बदलत्या जीवनशैलीमुळे कित्येक जण ताणतणावाला सामोरे जातात. त्यात आजकालच्या महिलादेखील घर आणि ऑफिस अशा दोन्ही जबाबदा-या लीलया सांभाळत असतात. पण सुपरवुमन असणा-या महिलांवर घर आणि ऑफिस अशा दुहेरी जबाबदा-या सांभाळताना अनेकदा ताण येतो. परिणामी त्यांची प्रकृती बिघडण्याचीही शक्यता असते. या तणावाला आपल्यापासून दूर ठेवायचं असेल तर काय केलं पाहिजे, हे जाणून घेऊ या. ऑफिस, घर, मित्र परिवार, मुलं आणि त्यांच्या समस्या.. अशा अनेक जबाबदा-या सांभाळणा-या महिलांना आपण मल्टिटास्किंग वुमन असं संबोधलं जातं. अशा महिलांबरोबर सदैव सोबत असणा-या मंडळींसाठी या महिला सुपरवुमनपेक्षा काही कमी नसतात. मात्र त्यांनाही काही समस्या असतात. याची कोणाला जाणीवच नसते. याला कारण महिला स्वत:च असतात. कारण या महिला आपल्या समस्या वाढवून ठेवत नाही, त्यांच्याकडे प्रत्येक समस्येचं निराकरण असतं. मात्र दुहेरी भूमिका निभावताना त्यांची कधी कधी दमछाक होते आणि परिणमी त्या ताणतणावाच्या शिकार होतात. अशा या महिलांवर ताण येण्यामागे कोणती कारणं आहेत आणि त्यासाठी काय केलं पाहिजे हे आज आपण समजून घेऊ या. तणाव ही गोष्ट काही एका रात्रीत होणारी समस्या नाही. ही अशी गोष्ट असते जी संबंधित व्यक्तीपर्यंत हळूहळू पोहोचते. आपल्या नकारात्मक विचारांसोबत अधिकाधिक जबाबदा-या स्वत:च्या डोक्यावर घेणं हे एक कारण असू शकतं. त्यातूनच या तणावाची निर्मिती होते आणि कधी कधी तर याचे गंभीर परिणामही दिसायला लागतात. तणावाची कारणं पुढीलप्रमाणे दिनचर्येनुसार व्यक्तिपरत्वे तणावाची कारणं बदलत असतात. कोणी घरच्या समस्यांनी तणावग्रस्त असतं तर कोणी ऑफिसच्या समस्येने त्रस्त असतं. या समस्यांनुसार प्रत्येक सम्यस्येचं निराकरण करण्याची पद्धतही वेगळी असते. योग्य वेळी तणावाचं निराकरण झालं नाही तर मात्र ती गंबरी समस्यस निर्माण होते. प्रमुख कारणं पुढीलप्रमाणे - आपण इतरांपेक्षा सगळ्यात उत्तमच प्रेझेन्टेशन द्यायचं असा एक प्रकारचा समज करून घेतल्याने आपल्यावर आपोआपच दबाव असतो. » ओव्हरटाईम करण्याची सवय » घरात कोणाचा आधार नसणे » कोणत्या तरी प्रकारची शारीरिक समस्या » घर, ऑफिस किंवा बिझनेसमध्ये तणावपूर्ण स्थिती » खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धती » स्वत:साठी वेळ काढणं शक्य नसणं, » योग्य वेळी किंवा ठरवून दिलेल्या वेळेत काम पूर्ण न होणं. लक्षणं » अशक्तपणा जाणवणं » एकाग्रता कमी होणं » झोप न येणं किंवा झोपेतून सतत दचकून उठणं » डोकेदुखी » पोटाशी निगडित काही समस्या » एकटेपणा आवडणं » अल्कोहोल किंवा ड्रग्जच्या आहारी जाणं » चिडचिड होणं तणावापासून दूर राहण्यासाठी.. ताणतणाव प्रत्येकाच्या अयुष्यात असतातच. मात्र या तणावापासून कसं दूर राहायचं याबाबत प्रत्येकाचे स्वत:चे असे खास प्रयत्न असतात. काही जणांच्या या समस्या कालांतराने आपोआपच दूर होतात तर काही जणांना समुपदेशनाची गरज भासते. काही जणांच्या सोबत त्यांचं कुटुंब असतं तर काही जणांकडे मित्रपरिवार असतो. पण ज्यांना कोणाचाच आधार नसतो त्यांचं काय? म्हणूनच घर आणि ऑफिसमधला ताण अधिकाधिक वाढणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आपल्या दिनचर्येत काही बदल केल्यास तुम्ही तणावाला दूर ठेवू शकतात. वास्तविकता जाणून त्याला सामोरे जा ऑफिसचं काम हे आपल्या जीवनाचा थोडासा भाग आहे. आपल्या शरीराची पूर्ण ऊर्जा त्याकामी खर्ची घालू नका. त्याचा परिणाम तुमच्या नात्यांवर होतो. कुटुंब आणि ऑफिस या दोन्हीमधलं अंतर नियमित राखलं पाहिजे. त्यांची सरमिसळ केलीत तर तुम्ही तणावाचे बळी ठरलात म्हणूनच समजा. ऐकावं मनाचं आपल्या व्यग्र जीवनात आपण स्वत:लाच विसरतो. मात्र स्वत:साठी वेळ काढणं आवश्यक असतं. आपली आवड निवड, आपल्यातली हुशारी समजा आणि त्यासाठी वेळ काढा. जुने फोटो किंवा अल्बम अथवा सीडी पाहून काही आठवणी ताज्या केल्या जातात. तुम्ही सुट्टीवर जाणार असाल तर लॅपटॉप किंवा फोनला स्वत:पासून जरा लांबच ठेवा. स्वत:साठी काही वेळ राखून ठेवायला शिका. किंवा सवय करा. केवळ कुटुंब आणि ऑफिसचं काम यातच वेळ घालवाल तर मात्र ताण वाढतच जाईल. म्हणूनच जितकं शक्य असेल तितका स्वत:साठी वेळ द्यावा. कारण जास्त तणाव वाढल्याने तुम्ही ना धड परिवाराला वेळ देऊ शकाल ना ऑफिसच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकाल. कुटुंबाला वेळ द्या कित्येक जणांना ऑफिसचं काम घरी करायची सवय असते. पण ही अतिशय चुकीची पद्धत आहे. ऑफिसचं काम ऑफिसमध्येच पूर्ण करावं. घरी कधीही आणू नये. घरचा संपूर्ण वेळ हा आपल्या कुटुंबालाच समर्पित करा. जेवणानंतर शतपावली करायला घरापासून काही अंतरावर कुटुंबासोबत जा. किंवा मुलांबरोबर जरासा वेळ घालवावा. दिवाळीच्या सुट्टीत मुलांबरोबर अधिक वेळ घालवा. संतुलन राखा रोज रोज तेच तेच काम किंवा रुटीन ठेवू नका. एकसुरी जीवानामुळे आपल्याला कंटाळा येतो. त्यामुळे काही ना काही बदल करणं आवश्यक असतं. दोन ते तीन महिन्यांनतर आपल्या कुटुंब किंवा मित्र परिवारासोबत कुठेतरी फिरायला जावं म्हणजे जरा एनर्जी मिळते. नाहीतर आयुष्याला काहीच अर्थ उरत नाही. कामाचं ओझं कमी करा कित्येक जणांना 'नाही' म्हणण्याची सवय नसते. पडेल ते काम करत राहतात. त्यामुळे परिणामी त्यांच्यावर कामाचं ओझं होतं. परिणामी काम कमी होण्याऐवजी वाढतच जातं. म्हणूनच तुम्हाला झेपेल इतकंच काम करा. जे काम तुमच्या क्षमतेपलीकडे आहे त्याला सरळ नाही म्हणायला शिकावं. नेहमी सकारात्मक विचार करा काही लोक नेहमी नकारात्मक विचार करतात. या नकारात्मक विचारांमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणूनच नेहमी सकारात्मक विचार करावा. सकारात्मक विचारांमुळे विचारांना नेहमी चालना मिळतात. आपल्याला प्रोत्साहन देणारी पुस्तकं वाचा. आपलं काम आपण नेहमी परफेक्टच असलं पाहिजे याऐवजी जितकं चांगलं देता येईल तितकं देण्याचा प्रयत्न करा. ऑफिसमध्येही व्यायाम करा किंवा विश्रांती घ्या कित्येक वेळ एकाच जागी बसण्यापेक्षा थोडया वेळाने जागेवरून उठावं. ऑफिसला जाताना शक्य असल्यास लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करा. तसंच लंचनंतर थोडा वेळ शतपावली करा. विश्रांती घ्या याचा अर्थ सुट्टीवर जाणं असा अर्थ होत नाही. तर खूप वेळ कॉम्प्युटरवर काम करावं लागत असेल तर मात्र थोडया वेळाने म्हणजे साधारण दोन ते तीन तासांनी डोळे बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या. तळव्यांचा हलकासा दाब डोळ्यावर दिल्यानेही बरं वाटतं. |
No comments:
Post a Comment