सध्याची तरुण पिढी आधुनिक जीवनशैलीत इतकी गुरफटून गेली आहे की त्यांना स्वत:कडे लक्ष द्यायलाही अजिबात वेळ नाही. खाण्या-पिण्याची अनियमितता आणि कमी झोप आदी कारणांमुळे सध्या तरुणांना मुरुमांची समस्या भेडसावते आहे. या समस्येविषयी थोडक्यात जाणून घेऊ या. सुचित्राच्या गालावर भरपूर प्रमाणात मुरुमं येत होती. हळूहळू ती मुरुमं कपाळावरही यायला लागली होती. सुचित्राला हे अजिबात आवडत नव्हतं. ती एक मुरूम आल्यावर लगेचच फोडून टाकत होती. मात्र ही मुरुमं फोडल्यामुळे त्याची लस आसपास पसरून तिचा संपूर्ण गाल मुरुमांनी भरला होता. त्यासाठी बरेच घरगुती उपचार करत होती. मात्र तिच्या फोडण्याच्या सवयीमुळे या समस्या कमी होण्याच्या ऐवजी वाढतच जात होती. त्यामुळे तिला कॉलेजमध्ये जाणंही नकोसं वाटत होतं. शेवटी एकदा ती या समस्येला कंटाळून डॉक्टरांकडे गेली. तारुण्यावस्थेत असताना गालावर, हनुवटीवर, कपाळावर, नाकावर मुरुमं येणं ही केवळ सुचित्राचीच नव्हे तर नुकतंच तारुण्यात पदार्पण केलेल्या समस्त तरुणांची समस्या आहे. त्वचेवर मुरुमं येणं ही त्वचेसंबंधीच्या विकाराशी निगडित समस्या आहे. ही मुरुमं तारुण्यातच अधिक येत असल्यामुळे यांना 'सौंदर्यपिटिका' असंही म्हणतात. पण तारुण्यावस्थेत असं काय होतं ज्यामुळे या समस्येला तोंड द्यावं लागतं हे जाणून घेऊ या. वय वर्ष १४ ते ३० या दरम्यान ही समस्या अधिक भेडसावते. पांढरा, लाल आणि काळा असे त्याचे विविध प्रकार असतात. लाल प्रकारातील मुरुमांमुळे अतिशय जळजळ होते, तर सतत फोडल्यामुळे तिथली त्वचा खडबडीत होते, कधी कधी ते काळे होतात. अशी मुरुमं फोडल्यामुळे त्यांचे डाग कायमस्वरूपी चेह-यावर राहतात. मुरुमं कशामुळे येतात? त्वचेतील तैलीय ग्रंथी अधिक सक्रिय झाल्यामुळे या प्रकारच्या समस्येला तोंड द्यावं लागतं. त्वचेखाली असलेल्या हेअर फॉलिकलच्या चारही बाजूंनी सूज येते. खरं म्हणजे चेह-यावर मुरुमं येण्याची समस्या ही तारुण्यावस्थेत अधिक भेडसावते. कारण या तारुण्यावस्थेत शरीरातील हार्मोन्समध्ये काही बदल होतात. त्यामुळे या तैलग्रंथी अधिक सक्रिय होतात. या ग्रंथी अधिक प्रमाणात उत्तेजित झाल्या की त्वचेखालील सूक्ष्म जीवाणूंना उत्तेजित करतात. मग हे जीवाणू त्वचेच्या कोशिकांना त्रास देतात, यामुळे मुरुमं यायला लागतात. खरं म्हणजे वात, पित्त, कफ आणि रक्त हे शरीरातील धातू दूषित झाल्यामुळे मुरुमं येतात. कधी कधी एकच किंवा अनेक मुरुमं गालावर, चेह-यावर किंवा कपाळावर येतात. त्यामुळे चेहरा विद्रुप दिसू लागतो. यामागची नेमकी कारणं काय आहेत हे जाणून घेऊयात. कारणं » आजकालच्या आधुनिक जीवनशैलीमुळे ताणतणाव आणि चिंता वाढल्यामुळे » पर्यावरणातील प्रदूषण » खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये बदल करणे म्हणजे अधिक तेलकट पदार्थाचं सेवन करणे, सतत जंक फूड किंवा फास्ट फूड खाणे. » तारुण्यात होणारे हार्मोन्समधील बदलामुळे एड्रिनल गं्रथी अधिक सक्रिय झाल्यामुळे मुरुमं येतात. काय काळजी घ्यावी? » दिवसातून किमान दोन किंवा तीन वेळा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा. जेणेकरून त्वचेवरील तेलकटपणा निघून जाईल. शक्य असल्यास आयुर्वेदिक साबणाचा वापर करावा. » बाहेरून आल्यावर, मेकअप काढल्यानंतर, व्यायामानंतर त्वचा स्वच्छ करावी. त्यापूर्वी हात स्वच्छ साबणाने धुवावेत. म्हणजे इन्फेक्शन होणार नाही. » काही जण मुरुमं आली की ती फोडण्याचा प्रयत्न करतात, खाजवणे किंवा दाबून त्यातील लस काढण्याचा प्रयत्न करतात. पण असं अजिबात करू नये यामुळे त्यातली लस आजूबाजूला पसरते आणि ते कमी होण्याऐवजी त्यात अधिक वाढ होते. » दररोज मेकअप करणं टाळावं. काही ठरावीक कारणांसाठीच मेकअप करावा. मेकअप केल्यावर तो व्यवस्थित निघेल याची काळजी घ्यावी. अधिक ऑइली मेकअप करू नये. » धूळ, माती आदींपासून चेह-याचं संरक्षण करावं. त्यासाठी चेहरा कपडय़ाने झाकावा. » जास्त घट्ट कपडे परिधान करू नयेत किंवा त्यांचा वापर कमी करावा. कारण यामुळे भरपूर घाम येतो. अधिक घामामुळेही मुरुमं येण्याची शक्यता वाढते. » काही मुलींना मासिक पाळीच्या पूर्वी मुरमं येतात. ही मुरुमं इस्ट्रोजन आनि प्रोजेस्टोरॉन हार्मोन्सच्या अनियमिततेमुळे येतात. नंतर आपोआप कमी होतात. » गर्भावस्थेमध्ये प्रोजेस्टेरॉन नावाच्या हार्मोन्सच्या पातळीत वाढ होते त्यामुळेदेखील मुरुमं येतात. म्हणून गर्भवती स्त्रीने भरपूर पाणी, व्यवस्थित जेवण आणि अधिकाधिक व्हिटामिनयुक्त पदार्थाचं सेवन करणं आवश्यक आहे. » जेवणात अति तेलकट किंवा तुपकट पदार्थाचा वापर टाळावा. » केसांत कोंडा होणार नाही याची काळजी घ्यावी. मुरुमांची समस्या अधिक जाणवत असल्यास काही दिवस केसांना कमी तेल लावावं. » पूर्ण झोप घेण्याचा प्रयत्न करावा. » सकाळी लवकर उठून ताज्या, स्वच्छ हवेत फिरायला जा आणि घरी व्यायाम करा. » अतिरिक्त मीठ, चहा-कॉफी आणि मिरची-मसाले यांचं सेवन करू नये. उपचार काय करावेत? » कडुलिंबाची पानं त्वचेच्या कोणत्याही विकारासाठी खूपच चांगली असतात. काढय़ाच्या किंवा पावडरीच्या रूपातही तुम्ही याचा वापर करू शकता. र्खम म्हणजे या पानांची पेस्ट करून ती विकारावर लावल्याने आराम मिळतो. » चंदन उगाळून ते मुरुमांवर लावल्यास थंडावा मिळून लवकर आराम मिळतो. चंदनामुळे मुरुमांत होणारी जळजळ कमी होते. » चंदन तेल आणि मोहरीचं तेल लावल्यानेही आराम मिळतो. » उन्हाळ्यात चेह-यावर चंदनाची पावडर लावल्यानेही आराम पडतो. » ब्लॅकहेडच्या समस्या असलेल्यांनी दालचिनी पावडरवर लिंबू पिळून त्याची पेस्ट तयार करावी आणि ती पेस्ट मुरुमं किंवा ब्लॅकहेड्स झालेल्या ठिकाणी लावावी. त्यामुळे आराम पडतो. » कोथिंबीरीच्या रसात चिमूटभर हळद घालून हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुऊन त्यावर लावावे. कोरडय़ा त्वचेसाठी आणि मुरुमांसाठी अतिशय उत्तम उपाय आहे. » मेथीच्या पानांची पेस्टही मुरुमांसाठी अतिशय लाभकारी आहे. रात्री झोपण्यापूर्वी ही पेस्ट शरीराला लावावी. थोडा वेळाने कोमट पाण्याने चेहरा धुवावा. चेहरा चांगला दिसतो आणि मुरुमांच्या समस्येपासूनही आराम पडतो. » रक्तचंदन पावडर किंवा रक्तचंदन उगाळून लावल्यानेही त्वरित आराम पडतो. » मुलतानी मातीदेखील मुरुमांवर अतिशय लाभदायी आहे. काही घरगुती उपचार पाहू या. » त्वचेवर कच्चं दूध आणि लिंबाचा रस एकत्र करून हे मिश्रण चेह-यावर कापसाच्या साहाय्याने लावावं म्हणजे चेह-यावरील धूळ, कचरा निघून जाईल. » मसूरची डाळ वाटून त्याची पावडर करावी. ही पावडर दोन चमचे घेऊन त्यात चिमूटभर हळद, लिंबू आणि दही मिसळून त्याची पेस्ट तयार करावी आणि ही पेस्ट चेह-यावर लावावी. सुकल्यावर चेहरा कोमट पाण्याने धुवावा. » एक चमचा तुळशीच्या पानांची पूड, एक चमचा कडुलिंबाच्या पानांची पावडर आणि एक चमचा हळद पावडर घ्या. त्यात मुलतानी मातीही घालावी. आठवडय़ातून दोन वेळा हे मिश्रण चेह-यावर लावल्याने चेहरा स्वच्छ होतो आणि त्वचा मुलायम होते. » कडुलिंबाची पानं मिक्सरवर वाटून त्यात चिमूटभर हळद घालून ती मुरुमांवर लावावी. सुकल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवावा. » दुधातही चंदन पावडर आणि हळद घालून ही पेस्ट चेह-यावर लावावी. » जायफळ पाण्यात उगाळून ते चेह-यावर लावल्यानेही बरं वाटतं. » चेह-यावर जि-याची पूड पाण्यात घोळवून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. ही पेस्ट लावल्यानंतर एक तासाने चेहरा धुवावा. » भरपूर पाणी प्यावं. दिवसातून किमान आठ ग्लास तरी पाणी प्यावं. » शरीराला अधिकाधिक ऑक्सिजन मिळावा यासाठी प्राणायाम आणि योगासनं करावीत म्हणजे लवकर आराम मिळतो. |
No comments:
Post a Comment