| ||||
तूप खा, आरोग्यदायी बना!
सध्याचे दिवस आहेत सणांचे-उपवासाचे. या दिवसात साजूक तुपाचा उपयोग करावा. भारतीय आहारामध्ये साजूक तुपाला 'राजेशाही' स्थान आहे. तेही गाईच्या दुधापासून बनवलेल्या साजूक तुपाला. या तुपापासून बनवलेल्या पदार्थात विजातीय घटक तयार होत नाहीत. त्यामुळेच ते आरोग्यवर्धक समजलं जातं. लोणी कढवून त्यातील पाण्याचा अंश पूर्णत: काढून टाकल्यावर उरलेला सारभूत पदार्थ म्हणजे साजूक तूप. भारतात साजूक तुपाला आहारामध्ये 'राजेशाही' स्थान आहे. पश्चिमेकडील देशांमध्ये हा पदार्थ 'क्लॅरिफाइड बटर' या नावाने ओळखला जातो. साजूक तुपात १०० टक्के फॅट्स आणि ९०० कॅलरीज आहेत. एक चमचा तुपात (म्हणजे एक टेबल स्पून) १३ ग्रॅम फॅट्स, आणि ११७ कॅलरीज असतात. सर्वसाधारणपणे रोज दोन लहान चमचे किंवा पळी (१० मिली) साजूक तूप मोठयांच्या आहारात सुचवलं जातं. साजूक तूप हे संपृक्त चरबीयुक्त असलं तरी त्यात आरोग्यदायी घटक असल्याचं संशोधन झालं आहे. त्यामुळे हल्ली साजूक तुपाचा, तोही गाईच्या दुधापासून बनवलेल्या तुपाचा वापर आहारात केला जातो. त्यातील काही आरोग्यदायी घटक निदर्शनास आले आहेत. आयुर्वेदशास्त्राने साजूक तुपाला ओजवर्धक तसंच आयुष्यवर्धक म्हटलं आहे. फायदे >> गाईच्या तुपात म्हशीच्या तुपापेक्षा अधिक 'अ' जीवनसत्त्व आहे. साजूक तुपामध्ये रेटिनॉल व बेटाकेरोटीन हे घटक आहेत. हे पौष्टिक घटक डोळयांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम समजले जातात. >> २०१० मध्ये झालेल्या एका संशोधनानुसार साजूक तूप हे रक्तातील सर्वात वाईट कोलेस्टेरॉल कमी करतं, तसंच चांगलं कोलेस्टेरॉल (एचडीएल) वाढवतं. बाजारात मिळणारं वनस्पती तूप (डालडा) हे मात्र बरोबर याच्या उलट काम करतं. >> साजूक तुपात कोलेस्टेरॉल आहे, परंतु ते शरीरात गेल्यावर परावर्तित होत नाही. त्यामुळे ते घातक नाही, असं काही शास्त्रज्ञ मानतात. >> तुपातील मेद हे अस्थिर स्वरूपातील समजलं जातं. पण साजूक तुपातील मेद हे अत्यंत स्थिर स्वरूपाचं आहे. त्यामुळे तळण्याच्या प्रक्रियेत हे मेद विजातीय घटक (ऑक्सिडंट्स) तयार करत नाही. कोणी खाऊ नये उच्च रक्तदाब, धमनीविकार, हायहोमोसिस्टीन, अर्धागवात, अमिबायसिस हे विकार असलेल्यांनी साजूक तूप खाऊ नये. अतिस्थूल, बैठं काम करणा-यांनी साजूक तूप जपून खावं. Read More »नैवेद्य बाप्पांचे, समाधान आप्तांचे
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. विद्येच्या आराध्य दैवताचं स्वागत कसं करायचं, याचे बेत आखले जात आहेत. बाप्पा आणि गौराईचा नैवेद्य तसंच प्रसादासाठी गोड काय करायचं, यावर घरोघरी चर्चा रंगत आहेत. गणपतीचा पहिला दिवस वगळता इतर दिवशी पारंपरिक पद्धतीचे मोदक, पुरणपोळया, तीच ती शेवयांची खीर, शेवयांचा शिरा करण्यापेक्षा पुढील पदार्थ करून पाहा. या पदार्थाच्या निराळेपणामुळे गृहिणींच्या पाककौशल्याची नक्कीच तारीफ होईल. अजूनही बालपणीच्या गणेशोत्सवाच्या आठवणी चांगल्याच लक्षात आहेत. खरं तर घरचा हक्काचा गणपती गावी येतो. शाळेला सुट्टी नसल्यामुळे गावी गणपतीला जाण्याचा योग आलाच नाही. पण गणपतीची मजा लुटली राहत्या चाळीमध्ये. चाळीत तिघांकडे गणपती यायचे. नागपंचमीपासून महिनाभर आधी 'चवथीच्या सणाला' (गणेश चतुर्थी) सुरुवात व्हायची. गणेशमूर्ती बनवणा-या कारागिराकडे नागपंचमीच्या दिवशी अडगळीत ठेवलेला पाट स्वच्छ धुऊन रंगकाम करून ठेवला जाई. या पाटावर बसून गणपती कधी येतोय, असं व्हायचं. दादरच्या ज्या बालमोहन विद्यामंदिर शाळेत माझं शिक्षण झालं, त्या शाळेच्या वाटेवर गणपतीची चित्रशाळा होती. शाळेत जाता जाता आम्ही मुलं-मुली मिनिटभर तरी चित्रशाळेत रेंगाळायचो. गणपतीची माती मळणं, साचे तयार करणं, साच्यातून काढलेल्या गणपतीला पॉलिश करणं, पांढरा प्रायमर रंग काढणं, मग बाकीचं रंगकाम, नजर उघडणं.. अखरेच्या दिवसापर्यंत अशी अनेक कामं हातघाईवर आलेली असायची. त्या सा-या सुबक मूर्तीच्या जन्माचे जणू आम्ही साक्षीदारच असायचो. जसजशा मूर्ती पूर्णत्वाकडे झुकायला लागत.. तसतसा अंगात चवथीचा सण भिनायला लागे. आधी सांगितल्याप्रमाणे मुंबईच्या घरी जरी गणपती येत नसला तरी, आईला प्रश्न पडे.. यंदा काय नैवेद्य करायचा. ती शेजारपाजारच्या घरच्या गणपतीला फुलं आणि नैवेद्य दाखवून श्रावण सोडे. गणपतीला दुर्वा-फुलं वाहिली की, श्रावण महिन्याचं पुण्य लागतं ही तिची भाबडी श्रद्धा. (अजूनही आईची ही श्रद्धा कायम आहे.) नैवेद्याला काय वेगळं करायचं.. यावरही ती बराच विचार करे. बाहेरचं खाण्यापेक्षा घरगुती पौष्टिक पदार्थ पोटात गेले पाहिजेत..यावर तिचा जास्त विश्वास. असो. आई आजही गणपतीसाठी विविध प्रकारचा नैवेद्य तयार करते. त्यातील काही निवडक पाककृती. साहित्य – एक मोठं रताळं, अर्धा कप खवा, अर्धा ते पाऊण कप खडीसाखरेची पिठीसाखर, दोन चमचे साजूक तूप, दुधात भिजवलेल्या केशरकाडया, जायफळ आणि वेलची पूड. पेढयांवर सजावट करण्यासाठी चारोळी आणि पिस्ते काप, चवीपुरतं कणभर मीठ. कृती - प्रथम रताळी पाणी न घालता उकडून घ्यावं. नंतर किसून घ्यावं. कढईत तूप घालून त्यात किसलेलं रताळ परतून घ्यावं. नंतर त्यात किसलेला खवा घालावा. कढईतलं मिश्रण अशा रीतीने परतून घ्यावं की, खवा आणि रताळं हे पदार्थ एकमेकांत एकजीव झाले पाहिजेत. नंतर त्यात पिठीसाखर घालावी. मिश्रण साधारण घट्ट होईपर्यंत आटवावं. वेलचीपूड, दुधात भिजवलेलं केसर दुधासकट घालावं. कणभर मीठ घालावं. मिश्रण थोडं थंड झाल्यावर पेढे वळावेत. वरून चारोळी आणि पिस्ते काप लावावेत. फायदे - रताळयामध्ये कबरेदकांचं प्रमाण भरपूर आहे. बारीक अंगकाठीच्या व्यक्तींनी रताळयापासून बनवलेले पदार्थ आवर्जून खावेत. जीवनसत्त्व 'अ', 'ब' आणि तंतुमय पदार्थ हेही पौष्टिक अन्नघटक रताळयात आढळतात. गोडसर असल्यामुळे लहान मुलांना आवडतं. यात घातलेल्या केशरामुळे शरीर तसंच त्वचेचं अंतर्बाह्य सौंदर्य राखलं जातं. रक्तप्रवाह सुरळीत करण्याचा गुणधर्म केशरात आहे. हृदयाचंही अरोग्य केशरामुळे उत्तम टिकतं. कोणत्याही पदार्थात बाहेरचे कृ त्रिम रंग वापरण्यापेक्षा केशरासारखे नैसर्गिक रंग वापरावेत. लाल भोपळयाचा कलाकंद साहित्य – एक कप लालबुंद भोपळयाचा किस, एक चमचा तूप, दोन कप सायीसकट दूध, अर्धा कप साखर, दोन चमचे फार आंबट नसलेलं दही, तीन चमचे मिल्क पावडर, वेलची पूड. कलाकंदावर सजावट करण्यासाठी सोललेल्या लाल भोपळयाच्या बिया किंवा पिस्ता काप, चवीपुरतं कणभर मीठ. कृती – प्रथम लाल भोपळा किसावा. तो तुपावर परतून घ्यावा. नंतर त्यात दूध, मिल्क पावडर घालावी. मिश्रण सतत ढवळत राहावं. उकळी येताच त्यात दही फेटून घालावं. म्हणजे दूध हळूहळू फाटेल. त्याचे कणकण बनतील. तेव्हा कणभर मीठ घालावं. जरूर वाटल्यास कडेने थोडं तूप सोडावं. शेवटी वेलची पूड घालावी. तूप लावलेल्या ट्रेमध्ये हे मिश्रण घालावं. वडया पाडाव्यात. वरून भोपळयाच्या बिया आणि पिस्ता काप लावावा. फायदे - नारिंगी तसंच लाल रंगाच्या भाज्या, फळं ही डोळयांच्या आरोग्यासाठी उत्तम समजली जातात. याला अपवाद लाल भोपळाही नाही. जीवनसत्त्व 'अ', तंतुमय पदार्थ या आहारघटकांचं जास्त प्रमाण भोपळयात आहे. त्यामुळे पोट तसंच डोळयांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी भोपळयाचे पदार्थ खावेत. भोपळयांच्या बियांमध्ये जीवनसत्त्व ब-६ असतं, जे त्वचेसाठी चांगलं असतं. साहित्य - अर्धा कप कच्चा राजगिरा, दोन कप उसाचा ताजा रस, एक ते दोन चमचे गूळ, दोन ते तीन चमचे मगज पेस्ट, वेलची पूड, एक चमचा साजूक तूप, दोन ते तीन लवंगा, दोन चमचे किसमिस, आवडत असल्यास काजूचे तुकडे, चवीपुरतं किंचितसं मीठ. कृती - राजगिरा स्वच्छ धुऊन चार ते पाच तासांसाठी भिजत घालावा. नंतर कुस्करावा. हा राजगिरा दोन ते तीन शिटयांवर मऊ शिजवावा. पॅनमध्ये तूप घालावं. त्यात लवंगा घालाव्यात. लवंगांचा खमंग सुगंध येऊ लागल्यावर त्यात उकडलेला राजगिरा घालून परतावा. नंतर पुन्हा त्यात गूळ घालावा. पुन्हा एकदा मिश्रण परतून घ्यावं. मगज पेस्ट काजू-किसमिस घालून एकत्र करावी. शेवटी उसाचा रस घालावा. दोन ते तीन उकळया येऊ द्याव्यात. खिरीला उकळी येताना त्यात कणभर मीठ घालावं. खिरीचा गॅस बंद करावा. थंड झाल्यावर वेलची आणि जायफळ पूड घालून सव्र्ह करावी. गरमागरम पु-यांबरोबर ही खीर एकदम चविष्ट लागते. फायदे - राजगि-यात लोह, कॅल्शियम तसंच कबरेदकं (काबरेहायड्रेट्स) या पोषण घटकांचं प्रमाण विपुल आहे. वजन कमी करणा-यांनी राजगि-याचे पदार्थ जरूर खावेत. राजगि-यामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो. उसात 'फ्रुक्टोज शुगर' नावाची चांगल्या दर्जाची शर्करा आहे. या रसात लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, जीवनसत्त्व 'क' हे खनीज तसंच जीवनसत्त्व पौष्टिक घटकांचं प्रमाण पुरेपूर आहे. उसाच्या रसातून मेंदूला लवकरात लवकर साखर पोहोचते. मगज म्हणजे भोपळा, कलिंगड, टरबूज या फळांच्या बियांचा आतला गर. हा गर आधी भाजला जातो. त्यानंतर मगज पेस्ट बनवली जाते. या गरात चांगल्या दर्जाचे स्निग्ध पदार्थ आहेत. लवंगांमुळे भूक वाढते. पदार्थ चांगला पचतोही. शिवाय पदार्थाला सुगंधही प्राप्त होतो. पदार्थामधला आणि शरीरातला कफदोष हा लवंगांमुळे कमी होतो. गुळामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं. ते शरीरासाठी चांगलं. Read More »स्थूलपणा आणि आयुर्वेद
बदलत्या जीवनशैलीमुळे अलीकडे तारुण्यातच लठ्ठ होण्याचं प्रमाण वाढलं आहे. शरीरातील प्रत्येक अवयव ही ईश्वराने दिलेली देणगी आहे. त्याचा योग्य वापर करायला शिकलं पाहिजे. अन्यथा वेगवेगळे विकार आपली सोबत करू शकतात. स्थूलपणावर आयुर्वेदात उपाय आहेत. त्याचा वापर केल्यास आपलं शरीर बेढब होणार नाही. सडपातळ, लवचिक शरीर हे तारुण्याचं एक लक्षण असतं. ही देणगी नसणारी व्यक्ती तरुण असली तरीही तरुण वाटत नाही. आजकाल तर फिजिकल फिटनेसचा जमाना आहे. त्यामुळे शरीर सडपातळ ठेवण्याकडे, त्यासाठी व्यायाम, डाएटिंग वगरे करण्याकडे अनेकांचा कल असतो. आयुर्वेदही या दृष्टीने व्यक्तीला अत्यंत उपयुक्त मदत करू शकतो. वेळीच काळजी घेतल्यास लठ्ठपणा आटोक्यात आणता येतो. मात्र त्यासाठी आहार, विहार आणि उपचार यांची योग्य दिशा ठरवायला हवी. काही नियमांचं काटेकोर पालन करायला हवं. पथ्यपाणी, व्यायाम, औषधी उपाययोजना यांचा विचार रुग्ण अगोदर का करीत नाहीत? स्थूलपणाचं मूळ कारण कफ या दोषाच्या प्रवत्तीत आहे. कफ म्हणजे मंद, सावकाश, मुंगीच्या गतीने हालचाल. त्यामुळे मेद, चरबी वाढतेय हे लक्षात येईपर्यंत बराच वेळ झालेला असतो. त्यानंतर मनुष्य थोडा आळस आणि चुकीचे उपचार करतो. मग मात्र रोग पक्कं घर करून बसतो. काही पालकांना त्यांची मुलं लठ्ठ होत आहेत हेच पटत नाही. आपली मुलं सुदृढ आहेत असंच त्यांना वाटतं. सुदृढ आणि सुजलेलं शरीर यातील फरक त्यांच्या लक्षात येत नाही. आनुवंशिकता आणि बीजदोष ही लठ्ठपणाच्या दृष्टीने गुंतागुंतीची कारणं असतात. मुलांकडे नीट लक्ष देणं, त्यांच्यावर अवाजवी बंधनं घालणं यामुळेही त्यांच्या शरीरात चरबी साठू लागते. आजचं जीवन यांत्रिक बनलं आहे. त्यामुळे अनेक गोष्टी विनाश्रम मिळण्याची व्यवस्था झाली आहे. व्यायामाचा, हालचालीचा अभाव, बैठं काम आणि सुखासीन जीवन हा अनेकांचा जीवनक्रम बनला आहे. मेद वाढवणारी दुपारची झोपही त्यात येतेच. थंड, जड, गोड, आंबट खारट पदार्थाचा अतिरेकी वापरही लठ्ठपणा वाढवायला कारण ठरतो. मेदवर्धक आणि मांसवर्धक पदार्थाचा अतिरेकी आहारही त्यात भर घालतो. कारण त्यामुळे फक्त मेद, मांसधातूचं पोषण अधिक होतं. फास्ट फूडच्या नावाखाली अलीकडे अनेक जण पोटात वाट्टेल ते ढकलत असतात. त्यात मांसाहार, मद्यपान, आइस्क्रीम, मेवामिठाईचा आस्वाद यांची भर पडते. तेलकट, तूपकट आहारही लठ्ठपणाच्या दृष्टीने हानिकारक असतो. खाण्यात गहू, हरभरा, कडधान्य, कांदा, बटाटा, साखर यांचं प्रमाण वाजवीपेक्षा जास्त असणं हेही मेदवाढीचं एक महत्त्वाचं कारण ठरतं. अनेक स्त्रियांना विटाळ कमी जातो, पाळी अनियमित असते. त्यामुळे त्यांचं वजन वाढतं. पाळी चुकवण्यासाठी गोळ्या, औषधं घेणं किती हानिकारक ठरत असेल याची कल्पना केलेली बरी. उपाययोजना करण्यासाठी या कारणांचा शोध घेणं आणि लक्षणं समजावून घेणं अर्थातच आवश्यक आहे. लठ्ठपणाच्या विकाराची काही प्रमुख लक्षणं उंचीच्या मानाने वजन जास्त असणं, पोट, छाती, कुल्ले, मांडया मान या ठिकाणी बेढबपणा येणं, थोडयाशा श्रमाने धाप लागणं, पायावर, चेह-यावर सूज येणं, लघवी कमी होणं, लघवीला पुन्हा पुन्हा जावं लागणं, स्त्रियांना विटाळ कमी जाणं, अंगाला खाज सुटणं, त्वचा फाजील स्निग्ध दिसणं, कार्यशक्ती कमी होणं, विश्रांती घ्यावीशी वाटणं, जास्त झोप येणं, अंगाला घाण वास मारणं अशी लठ्ठपणा येण्याची लक्षणं असू शकतात. लठ्ठपणावर उपाय करायला सुरुवात करण्यापूर्वी प्रथम वजन पाहणं आवश्यक आहेच, पण त्याचबरोबर कोणते स्नायू शिथिल आहेत, कुठे चरबी वाढली आहे हेही पाहायला हवं, त्यामुळे नेमका व्यायाम सुचवणं सोपं जातं. मलमूत्र, घाम यांचा वेग आणि परिणाम पाहणंही आवश्यक आहे. लागलेली भूक, घेतलेला आहार आणि प्यायलेलं पाणी यामानाने मल, मूत्र आणि घाम यांचा निचरा होत नसेल तर त्याचा परिणाम वजन वाढण्यात होणारच. स्त्रियांच्या बाबतीत पाळीच्या अनियमितपणाचा हाच परिणाम संभवतो. लठ्ठपणा, स्थूलता किती जास्त आहे हे ठरवण्यासाठी आनुवंशिकतेचा विचार उपयोगी पडतो. मलमूत्र साफ होण्यासाठी शोधनाचे उपचार उपयोगी पडतात. स्त्रियांची पाळी नियमित होण्यासाठी उपचार करावे लागतात. शरीरातून पुरेसा घाम निघत नसेल तर त्यासाठीही उपाय योजता येतात. रुक्ष अभ्यंग, व्यायाम यांचे नाना प्रकार उपयोगात आणता येतात. मात्र उपवास, लंघन, अशा उपायांनी थकवा, रसक्षय आणि पंडुता येणार नाही याची काळजी घ्यायला हवी. आयुर्वेदात लठ्ठपणावर काही अनुभविक उपचार आहेत. मलप्रवृत्ती साफ होत नसल्यास कपिलादी वटी सहा गोळ्या आणि एक चमचा एरंडहरीतकी चूर्ण गरम पाण्याबरोबर घ्यावं. त्रिफळा गुग्गुळ आणि आरोग्यवर्धिनी प्रत्येकी सहा गोळ्या अशा बारा गोळ्या दोन वेळा रिकाम्या पोटी सकाळी आणि सायंकाळी बारीक करून गरम पाण्याबरोबर घ्याव्यात. पाणी पिऊनही लघवी नियमित होत नसल्यास वरीलप्रमाणे औषधं घ्यावीत. रसायन चूर्ण सकाळी आणि सायंकाळी एक चमचा घ्यावं. मासिक पाळीत गर्भाशयाची स्वच्छता व्यवस्थित होत नसल्यास कुमारी आसव चार चमचे समभाग पाण्याबरोबर दोन्ही जेवणांनंतर घ्यावं. स्थूल शरीराबरोबर गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, संधिवात, आमवात ही लक्षणं असल्यास त्रिफळा गुग्गुळ, लाक्षादि गुग्गुळ, सिंहनाद गुग्गुळ आणि आरोग्यवर्धिनी प्रत्येकी तीन गोळ्या बारीक करून सकाळी आणि सायंकाळी रिकाम्या पोटी गरम पाण्याबरोबर घ्याव्यात. दोन्ही जेवणांनंतर सौभाग्य सुंठ अर्धा चमचा घ्यावी. पंडुता, मुखशोध, पादशोध या तक्रारी असल्यास चंद्रप्रभा, आरोग्यवर्धिनी, गोक्षुरादि गुग्गुळ, त्रिफळा गुग्गुळ आणि लाक्षादि गुग्गुळ प्रत्येकी तीन गोळ्या बारीक करून गरम पाण्याबरोबर घ्याव्यात. शुद्ध गुग्गुळ गोळ्या सकाळी, सायंकाळी आणि रात्री तीन वेळा अशा सहा गोळ्या पाण्यात विरघळवून घ्याव्यात. यामुळे शरीरात उष्णता वाढते. ज्यांना मानवेल त्यांनीच घ्यावं. चांगला कात तीन ग्रॅम, गुग्गुळ दहा ग्रॅम असं सकाळ, सायंकाळ दोन वेळा गरम पाण्याबरोबर घ्यावं. पुरेसा घाम येत नसल्याने स्थूलपण वाढलेला असल्यास त्रिफळा, वाविडग चित्रक, नागरमोथा, दशमुळं, बाहवा, एरंडमूळ, देवदार आणि दारुहळद प्रत्येकी दोन ग्रॅम अशी एक पुडी चार कप पाण्यात उकळून त्याचा काढा एक कप उकळवून गाळावा. तो सकाळी घ्यावा. पुन्हा उरलेला चोथा सायंकाळी पाण्यात उकळून आटवावा. अर्धा कप उरल्यावर गाळून घ्यावा. नुसता उकडलेला दुध्या भोपळा किंचित मिरपूड टाकून घ्यावा. ज्वारीची भाकरी आणि पालेभाज्यांचं सूप यावर राहण्याचा प्रयत्न करावा. आयुर्वेद उपचार घेताना त्याच्याबरोबर पथ्य पाळणंही आवश्यक असतं. लठ्ठपणावर उपचार सुरू केल्यावर गोड, आंबट, थंड आणि जड पदार्थ आहारातून बंद करावेत. पाणीसुद्धा कमी प्यावं, तेही उकळून गार केलेलं असावं. वनस्पतीतूप, दही, साखर, बटाटा, कांदा, चवळी, मटकी, वाटाणा, हरभरा, गहू, तूप, दूध, पोहे, चुरमुरे, तळलेले पदार्थ, मांसाहार लोणची, पापड, थंड पेयं, आइस्क्रीम, चॉकलेट आदी गोष्टीही कटाक्षाने टाळाव्यात. एवढे पदार्थ टाळल्यावर खायचं काय, हा प्रश्न पडला असेल. भाजलेल्या, ज्वारीची भाकरी, मुगाची पातळ आमटी, दुध्याभोपळा, कोहळा, दोडका, पडवळ, कारलं, शेवगा, राजगिरा या भाज्यांचा आहारात वापर करावा. पाणी जेवणाअगोदर प्यावं. जेवणानंतर पिऊ नये. दुपारची झोप सुस्ती वाढवते. बैठं काम टाळावं. पण पर्यायच नसेल तर त्याला पुरेशा व्यायामाची जोड द्यावी. रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपू नये. शतपावलीची सवय चांगली. पण ती पंधराशे ते अडीच हजार पावलांची असावी. लठ्ठपणावर उपचार सुरू केल्यावर साध्या साध्या बाबतीत दक्षता बाळगल्यास त्याचा खूप उपयोग होतो. उदाहरणार्थ, भूक आणि तहान मारायला शिकावं. ठरवून काम, व्याप, श्रम यामध्ये सतत बुडलेलं असावं. शरीरातून भरपूर घाम निघाला पाहिजे. दुपारची झोप तर टाळावीच, पण अनुषंगाने येणारं विलासी आणि ऐषारामी जीवनही न जगण्याचा निर्धार करावा. लठ्ठपणा हा तारुण्याची हानी करणारा असतो. म्हणून ते टिकवायचं असेल तर लठ्ठपणा शरीराचा ताबा घेणार नाही हे कटाक्षाने पाहायला हवं. Read More » | ||||
|
Tuesday, September 3, 2013
FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मà¤à¥à¤¤ मसà¥à¤¤ तà¤à¤¦à¥à¤°à¥à¤¸à¥à¤¤
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment