|
अमृतफळ आवळा
| भारतात आवळा या फळाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आवळा हिरवा असो की सुकलेला, चूर्ण केलेला किंवा मुरवलेला, त्याचे जो सेवन करील, त्याची जीवनशक्ती वाढते व रोगनिवारण होते. आवळ्याचे शास्त्रीय नाव 'एम्ब्लिका ऑफिसिनेलीस' असे आहे.
'एम्ब्लिका' हे नाव आवळ्याचे संस्कृत नाव 'अम्लिका'चा अपभ्रंश आहे. इंग्रजीत त्याला 'एम्बिका मायरोबेलन' असे म्हणतात. आवळ्यामध्ये पाणी ८१.२ टक्के, प्रोटीन ०५ टक्के, लोह १.०२ मि. ग्राम (१०० ग्रॅममध्ये) व 'क' जीवनसत्व ६०० मि. ग्रॅम (१०० ग्रॅममध्ये) मिळते. एकूणच 'क' जीवनसत्व आवळ्यात भरपूर प्रमाणात असते.
३ हजार वर्षापूर्वी चरकाचार्यानी त्याचे वर्णन 'सर्वरोगहारक' असे केले आहे. आवळ्याचा वृक्ष मध्यम आकाराचा, २० ते २५ फूट उंचीचा असतो. पाने चिंचेच्या पानासारखी बारीक असतात. मात्र पानांचा देठ लांब असतो. या झाडास पिवळी लहान फुले येतात. फळांचे झुबके असतात. साल खडबडीत भस्मरंगी असते. ही झाडे भारतात विनासायास उगवतात व झाडाचे मूळ सोडल्यास सर्व भाग औषधात वापरतात. मात्र ताजा आवळा जास्त गुणकारी असतो.
आंबटपणामुळे शरीरात पित्त वाढते. पण आवळा आंबट असला तरी खाल्ल्यावर त्याचा विपाक मधुर होतो. त्यामुळे पित्तप्रकोप शांत होतो. पित्तशमनासाठी तो अत्यंत उपकारक आहे.
हिरडा, बेहडा व आवळा समप्रमाणांत घेऊन त्याचे जे चूर्ण तयार करतात, त्यास 'त्रिफळाचूर्ण' म्हणतात. हे एक रसायन आहे याने कफ, पित्त व मलावरोध दूर होतो.
सकाळी अनशेपोटी आवळ्याचा रस प्यायल्यास फार फायदा होतो. बारीक ताप जातो, तापात हा रस चमचाभर घेतल्यास रुग्णाला अशक्तपणा जाणवत नाही.
जेवणापूर्वी एक-दोन आवळे खाल्ले तर पचनशक्ती वाढते व आम्लपित्त, अति तहान, घशातील जळजळ दूर होते.
अति थंड वातावरणात शीत व नाजूक प्रकृतीच्या तसेच कफ प्रकृतीच्या रुग्णांनी आवळा वैद्यकीय सल्ल्याशिवाय खाऊ नये.
रक्तात आहारदोषाने क्षार, आम्ल, कृमी इ.ची अनावश्यक वाढ झाल्यास रक्त दूषित होते व अनेक विकृती निर्माण होतात. हे दोष नाहीसे करण्याची शक्ती आवळ्यात आहे.
आवळ्याचे चूर्ण खडीसाखरेबरोबर खाल्यास स्त्रियांना बहुमुत्रतेच्या रोगात व प्रदररोगात फायदा होतो.
आवळ्याच्या रसात हळद व मध घालून चाटल्याने सर्व प्रकारचा प्रमेह दूर होतो.
आवळ्याचे चूर्ण दुधात कालवून रात्री झोपताना ते केसावर बांधल्याने केस वाढतात.
मेंदूतील जास्त उष्णता दूर होऊन नाकाचा घोणा फुटण्याचे बंद होते.
सतेज कांतीसाठी दोन ताजे आवळे व पांढरे तीळ पाण्यात भिजवून बारीक वाटून अंगाला लावून ठेवावे. अर्धा-एक तासाने स्नान करावे.
आवळा रक्ताभिसरण व स्मरणशक्तीसाठी अत्यंत फायदेशीर आहे. |
Read More »
गोठवणारी थंडी आणि योग
| थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची हालचाल करायची म्हटली की एक प्रकारचा आळस अंगात येतो. याच दिवसात श्वासाचे व सांध्याचे विकार वाढतात. त्यासाठी योगसाधना केल्यामुळे खूप फायदा होतो. गोठवणारी थंडी खरंच शरीरातील अनेक स्त्रावांचे वहन कष्टदायक करणारी असते. रक्ताभिसरणातील पृष्ठताण (Viscosity) वाढतो व स्नायू हालचाल करायला कुरकुरतात. या गारठय़ात पांघरूण घेऊन खुडूक होऊन बसावेसे वाटते. मात्र असे केल्यास रक्ताभिसरणावर पर्यायाने हृदयावरचा ताण वाढतो. आयुर्वेदामध्ये या दिवसांत, इतर दिवसांपेक्षा दीडपट हालचाल करायला सांगितली आहे. तेव्हा शिशिर ऋतूत आरोग्य टिकवण्याची गुरूकिल्ली सतत हालचाल करण्यामध्येच आहे. शिवाय थंड हवेमुळे फुफ्फु सांवरदेखील परिणाम होऊन त्यांची क्षमता कमी होते. अधिक हालचालीमुळे प्राणवायूचा पुरवठा सामान्य पातळीवर होऊ शकतो.
हालचाल वाढवण्यासाठी सर्वात उत्तम म्हणजे फिरायला जाणे. पण थंडीत बाहेर पडायला नको वाटते. सकाळी उजाडतेही उशिरा आणि संध्याकाळी अंधार पण लवकर पडतो. यावर उपाय म्हणजे घरातल्या घरात किमान अर्धा तास (सलग) फे-या मारणे किंवा वेळ असल्यास थोडी उन्हं आल्यावर फिरायला बाहेर पडणे. शक्य असल्यास परत संध्याकाळी उन्हं सरताना १५-२० मिनिटं बाहेर चक्कर मारून यावं. दिवसांतून दोन वेळेस तरी शारीरिक हालचाल (planned Movement) होणे जरूरी आहे. एक वेळ फिरण्याच्या जोडीला योगासने केल्यास अत्यंत फायदेशीर ठरते.
यावर्षी थंडीत, अकाली पडलेल्या पावसामुळे पिकांचे-फळांचे तर नुकसान झालेच. त्याचबरोबर मानवी शरीरावरदेखील विपरित परिणाम झाला. न हटणारी सर्दी-खोकला, ब्राँकायटीस, व्हर्टीगो , COPD – chronic Obstrutive Pulmonary Disease, Bhronco -vaseufar spsm,, ताप, सांधेदुखी इ. आजारात प्रचंड प्रमाणात वाढ झालेली दिसून येते आहे. एरव्ही लागू पडणारी औषधे, या आजारांवर उपयोगी पडेनाशी झाली आहेत. याचे कारण थंड हवामानामुळे फुफ्फुसांची क्षमता कमी होत असते. त्यामुळे शरीराला प्राणवायू कमी प्रमाणात मिळतो. (रक्तवाहिन्यांत अचानक आकुंचन झाल्यामुळे, रक्ताभिसरणात अडथळे निर्माण होतात) त्यामुळे दम लागणे, छातीत वेदना होणे, थकवा इ. लक्षणे निर्माण होतात. हृदयविकाराची लक्षणे निर्माण होऊन हृदयावर ताण निर्माण होतो. त्यातच हवेतील आद्र्रतेनेही हृदयविकाराची लक्षणे निर्माण होतात.
यावर वैद्यकीय सल्ल्याबरोबर योगसाधना केल्याने त्वरित आराम मिळू शकतो. सर्वप्रथम फुफ्फुसांची क्षमता वाढवणे महत्त्वाचे आहे. त्याकरता श्वासनक्रियेवर लक्ष ठेवून जाणीवपूर्वक दीर्घश्वसनाचा अभ्यास करावा. सकाळी किंवा संध्याकाळी रिकाम्या पोटी, आसनावर बसून कुठल्याही ध्यानात्मक आसनात (पद्मासन, वज्रासन किंवा साधी मांडी) स्थिर बसावे. पाठीचा कणा ताठ व मान सरळ ठेवावी. डोळे अलगद मिटून घ्यावे. श्वास-प्रश्वासावर लक्ष ठेवावे. याला संथ श्वसन म्हणतात. ८-१० श्वास झाल्यानंतर जाणीवपूर्वक जास्त-जास्त श्वास आत घेण्याचा प्रयत्न करावा व तो जास्तीत जास्त पूर्णपणे सोडण्याचा प्रयत्न करावा. याला दीर्घ श्वसन म्हणतात. असे ५-६ वेळा केल्यावर पुन्हा संथ श्वसन करावं. १-२ मिनिटांनी लक्ष श्वासावरच केंद्रित करावे. मनात विचार आले, तरी त्या विचारांवर मन भरकटू देऊ नये. मन पुन्हा श्वासावर केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा. दीर्घ श्वसनाचा हा अभ्यास साधारण १० मिनिटांपर्यंत करावा.
श्वसन क्षमता वाढवण्याकरता दुसरा उपाय म्हणजे उच्छश्वास वाढवणे. श्वसन क्षमता कमी झाल्यामुळे शरीराला प्राणवायू कमी मिळतो व कार्बन डायऑक्साईड वाढतो. उच्छश्वास वाढवण्याने शरीरातील कार्बन डायऑक्साईडची पातळी कमी होते व ऑक्सिजनची पातळी वाढते. त्याकरिता प्रथम कुठल्याही ध्यानात्मक आसनात स्थिर व्हावे. श्वास घेत दोन्ही हात सरळ रेषेत डोक्यावर घ्यावे (कोपरात वाकवू नये). मान सरळ ठेवावी. हात एकमेकाला समांतर ठेवावे. श्वास सोडत हात कोपरात वाकवून पंजे खांद्याच्या रेषेत घ्यावे. दोन्ही क्रिया सलग व श्वास जोरात घेत व जोरात सोडत कराव्या. श्वास घेत हात वर; श्वास सोडत हात खाली असे करत राहावे. श्वास घेता-सोडतांना श्वासाचा आवाज करावा. असे ४-५ वेळा करून, संथ श्वसन करावे (१-२ मिनिटे). पुन्हा जलद श्वसन करावे. झेपेल एवढीच आवर्तने करावी. उच्च रक्तदाब असेल तर बेताने करावे.
थंड हवेमुळे रक्ताभिसरणाची क्रिया मंदावते, त्यामुळे शारीरिक हालचाल कष्टदायक होते. थकवा-कंटाळा येतो. यावर सूर्य नमस्कार हा रामबाण उपाय आहे. मात्र त्याआधी वॉर्मअप करणे आवश्यक आहे. त्यामुळे हृदयावर एकदम ताण न येता हळूहळू रक्ताभिसरण सुधारते. शरीरातील सर्व सांध्यांची हालचाल पद्धतशीरपणे clock wise – Anticlock wise किमान ५-५ वेळा करावी. हाता-पायांच्या बोटांचे सांधे; मनगट-घोटे; कोपर-गुडघे; खांदे-जांघ; मान-कमर, असे सर्व सांधे जाणीवपूर्वक गोलाकार सलग फिरवावे. फिरवताना गती एकसारखी ठेवावी. या सूक्ष्म योगासनांमुळे सर्व सांधे मोकळे होतात, अंगातली थंडी कमी होते, शरीर हलके होते; रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे उत्साह वाढतो, मेद कमी होतो. पचनक्रिया सुधारते. अंतरपेशीय स्वच्छता होते व प्रतिकारशक्ती वाढते.
या व्यतिरिक्त अंगात स्वेटर, बंडी घालावी, कानावर टोपी, पट्टी घ्यावी, नाकावर रूमाल बांधावा, पायात मोजे घालावे, दिवसभर गरम पाणीच प्यावे, आहारात स्निग्धांशाचे प्रमाण योग्य ठेवावे. तीळ, लसूण, आलं, जेष्ठमध, तूप, डिंक, खसखस, खारीक, बदाम, काजू, ताज्या भाज्या इ. आहारात आवर्जून ठेवावे. |
Read More »
गरज आरोग्य विम्याची
| जग आधुनिक बनत चाललं आहे तशा आपल्या आजुबाजूच्या गोष्टीही झपाटय़ाने बदलत चालल्या आहेत, म्हणजे आरोग्याला उपकारक सोयीसुविधांची हल्ली चणचण नाही; पण आरोग्यावरील अपघात, आजार इ. संकटंही तेवढीच वाढली आहेत. अशा अडचणीच्या वेळी तुमच्या मदतीला येतो तो आरोग्य विमा. एका मोठय़ा कंपनीत आयटी विभागात कामाला असलेल्या विनयला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं. त्याची बायको प्रिया, हिच्या आयुष्यात प्रथमच अशाप्रकारे हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ आली होती. त्यामुळे काही दिवसांनी विनय बरा होऊन त्याला डिस्चार्ज मिळाला तेव्हा हातात मिळालेलं बिल पाहून तिलाच चक्कर आली. त्या प्रतिष्ठित हॉस्पिटलनं चांगलं लाखाच्या वर बिल केलं होतं. त्या क्षणाला विनय आणि प्रियाला आपण हेल्थ इन्शुरन्स काढून का नाही घेतला, याचा पश्चाताप झाला. आजकालच्या अतिवेगवान जीवनशैलीत आपण काही बदल स्वीकारलेले आहेत. मग त्याच्या अनुषंगाने त्या बदलांपाठोपाठ येणारे काही अपरिहार्य धोके किंवा परिणामही आपल्याला स्वीकारावे लागतात. उदाहरणार्थ हल्ली खूपशा नोक-यांमध्ये ताणतणाव वाढलेला आहे. आपली आहारशैली बदललेली आहे. मग यामुळे होणारे परिणाम निश्चितच आपल्या आरोग्यावर होताना दिसतात. अंतत: आपल्याला अनेकदा हॉस्पिटलची पायरी चढण्याची वेळ येतेच. अर्थात, ही वेळ काही सांगून येत नसते. त्यामुळे आपल्यासारख्या मध्यमवर्गीय माणसांकडे लाखो रुपये उपचारांसाठी हे अगदी ताबडतोब तयारही नसतात. मग हॉस्पिटलायझेशनसारख्या कठीण प्रसंगी आपल्याला एवढे पैसे उभे कुठून करायचे, हा मोठाच प्रश्न भेडसावतो. एकतर आपल्या घरातील आजारी व्यक्तीची काळजी लागून राहिलेली असते. त्यातच पैशांचाही प्रश्न असतो. याच वेळी नेमकी कामाला येते ती हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी किंवा आरोग्य विमा. एखाद्या मोठय़ा आजाराने दीर्घकाळ आजारी असलेल्या व्यक्ती किंवा अपघातात सापडलेल्या व्यक्तींवरील उपचारासाठी असा आरोग्य विमा उपयोगी येतो. पैसे हातात नसतानाही शेवटच्या क्षणीदेखील हॉस्पिटलमध्ये कॅशलेस हॉस्पिटलायझेशन म्हणजे पैसे न भरताही भरती करता येणं, तिथल्या उपचारांचा खर्च मिळणं हा हेल्थ इन्शुरन्सचा महत्त्वाचा फायदा आहे. हेल्थ इन्शुरन्स, मेडिकल पॉलिसी किंवा मेडिक्लेम अशा अनेक नावांनी ही पॉलिसी ओळखली जाते.
आज भारतात सुमारे २३ कंपन्या आरोग्य विमा पुरवतात. मात्र प्रत्येक कंपनीचा हेल्थ प्लॅन हा वेगवेगळा असतो आणि प्रत्येक प्रकारच्या विमा पॉलिसीमधील नियम-अटी या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे प्रथमच आरोग्य विमा खरेदी करताना या नियम-अटी संपूर्ण वाचणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपल्या कुटुंबातील आजार, आपलं राहणीमान व आपली जीवनशैली, आपली आíथक क्षमता यानुसार तुम्ही तुम्हाला किती रकमेचा आरोग्य विमा काढायचा आहे हे ठरवू शकता. कारण या विम्याचा काही विशिष्ट प्रीमियम हा ठरावीक काळानंतर भरावा लागतो. मात्र प्रीमियमची रक्कम कमी आहे म्हणून ती विमा पॉलिसी चांगली आहे, असं म्हणता येत नाही. काही पॉलिसीज्ना क्लेम रिलेटेड लोिडग्ज असतात. पॉलिसी रिन्युअलच्या वेळेस अचानक ही लोिडग्ज सामोरी येतात व पॉलिसी महागडी होऊन बसते. पॉलिसी फॉर्म भरताना नेहमी आपल्या आजारांची समग्र माहिती देणं गरजेचं असतं. यावेळी कोणताही आजार किंवा पुढं जिचे आजारात रूपांतर होऊ शकेल अशी समस्या लपवून ठेवू नका. अन्यथा तुम्हाला त्या आजारासाठी त्या पॉलिसीचे पैसे मिळताना अडचणी निर्माण होतील. पॉलिसी एजंटकडून आरोग्य विम्याची पूर्ण माहिती घ्या. त्यातील प्रक्रिया, सुविधा व नियम यांचा पूर्ण तपशील जाणून घ्या. कधीही पॉलिसीचे कागद पूर्ण व काळजीपूर्वक वाचल्याखेरीज त्यांच्यावर सही करू नये. जाहिरातींना भुलून किंवा विश्वासाखातर काहीवेळा अशा चुका होण्याचा संभव असतो. काही वेळेस आपल्या पॉलिसीत कोणत्या गोष्टी कव्हर केल्या जातात, याची माहिती ब-याच जणांना नसते. काही पॉलिसीज्मध्ये को-पेमेंट म्हणजे विमाधारकानेही क्लेमच्या रकमेतील काही टक्के रक्कम भरावयाची असते. तुम्हाला अशी पॉलिसी हवी आहे का, याचा आधी विचार करा. हॉस्पिटलच्या खर्चाचा क्लेम विमा कंपनी आपल्याला पूर्ण देईल, असा काहींचा समज असतो. मात्र काही पॉलिसींमध्ये हा क्लेम हॉस्पिटलमध्ये तुम्ही कोणत्या प्रकारच्या रुममध्ये राहणार आहात यावर ठरलेला असतो. ज्याला रुम रेंट सबलिमिट म्हणतात. तुम्ही खूप महागडय़ा रुममध्ये राहिलात तर बाकी सेटलमेंट त्यानुसार ठरवली जाते. याचीही माहिती विमा एजंटकडून करून घ्या.
आरोग्य विम्याच्या पॉलिसीच्या नेटवर्कमध्ये कोणती हॉस्पिटल्स समाविष्ट आहेत हे जाणून घ्या. या यादीत समाविष्ट नसलेल्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची वेळ आल्यास काय करायचे हे देखील एजंटला किंवा विमा कंपनीला आधीच विचारून घ्या. पॉलिसीत कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव आहे आणि कोणत्या गोष्टी वगळलेल्या आहेत याचा अभ्यास करा. निव्वळ प्रीमियम किती भरावा लागेल याची काळजी शेवटी करा, त्याआधी काही महत्त्वाचे पॉलिसी फिचर्स पाहून घ्या. त्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या इतर कंपन्यांच्या आरोग्य विमा पॉलिसींची माहिती मिळवून तुलना करा. कोणत्याही एका कंपनीचा विमा आकर्षक वाटतो म्हणून तोच खरेदी करण्याची चूक करू नका. काही पॉलिसींच्या नियमांनुसार मेडिक्लेम मिळण्यासाठी हॉस्पिटलमध्ये भरती असणं आवश्यक असतं. अशा वेळी बाहेर तुमचा उपचारांवर कितीही खर्च झाला असेल तर तो मिळत नाही हे लक्षात ठेवा. तर मेडिक्लेम पॉलिसी काढताना ही सर्व काळजी जरुर घ्या. |
Read More »
| |