झटपट वजन कमी करण्याच्या नादात कित्येक लोक अतिशय चुकीची पद्धत अवलंबतात. यामुळे कमी झालेलं वजन दीर्घकाळ स्थिर राहतंच, असं नाही. म्हणूनच वजन कमी करण्यापूर्वी काही गोष्टींचा अवलंब करणं आवश्यक आहे. असं म्हणतात की, प्रत्येक गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. हा अतिरेक तुमच्या वजनाच्या बाबतीत असेल तर तो केवळ शारीरिक नाही तर मानसिक किंवा भावनात्मक पातळीवरही धोका पोहोचवू शकतो. हे समजल्यावरही तुम्ही वजन कमी करू शकत नसाल तरीही काळजी करण्यासारखं काहीच नाही. कदाचित तुमच्याही नकळत तुमच्याकडून काही छोटया छोटया चुका होत राहतील. ज्या तुम्हाला तुमचं वजन कमी करून देत नसतील. म्हणूनच वजन कमी करायच्या काही सोप्या गोष्टी किंवा त्यामागची कारणं आपण जाणून घेऊ या. वजन का वाढतं? वजन कमी करण्यासाठी सर्वात प्रथम हे जाणून घेणं आवश्यक आहे की तुमचं वजन नेमकं कोणत्या कारणांनी वाढतंय. वजन वाढण्याच्या मागे ताणतणाव, अनुवंशिक कारणं, झोप पूर्ण न होणे, थायरॉईड किंवा मेनोपॉज अशा विविध कारणांमुळे हार्मोनल बदल होत असतात. असंही शक्य असेल की तुम्हाला अपु-या माहितीमुळे तुम्ही अशा चुका करत असाल. कारण सगळे प्रयत्न करूनही ते सफल होत नाही. दुसरा पर्याय म्हणजे असंही होऊ शकतं की तुम्ही अवलंबत असलेल्या वजन कमी करण्याच्या पद्धतीला तुमचं शरीर सरावलेलं असतं. ज्यामुळे एका ठरावीक मर्यादेनंतर वजन कमी होणं बंद होतं. अशावेळी आहार आणि व्यायामात बदल करणं आवश्यक आहे. वजन कमी करण्याचे काही नियम शरीरात वजनात मांसपेशी, हाडं, चरबी आणि पाणी यांचा समावेश असतो. योग्य पद्धतीने तुम्ही वजन कमी केलं की सगळ्यात प्रथम चरबी कमी होते. यामुळे मांसपेशी मजबूत होतात आणि दीर्घकाळापर्यंत लो कॅलरी डाईटमुळे पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि चरबीचा स्तरही वाढत असतो. पुरेसं पोषण मिळालं नाही की अशक्तपणा आणि थकवा जाणवायला लागतो. शरीराचा आकार बिघडायला लागतो. कधी कधी डाएट खूप कमी केल्यानेही तुमचं वजन वाढत असेल तर तुम्ही काय खाता हे तपासणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा की वजन कमी करणं ही एक-दोन दिवसांची गोष्ट नाही. व्यवहारिक लक्ष्य वजन कमी करण्यासाठी सर्वात प्रथम तुमचं ध्येय व्यवहारिक असणं आवश्यक आहे. म्हणजे या गोष्टीची सुरुवात हळूहळू झाली तरीही दीर्घकाळासाठी ती तुमच्या फायद्याची ठरेल. थोडक्यात प्रति महिना दोन ते तीन किलो वजन कमी करण्याचं ध्येय करा. प्रत्येक आठवडयाला आपलं वजन एक टक्का कमी करायचा प्रयत्न करा. संतुलन ठेवणं आवश्यक सुरुवातीला उत्साहात काही लोक अधिक व्यायाम करताना दिसतात. किंवा खाणंही कमी करतात. परिणामी योग्य डाएटच्या कमतरतेमुळे मेटाबॉलिक रेट कमी होऊ लागतो. यात सुरुवातीला वजन कमी होतं पण नंतर वजन वाढायला लागतं. म्हणूनच काही नियमांचं पालन करणं आवश्यक असतं. व्यायाम करायला सुरुवात करण्यापूर्वी काही सोपे व्यायाम करा. काही जण कार्डिओ करायला लागतात. मात्र कार्डिओ आणि वेट ट्रेनिंग यात संतुलन राखणं आवश्यक आहे. त्याचबरोबर संतुलित आहाराचं तुमच्या जेवणात रूपांतर करा. काबरेहायड्रेटचा बंदोबस्त पटकन वजन कमी करण्याच्या नादात काही लोक जेवणातून मिळणारी काबरेहायड्रेट्स पूर्णपणे बंद करतात आणि असं करताना ते हे विसरतात की, ज्या गोष्टीची शरीराला अधिक सवय असते तीच गोष्ट आपण कमी केली तर त्याच गोष्टीची ओढ आपल्याला अधिक वाटते. काबरेहायड्रेट आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक आहे. कारण यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. म्हणूनच ब्रेड, भात, बिस्कीट, मैदा यापासून तयार केलेल्या पदार्थाचा आहारात समावेश नसावा. त्यापेक्षा घरी तयार केलेला संतुलित आहाराचं सेवन करावं. जेवणाचे नियम वजन कमी करण्यासाठी ब्रेकफास्ट, लंच किंवा डिनर यापैकी कोणतीही एक गोष्ट सोडणं आवश्यक असतं. म्हणजे वजन झपाटयाने कमी होईल. असं काही जणांना वाटत असतं. मात्र यामुळे शरीराला पोषणमूल्य मिळत नाही. कधीही खाण्याला पर्याय शोधू नये. योग्य वेळी योग्य प्रमाणात जेवण करा. भोजनाच्या वेळी हलकं फुलकं खाल्ल्याने शरीराला पोषण तर मिळत नाहीच पण त्याचबरोबर खाल्ल्याचं समाधानही मिळत नाही. दुस-या दिवशी आदल्या दिवशी कमी खाल्लं म्हणून तुम्ही डबल जेवालं तर हेदेखील वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरतं. चुकीच्या डाएटची निवड प्रत्येकाच्या शरीराचं डाएट हे वेगवेगळं असतं. आपल्या शरीराला कोणत्या प्रकारचं डाएट आवश्यक आहे हे जाणून न घेता कोणत्याही डाएटचा अवलंब करू नका. दीर्घकाळ सूप आणि सॅलेडवर आधारित क्रश डाएट खाण्याने सुरुवातीला वजन कमी होतं. मात्र स्थिर स्वरूपात राहात नाही. डाएटमध्ये पूर्णपणे प्रथिनं म्हणजे अंडी, दूध, पनीर आणि पोल्ट्री प्रॉडक्टसना नष्ट केल्याने अशक्तपणा जाणवायला लागतो. मांसपेशींमध्ये अनियमितता येते. केस आणि नखं तुटायला लागतात. अकाली म्हातारपण दिसायला लागतं. चेहरा पांढराफटक पडतो. वजन कमी करण्याच्या नादात आरोग्याशी खेळ करू नका. कारण शरीराला मिळणारी ऊर्जा जेवणाच्या वेळी कमी होते. कोणत्याही गोष्टीला आपल्या डाएटमधून कमी केल्यामुळे समस्येच्या मुळाशी आपण पोहोचत नाही. म्हणूनच प्रत्येक गोष्ट थोडी थोडी म्हणजेच प्रमाणात खाणं आवश्यक आहे. याचबरोबर वजन कमी करण्यासाठी संतुलित डाएट आणि व्यायामाचा मेळ घालणं आवश्यक आहे. वजन कमी करण्यापूर्वी या लहान गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. |