Tuesday, February 17, 2015

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

शरीराला आवश्यक जीवनसत्त्व 'ड'

पारंपरिकरीत्या जीवनसत्त्व 'ड' हे तुमच्या शरीराची हाडे बळकट करण्यास व त्यांना कॅल्शिअमचा पुरवठा करण्यासाठी ज्ञात आहे. 

पारंपरिकरीत्या जीवनसत्त्व 'ड' हे तुमच्या शरीराची हाडे बळकट करण्यास व त्यांना कॅल्शिअमचा पुरवठा करण्यासाठी ज्ञात आहे. पण आता संशोधनातून असे दिसून आले आहे की, या जीवनसत्त्वाचा इतरही उपयोग होतो. जशी तुमची वाढ होत असते, त्यावेळी अनेक आजारांपासून संरक्षण करून तुम्हाला सशक्त बनवण्यामध्येसुद्धा हा जीवनसत्त्व मदत करू शकतो.

जीवनसत्त्व 'ड'चा अभाव हा घातक आहे. तुमचे वय कितीही असो, या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे तुमच्या हाडांच्या आरोग्यावर परिणाम होऊन ऑस्टिओपोरोसिस व संधिवात यांसारखे आजार होण्यासह तुमची मन:स्थिती व एकूण आरोग्यावर परिणाम होतो. जर्नल ऑफ क्लिनिकल एन्डोकिनॉलॉजी अ‍ॅण्ड मेटाबॉलिझममधील अभ्यासानुसार जीवनसत्त्व 'ड'ची कमी पातळी असलेल्या महिलांमध्ये दुप्पट उदासीनता दिसून येते. यामुळे तुमचा स्वभाव चिडचिडा होऊन जातो, मुख्यत: मासिक पाळी येण्याअगोदरच्या काळात मन:स्थितीमधील हा बदल दिसून येतो.

जर तुमच्या पाठीमध्ये तीव्र वेदना होत असतील किंवा फॅक्चर झाल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही समजलं पाहिजे की, हे जीवनसत्त्व 'ड'च्या अभावामुळे होत आहे. पुरेशा कॅल्शिअम सेवनाद्वारे हाडांच्या आरोग्याला चालना देणे हा पुरेशा जीवनसत्त्व 'ड'च्या प्राथमिक फायद्यांपैकी एक आहे. तसेच हा तुमच्या शरीराची शक्ती वाढवण्यासदेखील मदत करतो आणि सहजपणे तुमचे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतो.

लठ्ठपणा किंवा वजन कमी होणे या संदर्भात काही मजेशीर बाबी –
जर तुम्हाला तुमचे वजन नियंत्रणात ठेवता येत नसेल तर आहार किंवा व्यायामाला दोष देऊ नका. त्याऐवजी तुमचे जीवनसत्त्व 'ड' चे प्रमाण तपासा. शक्यता आहे की, तुमच्यामध्ये जीवनसत्त्व 'ड'ची कमतरता असेल. 'ड'जीवनसत्त्वाचे सामान्य प्रमाण, तुम्हाला अतिरिक्त वजन कमी करण्यास मदत करतात आणि शरीराचे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते. फक्त एवढेच नाही, ते तुम्हाला तुमची एरोबिक्स कृती अधिक सक्षम करण्यास मदत करते आणि तुमची शक्ती व सहनशीलता यांमध्ये सुधारणा करते.

जीवनसत्त्व 'ड' भूक नियंत्रित करते आणि तुमच्या शरीरातील पेशींचे कार्य चांगल्यारितीने कार्यान्वित राखण्यास मदत करते. अगदी मेदयुक्त पेशींनासुद्धा ते अस्तित्वात असण्याचे संकेत देण्यासाठी जीवनसत्त्व 'ड' ची गरज भासते आणि तुमच्या कमरेच्या घेराजवळ या पेशींची वाढ होणार नाही याची काळजी घेण्यासाठी त्यांवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे.

आहारामुळे तुमच्यात चिडचिडपणा निर्माण होत असेल, तर जीवनसत्त्व 'ड' तुमच्या शरीरामध्ये सेरोटोनीन पातळी वाढवतो आणि रागावर नियंत्रण आणण्यास मदत करतो. तसंच तुमचं ध्येय जलद गतीने साध्य करण्यासाठी तुम्ही ध्येयापासून विचलित होणार नाही याची खात्री प्रदान करतो.

याशिवाय, जीवनसत्त्व 'ड' कर्करोग (मुख्यत: स्तनाचा कर्करोग) टाळण्यासाठी मदत करतो, प्रजनन समस्यांना दूर करतो आणि तणावासंबंधित आजार जसे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग याविरुद्ध प्रतिकार करण्यास तुम्हाला मदत करतो. त्यामुळे तुम्ही दिवसाच्या प्रत्येक क्षणाला आरोग्यदायी व सक्रिय राहू शकता. जीवनसत्त्व 'ड'मुळे जवळपास ४० टक्क्यांपर्यंत त्वचारोग किंवा मल्टिपल स्क्लेरोसिस यासारखे आजार विकसित होण्याचा धोका टळतो.

तुम्हाला वाटत असेल की, तुम्ही तुमच्या सभोवती असलेल्या आजारांपासून सुरक्षित व आरोग्यपूर्ण आहात तरीदेखील तुमच्या शरीरामध्ये जीवनसत्त्व 'ड'चे पुरेसं प्रमाण असणं आवश्यक आहे. ज्यामुळे तुमची समग्र ज्ञानेंद्रियं विकसित होण्यास मदत होते.

म्हणून दिवसभर तुमच्या विविध भूमिकांमध्ये परिश्रम घेतल्यानंतर, ऊर्जेचा स्त्रोत तुम्हाला मिळणं आवश्यक आहे. ज्यामुळे तुम्ही आज किंवा उद्या येणा-या परिस्थितींचा सामना करण्यासाठी सुपरवुमन बनू शकता.

विसरू नका : हे केवळ जीवनसत्त्व 'ड' नाही. हे तणावापासून बचाव करतं, तुम्हाला आजारापासून दूर ठेवतो आणि तुमचे आरोग्य व त्याच्या विकासासाठी मदत करते!

Read More »

उत्तम आरोग्यासाठी ओमेगा-३

आपल्या शरीरात ओमेगा-३ नावाचं पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड असतं.

आपल्या शरीरात ओमेगा-३ नावाचं पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड असतं. जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेल्या पोषणमूल्यांपैकी एक असतं. त्यामुळे शरीराचं कार्य तर सुधारतंच, त्याचबरोबर मेंदू, हृदय व डोळे यांच्या निरोगी आरोग्यासाठी उपयुक्त ठरतं.

आपल्याकडे काही जणांना 'फॅट' हा शब्दच नकोसा वाटतो, परंतु काही फॅट 'चांगले फॅट'सुद्धा असतात व ते आपल्या आरोग्याचा अविभाज्य भाग असतात. दिवसभरातल्या आहारातून ते योग्य प्रमाणात आपण ग्रहण करायला हवं याची बहुतेक जणांना जाणीवच नसते.

आपलं शरीर फार कार्यक्षम मशीन आहे जे आपल्या आहारामधून भरपूर मेद घेऊन त्याची निर्मिती करतं. तरीही, ओमेगा-३ आणि ओमेगा-६ सारखे मुळातच तयार असलेले आवश्यक मेद हे मशीन तयार करू शकत नाही. त्याचा पुरेसा पुरवठा व्हावा यासाठी आपल्याला बाहय़ स्त्रोतांवर अवलंबून राहावं लागतं. हे फॅटी अ‍ॅसिड (मेदाम्ल) शरीरासाठी आवश्यक असतात. कारण त्यांच्या कमतरतेमुळे तणाव, प्रतिकारशक्ती कमी होणे, यकृत व किडनीसारख्या अवयवांचे कार्य निकामी होणे असे गंभीर मानसिक व शारीरिक आजार होऊ शकतात.

ओमेगा३ : हे पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड्स (PUFA) असतात जे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक पोषणांपैकी एक असतात. ते आपल्या शरीराचं कार्य सुधारतात आणि प्रौढांच्या व मुलांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड तीन प्रकारचे असतात. अल्फा-लिनोलेनिक अ‍ॅसिड ((ALA)), इकोसॅपेन्टाइनॉइक अ‍ॅसिड (EPA) आणि डोकोसॅहेइक्सानॉइक अ‍ॅसिड (DHA). इकोसॅपेन्टाइनॉइक अ‍ॅसिड आणि डोकोसॅहेइक्सानॉइक अ‍ॅसिड मांसांमध्ये आढळतं तर अल्फा-लिनोलेनिक अ‍ॅसिड नट्स किंवा बियांमधून प्राप्त होतं.

ओमेगा-३ मेंदू, हृदय व डोळे यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. ओमेगा-३ रक्ताच्या गाठींसारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण करतात, असं वैद्यकीय संशोधनातून आढळलं आहे. ते पेशीपटलाची द्रवता राखतात व रक्ताभिसरण व ऑक्सिजन पुरवठा वाढवतात. डोकोसॅहेइक्सानॉइक अ‍ॅसिडरक्तामध्ये प्रसरण होत असलेल्या बॅड फॅट(ट्रायग्लिसराइड)ला थांबवतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. इकोसॅपेन्टाइनॉइक अ‍ॅसिड आणि डोकोसॅहेइक्सानॉइक अ‍ॅसिड यांना -ह्य़ुमेटॉइड आर्थरायटिस असलेल्या रुग्णांमध्ये ताठरपणा व सांधेदुखीचा उपाय म्हणून ओळखले जातात.

तज्ज्ञांच्या मते, ओमेगा-३ हृदयासाठी लाभदायी असून हृदयविकाराचा झटका किंवा आघात येण्याची शक्यता कमी करतात. अमेरिकन हार्ट असोसिएशन निरोगी हृदयासाठी नियमित ओमेगा-३ घेण्याचा सल्ला देतात. त्यांच्या मते, ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड निरोगी लोकांच्या हृदयासाठी आणि ज्यांना कार्डियोव्हॅस्क्युलर आजार आहेत किंवा हा आजार होण्याची दाट शक्यता आहे, त्यांच्यासाठी लाभदायी आहे. संशोधनामधून असं समोर आलं आहे की ओमेगा-३ युक्त असलेल्या आहारामुळेसुद्धा बालकांची दृष्टी चांगली होते.

ओमेगा-३चे लाभ केवळ शरीरासाठीच नाहीत. त्याच्या पुरेशा प्रमाणाने मानसिक आरोग्यावरसुद्धा सकारात्मक परिणाम होतात. अभ्यासामधून लक्षात आलं आहे की, ओमेगा-३ युक्तआहार घेत असलेल्या लोकांमध्ये तणावाचं प्रमाण फारच कमी असतं.

आवश्यक फॅटी अ‍ॅसिड्स मुलांची वाढ व विकासासाठी तसेच त्यांची बौद्धिक वाढ होण्यासाठीसुद्धा महत्त्वाचे असतात. ओमेगा-३ हा मेंदूच्या आरोग्यासाठीचा क्रांतिकारी घटक आहे आणि त्याच्या कमतरतेमुळे वाचण्याची व स्मृतीची क्षमता कमी होते. त्याच्या नियमित घेण्यामुळे एकाग्रता कमी होणे अति क्रियाशिलता यांची लक्षणं मुलांमध्ये कमी होतात.

खरं तर, संशोधकांनी असा शोध लावला आहे की, ओमेगा३च्या कमतरतेमुळे मुलांमध्ये वाईट लक्षणं दिसतात. अशा मुलांमध्ये सामान्य मुलांपेक्षा अभ्यासाच्या आणि वागणुकीच्या तक्रारी जास्त असतात. मानवाच्या मेंदूचा एक-चतुर्थाश भाग अनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड्सने बनला आहे आणि ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिडच्या कमतरतेमुळे डिमेन्शियाचा धोका वाढतो.

ओमेगा-३चे काही उत्तम स्त्रोत पुढीलप्रमाणे -
» मासे
» माशांपासून बनलेलं तेल
» कॉर्डलिव्हर ऑइल
» क्रिल ऑइल

शाकाहारी लोक गडद हिरव्या पानांच्या पालेभाज्या, अळशीचं बी (फ्लॅक्ससीड्स), सोयाबीन, राजमा, मटकी, ब्लॅक बीन्स, अक्रोड व कॅनोला ऑईल (पांढ-या मोहरीचं तेल) यांचा वापर करू शकतात.

भारतामध्ये काही टेबल-स्प्रेड्समध्ये (ब्रेडवर लावायचे पदार्थ) भाजीपाल्यांमधून काढलेल्या ओमेगा-३चासुद्धा वापर करतात. तुम्ही त्याला तुमच्या न्याहारीमध्ये विशेषत्वाने या फॅटची आवश्यकता असलेल्या तुमच्या मुलाच्या आहारामध्ये त्याचा नियमित वापर करू शकता.

Read More »

बहुगुणी बोर

झिझिफस मॉरीटिएना नावाच्या जातकुळातील हे फळ असून ते भारतात बोर नावाने प्रचलित आहे. 

झिझिफस मॉरीटिएना नावाच्या जातकुळातील हे फळ असून ते भारतात बोर नावाने प्रचलित आहे. याशिवाय ते 'जुजुबी', 'चायनीज डेट्स' किंवा 'चायनीज अ‍ॅपल' या नावांनीही ओळखलं जातं. गोल, लंबगोल, वर्तुळाकार अशा कोणत्याही आकारांत हे उपलब्ध होतं. याचा गर हा पांढ-या रंगाचा असतो तर कवच हे काहीसं टणक असलं तरी गुळगुळीत आणि चमकदार असतं. असं असलं तरी दाताने अगदी सहज तोडता येतं.

बोराचं झाड साधारण पंधरा मीटर उंच वाढतं. या फळात भरपूर पोषणमूल्यांचा समावेश असून हे फळ प्रामुख्याने कच्चंच खाल्लं जातं. दुसरा प्रकार म्हणजे उन्हात वाळवलेलं बोरदेखील आवडीने खाल्लं जातं. हिरवट पिवळसर किंवा लाल रंगात हे उपलब्ध असतं. बोराला स्वत:चा विशिष्ट असा उग्र स्वाद असतो. लोणचं किंवा सरबतातही बोराचा वापर केला जातो. याचे भरपूर फायदे आहेत.

» कर्करोगासारख्या आजारापासून शरीराचं संरक्षण करण्याचं काम करतं. कर्करोगाला प्रतिकार करणा-या पेशी वाढवण्याचं काम बोर करतं.
» यात भरपूर प्रमाणात 'क' जीवनसत्त्व असल्यामुळे ते अँटिऑक्सिडंट म्हणूनही काम करतं.
» ताण हलका करण्याची क्षमतादेखील या फळात आहे.
» सर्दी किंवा शीतज्वरापासून बचाव होण्यास मदत होते. एक चमचा बोराचा रस आणि काळी मिरी यांचं सेवन केल्यास सर्दीपासून संरक्षण होतं.
» अतिसार, थकवा तसंच भूक न लागणे आदी विकारांवरही हे अतिशय गुणकारी आहे.
» बोर खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्तीदेखील वाढते.
» त्वचा कोरडी होणे, काळवंडणे याचबरोबर सुरकुत्या येणे यासारखे विकार कमी करण्यास मदत करतं. त्वचेचं तारुण्य टिकवण्याची क्षमता यात आहे.
» अस्थमा आणि मधुमेहाचा त्रास असल्यांनी बोरं आवर्जून खावी. रक्तातील साखर नियंत्रित राखण्याचं काम बोर करतं.
» वजन कमी करण्यासही हे मदत करते.
» 'अ' जीवनसत्त्व असल्यामुळे नियमित बोर खाल्ल्यास पचनशक्ती सुधारते.
» कॅल्शिअम आणि फॉफ्सरसचं प्रमाण अधिक असल्यामुळे हाडं आणि दातांच्या मजबुतीसाठी हे उत्तम आहे.

Read More »

स्वाइन फ्लूचा सामना करूया

काही वर्षापूर्वी उदयास आलेल्या स्वाइन फ्लूने सध्या पुन्हा एकदा थैमान घातलं आहे. 

संग्रहित छायाचित्र

काही वर्षापूर्वी उदयास आलेल्या स्वाइन फ्लूने सध्या पुन्हा एकदा थैमान घातलं आहे. सध्या महाराष्ट्रात स्वाइन फ्लू झालेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. यानिमित्ताने स्वाइन फ्लूची पुन्हा नव्याने माहिती करून घेऊया.

स्वाइन फ्लू हा इन्फ्लूएन्झा रोगाचा प्रकार असून जो सर्वसाधारणपणे डुक्कर या प्राण्यात आढळणा-या विषाणूंमुळे होतो. सतत डुक्कर या प्राण्याच्या संपर्कात राहणा-या माणसांना या रोगाची लागण होऊ शकते. मात्र डुकराचे मांस खाण्याचा या आजाराशी काहीही संबंध नाही. विषाणूंचा प्रसार हा रोग्याच्या नाकातील व घशातील स्रव, त्याचा घाम आणि त्याची थुंकी यापासून होतो.

स्वाइन फ्लू हा जुलै २००९ पासून चर्चेचा आणि चिंतेचा विषय झाला आहे. हा आजार तीव्र श्वसनाच्या अनेक लक्षणांसह आढळतो. मेक्सिकोने केलेल्या परीक्षणात नवीन एच१ एन१ विषाणूंची नोंद करण्यात आली. आजवर याचा तीव्र प्रादुर्भाव मेक्सिको शहरातच झालेला आहे. अमेरिकेत मात्र याचा प्रादुर्भाव फारच कमी आहे.

एच१ एन१ नावाचा हा विषाणू लवकर पसरत असल्यामुळे एकाच वेळी अनेक लोकांना याची लागण होऊ शकते. पण आपल्याकडे स्वाइन फ्लूमुळे मृत्यूच होतो, असा गैरसमज पसरत चालला आहे. मात्र रुग्णाला उशिरा उपचार मिळाल्यामुळे किंवा प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. योग्य वेळी योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे या आजाराचा प्रसार वेगाने होऊ शकतो. किंबहुना योग्य उपचार आणि औषधांचा कोर्स पूर्ण केल्यास दहा दिवसांत हा आजार बरा होऊ शकतो.

संसर्ग कसा होतो ?
स्वाइन फ्लूचे विषाणू हवेत आठ तास जिवंत राहू शकतात. केवळ हवेतच नाही तर खुर्ची, टेबलसारख्या ठिकानीही जिवंत राहतात. त्यामुळे बाहेरून आल्यावर हात न धुतल्यास आणि नाक, डोळे, तोंड यासारख्या अवयवांशी संपर्क आल्यास विषाणूंचे संक्रमण होतं. तसंच विषाणूबाधित व्यक्तीच्या संपर्कात राहिल्यानेदेखील हा आजार पटकन बळावू शकतो. अशा व्यक्तीच्या खोकण्याने किंवा शिंकण्यामुळे हवेत जे तुषार उडतात, त्या तुषारातील विषाणू धूलिकणवेष्टित स्वरूपात जिवंत राहतात. या विषाणूंचा हात-पायांशी संपर्क झाल्यास याचा संसर्ग होऊ शकतो.

लक्षणं
स्वाइन फ्लूची बाधा झाल्यास सात दिवसांतच त्याची लक्षणं दिसू लागतात.

»सर्दी आणि ताप येणे, तापासोबत थकवा येत असल्यास गंभीर लक्ष समजून त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
»सतत खोकणे
»शिंकणे
» घसा खवखवणे किंवा दुखणे
» डोकेदुखी
» थकवा येणे
» थंडी आणि अशक्तपणा
» उलटय़ा होणे

कोणाला होऊ शकतो ?
खरं म्हणजे हा आजार कोणालाही होऊ शकतो, मात्र
» वृद्ध माणसं
» पाच वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलांमध्ये
» गर्भवती महिलांमध्ये
» एचआयव्ही बाधित, अस्थमा किंवा मधुमेह यासारख्या गंभीर आजार असलेल्या रुग्णांमध्ये हा आजार होण्याची शक्यता अधिक असते.

निदान
प्राथमिक निदान हे लक्षणांवर आधारित आहे. निदानासाठी रुग्णाच्या घशातील द्रव तपासणीसाठी पाठवला जातो. रुग्णाच्या विषाणू तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्था (एनआयव्ही), पुणे आणि राष्ट्रीय संचारी रोग संस्था, दिल्ली या ठिकाणीच प्रयोगशाळा तपासणीची व्यवस्था केली आहे.

हे करावंच
» हात सातत्याने साबण व पाण्याने धुवावेत.
» गर्दीमध्ये जाणं टाळावं.
» खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल धरावा. किंवा पेपर धरावा. वापरून झाल्यावर तो पेपर फेकून द्यावा.
» भरपूर पाणी प्यावं
» पुरेशी झोप घ्यावी
» पौष्टिक आहार घ्यावा
» मल्टि व्हिटॅमिनचा गोळ्या घ्याव्यात
» वरीलपैकी कोणतीही लक्षणं जाणवल्यास त्वरित डॉक्टरांकडे धाव घ्यावी.

हे टाळा
» लागण झालेल्या रुग्णांच्या जवळ (सहा फुटांपर्यंत) जाऊ नये.
» हस्तांदोलन किंवा आलिंगन
» सार्वजनिक ठिकाणी थुंकणे
» डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणे
» आजारी मुलांना शाळेत न पाठवणे.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe

No comments:

Post a Comment