Wednesday, September 16, 2015

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

जीवनशैलीमुळे येणारं आजारपण

आजची पिढी एकविसाव्या शतकात जगतेय. ही तरुण मंडळी हुशार आहेतच तसंच प्रत्येक क्षेत्रात ती पुढे आहेत. ती सतत तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसतायेत. ही चांगली गोष्ट आहे मात्र त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाच्या ती आहारी गेली आहेत. मोबाईल, कॉम्प्युटर, टीव्ही याचा अतिरिक्त वापर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उलट- सुलट खाणं. ही तरुणांची सध्याची जीवनशैलीच झाली आहे. यामुळे मुलांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होताना दिसतोय.

तीस वर्षाच्या अंजलीला चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयीमुळे अ‍ॅटॅक आला आणि आता ती डायबिटीसने ग्रस्त आहे. इतक्या लहान वयात डायबिटीस होईल, याची तिला मुळीच कल्पना नव्हती. पंचवीस वर्षीय श्रद्धाच्या लग्नाला तीन र्वष झाली. हायपोथायरॉडिझममुळे तिला गर्भधारणा होत नव्हती. त्यामुळे ती खूप चिंतेत होती.

मनीष दिसायला चांगला होता; पण तो सतत टीव्ही बघायचा आणि कॉम्प्युटरवर नुसता गेम खेळात बसायचा. त्याचा परिणाम त्याच्या डोळ्यांवर झाला. परिणामी त्याला अभ्यास करायलाही त्रास होऊ लागला. समोरची अक्षरं धुरकट दिसायला लागली.
ज्योत्स्नाला फास्ट फूड खाण्याची सवय होती. त्यामुळे तिचं वजन वाढत होतं आणि ती स्थूलपणाने त्रस्त झाली होती. त्याचा परिणाम तिच्या सौंदर्यावर झाला.

परिणामी लग्न ठरायला त्रास झाला. तशीच गत सुनीलची होती. त्याची फिरतीची नोकरी असल्यामुळे त्याला सतत बाहेरचं खावं लागायचं. सतत बाहेरच्या खाण्यामुळे पोटात दुखण्याची समस्या जडली. तपासणी केल्यावर समजलं की त्याला अल्सरने ग्रासलं आहे.

चुकीची संगत मिळाल्याने निखिलला स्मोकिंग आणि ड्रिंकिंगची सवय लागली, त्यामुळे तो व्यसनं सोडायचं नावच घेत नाही.
अशी एक नाही तर लाखो उदाहरणं आपल्या आसपास पाहायला मिळतील. अनियमित दिनचर्या आणि आधुनिक पद्धतीचा आहार-विहार यामुळे लोक विशेषत: तरुण मंडळी आजारी पडतात. याचं मुख्य कारण म्हणजे पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण असं म्हणता येईल.

पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण म्हणजे बाहेरचे पदार्थ खाणं, सतत मैद्याचे पदार्थ खाणं, आपल्या प्रकृतीला सोसणारं नसतं. तसंच रात्रीचं जागरण करणं ही मुळात भारतीयांची प्रकृतीच नाही. म्हणजे आपण आपल्या प्रकृतीच्या विरुद्ध जाऊन काही गोष्टी करतो. म्हणूनच अशा समस्यांना तोंड द्यावं लागतं. याची कारणं काय आहेत हे समजून घेऊ या -

रात्री उशिरा झोपणं

रात्री उशिरा झोपणं ही आताच्या तरुण वर्गात फॅशन झाली आहे, असं म्हटलं तरी चालेल. आयुर्वेदात रात्री जागरण करणं वातवृद्धीचं लक्षण मानलं जातं. जी मंडळी रात्री जागरण करतात त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते. जेणेकरून शरीराचं कार्य बिघडतं. अचानक वजन कमी होतं किंवा ती व्यक्ती निस्तेज दिसायला लागते. तसंच पचनक्रियेसंबंधित विविध विकार होतात.

उशिरा जेवणं

शास्त्रानुसार सकाळी न्याहारी, दुपारी बारा वाजेपर्यंत जेवण, संध्याकाळी चार ते पाच वाजेपर्यंत न्याहारी आणि रात्री आठ किंवा आठच्या आत जेवण असं सांगितलं आहे. मात्र सद्य:स्थितीत कोणीच या वेळा पाळताना दिसत नाहीत. संध्याकाळी आठनंतर खाणं व्यर्ज सांगितलं आहे. सध्या आपल्याकडे रात्री उशिरा जेवणाचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे आम्लपित्त, स्थूलत्व, डायबिटीस यासारखे आजार डोकं वर काढतात.

मोबाईल आणि कॉम्प्युटरचा अधिक वापर

आधुनिक तंत्रज्ञानाची प्रगती झाल्यामुळे विकास दर निश्चितच वाढला आहे, मात्र त्याचे दुष्परिणाम शरीरावर होऊ लागले आहेत. त्यामुळे कॅन्सर, बहिरेपणा, निद्रानाश आदी दोषांना बळी पडतो.

आहाराविषयी सवयी आणि कुपोषण

आजकाल स्वाद आणि आधुनिकता याच्या नावावर काहीही जेवण वाढलं जातं. मांसाहार, फास्ट फूडची आवड, प्रक्रिया केलेलं अन्नपदार्थ, हवाबंद पाकिटातले खाण्याचे पदार्थ आणि त्यात असलेली प्रिझव्‍‌र्हेटिव्ह तसंच न चावता खाणं, विरुद्ध आहाराचं सेवन करणं, कधीही काहीही खाणं, या सवयी आपल्या शरीरावर परिणाम करतात. आज अधिकाधिक आजारपण या चुकीच्या आहाराच्या सवयींमुळे होताना दिसतात.

औषधांचं सेवन

आजकाल काहीही विचार न करता कोणतीही औषधं घेतली जातात. विशेषत: पेनकिलर. त्यामुळे किडणीचे आजार, वजन वाढण्यासाठी घेतली जाणारी स्टेरॉईड्स औषधांमुळे किडणी आणि हाडांची शक्ती कमकुवत होणं आदी विकार होतात. आजकालच्या मुलांना जोरजोरात वाहनं चालवण्याची क्रेझ असते, परिणामी मोठया दुर्घटना होऊ शकतात. याशिवाय अनेक सवयी आहेत, ज्या तरुणांच्या स्वास्थ्याला कारणीभूत ठरत आहेत.

काय परिणाम दिसतात?

शारीरिक समस्या

»  शरीराचा योग्य विकास होत नाही.

»  डोळ्यांची दृष्टी कमजोर होते.

»  कुपोषण किंवा स्थूलत्व येतं.

»  रक्ताची कमतरता

»  हृदयरोग, हायपरटेन्शन, डायबिटीज, यकृत, प्लीहा यांचे आजारा उद्भवतात.

»  पचनासंबंधी विकार होतात. आम्लपित्त, गॅस असेही विकार होतात.

मानसिक समस्या किंवा नशा करणे

आजकालची मुलं अधिक प्रमाणात मानसिक रुग्ण आहेत. चिंता, काळजी, निद्रानाश, आत्मविश्वासाची कमतरता, भावनिक पातळीवर चंचलपणा आदी समस्यांनी तरुणांना ग्रासलेलं दिसतं. म्हणूनच तरुण मुलं आत्महत्या करणे किंवा हिंसा करणे आदी गोष्टींना बळी पडताना दिसतात. संवेदनशील नसणं ही मानसिक अस्वस्थता असण्याचं महत्त्वाचं कारण आहे. याशिवाय नशा करणाऱ्या मुलांची समस्याही आपल्याकडे काही कमी नाही. सतत व्यसनांच्या आहारी गेल्यामुळे तरुणांमध्ये हृदयरोग, फुप्फुसांचे आजार, कॅन्सर, यकृत किंवा मानसिक आजारांचे बळी पडलेले दिसतात.

सौंदर्यासंबंधी समस्या

उलट-सुलट खाणं आणि अनियमित दिनचर्या यामुळे तरुणांमध्ये मुरुमं, डोळ्यांखाली काळी वर्तुळं, केस गळणे किंवा केस पांढरे होणे, उंची न वाढणे, कमी वयातच म्हातारपणाची लक्षणं दिसायला लागतात.

अशा विविध कारणांमुळे तरुणांमध्ये सामाजिक, सांस्कृतिक, नैतिक मूल्यांचा अभाव पाहायला मिळतो. त्यांना स्वातंत्र्य हवं असतं. त्यांना समाजाशी किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्यांपासून ते स्वत:ला लांब ठेवतात. आजकालची तरुणपिढी केवळ स्वत:चाच विचार करताना दिसते, या सगळ्याचं मूळ बघायला गेलं तर ते पाश्चिमात्य संस्कृतीचं आकर्षण असं म्हणता येईल. पाश्चिमात्य संस्कृतीचं आकर्षण असल्यामुळेच असे बरेच प्रकार होताना दिसतात. या पाश्चिमात्य संस्कृतीचा त्याग केला पाहिजे.भारतीय संस्कृतीला जवळ घेतलं पाहिजे.

त्यासाठी पुढील गोष्टी करा.

»  लवकर निजा आणि लवकर उठावे.

»  रात्रीचं जागरण करू नये, पुरेशी झोप घ्यावी.

»  योग्य वेळी जेवण, न्याहारी घ्यावी.

»  बाहेरचं खाणं व्यर्ज करावं. पिझ्झा, बर्गर यामुळेच स्थूलत्व येण्याची शक्यता असते.

»  पालकांनी मुलाशी संवाद साधावा.

»  नियमित योगा किंवा शरीराला आवश्यक असा व्यायाम करावा.

»  सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजकालच्या तरुणाने आत्मपरीक्षण करणं आवश्यक आहे.

Read More »

शशांकासन

हे आसन करताना चंद्राची शीतलता अनुभवायला मिळते तर आकार सशाप्रमाणे दिसतो. पाठदुखी कमी होते तसंच पोटावरची चरबी कमी होण्यासही मदत होते.

संस्कृतमध्ये शशांक याचा अर्थ 'चंद्र' आहे. या शब्दांचे दोन अर्थ आहेत. दुसरे म्हणजे 'ससा.' हे आसन करताना त्याचा आकार सशासारखा दिसतो. तसेच चंद्र हा शीतल व शांत आहे. हे आसन करताना आपण पूर्णपणे रिलॅक्स होतो. जे चंद्राचे गुण आहेत तेच हे आसन करताना आपणास अनुभवयास येते.

आसन

सुरुवातीला वज्रासनामध्ये बसावं. ज्या व्यक्तींना वज्रासन माहीत नसेल तर त्यांनी पुढीलप्रमाणे आसन करावं. प्रथम दोन्ही पाय समोर ठेवून बसावं. (बोथ लेग फॉर्वड) आता उजवा पाय गुडघ्यातून दुमडावा. तसंच डावासुद्धा गुडघ्यातून दुमडावा. आणि आता दोन्ही पायांच्या तळव्यावर बसावं. आता शरीराला रिलॅक्स करावं.

आता दोन्ही हात वर करावेत आणि शरीराचा वरील भाग अलगदपणे खाली आणा. शक्य झाल्यास डोके जमिनीला लावण्याचा प्रयत्न करावा. तसेच दोन्ही हात जमिनीवर ठेवावेत. व जितके पाठीला स्ट्रेच देता येईल तितके स्ट्रेच द्यावे. या स्थितीत डोळे बंद करावे व काही सेकंद या स्थितीत राहावे. शरीराला (अप्पर बॉडी) वरती आणताना घाई करू नये. हळुवारपणे अलगदपणे दोन्ही हात शरीराच्या बाजूला ठेवावेत.

श्वास

वज्रासन स्थितीत असताना जेव्हा दोन्ही हात आपण वर आणू तेव्हा श्वास घ्यावा व जेव्हा आपण खाली वाकू तेव्हा श्वास सोडून द्यावा. आपले डोके व हात जमिनीला स्पर्श केलेला असेल तेव्हा या स्थितीत नॉर्मल श्वास चालू असावा व जेव्हा आपण हात व डोके यांना वरती आणताना श्वास घ्यावा व हात शरीराच्या बाजूला आणताना श्वास सोडावा. व रिलॅक्स व्हावे.

वेळ

सुरुवातीला तुम्ही जितके सेकंद फायनल पोझिशनमध्ये राहू शकाल अगदी आरामात तेवढे सेकंद तुम्ही राहू शकता. ज्या व्यक्ती अगदी आरामात फायनल पोझिशनमध्ये २ मिनिटं राहू शकतात. या स्थितीत नॉर्मल श्वासोच्छ्वास चालू ठेवावा. नंतर हळूहळू मिनिटं वाढवावीत. या आसनात श्वास हा नॉर्मल/ नेहमीप्रमाणे असावा. हे आसन २ ते ३ वेळा करावे.

आसन करताना घ्यावयाची काळजी

ज्या व्यक्तींना वज्रासनामध्ये बसल्यावर त्रास होत असेल त्यांनी हे आसन करू नये. सुरुवातीस वज्रासनामध्ये बसण्याचा सराव करावा. (हा सराव ज्यांना गुडघ्याचा त्रास नाही आहे त्या व्यक्तींनी करावा. ज्यांचे गुडघ्याचे ऑपरेशन झाले असतील, त्या व्यक्तींनी करू नये.) वज्रासनामध्ये बसल्यानंतर आपण शरीराचा वरील भाग अलगदपणे खाली आणावा.

एकदम धापकन खाली वाकू नये, तसे केल्यास मानेला झटका बसू शकतो व पाठही दुखू शकते. शक्यतो खाली येताना काळजी घ्यावी व तसेच वरती उठताना अलगदपणे उठावे. सुरुवातीस शरीराचा वरील भाग वरती आणताना त्रास होईल तेव्हा आपण दोन्ही हातांच्या साहाय्याने वर यावे.

विशेष टीप

ज्या व्यक्तींना खूप जास्त रक्तदाबाचा त्रास, स्लिप डीस व तसेच व्हर्टिगो आहे त्या व्यक्तींनी हे आसन करू नये.

फायदे

या आसनाने पाठीला खूप चांगला ताण मिळतो. ज्यांना पाठदुखीचा त्रास असेल त्यांनी हे आसन करावे.
पाठीप्रमाणेच आसनात पोटाला सुद्धा चांगल्या प्रकारे ताण मिळतो. हे आसन दररोज केल्यास पोटही कमी होईल व गॅसचा त्रासही कमी होईल.

शंशाकासन अजून एका पद्धतीने करतात. ते आपण पुढीलप्रमाणे बघू या.

शशांकासनाचा दुसरा प्रकार

आसन :

वज्रासनामध्ये बसा. पाठ ताठ व मान सरळ ठेवावी. आता डाव्या हाताने उजव्या हाताचे मनगट पकडावे पाठीमागे. पूर्ण शरीराला रिलॅक्स करा. आता श्वास घेत शरीराचा वरील भाग जमिनीच्या दिशेने न्या. व कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करावा.

या स्थितीत काही सेकंद थांबावं. श्वासोच्छ्वास नॉर्मल असावा. तसेच श्वास घेत शरीराचा वरील भाग अलगदपणे वर आणावा. श्वास सोडताना पाठीमागील हात अलगदपणे सोडावे. व काही सेकंद रिलॅक्स व्हावे.

श्वास

श्वास घेताना दोन्ही हात मागे असावेत. डाव्या हाताने उजव्या हाताचे मनगट पकडावे. वाकताना श्वास सोडावा. डोके जमिनीला लावण्याचा प्रयत्न करावा. या स्थितीत श्वासोच्छ्वास हा नॉर्मल असावा. श्वास घेताना शरीराच्या वरील भागाला वर आणावं. श्वास सोडताना हात सोडावेत व काही सेकंद रिलॅक्स व्हावे.

वेळ

सुरुवातीस १०-१५ सेकंद थांबण्याचा प्रयत्न करावा. नंतर ३० सेकंदांपर्यंत थांबण्याचा प्रयत्न करावा.

आसन करताना घ्यावयाची काळजी

आपण जेव्हा हात पाठीमागे पकडतो. तेव्हा मनगट हे अति सैल पकडू नये किंवा जास्त जोर देऊन सुद्धा पकडू नये. इतकी काळजी घ्यावी की ते मनगट प्रॉपर पकडले गेले पाहिजे. त्यानंतर शरीराचा वरील भाग खाली नेताना अलगदपणे जावं. कारण आपले हात पाठीमागे पकडलेले असतात, तेव्हा खाली वाकताना आपला तोल जाऊ शकतो तेव्हा खाली वाकताना शक्यतो काळजी घ्यावी व तसेच वरती येताना सुद्धा मानेवर ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. वरती येताना हळुवारपणे यावे, घाई करू नये.

फायदे :

जे फायदे शशांकासनाने मिळतात, तेच फायदे या आसनाने मिळतात.

विशेष टीप :

ज्या व्यक्तींना खूप 'हाय ब्लडप्रेशर, स्पील डीस्क व तसे व्हर्टिगो आहे, अशा व्यक्तींनी हे आसन करू नये.

Read More »

उपयुक्त कारलं

कारल्याच्या कडवट चवीमुळे कारलं खाणारी मंडळी तशी खूप कमी आहेत. इंग्रजीत बिटर गोर्ड किंवा बिटर मेलन या नावानेही प्रसिद्ध आहे. चवीला कडू असलं तरी कारल्यामध्ये बरेच गुण आहेत.

कारल्याच्या कडवट चवीमुळे कारलं खाणारी मंडळी तशी खूप कमी आहेत. इंग्रजीत बिटर गोर्ड किंवा बिटर मेलन या नावानेही प्रसिद्ध आहे. चवीला कडू असलं तरी कारल्यामध्ये बरेच गुण आहेत.

कमी कॅलरीज असलेल्या कारल्यात बी१, बी२, बी३ आणि क ही जीवनसत्त्वं, मॅग्नेशिअम, झिंक, फॉस्फरस, मँगनीझ, डाएटरी फायबर्स, लोह, बिटा कॅरोटिन, कॅल्शिअम अणि पोटॅशियमचं मुबलक प्रमाणात आहे. अशा भरपूर जीवनसत्त्वांचा समावेश असलेल्या कारल्याचे गुणधर्म पाहुयात.

»  कारल्याचा रस प्यायल्याने रक्तात गुठळ्या होण्याचं प्रमाण कमी होतं.

»  कॉलेरा झालेल्या रुग्णांना दोन चमचे कारल्याच्या पानांचा रस, दोन चमचे पांढऱ्या कांद्याचा रस आणि एक चमचा लिंबाचा रस एकत्र करून प्यायला द्यावा. रुग्णाच्या स्थितीत फरक पडेपर्यंत याचं सेवन करावं. लवकर आराम पडतो.

»  रुग्णांनी आवर्जून सेवन करावं.

»  कारल्याचा रस सेवन केल्याने यकृताचं कार्य सुरळीत होतं, शरीराला नको असलेले पदार्थ बाहेर टाकले जातात.

»  रक्ताभिसरण सुरळीत होतं

»  संधीवात किंवा पायात गोळे येणे या विकारापासून आराम मिळतो.

» श्वसनाचा विकार असलेल्यांना दोन चमचे ताज्या कारल्याचा रसात मध घालून तो एक कप पाण्यात घालून व्यवस्थित ढवळा. दररोज प्यायल्याने लवकर आराम पडेल.

Read More »

गणेशपूजनातल्या औषधी पत्री

हरतालिका,  गणेशपूजन आणि ऋषीपंचमी या तीन दिवसांमध्ये पूजेसाठी विविध पत्री वापरल्या जातात. उद्या हरतालिका आणि परवा गणपती बाप्पांचं आगमन. या तीन दिवसांत वापरल्या जाणा-या काही महत्त्वाच्या वनस्पती अतिशय औषधी आहेत. त्यातल्या काही महत्त्वाच्या औषधी पत्रींचे गुणधर्म जाणून घेऊयात.

अवघ्या दोन दिवसांवर गणपती आले आहेत. ज्यांच्या घरी गणपती असतो त्यांची लगबग सुरू असेल. साफसफाई, गणपतीची आरास, त्याचा प्रसाद अशी सगळी तयारी करावी लागते. त्यातही सगळ्यात मुख्य तयारी केली जाते ती म्हणजे गणेश पूजनाची. कारण गणेशपूजनात एकवीस पत्री म्हणजे पानं वापरली जातात.

पाच दिवस गणपतीची पूजा-अर्चा करायची म्हणजे ही पत्री आणि फुलं आधीच आणून ठेवावी लागतात. कारण नंतर या सगळ्याच गोष्टी महाग होतात. मात्र या गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री किंवा फुलं याला काही ना काही औषधी महत्त्व आहे. एकवीसपैकी काही पत्रींचं औषधी महत्त्व जाणून घेऊयात.

दुर्वा

दुर्वा म्हणजे जमिनीवर पसरणारं एक प्रकारचं गवत असतं. आयुर्वेदातही दुर्वाला महत्त्व आहे. तसंच गणपतीला अतिशय प्रिय आहेत. म्हणूनच दुर्वाचा हार गणपतीला वाहिला जातो.  गर्भधारणा हवी असेल किंवा गर्भधारणेनंतर गर्भाचं रक्षण व्हावं म्हणून गर्भवतीच्या किंवा स्त्रीच्या आजूबाजूला ज्या काही वनस्पती आवश्यक असतात त्यात दुर्वा या वनस्पतीचं नाव आवर्जून घेतलं जातं.

दुर्वा प्रकृतीने थंड असतात. रक्तदोष दूर करतात. उष्णतेमुळे नाकातून रक्त येतं. त्यासाठी दुर्वांचा रस नाकात घातला जातो. त्यामुळे लवकर आराम मिळतो. पित्त झालेल्या लोकांनी खडीसाखरेबरोबर दुर्वाचा रस प्यायल्याने पित्त कमी होतं. नागिणसारखे अनेक त्वचाविकार दूर होण्यास मदत होते.

आजकाल प्रत्येक जण संगणकावरच काम करतात. सतत संगणकावर बसल्याने डोळ्यांची जळजळ होऊ शकते. अशा वेळी दुर्वाचा रस घातल्याने आराम होतो. सकाळी किंवा पहाटेच्या वेळी दुर्वावर अनवाणी चालल्याने दृष्टीदोष कमी होण्यास मदत होते. डोळ्यांवरचा ताण कमी होतो.

केवडा

गणपतीला केवडयाचं पान किंवा फूल वाहिलं जातं. केवडयाचं फूल हे बुद्धिवर्धक आहे. गणपती ही तर बुद्धीचीच देवता असल्याचं मानलं जातं. म्हणूनही हे फूल वाहिलं जातं. अपस्मारावर केवडयाची फुलं आणि केवडयाच्या कणसावरील बारीक कण एकत्र करून तयार केलेल्या मिश्रणाचं नस्य घ्यायला सांगितलं जातं. तसंच केवडयाच्या पारंब्याही बलकर असतात. थायरॉईडच्या विकारावरही केवडयाचा उपयोग होतो.

जास्वंद

हे गणपतीला आवडणारं फूल. पांढरी, पिवळी, गुलाबी आणि लाल अशा विविध रंगांमध्ये हे फुलं उपलब्ध असली तरी गणपतीला लाल रंगाचं फूलच अधिक प्रिय आहे. रंग वेगवेगळे असले तरीही त्या सगळ्या फुलांचे गुणधर्म हे सारखेच असतात. जास्वंदीच्या फुलामुळे केसांची वाढ उत्तम होते. फुलं वाटून त्यांचा रस केसांना लावला तर केस काळे होतात आणि त्यांची वाढ होते. चाईवर जास्वंदीच्या फुलांचा रस चोळल्यास फायदाच होतो.

अगस्ती

अगस्तीला आपण 'हादगा' म्हणूनही ओळखलं जातं. याच्या फुलांची भाजी केली जाते. या फुलांमध्ये अनेक जीवनसत्त्वांचा खजिना आहे.

मधुमालती

मधुमालती ही वनस्पती शहरातही अगदी सहज उपलब्ध आहे. गुलाबी, पांढरी, पिवळी अशा रंगांची ही फुलं असतात. फुप्फुसांचे विकार, त्वचारोग, सांधेदुखी, पोटातील जंत आदी विकारांवर या वनस्पतीचा उपयोग होतो.

शमी

शमीला अग्निदेवता म्हणतात म्हणून यज्ञाच्या ठिकाणी या वनस्पतीचा उपयोग केला जातो. कोरडया हवामानात वाढणारं हे झाड त्वचारोग, दमा, मूत्रपिंड या आजारांवर प्रभावी आहे.

माका

डोंगर-द-यांमध्ये वाढणारी ही वनस्पती म्हणजे रसायनी आहे. म्हणजे कोणत्याही रोगांवर रामबाण उपाय म्हणून ही वनस्पती वापरली जाते. मूत्रपिंडाचा आजारा, कावीळ, त्वचारोग, विंचूदंश आदी विकारांवर याचे औषध वापरले जाते.

बेल

एरव्ही शंकराचे आवडीचे पान म्हणून बेल ओळखलं जातं. मात्र गणेश चतुर्थीला मात्र गणपतीला मान दिला जातो. ही वनस्पती पोटातील जंतावर गुणकारी आहे. अतिसार, आव, धडधड, उष्णता आदींमध्ये हिचा उपयोग होतो.

रुई

हरतालिकेच्या पूजेत या पत्रीला विशेष मान असतो. ओसाड जागेत मोठया प्रमाणात येणाऱ्या या वनस्पतीला पांढरी, जांभळ्या रंगांची फुलं येतात. हत्तीरोगावर हे औषध अतिशय उत्तम आहे. तसंच कुष्ठरोगावरही हे चांगलं औषध आहे.

धोतरा

कोणत्याही जागेत उगवणारी ही विषारी वनस्पती आहे. काटेरी लांब नरसाळ्यासारखी याची फुलं विविध रंगांत उपलब्ध आहेत. हे फूल दमा, कफ, संधिवात आदी रोगांवर उपयुक्त ठरतं.

तुळस

एरव्ही गणपतीला दुर्वाशिवाय कोणतीही वनस्पती वाहात नाही. मात्र गणेश चतुर्थीला गणपतीला तुळस वाहिली जाते. ही औषधी वनस्पती असून ऑक्सिजन पुरवणारी आहे. डासांनाही पळवून लावते. कफ, दम, सर्दी, कीटकदंश आणि कॅन्सरसारख्या विकारांवर ही अतिशय उपयुक्त वनस्पती आहे.

आघाढा

ऋषीपंचमीच्या दिवशी महिला मुखमार्जनासाठी याचा वापर करतात. मुखरोगावर आणि दंतरोगावर ही वनस्पती वापरली जाते.

मारवा

ही सुवासिक वनस्पती असून विविध प्रकारच्या जखमा, भाजणे तसंच कोणत्याही प्रकारच्या त्वचाविकारावर ही वनस्पती अतिशय उपयुक्त ठरते.

Read More »

आरोग्यवर्धक भेंडी

भेंडी ही फळभाजी अनेक नावाने ओळखली जाते. भेंडीचं झाड साधारण एक मीटर लांब वाढतं.

ही फळभाजी अनेक नावाने ओळखली जाते. भेंडीचं झाड साधारण एक मीटर लांब वाढतं. बनारसमध्ये ही भेंडी राम तरोई तर छत्तीसगडमध्ये रामकलीय, मराठीत भेंडी, हिंदीत भिंडी, गुजरातीत भींडाम फारसीत वामिया तर इंग्रजीत लेडी फिंगर किंवा ऑक्रा या नावाने ओळखली जाते.

भेंडीत प्रोटिन, काबरेहायड्रेट, कॅल्शिअम, फॉस्फरस, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, सोडिअम फायबर, लोह आणि जीवनसत्त्वांचा भरपूर साठा असल्याने ही औषधी भाजी म्हणून ओळखली जाते. म्हणूनच हिरव्या भाज्यांमध्ये भेंडीचं स्थान महत्त्वपूर्ण मानलं जातं.

फ्राय भेंडी, मसाला भेंडी, ताकातली किंवा चिंच-गुळातली अशा विविध प्रकारांनी ही भाजी केली जाते. मात्र ही भाजी बुळबुळीत असल्याने कित्येकांना आवडत नाही, मात्र या गुणधर्मामुळेच कित्येक रोग बरे करण्याची क्षमता यात असते.

अशा या भेंडीचे गुण पुढीलप्रमाणे

»  फायबरचं प्रमाण अधिक असल्याने वजन कमी करण्यास मदत होते. तसंच फायबरमुळे पचनशक्ती सुधारते.

»  रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राखण्यास मदत होते. जेणेकरून हृदयाचे विकार होत नाहीत.

»  रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राखते. शरीराला आवश्यक असलेलीच साखर रक्तातून शोषली जाते.

»  बाळाच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त असून गर्भपात होण्याचा धोका राहत नाही. म्हणून गरोदर महिलांनी ही भाजी आवर्जून खावी.

»  फायबरप्रमाणेच यात क जीवनसत्त्व अधिक असल्याने प्रतिकारक्षमता सुधारते.

»  भेंडीत लोह, फोलेट आणि के जीवनसत्त्व असल्याने अ‍ॅनिमिया असलेल्या माणसांनी आवर्जून सेवन करावं.

»  जीवनसत्त्व अ आणि बीट कॅरोटिन असल्याने दृष्टी सुधारते.

»  पोटासाठी ही भाजी वरदान आहे असं म्हटलं तरीही चालेल. कारण पोटातील आम्ल, पित्त आणि कोलेस्टेरॉलला नियंत्रित ठेवून आतडय़ांचं आरोग्य सुरक्षित ठेवते. जेणेकरून आतडयाच्या कॅन्सरपासून बचाव होतो.

»  भेंडी कापून पाण्यात उकळून घ्यावी. त्यात एक लिंबू पिळून त्या पाण्याने केस धुवावे. केसांत कोंडा होणार नाही.

»  लघवीच्या ठिकाणी होणारी जळजळ कमी होते.

»  थकवा किंवा अशक्तपणा वाटत असलेल्यांनी भेंडी आवर्जून खावी. त्यामुळे शरीरात उत्साह संचारतो.

»  भेंडीतील बुळबुळीतपणामुळे सांधेदुखी कमी होण्यास मदत होते.

»  अस्थमाच्या रुग्णांनीही भाजी आवर्जून खावी. अस्थमाच्या लक्षणांना रोखण्याचं कार्य ही भाजी करते.

»  फुप्फुसांना येणारी सूज किंवा घशातली खवखव कमी करण्यास मदत करते.

»  भरपूर प्रमाणात सी जीवनसत्त्व असल्यामुळे त्वचेसाठीही ही भाजी वरदान ठरते. मुरुमं कमी होतात आणि चेहरा सुंदर, चमकदार होतो.

Read More »

तोलांगुलासन

या आसनात नितंब आणि हातावर संपूर्ण शरीराचा तोल सांभाळला जातो. तराजूसारखी त्याची अवस्था असते.

या आसनात नितंब आणि हातावर संपूर्ण शरीराचा तोल सांभाळला जातो. तराजूसारखी त्याची अवस्था असते. कणा मजबूत होतो तसंच श्रीरावर साचलेली अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. हे आसन करताना शरीराचा आकार तराजूसारखा दिसतो. म्हणून या आसनाला तोलांगुलासन असं म्हणतात.

कृती

प्रथम पद्मासनात बसावं. आता हळुवारपणे हाताच्या साहाय्याने मागे जावे. पाठीचा अँगल हा ४५ अंश असावा. तसंच हळुवारपणे हाताचे पंजे नितंबांखाली ठेवावेत, आता सावकाशपणे पायांना उचलावे. तसेच पूर्ण शरीराचा आधार हा नितंबावर आणि हातांवर असावा.

आता या स्थितीत काही वेळ थांबा, सुरुवातीला जितका वेळ थांबू शकाल तितकाच वेळ थांबा. आता हळुवारपणे पाय खाली जमिनीवर ठेवावेत. हातांचा आधार घेत सरळ बसावं. हातांच्या साहाय्याने पाठीला वर आणावं. पद्मासनातून पायांना रिलॅक्स करावं. काही सेकंद विश्रांती घेऊन हे आसन पाच वेळा करावं.

श्वास

पद्मासनात बसताना श्वास घ्यावा. पाठ मागे नेताना श्वास सोडावा.आसनस्थितीत श्वास हा सुरुवातीला रोखावा आणि नंतर नॉर्मलपणे असावा. पाठीला वरती पूर्वस्थितीत आणताना श्वास घ्यावा. पद्मासनातून पाय लांब करताना श्वास सोडावा.

आसन करताना घ्यायची काळजी

पद्मासनात बसल्यावर थोडा वेळ विश्रांती घ्यावी. पाठीला मागे नेताना हाताचा आधार घ्यावा. सुरुवातीला ४५ अंश नाही झाला तरी चालेल जेवढे तुम्हाला मागे जाता येईल तेवढेच जा. थोडा वेळ थांबा. नंतर अलगदपणे जमिनीपासून जितक्या वर पाय आणता येईल तितकाच आणावा.

हातांच्या आणि नितंबाच्या साहाय्याने पूर्ण शरीराचा तोल सांभाळावा. या आसनात मानेवर ताण पडता कामा नये. शरीराला जितकं सैल आणि मोकळं ठेवाल तितकं चांगलं असतं. आसन सोडताना घाई करू नये.

फायदे

»  या आसनामुळे पोटाला चांगल्याप्रकारे व्यायाम मिळतो. तसंच अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत होते.

»  पाठीचा कणा मजबूत होतो.

»  या आसनाच्या नियमित सरावामुळे बद्धकोष्ठता, दमा, क्षय आणि मधुमेह यांसारखे आजार नष्ट होण्यास मदत होते.

»  हे आसन नियमित केल्यास कंठ मधुर होतो आणि डोळे तेजस्वी होतात.

»  हात आणि खांद्यामधील स्नायू मजबूत होतात.

»  कंबर आणि नितंबाच्या स्नायूंना चांगला व्यायाम मिळतो.

विशेष टीप

तोलांगुलासन या आसन स्थितीत राहताना मान आणि डोकं जास्तीत जास्त पुढे उचलून धरा. जितका वेळ श्वास रोखता येईल तितका वेळ श्वास रोखून धरावा. या आसनातील दृष्टी नाभीस्थानावर केंद्रित करा. या आसनस्थितीत श्वास रोखून ठेवण्यास जमत नसेल तर श्वासोच्छ्वास सहजगत्या चालू राहू द्या.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe

No comments:

Post a Comment