| वृद्धांसाठी हॉस्पिटल कम वृद्धाश्रम | डॉ. मित्र चॅरिटेबल ट्रस्टने सन २००९ला सुरू केलेले डी.एम.सी.टी. हॉस्पिटल हे आज हॉस्पिटल नसून वृद्धांसाठी, अनाथांसाठी, गोर-गरिबांसाठी मायेचे घर बनले आहे ते केवळ तिथल्या डॉ. रवींद्र जाधव यांच्या अथक प्रयत्नाने. अशा या हॉस्पिटल कम वृद्धाश्रमाची ही माहिती. आजच्या आधुनिक जगात वैद्यकीय क्षेत्रांत अमूलाग्र बदल होताना दिसतायेत. जसं वेगवेगळय़ा विषयांतील तज्ज्ञांची हॉस्पिटलं आहेत, तशी वैद्यकीय क्षेत्रांशी निगडित पुनर्वसन हॉस्पिटलेदेखील निर्माण होताना दिसतात, असंच एक अनोखं हॉस्पिटल कल्याणमध्ये डॉ मित्र चॅरिटेबल ट्रस्टने सन २००९ला सुरू केलं. त्याचं नाव डी.एम.सी.टी. हॉस्पिटल आहे. त्याचं वैशिष्टय़ म्हणजे ते फक्तवृद्ध, बेडरीडन रुग्णांसाठी सवरेत्तरीय मदत करते. जसं लकवा, फ्रॅक्चर, बेडसोर्स, कोमा, डायबेटीक जखम, वृद्धत्वामुळे किंवा अशक्तपणामुळे आलेले बेडारीडनत्व, अपंगत्व, मतिमंदता, गतिमंदता कंपवात, डिमेन्शीया, पार्किनसन्सने त्रस्त आहेत, अशा रुग्णांची काळजी तसंच उपचारांचं दीर्घकालीन नियोजन करावं लागतं अशा रुग्णांना इथे सर्व सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. खरं म्हणजे अशा वृद्धांना, रुग्णांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचारांच्या नियोजनाची गरज असते; परंतु एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ठेवायचं म्हटलं तर खर्च परवडणारा नसतो आणि घरी ठेवून काळजी घ्यायची म्हटली तरी अवघड असते. अशा कठीण परिस्थितीत डी.एम.सी.टी. हॉस्पिटल ओल्ड एज अँड बेडरीडन पेशंट केअर सेंटरने अगदी माफक दरात सर्व सेवा-सुविधा आणि उपचार उपलब्ध करून दिले आहेत. या हॉस्पिटलचे प्रमुख संचालक डॉ. रवींद्र जाधव आहेत. त्यांची सुविद्य पत्नी डॉ. सौ. सुरेखा जाधवदेखील त्यांना सर्वतोपरी मदत करीत असतात. या हॉस्पिटलमध्ये मधुमेह तज्ज्ञ, हृदयरोग तज्ज्ञ, सर्जन, फिजिओथेरपिस्ट उपलब्ध असतात. त्याचप्रमाणे नर्सेस, आया, मावश्या, वॉर्डबॉय चोवीस तास केअर टेकर रुग्णांच्या सेवेला तत्पर असतात. इथे कौटुंबिक वातावरणामुळे रुग्णांना लवकर उपशय मिळतो. कामगारांसाठी वर्कशॉप घेतल्याने रुग्णांसोबत कसं वागावं हे त्यांना चांगलं कळतं. म्हणूनच बेडरीडन वृद्ध, रुग्ण अल्पावधीतच चालायला लागतात. बरे झालेले रुग्ण काही महिन्यांत आनंदाने घरी जातात. देश-परदेशातून अनेक वृद्ध, रुग्ण इथे सेवा घेण्यासाठी येतात. या सेवांचा फायदा घेण्यासाठी काही जण तात्पुरत्या कालावधीसाठी येतात तर काही जण कायमस्वरूपी राहण्यासाठी. येथे चाळीस वृद्ध रुग्णांची सोय केलेली आहे. पेन्शनर, देणगीदार, श्रीमंत, गरीब, अनाथ अशा सर्व प्रकारच्या वृद्धांना, बेडरीडन रुग्णांना तात्पुरते किंवा कायमस्वरूपी सांभाळून घेतलं जातं. हे सेंटर चालू केल्यानंतर अनेक समस्या निर्माण झाल्या. अनेक विघ्नसंतुष्ट लोकांनी ऐनकेन प्रकारे सेंटर बंद करण्याचा प्रयत्न केला. परंतु सर्व प्रकारच्या परिस्थितीचा सामना करून एकाकी, असहाय्य, भयानक जीवन जगणा-या वृद्धांना, रुग्णांना मायेचा आधार देण्याचे कायदे हे हॉस्पिटल करीत आहे. दूर परदेशात राहणारी मुलं आपल्या आजारी वृद्ध माता-पित्यांची अशा सेंटरमध्ये व्यवस्था करून निश्चिंत होतात. अनेक नातेवाईक आपल्या ओळखीच्या वृद्धांना त्यांच्याकडे जे काही आहे ते ट्रस्टला देणगी देऊन कायमस्वरूपी राहण्यासाठी येतात. डॉ. रवींद्र जाधव आणि त्यांचे सहयोगी २००९ पासून ही हॉस्पिटल कम वृद्धाश्रमाची संकल्पना राबवत आहेत. आपण एक अनोखी संकल्पना घेऊन गरजूंच्या उपयोगी पडता येईल असं कार्य करावं, अशा समाजमनाच्या डॉ. जाधव दाम्पत्याची इच्छा होती आणि त्यातूनच हे सेंटर उभं राहिलं. डॉ. रवींद्र जाधव हे ट्रस्टच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवित आहेत. त्यात मुक्त विद्यापीठाच्या रुग्ण सहाय्यक प्रमाणपत्र कोर्सेसचा बी.एस.एस.च्या प्रॅक्टिकल नर्सिग डिप्लोमा इ. समावेश आहे. आजपर्यंत हजारो गोर-गरीब अर्धशिक्षित मुलींना त्यातून रोजी-रोटी प्राप्त झाली आहे. 'डॉक्टर मित्र' नावाची मासिक आरोग्य पत्रिका त्यांनी दीर्घकाळ चालवली. त्या माध्यमातून आरोग्य शिक्षणाची चळवळ त्यांनी खेडोपाडी पोहोचवली. डॉ. रवींद्र जाधव व सहयोगी मित्रांनी एकाकी राहणा-या वृद्धांच्या मदतीसाठी एक हेल्पलाइन सुरू केली. या कामी स्थानिक नगरसेवक यांनी ट्रस्टला अॅम्ब्युलन्सची सोय करून दिली आहे. आज डॉ. जाधव दाम्पत्य एका तीन वर्षाच्या अनाथ मुलाचे संगोपन करीत आहेत. डॅडी होम या संकल्पनेच्या माध्यमातून रेल्वे, रस्त्याच्या कडेला भीक मागणा-या, थंडी, ऊन, वारा यामध्ये जीवन गमावणा-या अनाथ मुलांसाठी त्यांना मिशनरी कार्य करायचं आहे. रस्त्याच्या कडेला व इतर ठिकाणी भटकणारे भिकारी व मनोरुग्ण यांची ते मायेने विचारपूस करतात, त्यांचा शोध घेतात. त्याच ठिकाणी औषधोपचारांची व्यवस्था करतात. कपडे, चादरी, छत्र्या, पाण्याच्या बाटल्या पुरवतात. मृत्यूनंतर त्यांचे अंतिमसंस्कारदेखील करतात. येणा-या काही दिवसांत शहरापासून थोडे दूर पाच एकर जागेत भव्य हॉस्पिटल, वृद्धाश्रम, बेडरीडन पेशंट केअर सेंटर, अनाथश्रम, डॅडी होम उभारण्याचा विचार असून तिथे हजारो गरजू गरिबांना मायेचा आधार मिळणार आहे. | Read More » पॅथॉलॉजीमध्ये जाण्यापूर्वीची काळजी | यापूर्वी आपण कोणत्या चाचण्या नेमक्या कशासाठी केल्या जातात याची माहिती घेतली आहेच. मात्र आज आपण रुग्ण म्हणून चाचण्या करायला पॅथॉलॉजीत जाताना काय काळजी घ्यायची हे जाणून घेऊ या. आपण कोणतीही चाचणी करण्यासाठी लॅबमध्ये जातो. कधीकधी गेलो आणि लगेच आलो असं होत नाही. कित्येकदा दोन-दोन तासांच्या किंवा चोवीस तासांच्या अंतरावर पुन्हा चाचणी करण्यासाठी जावं लागतं. उदाहरणच द्यायचं झालं तर काही चाचण्या काहीही न खाता केल्या जातात, तर काही चाचण्या खाल्ल्यानंतर दोन तासांनी केल्या जातात. काही चाचण्यांमध्ये लघवी किंवा शौच घरून न्यावं लागतं. अशा वेळी आपल्याला काय करायचं ते समजत नाही. इतकंच नाही तर कित्येकदा तिथे पोहोचण्याची वेळही चुकते. मग आपल्याला माघारी यावं लागतं. खरं म्हणजे प्रत्येक चाचणीसाठी काय काळजी घ्यायला हवी याची माहिती पॅथॉलॉजीत उपस्थित असलेले डॉक्टर किंवा नर्सेस सांगतात. मात्र कधीकधी गर्दी असल्यास त्यांनाही सांगणं शक्य होत नाही. मात्र योग्य ती काळजी आपण घेतली, तरच आपल्याला आपण केलेल्या चाचण्यांचा निकाल चांगला मिळेल. अन्यथा तो निकाल चांगला येणार नाही. परिणामी वेळ, पैसा आणि आपली शक्ती सगळ्याच गोष्टी व्यर्थ जातात. म्हणूनच आपल्याला दिलेल्या चाचण्या करायला जाण्यापूर्वी एक रुग्ण म्हणून काय काळजी घेतली पाहिजे ते जाणून घेऊ या. लघवी किंवा कफ चाचणीसाठी घ्यावयाची काळजी युरिन रुटीन, प्रेग्नन्सी टेस्ट आणि कावीळ या प्रकारच्या चाचण्यांसाठी तसं पाहायला गेलं तर काहीही न खाण्याची गरज नसते. उत्तम निकाल लागण्यासाठी सकाळी उठल्यावरची पहिल्या लघवीचा नमुना आवश्यक असतो. पण तसं शक्य नसेल तर दिवसभरातला कोणताही नमुना चालतो. मात्र ज्या कंटेनरमधून तुम्ही हा नमुना नेणार असता तो स्वच्छ आणि कोरडा असावा. त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या तेलाची किंवा शॅम्पूची बाटली वापरू नये. तसंच हा नमुना दोन तासांच्या आत पॅथॉलॉजीमध्ये सुपूर्द करणं आवश्यक आहे. युरिन मायक्रोअल्बुमिन नावाच्या चाचणीसाठी सकाळच्या लघवीचा नमुना आवश्यक नाही. चोवीस तासांमधली युरिन टेस्ट ही चाचणी करण्यापूर्वी एक दिवस आधीपासूनच काळजी घ्यावी. शक्यतो शनिवारची निवड करू नये, कारण रविवारी काही पॅथॉलॉजी बंद असतात. तसंच खाल्ल्यानंतर चाचणीसाठी नमुना गोळा केल्यासही चालतं. यासाठी किमान दोन लिटरची स्वच्छ धुऊन कोरडी केलेली प्लास्टिकची बाटली वापरावी. यासाठी सकाळी ठरावीक एक वेळ निश्चित करावी. उदाहरणार्थ, सकाळी नऊ ही वेळ निश्चित करा. त्यावेळची लघवी गोळा करू नका. मात्र त्यानंतर दुस-या दिवशी सकाळी नऊपर्यंतची प्रत्येक वेळची लघवी नमुना म्हणून गोळा करून त्या बाटलीत भरावी आणि ही बाटली दोन तासांच्या आत पॅथॉलॉजीत न्यावी. युरिन कल्चर कॉलनी काउंट यात उपास करण्याची गरज नाही. मात्र यात लघवीचा नमुना कोणत्याही प्रकारच्या गोळ्या घेण्यापूर्वीच गोळा करावा. यासाठी पॅथॉलॉजीमधूनच बाटली किंवा कंटेनर घ्यावं आणि चाचणीच्या वेळीच ते उघडावं. हा नमुना दोन-तीन तासांच्या आत चाचणीसाठी न्यावा. उशीर होत असल्यास फ्रीजमध्ये ठेवावा. शौच चाचणी यासाठीही उपास करण्याची गरज नाही. कोणत्याही वेळचे शौच चाचणीसाठी चालते. मात्र गोळा केल्यावर दोन तासांच्या आत पॅथॉलॉजीत न्यावं. स्पुटम कल्चर यालाही उपास करण्याची आवश्यकता नाही. यासाठी पॅथॉलॉजीकडूनच बाटली घ्यावी. कफ सुटण्यासाठी सकाळी एक ग्लास गरम पाणी प्यावं. यात कफ छातीतून बाहेर पडणारा असावा. लाळ देऊ नये. दोन ते तीन नमुना गोळा करावा. साधारणत: २.५ एमएल तरी कफ असणं आवश्यक आहे. सुरुवातीला एक बाटलीत गोळा करून मग दुस-या बाटलीत गोळा करू नये. एकाच बाटलीत ते गोळा करावं. लॅबमध्ये एक ते दोन तासांच्या आत पोहोचतं करावं. रक्त चाचणीसाठी घ्यायची काळजी सीबीसी, ईएसआर, व्हीडीआरएल, एलएफटी, केएफटी इ.साठी न खाण्याची गरज नाही. एक कप चहा, कॉफी, दूध तसंच हलकीशी न्याहारी घेतली तरीही चालते. मात्र व्यायाम किंवा गरम पाण्याने आंघोळ करणं टाळावं. रक्त चाचणीसाठी साधारणत: सकाळी ८ ते १० या वेळेत जावं. मलेरियाच्या चाचणीसाठी ताप असतानाच रक्ताचा नमुना देणं आवश्यक आहे. लिपिड प्रोफाइल, कोलेस्टेरॉल, एचडीएल, एलडीएल, ट्रायग्लिसराइड्स साधारणत: दोन दिवस आधीपासून डाएट करणं आवश्यक आहे. रात्री उशिरापर्यंत होणा-या पाटर्य़ा टाळाव्यात. तसंच अल्कोहोल किंवा हेवी फॅटी खाणं टाळावं. चाचणीच्या एक दिवस आधी चहा, कॉफी किंवा दूध घेऊ नये. तसंच दहा ते बारा तास आधी न्याहारी किंवा पदार्थ खाणं टाळावं. औषधं दिली असतील ती घेणं शक्यतो टाळावंच. पाणी प्यायलेलं चालतं. तसंच अतिरिक्त व्यायाम आणि गरम पाण्याची आंघोळ करणं टाळावं, तसंच धूम्रपान किंवा पान खाणंही टाळावं. लॅबमध्ये सकाळी ८ ते १० यावेळेत पोहोचावं. कोलेस्टेरॉलसाठी उपास करणं गरजेचं नाही. ब्लड शुगर फास्टिंग आणि पीपी डायबिटीस नसल्यास दोन दिवस आधी डाएट करणं आवश्यक आहे. यातही रात्री उशिरापर्यंत जागणं, अल्कोहोल घेणं, हेवी जंक फूड खाणं टाळावं. आठ तास आधी चहा, कॉफी, दूध, न्याहारी किंवा अन्न सेवन करू नये. कोणत्याही प्रकारचं औषध घेणंही टाळावं. पाणी प्यावं. धूम्रपान किंवा पान सेवन करू नये. लॅबमध्ये सकाळी ८ ते १० या वेळेत पोहोचावे. ब्लड शुगर पीपीसाठी हलका नव्हे तर पूर्ण आहार घेणं आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारचं सरबत घेऊ नये. जेवण संपल्याची वेळ नोंद करून ठेवावी. समजा दहा वाजता तुम्ही पूर्ण आहार घेतलात तर बारा वाजण्यापूर्वी म्हणजे दोन तास पूर्ण होण्यापूर्वी पंधरा मिनिटं आदी लॅबमध्ये पोहोचणं आवश्यक आहे. डायबिटीस असल्यास किमान ६ ते ८ तास लंघन करावं. सकाळी ८ ते १० या वेळेत लॅबमध्ये पोहोचावं. पीपीसाठी जाताना तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेल्या तुमच्या नियमित गोष्टी उदाहरणार्थ औषधं, न्याहारी त्या वेळेतच घ्याव्यात. अतिरिक्त गोड खाऊ नये. धूम्रपान किंवा पान सेवन करू नये. पूर्ण आहार घ्यावा. त्याची वेळ नोंद करून ठेवावी. त्या वेळेनुसार दोन तास होण्याअगोदर किमान पंधरा मिनिटं लॅबमध्ये पोहोचणं आवश्यक आहे. औषधाची पातळी आणि प्रोथ्रोम्बिन वेळ तपासण्यासाठी रक्तचाचणी यासाठी घेण्यात येणारी काळजी आणि वेळ तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसारच पाळावी. शक्यतो जेवणाची, औषधाची आणि रक्त देण्याची वेळ पाळावी. एफनॅक, बोन मॅरो योग्य ती वेळ निश्चित करा. लाईट फूड खाणं आवश्यक आहे. वॅक्सिंग करणं आवश्यक आहे. तसंच ब्लड टेस्ट, सोनोग्राफी, स्कॅन, एक्स-रे आदी गोष्टींचे रिपोर्ट सोबत घेऊन जावेत. कोणालातरी बरोबर घेऊन जावं. पॅप स्मिअर मासिक पाळीदरम्यान ही चाचणी करू नये. मासिक पाळीनंतर साधारण पंधरा दिवसांनी करावी. काही औषधं सुरू असल्यास वेळ जाऊ द्यावा. ठरावीक वेळ घेऊनच लॅबमध्ये जावं. सर्व प्रकारचे रिपोर्ट्स जवळ बाळगावेत. | Read More » थंडगार ताडगोळा | पाल्म किंवा ताडाच्या झाडाला येणारं फळ म्हणजे ताडगोळा हे होय. याचं शास्त्रीय नाव बोरासस फ्लॅबिलिफर असं आहे. हे फळ महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. समुद्रकिनारी प्रामुख्याने लागवड होते. पाल्म किंवा ताडाच्या झाडाला येणारं फळ म्हणजे ताडगोळा हे होय. याचं शास्त्रीय नाव बोरासस फ्लॅबिलिफर असं आहे. हे फळ महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. समुद्रकिनारी प्रामुख्याने लागवड होते. बंगालमध्ये 'ताल', तेलगूमध्ये 'ताती मुंजलू', तामिळमध्ये 'नुन्गू', इंग्रजीमध्ये 'आइस अॅपल' तर हिंदीमध्ये 'तारी' या नावाने ओळखलं जातं. या झाडाची पानं सदाबहार हिरवीगार आणि आकाराने मोठी असतात. ताडगोळे हे अतिशय मऊ, रसदार असून त्यावर जाड साल असते. ही साल काढणं म्हणजे कंटाळवाणं काम असतं. सालीचा रंग पिवळसर केशरी असून आतील गराचा रंग करडा किंवा पांढरा असतो. चवीला गोड असून प्रकृतीने थंड असणारं हे फळ आहे. पाणीदार फळ असून ते कापायची गरज भासत नाही. या फळाची प्रवृत्ती थंड असून हे फळ उन्हाळ्यात खाणं आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहे. यात खनिज, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस आणि ए, बी, सी या जीवनसत्त्वांचा भरपूर साठा आहे. त्यामुळे एकंदरीतच शरीराला अतिशय उपयुक्त ठरतं. अशा या फळाचे उपयोग पुढीलप्रमाणे » यात भरपूर प्रमाणात पोटॅशिअम आणि फायबरचा साठा असतो. » हे फळ तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्याचं काम करतं, त्याचबरोबर शरीराचं तापमान नियंत्रित राहतं. » उन्हाळ्याच्या दिवसांत या फळाचे आवर्जून सेवन करावे. उष्णतेमुळे होणारी पोटातली जळजळ कमी होण्यास मदत होते. » उन्हामुळे लहान मुलांना किंवा मोठय़ा माणसांनाही त्वचेवर पुरळ किंवा अॅलर्जी होते. ताडगोळ्यांचा गर पुरळ आलेल्या ठिकाणी लावल्यास लवकर आराम पडतो. » उन्हाळ्याच्या दिवसांत हे फळ आवर्जून खावं, कारण या दिवसांत काही जणांना उन्हाळे लागतात, ही जळजळ कमी होते. » हे फळ या दिवसांत फ्रीजमध्ये साठवून ठेवावं. बाहेर ठेवल्यास हे लवकर खराब होतं. त्यामुळे त्याची साल न काढता फ्रीजमध्ये साठवून ठेवल्यास दीर्घकाळ टिकतं. सुट्टीच्या दिवसांत मुलं अधिक वेळ घराबाहेर असतात, अशा वेळी त्यांना हे फळ खाऊन मगच बाहेर पडायला सांगावं. » ताडगोळ्याचा फेसपॅकही अतिशय उत्तम आहे. चंदनाची साल उगाळून घ्यावी. त्यात थोडं नारळपाणी आणि ताजा ताडगोळा कुस्करून घालावा. याची चांगली पेस्ट तयार करून ती चेह-याला लावावी. फ्रेश वाटतं आणि उन्हामुळे रापलेली त्वचा उजळते. » किडणीच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असून शरीराला नको असलेली द्रव्यं याच्या सेवनाने बाहेर फेकली जातात. » याच्या सेवनाने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. » कांजण्या आलेल्या रुग्णांनी हे फळ खावं म्हणजे कांजण्यांमुळे अंगाला येणारी खाज कमी होते. » शरीरातील साखरेची पातळी संतुलित राहते. » याचं सेवन केल्यावर अधिक भूक लागत नाही, त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. | Read More » त्रास टॉन्सिल्सचा | टॉन्सिल्समुळे घशाला सूज येणे, घसा दुखणे किंवा कान दुखणे असे विकार झाल्याचं कित्येकदा ऐकलं आहे. यामागे कित्येकदा टॉन्सिल्स स्टोन हे कारण असतं. शरीरासाठी उपयुक्त असलेले हे टॉन्सिल्स शरीरासाठी मात्र त्रासदायक ठरतात. हे टॉन्सिल्स स्टोन म्हणजे काय, त्याचा त्रास कमी कसा करायचा हे जाणून घेऊ या. मनुष्याच्या शरीरात दगड किंवा स्टोन्स कुठे सापडतात असा कोणी आपल्याला प्रश्न विचारला तर आपण पटकन उत्तर देऊ-किडणी. पण किडणी हे काही एकमेव ठिकाण नाही. दुसरं ठिकाण कळलं तर तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. कारण दगड सापडणारं किडणीनंतरचं दुसरं ठिकाण म्हणजे टॉन्सिल्स हे होय. जिथे आपल्याला कडक आणि कधीकधी अतिशय दुखणारे, त्रास देणारे स्टोन्स दिसतात किंवा ते तोंडावाटे बाहेर पडतात. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटत असेल ना, पण हे खरं आहे. किडणीप्रमाणेच टॉन्सिलमध्येदेखील छोटे छोटे दगड निर्माण होतात त्यांना 'टॉन्सिल्स स्टोन' असं म्हणतात. मुळात टॉन्सिल्स म्हणजे काय आणि त्यात हे स्टोन कशामुळे होतात, त्याची कारणं, लक्षणं काय आहेत हे जाणून घेऊ या. टॉन्सिल्स म्हणजे काय? टॉन्सिल या एक प्रकारच्या ग्रंथी असून त्यांची रचना ही घशाच्या मागच्या बाजूला असते. घशाच्या दोन्ही बाजूला या ग्रंथी असतात. टॉन्सिल हा अशा उतींनी बनलेला भाग आहे ज्या उतींमध्ये लिम्फोसाइट्स नावाचं द्रव्य असतं. या पेशी शरीराला कोणत्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घेतात. असं म्हटलं जातं की, टॉन्सिल्स शरीराची प्रतिकात्मक शक्तीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. तसंच घशाजवळून येणा-या जीवाणू आणि विषाणूंच्या कणांपासून बचाव करण्याचं काम या ग्रंथी करतात. असं असलं तरी कित्येक तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, या टॉन्सिल्स नामक ग्रंथी त्यांचं कार्य नीट पार पाडत नाहीत. कारण त्यांची मदत होण्यापेक्षा त्यांच्यामुळे त्रास किंवा अडथळा निर्माण झालेली अनेक उदाहरणं सांगता येतील. खरं म्हणजे हे टॉन्सिल शरीराच्या अशा भागात असतात जिथे अनेक जंतू वास करतात. वास्तविक पाहता टॉन्सिल काढून टाकलेली माणसं जगात कमी पाहायला मिळतात. या उलट जीवाणू आणि विषाणूंच्या उपद्रवामुळे टॉन्सिल्समुळे त्रास सहन करणारी अनेक मंडळी पाहायला मिळतील. अशा या टॉन्सिल्समध्ये स्टोन होण्याची शक्यता अधिक असते. हे स्टोन्स का होतात, याची कारणं काय आहेत हे समजून घेऊयात. कारणं सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगायचं झालं तर असं सांगता येईल की, हे टॉन्सिल्स एक तर कोप-यात असतात आणि त्यावर भेगा किंवा लहान लहान फटी असतात. जिथे जीवाणू जाऊन बसतात, तसंच आपण खात असलेल्या काही पदार्थाचे लहान कण, मृत पेशी, ष्मल भाग असं काहीही जाऊन बसण्याची शक्यता अधिक असते. अशा कित्येक गोष्टी त्या फटींमध्ये जातात आणि त्या पदार्थाचा त्या फटींमध्ये ढीग जमा होतो आणि शेवटी त्या सगळ्याचा मिळून घट्ट असा पांढरा थर निर्माण होतो. हा थर कडक झाल्यावर यालाच 'टॉन्सिल्स स्टोन्स' किंवा 'टॉन्सिलोलित्थस' असं म्हणतात. साधारणपणे ज्यांचे टॉन्सिल्स खूप वर्षापासून सुजतात, त्यांच्या टॉन्सिल्समध्ये हा प्रकार प्रामुख्याने दिसून येतो. कधीकधी कित्येक लोकांच्या टॉन्सिल्समध्ये हे टॉन्सिलोलित्थस अतिशय लहान स्वरूपात असतात आणि त्याची हळूहळू वाढ होत राहते. मोठा आणि कडक दगड तयार झाला आहे, असं मात्र क्वचितच ऐकायला मिळतं. लक्षणं अगदीच लहानातला लहान म्हणजे सूक्ष्म दगड झाला असेल तरी कोणतीही लक्षात येण्याजोगी लक्षणं आढळत नाहीत. इतकंच नाही तर ते मोठे असतील तरीही हे स्टोन्स एक्स रे किंवा सीटी स्कॅन केल्याशिवाय दिसत नाहीत. असं असलं तरीही काही लक्षणं आढळतात ती पुढीलप्रमाणे - » श्वासाची दरुगधी टॉन्सिल्समध्ये दगड होण्याचं मुख्य कारण म्हणजे तोंडाला दरुगधी येणे हे होय. या टॉन्सिल्समध्ये काही सल्फर संयुगं निर्माण होतात जी श्वासाच्या दरुगधीला कारणीभूत ठरतात. तर काही तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की तुमच्या श्वासाला दरुगधी येत असेल तर तुम्हाला या आजाराला समोरं जावं लागतं. » घसादुखी टॉन्सिल्स स्टोन आणि टॉन्सिलायटिस हे दोन्ही प्रकार एकत्र होतात. तेव्हा तुमचा घसा संसर्गामुळे दुखतोय की स्टोनमुळे दुखतोय हे समजणं अवघड होतं. कारण टॉन्सिल्स स्टोनमुळे तुमचा घसा दुखतो किंवा जिथे तो दगड असेल त्या भागात एक प्रकारची अस्वस्थता जाणवते. कधीकधी टोचल्यासारखं होत राहतं. » पांढरा कचरा काही टॉन्सिल हे घशाच्या मागच्या बाजूला असूनही स्पष्टपणे दिसतात. कधीकधी आवंढा गिळताना आपल्याला घशात कडक गोळा लागतो. तो पांढ-या रंगाचा असतो. असं प्रत्येक रुग्णामध्ये दिसतंच असं नाही. कित्येकदा ते टॉन्सिल्सच्या घडीवर किंवा खाचांवर आढळतात. अशा वेळी ते केवळ सीटी स्कॅन किंवा आक्रमक स्कॅनिंग तंत्राच्या मदतीने शोधू शकतात. » घसा अतिशय सुजणे टॉन्सिल्स स्टोनची जागा आणि आकार लक्षात घेता ते सुजतात. त्यामुळे कधीकधी काही पदार्थ किंवा द्रव पदार्थ सेवन करणंही कठीण होतं. » कानदुखी टॉन्सिल्स स्टोन टॉन्सिल्सच्या कुठच्याही भागात निर्माण होतात. मात्र कानाचा आणि घशाचा सामायिक मार्ग असल्यामुळे कित्येकदा कानदुखी होऊ शकते. मग तो दगड कानाला स्पर्श करत नसला तरीही कान दुखू शकतो. » टॉन्सिल्स सुजणे जमा झालेला कचरा कठीण किंवा कडक होतो आणि त्याचं रूपांतर टॉन्सिल्स स्टोन्समध्ये होतं तेव्हा संसर्ग झाल्यामुळे टॉन्सिल्सना सूज येते. मुळातच टॉन्सिल्स स्टोन झाले की ते टॉन्सिल्स सुजायला कारणीभूत ठरतात. काळजी कशी घ्यावी? या टॉन्सिलोलित्थसचा आकार केवढा आहे आणि त्याची तीव्रता किती आहे यावर याचे उपचार कसे करावेत हे अवलंबून असतं. मात्र पुढील काही पर्यायांचा विचार करता येईल. » कोणतेही उपचार नाही ज्यांना टॉन्सिल्स स्टोन्सची लक्षणं दिसत नाहीत त्यांना कोणत्याही प्रकारचे खास उपचार उपलब्ध नाहीत. » घरच्या घरी कसे काढाल? काही लोक घरच्या घरी हे स्टोन्स काडीने किंवा अन्य कापडाच्या बोळ्याने पुसून किंवा कोरून काढण्याचा प्रयत्न करतात. » गुळण्या करा कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्यास टॉन्सिलिटिसमुळे होणारी अस्वस्थता कमी होते. तसंच टॉन्सिल्स स्टोन्सची तीव्रताही कमी होते. » अँटिबायोटिक्स टॉन्सिल्स स्टोन्सवर कित्येक प्रकारची औषधं आहेत. काही जणांना या अँटिबायोटिक्सचा उपयोग होतो, मात्र ज्यामुळे टॉन्सिलोलित्थस होतात त्याचं मूळ कारण नष्ट होत नाही. तसंच अँटिबायोटिक्सचे काही साईड इफेक्ट्सही आहेत. » ऑपरेशन टॉन्सिल्स स्टोन्स आकाराने खूप मोठे असतात आणि त्यांची लक्षणंही दिसतात तेव्हा ते ऑपरेशन करून काढण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो. काही वेळा डॉक्टर अतिशय सोप्या पद्धतीने ते काढण्याचा प्रयत्न करतात. जेणेकरून रुग्णाला गुंगी(अॅनेस्थेशिया)ही देण्याची गरज भासत नाही. हे स्टोन्स होऊच नयेत म्हणून काय काळजी घ्यावी? ज्यांना टॉन्सिल्सचा अतिशय जुना आजार आहे त्यांनाच हे टॉन्सिल्स स्टोन होण्याची शक्यता अधिक असते. हे स्टोन्स होऊच नयेत म्हणून ऑपरेशनशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. या प्रक्रियेला 'टॉन्सिल एक्टोमी' असं म्हणतात. टॉन्सिलच्या पेशींचं उच्चाटन केलं जातं. जेणेकरून टॉन्सिलोलित्थस होण्याची शक्यताच धूसर होते. टॉन्सिल स्टोन्स उपटण्याचा यापेक्षा दुसरा मार्ग म्हणजे टॉन्सिलेक्टोमाइज असून तो केवळ अॅनास्थेशिया देऊनच काढला जातो, मात्र जे पेशंट ही शस्त्रक्रिया करून घेतात त्यांचा काही दिवसांसाठी घसा दुखतो किंवा त्याला सूज येते. | Read More » काळी मैना | करवंद किंवा काळी मैना म्हणून मिळणारं फळ आपल्या चांगलंच परिचयाचं आहे. सध्या बाजारात ते मोठया प्रमाणावर दिसून येतं. करवंदाचं शास्त्रीय नाव करिसा स्पिनरम असं आहे. करवंद किंवा काळी मैना म्हणून मिळणारं फळ आपल्या चांगलंच परिचयाचं आहे. सध्या बाजारात ते मोठया प्रमाणावर दिसून येतं. करवंदाचं शास्त्रीय नाव करिसा स्पिनरम असं आहे. करवंदाच्या झाडाची लागवड उष्ण प्रदेशीय देशात म्हणजे आफ्रिका, साऊथ आशिया आणि भारतीय समुद्रालगतच्या विविध बेटांवर चांगल्या प्रकारे होते. या झाडाची वाढ सागरी क्षेत्रामध्ये अगदी समुद्रकिना-यावर आढळते. करवंदाचं झाड हे घनदाट असून त्याला काटे असतात. झाडाला चिक असतो. हे फळ कच्चं असताना हिरव्या रंगाचं तर पिकल्यावर काळ्या रंगाचं होतं. फळ अतिशय लहान आकाराचं असून त्याची चव आंबट गोड असते. आतील गर लाल किंवा पांढरा असतो. म्हणून हे फळ खाताना कोंबडा की कोंबडी असं म्हणत खाल्ले जाते. चावा घेतल्यावर आत पांढरा असेल तर कोंबडा आणि लाल असेल तर कोंबडी असं म्हणतात. अशा या फळाचे आरोग्याच्या दृष्टीने फायदे बघू या. » शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते. » रक्तात असलेलं अशुद्ध द्रव्य नष्ट करून रक्त शुद्ध करण्याचा प्रयत्न करते. » रोगप्रतिकारशक्ती वाढवते. » पोटदुखी तसंच पोटाच्या प्रत्येक विकारावर या फळाचे सेवन केल्यास आराम पडतो. » केवळ फळच नव्हे तर याच्या पानाचा उपयोग ताप आणि डायरिया यांसारख्या आजारांवर अतिशय गुणकारी आहे. » त्वचेच्या उपचाराच्या संदर्भात याचा वापर केला जातो. | Read More » घरगुती क्लिनर ठरू शकतात घातक | घरात फरशी पुसण्यासाठी किंवा साफसफाई करण्यासाठी आपण फिनेल आणि अन्य काही द्रव पदार्थाचा वापर करतो. मात्र हे क्लिनर कधीकधी जीवघेणेही ठरू शकतात. तुम्ही स्वत:ला वा तुमच्या कुटुंबाला किटाणूंपासून दूर ठेवण्याकरिता तसेच घराला र्निजतुक ठेवण्यासाठी सामान्य घरगुती क्लिनर वापरत असाल तर ते आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतं हे तुम्हाला माहीत आहे का? वैद्यकीय तज्ज्ञ फिनाईल क्लिनर वापरण्याबद्दल चिंता व्यक्त करत असून ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याचं सांगत आहेत. फिनाईल क्लिनर फरशी पुसण्यासाठी, प्रसाधनगृह आणि स्वयंपाकघर स्वच्छ करण्यासाठी वापरलं जातं. त्यामध्ये फेनॉल्स (काबरेलिक आम्ल) नावाचा रासायनिक घटक असतो. हे क्षयकारी पदार्थ रक्ताभिसरण संस्थेसाठी तसेच चेतासंस्था, हृदय, फुप्फुस, यकृत, किडनी आणि रक्तवाहिन्या यांसाठी विषारी असतात. हे फेनॉल्स त्वचा किंवा डोळे तसेच गिळण्यामधून किंवा श्वसनामाग्रे शरीरात गेल्यास विषारी ठरू शकतात. एकंदर आकडेवारीचा विचार केल्यास भारतामध्ये पचनमार्गाचे रासायनिक ज्वलन होऊन आणि आंतरिक रक्तस्रव होऊन बरेच लोक मृत्युमुखी पडणा-यांची संख्या अधिक आहे. फिनाईलचा संपर्क आलेल्या प्रत्येक अवयवासाठी ते घातक ठरू शकतात. फिनाईल शरीरात गेल्यास जठरात हानी होऊन मृत्यूसुद्धा होऊ शकतो. फिनाईलची बाटली उघडल्यानंतर डोळ्यात जाणा-या वाफेमधून फिनाईल डोळ्यात गेल्यास ज्वलन होऊन रक्तस्रव होऊ शकतो व डोळ्यांना इजा होऊ शकते. फिनाईल श्वासाद्वारे आत गेल्यास नाक, घसा आणि फुप्फुसांच्या अस्तराचे ज्वलन होऊ शकते आणि त्वचेला संद्रित फिनाईल स्पर्श झाल्यास ज्वलन, खाज, सूज, पुरळ येणे यांसारखे दुष्परिणाम होऊ शकतात. फिनाईलचा जास्त काळ संपर्क आल्यास हृदयाचे आजारसुद्धा होऊ शकतात. फेनॉल्सची अतिसंवेदनशीलता असणा-या व्यक्ती काही काळासाठी जरी याच्या संपर्कात आल्यास मृत्यू किंवा गंभीर दुष्परिणामांना त्यांना सामोरे जाऊ लागू शकते असे तज्ज्ञांचे मत आहे. फिनाईल प्रौढांसाठी जसं हानिकारक आहे तसेच ते लहान मुलांसाठी हानिकारक आहे. चुकून ते शरीरात गेल्यास उलटी होते आणि गंभीर आजार होतात. यावर त्वरित योग्य पद्धतीने उपचार न केल्यास ते मानवी शरीरामध्ये त्वचा, फुप्फुस आणि पोटामधून शोषले जाते आणि अवयव आणि रक्तप्रवाहामध्ये विषाक्तता पसरवते. फिनाईलचा अप्रत्यक्ष धोकासुद्धा आहे, तज्ज्ञांच्या मते, सामान्यपणे उपलब्ध असलेले फिनाईल अॅक्टिवएजंट (र्निजतुक) म्हणून कमी पडून हानिकारक जीवाणू, बुरशी, व्हायरस आणि पॅरासाईट तसेच राहतात, ज्यांपैकी काही कठीण पृष्ठभागावर काही काळासाठी तसेच राहिल्यामुळे घरातील व्यक्तींच्या आरोग्यास घातक ठरू शकतात. अस्वच्छ स्थितीही आजारांसाठी कारणीभूत असते आणि अस्वच्छ पाणी मृत्यूसाठी जबाबदार असते. फिनाईलचा धोका लक्षात घेता, त्याचा योग्य आणि सुरक्षित वापर करण्यास आणि त्याची साठवणूक करण्यास कडक पद्धतीने सुरक्षितता पाळण्याचे सुचविले जाते. काहीही वाईट घडणे टाळण्यासाठी फिनाईल त्याच्याच मूळ डब्यात साठवावे असेसुद्धा सुचवले जाते. ज्या भांडय़ांचा पुन्हा खाण्याच्या पदार्थासाठी वापर होऊ शकतो अशा ठिकाणी फिनाईल ठेवू नका उदा. कोल्ड िड्रकची बाटली हे मुले व प्रौढांमध्ये फिनाईलचे अंतर्वहन होण्याचे सामान्य कारण आहे. वापर झाल्यानंतर, क्लिनरला मुलांचा हात लागणार नाही अशा उंच ठिकाणी आणि दृष्टी पलीकडे ठेवायला हवे. घर स्वच्छ करताना, घरातील व्यक्तीनेही काळजी घ्यायला हवी की फिनाईलची बाटली किंवा पाण्याची भरलेली अर्धी फिनाईल असलेली बाटली पाळीव प्राणी किंवा मुले यांनी पेय पिण्यासाठी वापरू नये. प्रत्येक वर्षी फिनाईल विषबाधा झाल्याची हजारो उदाहरणे भारतामध्ये घडत आहेत. त्यापैकी बरीच उदाहरणे जीवघेणीसुद्धा असतात. त्यामुळे फिनाईलचा वापर करताना आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. | Read More » ऑस्टिओपोरोसिस नेमका कशामुळे? | ऑस्टिओपोरोसिस हा तसा सर्वसामान्यपणे कोणालाही होणारा आजार आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे कित्येक जणांना या आजाराला सामोरं जावं लागतं. हा आजार अचानक उद्भवतो. यात हाडांची घनता कमी होते, हाडं ठिसूळ होतात आणि परिणामी लहानसं फ्रॅक्चरही होऊ शकतं. अगदी लहानशा मुरगळण्यामुळे किंवा जड वस्तू उचलल्यामुळेदेखील हे फ्रॅक्चर होऊ शकतं. पन्नाशी उलटलेल्या संजीवनीताई घराबाहेर फिरायला गेल्या असताना त्यांचा पाय मुरगळला. दोन दिवस घरगुती उपचार करून बघितले तरीही काहीही फरक पडत नव्हता. शेवटी डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांच्या पायाला लहानसं फ्रॅक्चर झाल्याचं निदान झालं. त्या ऑस्टिओपोरोसिसचा शिकार झाल्या होत्या. मात्र त्यांना यापूर्वी कधीही संधिवाताचा त्रास झाला नव्हता. डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे त्या अधिकच बुचकळ्यात पडल्या. आपण आपल्या आसपास कित्येकदा अशा घटना घडलेल्या पाहतो. असे आजार ऐकतो ज्यांची कधीही पूर्वसूचना मिळत नाही. ऑस्टिओपोरोसिस हा त्या आजारांपैकीच एक आजार आहे. ऑस्टिओपोरोसिस हा एक असा आजार आहे जो हाडांना कमजोर करतो. जेणेकरून अतिशय तीव्र वेदना होतात आणि यात कधी कधी लहानसं फ्रॅक्चरही होऊ शकतं. थोडक्यात ऑस्टिओपोरोसिस हा आजार लहानशा फ्रॅक्रशी संबंधित आहे. हा आजार कित्येक वर्ष आपल्या शरीरात लपून बसलेला असतो. मात्र अचानक तो डोकं वर काढतो. अगदी लहानशा मुरगळण्यामुळे किंवा जड वस्तू उचलल्यामुळेदेखील हे फ्रॅक्चर उद्भवू शकतं. तसं पाहायला गेलं तर हा तसा सर्वसामान्य आजार आहे. आकडेवारी पाहिली असता असं लक्षात येतं की भारतात जवळपास ६० दशलक्ष लोकांना हा आजार झालेला दिसतो. पैकी महिलांमध्ये या आजाराचं प्रमाण अधिक आढळतं. कारण महिलांना ५० वर्षानंतर किंवा रजोनिवृत्तीनंतर हा त्रास उद्भवण्याचा धोका अधिक असतो. तीनपैकी एका महिलेला आणि आठपैकी एक पुरुषाला हा आजार झालेला दिसून येतो. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे नक्कीकाय? आपली हाडं गतिमान उतींनी बनलेली असतात. या आजारात त्या उतींचं प्रमाण सातत्याने कमी होत जातं. बालवयातच आपल्या हाडांची वाढ होते. तर तरुण पणात ही हाडांची घनता वाढून ती कणखर बनतात. आपण योग्य ती काळजी न घेतल्यास वयाच्या तिशीनंतर हळूहळू प्रामुख्याने महिलांमध्ये हाडांची घनता कमी होण्याचं प्रमाण अधिक आढळतं. परिणामी फ्रॅक्चरदेखील होऊ शकतं. थोडक्यात ऑस्टिओपोरोसिस या आजारात अस्थींमधील खनिज घनत्व कमी होत जातं, अस्थी किंवा हाडं ठिसूळ होतात. तसंच त्यात असंग्रहीत प्रोटीनचं प्रमाण वाढतं आणि रुग्णांना विविध गोष्टींना समोरं जावं लागतं. ऑस्टिओपोरोसिस झाला आहे हे कसं समजावं » बोन डेन्सिटोमेट्री चाचणी » ज्या ठिकाणी दुखापत झाली आहे असा भाग उदाहरणार्थ मणका किंवा पार्श्वभागाचा एक्सरे » सिरम कॅल्शिअम, व्हिटॅमिन डी, तसंच टी३, टी४ टीएसएच, एस इस्ट्रोजन, टेस्टोटेरॉन यांसारख्या काही रक्तचाचण्यांद्वारेदेखील हा आजार झाल्याचं कळू शकतं. कारणं आणि काळजी » शारीरिक हालचालींचा अभाव कित्येक मंडळी तासन् तास टीव्हीसमोर बसून राहतात तर काही मंडळींना नोकरीच्या ठिकाणी कित्येक तास एकाच जागी बसून राहावं लागतं. अशा लोकांच्या शरीराची हालचाल काहीशी कमी होते. परिणामी त्यांचा वजन वाढण्याकडे कल अधिक दिसून येतो. थोडक्यात अशी मंडळी काऊच पोटॅटो जीवनशैलीचा शिकार होतात. अशा मंडळींमध्ये ऑस्टिओपोरोसिस होण्याचा धोका अधिक असतो. काळजी » शक्य होईल तेव्हा आपल्याला ठरावीक व्यायाम करणं आवश्यक आहे. » शक्य असल्यास अधिकाधिक चालण्याचा प्रयत्न करावा. पायऱ्यांचा वापर केल्यास अधिक उत्तम. » वेट लिफ्टिंग किंवा वजन उचलणे यासारखे व्यायाम करण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून अस्थी घनतेमध्ये वाढ होईल. चुकीची आहारपद्धती आपल्याकडे सध्या जंक फूडला अधिक प्राधान्य दिलं जातं. भूक लागल्यावर पिझ्झा, बर्गर, समोसा, वडा असे पदार्थ खाल्ले जातात. मात्र हे पदार्थ आपल्या शरीरासाठी अयोग्य आहेत. वास्तविक आपल्या शरीराला ठरावीक कॅल्शिअमची नियमित गरज असते. महिलांच्या शरीराला १०० मिलिग्रॅम कॅल्शिअमची दिवसाला गरज असते. मात्र आपल्याकडच्या चुकीच्या आहारपद्धतीमुळे ती केवळ ३०० ते ५०० मिलिग्रॅम इतकीच मिळते. ही कमतरता भरून काढण्यासाठी दररोज दीड कप दूध किंवा दही यांचा आहारात समावेश करावा. » याशिवाय चीझ, नाचणी, चणे, बदाम, तीळ, मेथीचे दाणे, पालक, सलाड, कोरांटी आणि मासे अशा पदार्थाचा आहारात समावेश करावा. ताज्या फळांचे ज्यूस प्यायल्यानेदेखील कॅल्शिअमची कमतरता भरून काढण्यास मदत होते. हे शक्य नसेल तर कॅल्शिअम वाढीसाठी काही औषधं घ्या. जीवनसत्त्व डीची कमतरता जीवनसत्त्व डीमुळे कॅल्शिअमची वाढ होण्यासाठी प्रोत्साहन मिळत आणि नवीन हाडांच्या निर्मितीसाठी मदतही करते. काळजी » सकाळच्या कोवळ्या उन्हात सूर्यप्रकाशात उभे राहावं. » दररोज सकाळी लवकरात लवकर किंवा संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी किमान पंधरा ते वीस मिनिटं अवश्य चालावं. » अल्कोहोल मिश्रित द्रवपदार्थाचं सेवन, धूम्रपान, शीतपेय या गोष्टी आवर्जून टाळाव्यात. औषधं » दमा, संधीवात किंवा इतर तीव्र आजारांसाठी स्टेरॉइडयुक्त उपचारपद्धती अवलंबवावी. » रक्तातील कॅल्शियमची पातळीचं नियमन करणारे आणि थायरॉइड ग्रंथीत तयार झालेले संप्रेरक द्रव्य, व्हिटॅमिन डी आणि कॅल्शिअम पुरकं रुग्णांना द्यावीत. » ऑस्टिओपोरोसिसपासून बचाव करण्यासाठी इस्ट्रोजन प्रतिस्थापन उपचार केला जातो. मात्र या उपचारामुळे हृदयविकार किंवा डेम्नेशियासारखे आजार होण्याची शक्यता असते. म्हणूनच कित्येकदा डॉक्टर कमी तीव्रतेचं औषध केवळ तीन ते पाच वर्षासाठी देतात. | Read More » सकस न्याहारी का महत्त्वाची? | बारा किंवा त्यापेक्षा जास्त तास उपाशी राहिल्यास, आपल्या शरीराला पोषणाची आवश्यकता भासते. उठल्यानंतर तुमच्या मेंदूला त्याचं काम करण्यासाठी ग्लुकोजची आवश्यकता असते. कारण त्याची ऊर्जा कमी होते. न्याहारी तुमचा ग्लुकोजचा स्तर राखतो आणि तुमच्या चायापचयाला कृतीमध्ये परत आणतो. अनेकदा असं म्हटलं जातं की, न्याहारी ही दिवसभराचं महत्त्वाचं जेवण असते. रात्रभर सुप्त राहून आणि बारा किंवा त्यापेक्षा जास्त तास उपाशी राहिल्यास, आपल्या शरीराला पोषणाची आवश्यकता भासते. उठल्यानंतर तुमच्या मेंदूला त्याचं काम करण्यासाठी ग्लुकोजची आवश्यकता असते व त्याची ऊर्जा कमी होते. न्याहारी तुमचा ग्लुकोजचा स्तर राखतो आणि तुमच्या चायापचयाला कृतीमध्ये परत आणतो. सकाळी खाण्यामुळे केवळ भूक भागवण्यापेक्षा फार जास्त लाभ प्राप्त होतात. त्यामुळे एकाग्रता आणि स्मृती वाढते आणि ती तुमच्या पोटासाठीसुद्धा चांगली असते. जे लोक नियमितपणे त्यांची न्याहारी थांबवतात (आणि ज्यांना नंतर भूक लागल्याने पूर्ण दिवस अति खातात) त्यांपेक्षा जे लोक नियमितपणे न्याहारी घेतात ते त्यांचे वजन कमी करू शकतात. याव्यतिरिक्त उच्च रक्तदाब, हृदयाचा आजार आणि मधुमेह यांसारखे आजार असतात त्यांनासुद्धा न्याहारीची सवय उत्तम ठरते. पोषणतज्ज्ञ असा सल्ला देतात की, उठल्यानंतर दोन तासांच्या आत न्याहारी केल्याने त्यावर बरंच काही अवलंबून असतं. दिवसाच्या पहिल्या जेवणामध्ये कॅल्शिअम, लोह, प्रोटिन, फायबर आणि जीवनसत्त्व 'ब'आवश्यक असतं. दुर्दैवाने भारतामध्ये सामान्यपणे खाल्ले जाणारे न्याहारीचे पदार्थ उत्तम आरोग्यासाठी बनलेले नसतात. अति साखर, लोणी, तूप आणि तेल यांनी ते पदार्थ बनलेले असतात. चरबीयुक्त, तैलीय अन्नपदार्थामध्ये सॅच्युरेटेड फॅटची संख्या फार जास्त असते. जी आरोग्यासाठी चांगली नसते, त्यामध्ये कॅलरी व डाएटरी फॅट्ससुद्धा जास्त असतात. ज्यामुळे लठ्ठपणा आणि बॅड कोलेस्टेरॉल (एलडीएल)ची संख्यासुद्धा जास्त असते. हळुवार परंतु सतत फॅट जमा होणे आणि धमनीच्या भित्तीवर किटण लागणे, यांमुळे रक्तप्रवाहामध्ये अडथळे येतात आणि त्यामुळे हृदयाचा आघात होऊ शकतो. कोलेस्टेरॉलच्या जास्त प्रमाणामुळे पित्ताचा त्रास होतो व पित्ताचे खडे (गॉलस्टोन) होतात. तूप आणि लोणी : हे भारतीय न्याहारी पदार्थामधील प्रसिद्ध घटक आहेत, पूर्णपणे दुधापासून बनलेले असून सॅच्युरेटेड फॅटने संपन्न असतात. पुरी, लोणी लावून पराठा, व्हाईट ब्रेड, जास्त तेल घालून वरण इत्यादी पदार्थ नियमितपणे खाल्ल्यास शरीरामधील फॅटची संख्या वाढू शकते आणि त्यामुळे शरीरामधील एकूण कोलेस्टेरॉल आणि एलडीएल (बॅड) कोलेस्टेरॉलसुद्धा वाढू शकतं. चरबीयुक्त, मेदयुक्त आणि शर्करायुक्त पदार्थाचा प्रतिकारशक्तीवरही वाईट परिणाम होतो. ज्यामुळे सामान्य सर्दी ते कर्करोग यांसारखे आजार होतात. एकूणच आरोग्य राखण्यासाठी, तुम्हाला साखरेचं प्रमाण कमी करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी साखरेच्या पदार्थाची न्याहारी करण्याऐवजी फायबरची संख्या जास्त आणि साखरेचं प्रमाण कमी अशी न्याहारी करणं आवश्यक आहे. साखरेचं व्यसन असलेले लोक स्टेव्हिया किंवा सुक्रोलोजसारखे स्वीटनर वापरून साखरेचं प्रमाण कमी करू शकतात. हे मधुमेह, लठ्ठपणा आणि इतर आरोग्य तक्रारींसाठीदेखील उत्तम आहे. न्याहारी करताना काय टाळावे? » धान्य, फायबर, प्रोटिन आणि काबरेहायड्रेट संपन्न असलेले अन्नपदार्थ निवडा आणि साखर, सॅच्युरेटेड फॅटची संख्या कमी असू द्या. » तुमचा आहार बदलता असावा. एकच पदार्थ प्रत्येक दिवशी खाऊ नका. एकाच दिवशी वेगवेगळे पदार्थ खाल्ल्यानेसुद्धा बरंच काही होऊ शकतं. » काही सकस (निरोगी) न्याहारी पदार्थामध्ये आंबील, ओटमील, फ्रुट सलाड, संपूर्ण गव्हाचे ब्रेड, अन्न आणि फळांचे मिश्रण, मल्टिग्रेन डोसा, पोहे, उपमा, साऊथ इंडियन नाश्ता, सांभार, वरण, सोया, कोंब आलेले कडधान्य, भाजीपाल्याचे सँडवीच, कमी फॅट किंवा शून्य फॅट दूध आणि दही, बटरमिल्क, घरचे चीज, फळांचा ताजा रस, संपूर्ण तृणधान्य, केळ, टरबूज आणि सफरचंद यांसारखी फळं खावीत. » पेस्ट्रीज, साखर असलेले तृणधान्य, कॅनमधील फळांचे रस, ऑमलेट, तेलामध्ये तळलेले पराठे, बटर किंवा तूप, व्हाईट ब्रेड, व्हाईट राइस, फ्रेंच टोस्ट, तत्काळ होणारे नुडल्स, फॅटी मांस, दही आणि संपूर्ण दुधापासून बनलेले इतर पदार्थ यांसारखे पदार्थ खाऊ नयेत. » बटर आणि साखर यांऐवजी असलेल्या पदार्थाचा वापर करावा. उत्तम न्याहारी ही मुलं आणि किशोरवयीन यांच्यासाठीसुद्धा महत्त्वाची असते. जे सकाळी सकस अन्न खातात त्यांना जास्त ऊर्जा मिळते आणि ते जास्त प्रमाणात शारीरिक कृतींमध्ये सहभाग घेऊ शकतात. त्यामुळे लठ्ठपणा आणि जीवनशैलीचे आजार टळू शकतात. अशी मुलं शाळेत उत्तम प्रगती करू शकतात आणि ही मुलं फार स्वस्थ, उत्साहवर्धक व अभ्यासात हुशार असतात असं तज्ज्ञांचं मत आहे. प्रत्येकाने मग ते प्रौढ, तरुण किंवा लहान मुलं यांनी लक्षात घ्यावं. उत्तम दिनचय्रेसाठी व आपल्या आरोग्यासाठी सकाळी न्याहारी फार गरजेची आहे. | Read More » पाणीदार जाम | बाजारात दिसणाऱ्या फिकट पोपटी रंगांच्या जामचं शास्त्रीय नाव सेनेन्जिअम समरेंजेस असं आहे. या फळाचं झाड बारा मीटर उंच वाढत असून ते उष्णप्रदेशीय भागात अधिक प्रमाणात आढळतं. बाजारात दिसणाऱ्या फिकट पोपटी रंगांच्या जामचं शास्त्रीय नाव सेनेन्जिअम समरेंजेस असं आहे. या फळाचं झाड बारा मीटर उंच वाढत असून ते उष्णप्रदेशीय भागात अधिक प्रमाणात आढळतं. अंदमान आणि निकोबार बेटावर हे प्रामुख्याने आढळतं. या फळाच्या फुलांना चारच पाकळ्या आणि असंख्या पुंकेसर असतात. या फळाचा रंग पांढरा, हिरवा किंवा फिकट गुलाबीही असून त्याची साल चकचकींत असते. त्याच्या चकचकीतपणामुळे आणि आकारामुळे हे फळ वॅक अॅपल किंवा बेल अॅपल या नावानेही ओळखलं जातं. यात पाण्याचं प्रमाण अधिक असतं. तसंच चवीला ते थोडंफार हिरव्या सफरचंदासारखं लागतं. या फळात जीवनसत्त्व सी, फायबर, प्रथिनं, लोह आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात आढळते. » जीवनसत्त्व 'अ'चं प्रमाण यात अधिक असतं. याच्या सेवनामुळे पांढऱ्या रक्तपेशी वाढण्याला मदत होते. » दिवसभर कॉम्प्युरटवर काम केल्याने डोळे थकतात, जळजळ होते, कधी कधी त्यातून पाणीही येतं. असा त्रास नियमित होत असलेल्यांनी या फळाचं नियमित सेवन करावं. » लहान मुलांना ताप येत असेल तर याच्या फुलांचा लेप लावावा, आराम पडतो. » पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने उन्हाळ्यात आवर्जून सेवन करावं. म्हणजे घामावाटे बाहेर पडणाऱ्या पाण्याची झीज भरून काढायला मदत होते. » अतिसार किंवा डायरिया आदी विकारांवरही हे फळ अतिशय उत्तम आहे. » उष्णतेमुळे तोंड आल्यावर त्यावर आपण या फळाचं सेवन केल्यास लवकर आराम मिळतो. » वीर्यवृद्धीसाठीदेखील उपयुक्त आहे. | Read More » | |
No comments:
Post a Comment