आईचं दूध; अलौकिक वरदान
आईचं दूध बाळाच्या वाढीसाठी सर्वतोपरी आवश्यक पोषकता पुरवणारं अलौकिक वरदान आहे. त्यामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्तन्यपानामुळे आई आणि बाळामध्ये एक अतूट भावनिक बंध तयार होतो, बाळाला मानसिक सुरक्षितता मिळते. ‘जागतिक आरोग्य संघटना’ आणि ‘युनिसेफ’ यांनी स्तन्यपानाचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी, ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा ‘जागतिक स्तन्यपान आठवडा’ म्हणून जगभरात साजरा केला जातो. त्यानिमित्ताने स्तन्यपानाविषयी.
सगळ्याच सस्तन प्राण्यांमध्ये, नुकत्याच जन्मलेल्या पिल्लांसाठी, मातेच्या उदरात दूध तयार करण्याची किती अद्भुत सोय निसर्गाने केली आहे. बाळाचा जन्म झाल्या-झाल्या लगेचच, म्हणजे अध्र्या तासात बाळाला पाजायला घेतलं की दूध तयार व्हायला सुरुवात होते. सुरुवातीला पिवळसर रंगाचं घट्ट दूध येतं. त्याला शास्त्रीय भाषेत ‘कोलोस्ट्रम’ म्हणतात. काही जणी गरसमजामुळे हे स्तन्य वा दूध बाळाला पाजत नाहीत; पण खरं तर हे दूध बाळासाठी खूपच पोषक असतं. या दुधात प्रथिनांचं प्रमाण भरपूर असतं. रोगप्रतिकारशक्ती पुरवणारे घटक खूप जास्त प्रमाणात असतात.
‘ई जीवनसत्त्व’सुद्धा मिळतं, त्यामुळे रक्तकणांना संरक्षण मिळतं आणि नवजात बालकाला होऊ शकणारा काविळीचा त्रास टाळता येतो.परवा काही मध्यमवयीन मत्रिणींची चर्चा कानावर पडली, की ‘हल्लीच्या तरुण मुलींमध्ये बाळाला अंगावर न पाजण्याची जणू फॅशनच आलीय. या मुलींना आपलं काम, आपलं करिअर याशिवाय काहीही दिसत नाही, अगदी त्यांच्या बाळाची आईच्या दुधाची गरजही लक्षात येत नाही. त्यात बाळाच्या जन्मानंतर लगेचच स्वत:चं वजन कमी करायची घाई असते. दूध येण्यासाठी चांगलंचुंगलं खाऊन वजन वाढेल या अवाजवी भीतीपोटी खाण्यापिण्याची आबाळ करून घेतात. स्वत: मारे ‘ऑरगॅनिक फूड’ कुठून-कुठून मागवून खातात; पण आपल्या बाळाला कृत्रिम, पावडरचं दूध पाजतात. आईच्या नैसर्गिक, पोषण देणाऱ्या दुधापासून छोटी-छोटी बाळं वंचित राहतात; खूप वाईट वाटतं.’तेव्हाच ठरवलं, स्तन्यपान हे बाळासाठी आणि आईसाठीही कसं खूप मोठं वरदान आहे याची चर्चा व्हायला हवी. गर्भवती स्त्रियांना आणि इतरांनाही स्तन्यपानाचे महत्त्व पटवून द्यायला हवं. ‘जागतिक आरोग्य संघटना’ आणि ‘युनिसेफ’ यांनी स्तन्यपानाचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी, ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा ‘जागतिक स्तन्यपान आठवडा’ म्हणून जगभरात साजरा करायला सुरुवात केली आहे. त्यानिमित्ताने या महिनाअखेर हा लेखनप्रपंच.
आईचं दूध हे बाळासाठी पूर्णान्न आहे. जन्मानंतर पहिले सहा महिने बाळाला फक्त आईचं दूधच पाजलं जावं. पुढे बाळ दीड ते दोन वर्षांचं होईपर्यंत आवश्यक प्रमाणात वरचं पोषक खाणं-पिणं आणि त्या जोडीला स्तन्यपान केलं जावं. ‘जागतिक आरोग्य संघटने’नुसार, लहान बाळांना स्तन्यपान चालू असताना वेगळं पाणी पाजायची गरज नसते. सर्वसाधारणपणे दिवसभरात कमीत कमी ८-९ वेळा, सामान्यत: १ ते ३ तासांच्या अंतराने दूध पाजावं. हे प्रमाण प्रत्येक बाळानुसार बदलतं. खरं तर, बाळ मागेल त्या-त्या वेळी, दिवसा आणि रात्री जितक्या वेळी मागेल तितक्या वेळी स्तन्यपान करावं. जन्मानंतर पहिले दोन दिवस बाळाचं पोट छोटंसं, एखाद्या चेरीएवढं असतं. पुढच्या दोन दिवसांत पोटाचा आकार थोडा वाढून अक्रोडाएवढा होतो. नंतरच्या दोन दिवसांत पोट ताज्या जर्दाळूएवढं होतं आणि नंतर वाढून अंडय़ाच्या आकाराएवढं होतं. म्हणजेच बाळाची दुधाची भूक हळूहळू वाढत जाते. जन्मानंतर पहिल्या तीन दिवसांत बाळाचं वजन कमी होतं, पण दहा दिवसांत परत जन्मावेळच्या वजनाएवढं होतं. ४-५ महिन्यांत, बाळाचं वजन जन्मावेळच्या वजनाच्या दुप्पट होतं.
आईचं दूध बाळाच्या वाढीसाठी सर्वतोपरी आवश्यक पोषकता पुरवणारं असतं. आवश्यक प्रमाणात उपलब्ध होणारं आणि अतिशय सुरक्षित असतं. आईच्या दुधाचं तापमान सुयोग्य असतं. बाळाला हे दूध २-३ तासांत व्यवस्थित पचतं आणि पोट बिघडण्याचा त्रासही होत नाही. बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते. आजारपणांचं प्रमाण कमी राहतं आणि आजारपण आलंच तरी त्याचं स्वरूप सौम्य राहतं. आईचं दूध पिणाऱ्या बाळांना अॅलर्जीचा, दम्याचा विकार होण्याचा त्रास कमी संभवतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्तन्यपानामुळे आई आणि बाळामध्ये एक अतूट भावनिक बंध तयार होतो, बाळाला मानसिक सुरक्षितता मिळते. शास्त्रीय अभ्यासशोधांवरून असं सिद्ध झालंय की, स्तन्यपान उपलब्ध झालेल्या बाळांचा बुद्धय़ांक आणि भावनांक खूप चांगला असतो. त्यांचं वजन सुयोग्य असतं आणि मोठी झाल्यावरही ती प्रमाणबद्ध राहतात. दोन शास्त्रीय संशोधनांनुसार आईचं दूध पुरेशा प्रमाणात घेतलं तर बाळांना पुढे जाऊन टाइप १ आणि टाइप २ प्रकारचा मधुमेह होण्याची शक्यता कमी होते.
स्तन्यपान बाळासाठी जितकं महत्त्वाचं असतं तितकंच आईसाठीही असतं. हल्लीच्या मुली बाळाबरोबरच स्वत:च्या तब्येतीसाठी जागरूक असतात. ही जागरूकता अपरिहार्य आणि अभिनंदनीय आहे. बाळाचं संगोपन करणं आणि त्याबरोबरच स्वत:च्या करिअरचा आलेख उंचावता ठेवण्याची तारेवरची कसरत त्यांना साधायची असते. या मुलींनी जितके जास्तीत जास्त दिवस शक्य असतील तेवढे बाळासाठी देऊन स्तन्यपान करावं. स्तन्यपानामुळे आईला अनमोल असं मानसिक समाधान तर मिळतंच, शिवाय शारीरिक लाभही मिळतात. गरोदरपणात वाढलेलं आईचं वजन कमी होऊन बांधा पूर्ववत व्हायला मदत होते. आईचं गर्भाशय आकुंचन पावून पूर्वस्थितीत येणं सहज शक्य होतं, रक्तस्रावही कमी होतो. शास्त्रीय संशोधनाने सिद्ध झालंय की, नियमित स्तन्यपान करणाऱ्या मातांमध्ये स्तनांचा, अंडाशयाचा आणि गर्भाशयाचा कर्करोग व्हायची शक्यता कमी असते. नियमित स्तन्यपानामुळे नैसर्गिकरीत्या पाळणा लांबवला जातो. या महत्त्वाच्या फायद्यांबरोबरच काही व्यावहारिक फायदेही असतात. वरचं पावडरचं दूध तयार करणं किंवा गाईचं दूध आणून तापवणं, साठवणं हा त्रास वाचतो. वरचं दूध पाजण्यासाठी वाटी-चमचा किंवा बाटली उकळवून तयार करावी लागते. रात्री झोपेतून उठून हे सगळं करणं तर फारच त्रासदायक असतं. स्तन्यपानामुळे वेळ, पसा आणि श्रम यांची बचत होते.
ज्या आईंना भरपूर दूध येतं, पण काही कारणांनी बाळाला पाजणं शक्य नसतं त्यांनी दूध काढून काचेच्या बाटलीत किंवा स्टीलच्या डब्यात ठेवावं. आईचं दूध सामान्य तापमानाला १ ते ३ तास चांगलं राहतं. फ्रिजमध्ये २४ ते ४८ तास टिकतं आणि डीप फ्रीजमध्ये ३ ते ६ महिने टिकतं. बाळाला पाजताना गरम पाण्यात दुधाचा डबा किंवा बाटली ठेवून कोमट करून घ्यावं आणि वाटी चमच्याने पाजावं.
बरेचदा नवमातांना प्रश्न पडतो की, बाळाला आपलं दूध पुरतंय का नाही, बाळाचं पोट भरतंय ना.. पण जर दोन भुकांच्या मध्ये बाळ शांत झोपतंय, बाळाचं वजन व्यवस्थित वाढतंय, ते दिवसातून ८-१० वेळा शू करतंय, साधारण २-३ वेळा पिवळ्या रंगाची शी करतंय असं लक्षात आलं तर निश्चित राहावं की, बाळाला आईचं दूध व्यवस्थित पुरतंय. आईला आवश्यक प्रमाणात दूध येण्यासाठी, बाळाच्या जन्मानंतर लगेचच पाजायला सुरुवात करावी. थोडय़ा-थोडय़ा वेळाने नियमितपणे आणि रात्रीही दूध पाजावं.
आईची मानसिक तयारी, आत्मविश्वास, कुटुंबाचा आधार यांचा आवश्यक प्रमाणातल्या स्तन्यपानासाठी फायदा होतो. याउलट काही विशिष्ट कारणांनी दुधाचं प्रमाण कमी होतं. बाळाला दूध पाजायला सुरुवात करायला झालेला विलंब, बाळ जन्मल्यावर सुरुवातीला आईच्या दुधाऐवजी मध किंवा साखर-पाणी किंवा पावडरचं दूध पाजणे; आईने घेतलेला अनावश्यक ताण, आत्मविश्वासाचा अभाव, या कारणांमुळे आईचं दूध कमी पडू शकतं. याशिवाय काही गंभीर कारणं असतील तर लवकरात लवकर डॉक्टरांचं किंवा प्रशिक्षित ‘लॅक्टेशन एक्सपर्ट’चं मार्गदर्शन घ्यावं.
परवाच मत्रिणीच्या सुनेला म्हटलं, ‘‘बाळाला दूध पाजायचं नक्की केलंस, अभिनंदन. आता खाण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष दे. आईच्या आहारावर दुधाचा दर्जा अवलंबून असतो. संशोधनावरून सिद्ध झालंय की, आईचं भरणपोषण व्यवस्थित झालं नसेल, आई कुपोषित असेल तर तिच्या दुधामध्ये पोषक घटकांचं प्रमाण कमी असतं. विशेषत: काही ‘बी’ जीवनसत्त्व, सेलेनियम आणि आयोडीन अशा महत्त्वाच्या घटकांचं प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी असतं. स्निग्धाम्लांचं प्रमाण आईच्या आहारानुसार बदलतं.’’
नवमातांमध्ये पहिले सहा महिने, साधारणपणे ७५० मिलिलिटर दूध रोज तयार होतं. त्यासाठी आईच्या आहारातून नेहमीपेक्षा जास्तीचे ७००-७५० उष्मांक मिळायला हवेत. २५ ग्रॅम जास्त प्रथिनं आईच्या आहारात हवीत. या जास्तीच्या अन्नघटकांची गरज भरून काढण्यासाठी आईच्या आहारात ३-४ कप दूध, दोन वाढप मोडाची कडधान्यं किंवा घट्ट वरण किंवा एक वाढप सोयाबीन/ अंडी/ मासे/ चिकन यांचा समावेश करायला हवा. आहारात मोडाची मेथी, खसखस, हळीव, बाजरी, लसूण यांचा वापर वाढवला, की दूध वाढण्यास मदत होते.
दुधाची गुणवत्ता वाढवण्यासाठी, आईसाठी वेगवेगळी खीर तयार करताना शक्यतो साखरेऐवजी गूळ किंवा खारीक पूड वापरावी. ऋतूनुसार भाज्या, पालेभाज्या, फळं यासह संतुलित, चौरस, सर्व रसयुक्त आहार घ्यावा. जोडीला चार लिटर द्रवरूप आहार घ्यायला हवा. म्हणजे अडीच ते तीन लिटर पाणी आणि एक ते दीड लिटर पेय पदार्थ घ्यावेत. जेवणाबरोबर लिंबू पाणी घ्यावं. अधेमध्ये आवळा सुपारी खावी.
अजूनही बाळंतपणात आईच्या खाण्यापिण्यावर अयोग्य बंधनं घातलेली दिसून येतात. काही घरांत आईला फक्त तूप-भात देतात, तर काही जण फक्त बाजरीची भाकरी आणि वरण. काही घरांत भात न देता फक्त चपाती देतात. काही जणींना कडधान्य अजिबात देत नाहीत, तर काहींना पहिले बारा दिवस मिठाशिवायचे अळणी पदार्थ वाढले जातात. खरं तर अशा गरसमजांमुळे बाळाचे पोषण व्यवस्थित होणार नाही आणि वाढही योग्य प्रमाणात होणार नाही. आईच्या तब्येतीसाठीही चारीठाव जेवणाखाण्याची नितांत गरज असते. फक्त तुपाचा वापर मात्र प्रमाणातच हवा. बरेचदा प्रत्येक पदार्थावर, पोळीवर, भातावर तसंच खिरीमध्ये, लाडवात भरपूर तूप वापरलं जातं. खरं म्हणजे ३-४ चमचे तूप दिवसभरात पुरेसं असतं. सुकामेवाही प्रमाणातच वापरला जावा. या सुमारास लाडाने खाऊ घातलेले लाडू आणि खिरी खाऊनही, आयांना वजन सांभाळायचे असेल तर त्यांनी शक्य तेवढय़ा लवकर हलक्या व्यायामाला सुरुवात करावी. नॉर्मल डिलिव्हरी असेल तर एक ते दीड महिन्यांनी आणि सिझेरियन झालं असेल तर तीन ते साडेतीन महिन्यांनी, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यायाम करावा.
आपल्या बाळाला स्तन्यपान करणं आणि दिसामासांनी वाढताना बघणं हा आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा ठेवा आहे, याबद्दल कुणाचंही दुमत नसावं.
No comments:
Post a Comment