दिवसा कडक ऊन आणि रात्री धो धो पाऊस असं काहीसं वातावरण सध्या मुंबईकर अनुभवत आहेत. याचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर होताना दिसतोय. अशा वेळी आपल्या आरोग्याची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते. या ऑक्टोबर हिटमध्ये स्वत:ला फिट ठेवण्यासाठी या काही टिप्स सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. दिवसा कडकडीत ऊन आणि विजा चमकून आणि ढग गडगडून पडणारा धो धो पाऊस.. असं काहीसं वातावरण मुंबईकर अनुभवत आहेत. खरं म्हणजे ऑक्टोबर हिट जाणवायला लागली आहे आणि त्यात संध्याकाळी पाऊस पडायला लागल्यामुळे मुंबईकरांची अक्षरश: दैना उडत आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप असे आजारही डोकं वर काढत आहेत. दिवसभर कडक ऊन आणि त्यात पावसाचं घुंगट त्यामुळे वातावरणात अधिकच गुदमरायला होतं. घामाच्या धारा वाहत आहेत. अति प्रमाणात घाम आल्यामुळे चक्कर येण्याचं प्रमाण वाढतंय. आपण वातावरण काही बदलू शकत नाही; मात्र या बदललेल्या वातावरणात आपलं आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. अशा वेळी आरोग्य टिकवण्याचा मात्र प्रयत्न करू शकतो. कसं ते पाहू या. रखरखत्या उन्हामुळे शरीरातील ग्लुकोज, व्हिटॅमिन कमी होतं. शिवाय अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे आपल्या शरीराला वातावरणाशी जुळवून घ्यायला लागतं. असं जुळवून घेत असतानाच आजारी पडायला होतं. म्हणूनच हे सगळं टाळण्यासाठी आणि अशा वातावरणात शरीराला फिट ठेवण्यासाठी काय करता येईल म्हणजे या ऑक्टोबर हिटचा त्रास काहीसा कमी होईल हे जाणून घेऊ या. अति उष्णतेमुळे काय होतं? » त्वचा काळवंडते » स्नायूंमध्ये क्रॅम्प्स येतात. » सतत अशक्तपणा जाणवतो किंवा थकवा येतो. » डोकं कलकलल्यासारखं होतं. गोंधळ उडतो. » डोकेदुखी » मळमळणे किंवा उलटी होणे » चक्कर येणे अशा वेळी नेमकं काय करावं? » घामावाटे शरीराबाहेर जाणारं पाणी टिकवण्यासाठी भरपूर पाणी प्यावं. त्यासाठी तहान लागण्याची वाट पाहात बसू नका. मुळात आजारी असाल किंवा तुमच्या काही गोळया सुरू असतील तर अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. » बाहेर जाताना किंवा घरातही शक्यतो घट्ट कपडे घालणं टाळावं. सैल, वजनाने आणि रंगाने हलके कपडे वापरावेत. » उन्हामुळे शरीरातील उष्णता वाढते. घामाच्या धारा वाहून शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. म्हणून ग्लुकॉन-डी, इलेक्ट्रोल पावडरचं पाणी सोबत ठेवावं. म्हणजे शरीराला थंडावा मिळण्यास मदत होते. » अशा वेळी चक्कर येणे, नाकातून रक्त येणे असे विकार होतात. म्हणूनच ज्यांना हा त्रास आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने या विकारांवर पटकन बरं वाटेल अशी औषधं सोबत ठेवावीत. » शरीरातील साखरेचं प्रमाणही कमी होतं. तेव्हा सोबत साखरेची पुडी ठेवावी. » दिवसभर घामाच्या धारांमुळे शरीर अगदी चिकट होऊन जातं. अशा वेळी रात्री झोपताना कोमट पाण्याने अंघोळ करावी म्हणजे फ्रेश वाटतं. शिवाय घामामुळे येणारा थकवा कमी होतो. शरीराची दरुगधी कमी होते. » स्कीनची काळजी अधिक घ्यावी लागते. एसपीएफ असलेल्याच क्रीम वापराव्यात. अन्यथा त्वचेचं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. » गाडीने प्रवास करत असाल तर गाडी पार्क करताना सावलीत पार्क करावी. कारण गडद रंग आणि इंजिनमुळे गाडी लवकर तापते आणि पुन्हा प्रवास करायला लागलो की त्याचा त्रास अधिक होतो. उन्हात पार्क केलेल्या गाडीत लहान मुलांना अजिबात ठेवू नका. » अल्कोहोल किंवा साखरेचं अतिरिक्त प्रमाण असलेली अन्य प्रकारची शीतपेयं शक्यतो टाळणंच योग्य ठरेल. » ताप आलेल्यांना थंड पाण्याच्या फडक्याने पुसून काढावं म्हणजे ताप लवकर उतरायला मदतच होईल. » या दिवसांत अगदी लहान बाळं, लहान मुलं आणि वयोवृद्ध मंडळींची विशेष काळजी घ्यावी. » शक्यतो थंड ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे घरात फॅनखालीच बसावं. बाहेर जाणं आवश्यक असेल तर एसी असलेल्या ठिकाणी म्हणजे शॉपिंग मॉलमध्ये जावं. म्हणजे काही वेळ का होईना पण शरीराला थंडावा मिळतो. » घरात दुपारच्या वेळेला ऊन येत असेल तर खिडकीला पडदे लावावेत. म्हणजे हे ऊन आत येणार नाही. पडदे फिक्या रंगाचे, मात्र सुती आणि काहीसे जाड असावेत. मात्र पारदर्शक असू नयेत, कारण अशा पडद्यांमधून ऊन परावर्तीत होऊ शकतं. » संत्र, कलिंगड, मोसंबी, पेर अशी पाणीदार फळं सेवन करावीत. » दुचाकीवरून प्रवास करणार असाल तर चेहरा आणि केस स्कार्फने झाकावा. » डोळ्यांचं उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी गॉगलचा वापर करावा. शक्य असल्यास छत्रीचाही वापर करावा. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी.. » अशा वेळी त्या माणसाला प्रथम उन्हातून सावलीत आणावं. शक्य असल्यास अशा व्यक्तींना एअर कंडिशनमध्ये ठेवावं. सर्वप्रथम त्या माणसाला पाणी प्यायला द्यावं. » त्याच्या गळ्याला खांद्यावर बर्फ चोळावा. म्हणजे रक्ताभिसरण सुरळीत होते. » जाड कपडे घातले असतील तर ते कमी करावेत. » अंगावर थंड पाणी ओतावं. शक्य असल्यास बाथ टबमध्ये बसवावं. |