आजपासून दीपावलीची सुरुवात झाली. नवीन कपडे घालून मित्रांसोबत फटाके लावून आणि मस्त खुसखुशीत फराळावर ताव मारणं सुरू असेल. धमाल, मजा-मस्ती, पण या दिवाळीत मजा-मस्तीबरोबर थोडीशी स्वत:चीदेखील काळजी घेतली तर ही दिवाळी तुम्हाला नक्कीच आनंदाची जाईल. या दिवसांत विशेषकरून अस्थमाच्या रुग्णांना खूप त्रास होतो. अशा रुग्णांनी आणि त्याचबरोबर आपण सगळ्यांनीच काय काळजी घ्यावी हे जाणून घेऊ या. या दिवाळीच्या दिवसांत फटाक्यांवर कितीही बंदी आणली तरीही सध्या जोरदार फटाक्यांची आतषबाजी केली जाते. मात्र या फटाक्यांमुळे कानठळ्या तर बसतातच पण त्याचबरोबर त्यातून निघणाऱ्या कार्बन मोनोऑक्साइड, सल्फर डायऑक्साइडसारखे अनेक विषारी पदार्थ बाहेर पडत असतात. त्यामुळेच दिवाळीच्या आसपासचे दिवस अस्थमाच्या रुग्णांसाठी भयंकर ठरत असतात. कारण विषारी वायू श्वासोच्छ्वासावाटे फुप्फुसांपर्यंत पोहोचतात आणि त्यानंतर अॅलर्जीचे प्रकार सुरू होतात. परिणामी श्वास घ्यायला त्रास होतो. अस्थमा हा असा आजार आहे जो हवेतील परागकण, धूळ, धूर, फटाके, अगरबत्ती किंवा धुपाचा गंध, आंबट पदार्थ, फळं, दही, लोणची, आइस्क्रीम किंवा आइस क्युब्स आदी कारणांमुळे अस्थमाचा त्रास होतो. याचप्रमाणे दिवाळीच्या सुमारास घरात होणारी साफसफाई, नव्या-जुन्या कपडयांचा गंध, ठरावीक पदार्थाची अॅलर्जी, परफ्यूम किंवा डिओ आणि याचबरोबर फटाक्यांचा धूर.. यामुळे अस्थमाच्या रुग्णांच्या तब्येतीवर गंभीर परिणाम दिसू लागतात. अशा विविध कारणांमुळे रुग्णांना श्वास घेणं कठीण होऊन बसतं. त्यामुळे त्यांना कधीही अॅटॅक येण्याची शक्यता वाढते. छातीत अखडणे, जीव घुसमटणे अशी विविध लक्षणं दिसतात. आपला श्वास थांबतो की काय असं त्यांना वाटायला लागतं. म्हणूनच फटाक्यांचा धूर या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकतो. खरं म्हणजे अस्थमाचे रुग्ण दररोज औषधं घेतातच असं नाही. त्यांना भरपूर त्रास व्हायला लागतो तेव्हाच हे रुग्ण औषधांचा मारा करतात. हे रुग्ण सर्वसामान्यच दिसतात. त्यामुळे आपल्याला बरं वाटतंय तर आपण औषधं कशाला हवी किंवा आपण रोज औषधं घेतली तर आपल्याला त्याची सवय होईल, असा काहीसा भ्रम त्यांना सतत होत असतो. म्हणून अस्थमाचे रुग्ण औषधं घेण्याचं टाळतात. वास्तविक पाहता त्यांनी दररोज औषधं घेतली किंवा इन्हेलरचा वापर केला तर इन्हेलरद्वारे ते औषध फुप्फुसांपर्यंत पोहोचतात आणि आपला असर दाखवतात. मात्र नियमित औषधांचा वापर न केलेल्यांमध्येच अॅटॅक येण्याची शक्यता अधिक असते. या दिवाळीच्या दिवसात अस्थमाच्या रुग्णांनी काय काळजी घ्यावी हे जाणून घेऊ या. » नियमित गोळ्यांचं सेवन करा. » फटाक्यांपासून, विशेषत: फटाक्यांच्या धुरापासून लांब राहा. » दिवाळीच्या दिवसांत खिडक्या-दरवाजे बंद ठेवा. म्हणजे धुराचा त्रास होणार नाही. घरात एक्झॉस्ट फॅन असेल तर दोन तासातून किमान पाच मिनिटं हा फॅन लावून ठेवावा. म्हणजे घरातली हवा खेळती राहील. » या रुग्णांनी दिवाळीपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असतं. त्या त्रासाची डॉक्टरांकडून माहिती घेऊन त्याप्रमाणे औषधं घ्यावीत. म्हणजे अचानक उत्पन्न होणाऱ्या समस्यांना सामोरं जाण्याची क्षमता असते. » इन्हेलर, नेब्युलायझर सदैव जवळ ठेवावं. अधून मधून त्याचं सेवन करत राहावं. » प्रवास करताना तुमची औषधं सदैव जवळ बाळगा. » इन्हेलरचा योग्य वापर कसा करायचा हे डॉक्टरांना विचारून घ्यावा. फुप्फुसांमधली अशुद्ध हवा बाहेर कशी फेकायची आणि इन्हेलरची हवा अधिकाधिक फुप्फुसांपर्यंत कशी पोहोचवायची, याची पूर्ण माहिती करून घ्यावी. त्याप्रमाणे त्याचा वापर करावा. » अशा रुग्णांनी दिवाळीच्या एक आठवडा आधी आणि नंतर बाहेर पडताना अधिक काळजी घ्यावी. कारण या दिवसांतही फटाक्यांचा धूर सतावत असतो. शक्यतो बाहेर पडताना तोंडावर मास्क लावून फिरावं. दिवाळीसाठी अन्य काही टिप्स - » आजकाल अनारकली ड्रेसची फॅशन आहे. मात्र फटाके फोडताना अनारकली किंवा सिंथेटिक, उडणारे, सैल ड्रेस घालू नयेत. » फटाक्यांच्या जवळ आसपास कुठेतरी पाण्याची बाटली आवश्य ठेवावी. » मुलांबरोबर फटाके उडवताना मोठयांनी आवश्य बरोबर राहावे. » रॉकेट किंवा हवेत उडणारे फटाके नेहमी मैदानातच लावावेत. » लायटिंगचं काम करताना सावधानी ठेवा. वायर टेस्ट करताना टेस्टर किंवा बल्बचा वापर करावा. » लायटिंगचं सामान सिलिंडरपासून लांबच ठेवावं. » काळजी घेऊनही आगीचा सामना करावा लागलाच तर प्रथम मुख्य स्वीच बंद करा. जवळच्या लाकडी दरवाजापाशी जा. ओलं ब्लँकेट निवडावं. घराच्या खिडक्या-दरवाजे उघडा. » कपडयांमध्ये आग लागली तर पटकन ते कपडे उतरवा. पण स्वत: करण्यापेक्षा हे काम दुस-याला करण्यास सांगावं. » एखादी व्यक्ती आगीच्या तडाख्यात आलीच तर तिला तुम्ही स्वत: काही औषधोपचार करण्यपेक्षा त्वरित डॉक्टरांकडे घेऊन जावं. |
No comments:
Post a Comment