निसर्गनियमानुसार वातावरणात बदल होणे स्वाभाविक असते, मात्र या बदलांना जुळवून घेणे आपल्या हातात असते. उन्हाळ्याच्या काळात उष्णता वाढल्याने आरोग्यविषयक समस्या उद्भवतात. परंतु ऋतुमानानुसार आहारशैलीत बदल केल्यास आरोग्य चांगलं राहतं. निसर्गनियमानुसार वातावरणात बदल होणे स्वाभाविक असते, मात्र या बदलांना जुळवून घेणे आपल्या हातात असते. उन्हाळ्याच्या काळात उष्णता वाढल्याने आरोग्यविषयक समस्या उद्भवतात. परंतु ऋतुमानानुसार आहारशैलीत बदल केल्यास आरोग्य चांगलं राहतं. यासाठीच हा आहार नेमका कसा असावा, आहारसूत्रात कोणता बदल करावा, हे जाणून घेऊ या. उन्हाळ्याच्या दिवसात वातावरणातील उष्णता वाढते आणि त्याचा शरीरावर परिणाम होतो. डिहायड्रेशन, उष्माघात, भूक मंदावणे, उन्हाळा लागणे, अॅसिडिटी, डोके दुखणे, अस्वस्थ वाटणे, थकवा जाणवणे या समस्या उद्भवतात. आपापल्या प्रकृतीनुसार, तसेच आहार-विहारानुसार ही लक्षणं कमी-अधिक असू शकतात, मात्र या वातावरणाशी जुळवून घेणं थोडंसं कठीण होतं. आपलं शरीर या बदलांना जुळवून घेत शरीराचं तापमान नियंत्रित राखण्याचा प्रयत्न करते. मेंदूतील हायपोथॅलिमस हा भाग हे तापमान नियंत्रित करतो. शरीरात पाण्याची कमतरता जाणवू लागल्यास स्नायूंच्या प्रणालीद्वारे हा संदेश मेंदूला पोहोचवला जातो व तहान भागवण्याची क्रिया घडते. खूप थंडी असो वा उष्णता, शरीराचं तापमान एका विशिष्ट मर्यादेपर्यंत नियंत्रित केलं जातं. मात्र ही पातळी नियंत्रित राखण्याची यंत्रणा नीट काम करू न शकल्यास समस्या उद्भवतात. जसं उन्हाळ्यात घाम येऊन हे तापमान योग्य राखलं जातं, मात्र यासाठी शरीराला आवश्यक पाणी मिळणं गरजेचं असतं. » या काळात शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्यास त्याचा थेट परिणाम चयापचय क्रियेवर होऊन हिटस्ट्रोक, सनस्ट्रोक होऊन अस्वस्थ वाटणं, ग्लानी येणं, प्रचंड डोकेदुखी, रक्तदाब वाढणे वा कमी होणे, त्वचा कोरडी पडणे ही लक्षणे दिसू लागतात. यात शरीरातील मीठ व पाण्याचं प्रमाण कमी होतं, ज्याला 'हायपोनेट्रिमिया' म्हणतात. ही लक्षणे गंभीर स्वरूप धारण करून कधी कधी ते जीवावरही बेतू शकतं. » उन्हात खूप काळ फिरणं, जास्त प्रमाणात शारीरिक श्रम करणं, अति व्यायाम करणं, तळलेले, मसालेदार व तिखट पदार्थ जास्त प्रमाणात खाणं या गोष्टींमुळे उन्हाळ्यातील समस्या उद्भवतात. त्यामुळे या काळात योग्य आहारविहाराची आवश्यकता असते. » उन्हाळ्यात शरीरातील मिठाचं व पाण्याचं प्रमाण योग्य राखण्यासाठी खूप पाणी प्यायला पाहिजे. » शरीरात थंडावा निर्माण व्हावा यासाठी फळं व भाज्यांचे रस, सरबतं आणि द्रव पदार्थाचं खूप सेवन केलं पाहिजे. मात्र हे घेताना यात साखर सेवन करू नये. साखरेमुळे शरीरातील आम्लधर्मी गुणधर्म वाढून चयापचय क्रियेवर त्याचा परिणाम होतो. » खनिजक्षार व जीवनसत्त्व हेदेखील खूप गरजेचे असतात. म्हणून शहाळ्याचं पाणी, लिंबूपाणी, ताक, दही, कैरीचं पन्हं यांचं सेवन करावं. तसेच काकडी, कांदा, कोथिंबीर, पुदिना, कलिंगड अशा जास्त प्रमाणात पाणी असलेल्या पदार्थाचा आहारात समावेश करावा. » या काळात पचायला हलका असा आहार घ्यावा. ज्वारी, नाचणी, मूग अशा थंड गुणधर्माची धान्यं जरूर खावीत. याचबरोबर गायीचं दूध, वरण-भात, खिचडी असे सुपाच्य पदार्थाचं सेवन करावं. » या काळात पचनक्रिया मंदावलेली असते, तेव्हा जास्त तळलेले पदार्थ, मसाल्याचे पदार्थ, बेकरीतील उत्पादनं, जंक फूड, काबरेनेट ड्रिंक्स यांचं सेवन वज्र्य करावं. तसेच चहा, कॉफी, अल्कोहोल अशा उष्णता वाढवणा-या पदार्थाचं सेवन करू नये. » उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे अन्न लवकर खराब होण्याची शक्यता असते. म्हणूनच शक्यतो ताजे पदार्थच खावेत. शिळे अन्न अजिबात खाऊ नये. यामुळे पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. » रात्रीचा आहार हा अत्यंत हलका असावा. मांसाहारी पदार्थ शक्यतो सकाळ किंवा दुपारच्या वेळेतच सेवन करावेत. तसेच रात्रीचा आहार झोपण्यापूर्वी तीन तास आधी घ्यावा. |