Tuesday, January 7, 2014

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

हंगामी फळं खा, सुदृढ बना!

'फळं (विशेषत: हंगामी) खा, सुदृढ बना आणि आनंदी जीवन जगा!' हा सर्व वाचकांसाठी नववर्षाचा संदेश आहे. हा विचार आपल्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याशी खूपच निगडित आहे. मागच्या लेखात आपण केळं आणि आवळा या फळांचे गुणधर्म आणि महत्त्व जाणलं. या लेखात आपण संत्रं, स्ट्रॉबेरी आणि डाळिंब या फळांविषयीचा ऊहापोह करूया.
आपल्या भारतातील ब-याच शहरांची त्या-त्या ठिकाणी पिकणा-या फळांवरून एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण झालेली आहे. जसं नागपूर म्हटलं की, सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतं ते 'संत्रं'. तिथे पिकणा-या संत्र्यांमधील गुणधर्म अधिक प्रभावी आणि आंबट-गोड चव जिभेवर दीर्घकाळ रेंगाळते. संत्र्यामध्ये कर्करोगास प्रतिबंध करणा-या काही अत्यंत महत्त्वाच्या घटकांचा एक समूह असतो. तसंच 'क' जीवनसत्त्व आणि बीटा कॅरोटीनचं प्रमाणही मुबलक असतं. हे दोन्ही घटक स्वादुपिंडा(पॅनक्रिअ‍ॅज)च्या कर्करोगाचं प्रमाण कमी करण्यास उपयोगी पडतात. स्तनांचा कर्करोग, पोटाचा कर्करोग आणि फुप्फुसांच्या रोगांवरही संत्र अत्यंत गुणकारी आहे. संत्र खाण्यानं दमाही नियंत्रणात राहतो.

स्ट्रॉबेरी हे हिवाळा आणि उन्हाळा अशा दोन हंगामांमध्ये येणारं फळ आहे. त्रिकोणी, छोट्याशा, गुबगुबीत, लालचुटूक दिसणा-या या स्ट्रॉबेरीज दिसायला मोहक आणि चवीला आंबट-गोड असतात. या फळात अँटिऑक्सिडंट्स (शरीरातील विषद्रव्यं बाहेर काढणारी यंत्रणा) सोबतच 'क' जीवनसत्त्व,लोह, कॅल्शियम या घटकांचं प्रमाणही विपुल आहे. वर्षभर आपण या स्ट्रॉबेरीजचा आस्वाद मोरंबा, जॅम, सरबत या स्वरूपात घेऊ शकतो.

लाल-पांढ-चा दाण्यांचा समूह असणारं, गोड, तुरट चवीचं असं फळ म्हणजे डाळिंब. डिसेंबर ते मार्च महिन्यांदरम्यान उत्तम प्रतीच्या डाळिंबांचा हंगाम असतो. आयुर्वेदानुसार डाळिंब हे शरीरस्वास्थ्यास सवरेत्तम फळ मानलं गेलं आहे. डाळिंबामध्ये 'अ' आणि 'क' जीवनसत्त्वं व मुख्यत्त्वे लोह मुबलक प्रमाणात असतं.

अम्लपित्ताच्या त्रासासाठी डाळिंबाचा रस (पाच ते सहा मोठे चमचे, दिवसातून दोन वेळा) किंवा एका अख्ख्या डाळिंबातील दाणे खाणं, ही आयुर्वेदातील एक चिकित्सा आहे. त्यातील तुरट रसामुळे पित्तासोबतच कफाचंही शमन होतं. ४-५ महिन्यांच्या बाळाला रोज पाच छोटे चमचे डाळिंबाचा रस पाजल्यास, त्याची प्रतिकारशक्ती वाढून बाळ सुदृढ बनतं. डाळिंबाची सालही गुणकारी आहे. या सालींपासून तयार केलेला काढा कफ झालेला असताना, तसंच त्वचा विकारांसाठीही दिला जातो.

अजूनही काही हंगामी फळांचं महत्त्व तुम्हाला पटवून देणं बाकी आहे. मात्र, पुढील (१४ जानेवारीच्या) लेखात शरीरात स्निग्धता व उष्णता निर्माण करणा-या पदार्थाबाबत जाणूया. त्यापुढील लेखात हिवाळी हंगामातील उरलेली काही फळं पाहूया, तोपर्यंत मिळतील तितकी फळं खात राहा!

हे अवश्य करा..

>त्या-त्या हंगामादरम्यान येणा-या फळांमधून अधिक जास्त प्रमाणात पौष्टिक घटक मिळतात.
>फळं नेहमी जेवणाच्या अर्धा तास आधी खावीत.
>ज्यांना-ज्यांना शक्य असेल त्यांनी दररोज एक संत्र खा.
>सतत होणा-या उलट्या व जुलाब थांबवण्यासाठी डाळिंबाची साल सहाणेवर उगाळून, तयार झालेलं एक चमचा चाटण चाटावं. असं केल्यास उलट्या-जुलाब थांबतात.

Read More »

किडनी स्टोनपासून नैसर्गिकरीत्या सुटका

बदलती जीवनशैली, अनियमित दिनचर्या, खाण्या-पिण्याच्या उलटसुलट सवयी यामुळे अनेक जण सध्या किडनी स्टोनच्या त्रासाला बळी पडतायत. किडनी स्टोनचा खूप त्रास होत असताना प्रचंड पोटात दुखतं. हा आजार आनुवंशिकही असू शकतो. या आजाराने त्रस्त रुग्णाला डॉक्टर अनेकदा ऑपरेशन करण्याचा सल्ला देतात. पण यावर मात करण्यासाठी काही घरगुती उपचार आहेत. या औषधांच्या सेवनाने तुम्ही या आजारावर मात करू शकता.
मीठ आणि मूत्रातील खनिज पदार्थ एकमेकांच्या संपर्कात आल्यास किडनी स्टोनचा आजार होऊ शकतो. किडनी स्टोनचा आकार विविध प्रकारचा असतो. काही कण वाळूप्रमाणे बारीक असतात, तर काही कण मोठे असतात. कधी कधी लहानसहान स्टोन लघवीवाटे शरीराच्या बाहेर पडतात. पण जे आकाराने मोठे असतात ते बाहेर पडत नाहीत. परिणामी पोटात दुखण्यासारखे त्रास होतात. मात्र हे स्टोन नष्ट करणारे काही घरगुती उपाय पुढे दिले आहेत. त्याचा उपयोग केल्यास निश्चितच आराम पडेल.

द्राक्षांचे सेवन करा

सध्या थंडीचे दिवस आहेत. या मोसमांत द्राक्षं चांगली येतात. आता द्राक्ष बाजारातही दिसायला सुरुवात झाली आहेत. त्यामुळे ती मुबलक प्रमाणात मिळतील. किडनी स्टोनपासून सुटकारा मिळण्यासाठी द्राक्षं अतिशय उपयुक्त ठरतात. द्राक्षात पोटॅशिअम मीठ आणि पाणी भरपूर प्रमाणात असतं. तसंच द्राक्षात अलबुमीन आणि सोडिअम क्लोराइड यांचं प्रमाण खूप कमी असतं. म्हणूनच ती या आजारात अतिशय उपयुक्त ठरतात.

कारल्याचा आहारात समावेश करा

कारलं चवीला अतिशय कडू असतं. त्यामुळे प्रत्येकालाच ते आवडतं असं नाही. क्वचितच त्याचा आहारात समावेश होतो, मात्र किडनी स्टोनवर हा रामबाण उपाय आहे. कारल्यात मॅग्नेशिअम आणि फॉस्फरस असतं जे किडनी स्टोन होण्याची प्रक्रिया थांबवतं. म्हणूनच जे रुग्ण किडनी स्टोनने त्रस्त आहेत त्यांनी आपल्या आहारात कारल्याचा आवर्जून समावेश करायला हवा.

केळी खा

स्टोनचा कमीत कमी त्रास व्हावा म्हणून केळी खायला हवीत. केळ्यात बी-६ नावाचं जीवनसत्त्व असतं. या जीवनसत्त्वामुळे खड्यांच्या निर्मितीला आळा घातला जातो. याशिवाय जीवनसत्त्व बी अन्य जीवनसत्त्वांबरोबर सेवन केल्यास किडनी स्टोनच्या आजारात खूप आराम पडतो. एका शोधानुसार जीवनसत्त्व बीचं १०० ते १५० मिलिग्राम दररोज सेवन या आजारात खूप फायदेशीर ठरतं.

ओवा

लघवीला चालना देणारे गुण ओव्यात उपजतच असतात. त्यामुळे ओवा किडनी स्टोनसारख्या आजारात टॉनिक म्हणून उपयुक्त ठरतो. किडनीत स्टोन जमा होऊच नये म्हणून नियमित आहारात, मसाल्याच्या रूपात ओव्याचा वापर करावा.

लिंबाचा रस

ऑलिव्ह ऑइल आणि लिंबाचा रस यांच्या एकत्रित सेवनाने या आजारात खूप फायदा होतो. या आजारात पोटदुखी होते. अशा वेळी ६० मिलीलीटर लिंबाच्या रसात तितक्याच ऑलिव्ह ऑइलची मात्रा घेतली तर पोटदुखीपासून त्वरित आराम पडतो.

चाकवताचा रस

किडनी स्टोन नष्ट करण्यासाठी चाकवत ही पालेभाजी अतिशय उपयुक्त ठरते. यासाठी चाकवताची अर्धी जुडी पानं चांगली उकळून घ्यावीत. हे पाणी गाळून त्यात काळीमिरी, जिरं आणि थोडं सैंधव मीठ घालावं. हे पाणी दिवसातून चार वेळा प्यावं. खूप गुणकारी ठरतं.

थंड कांदा

कांद्यात स्टोननाशक तत्त्वं असतात. आहारात कांद्याच्या सतत सेवनाने किडनी स्टोनपासून सुटकाराही मिळू शकतो. साधारण ७० ग्रॅम कांदा किसून त्याचा रस काढावा. सकाळी अनशापोटी या रसाच्या नियमित सेवनाने स्टोनचे बारीक बारीक खडे होतात आणि ते लघवीवाटे बाहेर पडतात.

तुळस

तुळस कित्येक आजारांत लाभदायक आहे. तुळस घालून नियमित चहा प्यायल्याने किडनी स्टोनच्या आजारापासून आराम पडतो. तुळशीचा रस प्यायल्याने स्टोन लघवीवाटे बाहेर पडण्यास मदत होते. कमीत कमी एक महिना तुळशीच्या पानांच्या रसासोबत मधाचं सेवन केल्यामुळे किडनी स्टोनपासून कायमची सुटका मिळू शकते. तुळशीची ताजी पानं रोज चावून खाल्ल्याने खूप फायदा होतो.

डाळिंबाचा रस

किडनी स्टोनपासून सुटका होण्यासाठी डाळिंबाच्या दाण्यांचा रस सेवन करणं हा अतिशय गुणकारी घरगुती उपचार आहे. डाळिंबाचे दाणे आणि रसात काहीसा तुरटपणा असल्याने तो किडनी स्टोनसारख्या आजारात अतिशय उपयुक्त ठरतो.

या उपायामुंळे किडनी स्टोनपासून सुटका होऊ शकते. हे उपाय घरगुती तर आहेतच, शिवाय फायदेशीरही आहेत. मात्र हे उपाय उपयुक्त ठरले नाहीत तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Read More »

बहुगुणी मसाले

मसाल्यांचा इतिहास तर सगळ्यांनाच माहीत आहे. खाद्यपदार्थ तिखट, सुवासिक आणि स्वादिष्ट बनवण्यासाठी जे विविध वनस्पतींचे भाग वापरण्यात येतात त्यांना मसाले असं म्हणतात.
मसाल्याच्या व्यापाराचं मूळ आशियातील संस्कृतीच्या इतिहासात आढळतं. आग्नेय चीन आणि अरबस्थानात हा व्यापार समुद्रकिनारी होत असे. दालचिनी, तमालपत्र, वेलदोडे, आलं आणि हळद हे पदार्थ पूर्वेकडच्या लोकांना प्राचीन काळापासून माहीत होते. याच मसाल्याच्या व्यापारासाठी पोर्तुगीज भारतात आले. हा इतिहास तर सगळ्यांनाच माहीत आहे. खाद्यपदार्थ तिखट, सुवासिक आणि स्वादिष्ट बनवण्यासाठी जे विविध वनस्पतींचे भाग वापरण्यात येतात त्यांना मसाले असं म्हणतात.

मसाले वापरण्यामागे पदार्थ रुचकर करून तो खाण्याची इच्छा वाढवणं हा उद्देश असू शकतो. काही मसाल्यांमध्ये औषधी गुणधर्म असल्याने त्यांचा उपयोग आसवं, अर्क, सायरप आदी गोष्टी करण्यासाठी केला जातो. सामान्यत: वनस्पतींची मुळं, मूलक्षोडे (जमिनीत आडवी वाढणारी जाडसर खोडे), साली, पानं, फुलं, फळ, बिया आदी भाग वाळवून मसाले म्हणून वापर केला जातो. बहुतेक मसाल्यांचे पदार्थ ज्या वनस्पतीपासून केले जातात त्या आशिया, आफ्रिका, अमेरिका या खंडांतील म्हणजेच उष्ण कटिबंधातील प्रदेशांत आढळतात.

प्राचीन काळी मसाल्याच्या पदार्थाचा उपयोग औषधं, तेलं, मलमं करण्यासाठी वापरला जात होता. इतकंच नाही तर पूजेसाठी, मद्याला स्वाद आणण्यासाठी, आंघोळीचं पाणी सुगंधित करण्यासाठी, शरीर लेपनासाठी, धूप म्हणूनही वापर केला जायचा. चीन, सुमेर, सीरिया, इजिप्त, ग्रीस, रोम इ. संस्कृतीत मसाल्याच्या पदार्थाचा वापर रोगोपचारासाठीही केला जायचा. मसाल्यांच्या पदार्थाच्या रोगनिवारणातील वापरात पुढे सुधारणा होऊन मध्य युगात आणि आधुनिक काळाच्या आरंभापर्यंत औषधांसाठी मसाल्यांतील पदार्थाचा वापर बराच प्रचलित होता.

माणसाने मसाल्यांचा वापर खाद्यपदार्थात नेमका कधीपासून केला याची ठोस माहिती उपलब्ध नाही. कांदा आणि लसूण यांचा वापर फार पूर्वीपासून अन्नाचा एक घटक आणि मसाल्याचा एक भाग म्हणून केला जायचा. प्राचीन ग्रीक लोक मसाल्याच्या पदार्थाचा वापर खाद्यपदार्थ आणि पेये स्वादिष्ट करण्यासाठी करत असत. त्यानंतर युरोपमध्ये खाद्यपदार्थाचं कडवट होण्यापासून अथवा खराब होण्यापासून संरक्षण करण्यासाठी किंवा तो पदार्थ अधिक स्वादिष्ट करण्यासाठी मसाल्याच्या पदार्थाचा वापर करायला सुरुवात झाली.

मध्य युगापर्यंत बरेच मसाल्याचे पदार्थ खाद्यपदार्थात वापरले जाऊ लागले. अशा या मसाल्याचा व्यापार जसजसा प्रगत होत गेला तसतसं त्याचं स्वरूप पालटू लागलं आणि तिखट, सुवासिक मसाल्याचे पदार्थ गरीब-श्रीमंत सारख्याच प्रमाणात करू लागले. मसाल्याचा आधुनिक उपयोग विविध प्रकारचे सॉस, लोणची, चटण्या, बिस्किटं, पेयं, मेवामिठाई आदी पदार्थात तसंच सुवासिक द्रव्ये, सौंदर्यप्रसाधनं, टुथपेस्ट आदी गोष्टींसाठी केला जातो. अशा या स्वयंपाकात सर्रास वापरल्या जाणा-या बहुगुणी मसाल्याच्या पदार्थाचे विविध गुण आपण 'म मसाल्याचा' या सदरातून जाणून घेणार आहोत.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe

No comments:

Post a Comment