Tuesday, November 12, 2013

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

शक्तिवर्धक मेथी

हवेत सकाळी गारवा जाणवतो आहे. अर्थातच थंडीचे दिवस सुरू झाल्याचेच हे चिन्ह आहे. थंडीच्या दिवसांत मेथी मुबलक प्रमाणात मिळते. मात्र तिच्या कडू चवीमुळे कित्येक जण मेथीला नाक मुरडतात. पण ही मेथीची भाजी अतिशय गुणकारी आहे. मधुमेह, अंगदुखी, संधिवात, आम्लपित्त यांसारख्या विकारांवर मेथी अत्यंत गुणकारी आहे. अशा या मेथीचे आणखी कोणते औषधी गुणधर्म आहेत हे जाणून घेऊया.

>> चवीला अत्यंत कडू; परंतु आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत हितावह असा मेथीचा गुणधर्म आहे. मधुमेहाला आटोक्यात आणायला मेथीचा बराच उपयोग होतो. मेथी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी. ते पाणी दिवसभर प्यावे. असं नित्यनेमाने महिनाभर केल्यास मधुमेहाने त्रस्त असणाऱ्या रुग्णांना शरीरात आश्चर्यकारक बदल झालेला दिसून येतो. मेथी कडू असल्याने मधुमेहाच्या विकारात अत्यंत गुणकारी ठरली आहे. लघवीतून साखर जाण्याच्या विकारातही वरीलप्रमाणे उपाय केला असता गुण आल्याचं आढळून आलं आहे.

>> आपल्या रोजच्या आहारात मेथीचा वापर करायला हवा. मग ती मेथीची भाजी असो वा मेथीचा लाडू किंवा मेथीचा पराठा अशा पदार्थाचा समावेश करावा. मेथीचा लाडू दिवसातून किमान एक तरी खावा. अंगदुखीवर तो अत्यंत गुणकारी आहे. याशिवाय मेथीचा लाडू बाळंतिणीला अवश्य द्यावा. त्यामुळे वातविकाराच्या त्रासापासूनही मुक्तता मिळते. मेथीपाकाच्या सेवनामुळे वातरोग, संधिवात, आमवात, आम्लपित्त, बाळंतरोग आणि नेत्ररोग यावरही नियंत्रण राखलं जातं.

>> शरीर संगोपनासाठी सकाळ-संध्याकाळ चमचाभर मेथीपाक दुधाबरोबर घ्यावा. शरीर संवर्धनासाठी मेथीच्या तेलाचाही उपयोग केला जातो. मेथीच्या कोवळ्या पानांच्या भाजीचाही आहारात अंतर्भाव असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे मलावरोधासारखे विकार दूर होतात. पोट साफ राहते. आणि रक्तशुद्धीचेही कार्य त्यामुळे होते.

>> मेथी हे उत्तम दर्जाचं टॉनिक आहे. मेथीचे गुणधर्म वातहारक, वायुनाशक, वीर्यवर्धक, रक्तशुद्धीकारक आणि रसधातूपोषक असे आहेत. रोज सकाळी थोडी थोडी मेथी खल्ल्याने वायुविकार दूर होतो. मेथी आणि सुंठेचे चूर्ण गुळात मिसळून दिवसातून दोनदा घेतल्यास आम्लवात दूर होतो.

>> मेथीचा पराठा, गरगटे, लाडू, मेथीच्या वडया प्रसिद्ध आहेत. मेथी घालून पीठलंही तयार केलं जातं. हिवाळ्यात मेथीची भाजी विपूल प्रमाणात उपलब्ध होईल. शक्तिवर्धक भाजीचा जेवणात हमखास समावेश करावा. मेथीची पचडी हा कर्नाटकात प्रसिद्ध प्रकार आहे.

मेथीची पचडी

साहित्य : मेथीची जुडी, कांदा, दही, साखर, मीठ, तिखट, तेल.

कृती : मेथी निवडून, स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावी. त्यात कांदा, दही, साखर घालून एकत्र करावं. चवीसाठी तेलाची फोडणी द्यावी. तिखट आवडत असल्यास त्यात तिखट घालावं. दही न घालता देखील ही पचडी छान लागते. त्यात कांदा, मीठ, तिखट आणि कच्च तेल वरून घालून ती एकत्रित करावी.

Read More »

'फराळा'चा मोह आवरा..

दरवर्षी दिवाळी ही आपल्यासोबत आनंद, उत्साह घेऊन येते. परंतु त्याचसोबत गोडधोड पदार्थाची रेलचेल, पंचपक्वान्नांचे बेत, घराघरात शक्यतो वर्षभरात एकदाच बनणाऱ्या 'फराळा'शिवाय दिवाळी साजरी होऊच कशी शकेल.. तुळशीचं लग्न संपेपर्यंत दिवाळसण काही संपत नाही. मग फराळाचा फडशा पाडणं तरी कसं थांबेल.. तर फराळासह, मिठायांवरही मनमुराद हात मारणा-यांनो, आपल्या खाण्याला वेळीच आवर घाला. नाहीतर शरीरात अतिरिक्त साखर, मीठ, चरबी यांसारखे आरोग्याला घातक ठरणारे शत्रू आपलं बस्तान मांडू लागतात.

फराळातील पदार्थापैकी करंजी, शंकरपाळी, रवा-बेसनाचे लाडू, अनारसे, चिरोटे म्हटलं की, साखर आणि तूप अगदी सढळ हातानं वापरलं जातं. तर तिखटाच्या पंगतीतील चकली, चिवडा, कडबोळी, शेव हे पदार्थ चमचमीत होण्यासाठी त्यात आपसूकच नेहमीच्या पदार्थापेक्षा तिखट आणि मीठ जास्त प्रमाणात घातलं जातं. परंतु हे अति तेलकट, तुपकट, गोड, खारट आणि तिखट पदार्थ जिभेला जरी चविष्ट लागत असले, तरीही सकस आहाराच्या व्याख्येत ते निकृष्टच ठरतात.

दिवाळीदरम्यान फराळ, मिठाई वा इतर पक्वान्नांवर तुटून पडलेल्यांना, दिवाळी संपता संपता अॅसिडिटी, अपचन आणि जुलाब या समस्या भेडसावतात. आता हेच पाहा, फराळातील बेसनाचे लाडू करताना, काही जण ते आकर्षक दिसण्यासाठी त्याचा रंग पिवळसर राहावा म्हणून बेसन नीट / पूर्ण भाजत नाहीत. रव्याचे लाडू करताना तोही पूर्ण (खरपूस) भाजून घेत नाहीत. त्यामुळे असे अर्धेकच्चे राहिलेले लाडू आवडीनं जास्त खाल्ल्यास पोटाला बाधून अतिसार, आमातिसार, आव पडणं असे पोटाचे विकार संभवतात.

चकली आणि चिवडा हे खुसखुशीत पदार्थ खाताना जरी कोरडे वाटत असले, तरी त्यातही भरपूर तेल शोषलं जातं. हे तेलकट पदार्थ आणि हवेत फटाक्यांमुळे वाढलेलं प्रदूषण यांमुळे बहुतेकांना (विशेषत: रोगप्रतिकारकशक्ती कमी झालेली असलेल्यांना) हमखास घसा खवखवणं, टॉन्सिल्स सुजणं, कफ घट्ट होणं असे आजार होतात. आधी म्हटल्याप्रमाणे तेल-तूप सढळ हातानं वापरलं असल्यामुळे फराळ, मिठाई अति खाल्ल्यानं आधीच जास्त वजन असलेल्यांच्या वजनातही अधिक भर पडण्याचा धोकाही असतो. तर अशा स्थूल व्यक्तींच्या आरोग्याच्या दृष्टीनं हे धोकादायकही आहे.
या 'फराळाच्या बागुलबुवानं' घाबरलात का? आता खाऊन झाल्यावर विचार करत टेन्शन घेण्यापेक्षा, आता यापुढील किमान काही दिवस तरी आहारात कशी आणि कुठली पथ्यं पाळता येतील याचा विचार करा. त्यासाठी या काही पाककृती तुम्हाला नक्कीच मदत करतील.

दुधी भोपळ्याचे ढोकळे

साहित्य : पाव किलो दुधी भोपळा, ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ प्रत्येकी अर्धी वाटी, एक वाटी बेसन, तिखट, धणे-जिरेपूड प्रत्येकी एक चमचा, मीठ चवीनुसार, तेल.

कृती : दुधी भोपळा किसून घ्यावा. बेसनासह वरील दोन पिठं या किसामध्ये मिसळावीत. तिखट, धणे-जिरेपूड, मीठ आणि त्यावर कडकडीत गरम केलेल्या दोन चमचे तेलाचं मोहन घालून मिश्रण चांगलं एकजीव करावं. या मिश्रणाचे रोल करता येतील इतपत हे मिश्रण घट्ट असावं. हे रोल कुकरमध्ये तीन शिट्टय़ांमध्ये वाफवून घ्यावेत. थंड झाल्यावर याचे मध्यम जाडसर काप करावेत. अगदी चमचाभर तेलात तीळ आणि ओव्याची फोडणी करून ती या तुकडय़ांवर ओतून, खायला द्यावे.


भाज्यांची इडली

साहित्य : चार वाटया इडलीचं घरी तयार केलेलं पीठ (इडलीचं पीठ तयार करताना, त्यात तांदूळ व उडीद भिजत घालताना त्यात अनुक्रमे जिरे व मेथीचे दाणे प्रत्येकी अर्धा चमचा घालणे. असं केल्यानं पीठ पचायला जास्त हलकं होतं), त्यात बारीक चिरलेली फरसबी, नवलकोल, भोपळी मिरची, गाजर प्रत्येकी पाव वाटी, अर्धा चमचा आल्याचा कीस, अर्धा चमचा जिरे, चवीनुसार मीठ.

कृती : वरील सर्व साहित्य प्रमाणानुसार एकत्र करून त्याच्या नेहमीप्रमाणे वाफवून इडल्या कराव्यात.
वरील दोन्ही पदार्थ हे उकडलेले असल्यामुळे ते पोटभरीचे होण्यासोबतच पथ्यकरही आहेत.

विशेषत: वजन आटोक्यात आणू इच्छिणा-यांना हे नक्कीच उपयुक्त ठरतील.

Read More »

थंडीत घ्या बाळाची काळजी

नाही नाही म्हणतानादेखील मुंबईत सकाळच्या वेळी वातावरणात गारवा जाणवू लागला आहे. हळूहळू थंडी पडायला सुरुवात होईल. थंड हवेमुळे त्वचेतील ओलावा कमी होतो. परिणामी त्वचा शुष्क होणे, लाल होणे, खाज येणे, लालसर होणे, केसांत कोंडा होणे, सर्दी, खोकला, ताप येणे असे विकार व्हायला सुरुवात होते. थंडीचा सगळ्यात जास्त परिणाम लहान मुलांवर होतो. त्यांची त्वचा अधिक संवेदनशील असते. त्यामुळे त्यांची काळजी घेणं अधिक गरजेचं असतं. छातीत कफ साचल्यामुळे न्यूमोनियासारखे आजार त्यांना होऊ शकतात. म्हणूनच त्यांची काळजी अधिक घ्यावी. या दिवसांत लहान मुलांची काय काळजी घ्यावी, त्या विषयी..

0 नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गरम कपडे घालावेत. तसंच झोपताना त्याला डायपर घालून झोपवावं. त्याच्या त्वचेला ओलावा येणार नाही याची काळजी घ्यावी. रात्री झोपेतही डायपर खराब झालं नाही ना याची खात्री करून घ्यावी.

0 बाळ झोपण्याचं ठिकाण खिडकीच्या किंवा दरवाजाच्या बाजूला नाही याची काळजी घ्यावी.

0 बाळाला झोपवताना गादीवर किंवा उशीच्या जवळ झोपवावं.

0 थंडीत बाळाला अंघोळ घालताना त्याला थंडी लागणार नाही याची विशेष काळजी घ्यावी.

0 अंघोळ घालण्यापूर्वी सूर्यफूल आणि एरंडेल यांचं मिश्रण असलेल्या तेलाने बाळाचं मालिश करावं. त्यामुळे त्वचा मुलायम होते. दाह किंवा खाज येत नाही.

0 ज्या ठिकाणी बाळाला अंघोळ घालणार असाल ती जागा थंड तर नाही ना किंवा तिथली खिडकी उघडी नाही याची प्रथम चाचपणी करून घ्यावी. तिथली जागा उबदार आहे याची खात्री करून घ्या. तसंच अंघोळ घालण्यापूर्वी पाणीदेखील गरम आहे की नाही याची खातरजमा करून घ्यावी.

0 हिवाळ्यात बाळाच्या टाळूची त्वचा कोरडी पडते. त्यामुळे बाळाच्या टाळूवर खपल्या दिसतात. त्या हाताने किंवा ब्रशने एकदम काढायला जाऊ नका. आंघोळीच्या वेळी एक मुलामय पंचा पाण्यात प्रथम बुडवून, पिळून घ्यावा. गरम पंचाने बाळाची टाळू थोडावेळ झाकून ठेवावी. असं दररोज केल्याने त्या खपल्या आपोआप पडायला सुरुवात होईल.

0 थंडीपासून संरक्षण करण्यासाठी बाळाला स्पंज बाथ घालणंही केव्हाही उत्तम ठरतं. त्याच्या अंगावर पाणी घालण्याऐवजी त्यांला स्पंजने पुसून घ्यावं. म्हणजे बाळाला थंडी लागत नाही.

0 बाळाच्या केसांसाठी बेबी शॅम्पू आणि त्वचेसाठी मृदू-मुलायम साबणाचा वापर करावा. बाजारात हिमालय किंवा जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचं मसाज ऑइल किंवा बाळाच्या त्वचेची काळजी घेणारा सौम्य साबण उपलब्ध आहे. त्याच्या वापराने त्याची त्वचा मृदू होते.

0 बाळाला पाण्याच्या टबात अंघोळीसाठी बसवण्यापूर्वी त्याचे डोळे, कान आणि नाक कापसाने स्वच्छ करून घ्यावेत. मग पाठ, पोट आणि छातीला साबण लावावा. सगळ्यात शेवटी हाताची बोटं, नखं स्वच्छ करावीत.

0 अंघोळ घालून झाल्यावर बाळाचं शरीर पंचा किंवा सुती फडक्याने व्यवस्थित कोरडे करावेत.

0 अंग कोरडं झालं की त्यावर सर्दीचं औषध लावावं. त्यावर त्याला गरम कपडे घालावेत. हात, पाय आणि डोकं कायम झाकून ठेवावं.

0 घरात सावली असल्याने घरातही खूप थंडी लागते. त्यामुळे सकाळच्या कोवळ्या उन्हात लहान बाळांना बसवावं किंवा फिरायला घेऊन जावं. कारण सकाळच्या उन्हातून बाळाला डी जीवनसत्त्व मिळतं, जेणेकरून त्याची हाडं मजबूत होतात.

0 नवजात शिशूला आईचं दूध पाजावं त्यामुळे शिशूच्या शरीराला ऊब मिळते.

0 बाळाच्या ओठाची त्वचा खूप नाजूक असते. त्यामुळे तिची काळजी घेणं गरजेचं आहे. तिला पेट्रोलियम जेली किंवा बेबी लोशन लावावं. म्हणजे त्यांचे ओठ कोरडे पडणार नाहीत. ते मुलायम राहतील.

0 बाळाला ताप येत असेल तर लहान बाळ लघवीवाटे शरीरातील पाणी सतत बाहेर टाकतात. तेव्हा त्यांची त्वचा कोरडी कशी राहील याकडे लक्ष द्या. मधून मधून त्यांना पाणी किंवा इलेक्ट्रोलिक पावडरीचं पाणी पाजावं. बाळ जेवत असेल तर त्याला फळांचा ज्युस पाजावा.

0 थंडीत सतत गरम कपडय़ामुळेही त्वचा लालसर होते. अशा वेळी त्याच्या अंगावरील उबदार कपडे थोडे कमी करावेत. आणि त्याला मोकळ्या हवेत थोडा वेळ बसवावं.

मालीश करण्यापूर्वी

> बाळाच्या मालीशसाठी कोणतं तेल वापरावं यासाठी प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

> काही ठरावीक उत्पादनं अ‍ॅलेर्जिक किंवा रिअ‍ॅक्शन आणणारी असू शकतात. तुमच्या बाळाच्या शरीराला तेल लावण्यापूर्वी थोडं तेल त्याच्या हाताला लावून पाहा. जेणेकरून तेल अनुरूप आहे की नाही ते पाहता येईल. तेल लावलेल्या जागी बाळाला पुरळ आलं तर दुसरं पर्यायी उत्पादन लावून पाहा.

> लेबलवरील घटक काळजीपूर्वक वाचा. नैसर्गिक घटक उदा. ऑलिव्ह आणि विंटर चेरी बाळाच्या त्वचेसाठी चांगले असतात. ऑलिव्ह तेल जीवनसत्त्व 'इ'ने परिपूर्ण असतं. ते त्वचेला मऊ करतं, त्याचबरोबर संरक्षण आणि पोषण देतं. तसंच यात सूक्ष्मजीव निवारक गुणही आहेत जे त्वचेची काळजी घेतात.

> बाळाच्या पोटाला हळुवारपणे तेल लावा आणि हळुवार व सौम्यपणे स्ट्रोक द्या. मालीश करताना गरजेपेक्षा जास्त जोर लावू नका. त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता अधिक असते.

> बाळाची सोय लक्षात घ्या. मालीश तेव्हाच करावं जेव्हा बाळ ते करून देईल. बाळाला मालीशचा मजेशीर अनुभव मिळू शकेल.

> चांगलं मालीश केलं की बाळाला चांगली झोप येईल. म्हणूनच आईने बाळाच्या झोपेच्या तासांची काळजी घेणं आवश्यक आहे. त्याची झोप पूर्ण झाल्यानंतरच मालीश करावं आणि नंतर गरम पाण्याने त्याला आंघोळ घालावी. - डॉ. जयश्री केशव

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe

No comments:

Post a Comment