हवामानात बदल झाले की त्याचा परिणाम शरीरावर झालाच म्हणून समजा. सध्यादेखील बदलत्या वातावरणामुळे कित्येक जण आजारी पडताना दिसत आहेत. मात्र अशा या वातावरणात आपण आरोग्यपूर्ण पदार्थाचं सेवन केलं तर ते आपल्या शरीरासाठी उत्तम ठरेल. अशाच काही फळ आणि भाज्यांची आज आपण माहिती घेणार आहोत. सध्या वातावरणात अनेक बदल होत आहेत. मध्येच गरम होतंय तर मधूनच कधी संध्याकाळचे बोचरे वारे झोंबायला लागतात. त्यातच रात्रीची जागरणं.. या सगळ्याचा परिणाम तब्येतीवर होताना दिसतोय. आजूबाजूच्या थंड वातावरणामुळे पाणीही पोटात कमी जातं. मग अपचन होऊन उलटया-अतिसार वगैरे विकारांना समोरं जावं लागतं. कित्येक जण सर्दी, ताप, अंगदुखीमुळे बेझार झाले आहेत. या दिवसांत तब्येतीच्या अशा कुरबुरी वाढतच जातात. यासाठी आपलं खाणं-पिणं योग्य असेल तर त्याचा आपल्या शरीरावर नक्कीच परिणाम होतो. म्हणूनच या दिवसांत नक्की काय खाल्लं पाहिजे हे पाहणं गरजेचं आहे. आज आपण अशाच काही पदार्थाची माहिती घेणार आहोत. डाळिंब डाळिंबाचा ज्युस आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम असतो. यात इतर फळांच्या रसाच्या तुलनेत अँटिऑक्सिडंटचा भरपूर साठा असतो. जे शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल शरीराबाहेर टाकण्यास मदत करते. नियमित डाळिंबाचा रस प्यायल्याने रक्ताभिसरण सुरळीत होतं. त्यामुळे हृदयविकाराचा त्रास कमी होण्यास मदत होते. त्वचेचा पोत सुधारतो. त्याचप्रमाणे स्तनांचा कॅन्सर होण्यापासून बचाव होतो. लिंबुवर्गीय फळांचा वापर लिंबू, संत्र, इंडलिंबू, द्राक्ष अशी फळं या मोसमात खाणं केव्हावी चांगलंच म्हणावं लागेल. जीवनसत्त्व क आणि फ्लेव्होनाईड्स अधिक प्रमाणात असतं. जे शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल नष्ट करून चांगल्या एचडीएलची वाढ करण्यास मदत करते. यांच्या सेवनाने त्वचेचा पोत सुधारतो. टोमॅटो, कलिंगड, पेरू अशी फळंदेखील तुम्ही या दिवसांत खाऊ शकतात. बटाटे या दिवसांत बटाटे खाणं अधिक चांगलं म्हणता येईल. उत्तम स्टार्च म्हणूनही त्याचा उपयोग केला जातो. यात पोषणमूल्याचा भरपूर साठा आहे. पण या बटाटयाचं नुसतं सेवन करणं योग्य नाही. तो कशाच्या तरी बरोबरीने खाणं अधिक उत्तम ठरेल. यातदेखील विटॅमिन सी आणि बी ६ अशा जीवनसत्त्वाचा साठा असतो. महिलांनी या दिवसांत आवर्जून सेवन करावं. कांदा तुमच्यापैकी कित्येक जण दररोजच्या जेवणात कांद्याचा वापर करत असाल. कांदा भलेही तुमच्या डोळ्यातून पाणी काढत असेल मात्र शरीराला तो अतिशय चांगला आहे. यात कॅलरीज कमी असून जीवनसत्त्व आणि फयाबरचा भरपूर साठा आहे. शरीरातील वाईट कोलेस्टेरॉलवरदेखील नियंत्रण आणण्याचं काम करतो. बीट गोड आणि लाल रंगांचं हे कंदमूळ आरोग्यासाठी उत्तम आहे. कॅन्सरपासून रक्षण करतं. अ, ब, आणि क जीवनसत्त्व तसंच पोटॅशिअम आणि फॉलिक अॅसिडचा साठा आहे. त्याचप्रमाणे त्यातून नैसर्गिकरीत्या शर्करा मिळते. रताळं यात फायबर, बिटा केरोटिन, जीवनसत्त्व अ आणि क, तसंच अँटिऑक्सिडंट म्हणून काम करतं. त्यामुळे या दिवसांत ते अतिशय उपयुक्त ठरतं. कोबी फ्लॉवरच्या तुलनेत जीवनसत्त्व, खनिज याचबरोबर फायबर, अँटिऑक्सिडंटचा भरपूर साठा असतो. जे शरीरातील अनावश्यक कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतं. त्याचप्रमाणे कॅन्सर आणि मधुमेहची शक्यताही कमी करतं. तांबडा भोपळा याचे विविध प्रकार आहेत. केशरी आणि पिवळ्या रंगाचा भोपळा चांगलाच प्रचलित आहे. एक कप उकडलेल्या भोपळ्यात कमी कॅलरीज असतात मात्र त्यात ए आणि क जीवनसत्त्वाचा भरपूर साठा असतो. याचप्रमाणे पोटॅशिअम, फॉलेट तसंच जीवनसत्त्व बी ६ आणि के जीवनसत्त्वाचा भरपूर साठा असतो. हिरव्या पालेभाज्या हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी उत्तम आहेत हे आपण कित्येक वर्षानुवर्ष ऐकतो आहोत. मेथी आणि पालक यासारख्या पालेभाज्या पाचक तर आहेतच, त्याचबरोबर त्यात जीवनसत्त्वदेखील भरपूर प्रमाणात आहेत. केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहेत. पाचक असल्याने बद्धकोष्ठतेचा त्रासही होत नाही. या दिवसांत विशेषकरून जेव्हा अन्न पचत नाही तेव्हा अशा भाज्यांचा आवर्जून आहारात समावेश कारावा. |
No comments:
Post a Comment