आजची पिढी एकविसाव्या शतकात जगतेय. ही तरुण मंडळी हुशार आहेतच तसंच प्रत्येक क्षेत्रात ती पुढे आहेत. ती सतत तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसतायेत. ही चांगली गोष्ट आहे मात्र त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाच्या ती आहारी गेली आहेत. मोबाईल, कॉम्प्युटर, टीव्ही याचा अतिरिक्त वापर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उलट- सुलट खाणं. ही तरुणांची सध्याची जीवनशैलीच झाली आहे. यामुळे मुलांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होताना दिसतोय. तीस वर्षाच्या अंजलीला चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयीमुळे अॅटॅक आला आणि आता ती डायबिटीसने ग्रस्त आहे. इतक्या लहान वयात डायबिटीस होईल, याची तिला मुळीच कल्पना नव्हती. पंचवीस वर्षीय श्रद्धाच्या लग्नाला तीन र्वष झाली. हायपोथायरॉडिझममुळे तिला गर्भधारणा होत नव्हती. त्यामुळे ती खूप चिंतेत होती. मनीष दिसायला चांगला होता; पण तो सतत टीव्ही बघायचा आणि कॉम्प्युटरवर नुसता गेम खेळात बसायचा. त्याचा परिणाम त्याच्या डोळ्यांवर झाला. परिणामी त्याला अभ्यास करायलाही त्रास होऊ लागला. समोरची अक्षरं धुरकट दिसायला लागली. ज्योत्स्नाला फास्ट फूड खाण्याची सवय होती. त्यामुळे तिचं वजन वाढत होतं आणि ती स्थूलपणाने त्रस्त झाली होती. त्याचा परिणाम तिच्या सौंदर्यावर झाला. परिणामी लग्न ठरायला त्रास झाला. तशीच गत सुनीलची होती. त्याची फिरतीची नोकरी असल्यामुळे त्याला सतत बाहेरचं खावं लागायचं. सतत बाहेरच्या खाण्यामुळे पोटात दुखण्याची समस्या जडली. तपासणी केल्यावर समजलं की त्याला अल्सरने ग्रासलं आहे. चुकीची संगत मिळाल्याने निखिलला स्मोकिंग आणि ड्रिंकिंगची सवय लागली, त्यामुळे तो व्यसनं सोडायचं नावच घेत नाही. अशी एक नाही तर लाखो उदाहरणं आपल्या आसपास पाहायला मिळतील. अनियमित दिनचर्या आणि आधुनिक पद्धतीचा आहार-विहार यामुळे लोक विशेषत: तरुण मंडळी आजारी पडतात. याचं मुख्य कारण म्हणजे पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण असं म्हणता येईल. पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण म्हणजे बाहेरचे पदार्थ खाणं, सतत मैद्याचे पदार्थ खाणं, आपल्या प्रकृतीला सोसणारं नसतं. तसंच रात्रीचं जागरण करणं ही मुळात भारतीयांची प्रकृतीच नाही. म्हणजे आपण आपल्या प्रकृतीच्या विरुद्ध जाऊन काही गोष्टी करतो. म्हणूनच अशा समस्यांना तोंड द्यावं लागतं. याची कारणं काय आहेत हे समजून घेऊ या - रात्री उशिरा झोपणं रात्री उशिरा झोपणं ही आताच्या तरुण वर्गात फॅशन झाली आहे, असं म्हटलं तरी चालेल. आयुर्वेदात रात्री जागरण करणं वातवृद्धीचं लक्षण मानलं जातं. जी मंडळी रात्री जागरण करतात त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते. जेणेकरून शरीराचं कार्य बिघडतं. अचानक वजन कमी होतं किंवा ती व्यक्ती निस्तेज दिसायला लागते. तसंच पचनक्रियेसंबंधित विविध विकार होतात. उशिरा जेवणं शास्त्रानुसार सकाळी न्याहारी, दुपारी बारा वाजेपर्यंत जेवण, संध्याकाळी चार ते पाच वाजेपर्यंत न्याहारी आणि रात्री आठ किंवा आठच्या आत जेवण असं सांगितलं आहे. मात्र सद्य:स्थितीत कोणीच या वेळा पाळताना दिसत नाहीत. संध्याकाळी आठनंतर खाणं व्यर्ज सांगितलं आहे. सध्या आपल्याकडे रात्री उशिरा जेवणाचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे आम्लपित्त, स्थूलत्व, डायबिटीस यासारखे आजार डोकं वर काढतात. मोबाईल आणि कॉम्प्युटरचा अधिक वापर आधुनिक तंत्रज्ञानाची प्रगती झाल्यामुळे विकास दर निश्चितच वाढला आहे, मात्र त्याचे दुष्परिणाम शरीरावर होऊ लागले आहेत. त्यामुळे कॅन्सर, बहिरेपणा, निद्रानाश आदी दोषांना बळी पडतो. आहाराविषयी सवयी आणि कुपोषण आजकाल स्वाद आणि आधुनिकता याच्या नावावर काहीही जेवण वाढलं जातं. मांसाहार, फास्ट फूडची आवड, प्रक्रिया केलेलं अन्नपदार्थ, हवाबंद पाकिटातले खाण्याचे पदार्थ आणि त्यात असलेली प्रिझव्र्हेटिव्ह तसंच न चावता खाणं, विरुद्ध आहाराचं सेवन करणं, कधीही काहीही खाणं, या सवयी आपल्या शरीरावर परिणाम करतात. आज अधिकाधिक आजारपण या चुकीच्या आहाराच्या सवयींमुळे होताना दिसतात. औषधांचं सेवन आजकाल काहीही विचार न करता कोणतीही औषधं घेतली जातात. विशेषत: पेनकिलर. त्यामुळे किडणीचे आजार, वजन वाढण्यासाठी घेतली जाणारी स्टेरॉईड्स औषधांमुळे किडणी आणि हाडांची शक्ती कमकुवत होणं आदी विकार होतात. आजकालच्या मुलांना जोरजोरात वाहनं चालवण्याची क्रेझ असते, परिणामी मोठया दुर्घटना होऊ शकतात. याशिवाय अनेक सवयी आहेत, ज्या तरुणांच्या स्वास्थ्याला कारणीभूत ठरत आहेत. काय परिणाम दिसतात? शारीरिक समस्या » शरीराचा योग्य विकास होत नाही. » डोळ्यांची दृष्टी कमजोर होते. » कुपोषण किंवा स्थूलत्व येतं. » रक्ताची कमतरता » हृदयरोग, हायपरटेन्शन, डायबिटीज, यकृत, प्लीहा यांचे आजारा उद्भवतात. » पचनासंबंधी विकार होतात. आम्लपित्त, गॅस असेही विकार होतात. मानसिक समस्या किंवा नशा करणे आजकालची मुलं अधिक प्रमाणात मानसिक रुग्ण आहेत. चिंता, काळजी, निद्रानाश, आत्मविश्वासाची कमतरता, भावनिक पातळीवर चंचलपणा आदी समस्यांनी तरुणांना ग्रासलेलं दिसतं. म्हणूनच तरुण मुलं आत्महत्या करणे किंवा हिंसा करणे आदी गोष्टींना बळी पडताना दिसतात. संवेदनशील नसणं ही मानसिक अस्वस्थता असण्याचं महत्त्वाचं कारण आहे. याशिवाय नशा करणाऱ्या मुलांची समस्याही आपल्याकडे काही कमी नाही. सतत व्यसनांच्या आहारी गेल्यामुळे तरुणांमध्ये हृदयरोग, फुप्फुसांचे आजार, कॅन्सर, यकृत किंवा मानसिक आजारांचे बळी पडलेले दिसतात. सौंदर्यासंबंधी समस्या उलट-सुलट खाणं आणि अनियमित दिनचर्या यामुळे तरुणांमध्ये मुरुमं, डोळ्यांखाली काळी वर्तुळं, केस गळणे किंवा केस पांढरे होणे, उंची न वाढणे, कमी वयातच म्हातारपणाची लक्षणं दिसायला लागतात. अशा विविध कारणांमुळे तरुणांमध्ये सामाजिक, सांस्कृतिक, नैतिक मूल्यांचा अभाव पाहायला मिळतो. त्यांना स्वातंत्र्य हवं असतं. त्यांना समाजाशी किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्यांपासून ते स्वत:ला लांब ठेवतात. आजकालची तरुणपिढी केवळ स्वत:चाच विचार करताना दिसते, या सगळ्याचं मूळ बघायला गेलं तर ते पाश्चिमात्य संस्कृतीचं आकर्षण असं म्हणता येईल. पाश्चिमात्य संस्कृतीचं आकर्षण असल्यामुळेच असे बरेच प्रकार होताना दिसतात. या पाश्चिमात्य संस्कृतीचा त्याग केला पाहिजे.भारतीय संस्कृतीला जवळ घेतलं पाहिजे. त्यासाठी पुढील गोष्टी करा. » लवकर निजा आणि लवकर उठावे. » रात्रीचं जागरण करू नये, पुरेशी झोप घ्यावी. » योग्य वेळी जेवण, न्याहारी घ्यावी. » बाहेरचं खाणं व्यर्ज करावं. पिझ्झा, बर्गर यामुळेच स्थूलत्व येण्याची शक्यता असते. » पालकांनी मुलाशी संवाद साधावा. » नियमित योगा किंवा शरीराला आवश्यक असा व्यायाम करावा. » सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजकालच्या तरुणाने आत्मपरीक्षण करणं आवश्यक आहे. |