वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अवहालानुसार २००५ ते २०१५ या दहा वर्षामध्ये ८४ दशलक्ष लोकांचा मृत्यू कर्करोगामुळे झाला आहे. त्यामुळे कर्करोग हे जगभरातील मृत्यूंचं मुख्य कारण असल्याचं सिद्ध झालं आहे. अशा या कर्करोगाविषयी जनजागृती करणं आवश्यक आहे. ४ फेब्रुवारी हा जागतिक कर्करोग दिन म्हणून ओळखला जातो. यानिमित्ताने जगभरातील कर्करोग निदान संस्थेमध्ये कर्करोगाविषयी काळजी कशी घ्यावी, त्याची लक्षणं काय आहेत. तसंच त्यावर उपचार कसे घेतले जातात याविषयी माहिती देऊन या दिवशी जनजागरण केलं जाते. अशा या जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने कर्करोगाविषयी.. आपल्याला कर्करोग झाला आहे हे समजताच आपले हातपाय गळून जातात. मुळात आपण जागरूक असू तर कर्करोगासारख्या आजारापासून आपण आपली मुक्तता करून घेऊ शकतो. कर्करोग हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवणारा रोग आहे. हा कर्करोग कोणत्याही पेशीमध्ये, कोणत्याही उतीमध्ये आणि अवयवामध्ये होऊ शकतो. कॅन्सरचे कितीतरी प्रकार असून या सगळ्या प्रकारांमधला समान दुवा म्हणजे अनिर्बंध पेशींची वाढ. सामान्यपणे पेशी विभाजन क्रमाने नियंत्रित पद्धतीने होते. शरीराच्या आवश्यकतेनुसार नव्या पेशी जुन्या पेशींची जागा घेतात. पेशी विभाजनाची ही नेहमीची पद्धत आहे. कधी कधी पेशी विभाजन नव्या पेशींची आवश्यकता नसताना होत राहते. या अतिरिक्त पेशींचे गाठोडे म्हणजेच अर्बुद किंवा टय़ुमर(गाठी) होय. हे टय़ुमर दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे बिनाइन टय़ुमर म्हणजे कर्करोगाची गाठ आणि दुसरा प्रकार म्हणजे मारक गाठी (मॅलिग्नंट). पहिल्या प्रकारची गाठ ही सहज काढून टाकता येते. या गाठी नवनवीन अवयवांमध्ये नव्याने कर्करोगाच्या गाठी तयार करत नाहीत. मात्र दुस-या प्रकारात कर्करोगाच्या अनियमित आणि अनिर्बंध वाढणा-या पेशींच्या गाठीपासून मारक गाठी बनतात. या गाठी सभोवतालच्या उती आणि अवयवांमध्ये पसरतात. गाठीमधून बाहेर पडलेल्या पेशी लसिकेमार्फत किंवा रक्तवाहिन्यांमधून इतर अवयवांमध्ये प्रवेश घेतात. त्यामुळे मूळ अवयवाबरोबरच इतर अवयवांमध्येही कर्करोग पसरतो. तसंच आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यात कर्करोग होऊ शकतो. काही प्रकारचे कर्करोग लहान मुलांमध्ये होतात, उदाहरणार्थ, डोळ्याच्या दृष्टिपटलाच्या पेशींचा कर्करोग तसंच बहुतेक प्रकारचे ल्युकेमिया म्हणजे रक्ताचे कर्करोग लहानपणी होतात. स्तनांचा, प्रोस्टेट किंवा पौरुष ग्रंथीआणि मोठय़ा आतडय़ाचा कर्करोग प्रौढपणी होतो. या अर्बुदविज्ञानाचा अभ्यास केल्यास निदान आणि उपचाराद्वारे कर्करोग हा आजार बरा होऊ शकतो. काय टाळाल? शरीराला उच्च कोलेस्टेरॉल देणारे पदार्थ जसं की मांस, लिव्हर आणि दुधाचे पदार्थासारखे आहार टाळावेत. अतितेलकट पदार्थ टाळावे. सकाळी दहा ते दुपारी ४ वाजेपर्यंत उन्हात उभे राहू नये. मद्यपान टाळावे. काय करावं उन्हातून फिरताना मोठी हॅट वापरावी. उन्हातून जाताना १५ किंवा त्याहून अधिक संरक्षक घटक असलेलेच क्रीम लावावं. पेरू, द्राक्ष, अननस यासारख्या फळांचा आणि टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या अशा भाजांचा तसंच कडधान्याचा आहारात समावेश करावा. तसंच आहारात पास्ता,तांदूळ आणि घेवडा अशा पदार्थाचा समावेशक करावा. थोडक्यात तंतुमय पदार्थाचे सेवन, जीवनसत्त्व, क्षार, तेलाचे कमी प्रमाण आणि संतुलित आहार घेतल्याने कर्करोगाची शक्यता कमी होते. कॅन्सरची रूपरेषा वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, फुप्फुसांचा आणि तोंडाचा कर्करोग हा सामान्यपणे कोणालाही होऊ शकतो. तर स्तनांचा आणि गर्भाशयाचा कर्करोग हा महिलांनाच होतो. सध्याच्या घडीला भारतात कर्करोगामुळे मृत्युमुखी पडणा-या लोकांचं प्रमाण अधिक असून तीन दशलक्ष रुग्ण या आजाराने त्रस्त आहेत. भारतात वर्षाला जवळपास ५ लाख लोक कर्करोगामुळे मृत्युमुखी पडतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या मते, या वर्षी ही संख्या ७ लाखांच्या घरात पोहोचण्याची शक्यता अधिक आहे. प्रतिवर्षी कर्करोगाने मृत्यू होणा-याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. तसंच फुप्फुसं, तोंड, ओठ, घसा अािण मानेचा कर्करोग प्रामुख्याने पुरुषांमध्ये तर बहुतांश महिलांमध्ये गर्भाशय, स्तन आणि अंडाशयाचा कर्करोग आढळतो. भारतात प्रामुख्याने मूत्रपिंड, पुरुषांचे जननेंद्रिय, आतडय़ांच्या कर्करोग वृद्ध पुरुषांना तर गर्भाशयाचा कर्करोग हा वृद्ध महिलांना होतो. बाकीचे बहुतांश कर्करोग हे वयाच्या ३२ ते ३५ या वयोमर्यादेत होतात. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात ३००हून अधिक कर्करोग निदान संस्था असून त्यापैकी ४० संस्थांमध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. २०२० पर्यंत भारतात ६०० कर्करोग निदान संस्था उपलब्ध असणं गरजेचं आहे. स्तनांचा कर्करोग गेल्या काही वर्षात स्तनांचा कर्करोग हा तरुण वयातच होण्याचं प्रमाण अधिक वाढलेलं दिसतंय. त्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. पूर्वीपेक्षा हे प्रमाण अधिक वाढलं आहे. अलीकडे याकडे लक्ष केंद्रित केल्याने काही रुग्ण प्रगतिपथावर आहेत. म्हणूनच स्तनांच्या कर्करोगाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण हा कर्करोग बरा होण्याची शक्यता असते. यासाठी नियमित एक तास स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. वयाच्या २० वर्षीपासूनच योग्य डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी. जेणेकरून या कर्करोगाचं निदान लवकर होण्यास मदत होईल आणि वेळीच उपचार केल्याने एखादीला नव्याने जीवनाची संधी मिळू शकते. जगभरातील महिलांचं मृत्यू होण्याचं प्रमुख कारण स्तनांचा कर्करोग हे आहे. नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार असं सिद्ध झालं आहे की दर अठ्ठावीस महिलांमधील एका महिलेला स्तनांचा कर्करोग होण्याची शक्यता असते. भारतात स्तनांचा कर्करोग ४३ ते ४६ या वयादरम्यान होतो. म्हणूनच स्तनांच्या कर्करोगाविषयी महिलांमध्ये अधिकाधिक जागरूकता कशी निर्माण होईल, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कर्करोगाची मदत रुग्णांपर्यंत पोहोचत का नाही? कर्करोगाचा उपचार करण्यासाठी लागणारा खर्च खूप असल्याने कित्येक दशलक्ष रुग्णांना त्या उपचाराचा लाभ मिळू शकत नाही. खरं म्हणजे कर्करोगाचं निदान लवकर झाल्यास त्याचा उपचार कमी खर्चिक असतो तसंच रुग्ण लवकर बराही होऊ शकतो. त्याचप्रमाणे कर्करोगाचं निदान उशिरा झाल्यास त्यावरील उपचार ही मोठी खर्चिक बाब असतेच, त्याचप्रमाणे त्यातून मुक्तता होण्याची शक्यतादेखील कमी असते. डॉक्टरांच्या मते, कर्करोगाचा प्रादुर्भाव होण्याचं मुख्य कारण म्हणजे अनुवंशिक संप्रेरकांचा वापर आणि रोगप्रतिकारशक्तीचा अभाव हीदेखील असू शकतात. याशिवाय बाहय़ आणि पर्यावरणविषयक कारणं, उदाहरणार्थ अन्न सवयी, औद्योगिकीकरण, लोकसंख्या वाढ अशीही असू शकतात. निदान करण्यात विलंब, आवश्यक वैद्यकीय सुविधांचा अभाव, आपापसांत दुर्लक्ष असणे यामुळे कर्करोग हा 'किलर रोग' ठरू शकतो. खरं म्हणजे कर्करोगाचं निदान लवकर झालं तर त्यावर योग्य ते उपचार केले जातील आणि रुग्ण एक निरोगी आयुष्य जगेल. म्हणूनच कॅन्सरचे कोणते प्रकार आहेत आणि त्यांची लक्षणं काय आहेत याविषयी लोकांमध्ये माहिती प्रसारित करणं आवश्यक आहे. मूत्रावाटे रक्त जाणे हे कर्करोगाचं प्रमुख कारण असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे याकडे दुर्लक्ष केलं जाऊ नये. यावरून हे सिद्ध होतं की कर्करोगावर प्रतिबंध करण्यात अन्न हा घटक महत्त्वाची भूमिका बजावतो. या कर्करोग दिवस साजरा करण्याच्या निमित्ताने अधिकधिक लोकांना कर्करोगाविषयी माहिती देऊन त्यांना त्या आजाराविषयी जागरूक करूया. |
No comments:
Post a Comment