| हिवाळा म्हटलं की, गारेगार वा-याची झुळूक, कुडकुडणारे हात-पाय आणि स्वेटर-हातमोजे-कानटोपी घालत थंडीचा केला जाणारा सामना, असं चित्र डोळय़ांसमोर येतं. मुंबईत सध्या म्हणावा तसा थंडीचा जोर पडलेला नाही. पण हळूहळू थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. गारेगार थंडीपासून वाचण्यासाठी प्रत्येक जण तयारी करेल. म्हणूनच या थंडीपासून बचाव करण्यासाठी काही स्निग्ध पदार्थाचा मारा करणं आवश्यक आहे. गुलाबी थंडीचा आनंद प्रत्येक जण घेतो. कुडकुडणा-या थंडीत चहा-कॉफीची मजाच काही औरच. कुणी स्वेटर-शालची खरेदी करेल, तर कुणी कोरडया पडणा-या त्वचेला सुरक्षाकवच पोहोचवण्यासाठी बाजारात उपलब्ध विविध क्रीम्सची खरेदी करेल. केवळ स्वेटर-शाल घालून शरीराला ऊब मिळते का? विविध क्रीममुळे कोरडया पडलेल्या त्वचेला ऊब मिळेल का? उत्तर आहे, नाही. हे सगळं करत असताना शरीरातील सरासरी तापमान राखण्यासाठी योग्य, संतुलित आहारही तितकाच महत्त्वाचा आहे. हिवाळा तसा आल्हाददायक असतो. या अल्हाददायक वातावरणात आहारही पौष्टीक, रुचकर असल्यास ताजेतवाने वाटेल. त्यामुळे शरीराला थंडीशी सामना करण्यास आपसूकच ऊर्जा मिळेल. हिवाळ्यात वातावरण थंड असतं. थंडीमुळे भूक वाढते. पण या वातावरणात पचनक्षमताही वाढल्याने इतर वेळी पचनास जड वाटणारे पदार्थ हिवाळ्यात सहज पचतात. अशा वेळी दूध, तूप, ताक, लोणी या स्निग्ध पदार्थाचे नियमित सेवन केल्यास अधिक फायदेशीर ठरतं. योग्य आहारामुळे शरीराला आवश्यक ऊब मिळतेच तसेच वात-कफ दोषांचे संतुलनही होते. चला तर मग पाहूयात हिवाळ्यातील स्निग्ध पदार्थाचा उबदार आहार कसा असावा. दूध, ताक, लोणी, तूप हे पदार्थ शरीराला स्निग्धता आणि ऊब दोन्ही देतात. असे पदार्थ हिवाळ्यात खाण्यास केव्हाही चांगले. प्रत्येक स्निग्ध पदार्थाची चव म्हणावी तितकी चविष्ट नसते. त्यामुळे हिवाळ्यात दररोजच्या आहारात याचा समावेश करावा तरी कसा ? असा प्रश्न हमखास पडतो. विशेषत: लहान मुलांना हे स्निग्ध पदार्थ खाऊ घालण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागते. अशा वेळी या स्निग्ध पदार्थात सुकामेवा, साखर, मध, हळद, मीठ, जिरे, कोथिंबीर, मिरची पूड आदी पदार्थ टाकत त्याची चव बदलत ते मुलांना दिल्यास मुलेही आवडीने खातील. हे स्निग्ध पदार्थ नुसते खाण्याऐवजी चपाती, भाकरी, भात, खिचडीसोबत खावेत. दूध : आबालवृद्धांच्या आहारात दुधाचा हमखास समावेश असतो. अनेक जण सकाळ-संध्याकाळ दूध आवडीने पितात. पण दुधाला पाहून नाक मुरडणारेही अनेक जण आहेत. अशा वेळी दुधाची चव बदलत ते पिल्यास केव्हाही चांगले. हिवाळ्यात ज्यांना नुसते गरम दूध आवडते त्यांनी ते दररोज एक ग्लास प्यावे. दुधात साखर घालण्याऐवजी मध टाकून प्यावं. मध हा साखरेला उत्तम पर्याय आहेच, शिवाय मधात स्वत:चे उष्ण गुणधर्म आहे. त्यामुळे ग्लासभर दुधात एक चमचा मध टाकल्यास चविष्ट दूध लागेल. हे दूध मुले आवडीने सेवन करतील. साखर आणि मधऐवजी दूध मसाला हाही एक उत्तम पर्याय आहे. केशर, बदाम, काजू, वेलचीपूड, जायफळ यांचा समावेश असलेला दुधाचा मसाला दुधात टाकावा. दुधासोबत मसाल्यात समाविष्ट सुकामेव्याचे गुणधर्मही शरीराला मिळतील. ताक : हिवाळ्यातील थंडीत भूक अधिक लागते. थंड वातावरणामुळे पचनही लवकर होते. अशा वेळी ताकाचे सेवन केल्यास उत्तम. पण दररोज त्याचे सेवन करू नये. जेवणानंतर ग्लासभर ताक पिणं चांगलं. यामुळे जेवण पचण्यास मदत होते. नुसतं ताक पिण्याऐवजी त्यात आवडीनुसार साखर घालूनही पिऊ शकतो. तर इतर वेळी कोथिंबीर, मीठ, हिंग, जिरे यांचा समावेश असलेला ताकाचा मसाला वापरतही ताकाची चव वाढवता येऊ शकते. लोणी : ताजे लोणी हे नेहमी रुचकर लागते. ताजे लोणी चवीला गोड असते आणि त्यात ताकाचा अंश असल्याने चविला किंचित तुरट, आंबटही लागते. लोणी पचायला हलके असल्याने हिवाळयात दिवसातून दोन-तीन चमचे नुसते खावे. ज्यांना नुसते लोणी खाणे आवडत नसेल त्यांनी लोण्याचा दररोजच्या आहारात समावेश करावा. बाजरी, ज्वारीच्या गरमागरम भाकरीसोबत ताजे लोणी चविष्ट लागेल. लोण्यात किंचित मिरचीपूड टाकल्यास लोण्याचीही चव वाढवता येऊ शकते. लोणीमध्ये चमचाभर साखर घालत हे मिश्रण गरम चपाती किंवा भाजलेल्या ब्रेडवर लावून दिल्यास मुले आवडीने खातील. तूप : साजूक तूप जेवढे चविष्ट, रुचकर आहे तेवढेच ते औषधीही आहे. दररोजच्या आहारात तुपाचा सर्रास वापर होतो. हिवाळ्यात गरम चपाती, भाकरीसोबत तूप खावे. तांदळाच्या भातासोबत तसेच मुगाची किंवा मिक्स डाळींची खिचडी करत त्यासोबत तूप खाल्ल्यास चांगले. मटकी, तूर, उडीद, वाल या आणि इतर कडधान्यांचा वापर करत दर दोन-तीन दिवसांनी त्याची भाजी करावी. जिरे, लसूण, मोहरी, सूंठ, हळद, आले, हिंग, मिरची, पुदिना, ओवा, मिरी, लवंग, तमालपत्र, दालचिनी, जायफळ, तीळ वगैरे मसाल्यांमध्ये स्वत:चा वेगळा गुणधर्म असतो. या मसाल्यांचा खाद्यपदार्थ बनवताना योग्य वापर केल्यास शरीराला या मसाल्यातील औषधी गुणधर्म मिळू शकतात. थंडीपासून बचाव करताना शरीरातील उष्मा वाढीस लागण्यासाठी सुकामेवा उपायकारक ठरतो. त्यामुळे हिवाळयात सुकामेवा तर खावाच खावा. खारीक, अंजीर, बदाम, जर्दाळू, चारोळी, काजू, मनुके, पिस्ता, खजूर, अक्रोड नुसते खावेत. डिंकाचा लाडून उत्तम. सोबत तिळाची चिक्की, अंजीर बर्फी, गुळपोळी, शेंगदाण्याची चिक्कीही खावी. सर्दी-खोकल्याच्या वेळीस थंड पाणी न पिता सकाळ संध्याकाळ कोमट पाणी प्यावे. |
No comments:
Post a Comment