मुंबई आणि उपनगरात शनिवारी पडलेल्या पावसामुळे संध्याकाळच्या वेळी चांगलेच थंडगार वारे वाहायला लागले आहेत. त्यामुळे सकाळच्या वेळी मस्त गुलाबी थंडी पडू लागली आहे. या गुलाबी थंडीचा लहानग्यांपासून ते मोठयांपर्यंत प्रत्येकच जण आनंद घेतो. गारठलेल्या शरीराला ऊब पोहोचवण्यासाठी लोकरीचे कपडे आवश्यक आहेतच, पण त्याचसोबत शरीराला आतून उष्णता पुरवणारे पदार्थही आवश्यक आहेत. यासाठी दररोजच्या आहारात शरीराला उष्णता पुरवणा-या पदार्थाचा समावेश करायला हवा. दोन दिवसांपूर्वी पडलेल्या थंडीमुळे लोकांनी बासनात गुंडाळलेले लोकरीचे कपडे बाहेर काढले असतील. थंडी म्हटलं की, सर्दी-ताप-खोकल्याला आमंत्रण आलंच. त्याच्या त्रासापासून वाचण्यासाठी औषधे आलीच. पण या औषधांच्या सेवनासोबत आहारातील औषधी पदार्थाचे सेवन केल्यास अधिक उत्तम. या अल्हाददायक वातावरणात पौष्टिक, रुचकर तसंच औषधी गुणधर्मानी युक्त आहार घेतल्यास अधिक ताजंतवानं वाटेल. त्यामुळे शरीराला थंडीशी सामना करण्यास आपसूकच ऊर्जा मिळेल. शरीर उबदार राहिल्याने हाता-पायांमध्ये अधिक चपळपणा येतो. अंगदुखी किंवा आखडण्याचे त्रास होत नाही. हे सर्व तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण नियमित आहार करू. पण हा आहार सेवन करताना शरीराची प्रकृती आणि पचनशक्तीचा विचार करूनच या पदार्थाचा आहारात समावेश करावा. चला तर मग पाहूयात हिवाळ्यातील उबदार आहार कसा असावा. » सर्व ऋतूंमध्ये ताजे, गरम अन्न खाणं केव्हाही चांगले. पण हिवाळ्यात आवर्जून ताजं आणि गरमागरम भोजनाचे सेवन केल्यास उत्तम. यामुळे भूक तर भागतेच शिवाय ताजे, गरम भोजन पचायलाही सोयीस्कर पडते. वेळेवर ताजे, गरम जेवण केल्यास शरीराला जडपणा येत नाही. थोडक्यात काय, तर शरीरही उबदार राहते. » हिवाळ्यातील आहारात शरीराला उष्णता पोहोचवणाऱ्या पदार्थाचे सेवन निष्टिद्धr(155)तच करावे. पण त्या आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शरीराची प्रकृती, पचनशक्ती लक्षात घेता आहाराचे सेवन करावे, अन्यथा उष्ण पदार्थाचे अधिक सेवन बाधक होऊ शकते. » भाज्या, फळे, सुकामेवा, कडधान्य, दूध-ताक सारखे स्निग्ध पदार्थ, मसाले या पदार्थाचे योग्य संतुलन राखत आहार घ्यावा. आहाराच्या माध्यमातून मिळणारी उष्णता बाधू नये यासाठी सकाळ-सायंकाळ नियमित व्यायाम करावा. पहाटे लवकर उठून चालणे, योगा, सूर्यनमस्कार आदी व्यायाम करावेत. » गरमागरम बाजरीची भाकरी आणि त्यावर साजुक तुपाची धार, याचे सेवन करावे. जेवणात तांदळाच्या नेहमीच्या भाताऐवजी मुगाची किंवा मिक्स डाळींची खिचडी खावी. सोबत तूपही घ्यावे. कधी ज्वारी-बाजरीची भाकरी बनवावी. त्यासोबत तूप-गूळ खाल्ल्यास चविष्ट लागते. » शरीराला स्निग्धता पुरवणारे पदार्थ म्हणजे दूध, ताक, लोणी. हे पदार्थ शरीराला स्निग्धता आणि ऊब दोन्ही देतात. असे पदार्थ हिवाळ्यात खाण्यास केव्हाही चांगले. नुसते गरम दूध पिण्याऐवजी त्यात केशर, बदाम, वेलची आदींचा समावेश असलेल्या दुधाचा मसाला टाकून प्यावे. तर कधी हळद टाकून दूध प्यावे. भाकरीसोबत तुपाऐवजी लोणी खावे. जेवणानंतर ग्लासभर ताक प्यावे. आवडीनुसार कधी साखर तर कधी ताकाचा मसाला टाकावा. » मटकी, तूर, उडीद, वाल या आणि इतर कडधान्यांचा वापर करत दर दोन-तीन दिवसांनी त्याची भाजी करावी. » जिरे, लसूण, मोहरी, सुंठ, हळद, आले, हिंग, मिरची, पुदिना, ओवा, मिरी, लवंग, तमालपत्र, दालचिनी, जायफळ, तीळ वगैरे मसाल्यांमध्ये स्वत:चा वेगळा गुणधर्म असतो. या मसाल्यांचा खाद्यपदार्थ बनवताना योग्य वापर केल्यास शरीराला या मसाल्यातील औषधी गुणधर्म मिळू शकतात. » थंडीपासून बचाव करताना शरीरातील उष्मा वाढीस लागण्यासाठी सुकामेवा उपायकारक ठरतो. त्यामुळे हिवाळ्यात सुकामेवा तर खावाच खावा. खारीक, अंजीर, बदाम, जर्दाळू, चारोळी, काजू, मनुके, पिस्ता, खजूर, अक्रोड नुसते खावेत. डिंकाचा लाडून उत्तम. सोबत तिळाची चिक्की, अंजीर बर्फी, गुळपोळी, शेंगदाण्याची चिक्कीही खावी. » सर्दी-खोकल्याच्या वेळीस थंड पाणी न पिता सकाळ-संध्याकाळ कोमट पाणी प्यावे. » साखरेला मध हा उत्तम पर्याय असतो. त्यामुळे अनेक जण मधाचा आहारात वापर करतात. हिवाळ्यात मधाचा वापर नियमित केल्यास ते उपायकारकच आहे. मधाच्या सेवनामुळे शरीर उष्ण राहते. तसेच हिवाळ्यात खोकला तर हमखास होतो. » अशा वेळी नुसत्या मधाचे चाटण घेण्याऐवजी मध आणि आलं एकत्र करत त्याचे चाटण बनवावे. सकाळी आणि रात्री हे चाटण नियमित घेतल्यास घशाला आराम मिळेल. दररोज एक ग्लास कोमट पाण्यात किंवा दुधात एक चमचा मध घालून सेवन केल्यास उत्तम. » हिवाळ्यात फुटलेल्या ओठांची काळजी घेताना त्यावर क्रीम लावण्याऐवजी दुधाची साय किंवा तूपही लावू शकतो. ओठ लगेच मऊ पडतात. |
No comments:
Post a Comment