Tuesday, July 30, 2013

नैसर्गिक वेगांत आरोग्याची वाट, पावसाळयात जपा त्वचेला,

 


नैसर्गिक वेगांत 'आरोग्याची' वाट

आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये 'वेग' या संकल्पनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. परदेशी जीवनशैली जरी अत्यंत वेगवान असली, तरी आपल्या शरीरात नित्यनेमानं निर्माण होणा-या नैसर्गिक वेगांच्या बाबतीत मात्र शिष्टाचारांचं कुंपण घातलं जातं. परंतु या नैसर्गिक वेगांना अटकाव केल्यास त्याचे शरीरक्रियेवर काय आणि किती प्रमाणात विपरीत परिणाम होऊ शकतात, हे तुम्हीच पाहा..
'ताई, ताई, ती बघ समोरची बया मला केव्हापासून एकटक बघतेय आणि तोंड वाकडं करतेय,' काहीशा वैतागलेल्या स्वरातच केतन सोबत प्रवास करत असलेल्या ताईला म्हणाला. त्याची ही चिडचिड पाहून, परदेशातील संस्कृती आणि आपल्या संस्कृतीतला फरक समजावताना ताई केतनला म्हणाली, ''तू तीन-चार वेळा तिच्यासमोर शिंकलास ना, याचाच तिला राग आला असेल. त्यांच्याकडच्या शिष्टाचारांमध्ये बसत नसेल तुझं हे असं शिंकणं. तू नको बघत राहूस तिच्याकडे.'' खरं तर शरीरात निर्माण होणा-या नैसर्गिक वेगांवर (शिंक, खोकला, जांभई, ढेकर, मल, मूत्र, उल्टी, शुक्राणूवेग व अपानवायुवेग) सबंध पृथ्वीतलावरील कुठलाही माणूस नियंत्रण ठेवूच शकत नाही, हे त्रिकालाबाधीत सत्य आहे. तरीही सगळ्यांसमोर जोरात न शिंकणं, शिंकताना एखादा अपराध करत असल्याप्रमाणं लाजणं, शिंक दाबण्याचा प्रयत्न करणं आणि शिंक अगदीच अनावर झाल्यास शेजा-यालाही ऐकू येणार नाही, याची खबरदारी घेत दबकत-दबकत शिंकणं; हे झालं तथाकथित परदेशी संस्कृतीतील शिष्टाचार!
आपल्यासारख्या भारतीयांना परदेशात गेल्यावर तिथले शिष्टाचार पटकन लक्षात येत नाहीत. आपल्याकडे तर सर्व काही मुक्त आणि नि:संकोचपणे करण्याची मुभा आहे. घरात, रस्त्यात, प्रवासात कामाच्या ठिकाणी जवळपास सगळीकडेच आपल्याला अवतीभवती असलेल्यांकडून खोकला, शिंक, जांभई, ढेकर इतकंच काय तर, अगदी अपानवायू मुक्त करण्याच्या क्रियेचा ध्वनीही अगदी सर्रास ऐकू येतो. कदाचित म्हणूनच की काय, हे परदेशी नागरिक आपल्याला असभ्य आणि मूर्ख समजतात. कारण त्यांच्या मते, या वेगांचं जाहीर प्रदर्शन करू नये.
सर्वप्रथम हे लक्षात घ्यायला हवं की, हे वेग काही पूर्वसूचना देऊन येत नाहीत. कुठेही आणि केव्हाही या वेगांचं उत्सर्जन (उदीरण) हे होत असतंच. आयुर्वेदाच्या मते, या वेगांना अजिबात प्रयत्नपूर्वक थांबवू नये. कारण जर या वेगांना उदीरणापासून थांबवलं तर अनेक प्रकारचे रोग आपल्याला जडू शकतात. वर दिलेल्या उदाहरणाप्रमाणे काही अपवाद वगळले, तर जगभरातले लोक भारतीय संस्कृतीची मनापासून स्तुती करतात आणि ती प्रयत्नपूर्वक स्वीकारतातही.
मात्र त्या-त्या देशांतील संस्कृती, तिच्यात सामावलेले शिष्टाचार, काही नियम (सिद्धांत) असतात, आणि त्या ठिकाणी गेल्यावर त्यांचं पालन करणं गरजेचं असतं. परंतु नैसर्गिक वेगांचं उदीरण थांबवू नये आणि असं केल्यास धडधाकट माणूसही आजारी पडू शकतो, हे साधं गणित जेव्हा या अपवादीत परदेशस्थांना कळेल, तेव्हा हे लोकही बदलतील.
खरंच हे वेग अडवल्यास आजारपण येऊ शकतं का, याचं उत्तर 'होय' असं होऊ शकतं. 'अष्टांगहृदय (वाग्भट)' नावाच्या आयुर्वेदाच्या ग्रंथात याचं समर्पक उत्तर सापडेल. शिंक थांबवल्यावर डोकं, मान दुखते, आखडली जाते, Bells Palsy (अर्दित म्हणजेच तोंडाचा लकवा) यासारखे रोग होतात. डोळे, कान, नाक ही इंद्रियं कमकुवत होत जातात. तसंच शिंका व जांभई थांबवल्यावर मानेच्या वरच्या भागात वायुमुळं होणा-या रोगांचं प्रमाण वाढतं.खोकला थांबवल्यावर दमा (अस्थमा), अरुची (भूक मंदावणं), पाणी पिऊनही न थांबणारी उचकी आणि खोकल्याचं प्रमाण वाढतं. हृदयाशी संबंधित रोगही होण्याचा धोका निर्माण होतो. पादणं थांबवल्यास पोट फुगतं, मलबद्धता (कॉन्स्टिपेशन) होतं, लघवी अडकते, तसंच डोळ्यांची दृष्टी मंद होते (धुरकट, कमी दिसू लागतं), जठराग्नी (पाचकाग्नी) मंदावतो. तसंच ढेकर थांबवल्यावर अरुची, शरीर थरथरतं, छाती गच्च झाल्यासारखी वाटते.
एक-दोनदा हे वेग थांबवल्यास वरील रोगांचा प्रादुर्भाव होत नाही. परंतु वरचेवर वेगोधारण केल्यास ते शरीरासाठी घातक ठरू शकतं. याव्यतिरिक्त मल-मूत्र विसर्जन, भूक-तहान, झोप, उल्टी, अश्रू अशा वेगांचं थांबवणंही आयुर्वेदानुसार निषिद्ध आहे.
मित्रांनो, भारतीय असण्याचं महत्त्व जाणून घेऊन या देशात उपभोगता येणा-या मोकळीकीप्रमाणेच आपल्या शरीरातील नैसर्गिक वेगांनाही वाट मोकळी करून द्या आणि पर्यायानं निरोगी राहा! –  डॉ. रवींद्र उपाध्याय
Read More »

'माये'च्या दुधाची साठवण

काही कारणास्तव आई अंगावर बाळाला पाजू शकत नाही. पूर्वी त्याला पर्याय होता ओल्या दायीचा. पण हा पर्याय व्यवहार्य नाही. त्याला आता पर्याय आहे, 'ह्युमन मिल्क बँक'चा. म्हणजेच 'मातृदुग्ध पेढी'चा. आजच्या घडीला मुंबई, उपनगर आणि ठाणे परिसरात एकूण पाच मिल्क बँक कार्यरत आहेत.
मूल रडायला लागलं की, पूर्वी त्याला लगेच पदराआड घेऊन पाजलं जाई. अशा स्त्रीला अडाणी, अशिक्षित समजण्याचा एक जमाना होता. खरं तर तीच स्त्री योग्यरितीने स्तनपान देत होती, असं आजचं विज्ञान सांगतं. पण हे समजण्यास साधारण एक शतक तरी जावं लागलं. मध्यंतरीच्या काळात स्तनपानाची जागा दुधाची पावडर, बाटली आणि बालान्नाने (बेबी फूड) घेतली. आईच्या दुधापेक्षा पावडरचं दूध आणि घरी बनवलेल्या ताज्या अन्नपदार्थापेक्षा बंद डब्यातील शिळं, महागडं बालान्न अधिक पौष्टिक आणि आरोग्यदायक असतं, असा प्रचार जाहिरातींद्वारे करण्यात आला.
तो इतका लोकांच्या मनावर बिंबला गेला की, तो सहजासहजी पुसणं कठीण होऊन बसलं होतं. त्यामुळे पावडरचं दूध आणि बंद डब्यातील खाऊचा वापर बाळासाठी सर्रास होऊ लागला. पण जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे असा खाऊ खाणारं बाळ गुटगुटीत वाटण्यापेक्षा किडकिडीत, वारंवार लघवी करणारं, चिडकं होतं. हे असं का? तर दूषित पाणी, अस्वच्छ भांडी, अस्वछ बाटली यामुळे जंतुसंसर्ग होतो. मूल सारखं आजारी पडतं. पावडर महाग असल्यामुळे म्हणा किंवा दूध बनवण्याची पद्धत माहीत नसल्यामुळे म्हणा पावडर कधी कमी घातली जाते, तर कधी जास्त. त्यामुळे पोषणदोष उद्भवतो. याचे परिणाम म्हणजे अशा मुलांचा बौद्धिक विकास आणि शारीरिक वाढ मंदावते. दात पुढे येतात. जंतुसंसर्गामुळे अतिसार होऊन तसंच कुपोषणाने मृत पावणा-या मुलांची संख्या दरवर्षी १० ते १५ लाख इतकी आहे. हे टाळण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे स्तनपान.
आईचं दूध नवजात अर्भकांसाठी अमृतासमान असलं तरी काही मातांना विविध कारणांमुळे बाळांना स्तनपान देणं शक्य होत नाही. परदेशातील 'फिगर कॉन्शियस' महिला स्तनपान करणं टाळतात. भारतातील बहुसंख्य महिलांची तशी विचारसरणी नसली तरी सिझेरियेन झालेल्या अनेक मातांमध्ये सुरुवातीच्या काही दिवसांत दूध येत नाही. काही माता या कुपोषित असतात तर काहींना अन्य कारणास्तव स्तनपान शक्य होत नाही. म्हणजे उदा. आईला क्षयरोगाची बाधा असणं (तिचे उपचार सुरू केल्यावर सुमारे दोन महिन्यांनी तिच्या थुंकीत क्षयरोगाचे जंतू न सापडल्यास दूध देण्यास हरकत नसते) आईला कावीळ, एड्स, इतर मानसिक आजारांची लागण होणं, या कारणांमुळे बाळाला दूध पाजता येत नाही. आईची थायरॉइड, मधुमेह या आजारातील गोळया, झोपेची औषधं, रेचकं, कॅन्सर- फेफ-यावरची औषधं, सल्फा, टेट्रासायक्लीन, इस्ट्रोज ही औषधं चालू असतील तर बाळाला आईच्या दुधापासून वंचित राहावं लागतं. स्तनात गळू झाल्यावर, आई हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असल्यावर, बाळाचा जन्म होताच आईचं निधन झाल्यामुळेही मातेच्या दुधाला मुकावं लागतं. या जन्मदात्रीच्या दुधापासून वंचित राहणा-या बाळांसाठी पर्याय आहे, 'हय़ुमन मिल्क बँक'चा म्हणजे 'मानवी दुग्ध पेढी'चा.
फिगर कॉन्शियस आयांमुळे परदेशात 'हय़ुमन मिल्क बँक'ची संकल्पना रुजली. भारतात आणि महाराष्ट्रात ही संकल्पना आणली लोकमान्य टिळक म्युनिसिपल जनरल हॉस्पिटलच्या (सायन हॉस्पिटल) बालरोगतज्ज्ञ आणि अधिष्ठाता डॉ. अल्मिडा फर्नाडिस यांनी. स्तनपानाचा पुरस्कार करणा-या डॉ. अल्मिडा यांनी Training manual on Brestfeeding management steps towards Baby friend "y care" ही पुस्तिका लिहिली होती. या पुस्तिकेचं प्रकाशन 'युनिसेफ'ने केलं होतं. पुस्तिकेच्या निमित्ताने डॉ. अल्मिडा यांचं अमेरिकेत जाणं झालं.
तिथे त्यांना 'हय़ुमन मिल्क बँक' या संकल्पनेविषयी समजलं. आईच्या दुधाला वंचित राहिलेल्या बाळाला वरचं दूध म्हणून गाई-म्हशीचं दूध नाहीतर पावडरीचं दिलं जाई. मात्र आईच्या दुधात असणारी संरक्षक द्रव्यं या दुधात नसतात. बाळाच्या आरोग्यासाठी लागणारी पोषणद्रव्यंही अत्यंत अल्प प्रमाणात असतात. अशा वरच्या दुधावर असणा-या बाळांना जंतुसंसर्ग होतो. बाळ वारंवार आजारी पडतात. अशा बाळांसाठी १९८९ साली डॉ. अल्मिडा यांनी आशिया खंडातील पहिली मातृदुग्ध पेढी स्थापन केली. आतापर्यंत 'रक्त पेढी', 'नेत्र पेढी', 'शुक्राणू पेढी' (स्पर्म बँक), 'स्कंधकोशिका पेढी' (स्टेम सेल बँक) याविषयी ऐकलं असेलच. 'अवयवदान', 'देहदान' हेही ठाऊक असेल. या प्रकारचीच एक संकल्पना म्हणजे 'मिल्क बँक'. यात आई आपल्याकडचं जास्तीचं दूध दान करते.
''बाळंतपणानंतर काही वेळेस आईच्या शरीरात बाळाच्या गरजेपक्षा जास्त दूध तयार होतं. अशा वेळेस ते दूध फेकून न देता त्यांना दान करण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. या दुधाचा उपयोग अपु-या दिवसांच्या बाळांसाठी किंवा अतिदक्षता विभागात ठेवलेल्या बाळाच्या अन्नासाठी होतो. एवढंच नाही तर ज्या स्त्रियांना बाळंतपणानंतर बाळाला पाजण्यासाठी अजिबातच दूध येत नाही किंवा आईला एचआयव्ही किंवा 'ब' गटातील काविळीची लागण झालेली असते, त्या आईच्या बाळासाठी मातृदुग्ध पेढीतील दुधाचा उपयोग केला जातो,'' अशी माहिती सायन हॉस्पिटलमधील नवजात अर्भक विभागाच्या प्रमुख आणि प्राध्यापक डॉ. जयश्री मोंडकर यांनी दिली.
मातृदुग्ध पेढीतील दूध हे बाळाच्या आरोग्यासाठी सुरक्षित असतं का, असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. त्याविषयी डॉ. मोंडकर सांगतात, ''कोणत्याही आईच्या दुधाएवढंच हे दूध सुरक्षित असतं. म्हणूनच आम्ही बाळंतपणानंतर प्रत्येक आईला 'मिल्क बँकिंग'चं महत्त्व पटवून देतो. बाळंतपणानंतर निरोगी प्रकृती असणा-या स्त्रीच्या दुधाची साठवण इतर बाळांसाठी केली जाते. दूध हे शास्त्रोक्त पद्धतीने साठवलं जातं. ब्रेस्ट पंपाच्या मदतीने स्टिल कंटेनरमध्ये सर्वात आधी थोडं म्हणजे साधारण पाच मिलीलिटर दूध काढून घेतलं जातं. मग हे दूध प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलं जातं. प्रयोगशाळेतून दुधाची शुद्धता तपासल्यावर आईकडून जास्त दूध घेतो. या दुधाचं ५६ ते ६३ अंश सेल्सिअस तापमानावर तीस मिनिटांसाठी पाश्चरायझेशन करतो. या प्रक्रियेमुळे दुधातील मौल्यवान पोषक घटक तसेच राहून जिवाणू नष्ट होतात. दुधाचं कल्चर केलं जातं.
या प्रक्रियेमुळे दूध स्तनपानाच्या दुधाइतकंच चांगलं आणि पौष्टिक राहतं. त्यानंतर दुधाची तपासणी केली जाते. त्या दुधात पुन्हा कुठलाही दोष न आढळल्यास ४०० मिलीलिटर इतकं दूध मावेल अशा स्टीलच्या र्निजतुक डब्यात ठेवतो. हा डबा फ्रीजरमध्ये उणे २० अंश सेल्सिअस तापमानाला ठेवतो. हे दूध सहा महिन्यांपर्यंत टिकू शकतं. 'वर्ल्ड हय़ुमन मिल्क बँक असोसिएशन'ची नियमावली आहे. त्या नियमावलीप्रमाणे आम्ही आमच्याकडची मिल्क बँक चालवतो.''
''मिल्क बँकमध्ये 'साधारण सहा महिन्यांपर्यंत दूध राहू शकत असलं तरी आमच्या मातृदुग्ध पेढीतील दूध आठवडाभरातच वापरलं जातं. कारण मागणी आणि पुरवठयाचं गुणोत्तर दिवसेंदिवस व्यस्त होत आहे. प्रत्येक दिवशी आमच्या मातृदुग्ध पेढीत साधारण चार ते पाच लिटर दूध जमा होतं. सायन हॉस्पिटलमध्ये वर्षाला १२ हजार स्त्रियांची प्रसूती होते, तर हॉस्पिटलच्या नवजात अर्भक विभागात साडेतीन हजार बाळं उपचारासाठी येतात. त्यांच्या सुश्रूषेसाठी आम्ही पेढीतील दुधाचा वापर करतो. या प्रक्रियेत आम्ही दात्याला पैसे देत नाही आणि मिल्क बँकेतील दूध वापरल्याबद्दल पैसेही घेत नाही. ही पूर्णत: विनामूल्य सेवा आहे,'' ही माहिती देत डॉ. मोंडकर यांच्या चेह-यावर एक वेगळंच समाधान असतं.
आईचं दूध उपलब्ध न होऊ शकणा-या बाळांसाठी मातृदुग्ध पेढीचा पर्याय योग्य असल्याचं मत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. विनिता साळवीही व्यक्त करतात. ''आईला भरपूर दूध यावं यासाठी तिने तिचं आईपण आनंदाने स्वीकारालं पाहिजे. तसंच गर्भारपणात तिने बाळाला अंगावरचं दूध पाजण्याचा निर्धार करायला हवा. बाळाला पहिलं चीक दूध पाजलंच पाहिजे; पण कधी कधी दुर्दैवाने आईचं दूध बाळाला देता येत नाही. तेव्हा पर्याय उरतो तो मिल्कबँकचा. सायन हॉस्पिटलनंतर आता कामा, केईएम आणि जे.जे. हॉस्पिटलमध्येही मातृदुग्ध पेढय़ांची सुरुवात झाली आहे. २०१२ साली रोटरी क्लब ऑफ ठाणे (नॉर्थ एण्ड) यांच्या पुढाकाराने ठाणे महापालिकेच्या कळवा हॉस्पिटलमध्येही मातृदुग्ध पेढीची स्थापना झाली.''
''मातृदुग्ध पेढय़ांची यशस्वी वाटचाल पाहता आता इतरही हॉस्पिटलमध्ये मातृदुग्ध पेढया सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील,''असा अशावाद डॉ. साळवींच्या बोलण्यातून व्यक्त झाला.
स्तनपान हा बाळाचा हक्क आहे. बालकांच्या दुधाला पर्यायी अन्न, दूध पाजण्याच्या बाटल्या आणि बालकांचे खाद्यपदार्थ (उत्पादन, पुरवठा आणि वितरण नियमन) यांच्या संदर्भातील कायदा १९९२ हा ३० डिसेंबर १९९२ च्या परिपत्रकात जारी केला गेला. एक ऑगस्ट १९९३ पासून संपूर्ण भारतभर अमलात आला. स्तनपानाच्या मोहिमेचा जगभर प्रसार आणि प्रचार व्हावा, यासाठी एक ते सात ऑगस्ट १९९४ या दरम्यान स्तनपान सप्ताह पाळला गेला. तेव्हापासून ऑगस्ट महिन्यातील पहिला आठवडा हा 'जागतिक स्तनपान सप्ताह' म्हणून पाळला जातो. पण कायदा तयार झाला असूनही दुधाचे आणि बालान्नचे डबे यांची विक्री कमी झाली आहे का? तर नाही. उलट ती वाढतच आहे. आजच्या स्त्रियांना बाळाला अंगावरचं पाजण्यासाठी वेळ कुठे आहे, सहा महिने बाळाला दूध पाजणं अवघड, तर दीड-दोन र्वष कसं पाजणार? असा प्रश्न विचारला आहे. कायद्याने प्रश्न सुटत नाहीत. शेवटी गरज असते लोकशिक्षणाची, हे यातून दिसून येतं. खासकरून आईच्या शिक्षणाची. शारीरिक आणि मानसिक आजारांमुळे बाळाला दूध न देऊ शकणा-या मातांपुढे मातृदुग्ध पेढीचा पर्याय आहे. तेव्हा बाळाला बाहेरचा खाऊ देण्यापेक्षा दुग्ध पेढीतील आईचं दूध देऊन सुदृढ, निरोगी पिढी निर्माण करता येईल.

Read More »

पावसाळयात जपा त्वचेला..

पावसाळयात त्वचेतील ओलावा कमी होऊन ती कोरडी होते. यासाठी चेहरा धुण्याकरता साबणाऐवजी साबणविरहित फेसवॉशचा वापर करावा. 
>> पावसाळयात त्वचेतील ओलावा कमी होऊन ती कोरडी होते. यासाठी चेहरा धुण्याकरता साबणाऐवजी साबणविरहित फेसवॉशचा वापर करावा. कोरफड आणि कडुनिंबाचे घटक असलेल्या फेसवॉशची निवड करावी.
>> या दिवसांत त्वचेवरील मृतपेशींचा थर वाढत जातो. यामुळे त्वचा आठवडयातून किमान एकदा तरी त्वचेला एक्सफॉलिएट करावं. एक्सफॉलिएटमुळे त्वचेत खोलवर गेलेला मळ निघण्यास मदत होते. त्वचेवरील मृत पेशी, ब्लॅकहेड्स, व्हाइटहेड्स आणि मळ काढून टाकण्याकरता जर्दाळू, कडुनिंब आणि आक्रोड यांच्यापासून बनवलेल्या स्क्रबरचा वापर करावा. स्क्रबर लावताना त्वचा जोरजोरात घासू नये. स्क्रबर लावताना डोळयांभोवतालचा भाग सोडावा. स्क्रबर त्वचेवर लावताना जोरजोरात घासू नये. त्यामुळे त्वचा लाल होऊन चुरचुरते. जखमाही होतात. चेहरा कोमट पाण्याने धुऊन टाकावा. हलकेच कोरडा कारवा. त्वचेवरची मोकळी झालेली छिद्रं बंद करण्याकरता त्वचेवर बर्फ लावावा.
>> स्क्रबनंतर चेह-यावर फेसपॅक लावावा. फेसपॅकमुळे त्वचेचं क्लिन्झिंग होतं. त्यामुळे त्वचेच्या छिद्रांतील मळ, त्वचेवरील मृतपेशी आणि अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत होते. फेसपॅक त्वचेवर, गरजेपेक्षा जास्त काळ चेह-यावर ठेवला गेल्यास ती ताणली जाऊन सैल पडते.
>> पावसाळयात त्वचेतील ओलावा कमी होत असल्याने एखाद्या उत्तम मॉइश्चरायझरच्या साहाय्याने त्वचेला मॉइश्चराइज करणं गरजेचं आहे. कोको बटर आणि जीवनसत्त्वं असलेल्या मॉइश्चरायझरची निवड करावी.
>> केस धुण्यापूर्वी केसांना तेलाने चांगला मसाज करा. आवळा आणि भृंगराज वनौषधी असलेलं तेल वापरा. या घटकांमुळे डोक्यातील रक्ताभिसरण सुधारून टाळू आणि केसांचे संरक्षण होण्यास मदत होते.
>> चिकपी आणि गुझबेरी आशा नैसर्गिक घटकांनी युक्त सौम्य प्रोटिन श्ॉम्पू निवडा. या फळांमध्ये असलेल्या प्रथिनांच्या प्रमाणामुळे केसांचं पोषण होतं. – चंद्रिका महेंद्र, ज्येष्ठ संशोधक (हिमालय ड्रग कंपनी)

Read More »
 




No comments:

Post a Comment