण्याची गरज नाही. पण मुख्य दरवाजा बदलला असेल तर हा विधी करावा.
भगवान शंकराने वास्तुपुरुषास वर दिला आहे, तो म्हणजे 'तथास्तु' म्हणण्याचा. तेव्हा वास्तू (नवीन असो वा जुनी) काही वाईट उच्चारू नये. कारण तुम्ही जे बोलता त्यास वास्तुपुरुष 'तथास्तु' म्हणतो.
हा विधी अत्यंत व्यवस्थित झाला पाहिजे. आयुष्यात सर्वसामान्य माणसे एकदाच घर घेतात. तशीच वास्तुशांतीही शक्यतो एकदाच होते. वास्तुशांतीनंतर काही वर्षाच्या विलंबाने किंवा शक्य असेल तर दरवर्षी उदकशांती, नवग्रह होम, गणेशयाग, सप्तशतीचे पाठ घरी करावेत. त्याने वास्तू पवित्र, निर्मळ होऊन जाते. लग्नकार्यानंतर वर्षभर वास्तू करू नये. लग्न, मुंजी अगोदर वास्तुशांती करावी. तसंच दर सणावाराला आनंदी प्रसंगी वास्तुपुरुषास न चुकता नवेद्य दाखवावा. वास्तूची रचना चुकीची झालेली असेल, ती वास्तुशास्त्राप्रमाणे नसेल तर पाडापाड न करता उपचाराद्वारे घराची रचना करून घ्यावी. एखाद्या लहान मुलावर ज्याप्रमाणे संस्कार होतात, मोठेपणी ते मूल ते संस्कार घेऊनच वाढतं तसंच आपल्या वास्तूचंही आहे. जसे बांधकाम तसेच फळ मिळते.
वास्तुपुरुष आग्नेयेस निक्षेपच करावा. कारण 'नमस्ते वास्तुपुरुषा भुशैय्याभिरत प्रभू। मद्गृहे धनधान्यादी समृद्धी कुरू सर्वदा॥' अशी प्रार्थना आहे, तेव्हा भूशय्या म्हणजेच जमीन हीच वास्तुपुरुषाची शय्या आहे. तेव्हा निक्षेप भूमीतच झाला पाहिजे.

Read More »

आम्ही सामान्यांच्या घरांची आव्हाने पेलतो! – अखिलेश चौबे

जन्म, शिक्षण, व्यवसाय सारं मुंबईतच. त्यामुळे कळत्या वयातच इथल्या झपाट्याने बदलत्या राहणीमानाचा आढावा घेत, निवासी व व्यावसायिक इमारतींच्या बांधकाम क्षेत्रात गेल्या १३ वर्षापासून भक्कम पाय रोवलेलं तरुण नाव आहे अखिलेश चौबे. दहिसर पूर्व येथील झोपडपट्टी पुनर्वसनासारख्या महत्त्वाच्या व जोखमीच्या प्रकल्पावर काम करण्याचं आव्हान स्वीकारलेल्या अखिलेश चौबे यांच्या कारकीर्दीवर थोडक्यात टाकलेला दृष्टिक्षेप..
माटुंग्याच्या रुपारेल महाविद्यालयातून वकिली पेशाची पदवी घेतलेल्या अखिलेश यांनी काही वर्ष वकिली केली. त्यानंतर मात्र वकील म्हणून कार्यरत असताना, कौन्सिलिंगद्वारे मिळालेल्या अनुभवामुळे आणि निर्माण झालेल्या जनसंपर्कामुळेच त्यांचा बांधकाम क्षेत्रामध्ये येण्याचा मार्ग निश्चित झाला.
आपल्या या वाटचालीबद्दल ते सांगतात, ''२००१ सालापासून 'चौबे रिअ‍ॅलिटीज' नावाने त्यांनी बांधकाम कंपनी सुरू केली. नालासोपारा येथे 'संस्कृती हाइट्स' नावाची पहिली इमारत बांधून बांधकाम व्यवसायातील पहिली मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर नायगाव, वसई आणि विरार या भागांमध्ये एकूण १५ निवासी इमारतींची बांधकामं केली. त्यापैकी २००८ साली पूर्ण झालेले दहिसर पूर्वेकडील ३० लाख चौरस मीटरवर उभारलेले रहिवासी संकुल, हादेखील आमच्या बांधकाम व्यवसायातील यशस्वीपणे पूर्ण केलेला एक महत्त्वाचा टप्पा आहे. कंपनीच्या डायरेक्टर पदावर मी स्वत:, रमाकांत पांडे तसंच चार्टर्ड अकाउंटंट आलोक चौबे आणि विजय त्रिपाठी अशी आम्हा चौघांची भागीदारी आहे.''
मुंबईतील रिअल इस्टेट क्षेत्राविषयी बोलताना ते म्हणतात, ''रिअल इस्टेट व्यवसायाला मुंबईसारख्या झपाटय़ाने बदलत्या 'ग्लोबल' शहरामध्ये मार्केट चांगलं आहे. मुंबईकरांच्या वाढत्या गरजा हेच रिअल इस्टेट व्यवसायवाढीचं गमक आहे. मुंबईतील बहुतांश प्रकल्पांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांचा मालमत्ता म्हणून गुंतवणुकीकडे वाढत चाललेला कल, हीदेखील रिअल इस्टेट व्यवसायाच्या यशाची एक महत्त्वाची बाब आहे.''
''सध्या चालू असलेल्या बांधकामांपैकी दहिसर पूर्वेकडील झोपडपट्टी पुनर्विकासाचे बांधकाम जोरदार सुरू आहे. तेथील रहिवाशांसाठी स्वतंत्र इमारतीचं बांधकाम सुरू आहे. त्याच विभागात 'सिग्नेचर-फेज १' आणि 'सिग्नेचर- फेज २' नामक या आमच्या पहिल्याच बिझनेस पार्कचं बांधकामही सुरू आहे. २०१५ वर्षापर्यंत ते पूर्ण होईल. त्याचबरोबरीने 'स्प्लेंडर-फेज १' आणि 'स्प्लेंडर-फेज २' या दोन्ही बिझनेस पार्कची बांधकामंही सुरू झाली आहेत, २०१७ सालापर्यंत तेही पूर्ण होईल,'' अशी माहितीही त्यांनी दिली.
आगामी प्रकल्पांविषयी अखिलेश सांगतात, ''सामान्य मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडेल असाही प्रकल्प बोरिवली आणि दहिसर पूर्वेला करण्याचा आमचा मानस आहे. त्याच्या आराखडय़ावर कामही सुरू आहे. म्हाडातर्फे दिल्या जाणा-या घरांच्या दरांची तुलना करता, चाळीस लाखांसारख्या परवडणाऱ्या दरात वन बीएचकेच्या ५०० फ्लॅट्सच्या इमारतीच्या आराखड्यावर काम सुरू आहे. पश्चिम उपनगरांमध्ये आणि पालघर तसंच बदलापूरसारख्या ठिकाणीही मध्यमवर्गासाठी बांधकाम करण्याच्या विचारात आम्ही आहोत.''
दहिसरसह वसई, नायगावसारख्या परिसराचा जवळपास कायापालट करण्यामागे अखिलेश चौबे आणि त्यांच्या संपूर्ण टीमची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

Read More »