Tuesday, October 29, 2013

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

उटण्याचं अभ्यंगस्नान

दिवाळी.. सण चैतन्याचा, लक्ष-लक्ष दिव्यांच्या साक्षीने अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा, उत्तुंग आकाशाशी नाते साधत तेजाची लकेर उमटवू पाहणा-या आतषबाजीचा, गोडधोडाच्या मेजवानीचा, उत्सवाच्या उत्साही रंगाचा आणि तनासोबत मनामनावरही सुगंधाचा दरवळ पसरवणारा! प्रथा, परंपरेनुसार दिवाळीची पहिली अंघोळ सुगंधी उटण्याशिवाय पूर्ण होत नाही. मात्र उटण्याचा वापर ही केवळ प्रथा नसून त्यामागे शास्त्रीय कारणही दडलं आहे. काय आहे ते कारण? जाणून घेऊया, उटण्याच्या रूपातील याच सुगंधाबाबत..

भारतातील प्रत्येक सण वैशिष्टयपूर्ण आहे. प्रत्येक सणाला जोडून काही परंपरा आहेत. याच परंपरेनुसार दिवाळीच्या सणात अभ्यंगस्नान आणि या स्नानासाठी वापरल्या जाणा-या उटण्याला विशेष महत्त्व आहे. दिवाळीचा सण म्हणजे थंडीला सुरुवात आणि थंडी म्हटली की त्वचेची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. यासाठी आयुर्वेदिक उटणं उपयुक्त ठरतं. उटण्याच्या वापरामुळे मृत त्वचा नष्ट होऊन त्वचेची रंध्रे मोकळी होतात. त्वचा कोमल आणि सुगंधी होते. त्यामुळेच हे उटणं परंपरा आणि विज्ञानाशीही नातं साधतं. चेहरा आणि त्वचेबाबत जागरूक असलेली आजकालची तरुणपिढी उटणं लावायला कंटाळा करते. प्रथा-परंपरेनुसार चालत आलेलं आणि दिवाळीतील अभ्यंगस्नानासाठी महत्त्वपूर्ण असलेलं उटणं पुढील काही वर्षात भूतकाळात विलीन तर होणार नाही ना?

उटणं बनवताना कपूर कचरी, नागरमोथा, वाळा, आंबाहळद, बावची, कचुरा वडा, गुलाबफूल, दवणा, मारवा, चंदन पावडर यांचे सम प्रमाणात मिश्रण करावे आणि ते एकरूप झालं की त्याचं सुगंधी उटणं तयार होतं.

वाळा अतिशय थंड असल्यामुळे याचा उपयोग या दिवसांत करण्यात येतो. आंबेहळदीमुळे त्वचा मुलायम, नाजूक होते, चेह-यावर लावल्यास तजेलपणा जाणवतो. इतर आयुर्वेदिक मिश्रणाने त्वचेवर इतर कोणताही उपाय होत नाही; परंतु वापरल्याने प्रसन्न वाटतं. उटण्यातील कपूर कचरी, नागरमोथा, दवणा, मारवा अशा बहुतेक औषधी या सुगंधी आहेत त्यामुळेच उटण्याचा एक विशिष्ट सुवास दरवळत असतो.

काही महिला उटणं दररोज लावतात. साबणाचा वापरही करत नाहीत. चंदनाचा उपयोग त्वचेला प्रसन्न ठेवण्यासाठी करण्यात येतो. उटण्याच्या मिश्रणाचा साबणही बाजारात खास दिवाळीसाठी उपलब्ध आहे.

हिंदू संस्कृतीप्रमाणे अभ्यंगस्नानाच्या वेळी सुगंधी उटणं लावून दिवाळीच्या पहिल्या दिवशी अंघोळ करणे म्हणजे दिवाळीच्या पहिल्या दिवसाची एक प्रसन्न सुरुवात झाल्यासारखे वाटते.

Read More »

ऋतूबदलानुसार अन्नसेवन

आपल्याला जर निरोगी राहायचं असेल, तर अन्नाचं सेवन करताना, ऋतू व त्या-त्या ऋतूतील हवामानाचा अंदाज हा घ्यायलाच हवा.
आपल्याला जर निरोगी राहायचं असेल, तर अन्नाचं सेवन करताना, ऋतू व त्या-त्या ऋतूतील हवामानाचा अंदाज हा घ्यायलाच हवा. सध्या ऑक्टोबर महिना म्हणजेच ऋतूनुसार शरद ऋतू सुरू आहे. या ऋतूत सूर्य अधिक प्रकाशमान होऊ लागतो, शरीरातील दोषांमध्ये (वात, पित्त, कफ) होणारे बदल स्पष्ट होऊ लागतात.

ऑक्टोबर महिना म्हणजेच शरद ऋतूच्या काळात शरीरातील पित्त बाह्य उष्णतेने वाढू लागतं. या दिवसांदरम्यान नवरात्र हा सण येतो. नवरात्रीचे उपवास करण्याची प्रथा ही तत्त्वाला धरून आहे. हे उपवास केल्याने शरीर नवीन ऋतूसाठी तयार होतं व शरीरातील आमाचं पाचन होतं. तसंच नवरात्रींचं शीतल चांदणं नैसर्गिकरीत्या पित्तशमनाचं कार्य करतं.

विशेषत- या कालावधीत शरीरात नैसर्गिकरीत्या वाढलेल्या पित्ताचं शमन करण्यासाठी व शरीरातील बल वाढवण्यासाठी येते ती कोजागरी पौर्णिमा. शरद ऋतूतील गुणधर्मानुसार दिवसा तप्त, तर रात्री शीतल असं वातावरण असतं. खरं तर, हा निसर्गानंच साधलेला समतोल आहे. या तत्त्वावर आधारलेली अशी ही कोजागरी पौर्णिमा. या पौर्णिमेला रात्रीच्या चंद्र प्रकाशात साखर, बदाम, चारोळी, केशर, वेलची-जायफळ पूड यांची भरड आटवलेल्या दुधात मिसळून ते दूध पिण्याची पद्धत आहे. कारण दूध आणि रात्रीची (चंद्र प्रकाशाची) शीतलता ही दिवसभरातील उष्णतेने शरीरात निर्माण झालेल्या पित्ताचं शमन करते. अशा तऱ्हेने अश्विन महिन्यातील पित्त शमनाचं कार्य दसरा आणि कोजागरी या सणांद्वारे होतं.

आता आपण 'ऑक्टोबर हिट' सुसह्य होण्याकरिता आपल्या दररोजच्या खाण्यात कोणकोणत्या प्रकारच्या आहाराचा समावेश करता येईल, ते पाहूया. सकाळी शक्यतो वेळेवरच उठून प्रातर्विधी उरकून तांब्याचा कलश वा जारमध्ये ठेवलेलं मध्यम गरम पाणी, नित्यानं एक मध्यम पेलाभर प्यावं. ज्यांचा चहाशिवाय दिवस सुरूच होत नाही, अशांनी चहा उकळताना त्यात सुंठ पावडर, धणे पावडर आणि बडीशेप पावडर प्रत्येकी पाव चमचा घालावी. असा चहा प्यायल्याने कफ व पित्ताचं शमन होतं. सकाळी रिकाम्या पोटी नुसताच चहा घेऊ नये, त्यासोबत बिस्किटांऐवजी राजगिरा चिक्की बिस्किटं, मेथीचा खाकरा असे हलके पदार्थ जरूर खावेत. साधारण अध्र्या-पाऊण तासानंतर फिटनेससाठी घरच्या घरी करता येतील अशी सोपी योगासनं, सांधे (शरीर) मोकळे करणारे व्यायाम करावेत.

सकाळच्या घाईत थोडा वेळ असल्यास भाजलेल्या मुगाच्या डाळीत गोडाच्या प्रमाणानुसार गूळ व थोडं साजूक तूप घालून बनवलेली खीर व त्यासोबत एखादं केळं खाल्लं की झाली तुमची सकाळची पौष्टिक न्याहारी. कधी मूगडाळ व तांदूळ यांच्या मिश्रणाचे डोसे, लापशी रव्याचा शिरा किंवा पातळ लापशी, अगदीच न जमल्यास दूध आणि पोळी (गव्हाची चपाती) खाऊनच घराबाहेर पडावं.

सकाळीच अगदी तिखट, मसालेदार न्याहारी घेऊ नये. जेणेकरून पित्ताशी संबंधित त्रास उद्भवणार नाहीत. घराबाहेर पडण्यापूर्वी गरजेनुसार लागणारी पाण्याची बाटली (ओझं म्हणून न टाळता), ग्लूकॉन-डी, इलेक्ट्रॉल पावडरची पाकिटं न चुकता सोबत असावीत. उन्हामुळे, थकव्यामुळे, उपाशी राहिल्यामुळे चक्कर आल्यास इलेक्ट्रॉल पावडर जिभेवर टाकल्यास चक्कर थांबते. अंगाला थोडे सैल, फिक्या रंगाचे कपडे घालावेत. यामुळे सूर्याची उष्णता व हवेतील उष्णता शरीरात कमी प्रमाणात खेचली जाते. प्रवासातील चालत जाण्याच्या वेळी छत्री किंवा टोपीचा वापर न लाजता करावा. आहाराविषयी कितीही पथ्यं पाळायची म्हटलं, तरी सर्वसामान्यपणे सगळ्यांचा कल हा रुचकर, चमचमीत खाण्याकडेच असतो. म्हणूनच तुम्हाला घरीच बनवता येतील, अशा काही 'रुचकर परंतु पथ्यकर' अशा पाककृती देत आहे. नक्कीच करून बघा. पुढील लेखात अजून काही आरोग्यवर्धक पाककृती पाहूया.


मुगाची हिरवी धिरडी
साहित्य - तीन वाटया मोड आलेले मूग, तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे, अर्धा चमचा ठेचलेलं आलं, एक चमचा बारीक चिरलेला लसूण, दोन वाटया घट्ट दही, एक वाटी ताक, अर्धा चमचा हिंग, एक ते दोन चमचे साखर, एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर व चवीनुसार मीठ.

कृती - मूग, कोथिंबीर, दही, हिंग, आलं-लसूण, मिरच्या, साखर व मीठ यांचं एकत्रित मिश्रण वाटून घ्यावं. एका पातेल्यात हे मिश्रण घेऊन त्यात ताक घालावं (मिश्रण घट्टसरच राहायला हवं). एक मिनिटं हे मिश्रण झाकून ठेवावं. डोशाच्या तव्यावर एक चमचा तेल पसरावं, त्यात साधारण थालीपीठाच्या आकाराएवढं हे मिश्रण पसरावं. ही धिरडी डोशाच्या आकाराइतकी पसरू नयेत, कारण उलटताना ती तुटू शकतात. दोन्हंी बाजूंनी खरपूस भाजून घ्यावीत. ही न्याहारीत वा डब्यातही नेऊ शकता.


आरोग्यवर्धक मिक्स फ्रूट सलाड
साहित्य – पपईचे तुकडे, चिकूचे तुकडे, आंब्याचे तुकडे, सफरचंदाचे तुकडे, पेअरचे तुकडे, डाळिंबाचे दाणे, (काही फळे ऋतूनुसार उपलब्ध असल्यास) प्रत्येकी अर्धी वाटी, एक वाटी दही (घट्ट टांगलेलं) लहान मुलं वा ज्येष्ठ नागरिकांना देताना दह्याऐवजी दुधाची घट्ट साय वापरावी, तीन ते चार चमचे सुकामेव्याचं मिश्रण (काजू, बेदाणे, काळ्या मनुका, अक्रोडाचे तुकडे), दोन ते तीन चमचे दुधाचा मसाला.

कृती - सर्व फळांचे तुकडे एकत्र करावेत. एका बाऊलमध्ये दही किंवा दुधाची घट्ट साय व दुधाचा मसाला यांचं मिश्रण एकजीव करावं. खायला देताना, वाटीत वा बाऊलमध्ये आधी दही किंवा दुधाची घट्ट साय व दुधाचा मसाला यांच्या मिश्रणाचा थर, त्यावर एकत्र केलेले फळांचे तुकडे आणि वरून सुकामेव्याच्या तुकडय़ांचा थर द्यावा. हे मोठं वाटीभर सलाडही सकाळची उत्तम न्याहारी आहे.

Read More »

दिवाळी फराळ आणि आरोग्य संबंध

दिवाळीचा फराळ चविष्ट खरा, परंतु त्यात आरोग्यदायी पदार्थाचा वापर नसेल तर असा फराळ आरोग्यासाठी नक्कीच चांगला नाही. तळलेले पदार्थ त्यातही ते मैदा-साखरेचे बनवलेले असतील तर हा फराळ खाऊन आरोग्य सुधारण्याऐवजी ते बिघडण्याचीच पाळी येईल. दिवाळी फराळाला आपल्याकडे कित्येक शतकांची परंपरा आहे, पण त्यावेळचा फराळ आरोग्यसंपन्न होता. आता बनवला जाणारा फराळ कितपत पौष्टिक आहे याचा विचार करूनच त्यावर ताव मारा.

दिवाळी हा जसा दिव्यांचा-रोषणाईचा सण आहे तसाच तो सुप्रसिद्ध आहे फराळासाठी! रुचकर स्वादाचे, वेगवेगळ्या आकारांचे, विविध रंगारूपांचे एकाहून एक सरस असे जिभेला लालसावणारे फराळाचे पदार्थ हे आपल्या दिवाळसणाचं वैशिष्टयच म्हणायला हवं. दिवाळी जवळ येऊ लागल्याचं समजतं ते घराघरांमधून दरवळणा-या, नाकाला असीम आनंद देणा-या रुचकर सुगंधांनी! मुळात दिवाळसण हा अश्विन महिन्यात येतो, जो निसर्गसौंदर्याच्या आविष्काराचा आणि धान्याच्या संपन्नतेचा काळ असतो. धान्य चांगलं उत्पन्न झाल्याने धनाचीही प्राप्ती होणार असते, एकंदरीतच या वेळी धनधान्याचा सुकाळ असतो. साहजिकच सगळीकडे आनंदीआनंद असतो. हे धान्य मिळवण्यासाठी ज्याला हे काबाडकष्ट करावे लागले तो शेतकरी या मागच्या चार महिन्यांतल्या पर्जन्यकाळामधील कृषिकामाने थकून गेलेला असतो आणि आता त्या कष्टाचा आनंद घेण्यासाठी आतुर झालेला असतो. ही आहे पार्श्वभूमी दिवाळसणामध्ये पौष्टिक गोडधोड खाण्याची. आरोग्यशास्त्राच्या दृष्टीनेही विचार करता हा विसर्गकाळ आहे. निसर्गात होणारे बदल शरीरबल वाढवण्यास पोषक ठरतात. निसर्गातील त्या सकारात्मक बदलांना पौष्टिक आहाराने अधिकच बलदायक बनवण्याचा सण म्हणजे दिवाळी, जो मुख्यत्वे थंडीमध्ये येतो. मुबलक अन्न उपलब्ध असताना शीतकाळामध्ये पौष्टिक आहार सेवन करण्याचा विचार मानवाने प्राण्यांच्या निरीक्षणातूनच केला असावा. अन्न उपलब्ध आहे तेव्हा शरीरामध्ये त्या अन्नाचा (तत्जन्य चरबीचा) पुरेसा साठा करून ठेवायचा, जेणेकरून नंतर उन्हाळ्यामध्ये अन्नाचे दुíभक्ष होईल, तेव्हा त्या साठवलेल्या चरबीच्या साठयावर शरीराला गुजराण करता येईल, हा त्या अतिमात्रेमध्ये पौष्टिक अन्नसेवनाचा मूळ हेतू, जो नसíगक अवस्थेमधील प्राण्यांनी आजही अवलंबलेला दिसतो. निसर्गावर संपूर्णत: अवलंबून असलेल्या, कृषीआधारित जीवन असलेल्या मानवालाही या संकटाचा सामना काही प्रमाणात करावा लागत होता व त्यातूनच दिवाळीसारख्या अधिक ऊर्जा पुरवणा-या पौष्टिक आहाराची सांगड दिवाळी फराळाशी घातली गेली, जेणेकरून पुढे येणारा ग्रीष्मातला उन्हाळा आणि वर्षातला पावसाळा या अन्नाचा सुकाळ नसणा-या व आरोग्य दुर्बल होणा-या काळामध्ये शरीर तगून राहावं.

'शरीर निरोगी करणे' या विचाराने या सण-उत्सवादी योजना आपल्या चतुर पूर्वजांनी केल्या आहेत. त्यामुळे दिवाळी हा पूर्वापार चालत आलेला सण आहे हे निश्चित. अनेक पौराणिक कथांवरून हे सिद्ध होतंच. पण दिवाळीच्या सणाचा इतिहास पुराणकाळाच्याही मागे जाऊन पोहोचतो. उपनिषदकाळामधील गृहसंस्कारातल्या 'पार्वण, आश्वयुजी व आग्रयण' या पाकयज्ञांचं एकीकरण व रूपांतर होऊन आपण ज्याला दीपावली म्हणतो, तो उत्सव अस्तित्वात आला असावा, असं प्रसिद्ध वेदाभ्यासक 'ऋग्वेदी' म्हणतात. या पाकयज्ञांमध्ये नवीन धान्याची खीर, नवीन भातांचे पोहे वा पोह्यांचा गोड पदार्थ अशी मिष्टान्नं बनवली जायची. प्रत्यक्षात आज आपण जो फराळ बनवतो, त्या फराळामधील विविध खाद्यपदार्थाचे उल्लेख ज्या क्षेमकुतूहल, भोजनकुतूहल आदी पाकशास्त्रविषयक ग्रंथांमध्ये सापडतात, ते साधारण अकराव्या शतकात रचलेले ग्रंथ आहेत. सुप्रसिद्ध जगप्रवासी आल्बेरुनीच्या अकराव्या शतकातील भारतदर्शनामध्ये दिवाळीमधील उत्सवाचं वर्णन आहेच, जे आपल्या दिवाळ फराळाची निदान एक वर्षाची परंपरा सिद्ध करतं. या प्राचीन ग्रंथांमध्ये दिवाळी फराळाला बनवले जाणारे खाद्यपदार्थ आहेत पुढीलप्रमाणे: अपूप (अप्पे/घारगे), शालिपूप (अनारसे), शंखपाला (शंकरपाळे), सम्पाव (सारोटी), मधुशीर्षक (खाजे), शष्कुली(करंजी), चणकपुरीका (बेसनाच्या तिखट पु-या),मुद्गलड्ड (मुगाचे लाडू), सेविका (शेवया), चक्रिका (चकली) वगरे-वगरे! या खाद्यपदार्थाची नुसती यादी वाचली तरी आपल्या आहारपरंपरेची संपन्नता ध्यानात येते आणि बर्गर-पिझ्झा अशा अर्धवट पदार्थाचं कौतुक करणा-यांची कीव येते. पाश्चात्त्यांच्या तुलनेमध्ये आपल्याकडे एक प्रदीर्घ आहार परंपरा आहे. दिवाळीचा फराळ हे त्या आहार परंपरेचं-पाककलेचं कौशल्य आहे, ते येरागबाळीचं काम नाही. तुमच्या विशीपंचविशीच्या सुनेला वळीदार खुसखुशीत करंज्या बनवता येतात का नाही, हा एक पाककौशल्याचा भाग होता. आपली पाककलेची परंपरा सुदृढ ठेवण्यामध्ये अशा प्रकारे दिवाळी फराळ मोठीच भूमिका बजावत होता. दुर्दैवाने आज नाही कोणाला त्या पाककलेचं सोयर, नाही ती आहार परंपरा जिवंत ठेवण्याचं सूतक!

सोळाव्या-सतराव्या शतकाच्या आसपास विविध प्रदेशांच्या सफरीवर व्यापाराच्या उद्देशाने निघणारे युरोपियन्स आपल्यासोबत जे पदार्थ घ्यायचे त्यातले प्रमुख पदार्थ म्हणजे पांढरी साखर, पांढरे पीठ (मैदा) व पॉलिश केलेला पांढरा तांदूळ. या गोड-दाणेदार-स्वच्छ साखरेची व मुलायम मैद्याची संपूर्ण जगाला हळूहळू अशी काही भुरळ पडली की, एकोणिसाव्या शतकापर्यंत मैद्याचे व साखरेचे पदार्थ खाणं ही केवळ श्रीमंतांची मिजास होती. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यकाळामध्ये झालेल्या रोलरमिल्सच्या निर्मितीनंतर रिफाइंड साखर व मैदा मुबलक उपलब्ध होऊ लागला आणि विसाव्या शतकामध्ये त्याची एक मुख्य बाजारपेठ बनला भारत. मागच्या संपूर्ण शतकामध्ये दशकागणिक गुळाची जागा घेतली साखरेनं आणि तांदूळ-गहू-मूग आदी धान्यांची जागा घेतली मैद्यानं. मैदा व साखरेमुळे पदार्थ बनवणं सोपं झालं. ते अधिक आकर्षक दिसू लागले आणि खाताना तर असे खुसखुशीत लागत की जीभ एकदम तृप्त. मात्र चार इंची जीभ ही पाच फुटी देहाला नेहमीच अडचणीत आणते, तसंच इथेही घडलं. समाजातील ज्या सर्वोच्च स्तरातील धनिक लोकांना स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये साखर व मैदा परवडत होता, त्यांच्यामध्येच मधुमेह-हृदयरोग-कॅन्सर-स्थूलत्व संबंधित विकृती आदी आजार दिसू लागले. हे आजार श्रीमंतांचे आहेत, असं म्हणणा-या मध्यम व कनिष्ठ वर्गाकडेही मागच्या तीन-चार दशकांमध्ये थोडा पैसा वाढला आणि त्यांचंसुद्धा साखर व मैद्याचं सेवन वाढलं आणि साहजिकच दिवाळी फराळसुद्धा साखर आणि मैद्यापासून बनू लागला. मागील तीन-चार दशकांमध्ये आपल्या म्हणजे समाजातल्या मध्यम व निम्न स्तरातील घरांमध्ये शिरलेल्या मधुमेह-हृदयरोग-कॅन्सर-स्थूलत्व आदी विकारांमागे मैदा व साखर हे एक महत्त्वाचं कारण आहे, असं अनेक संशोधक छातीठोकपणे सांगत आहेत. आता बोला? त्यात पुन्हा आपण मागील काही वर्षामध्ये माव्याचे गोड पदार्थ बनवू लागलो आहोत. जो मावा चारपाचशे जोरबैठका मारणा-यांनी खावा, ही अपेक्षा असते. मग इतका जड पदार्थ असलेला मावा घरबैठया लोकांना कसा काय पचणार? जरी पचला तरी तो मधुमेह-हृदयरोग-स्थूलत्व आदी रोगांना आमंत्रण देणारच.

महत्त्वाचं म्हणजे वर सांगितलेल्या दिवाळीआधीचे काबाडकष्ट, केवळ थंडीमध्ये अन्नाची उपलब्धता, ग्रीष्म-वर्षामध्ये अन्नाचं दुíभक्ष आदी गोष्टी एकविसाव्या शतकामध्ये आपल्याला लागू होतात का? अन्नाचा सुकाळ नाही, अशी परिस्थिती आपल्यावर येणार आहे का? अन्नाशिवाय राहावं लागणार नसेल तर कशाला हवा एवढा पौष्टिक आहार? नेहमीच मुबलक ऊर्जायुक्त अन्न सेवन करणा-या आपल्याला कशाला हवाय अतिऊर्जायुक्त आहार? सदासर्वदा सहज अन्न उपलब्ध असणा-या तुम्हा-आम्हाला कशाला हवा आहे, शरीरामध्ये चरबीचा साठा आहे का? अन्नाचं दुíभक्ष होणार आहे का? मग एवढया अतिमात्रेमध्ये-इतक्या अधिक ऊर्जेने ठासून भरलेला असा पौष्टिक आहार काय करेल? निश्चितच आजारांना आमंत्रण देईल. नव्हे देत आहेच! त्यामुळे मैदा-साखर या अनारोग्यकर पदार्थानी बनवलेल्या खाद्यपदार्थाची आपल्याला गरज आहे का, याचा विचार गंभीरतेने करण्याची वेळ आली आहे. एकविसाव्या शतकामध्ये आपल्याला एवढया पौष्टिक आहाराची गरज नाही हे समजून या दिवाळी फराळामध्ये बदल व्हायला हवा. हल्ली फराळ बनवणं हे शहरी रहाटगाडयामध्ये कितपत शक्य होतं व किती घरांमध्ये फराळ बनतो, हा तसा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो. तरीही आरोग्याला पोषक असा दिवाळी फराळ बनवायचा तर तो मैद्याशिवाय बनला पाहिजे. मैद्याऐवजी तांदूळ, नाचणी, गहू, मूग आदी धान्यांचा वापर करा. साखर तर अजिबात नको, त्याऐवजी अर्थातच गुळाचा वापर करा. होता होईतो तळलेले पदार्थसुद्धा नको आणि महत्त्वाचं म्हणजे हा फराळ कष्ट-परिश्रम करणा-यांसाठी आहे, हे विसरू नका. मुळात परिश्रम नाहीच, व्यायाम केलाच तर तो एसी जिममध्ये जाऊन, घाम न काढता केलेला व्यायाम कसा हो? व्यायाम नाहीच. तर भरपूर चाला. दिवसाला निदान ५००० पावलं तरी चाललं पाहिजे. तुमच्यातले अनेक जण दिवसाला एक००० पावलंसुद्धा चालत नसतील. त्यांनी कशाला खावा पौष्टिक दिवाळी फराळ? यानंतरही तुम्हाला भरपूर प्रमाणात दिवाळी फराळ खायचा असेलच तर घरात येऊ घातलेल्या आगंतुक आजारांची तयारी आत्तापासून सुरू करा. काय?

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe

No comments:

Post a Comment