व्यंगत्वाला पांगळ बनवणारे मेजर जनरल इयान कार्डोझो...
मेजर जनरल इयान कार्डोझो हे नाव ऐकलं की पहिला प्रश्न मनात येईल कि कोणाच नाव हे? भारतीय आहेत का? कारण आपली भारतीय असण्याची व्याख्या आधी आडनावा वरून सुरु होते. आपल्याकडे नको त्या लोकांना हिरो बनवण्याची घाई असते. १० शतक मारणाऱ्या खेळाडू वर शाळेत धडा येतो किंवा १०० चित्रपट करणारा हिरो मिलेनियम सुपरस्टार बनतो. कोणत्यातरी हिरोचा मुलगा बोलला की पडला ह्याची ब्रेकिंग न्यूज होते पण आपल्या जिद्दी पुढे अपंगत्वाला पांगळ करणारे मेजर जनरल इयान कार्डोझो मात्र भारतीयांना कधीच दिसत नाहीत आणि त्यांची ओळख करून घेण्याच्या फंदात भारतीय अडकत नाहीत.
इयान कार्डोझो ५ गोरखा रायफल मध्ये १९७१ सालच्या युद्धाच्या वेळी मेजर ह्या हुद्यावर कार्यरत होते. युद्धात मेजर इयान कार्डोझो ह्यांचा पाय लँड माईन वर पडला. त्यावेळी झालेल्या स्फोटात त्यांच्या पायाला प्रचंड जखमा झाल्या. त्यांना त्या अवस्थेत जवळच्या हॉस्पिटल मध्ये नेण्यात आल. त्यांच्या पायाच्या जखमा इतक्या होत्या की पायाला गँगरीन झालं होतं. पाय कापण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नव्हता. तेव्हा मेजर इयान कार्डोझो त्यांनी तिथल्या डॉक्टर ला विचारलं तुमच्याकडे मॉर्फीन आहे का बेशुद्ध करण्यासाठी? डॉक्टर म्हणाले नाही. मग त्यांनी विचारलं, तुम्ही माझा पाय कापू शकाल का? डॉक्टर म्हणाले आमच्याकडे ऑपरेशन करण्यासाठी काहीच साधन नाहीत की आम्ही ऑपरेशन करू शकू. एका सेकंदाचा विलंब न लावता त्यांनी जवळच असलेल्या आपल्या सैनिकाला बोलावलं आणि विचारल, “माझी खुकरी कुठे आहे”? त्याने क्षणाचा विलंब न लावता त्याने त्यांची खुकरी त्यांना आणून दिली. त्या सैनिकाला मेजर इयान कार्डोझो ह्यांनी ऑर्डर केली की ह्या खुकरी ने माझा पाय विलग कर.
रक्ताच्या थारोळ्यात पूर्ण पाय आणि असंख्य वेदना होत असताना त्या सैनिकाला आपल्या ऑफिसर चा पाय खुकरी ने कापण्याच धैर्य झाल नाही. त्याने तसं करण्यास नकार दिला. दुसऱ्या क्षणात मेजर इयान कार्डोझो ह्यांनी खुकरी आपल्या हातात घेतली. स्वतःच्या हाताने आपला गँगरीन झालेला पाय कापल्यावर आपल्या सैनिकाला ऑर्डर केली की, जा आता ह्याला दफन कर.... शुद्धीत असताना स्वतःचा पाय स्वतःच्या हाताने कापायला काय धैर्य लागत असेल ह्याचा आपण विचार पण करू शकत नाही. इथवर मेजर इयान कार्डोझो थांबले नाहीत. आता कापलेल्या भागावर शस्त्रक्रियेची गरज होती. कामाडींग ऑफिसर ने त्या वेळेस म्हंटल कि, “तू खूप लकी आहेस. आत्ताच आम्ही युद्धात एका पाकिस्तानी सर्जन ला बंदी बनवलं आहे. तो तुझ्यावर शस्त्रक्रिया करेल. त्यावर मेजर इयान कार्डोझो ह्यांनी सांगितल, माझा जीव गेला तरी चालेल पण माझ्यावर कोणताही पाकिस्तानी डॉक्टर शस्त्रक्रिया करणार नाही. मला माझा भारत परत हवा आहे..... अरे कुठून येते ही देशभक्ती? हा जाज्वल्य देशाभिमान. आपण खरचं करंटे आहोत. आपल्यात ह्याच्या एक अंशाचा पण देशाचा अभिमान नाही.
मेजर इयान कार्डोझो ह्यांना दुसरीकडे हलवण्यासाठी युद्धामुळे चॉपर हि मिळत नव्हत. तेव्हा दोन अटींवर आपल्या कामाडींग ऑफिसर ला स्वतःवर शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली. त्यातली पहिली गोष्ट होती. ती म्हणजे एक वेळ मेलो तरी चालेल पण माझ्या रक्तात पाकिस्तानी माणसाच रक्त मिसळणार नाही. दुसरी म्हणजे पूर्ण शस्त्रक्रियेच्या वेळी कामाडींग ऑफिसर म्हणजे ते स्वतः ती पूर्ण होई पर्यंत समोर उभे रहातील. ह्या मागे कारण होत की, त्याकाळी भारतीय सैनिकांना शस्त्रक्रियेच्या वेळी त्रास देण्याचे प्रकार पाकिस्तानी डॉक्टर कडून घडले होते. ह्या दोन अटींचा मान ठेवून मेजर मोहम्मद बशीर ह्यांनी मेजर इयान कार्डोझोवर शत्रक्रिया केली.
त्या पायाच्या जागेवर मेजर इयान कार्डोझो ह्यांना लाकडी पाय बसवण्यात आला. युद्ध संपल पण पुढे काय? डॉक्टरांनी मेजर आपल्या जबाबदाऱ्या पूर्वी सारख्या पूर्ण करू शकणार नाही अस म्हणत व्यंगत्वाची जाणीव त्यांना करून दिली. पण मेजर नी हार मानली नाही. त्यांनी पुन्हा एकदा नव्या जोमाने आपली शारीरिक क्षमता वाढवायला सुरवात केली. एक लाकडाचा पाय असणारा पण दोन सामान्य पाय असणाऱ्या लोकांपेक्षा वरचढ ठरू शकतो. हे सिद्ध करण्याचा मेजर नी चंग बांधला. भारतीय सेनेच्या शारीरीक चाचण्यातून जाण्यास डॉक्टरांनी त्यांना मनाई केली. पण त्यांच्या इच्छे आणि जिद्दी पुढे डॉक्टर नमले. त्या चाचणीत मेजर इयान कार्डोझो ह्यांनी ७ ऑफिसर ना मागे टाकले. हे सातही ऑफिसर सामान्य पाय आणि फिजिकली फीट असणारे होते.
एकदा त्यांनी आर्मी च्या व्हाईस चीफ ना विचारलं मी अजून काय करू शकतो? त्यावर ते म्हणाले माझ्यासोबत जम्मू आणि काश्मीर ला इथून चल. आर्मी व्हाईस चीफ ६००० फुट उंचीवर हेलिकॉप्टर ने पोहोचण्या आगोदर मेजर इयान कार्डोझो हे तो रस्ता पायी चढून गेले. हे बघून त्यांची केस आर्मी व्हाईस चीफ नी त्या काळी भारताचे सैन्य प्रमुख टी.एन.रैना ह्यांच्याकडे पाठवली. सैन्य प्रमुखांनी त्यांना त्यांच्या सोबत लडाख ला येण्याचा आदेश दिला. लडाख ला डोंगरात आणि बर्फात चालताना बघून सैन्य प्रमुखांनी त्यांना बटालियन ( एका बटालियन मध्ये १०० ते २०० सैनिक असतात.) ची कमांड दिली. अश्या प्रकारे भारतीय सैन्यातील पहिले अपंग कमांडिंग ऑफिसर ते बनले. त्यानंतर ही अनेक स्पर्धेत आणि कामात एखाद्या धडधाकट ऑफिसर ला लाजवेल अशी कामगिरी त्यांनी केली. त्यांच्या ह्या अतुलनीय जिद्दी ला सलाम म्हणून त्यांना ब्रिगेड ची जबाबदारी देण्यात आली. ( एका ब्रिगेड मध्ये ४००० इतके सैनिक असतात.) आपला स्वतःचा पाय का कापला अस विचारल्यावर त्यांनी सांगितल की,
'मला लाचार व्हायचं नव्हत. त्या तुटलेल्या पायच ओझ मला व्हायचं नव्हत. पाय गेला म्हणून मी संपलो नव्हतो. माझ्यात तीच धमक बाकी होती. माझ्यात तोच सैनिक जिवंत होता. माझ्यातली विजीगिषु वृत्ती जिवंत होती. मग घाबरायचं कशाला?'
आपल्या व्यंगत्वाला त्यांनी आपल हत्यार बनवलं. मग जे मिळवलं तो इतिहास आहे. ह्या हिरोने तरुण पिढीला जो संदेश दिला आहे. तो त्यांच्या शब्दात,
“You have only one life to live, live it to full. You have 24 hours in a day: Pack it up”.
व्यंगत्वाला ही पांगळ बनवणाऱ्या ह्या जिगरबाज, शूरवीर, पराक्रमी सैनिकी अधिकाऱ्याला माझा साष्टांग दंडवत. देशभक्ती काय असते ते अश्या मेजर जनरल इयान कार्डोझो च आयुष्य बघितल्यावर कळते. तुम्ही दुसऱ्या मातीचे आहात सर. आम्ही करंटे म्हणून जन्माला आलो आणि तसेच जाऊ. पण व्यंगत्वाला ही पांगळ करणारे तुमच्या सारखे अधिकारी भारतीय सैन्यात आहेत म्हणून आज भारत अखंड आहे. तुमच्या सारख्या अधिकाऱ्यांना माझा पुन्हा एकदा साष्टांग दंडवत आणि कडक सॅल्यूट.
जय हिंद!...