Tuesday, July 16, 2013

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

मूग सोयाबीन सूप

साहित्य:- एक कप मूग, अर्धा कप सोयाबीन, सोयाबीनचे दाणे किंवा सोयाबीन चंक्स, दोन टोमॅटो, दोन चमचे तूप, ३-४ लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ, मिरे पूड, धने पूड, जिरे पूड, लाल तिखट पूड

कृती:- मूग, सोयाबीन आणि टोमॅटो कुकरमध्ये चांगले शिजवून घ्या. आणि या सर्व मिश्रणाची चांगली बारीक पेस्ट करून घ्या. लसूण बारीक किसून घ्या नाही तर बारीक कापून घ्या. एका जाड बुडाच्या भांडयामध्ये तूप गरम करून घ्या.

त्या तुपात लसूण टाकून लालसर होईपर्यंत भाजा. नंतर त्यात सगळे मसाले टाकून १०-१५ सेकंद हलवा. नंतर त्यात भाज्यांची पेस्ट, मीठ आणि गरजेपुरते पाणी घालून चांगले उकळून घ्या. झाले तुमचे मूग सोयाबीन सूप तयार.

Read More »

जपा आपल्या तान्हुल्यांना..

पावसाचा त्रास लहान मुलांना होतोच. आपल्याला काय होतंय, हे त्यांना सांगताच येत नसल्याने आणि आपल्यालाही चटकन कळत नसल्याने उपचार करायला जरा उशीर होतो. अशा वेळी आईने बाळाच्या हालचालींवर लक्ष ठेवावं. त्याच्या रोजच्या हालचालींमध्ये जरा जरी फरक जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, हे महत्त्वाचं!

येणारा पाऊस हा वातावरणात निरनिराळे बदल घडवून आणतो. पावसाळयातील वातारवणात सर्वात जास्त परिणाम होतो तो दमटपणाचा. हा दमटपणा निरनिराळय़ा जीवजंतूच्या (म्हणजे विषाणू आणि जीवाणू) प्रजननासाठी अतिशय पोषक असतो. हे जीवजंतू विविध मार्गाने आपल्या संपर्कात येतात. हवा, पाणी आणि आहार दूषित करतात. त्यातून संसर्गजन्य आजारांचं प्रमाण वाढतं. सर्दी, खोकल्यापासून विविध त्वचेच्या आजारांचं प्रमाण वाढतं. या संसर्गजन्य आजारांचा परिणाम हा कमी प्रतिकारशक्ती असलेल्यांवर सर्वात जास्त होतो. तान्हं बाळ, लहान मुलं आपसूकच आजारी पडतात.

लहान मुलांना होणारे आजार
संसर्गजन्य आजार.
दूषित पाण्याचे आजार.
विशिष्ट त्वचा विकार.
वातावरणातील असमतोलाच्या परिणामामुळे होणारे आजार जसं की, दमा, उल्टी येणं वगैरे.

संसर्गजन्य आजार
या प्रकारच्या आजारात जीवजंतूंमुळे होणा-या आजारांचं प्रमाण सर्वात जास्त आहे. सर्दी, खोकला, चिडचिडेपणा यांसारख्या शारीरिक तसंच मानसिक त्रासांबरोबरीने दूध घेण्यास नाकारणं, श्वास घेण्यास त्रास होणं, न्यूमोनिया, फ्लू ताप अशाप्रकारचे गंभीर आजार दिसून येतात.

सर्दी-खोकल्याप्रमाणे टायफॉइड (मुदतीचा ताप), मलेरिया (हिवताप), डेंग्यू (हाडमोडीचा ताप) यांसारखे आजार डोकं वर काढतात. लघवीमध्ये होणा-या जंतुसंसर्गाचं प्रमाण वाढतं. त्यामुळे परिणामी मूत्रपिंडाचे आजारही होतात. काही मुलांमध्ये तापाचं प्रमाण इतकं असतं की, बाळाला तापाबरोबर आकडीही येऊ शकते.

दूषित पाण्याचे आजार
तान्ह्या बाळांमध्ये दूषित पाण्यापासून थेट आजार होत नाहीत, तर आईमुळे होतात. यासाठी आईने पाणी गाळून, उकळून प्यावं. उघडय़ावरचे पदार्थ खाणं टाळावं.
ग्रॅस्ट्रो, जुलाब होणं हे पावसाळय़ात दूषित पाण्यापासून होणारे प्रमुख आजार वर्षभरापेक्षा जास्त वयोगटांतील मुलांना होतात. कावीळ, डिसेंट्री (पातळ शौचास होऊन त्यातून रक्त पडतं) याही आजारांची लागण प्रामुख्याने दूषित पाण्यातून होते. पाणी उकळून-गाळून प्यायल्याने हे आजार सहजरीत्या टाळता येऊ शकतात.
दूषित पाणी, पाळीव प्राण्यांचे मलमूत्र यांचा संपर्क आपल्या त्वचेवरील जखमांशी आल्यास लेप्टोस्पायरोसीससारखे गंभीर आजार पसरतात. लहान मुलांना जरा जरी लागलं किंवा खरचटल्यास त्यावर लागलीच उपचार करावेत.

विशिष्ट त्वचाविकार
गोवर, कांजिण्या या आजारांचं प्रमाण लहान मुलांमध्ये वाढतं. कारण गोवर तसंच कांजिण्या ज्या जीवजंतूंपासून होतात, त्यांचा पावसाळा हा प्रजननाचा काळ असतो. गोवर-कांजिण्या आल्यास भोंदूबाबांकडून उपाय करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्वचा कोरडी होऊन त्वचेला कंड सुटतो. डॉक्टरांनी सांगितलेलं क्रीम लहान मुलांना लावावं. पावसाळय़ात मुलांचे दिवसातून चार वेळा कपडे बदलावेत.

वातावरणातील असमतोल
पावसाळय़ात निर्माण होणारा दमटपणा नुकत्याच जन्मलेल्या बाळांमध्ये हायपोथेरमिया नावाचा आजार घेऊन येतो. पावसाळय़ात थंडावा वाढल्यामुळे लहान मुलांच्या शरीराचं तापमान जरूरीपेक्षा जास्त कमी होतं. त्या वेळी हायपोथेरमिया होतो.

सावधानतेचा कानमंत्र
तान्ह्या बाळाला आईचं दूध सातत्याने द्यावं. बाळाला आईच्या जवळ ठेवावं.
बाळाला लोकरी तसंच घोंगडीपासून बनवलेल्या उबदार कपडय़ांमध्ये गुंडाळून ठेवावं.
बाळाला एक ते दीडपेक्षा जास्त ताप असेल तर डॉक्टरांकडे घेऊन जावं
बाळाची हालचाल तसंच त्याची संडास-लघवीचं प्रमाण याकडे लक्ष ठेवावं. (सर्वसाधारणपणे बाळ दिवसातून सहा ते आठ वेळा लघवी करतं. दिवसातून दोन ते तीन वेळा संडास होऊ शकतो. पण या प्रमाणात जर वाढ झाली किंवा घट झाली तर बाळाच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.)
बाळाचा वरचा आहार आणि आईचं दूध याचं वेळापत्रक तयार करावं. त्या वेळापत्रकानुसार बाळ जर काही खात नसल्यास डॉक्टरांना दाखवावं.
आईने निरोगी राहणं गरजेचं आहे.
आई-बाळ दोघांनीही पावसाळय़ात बाहेर फिरणं टाळावं.
योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Read More »

वाजे 'पाऊल' आपुले!

आपल्या देशात कोटयवधी लोक आजही अनवाणी फिरतात. ज्यांना पादत्राणे परवडत नाहीत तेच नव्हेत, तर घर, मंदिर तसेच आसपासच्या परिसरात अनवाणी फिरणारे सर्वसामान्य नागरिकही मोठया संख्येने आहेत. वाढत्या मधुमेहींच्या संख्येमुळे पावलांची काळजी हा एक कळीचा मुद्दा झालेला आहे. 'फुट स्पा'सारख्या नव्या संकल्पना रुळतायत, पण स्वत:च्या पावलांची काळजी कशी घ्यावी याबाबत मात्र आजही आपल्या देशातले नागरिक निरक्षरच आहेत.

'कशात काय नि फाटक्यात पाय', 'लाथ मारेन तिथे पाणी काढेन', 'अंथरूण पाहून पाय पसरावेत'.. अशा पायाशी संबंधित म्हणींबरोबरच पायावर पाय टाकून बसू नये, पाय वाजवू नये.. अशा गैरसमजुतींपासून ते पाय लागला की नमस्कार करण्याच्या श्रद्धात्मक गोष्टींपर्यंत सगळ्याच बाबींतून आपला 'पाय' हा अवयव आपण किती आणि कसा 'जपतो', हे लक्षात येतं. आताशा आधुनिक जीवनशैलीने आपल्या पायांना 'फुट स्पा'च्या सौंदर्यपूर्ण कोंदणात, मखमली गालिच्यांच्या सुखद अनुभवात विसावलं असलं तरी सौंदर्याच्या पलीकडील पायांच्या 'आरोग्यदायी' संकल्पनेपर्यंत आपण पोहोचू शकलेलो नाही, हेच खरं!

कारण आज जगभरात अंगविच्छेदन शस्त्रक्रियेत पाय कापून टाकण्याचं प्रमाण विसाव्या मिनिटाला एक असं आहे. अपघातात पायाला जबर जखम झाली अणि त्यामुळे पाय गमवावा लागला ही नियती मानली, मात्र आपल्याच अनास्थेमुळे पायाला होणारी छोटीशी जखमही पाय कापण्याच्या स्टेजपर्यंत येते, हे आपला पाय हा शरीराचा एक दुर्लक्षित अवयव असल्याचं सिद्ध करतो. कदाचित हे अविश्वसनीय वाटेल, मात्र अनाठायी श्रद्धेतून अनवाणी देवदर्शनाला गेलेल्या कित्येकांना पायाला जखम होऊन, त्याचं गँगरिनमध्ये रूपांतर होऊन पाय कापावा लागला आहे.

कुणाला तर, मंदिरात प्रदक्षिणा घालताना अक्षता टोचून जखम गहिरी झाल्याने पाय गमवावा लागला आहे, तर कुणाला एस. टी. प्रवासात बूट काढून कॉबरेरेटरवर ठेवल्याने भाजून जखम होऊन ते गँगरिनपर्यंत गेल्याने अंगविच्छेदनाला सामोरं जावं लागलं आहे. इतकंच नव्हे तर, अंघोळ करताना पायावर एकदम गरम पाणी टाकलं, फोड आला, त्यातून जखम चिघळली नि पाय कापावा लागला. पाय गमावण्याला कारणीभूत ठरलेली ही वरील उदाहरणं पाहता, ह्या सगळ्या गोष्टी त्या त्या व्यक्तींच्या बाबतील घडल्या त्याला एक सामान्य कारण होतं, ते म्हणजे त्यांच्या पायाच्या संवेदनाच निघून गेल्या होत्या.

पायाची जळजळ होणं, पाय खूप दुखणं, गुडघे-टाचांमधून असह्य वेदना, ठणके येणं.. अशा अनेक समस्या थोडय़ा फार फरकाने, वयानुसार कमी-जास्त स्वरूपात आपणा सर्वामध्येच आढळतात, ज्या तात्पुरत्या तेल-बामाच्या उपायांनी आपण शिथिल करतो. मात्र काहींच्या बाबतीत ही संवेदनाच निघून गेल्याने आपल्याला दुखतंय, ही भावनाच नष्ट झालेली असते. म्हणूनच असं म्हटलं जातं की, 'वेदना हीदेखील देवाने आपल्याला दिलेली एक देणगीच आहे.'

आज जगभरातलं मधुमेहींचं वाढतं प्रमाण लक्षात घेता अशी 'वेदनाशून्य' लोकसंख्याही तितकीच वाढत आहे. जागतिक वैद्यकीय विश्वात भारताला तर 'कॅपिटल ऑफ डायबिटीस' अर्थात 'मधुमेहाची राजधानी'चं संबोधलं जातं. त्यामुळे आपल्याकडे गँगरिनमधून उद्भवणा-या अंगविच्छेदनाचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं 'डायपेड' या फुट लॅबचे ऑर्थोटिस्ट आणि प्रोस्थेटिस्ट डॉ. भूषण हेमाडे सांगतात. ते कसं तर, मधुमेहामुळे शरीरातल्या रक्तवाहिन्या फुगतात, त्या जाड व्हायला लागल्या की त्यातल्या संवेदनाच निघून जातात.

अनेकांमध्ये शरीरातला रक्तप्रवाह कमी होतो. त्यानंतर पायाची हाडं ठिसूळ होऊ लागतात. त्यातला जैवयांत्रिकपणा(बायोमेकॅनिक्स) जाऊन हळूहळू पाय जमिनीलाच पूर्णत: टेकला जाण्याची म्हणजेच फ्लॅट फुटची समस्या उद्भवते आणि पाय वाकडा होतो. काही वेळेस तर हाडं आतून बाहेर येतात. म्हणजेच जखमा आतून बाहेर येतात. सर्वसाधारण लोकांचं मत असतं की, मी तर चप्पल घालून बाहेर जातो, मला काय होणार. पण आतल्या हाडांतून हिमनगासारख्या जखमा बाहेर येत असल्याने तिथे भोवरी होऊन हळूहळू संसर्ग होतो. याची पुढची स्टेज गँगरिन हीच. आणि परिणामत: पाय कापावा लागणं.

मधुमेहींना वेदनेची जाणीव होत नसल्याने जखम, इजा होऊच न देणं यादृष्टीने त्यांनी विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. त्यामुळे पायाला जखम झाली तरी ती वाढू न देण्यासाठी एकतर त्यावर उभं राहू नये आणि दुसरं त्यावर पाणी टाकू नये. या दोन्ही गोष्टी कटाक्षाने पाळल्या तर अंगविच्छेदनाचं प्रमाण खूप मोठय़ा प्रमाणात टळू शकतं.

'बेअरफुट संस्कृती' जपणा-या आपणा भारतीयांना 'फुट स्पा' चांगलाच परिचित झालाय, मात्र पायांचं आरोग्य कसं आहे, हे तपासणारी 'फुट लॅब' ही आपणासाठी अजून नवीनच आहे. आकर्षक वैद्यकीय विमा पॉलिसीमुळे अलीकडे वर्षातून एकदा तरी संपूर्ण 'बॉडी चेकअप' करण्याच्या सजगतेला आपण सरावलो आहोत, मात्र त्यातही पाय हा अवयव वगळलेलाच दिसतो. प्रत्येकानेच आपल्या शरीराचा संपूर्ण भार पेलणा-या पायांचंही कवतिक केलं पाहिजे, तेही आरोग्याच्या दृष्टिकोनातून. म्हणूनच पायाशी संबंधित विविध चाचण्या करणं आवश्यक आहे. यालाच 'फुट मॅपिंग किंवा फुट स्कॅनिंग' असं म्हटलं जातं.
फुट मॅपिंग चाचणी

१. फुट प्रेशर चाचणी :- चालताना पाय कसा पडतो. शरीराचा भार पायावर नेमका कशा पद्धतीने येतो. शरीराचं वजन कशा पद्धतीत पायावर पेललं जातं. आणि तुम्ही चालताना तुमची लकब कशी आहे. त्याच्यामुळे तुमच्या शरीराच्या कुठल्या भागावर जास्त वजन येतं हे पाहिलं जातं. खरं तर चालण्यासाठी जो माणूस पायांचा वापर करतो, त्या प्रत्येकानेच ही टेस्ट करणं गरजेचं आहे.

२. नव्‍‌र्हस् चाचणी :- रक्तप्रवाह तपासला जातो. शरीराच्या शिरा आतून जाडय़ा झाल्या असतील तर त्या किती जाड झाल्यात, त्यांचा आतला लवचिकपणा किती आहे, हे पाहिलं जातं.

३. पाऊल संवेदना चाचणी :- संवेदना किती प्रमाणात निघून चाललीय, ते पाहिलं जातं.
या चाचण्या एवढय़ासाठीच की संपूर्ण आयुष्य शरीराचं वजन पेलणा-या पायाच्या आरोग्यासाठी आपण किती जागरूक असायला हवं, अर्थातच त्यातून येणारे इतर आजार आपण रोखू शकतो.

आज तासन् तास उभं राहूनच काम करणं ही ज्यांच्या पेशाची गरज आहे, असे पोलिस, शिक्षक, लिफ्टमन, सुरक्षारक्षक, वॉचमन वगैरे मंडळींनी या चाचण्या आवर्जून करायला हव्यात. या तिन्ही चाचण्यांमधून येणा-या निकालावरून सुरक्षेसाठी नेमकी कोणती काळजी घ्यावी त्याचबरोबरच, प्रत्येकाच्या आवश्यकतेनुसार विविध पादत्राणं बनवून दिली जातात. खास पोरॉन (पॉली युरिथिन) मटेरिअलपासून ते बनवले जातात.

मधुमेहींसाठी पायाला एक संरक्षक कवच म्हणून विशिष्ट प्रकारचे मोजेही दिले जातात. मर्दनदायी धाग्यांपासून बनविलेल्या या मोजांमधून एक प्रकारची उष्णता निर्माण होत असते. त्यातून चालताना मर्दन मिळाल्याने पायाची जळजळ होणं थांबते. मधुमेहींसाठी हे मोजे विशेष लाभदायक ठरतात. अनेकांना घोटय़ाच्या सांध्याची समस्या असते. अशा वेळी चालणं सुरळीत करणारं 'एअर वॉकर' सारखं उपकरणं चालणं 'सक्षम' बनवतं.

हे उपकरण म्हणजे एक प्रकारचं रिमूव्हेबल प्लास्टरच! आतमध्ये हवेची पातळी आपल्या आवश्यकतेनुसार कमी जास्त होत असल्याने, न्यूमॅटिकल लॉकिंगमुळे चालण्यात एक सहजता येते, आणि पायाला एक भक्कम आधार मिळत असल्याने चालण्याचा आत्मविश्वासही मिळतो. पण अर्थातच वरील चाचण्यांवरून आणि डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानुरूप या गोष्टी वापरणं उपयुक्त ठरतं. धोक्याची सूचना देणा-या या चाचण्या आपल्याला भविष्यात सुरक्षित उपायांचे इशारे नक्कीच देतात.

मूलत: कृत्रिम पाय बनविण्याच्या व्यवसायात असलेले डॉ. भूषण हेमाडे सांगतात की, 'आपल्या अनास्थेमुळे पाय गमवावा लागणं, आणि त्यातून होणा-या शारीरिक-मानसिक वेदना मी खूप जवळून पाहिल्या आहेत. याला कारण पंढरीच्या पायांवर डोकं ठेवणारे आपण, आपल्या पायांची मात्र चाळण झाली तरी दुर्लक्ष करतो. अंगविच्छेदनामुळे कृत्रिम पाय बनवावा लागण्यापेक्षा जर मी सुदृढ पावलांसाठी निरोगी पादत्राणे बनवू शकलो, तर मला अधिक आनंद आहे.

आणि हेच माझं ध्येयही.' त्यासाठीच गेली २५ र्वष ते या क्षेत्रात संशोधन करत आहेत. भारतात अशी फुट लॅब असणारे ते एकमेव असून मधुमेहामुळे कुणाचाही पाय कापला जाऊ नये, या ध्येयासह आपल्या 'सपोर्ट हॅण्डिक)प्ड इंडिया' या सामाजिक संस्थेमार्फत आज ते देशभरात 'दीपस्तंभ' प्रकल्पांतर्गत पायाच्या आरोग्याचं महत्त्व पटवून देणारी मोफत शिबिरं करत असतात. त्यांचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर आहेत, मुंबईचे डबेवाले. पायांवरच ज्यांचा चरितार्थ चालतो, अशा या डबेवाल्यांनीही ते जिथून जिथून डबे उचलतात, त्या जवळ-जवळ दोन लाख लोकांपर्यंत पायाच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचं कार्य त्यांनी हाती घेतलंय.


मधुमेहींनी घ्यायची काळजी

पायाला मालिश करू नये.
फुट स्पा करू नये.
फिश पेडिक्युअरसारखे प्रकार तर टाळावेतच.
बाम, तेल काहीच वापरू नका.
मुळात वेदनाशून्य पायांना मसाएरने कितीही मालिश केले तरी ते जाणवत नाही, आणि तो जोर काढत राहतो. त्यामुळे उलट आतील शिरांना त्रास होतो.
नखं कापताना खास काळजी घ्यावी. विशेषत: एकाच रेषेत कापावीत.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe

No comments:

Post a Comment