Tuesday, July 2, 2013

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

लठ्ठपणाचे कारण बेसुमार खाणेच

माणूस लठ्ठ होत चालला आहे, कारण नव्या जीवनशैलीत त्याला व्यायामासाठी वेळच नाही, अशी आपली आतापर्यंतची समजूत. म्हणजे अशी समजूत शास्त्रज्ञांनीच करून दिली आहे. पण आता या समजुतीच्या पार ठिक-या उडाल्या आहेत. एका संशोधनात आढळून आलं आहे की, माणूस जाड होतो तो त्याच्या बेसुमार खाण्यामुळेच, व्यायामाच्या अभावामुळे नाही.

आफ्रिकेतील टांझानिया देशातील हाद्झा आदिवासी जमातीचा अभ्यास करून शास्त्रज्ञांनी हा निष्कर्ष काढला आहे. या जमातीचे लोक अजूनही आदीमानवाप्रमाणे जंगलातील वनस्पती आणि शिकारीवर उदरनिर्वाह करतात.

त्यांचा अभ्यास केल्यावर शास्त्रज्ञांना आढळून आलं की, आपल्याला आवश्यक असणा-या कॅलरीज हे निश्चित असं मानवी वैशिष्टय़ आहे. म्हणजेच आपल्याला किती कॅलरीज आवश्यक आहेत हे ठरलेलं आहे. याचाच अर्थ असा की, आधुनिक काळात वाढत असलेला लठ्ठपणा हा आधुनिक निष्क्रिय जीवनशैलीचा भाग नसून अति खाण्याचा परिणाम आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, जगातील दर तीन माणसांपैकी एकाला लठ्ठ होण्याचा धोका आहे. या लठ्ठपणाला पाश्चिमात्य जीवनशैली कारणीभूत असल्याचं मानलं जातं. मात्र माणूस लठ्ठ होण्याला इतरही अनेक कारणं आहेत. यात प्रक्रिया केलेले, भरपूर साखर, चरबी असलेल्या अन्नाबरोबरच दैनंदिन कामं करण्यासाठी शारीरिक कष्ट करण्याऐवजी यंत्रांचा आधार घेणं, जास्तीत जास्त बैठी कामं करणं अशा घटकांचाही समावेश आहे. काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, औद्योगिक क्रांतीनंतर आपल्या शरीरातलं आवश्यक कॅलरीजचं प्रमाण कमालीचं घटलं आहे आणि आहारातील बदलापेक्षा लठ्ठपणासाठी हा घटक सर्वात धोकादायक आहे.

'पीएलओज वन' या मासिकात प्रकाशित झालेल्या संशोधनात या सिद्धांताचं परीक्षण करण्यात आलं. टांझानियातील हाद्झा जमातीतील लोक त्यांची ऊर्जा कशी खर्च करतात याचा अभ्यास शास्त्रज्ञांनी केला. हाद्झा लोक आजही जंगलातील शिकारीवर जगतात, म्हणूनच प्राचीन मानवी जीवनशैलीचं उदाहरण म्हणून या अभ्यासासाठी या लोकांची निवड करण्यात आली. एक हजारांच्या आसपास संख्या असलेले हाद्झा लोक प्राण्यांची शिकार करण्यासाठी आणि जंगली फळे, कंदमुळे आणण्यासाठी आजही बाण, लहान कुऱ्हाडी आणि खणण्यासाठी काठय़ांचा वापर करतात. ते आधुनिक शस्त्र किंवा बंदुकांचा वापर करत नाहीत.

अमेरिका, टांझानिया आणि युनायटेड किंगडममधील शास्त्रज्ञांच्या एका गटाने १८ ते ७५ वर्ष वयोगटातील ३० स्त्री-पुरुषांच्या शरीरातील ऊर्जा खर्च होण्याच्या प्रमाणाचं मोजमाप केलं. तेव्हा त्यांना आढळून आलं की, हाद्झा स्त्री-पुरुषांमधील शारीरिक हालचालींचं प्रमाण खूपच जास्त होतं. पण जेव्हा त्यांच्या आकार आणि वजनाची तपासणी केली तेव्हा आढळून आलं की त्यांच्या चयापचयाचं प्रमाण हे पाश्चिमात्य लोकांपेक्षा वेगळं नव्हतं. अमेरिका किंवा युरोपमधील प्रौढ माणसांच्या तुलनेत हाद्झा शिकारी कितीतरी मोठय़ा प्रमाणात त्यांच्या कॅलरीज खर्च करत असणार असंच सगळ्यांना वाटलं होतं, असे अमेरिकन शास्त्रज्ञ डॉ. हर्मन पॉँट्झर यांनी सांगितलं. पण जी माहिती मिळाली त्याने सगळेच चकीत झाले. ऊर्जा खर्च होण्याची ही प्रक्रिया गुंतागुंतीची असल्याचं ते सांगतात.

शास्त्रज्ञांनी काहीही निष्कर्ष काढला तरी निरोगी राहण्यासाठी शारीरिक व्यायाम आवश्यक असल्याचं मत डॉ. पॉँट्झर यांनी व्यक्त केलं. त्यांचं म्हणणं आहे की, पाश्चिमात्य किंवा आधुनिक जीवनशैली व्यतीत करणा-या व्यक्तींचा आहार जास्त असल्याने त्यांचा लठ्ठपणा वाढतो आहे, ते व्यायाम करत नाहीत म्हणून नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही सक्रिय असणं, हे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे, पण त्यामुळे तुम्ही सडपातळ राहताच असं नाही. त्यासाठी तुम्हाला कमी खावं लागेल. उत्क्रांतीमुळे कदाचित आपला दैनंदिन ऊर्जाखर्च निश्चित झाला असण्याची शक्यता आहे आणि तो सर्व लोकांमध्ये सारखाच आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

Read More »

कडू कारले आरोग्यासाठी मात्र चांगले!

कारले चवीला कडू असले तरी अनेक गुणधर्मानी युक्त आहे. कारल्याचा मूळ गुणधर्म थंड असून ते पचायला हलके असते. शरीरातील वायू वाढवून पचनक्रिया प्रदीप्त करीत पोट स्वच्छ करत असते. प्रत्येक १०० ग्रॅम कारल्यामध्ये जवळपास ९२ ग्रॅम पाणी असते.

कारले चवीला कडू असले तरी अनेक गुणधर्मानी युक्त आहे. कारल्याचा मूळ गुणधर्म थंड असून ते पचायला हलके असते. शरीरातील वायू वाढवून पचनक्रिया प्रदीप्त करीत पोट स्वच्छ करत असते. प्रत्येक १०० ग्रॅम कारल्यामध्ये जवळपास ९२ ग्रॅम पाणी असते. त्याचसोबत यामध्ये जवळपास ४ ग्रॅम काबरेहायड्रेट, १५ ग्रॅम प्रोटिन, २० मिलीग्रॅम कॅल्शियम, १७ मिलीग्रॅम फॉस्फरस, १८ मिलीग्रॅम लोह आणि अत्यंत कमी प्रमाणात फॅट्स असतात.

यामध्ये अ आणि क जीवनसत्त्वदेखील असतं. ज्याचं प्रमाण अनुक्रमे प्रत्येक १०० ग्रॅमसाठी १२६ मिलीग्रॅम व ८८ मिलीग्रॅम असतं. पाणी अधिक आणि फॅट कमी असल्यामुळे उन्हाळ्यासाठी ते अतिशय चांगलं असतं. कारलं खाल्ल्यामुळे त्वचा स्वच्छ होते आणि कुठल्याही प्रकारची मुरूमं अथवा पुटकुळ्या येत नाहीत. कारलं भूक वाढवतं आणि मळ शरीराबाहेर काढतं. मूत्रमार्गदेखील स्वच्छ करतं. यामध्ये क जीवनसत्त्व अधिक असल्यामुळे शरीरातील ओलावा कायम राखण्यासाठी आणि ताप आलेल्या स्थितीत अतिशय लाभदायक असतं. कारल्याची भाजी खाल्ल्यामुळे कधीही बद्धकोष्टता होत नाही. यामुळे अ‍ॅसिडिटी, छातीत जळजळणं आणि आंबट ढेकर येणं या तक्रारी दूर होतात.

वाढलेलं यकृत, प्लिहा आणि मलेरियाचा ताप यामध्ये कारलं अतिशय लाभदायक सिद्ध होतं. त्याचबरोबर सांध्यांचे दुखणे तसंच संधिवातामध्ये देखील कारल्याची भाजी कडूपणा न घालवता दिवसातून तीन वेळा खावी असा काही तज्ज्ञांद्वारे सल्ला दिला जातो. त्वचारोग, कृष्ठरोग तसंच मूळव्याधीमध्येही कारलं मिक्सरमध्ये बारीक करून प्रभावीत ठिकाणी हलक्या हाताने हा लेप लावल्यास फायदा होतो. रात्री झोपण्यापूवी हा लेप लावावा. कारल्याच्या एक चमचा रसात साखर मिसळून हे मिश्रण प्यायल्यास मूळव्याधीमध्ये रक्त पडत असल्यास फायदा होतो. या रसाच्या सेवनामुळे गर्भवती स्त्रियांमध्ये दुधाचं प्रमाण वाढतं.

कारलं शरीराचा दाहदेखील दूर करतं. शरीराच्या ज्या भागात जळजळ होत असेल, तिथे कारल्याच्या पानांचा रस चोळावा. मूलभूत शीतल प्रकृती असल्यामुळे या उपायाचा त्वरित लाभ होतो. मधुमेही रुग्णांसाठीदेखील कारलं फायद्याचं असतं. त्यांनी कारल्याचं सेवन केलं पाहिजे.

कडूपणा दूर न करता कारल्याची भाजी तसंच त्याची पाने किंवा कच्च्या कारल्याचा रस उन्हाळ्यात सकाळ-संध्याकाळ घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी बरीच कमी होते. कारल्याचा रस पोटातील जंतदेखील दूर करतो. लोहतत्त्व अधिक प्रमाणात असल्यामुळे कारलं अ‍ॅनिमिया, रक्तदाब हे आजारदेखील दूर करतो. कारल्याचा रस तीन दोष म्हणजे वात, पित्त आणि कफ यांचा नाश करतो. कांजण्या, देवीचा आजार आणि गोवर या आजारातदेखील कारलं उकडून रुग्णाला खाऊ घातलं जातं. असे हे बहुगुणी कारले आपल्या आहारात नियमितपणे समाविष्ट करावे.


कार्ल्याची भजी

साहित्य : १ कार्ले, नाचणीचं पीठ- १ वाटी, चिमूटभर हिंग, लाल मिरची पूड- १ टी स्पून, आमचूर पूड- १/२ टी स्पून, सोडा चिमूटभर, चवीनुसार मीठ, १ लिंबाचा रस, पाणी, तेल.

कृती : कार्ले चांगले धुऊन घेऊन त्याच्या पातळ गोल चकत्या कापा. ह्या चकत्यांना लिंबाचा रस आणि थोडे मीठ लावून १५-२० मिनिटे ठेवा. नंतर ह्या चकत्या पाण्याने २-३ वेळा नीट धुवा.

एका कढईत तेल तापवायला ठेवा. तेल तापेपर्यंत नाचणीच्या पिठात हिंग, लाल मिरची पूड, सोडा, मीठ, आमचूर पूड, पाणी टाकून भजीचं पीठ तयार करा. तेल गरम झालं की त्यात काल्र्याचे काप बुडवून भजी तेलात सोडाव्यात. ही भजी दोन-तीन मिनिटे चांगली तळा.

कार्ल्याची ही गरमागरम भजी कोणत्याही पातळ चटणीबरोबर किंवा सॉससोबत खाता येते.

टीप : ही भजी डायबिटीस असलेल्या लोकांसाठी तर उत्तमच!

Read More »

नैसर्गिक आरोग्य गुटी!

पावसाळ्याच्या दिवसांत बाजारात फेरफटका मारल्यास आपल्याला विविध रंगांच्या, प्रकारच्या रानभाज्या पाहायला मिळतात. डोंगरउतारावर, नदी किना-यावर, ओढा-विहीर तसंच नदीपरिसरांत, रानवाटांवर, कधी कधी शेताच्या बांधावर तर कधी घरामागच्या परसात या भाज्या आपसुकच उगवतात, तेही रासायनिक खतं, कीटकनाशकं यांच्या वापराशिवाय. आजच्या 'फास्टफूड-जंकफूड' खाणाऱ्यांचं प्रमाण दिवसागणिक वाढणा-या जमान्यात 'पौष्टिक खा, निरोगी राहा'असं वारंवार सांगितलं जातं. अशा वेळी या रानभाज्या प्रत्येकासाठी 'हेल्थ टॉनिक'च ठरत आहेत.

'पावसाळ्यात धरती हिरव्या रंगाने उजळून जाते' किंवा 'पावसातला धरतीचा हिरवा रंग पाहून जणू ती हिरवाकंच शालूच नेसली आहे, असं वाटतं' यांसारख्या उपमा आजपर्यंत अनेकदा निबंध, ललित निबंध, गोष्टी, व्याख्यानं, कविता यांतून अनेकदा कानावर पडल्या असतीलच; पण एका अर्थी पाऊस आणि हिरवा रंग यांचं नातं सांगणा-या लालित्यपूर्ण उपमा तंतोतंत ख-या आहेत. पावसाळय़ात निसर्गाची विविध रूपं आपल्याला पाहायला मिळतात. या रूपांपैकीच एक म्हणजे हिरव्या रंगाच्या विविध छटा असणा-या रानभाज्या. (क्वचितच एखाद् दुसरी भाजी लाल, शेंदरी नाही तर तपकिरी रंगाची असते.)

या रानभाज्यांचं वैशिष्टयं म्हणजे त्या रासायनिक खतं, कीटकनाशकं यांच्या वापराशिवाय आपोआप उगवतात. त्यामुळे त्या भाज्यांमधील पौष्टिक गुणधर्मात दुपटीने वाढ होते. परिणामी या रानभाज्या विविध आजारांवर, विकारांवर गुणकारी ठरतात. या पावसाच्या दिवसात पोकळा, केनी, मायाळू, मोहाची फुलं, राजगिरा, आपटयाच्या पानांसारखी पण मऊ लुसलुशीत कोरलाची पानं, गवताप्रमाणे दिसणारी फोडशी, चिंचेच्या पानांप्रमाणे दिसणारा कोवळय़ा पानांचा खुरासन, तेलपट, शेवळी, रानटी माठ, लोत, तोरणा, कोरळ, नारणवेल, घालवेल, धोरता, कुंडा, दिंडा, रानटोण, पेंढरा, मांड, रानमाठ, काटेमाठ, हिरवामाठ यांसारख्या भाज्या भरपूर प्रमाणात खाण्याचा हा महत्त्वाचा ऋतू आहे.

या भाज्यांचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्या रासायनिक खतविरहित असल्यामुळे उपवासालाही खाता येतात. मांसाहारी मंडळी या भाज्यांमध्ये ओली किंवा सुकी कोळंबी, तिसरे, सुके बोंबील टाकूनही या भाज्या बनवतात. रानभाज्यांमध्ये असणा-या तंतुमय (फायबर) घटकांमुळे पावसात मंदावलेली पचनक्रिया अधिक गतिमान होते. 


'हेल्थ टॉनिक' किंवा 'आरोग्यासाठी गुटी' ठरलेल्या अशा महत्त्वाच्या रानभाज्यांची ही ओळख:-

टाकळा : महाराष्ट्राच्या काही भागांत खासकरून कोकणात ही भाजी 'टायकळा' किंवा 'टाकळा' म्हणून ओळखली जाते. टाकळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते. कारण कोवळय़ा पानांची भाजी पचायला हलकी असून ती तिन्ही दोष कमी करते. रक्तवात, रक्तपित्त यांसारखे रक्ताचे आजार तसेच नायटा रोगातही ही भाजी आवर्जून खातात. पावसात होणारा खोकला, शरीराला सुटणारी खाज, पोटात जंत होणं, दमा लागणं याही त्रासात ही भाजी जरूर खावी.

गोमेटू : तोंडलीसारखी लांबट हिरवी फळं या भाजीला येतात. आमटीत किंवा भाजीत ही फळं घातली असता त्या पदार्थाच्या चवीत वाढ होते. या दिवसात चिखल्यांमुळे पायाला जखमा होतात. अशावेळी निखा-याच्या आगीवर ही फळं भाजून त्याचा गर पायाला लावल्यास जखमा ब-या होऊन पाय आधी जसे स्वच्छ होते तसेच होतात.

कुळू : गवताची पाती तसंच लव्हाळ्याप्रमाणे दिसणारी ही रानभाजी 'फोडशी' म्हणून ओळखली जाते. भिजवलेली मुगाची डाळ किंवा चणाडाळीत कांदा घालून केलेली ही भाजी अतिशय रुचकर लागते. या भाजीमुळे पोटदुखी थांबते.

कुर्डू : कांदा-लसूण घालून केलेली कुर्डूची भाजी पोटासाठी सारक ठरते. या भाजीत लोहाचं प्रमाण जास्त असल्यामुळे गरोदर स्त्रिया, वाढत्या वयातील मुली, महिला यांनी ती आवर्जून खावी. कुर्डूची फुलं तसंच बियांची चटणी लघवीच्या विकारांवर औषधी ठरते.
कुडाच्या शेंगा : पोटाच्या आजारांसाठी ही भाजी गुणकारी समजली जाते. कोवळ्या कुडाच्या शेंगा मोडून, पीठ पेरून परतून केलेली भाजी या दिवसांत अनेक घरांत खाल्ली जाते. कुडाच्या शेंगाची भाजी आणि चटणी मूतखडय़ावर बहुगुणी समजली जाते. या कुडाच्या कांद्यांना अंकुर फुटल्यावर त्यांचीही भाजी करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. ही अंकुर फुटलेल्या कांद्याची भाजी कृमी तसंच जंतूंवर गुणकारी ठरते.

कावळा : या भाजीला संस्कृत भाषेत 'कचाय' असंही म्हणतात. ओलं खोबरं घालून बारीक पानं असलेल्या कावळ्याची भाजी करतात. कच्च्या कावळय़ामध्ये गोडं दही आणि सैंधव मीठ घालून कोशिंबीरही केली जाते. ही भाजी कफदोषाच्या विविध आजारांवर गुणकारी समजली जाते.

कोळी : या नावाचा कीटक असतो, ते आपल्या सर्वाना माहीत आहेच; पण या नावाची भाजीही असते. या भाजीचं बळीराजाच्या आहारात विशेष महत्त्व आहे. शेतकरीराजा पाऊस पडल्यावर पेरणी, लावणीच्या कामाला लागतो. त्याही पूर्वी तो 'कोळीच्या भाजी'चा नवेद्य आपल्या कुलदैवतेला दाखवतो.

कंटोळी : 'कर्टुल', 'कंटोळं' या नावानेही ही भाजी ओळखली जाते. झाडाझुडुपांत वाढलेल्या कंटोळीची भाजी कांदा-खोब-यासहित परतून केली जाते. संधिवाताच्या तसंच पित्ताच्या विकारांवर ती अत्यंत लाभदायी ठरते.

भोपळयाचा वेल : भोपळ्याच्या कोवळय़ा वेलाची भाजी त्याच्या पानासकट केली जाते. या वेलीत लोह तसंच विविध क्षारांचं प्रमाण अधिक असतं. भोपळ्याच्या केशरी रंगाच्या फुलांच्या भाजीपासून मिळणारं लोह शरीराला पूरक ठरतं. फुलांची भाजी रक्तविकार आणि अंगाचा दाह कमी केल्यास उपयोगी ठरते.

सुरणाचा कोंब : पहिला पाऊस पडल्यावर जमिनीत सुरणाचे कंद रुजून येतात. जमिनीच्या वरच्या बाजूंना हिरव्या रंगाची लांब पानं येतात. सुरणाच्या पानांच्या तंतुमय भाजीत लोह आणि क्षार असतात. लाल तिखट, कढीपत्ता, चिंचेचा कोळ, गूळ टाकून केलेली सुरणाच्या कोंबाची भाजी अप्रतिम लागते.

शेवळ : 'शेवळ' किंवा 'शेवळी' ही करंगळीच्या जाडीची लाल, पिवळा तसंच जांभळय़ा रंगाची भाजी वातविकारांवर उपयुक्त ठरते. ही भाजी उकडवून तसंच सुकवून वर्षभरही वापरता येते. शाकाहरी तसंच मांसाहारी या दोन्ही प्रकारच्या अन्नपद्धतीने ही भाजी तयार केली जाते.

चिवलाचे कोंब : ही भाजी म्हणजे बांबूंचे कोंब. पावसात नवीन बांबू रुजून वर येतात. त्या वेळी ते कोवळे असतात. त्या वेळीच हे बांबूचे कोंब खाण्यासाठी सर्वार्थाने वापरले जातात. पातळ कढण (सूप), भाजी करण्यासाठी ते योग्य असतात. या भाजीत क्षारांचं प्रमाण भरपूर असतं.

सोनअळंबी : अळंबीची खाण्यायोग्य जात म्हणजे सोनअळंबी. प्रथिनं आणि क्षारांचं भरपूर प्रमाण असणा-या सोनअळंबी या आकारानं लहान असल्या तरी पौष्टिक असतात. भाजी, मसाले भात, पुलाव, कढण मध्येही अळंबीचा वापर केला जातो.

बाफळी : पावसाळ्यात बद्घकोष्ठता आणि पोटदुखी हे आजार डोकं वर काढतात. त्यावर बाफळीची भाजी लाभदायी ठरते. या भाजीच्या बिया कांजण्या, देवी आदी रोगांवर औषध म्हणून तर शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

श्वेतकांचन : या भाजीच्या फुलांची भाजी दमा, खोकला, कफ, वायू, रक्तविकारावर औषधी ठरते.

चवळी : चवळीचे दोन प्रकार असतात. वेलीची चवळी आणि रोपाची चवळी. रोपाची चवळी 'तांदूळजा' किंवा 'तण्डुलीया' या नावाने ही भाजी ओळखली जाते. भाजी पचायला हलकी, थंड गुणधर्माची असते. ही भाजी खाल्ली असता भूक वाढते. शरीरात निर्माण होणारी विषद्रव्यं म्हणजे 'टॉक्सिन' शरीराबाहेर टाकण्यासाठी चवळीचा उपयोग केला जातो. मासिक पाळीचा त्रास असणा-या स्त्रियांनी पावसाळयात चवळीच्या भाजीचा जेवणात समावेश करावा. या त्रासात भाजीचा रस पिण्यासाठी घ्यावा. या भाजीमुळे लघवीस भरपूर होतं. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. वेलीच्या चवळीच्या टोकांना कोकणात 'बोके' म्हणतात. या टोकांचीही भाजी केली जाते. तंतुमय अशा सारक भाजीची चव काहीशी तुरट असते.

मायाळू : 'पोतकी', 'उपोदिका' ही 'मायाळू' या भाजीची काही नावं. या भाजीच्या लाल रंगाच्या वेलीवर हिरवी पानं उठून दिसतात. वात आणि पित्तदोषाचा नाश करणारी ही भाजी शुक्रधातूंची वाढ करण्यासाठी उपयुक्त असते. आजारपणात ही भाजी खाल्ली असता तोंडाला चव येते.

शेवगा : या वनस्पतीच्या पानं, फुलं आणि शेंगांचा भाजीसाठी उपयोग केला जातो. शेवग्याला लाल, पांढरा आणि निळसर-काळपट अशा रंगाची फुलं येतात. यांपैकी लाल फुलं येणारा शेवगा आरोग्यदृष्टय़ा गुणकारी समजला जातो. फुलांची भाजी खाल्ल्याने लघवीस येणारा उग्र दर्प, जडपणा कमी होतो. मात्र जास्त घाम येणं, चक्कर येणं, नाकातून रक्त वाहणं, घसा सुकणं अशी लक्षणं दिसतात तेव्हा फुलांची भाजी खाऊ नये.

अळू : अळूच्या भाजीपासून देठी, ओले चणे-मका तसंच भुईमुगाच्या शेंगाचे दाणे, काळे वाटाणे, फणसाच्या आठळय़ा टाकून केलेली अळूचं साग (जे फतफतं, गरगाट म्हणून ओळखलं जातं), अळुवडय़ा हे पदार्थ तयार केले जातात. अळूच्या कंदांपासून म्हणजे अरवीपासूनही विविध पदार्थ तयार केले जातात. अळूची पानं तसंच देठात लोहाचं प्रमाण भरपूर असल्यामुळे ही भाजी सर्वानी आवर्जून खावी. पानांची भाजी खाल्ल्याने पोट साफ होतं. मात्र बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्यांनी अळूच्या कंदापासून बनवलेली भाजी जपून खावी.

अंबाडी : अंबाडीची कोवळी पानं आणि फळांची भाजी करण्याचा प्रघात आहे. अळूची भाजी करताना अंबाडीची फळं तसंच पाल्याचा वापर केला जातो. फळांपासून सासव, किंवा कुठल्याही भाजीत आंबटपणा आणण्यासाठी उपयोग केला जातो. फळं वापरण्यापूर्वी ती तासावी लागतात. आम्लपित्ताचा त्रास असणाऱ्यांनी ही भाजी सांभाळून खावी.

वसूची भाजी : पावसाळ्यात ही मुबलक प्रमाणात आढळते. 'पुनर्वसू' या नावानेही ही भाजी ओळखली जाते. पांढरी आणि लाल असे या भाजीचे दोन प्रकार आहेत. साधारणपणे पांढ-या वसूचा भाजीसाठी उपयोग केला जातो. यकृताचे आजार, पोटात पाणी होणं, अंगावर सूज येणं, लघवीला कमी होणं या त्रासात पुनर्वसूची भाजी खावी.

हादगा : ही वनस्पती 'अगस्ता' या नावाने ओळखली जाते. शेवग्याप्रमाणेच हादग्याच्या कोवळय़ा पानांचा, शेंगाचा आणि फुलांचा जेवणात उपयोग केला जातो. भोंडल्याच्या खेळात खिरापतीत हादग्याच्या फुलांपासून तयार केलेल्या पदार्थाचा उपयोग केला जातो. जेवणानंतर सुस्ती येणाऱ्यांनी हादग्याच्या फुलांची भाजी नाचणीच्या भाकरीसोबत खावी.

पावसाळ्यात शरीरात वातदोष वाढतो. त्यामुळे पालेभाज्या खाऊ नयेत असा समज आहे. परंतु या ऋतूत पालेभाज्या आपसूकच उगवतात. त्यामुळे सगळ्याच नाही तर काही ठरावीक पालेभाज्यांचा युक्तीने आहारात उपयोग केल्यास शरीराची कार्यक्षमता वाढते. फक्त त्या कोरडय़ा असल्यामुळे तेलावर शिजवाव्यात.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe

No comments:

Post a Comment