Tuesday, July 23, 2013

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

आरोग्यावर लिहू काही!

जिथे शरीर आहे तिथे निरोगी राहण्याची, सुदृढतेची सहज भावनाही आहे. मात्र अलीकडच्या धावपळीच्या जीवनात, 'आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ आहे कुणाला?' असं सहजच बोललंही जातं.

जिथे शरीर आहे तिथे निरोगी राहण्याची, सुदृढतेची सहज भावनाही आहे. मात्र अलीकडच्या धावपळीच्या जीवनात, 'आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ आहे कुणाला?' असं सहजच बोललंही जातं. ज्या जगण्यासाठी आपण कमावतो, ते जगणच आपण विसरत चाललो आहोत की काय?, असाही प्रश्न त्यानिमित्ताने उपस्थित होतो.

मात्र खरंच तसं आहे का?, यावर काहीसा विचार करायला लावणारी आणि त्यानिमित्ताने लेखनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारी एक स्पर्धा लेखनप्रेमींसाठी आयोजित केली आहे, 'शतायुषी'या आरोग्यविषयक दिवाळी मासिकाने. 

आरोग्याच्या नवनवीन समस्या दिवसेंदिवस डोकं वर काढत असताना आयुर्मानही घटत चाललेलं दिसतं. अशा वेळी सुदृढ जीवनशैलीसाठी मुळात आरोग्याविषयीची जागरूकता आपल्यात असायला हवी. भविष्यासाठी नवनवीन स्वप्न रंगवत असताना ती स्वप्नं सत्यात उतरवायची असतील तर, आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

पण प्रत्यक्षात आपलं तसं होतं का, हा स्वपरीक्षणात्मक विचार प्रत्येकानेच करायला हवा.. याच अनुषंगाने यंदाच्या 'शतायुषी २०१३' च्या लेखनस्पर्धेचा विषय ठरविण्यात आला आहे, 'आरोग्याकडे लक्ष द्यायला मला वेळ नाही, हे खरं किती, खोटं किती?'

वेळ नाही म्हणून स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं नाही, हे बरोबर की चूक? आणि वेळ नाही म्हणण्यामागे काही कारणं असतील का? याचाच आढावा आपण लिहिलेल्या लेखांच्या माध्यमातून या दिवाळी अंकाद्वारे घेतला जाईल, जो अर्थातच सर्वसामान्यांमध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण करणारा असेल, म्हणूनच लिहिते व्हा.. लेखासाठीची शब्दमर्यादा ५०० शब्द असून लेख पाठविण्याची अंतिम तारीख आहे, १६ ऑगस्ट २०१३
पत्ता : डॉ. अरुण संगमनेरकर, संपादक शतायुषी, कॉलनी नर्सिग होम, नवी पेठ, पुणे- ३० संपर्क:- ६६८७१०००
ई-मेल : dravsangamnerkar@gmail.com cnhhospital@gmail.com

Read More »

गव्हाचे सत्त्व

गहू रात्री पाण्यामध्ये भिजत घालावेत. हे पाणी दुस-या दिवशी काढून घेऊन गहू पुन्हा नवीन पाण्यात भिजवावेत. तिस-या दिवशी हे पाणी काढून घेऊन हेच गहू पुन्हा पाण्यात भिजत ठेवावेत. 

गव्हाचे सत्त्व बनविण्याची मुख्य कृती :

गहू रात्री पाण्यामध्ये भिजत घालावेत. हे पाणी दुस-या दिवशी काढून घेऊन गहू पुन्हा नवीन पाण्यात भिजवावेत. तिस-या दिवशी हे पाणी काढून घेऊन हेच गहू पुन्हा पाण्यात भिजत ठेवावेत. चौथ्या दिवशी गव्हातील पाणी काढून टाकावे. त्यानंतर या भिजलेल्या गव्हात थोडे नवीन पाणी घालून हे गहू वाटून घ्यावेत. अशा प्रकारे वाटलेले गहू पिळून व गाळून तयार झालेली लापशी एका पातेल्यात काढून घ्यावी व त्यावर ताट झाकून ठेवावे.
सहा-सात तासांनी भांडयांवरील झाकण उघडून पाहावे. गव्हाचे सत्त्व भांडयात खाली राहते व वरती पाण्याची निवळ-पाणी दिसते. आलेली पाण्याची निवळ वा पाणी काढून टाकावे. अशा प्रकारे तयार झालेले गव्हाचे सत्त्व बरणी अथवा डब्यात भरून ठेवावे.

पाककृती : स्थूल व्यक्तींकरता..

साहित्य : गव्हाचे सत्त्व(एक वाटी), पाणी (चार वाटी), दूध (एक वाटी), साखर (दोन चमचे), वेलची पावडर (चवी पुरती)
वरील मिश्रण एका पातेल्यात घेऊन मंद गॅसवर ठेवून शिजवावे. हे मिश्रण सतत घोटत राहणे आवश्यक आहे, जेणेकरून यात गुठळ्या होणार नाहीत.
कृष व्यक्तींकरता..

साहित्य : गव्हाचे सत्त्व(एक वाटी), तूप (दोन चमचे), दूध (एक वाटी), साखर (दोन चमचे), वेलची पावडर (चवीपुरती)
एका पातेल्यात दोन चमचे तूप घालून त्यात गव्हाचे सत्त्व घालावे. त्यानंतर त्यात एक वाटीभर दूध व दोन चमचे साखर घालून गॅसवर शिजवावे. वेलची पावडर (हवी असल्यास) घालून सतत घोटत राहावे. घोटलेल्या मिश्रणास लकाकी आल्यावर ते शिजले आहे, असे समजून गॅस बंद करावा.

टीप : गव्हाचे सत्त्व दिवसातून एकदा वाटीभर तरी घ्यावे. अतिशय पोषणयुक्त असे हे पेय आहे.

Read More »

निखळ त्वचा खुलवते सौंदर्य..

अनेकांना थोडयाशा उन्हाचाही प्रचंड त्रास होतो, कित्येकांना तर उन्हामध्ये बाहेर पडताना शरीर पूर्णत: झाकून घेतल्याशिवाय पर्यायच नसतो. अशा अतिसंवेदनशील त्वचेविषयीची प्रातिनिधिक समस्या आणि त्यातून आयुर्वेदीय उपचार सुचविणारा संवाद..

प्रश्न : सर, माझी त्वचा फोटोसेंसिटिव्ह (प्रकाश तीव्रग्राही-संवेदी) आहे. गेली कित्येक वर्ष मला उन्हामध्ये बाहेर पडताना भीती वाटते. माझ्या त्वचेचा रंग उन्हामुळे काळसर होतो. आणि तो पुन्हा पूर्ववत व्हायलाही बरेच दिवस लागतात. संपूर्ण शरीरावर डाग (पॅचेस) येतात. कधी ते चॉकलेटी असतात तर कधी अगदी काळ्या रंगाचे असतात. उन्हात तर अशा प्रकारचे डाग वाढतात.

काही दिवसांपासून अधिक प्रमाणात मुरमंही येत आहेत. पूर्वीपेक्षा आता या मुरमांचं प्रमाणही खूप वाढलंय. चेह-याबरोबरच मानेवर, खांद्यावर तसंच पाठीवरही ही मुरमं येतात. मुरमं खूपच कडक आणि खोलवर गेलेली आहेत. ती दुखतातही. त्यांना पिकायला बराच वेळ लागतो. ज्या ज्या ठिकाणी मुरमं झालीयत त्या सर्व ठिकाणी काळे डाग पडतात आणि ते कायम स्वरूपात राहतात. मला लवकर बरं करा. दोन महिन्यांनंतर माझं लग्न ठरलंय.

माझ्या होणा-या नव-याने मला अनेक ब्युटी पार्लर्स, स्कीन स्पेशलिस्ट तसंच कॉस्मेटोलॉजिस्टची नावं सुचवली. पण रसायनयुक्त औषधांमुळेही माझ्या शरीराला त्रास होतो, मला ती सूट होत नाहीत. मी फेशिअलसुद्धा हर्बलचंच करते. माझी त्वचा खूपच संवेदनशील आहे.

उत्तर : स्मिताताई, तुम्हाला माहीत असेलच की त्वचेचा रंग आयुर्वेदाप्रमाणे पित्तदोषामुळे बदलतोय. तुम्ही जर पित्तप्रकृतीचे असाल तर उन्हामध्ये नैसर्गिक पित्त वाढतं किंवा ऊन अंगावर घेतल्यास पित्त वाढतं. अशा अवस्थेत पित्त वाढेल असे आंबट-तिखट तळलेले पदार्थ अधिक खाल्ल्यास पित्ताचं प्रमाण आणखी वाढतं. त्यामुळे त्वचेचा रंग गडद होतो. फोटोसेंसिटिव्हिटी विशेषत: पित्त वाढल्यामुळे येते. यासाठी कोणतीही तात्पुरती उपचार पद्धती नाही. थोडया प्रमाणात (पथ्यपालन) प्रकृतीनुसार खाणंपिणं ठेवावं तसंच आपल्या नेहमीच्या जीवनशैलीत बदल करणं आवश्यक आहे. मानसिक ताणतणाव, रात्रीचं जागरण, बद्धकोष्ठता आणि मासिकपाळी नियमित वेळेवर न येणं, या सर्व गोष्टीही त्याला जबाबदार आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टी सुरळीत असणं नितांत गरजेचं असतं.

ही समस्या कमी वेळात आटोक्यात आणता येते, पण त्यासाठी औषध, आहार आणि जीवनशैली या तिन्ही गोष्टी प्रमाणात बदलाव्या लागतील. औषधांमध्ये कडुनिंब, बाहवा, तुळस, कात, सारिवा, हळद, गुळवेल आणि मंजिष्ठासारखी औषधं घ्यावी लागतील. आहार आणि जीवनशैली या दोन्ही गोष्टी त्यांच्या दैनंदिनीविषयी चर्चा करून ठरवता येतील. आयुर्वेदिक स्पा बाबतीत ऐकलंय? आठवडय़ातून तीनदा स्पा घेऊन उपचार घ्यावे लागतील.

त्यात हर्बल पावडर मसाजमध्ये (एक्सफोलिएशनसाठी – निर्जीव पेशीजालावरील पृष्ठभागावरून पातळ पापुद्रे सुटणे) वैद्यांनी सिद्ध(मेडिकेटेड) केलेलं 'मिल्क धारा' केलं जातं. त्यामुळे त्वचेचा रंग बदलतो, तसंच त्वचेच्या पोषणासाठी व फेसपॅक आणि हर्बल बॉडी पॅक (अनेक प्रकारच्या औषधी एकत्रित करून) मुरमांवर तसंच त्याच्या आसपासच्या भागावर लावून शरीर काही वेळेसाठी टॉवेलने गुंडाळून ठेवावं लागतं. १०-१२ सीटिंग घेतल्याने पुष्कळच फायदा होतो.

Read More »

लढा अ‍ॅनिमियाशी..

'अ‍ॅनिमिया' (पंडुरोग) ही महिलांमध्ये सर्वसाधारणपणे आढळणारी प्रमुख समस्या आहे. ही समस्या स्त्रियांना आरोग्यदृष्टय़ा कमकुवत करणारी आहे. अ‍ॅनिमियाची समस्या गंभीर आजाराचं स्वरूपही बनते. स्त्रीच्या आरोग्यावर संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याची भिस्त आहे. मुली निरोगी राहिल्या तर त्यांच्यापासून सुदृढ पिढीची निर्मिती होईल. त्यामुळेच 'निरोगी स्त्री एका निरोगी कुटुंबाची ताकद आहे', असं म्हणतात ते उगीच नाही. कुटुंबातील स्त्रीचं निरोगीपण जपायचं असेल तर अ‍ॅनिमियाशी लढलंच पाहिजे

'हेल्पमुंबई फाउंडेशन (एचएमएफ)' या संस्थेने 'मेट्रो पोलिस हेल्थकेअर' यांच्या मदतीने 'अ‍ॅनिमिया इरॅडिकेशन प्रोग्राम' नावाचा उपक्रम मुंबईत सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत 'हेल्दी वुमन-सेफ वुमन' या मोहिमेचाच एक भाग आहे. १५ जून २०१३ रोजी या मोहिमेतील पहिलं शिबीर धारावी इथे घेण्यात आलं होतं. त्या शिबिरात २५३ महिला सहभागी झाल्या होत्या. त्यापैकी ४० टक्के महिला अ‍ॅनेमिक असल्याचं आढळून आलं. या महिलांमध्ये हिमोग्लोबीनचं प्रमाण हे १२ ग्रॅम/डीएलपेक्षा कमी होतं.

प्रौढ महिलेकरता आवश्यक असलेलं हे सर्वसाधारण प्रमाण आहे. त्यातील पाच महिलांमध्ये अ‍ॅनिमियाचं प्रमाण हे तीव्र असल्याचं आढळून आलं. त्यांना तत्काळ वैद्यकीय सेवा पुरवण्यात आली. काही दिवसांपूर्वी कलिना परिसरात संस्थेने दुसरं शिबीर घेतलं. दुस-या शिबिरात एकूण १४५ महिला सहभागी झाल्या होत्या. त्यापैकी ६० टक्के अ‍ॅनेमिक असल्याचं आढळून आलं. तर ५२ महिलांमध्ये हिमोग्लोबीनचं प्रमाण १०.९ ग्रॅम/डीएल(मॉडरेट अ‍ॅनिमिया) पेक्षाही कमी होतं. त्यापैकी पाच जणी गंभीर अ‍ॅनिमियाने आजारी होत्या. त्यांच्यातील हिमोग्लोबीनचं प्रमाण हे ८ ग्रॅम/डीएल पेक्षाही कमी आढळलं.

वरील आकडेवारींचं गांभीर्य समजण्यासाठी मुळात आधी अ‍ॅनिमिया म्हणजे काय, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. अ‍ॅनिमिया म्हणजे लाल रक्तपेशींचा अभाव, थोडक्यात रक्ताक्षय. या तांबडया रक्तपेशींच्या अभावामुळे रक्तात प्राणवायू (ऑक्सिजन) वाहण्याची क्षमता कमी होते. हाडांच्या मगजात (बोर्न मॅरो) रक्तपेशींची निर्मिती होते. त्यांचं आयुष्य साधारण चार महिन्यांचं असतं. लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी शरीरात योग्य प्रमाणात 'फॉलिक अ‍ॅसिड' आणि जीवनसत्त्व ब-१२' असावं लागतं. हिमोग्लोबीन या लाल रंगद्रव्यामुळे तांबडयापेशींना रंग प्राप्त होतो. शरीरातील प्रत्येक पेशीच्या शुद्धीकरणाचं कामही हिमोग्लोबीनमुळे होतं. हिमोग्लोबीनचा रंग फिक्का पडल्यावरही किंवा या रंगद्रव्याचं प्रमाण घटल्यावरही अ‍ॅनिमिया होतो. अ‍ॅनिमिया झाल्यावर कुपोषणाचं प्रमाण वाढतं.

हिमोग्लोबीनचा रंग चांगला राहण्यासाठी, त्यांचं शरीरातील प्रमाण योग्य राहण्यासाठी लोह(आयर्न), फॉलिक अ‍ॅसिड, जीवनसत्त्व ब-१२, प्रथिनं, जीवनसत्त्व क ही जीवनसत्त्वं, प्रथिनं तसंच क्षार, खनिजं आदी पोषणमूल्यं असणा-या आहाराचं प्रमाण वाढवणं महत्त्वाचं आहे. भारतात स्त्रियांमध्ये अ‍ॅनिमियाचं प्रमाण हे सर्वात जास्त आहे. ४० ते ५० टक्के स्त्रिया या अ‍ॅनिमिक असतात. स्त्री अ‍ॅनिमिक असण्याचा सर्वात जास्त परिणाम हा ती गरोदर असताना होतो, असं स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. विनिता साळवी सांगतात. त्या पुढे म्हणतात, अ‍ॅनिमियाचे दोन प्रकार आहेत. फॉलिक अ‍ॅसिड आणि जीवनसत्त्व ब-१२ मुळे यांच्या कमतरतेमुळे होणारा अ‍ॅनिमिया हा 'मेगेलोब्लास्टिक' अ‍ॅनिमिया म्हणून ओळखला जातो.

या अ‍ॅनिमियात लाल रक्तपेशींचा आकार गरजेपेक्षा जास्त वाढतो. लोहाच्या कमतरतेमुळे होणा-या अ‍ॅनिमियाला 'मायक्रोसिटिक अ‍ॅनिमिया' म्हणतात. त्यात लाल रक्तपेशींचं आकारमान खूपच कमी होतं. या दोन्ही प्रकारच्या अ‍ॅनिमियात हिमोग्लोबीनचं प्रमाण कमी असतं. आईने गरोदरपणात लोहयुक्त पदार्थ खाल्लेच पाहिजेत. पण त्याच्या जोडीने फॉलिक अ‍ॅसिड आणि जीवनसत्त्व ब-१२ ही पोषणमूल्य असणारेही पदार्थ खाल्ले पाहिजेत. आई होऊ इच्छिणा-या प्रत्येक स्त्रीने गरोदर राहण्यापूर्वी तीन महिने योग्य प्रमाणात फॉलिक अ‍ॅसिड, जीवनसत्त्व ब-१२ आणि लोहाचं प्रमाण असलेले पदार्थ खाल्ल्यास तिला गरोदर असताना त्रास होत नाही. तिची प्रसूतीही चांगली होते.

बाळ आईच्या पोटात असताना त्याला आवश्यक असणारी लोहाची गरज तो आईकडून भागवतो. त्यामुळे गरोदरपणात लोहयुक्त आहार अधिक प्रमाणात खावा लागतो. न खाल्ल्यास बाळंतपणानंतर ती माता अ‍ॅनिमिक होते. तिला अशक्तपणा, पाय दुखणं, पायांच्या पोट-या भरून येणं, केस गळणं, ते लवकर पांढरे होणं या शारीरिक समस्यांना तोंड द्यावं लागतं. नवजात अर्भकाच्या शरीरातही लोहाची कमतरता निर्माण होते. खासकरून अपु-या महिन्याच्या बाळांमध्ये. अपु-या महिन्याच्या बाळांमध्ये लोहाचा साठा गर्भारपणाचे दिवस पूर्ण झाल्याशिवाय भरला जात नाही. ही कमतरता पुढे आईला भरून काढावी लागते.

ज्या स्त्रियांमध्ये मासिकपाळीत जास्त रक्तस्रव होतो, त्यांच्याही शरीरात लोहाची कमतरता आढळते. आयर्न, फॉलिक अ‍ॅसिड, जीवनसत्त्व ब-१३ या गोळय़ांबरोबर आणि कॅल्शियमच्या गोळय़ा एकत्र खाऊ नयेत. त्यामुळे शरीराला दोन्ही क्षार, जीवनसत्त्वांचा फायदा होत नाही. गुळात बनवलेली शेंगदाण्याची चिक्की, लाडू प्रत्येक स्त्रीने खावेत.

स्त्रियांच्या आरोग्यविषयक मानसिकतेबद्दल बोलताना मेट्रो पोलिस हेल्थकेअरच्या पॅथोलॉजिस्ट, डॉ. विनती गोलविलकर सल्ला देतात, घरगुती कामाच्या गडबडीत स्त्रिया आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. पण त्यांनी तसं करू नये. आपल्या दैनंदिन आहारातील कितीतरी असे पदार्थ आहेत, ज्यांच्यापासून लोह, फॉलिक अ‍ॅसिड, जीवनसत्त्व ब-१२ यांची गरज भागवता येते. उदा. गूळ आणि हिरव्या भाज्या खा. काळा गूळ असेल तर अधिकच चांगलं.

'अ‍ॅनिमिया इरॅडिकेशन प्रोग्राम' या उपक्रमात गरिबीमुळे अ‍ॅनिमिया वाढतो, असंही एक निरीक्षण समोर आलं आहे. मुळात अ‍ॅनिमियाचा आजार गरिबीपेक्षा दारिद्रय़ामुळे वाढतो. आपल्याकडे फक्त खाण्याचं दारिद्रय़ नाही तर विचारांचंही दारिद्रय़ आहे. गरिबीत अपुरी पोषणमूल्यं असणारा आहार खावा लागतो. तर दारिद्रय़ात सलग उपाशी राहावं लागतं. आजही खेडयापाडयात कित्येक कुटुंबात मुली, स्त्रियांच्या वाटय़ाला अपुरा आहार येतो. आधी घरातल्या सगळय़ा लहान-थोरांनी जेवायचं, त्यातून उरलं सुरलं स्त्री खाणार; अशी मानसिकता आशिया खंडात आहे.

या मानसिकतेमुळे स्त्रीच्या वाटय़ाला पुरेसा आहार येतच नाही. याही सामाजिक परिस्थितीवर तोडगा काढला पाहिजे. लोहाचं प्रमाण वाढण्यासाठी कुठला आहार आवश्यक आहे, त्या आहारातील घटकांचं कसं एकत्रीकरणं केलं पाहिजे, याचं मार्गदर्शन करणारी पुस्तिकाच काढली पाहिजे. पूर्वी अशा प्रकारची 'सकस आहार' ही पुस्तिका ज्येष्ठ आहारतज्ज्ञ आणि पाककला शास्त्रज्ञ वसुमती धुरू यांनी अतिशय साध्या-सोप्या भाषेत लिहिली होती. त्यातील पाककृती हा मध्यमवर्ग आणि निम्न मध्यमवर्ग यांची जीवनशैली डोळय़ांसमोर ठेवून लिहिली होती. 'समाजवादी महिला संघा'तर्फे ती छापण्यात आली होती. अशाप्रकारचं भरीव काम झालं तर अ‍ॅनिमियाशी प्रत्येक कुटुंब लढू शकेल.

अर्थ हिमोग्लोबीनचा
'हिम' आणि 'ग्लोबीन' या दोन शब्दांपासून 'हिमोग्लोबीन' संज्ञेची व्युत्पत्ती झाली आहे. 'हिम' म्हणजे रंगद्रव्य; तर 'ग्लोबीन'म्हणजे प्रथिनं! विविध प्रकारच्या डाळी, दूध आणि मांसाहार या खाद्यपदार्थातून शरीरासाठी उपयोगी असणारं प्रथिन हे पोषणतत्त्व मिळतं. तर लोहापासून शरीराला 'हिम' नावाचं रंगद्रव्य मिळतं. या रंगद्रव्याचा रंग लाल भडक असतो. आता लोह(आयर्न) कशातून मिळतं? तर स्वयंपाकासाठी वापरलेल्या लोखंडी भांडयातून, पालेभाज्यांमधून विशेषत: लाल माठ, पालक, मेथी आणि अळू या भाज्यांमधून लोह मिळतं. शरीरातील हिमोग्लोबीनमधलं लोह या घटकांचं प्रमाण घटलं तर अ‍ॅनिमिया होतो. रक्ताचा लालभडक रंग फिक्का पडतो.

अ‍ॅनिमिया टाळण्यासाठी काय कराल?
लोह, कॅल्शियम आणि 'क'जीवनसत्त्वाचा नैसर्गिक साठा असतो, अशा पदार्थाचा रोजच्या आहारात समावेश करावा. त्याने रक्त आणि मज्जाधातूंचं उत्तम पोषण होतं. रक्तकण वाढीस लागतात. रोगप्रतिकारक शक्ती आणि कुठलंही काम करण्याची कुवत वाढते.
अ‍ॅनिमिया टाळण्यासाठी खाण्यात पुढील पदार्थ असावेत..
मांसाहार : बांगडा, कलेजी, बीफ, अंडयाचा पिवळा बलक
भाज्या : लाल माठ, फ्लॉवरची पानं, मेथी, पालक, चवळी, बीट
धान्य : नाचणी, बाजरी, हरभरे, तीळ, अळीव.
फळं : अंजीर, डाळिंब, खजूर, जर्दाळू, आलुबुखार आणि नासपती.
इतर पदार्थ : गूळ, पोहे

हेही लक्षात असू द्या..
पोळी किंवा चपातीच्या पिठात नाचणी आणि ज्वारीचं पीठ मिक्स करावं. या पिठात मेथी, अळू किंवा पालकाची पानं चिरून घालावी. थोडासा चिंचेचा कोळ घालून पीठ मळावं. असे पराठे रोज तीन दिवस खावेत.
हिरव्या शिजवलेल्या पालेभाज्या, पाच खजूर, छोटी वाटी भाजलेले सोयाबीन किंवा हरभरे यांचा रोजच्या आहारात नियमित समावेश करावा. या पदार्थामुळे अनेक रक्तवर्धक घटक आणि जीवनसत्त्वांची गरज भागते.
ओले तसंच मोड आलेल्या हरभऱ्यांसोबत गूळ खाताना मिश्रणात लिंबाचा रस पिळावा. त्याने लोहाचं आतडय़ांत व्यवस्थित शोषण होतं.
अधूनमधून आहारात अळूवडी, अळूची पातळ भाजी, गूळ-पोहे, अळीवाची खीर तसंच लाडू, नाचणीचा लाडू, मेथीचे थेपले, डाळिंब आणि डाळिंबाचा रस, खजुराची साखर न घातलेली बर्फी, नाचणीचं सत्त्व यांचाही समावेश करावा.
जेवणापूर्वी किमान तासभर आधी आणि नंतर चहा-कॉफी घेण्याची सवय मोडावी. त्यामुळे आपण खात असलेल्या अन्नातील लोहाचं पोषण कमी होतं.
लोहाच्या पोषणासाठी 'क' जीवनसत्त्वाची गरज असते. म्हणूनच लोहयुक्त पदार्थ खाण्यापूर्वी किंवा खाण्यानंतर 'क' जीवनसत्त्वाचा साठा असलेले तसंच सायट्रिक आम्ल, टार्टारिक आम्ल असलेले लिंबू, चिंच, आवळा, कैरी, संत्र, पेरू, मोसंबी किंवा मोड आलेली कडधान्यं खावीत. कडधान्यांना मोड आणण्याच्या प्रक्रियेतही 'क' जीवनसत्त्वाची वाढ होते.

लोहाच्या कमतरतेमुळे होणा-या अ‍ॅनिमियाची लक्षणं
पुरुषांमध्ये लोहाचं प्रमाण शंभर मिलीलिटर रक्तात १३.५ ते १८.० ग्रॅमच्या दरम्यान, तर स्त्रियांमध्ये लोहाचं प्रमाण शंभर मिलीलिटर रक्तात ११.५ ते १६.५ ग्रॅमच्या दरम्यान असलं पाहिजे. मात्र रक्तातील लोहाचं प्रमाण १० ग्रॅमहून कमी होतं तेव्हा थकवा जाणवणं, हृदयाची धडधड वाढणं, धाप लागणं, श्वास लागणं आणि चक्कर येणं ही लक्षणं बहुतांश रुग्णांमध्ये दिसतात. याच्या जोडीला -
केस गळणं, त्वचा निस्तेज, ओठ फाटणं, गिळताना त्रास होणं याही प्रकारचे त्रास अ‍ॅनिमियामुळे होतात.
अ‍ॅनिमियाचा त्रास असणा-या मुलांमध्ये मनाची एकाग्रता कमी होते. मुलांची बौद्धिक तसंच मानसिक वाढ खुंटते.
दीर्घकाळ अ‍ॅनिमिया असेल तर घशाची जळजळ वाढते. घशाला कोरडही पडते.
स्त्रियांमध्ये मासिकपाळीच्या वेळीही त्रास होतो.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe

No comments:

Post a Comment