Wednesday, August 7, 2013

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

अश्रूंचे झाले काटे!

अश्रू म्हणजे आपल्या भावनांचं प्रतीक! कधी आपण दुखावलो गेलो की आपल्या डोळ्यातून चटकन अश्रू बाहेर पडतात, तर कधी आपल्याला अत्यानंद झाला की 'आनंदाश्रू' येतात. दु:ख वा आनंदाने आपले डोळे भरून येत असले की, 'इमोशनल पर्सन'च्या वर्गात आपली गणती होते. हे 'इमोशनल' असणं आपल्या कमकुवत मनाचं लक्षण असल्याचं अर्थातच स्वत:ला 'सो कॉल्ड' स्ट्राँग म्हणवणा-यांचं म्हणणं! पण जर तुमच्या डोळ्यातून अश्रू येत नसतील तर तोही एक आजारच आहे, बरं का! गमतीचा भाग सोडला तर अलीकडे डोळ्यात अश्रू न येण्याच्या म्हणजेच डोळे कोरडे होण्याच्या समस्येत वाढ होत आहे. यालाच 'ड्राय आय सिंड्रोम' असं म्हटलं जातं.

डोळे कोरडे होण्याच्या समस्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याला पुष्टी मिळाली ती अलीकडे औषधांच्या दुकानात डोळे कोरडे होण्याच्या समस्येवर विविध प्रकारचे आय-ड्रॉप्स घेणा-यांची संख्या वाढत असल्याच्या एका संशोधनाची. विविध समस्यांवर वेगवेगळे आय-ड्रॉप्स सध्या डोळ्यांच्या समस्येने ग्रस्त लोक खरेदी करत आहेत. डोळ्याला खाज येणे, जळजळणे, कोरडे होणे या समस्येसह डॉक्टरांचा धावा करणा-यांची संख्या वाढत आहे. हे होतंय कशाने? हा ना कोणत्या संसर्गाचा प्रकार ना अ‍ॅलर्जीचा. विशेष म्हणजे डॉक्टर मंडळी या समस्येसाठी जबाबदार ठरवत आहेत, स्मार्टफोन आणि कम्प्युटर वर्किंग स्टाइलला..

'आय केअर इंडस्ट्री'च्या अंदाजपत्रकानुसार, जगभरातील अध्र्याहून अधिक लोकसंख्या डोळे कोरडे होण्याच्या समस्येने ग्रस्त आहे. दृष्टिदोषानंतर सध्याची सर्वाधिक संख्येने केली जाणारी आरोग्य तक्रार म्हणजे डोळे कोरडे होणं ही असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. वयोमानानुसार दृष्टी कमकुवत होते म्हणून वृद्धांमध्ये आणि रजोनिवृत्तीमुळे स्त्रियांमध्ये ही समस्या सर्वाधिक असल्याचं आतापर्यंत नेत्रचिकित्सकांचं म्हणणं होतं. पण आता केवळ स्त्रिया किंवा वृद्धच नव्हे, तर सर्वच वयोगटांतील स्त्री-पुरुष डोळ्यांच्या तक्रारी घेऊन येत असल्याचं चित्र दिसतं.

या वाढत्या समस्येचं कारण काय?
डोळ्यातील श्लेष्मा पटल (म्युकस मेम्ब्रेन) जे अश्रूनिर्मितीसाठी मुख्य घटकद्रव्य निर्माण करतं, ते वयानुसार कोरडं होत जातं. 'कॉर्निआ' नामक जर्नलमध्ये नुकतंच प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, डोळे कोरडे होण्याच्या समस्येचं मुख्य कारण आहे आद्र्र, दमट वातावरणात दीर्घकाळ आपण राहतो ते. उदा. वातानुकूलित कार्यालयं. दुसरं आणि अतिमहत्त्वाचं म्हणजे पापण्याही लवू न देता सतत कम्प्युटर आणि स्मार्टफोन स्क्रीनकडे पाहत राहणं. खरं तर लोक पापण्या लवणंच विसरले आहेत. आज असंख्य नोक-या अशा आहेत की, त्यात संपूर्ण दिवसभर कम्प्युटरकडे डोळे लावून बसावं लागतं, असे लोक डोळ्यांच्या समस्येने त्रस्त आहेत. आता खरं तर आपण आपल्या कम्प्युटर स्क्रीनवर एक स्टिकरच लावायला हवा, 'ब्लिन्क. पापण्या मिचकवा.. ' असा.

सर्वसामान्यत: माणसाने एका मिनिटात १२-१५ वेळा डोळे मिचकावले पाहिजेत. डोळे कोरडे होण्याच्या काही कारणांमध्ये स्वयंप्रतिकार रोग तसंच अ‍ॅण्टिस्टॅमिना आणि अ‍ॅण्टिडिप्रेसंट गोळ्यांचा वापर या गोष्टी कारणीभूत असतात. लसिकसारख्या काही डोळ्यांच्या शस्त्रक्रियांमध्ये तात्पुरती कोरडे होण्याची समस्या उद्भवते. कोरडया आणि वादळी हवामानामुळेही डोळे कोरडे होतात. कॉण्टॅक्ट लेन्सेस आणि डोळ्यांचा मेकअपही यासाठी कारणीभूत आहेच. काही डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की, कॉण्टॅक्ट लेन्स वापरणा-यांना जर कोरडया डोळ्यांची समस्या असेल तर डोळ्यांचा संसर्ग आणि सतत खाज होण्याची शक्यता अधिक असते.

कोरडया डोळ्यांचेही दोन मुख्य प्रकार पडतात. एक म्हणजे ऑक्स्ट्रक्टिव्ह सिंड्रोम. यात आपले डोळे आवश्यक अश्रूनिर्मिती करू शकत नाहीत. दीर्घकाळ हेच एकमेव कारण मानलं जात होतं. मात्र अलीकडील काही वर्षामध्ये अश्रूंचा वाईट दर्जा, त्यांची निकृष्ट स्र्वणक्षमता हेही कारण दिसू लागलं आहे. याला सिक्रेट्री सिंड्रोम म्हटलं जातं. अनेकांमध्ये या दोन्ही समस्या दिसतात.डोळ्यांचा पृष्ठभाग आच्छादणारी अशी एक संरक्षक अश्रूफित (प्रोटेक्टिव्ह टीअर फिल्म) ही मुख्यत: तीन घटकांपासून बनलेली असते.

बाह्य तैलस्तर हा डोळ्याचं बाष्पीकरण रोखतो. मधला असतो पाण्याचा स्तर. या स्तरात जेल स्वरूपातील म्युसिन नामक घटक काही प्रमाणात असतो, ज्याद्वारे डोळ्यांची बाह्य अश्रूफित धरून ठेवण्याचं काम केलं जातं. डोळ्यांच्या वरील आणि खालील पापण्यांमध्ये असणारी मेबोमिअन ग्रंथी डोळे पाणीदार राहण्यासाठी आवश्यक तैलनिर्मिती करत नाही, तेव्हा मध्य पातळीतील पाण्याच्या स्तरयुक्त अश्रूंचं मोठया प्रमाणात बाष्पीभवन होऊन डोळे कोरडे होण्याची समस्या निर्माण होते.

आपण जेव्हा जेव्हा डोळे मिटतो आणि जेव्हा आपल्या वरच्या पापण्यांचा खालच्या पापण्यांना स्पर्श होतो तेव्हा मेबोमिअन ग्रंथी तेल स्र्ववतात. या तैलस्तरामुळेच अश्रूफित स्थिरावते. जर आपण अर्धवट डोळे मिटले तर ही प्रक्रिया पूर्णच होत नाही. त्यामुळे डोळे पाणीयुक्त ठेवण्यासाठी आवश्यक तेल बाहेरच येत नाही. ते तेल पुन्हा वरच्या पापणीकडेच राहतं. तिथे त्यांचा जाड स्तर तयार होतो. त्यामुळे या तैल ग्रंथींचा प्रवाह आपोआप बंद होऊ लागतो. अनेकांना अर्धवट डोळे मिटण्याचीच सवय असते. आपल्याही नकळत आपण हे करत असतो, परिणामत: डोळे कोरडे व्हायला सुरुवात होते.

डोळे कोरडे होण्याची लक्षणं म्हणजे, रवाळ-खरखरीत वाटणं, जळजळणं किंवा खाज येणं, कधी कधी अंधुक दिसणं. यात अनेकदा एक सुरक्षात्मक तंत्र (प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम) म्हणून आपलं बोलकं शरीरच अधिक प्रमाणात डोळ्यातून पाणी बाहेर स्र्वतं. डोळे कोरडे होण्याच्या समस्येला हा प्रतिसाद असतो. अधिक गंभीर प्रकरणांमध्ये कोरडया डोळ्यांच्या पृष्ठभागावर उघडया नसांवर सूक्ष्म कणनिर्मिती होऊन डोळ्यात एकदम खुपल्यासारख्या वेदना होऊ शकतात.

याविषयी अधिक माहिती देताना ठाण्यातील रानडे सुपरस्पेशलिटी आय सेंटरच्या कॉर्निया अ‍ॅण्ड रिफ्रॅक्टिव्ह स्पेशलिस्ट, एम. एस. ऑप्थेल डॉ. माथंगी चारी-रानडे सांगतात, 'मधुमेह, उच्च रक्तदाब या जीवनशैलीनुसार होणा-या आजारांचं प्रमाण जसं वाढलंय, तसंच हे डोळे कोरडे होण्याच्या समस्येचं आहे. पूर्वी आपल्या देशात डोळ्यांचे आजार व्हायचे, ते कुपोषणामुळे. ती एक न्युट्रिशनल समस्या होती. आता मात्र बदलती जीवनशैली आणि तंत्रज्ञानामुळे हा आजार वाढला आहे. दिवसातून किमान एक रुग्ण ड्राय आय सिंड्रोमचा असतो. डोळ्यांच्या इतर समस्या घेऊन आलेल्यांमध्येही कमी-जास्त प्रमाणात ही समस्या आढळते. त्यानुसार आपण माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर असे भाग करू. बाहेरून फिरून आलं की डोळे लाल होऊन पुन्हा आपोआप बरे होतात हा माइल्ड प्रकार. ड्राय आय सिंड्रोमची ही अगदी सुरुवातीची स्टेज, जी अनेकांमध्ये दिसते.

त्यासाठी डोळ्याला गरम उबदार कपडयाची वाफ घेता येते. मात्र मॉडरेट आणि सिव्हिअर प्रकारच्या सिंड्रोममध्ये विशिष्ट उपचारपद्धती अवलंबली जाते. डोळ्याला गरम वाफ देऊन बंद झालेल्या नेत्रग्रंथीतील क्लॉग्स वितळले जाऊन ती उघडली जाते, याला हॉट फॉर्मेण्टेशन किंवा हॉट कॉम्प्रेशन म्हणतात. डोळ्यांना मसाज करण्याचं तंत्रही वापरलं जातं. मसाज मिळून बंद झालेला भाग मोकळा होतो. साचलेली घाण बाहेर आल्यावर ती स्वच्छ केली जाते. नंतर चांगली अश्रूनिर्मिती व्हावी यासाठी काजळासारखं अ‍ॅण्टिबायोटिक स्टिरॉइड लावलं जातं. यासोबत डोळ्यांवर अश्रू ड्रॉप्सही दिले जातात. त्याला 'टीअर सबस्टिटय़ुट्स' म्हटलं जातं. डोळे स्वत:हून अश्रूनिर्मिती करत नसल्याने हे कृत्रिमरीत्या तयार केलेलं रसायन अश्रूसारखं काम करतं.'

कोरडया डोळ्यांची समस्या गंभीर स्वरूपात असेल तर जेल ड्रॉप्स, ऑइंटमेंट वापराचा सल्ला दिला जातो. पण या उपचारात काही काळापुरतं अंधुक दिसतं, म्हणूनच जेल किंवा ऑइंटमेंट स्वरूपातील औषधं रात्रीच्या वेळीच वापरण्यास सांगितली जातात. काहींना रात्री झोपताना डोळे अर्धवट बंद करण्याची सवय असते ती चुकीची आहे, यासाठीही असे उपचार केले जातात. नेत्रग्रंथीचा दाह कमी करण्यासाठी स्टेरॉइड्स, ओमेगा थ्री फॅटी अ‍ॅसिडसारखी अ‍ॅण्टिइन्फ्लामेट्री औषधंही दिली जातात.

अशी विविध प्रकारची औषधं आणि उपचारपद्धती अवलंबण्यापेक्षा डोळ्यांची योग्य वेळी योग्य ती काळजी घेतली तर निरोगी 'दृष्टी' मिळू शकते. पण अर्थातच त्यासाठी हवी आरोग्याची 'दूरदृष्टी'!

Read More »

खजूर खाऊ, खूश होऊन जाऊ!

रमजानचा महिना सुरू आहेच आणि चातुर्मासालाही सुरुवात झाली आहे. आता श्रावण महिनाही लागेल. घरोघरी उपासतापासांना जोर चढेल. घरातल्या उपवासाच्या वातावरणाचा परिणाम लहान मुलांच्या डब्यातल्या पदार्थावरही होतो. म्हणून सणासुदीच्या दिवसांत मुलांचा डबा अधिक निगुतीने करण्याच्या काही टिप्स..

शाळेतला मुलांचा डबा हे कोणत्याही गृहिणीसाठी आव्हानच असतं. मुलांनाही तेच तेच खाण्याचा कंटाळा येतो. आता तर सणासुदीचे दिवस आले आहेत. मात्र सणासाठीचे सगळेच पदार्थ मुलांना शाळेत नेता येत नाहीत. त्यामुळे घरात उपवास असेल तर अप्रत्यक्षरीत्या मुलांनाही उपवास घडतो. एक प्रकारे मुलांचं हे कुपोषणच. खरं तर या दिवसांत खजुरापासून बनवलेले पदार्थ खावेत, म्हणजे मुलांना उपवास लागणार नाही आणि मुळातच पौष्टिक गुणधर्म असलेल्या खजुराने आरोग्यही चांगलं राहत.

रमजानचे दिवस असल्यामुळे बाजारात विविध प्रकारच्या खजुराची रेलचेल आहे. 'भूमी', 'पिंड', 'जायदी' आणि 'छुहारा' (सुलेमानी खजूर) हे खजुराचे चार प्रकार बाजारात विकण्यास आले आहेत. पैकी लहान आकाराचा खजूर हा 'भूमी खजूर' म्हणून ओळखला जातो. आपण जो खजूर खातो तो बसरा आणि अरबस्तानमधून आलेला असतो. अरबस्तान, इजिप्त आणि अफगाणिस्तान इथे पुष्कळ खजूर पिकतो. व्यवस्थित पिकलेल्या रसदार फळांना 'खजूर' असं म्हणतात. तर अर्धवट पिकलेली सुकी फळं 'खारीक' म्हणून ओळखली जातात. आपल्याकडे उत्तम प्रतीच्या खारका 'इराण' आणि'अफगाणिस्तान'मधून येतात.

खजुरात 'अ', 'ब' आणि 'क' जीवनसत्त्व पुष्कळ प्रमाणात असतं. तसंच कारबोहायड्रेट्स आणि खनिज द्रव्यंही विपुल प्रमाणात असतात. खजुरात ६०-७० टक्के इतकी शर्करा (ग्लुकोज) असून त्यात चुना, कॅल्शियम, तांबं, फॉस्फरस आणि लोह या घटकांचं प्रमाण विपुल असतं. त्यामुळेच खजुराला पौष्टिक समजलं जातं. खजूर खाल्ल्याने त्यात असणा-या 'अ' जीवनसत्त्वामुळे शरीरातील अवयवांचा विकास होतो. जीवनसत्त्व 'ब'मुळे हृदय सुदृढ राहतं. पचनसंस्था मजबूत झाल्यामुळे भूक चांगली लागते. आतडयांची स्वच्छता होते. जीवनसत्त्व 'क'मुळे शरीरात तीव्र प्रतिकारशक्ती निर्माण होते. त्यामुळे बाहेरच्या कुठल्याही जंतूंचा शरीरावर विपरीत परिणाम होत नाही.

खजुरात असणा-या लोहाच्या गुणधर्मामुळे शाळकरी मुलींचा मासिकपाळीचा त्रास खूपच कमी होतो. खजूर खाण्याची एक पद्धत आहे. एक तर तो तुपात परतून तरी खावा. नाहीतर खजुराची बी काढून त्यात लोणी आणि मिरीचा एक दाणा भरून रोज सकाळी खावा. त्याने आरोग्य सुधारतं. पचनाचे कुठलेच त्रास निर्माण होत नाहीत. खजुरापासून तयार केलेले पदार्थ लहान मुलांच्या आरोग्यासाठीही चांगले.

मुलांच्या डब्यात नेण्यासाठी खजुराच्या या काही पाककृती..

खजूर वडया
साहित्य: १०० ग्रॅम बिनबियांचा खजूर, ४०० ग्रॅम खडीसाखर (छोटया चौकोनी तुकडयांची पत्री खडीसाखर नको. मोठया ओबडधोबड खडयांची हवी), तीन चमचे लोणी, दीड कप दूध, ७-८ वेलदोडयांची पूड, चवीपुरतं मीठ.

कृती: खडीसाखरेची खलबत्त्यात पूड करून घ्यावी. जाड बुडाच्या भांडयात लोणी, दूध आणि खडीसाखरेची पूड एकत्र करून घ्यावी. गोळीबंद पाक तयार झाल्यावर मिश्रण खाली उतरवावं. त्यात वाटलेला खजूर आणि वेलदोडयांची पूड घालावी. मिश्रण चांगलं ढवळावं. तूप लावलेल्या थाळीत ते थापावं. गार झाल्यावर वडया पाडाव्यात.

फायदे : लोण्यामुळे शरीराला स्निग्धता मिळते. तसंच जीवनसत्त्व 'अ' आणि 'क', कॅल्शियम यांचं प्रमाणही भरपूर असतं. लोण्यामुळे बुद्धी वाढते. वडीत दूध घातल्यामुळे वडीला खुसखुशीतपणा येतो. वेलदोडयामुळे वडीला सुगंध प्राप्त होतो. तसंच वाढलेलं पित्त कमी होतं. आतडयांना अंतर्गत झालेल्या जखमाही वेलदोडयांमुळे भरून निघतात.खडीसाखरेमुळे शर्करेचं प्रमाण वाढतं.


खजूर रोल
साहित्य: १ वाटी बिनबियांचा खजूर, अर्धी वाटी अक्रोडाची पूड, ११ चमचा काठोकाठ चमचा भरून खडीसारखेची भरड, २ चमचे खडीसाखरेपासून तयार केलेली पिठीसाखर, अर्धी वाटी खोब-याचा कीस, ३/४ वाटी दूध, थोडं साजूक तूप.

कृती : दूध आणि खडीसाखरेची भरड एकत्र करून मिश्रण गॅसवर ठेवावं. साखर विरघळली की, त्यात खजुराचा वाटून गोळा घालावा. मिश्रण डावेने हलवावं. अवघ्या पाचच मिनिटांत मिश्रण पिठल्यासारखं घट्ट होऊ लागतं. मिश्रण घट्ट होऊ लागल्यावर त्यात अक्रोडाची पूड घालावी. गोळा पातेल्यात फिरू लागल्यावर त्यात थोडं तूप घालावं. नंतर खाली उतरून डावाने घोटत राहावं. थोडी थोडी पिठीसाखर घालावी. पोळपाटावर ओला फडका अंथरावा. त्यावर गोळा ठेवून तो पातळ लाटावा. नंतर त्यावर खोबरं पसरून वळकटी करावी. नंतर रोल कापावेत.

टीप : खोब-याचा कीस वापरताना डेसिकेटेड कोकोनटचा वापर केला तरी चालेल.
फायदे : 'अक्रोड' हा बुद्धिवर्धक असून त्यात मेंदूसाठी लागणारी सर्वच जीवनसत्त्व आहेत. यातल्या ओमेगा थ्री फॅटी अ‍ॅसिडमुळे हृदयाची कार्यक्षमताही वाढते. अक्रोड खाल्ल्याने शरीरातील वाईट कोलेस्टेरोलचं प्रमाण घटून चांगल्या कोलेस्टेरोलचं प्रमाण वाढतं. खोब-याच्या किसामुळे स्निग्धता वाढते.


खजुराची चटणी
साहित्य: १ वाटी खजूर. अर्धी वाटी लिंबाचा रस, १ चमचा लाल तिखट, भाजलेल्या जि-याची चमचाभर पूड, चवीपुरतं मीठ.

कृती: खजूर स्वच्छ धुवावा. त्याच्या बिया काढून उभे तुकडे करावेत. लिंबाचा रस, तिखट, मीठ, खजुराचे तुकडे आणि जि-याची पूड एकत्रित कालवून दोन दिवस मुरत ठेवा. ही चटणी चविष्ट होते. थालिपीठ, पराठे, आंबोळीबरोबर खाण्यास छान लागते.

फायदे : ही चटणी रुचकर असून भूक वाढवते. चटणीत वापरलेल्या जि-यामुळे पचनसंस्था चांगली राहते. पदार्थ खाल्लेला पचतो. बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.

Read More »

ब्रोकोली पराठा

पराठे कसे बनवतात. ब्रोकोलीचे सारण आधीच बनवून ठेवलं तर त्याला पाणी सुटतं. 
साहित्य : सारणासाठी- १ मध्यम आकाराचा ब्रोकोलीचा गड्डा, दीड चमचा आलं-लसूण पेस्ट, १ चमचा गरम मसाला, १/२ चमचा आमचूर पावडर, १ बारीक चिरलेला कांदा, १ चमचा मिरची पेस्ट, चवीपुरतं मीठ

आवरणासाठी : १ कप गव्हाचं पीठ, पाव चमचा हळद, मीठ, अर्धा चमचा जिरे, १ चमचा तेल

कृती : गव्हाचं पीठ, हळद, जिरे, मीठ, तेल आणि पाणी घालून पीठ घट्टसर मळून घ्यावं. ब्रोकोलीचे लहान तुकडे करून मिक्सरमध्ये भरडसर वाटून घ्यावेत. त्यात चिरलेला कांदा, आलं-लसूण पेस्ट, गरम मसाला, मिरची पेस्ट, आमचूर पावडर आणि मीठ घालून एकत्र करावं. पिठाच्या गोळ्यात हे सारण भरून याचा पराठा लाटावा. तव्यावर शेकून घ्यावा. हा गरमागरम पराठा दह्याबरोबर सव्‍‌र्ह करावा.

टीप : ब्रोकोलीचे सारण आधीच बनवून ठेवलं तर त्याला पाणी सुटतं. त्यामुळे पिठाच्या गोळ्यात हे सारण भरताना जास्त ओलाव्यामुळे पीठ चिकटही बनतं आणि पराठे लाटले जात नाहीत. त्यामुळे जेव्हा पराठे बनवायचे असतील तेव्हा हे मिश्रण तयार करावं आणि लगेच याचे पराठे बनवावेत.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe