हृदयरोगामुळे होणारे स्त्रियांचे मृत्यू गेल्या वीस वर्षात कमी झाले असले, तरी पुरुषांच्या तुलनेत त्याचे प्रमाण जास्त आहे. स्तन आणि फुप्फुसांच्या कर्करोगापेक्षाही हृदयविकाराने मरण पावणा-या स्त्रियांची संख्या कितीतरी जास्त आहे. आठपैकी एका स्त्रीला स्तनांचा कर्करोग होतो, तर तीनपैकी एका स्त्रीला हृदयरोग असतो. मात्र स्त्रियांमध्ये हृदयविकाराविषयी जागरूकता निर्माण करून त्यायोगे हृदयविकारामुळे होणारे हजारो मृत्यू थांबवता येऊ शकतात. सरकारी कार्यालयात काम करणा-या एका ४२ वर्षाच्या स्त्रीला दररोज तिच्या कल्याणच्या घरापासून नरिमन पॉइंटपर्यंत ट्रेनने प्रवास करावा लागतो. ट्रेन पकडण्यासाठी पाय-यांवरून चढ-उतार करताना आपल्याला धाप लागत असल्याचं तिच्या लक्षात आलं. त्यांचं वजन ५५ किलो आणि शरीरयष्टी बारीक असल्यामुळे आरोग्याला तसा काही धोका नव्हता. त्यांनी फोर्टसि, कल्याण येथे आरोग्याची तपासणी करून घेतली आणि त्यात केलेल्या ताणतणाव चाचणीचे निष्कर्ष धक्कादायक निघाले. त्यानंतर केलेल्या कोरोनरी अन्गिगोग्राममध्ये त्यांना डबल व्हेसल डिसीज (दुहेरी रक्तवाहिनी आजार) असल्याचे निष्पन्न झाले आणि कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला. त्यानंतर त्यांच्या दुहेरी रक्तवाहिन्यांची अँजिओप्लास्टी केली. आता त्या वैद्यकीयदृष्टया ब-याच चांगल्या आहेत आणि त्यांची कष्ट करण्याची वृत्ती आणखी सुधारली आहे. रुग्ण योग्य वेळेस दाखल झाल्यामुळे त्यांची परिस्थिती बिकट होण्याआधीच त्यांच्यावर उपचार करण्यात आले. वेळ वाया न गेल्यामुळे शारीरिक गुंतागुंतही टाळता आली. आज अमेरिकेत हृदयरोग हा स्त्री आणि पुरुषांसाठी धोकादायक ठरलेला पहिल्या क्रमांकाचा आजार आहे. दर ८० सेकंदाला एक स्त्री हृदयरोगाने मरण पावते आणि हृदयरोगामुळे होणा-या मृत्यूपैकी तीन तृतीयांश मृत्यू वेळीच योग्य उपचारांच्या मदतीने टाळता येण्यासारखे असतात. ८० टक्केस्त्रियांमध्ये हृदयरोगासाठी कारणीभूत ठरणारे किमान एक धोकादायक लक्षण असते, मात्र बहुतेक महिला हृदयरोगामुळे आपल्या आरोग्याला धोका आहे असे मानत नाहीत. ३० ते ३५ वयोगटातील ६० टक्के भारतीय शहरी स्त्रियांना हृदयरोगाचा धोका असतो. गेल्या ५ वर्षात स्त्रियांच्या रक्तवाहिन्या आणि हृदयरोगात (सीव्हीडी) १६ ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दक्षिण-पूर्व आशिया भागातील सीव्हीडीमुळे वेळेआधीच होणा-या मृत्यूचे प्रमाण किमान २०२५ पर्यंत २५ टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हृदयरोगामुळे होणारे स्त्रियांचे मृत्यू गेल्या वीस वर्षात कमी झाले असले, तरी पुरुषांच्या तुलनेत त्याचे प्रमाण जास्त आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकन हार्ट असोसिएशनने (एएचए) स्त्रिया आणि हृदयरोगाविषयी नवे वैज्ञानिक निवेदन जाहीर केले आहे. एएचएच्या म्हणण्यानुसार पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याची विविध कारणे असतात. हृदयविकाराचा झटका येणा-या स्त्रिया आणि पुरुषांच्या शरीरात जास्त गुंतागुंत तयार होते. त्याचप्रमाणे झटका येऊन गेल्यानंतरच्या पहिल्या वर्षात मृत्यू होण्याचा दरही जास्त असतो. यावर्षीचा फेब्रुवारी महिना 'गो रेड फॉर वुमन' म्हणून साजरा करण्यात आला. स्त्रियांमध्ये हृदयविकाराविषयी जागरूकता निर्माण करून त्यायोगे हृदयविकारामुळे होणारे, परंतु टाळता येण्यासारखे हजारो मृत्यू थांबवणे हा या संकल्पनेचा हेतू होता. भारतातही अशा प्रकारचे अभियान सुरू करण्याची गरज आहे असं मला वाटतं. कारण बहुतेक स्त्रिया स्तनांचा कर्करोग किंवा मानेच्या कर्करोगाचा जास्त विचार करतात. मात्र, स्तन आणि फुप्फुसांच्या कर्करोगापेक्षाही हृदयविकाराने मरण पावणा-या स्त्रियांची संख्या कितीतरी जास्त आहे. आठपैकी एका स्त्रीला स्तनांचा कर्करोग होतो, तर तीनपैकी एका स्त्रीला हृदयरोग असतो. स्त्रियांमध्ये हृदयविकारासाठी कारणीभूत ठरणारे प्रमुख घटक कोणते? » आशियाई देशांत मधुमेहाने साथीच्या रोगाप्रमाणे उग्र स्वरूप धारण केले असून मधुमेह असणा-या स्त्रियांमध्ये हृदयविकार होण्याची शक्यता तीन पटींनी जास्त असते. माझ्या अनुभवानुसार मधुमेही स्त्रियांमध्ये वयाच्या अलीकडच्या टप्प्यावरच हृदय रक्तवाहिन्यांचा विकार होण्याचं प्रमाण जास्त आढळून येतं. » वयाच्या अलीकडच्या टप्प्यावरच हृदय रक्तवाहिन्यांचा विकार होण्याची अनुवंशिकता असल्यास » स्थूलत्व विशेषत: ओटीपोटाच्या भागात » डिस्लीपिडीमिया (रक्तातील लिपिड्सचे असंतुलित प्रमाण (उदा. ट्रायग्लिसराइड्स, कोलेस्ट्रॉल आणि किंवा फॅट फोस्फोलिपिड्स)) » धूम्रपान » ताण बदलत्या जीवनशैलीमुळे कमी झालेले इस्ट्रोजेनचे प्रमाण आणि इतर आजारांची गुंतागुंत हेसुद्धा स्त्रियांमध्ये सीएडी होण्यास कारणीभूत ठरत आहेत. ताणाबद्दल बोलायचे झाल्यास गेल्या काही दशकांत भारतीय स्त्रियांच्या जीवनशैलीत मोठे बदल झाले आहेत. भारतीय स्त्रिया सर्व क्षेत्रात हिरिरीने काम करत आहेत, मात्र घरगुती कामांतून त्यांची सुटका झालेली नाही. त्याच्या जोडीला मुलांच्या मागण्या, न्यूक्लियर कुटुंबपद्धतीमुळे कुटुंबातील इतरांचा मर्यादित पाठिंबा या घटकांमुळेही स्त्रियांवरील ताण सातत्याने वाढत आहे. काम करणा-या स्त्रिया ब-याचदा चुकीचा आहार घेतात आणि व्यायाम करत नाहीत. त्यामुळेही भारतीय स्त्रियांमध्ये हृदयविकार होण्याचे प्रमाण वाढत आहे. रक्तवाहिन्यांचा तीव्र त्रास असलेल्या स्त्रियांमध्ये हृदयविकाराची नेहमीपेक्षा वेगळी लक्षणे दिसून येत आहेत. छातीत दुखण्याची जागा तीव्र थकवा, धाप लागणे, अपचन, जबडा किंवा घसादुखी, पाठीच्या वरच्या भागात दुखणे यांनी घेतली आहे. रक्तवाहिन्यांचा तीव्र त्रास असलेल्या बहुतेक स्त्रिया उशिरानेच डॉक्टरकडे धाव घेतात. या विलंबामुळेच प्राथमिक अँजिओप्लास्टीसारखे उपचार पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना कमी प्रमाणात सुचवले जातात. विलंब झाल्यामुळे त्यांच्या रक्तवाहिन्यांमधील गुंतागुंतही वाढलेली असते. हृदयविकाराच्या झटक्यातून सावरणा-या फार कमी स्त्रियांना हृदयाचे पुनर्वसन करण्याचा सल्ला दिला जातो. स्वत:ला वाचवण्यासाठी काय कराल? » हृदयविकाराच्या संभाव्य धोकादायक लक्षणांची माहिती घ्या. मित्रपरिवार, कुटुंबीय आणि सहका-यांनाही माहिती द्या. » वर्षातून एकदा आरोग्याची तपासणी करा. तुमचे वय तीसपेक्षा जास्त असेल, तर स्तनांची तपासणी आणि स्त्रीरोगतज्ज्ञांद्वारे तपासणी करून घेण्याबरोबर हृदयाचे परीक्षणही करून घ्या. » वर सांगितल्याप्रमाणे हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे तुमच्यात किंवा कुटुंबीयांत दिसल्यास तातडीने वैद्यकीय सेवा घ्या. » लक्षात घ्या. पहिला तास हा सुवर्णतास असतो. या तासाभरात मिळालेला उपचार तुमच्या आरोग्यावर लघु व दीर्घकालीन परिणाम करणारा असतो. » स्वत:ला ताणमुक्त करण्याची सवय लावून घ्या. » चांगला आहार घेण्याची सवय लावा आणि धूम्रपान करू नका. घरी तसेच कामाच्या ठिकाणी धूम्रपानमुक्त वातावरण मिळावे म्हणून प्रयत्न करा. |