वैद्यकीय क्षेत्रात प्रगती केली असली तरी, आजही मानवाला अनेक असाध्य आजारामुळे मृत्यूला सामोरे जावं लागतंय हेदेखील तितकंच खरं आहे, मात्र अशा असाध्य रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी स्टेम सेल थेरपी सध्या महत्त्वाची मानली जाते. असाध्य आजारांनी ग्रस्त असणा-या रुग्णांसाठी ही थेरपी आशेचा एक नवीन किरण घेऊन आली आहे. आपल्याच शरीरातील मूळ पेशींच्या आधारावर असलेल्या या थेरपी सध्या जगभरातून विश्वासाने स्वीकारल्या जात आहेत. स्टेम सेल म्हणजे शरीरातील मूळ पेशी. या पेशी कुठल्याही प्रकारच्या नवीन पेशी निर्माण करण्यास सक्षम असतात. स्टेम सेल हे, प्रसूतीच्या वेळी मातेच्या गर्भ नाळेतून, रक्त किंवा अस्थिमज्जा (बोनमॅरो) मधून प्राप्त करता येतात. यातील पहिला आणि सर्वात चांगला प्राप्तीचा स्रोत म्हणजे मातेच्या गर्भ नाळेतील निघणारे रक्त होय. ज्या पेशींच्या अभावी रुग्णाला असाध्य आजार जडलेला असतो वा एखाद्या आजारात ज्या अवयवाचं नुकसान झालेलं असतं त्या भागावर स्टेम सेलद्वारे यशस्वी उपचार करणं आता शक्य झालं आहे. त्या रुग्णाच्या शरीरातील रक्तप्रवाहात किंवा शरीराच्या कुठल्याही भागात स्टेम सेल म्हणजे मूळ पेशीचे प्रत्यारोपण करता येते. अशा प्रकारच्या प्रत्यारोपणामुळे अनेक असाध्य रोगांचा उपचार उपलब्ध झाले आहेत. ज्या रुग्णावर सध्या सर्व प्रकारचे उपचार करूनदेखील यश मिळाले नाही, त्यांच्यावर स्वत:च्या शरीरातून प्राप्त केलेल्या मूळ पेशींच्या प्रत्यारोपणाने उपचार केले जात असून त्याचा आजार बरा होण्यात बराच लाभ होत आहे. स्टेम सेल प्रत्यारोपण उपचार पद्धतीने कायम स्वरूपाचे अपंगत्व, जैविक असाध्य आजार, अनुवांशिक आजार कायमचे बरे होऊ शकतात. आपल्या शरीरात अशा प्रकारच्या मूळ पेशींचा साठा असतोच. बोनमॅरोद्वारे स्टेम सेल प्राप्त करून त्याद्वारे निकामी झालेल्या अवयवाचे कार्य पुन्हा सुरू करणे शक्य होते. यालाच 'ऑर्गन ट्रान्सप्लान्ट' असं म्हटलं जातं. यात काही अवयव वा त्याच्या पेशींच्या ऊती नव्याने तयार करता येतात. मधुमेहासारखा आजार असो वा लिव्हर सोरायसिससारख्या आजारातही याचा प्रभावी लाभ झाला आहे. आपल्या शरीरात स्वत:चा आजार बरा करण्याची शक्ती असते आणि ती पुनरुज्जीवनाची शक्ती स्टेम सेलद्वारे प्राप्त होते. गुडघ्याच्या जुनाट दुखण्यावरील नि रिप्लेसमेंटची शस्त्रक्रियादेखील यशस्वी झाली आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीचे वय वाढते. त्यानुसार आपलं क्रोनोलॉजिकल वय ठरतं. आपलं बायोलॉजिकल म्हणजेच जैविक वय हे काळानुसार वाढत असतं, परंतु आपल्या शरीराच्या क्षमतेनुसार प्रत्येकाच्या क्रोनोलॉजिकल वयाची पातळी वेगवेगळी असते. त्यानुसार आपल्या एखादा आजार जडल्यानंतर त्या अवयवाची पुन्हा कार्यक्षम होण्याची मर्यादाही ठरवता येते आणि पद्धतीत स्टेम सेल प्रत्यारोपणाचा खूप लाभ होतो. स्टेम सेलद्वारे अवयव प्रत्यारोपण हे इतर अवयव प्रत्यारोपणापेक्षा कमी खíचक व सुलभ असतं. तसंच यात निराळी जैविक कार्यक्षमता असणा-या अवयवाचं प्रत्यारोपण न होता स्वत:च्या शरीरातील ऊतींपासून बनलेल्या अवयवाचं प्रत्यारोपण केलं जातं, त्यामुळे आजार बरा होण्याची क्षमता अनेक पटीने वाढते. तसंच अवयव प्रत्यारोपणानंतर होणारा त्रास अनेक पटींनी कमी असल्याचं दिसून येतं व ही कार्यक्षमता कायमस्वरूपी राखली जाते. तसंच या उपचारांना खूप कमी कालावधी लागतो. अशा पद्धतीने ही टु वे उपचार पद्धत असल्याने तिचा अवलंब केला पाहिजे. अल्झायमर, पाíकसन्स, रक्ताचा कर्करोग अशा असाध्य रोगांवरही उपचार पद्धती बव्हंशी यशस्वी झाल्याचं दिसून आलं आहे. थॅलेसेमियासारख्या आजारात जिथे सतत रक्ताची आवश्यकता असते, अशा आजारात तर पूर्ण उपचार पद्धतीने चांगला बदल घडवता येतो. या आजारात दर सहा महिन्यांनी रक्तसंक्रमण करावे लागते. यात प्रत्येक वेळी मिळता-जुळता रक्तगट सहज उपलब्ध होईल, याची खात्री नसते. अशा स्थितीत रक्तपेशी प्रत्यारोपणाच्या (ब्लड स्टेम सेल) माध्यमातून या जीवघेण्या रक्तविकारांपासून रुग्णाचे प्राण वाचवता येणे शक्य होत आहे. या उपचाराद्वारे रक्तपेशी आणि रोगप्रितकार शक्ती पुन्हा निर्माण करणे व आजारविषयक निगा राखणे हे प्रत्यारोपणाचे उद्देशही सहज साध्य होताना दिसतात. अनेक आजारामध्ये उपयुक्त ठरू लागल्याचे समोर आल्यानंतर जगासह भारतात या थेरेपीला लोकमान्यता हळूहळू मिळायला सुरुवात झाली आहे. सध्याच्या काळात असाध्य आजारामधील स्टेम सेल उपचार पद्धत सर्वात चांगली उपचार पद्धती आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. |
No comments:
Post a Comment