परीक्षेचा कालावधी मुलांच्या मेंदूकरिता मॅरेथॉनसारखा असतो. त्यांच्या मेंदूला मॅरेथॉनमध्ये टिकून राहायचे असेल तर मुलांना चांगले पोषण मिळणे अत्यावश्यक आहे. पोषक खाद्य आणि पेये यांच्या सेवनाने मानसिक क्षमता आणि मेंदूची सतर्कता वाढण्यात मदत होते. परीक्षेच्या आधी आणि परीक्षेच्या काळात मुलांवर प्रचंड मानसिक ताण असतो. या काळात मुलांची फार लवकर मानसिक दमणूक होत असल्याचे चित्र दिसतं. या ताणामुळे मुलं नीट खात नाहीत किंवा ताण विसरण्याकरिता खूप खातात. अभ्यास करताना झोप येऊ नये याकरिता भरपूर चहा-कॉफी घेतली जाते. परीक्षेच्या आधीचा आणि परीक्षेचा कालावधी म्हणजे मुलांच्या मेंदूकरिता एखाद्या मॅरेथॉनसारखा असतो. त्यांच्या मेंदूला या मॅरेथॉनमध्ये टिकून राहायचे असेल आणि प्रचंड स्पध्रेच्या या युगात मुलांना तगून राहायचे असेल तर मुलांना चांगले पोषण मिळणे अत्यावश्यक आहे. पोषक खाद्य आणि पेये यांच्या सेवनाने मानसिक क्षमता आणि मेंदूची सतर्कता वाढण्यात मदत होते. या काळात मुलांनी जंक फूड खाल्ले तर त्यांना अधिक दमल्यासारखे आणि गळून गेल्यासारखे वाटेल. तुमच्या मेंदूला सतर्क आणि तरतरीत ठेवायचे असेल तर तुम्ही योग्य आहार घेणे आवश्यक असते. आरोग्यदायी खाण्यामुळे मेंदूच्या कामगिरीत सुधारणा होते हे सत्य असले तरी या प्रक्रियेला खूप वेळ लागतो व ती अनेक बाबींवर अवलंबून असते. खाली दिलेल्या टिप्समुळे तुम्हाला तुमच्या मेंदूची क्षमता वृद्धिंगत करता येईल, शिवाय तुमच्या प्रतिकारशक्तीतही सुधारणा करता येईल. तुमची प्रतिकारशक्ती उत्तम असेल तर तुम्ही कोणत्याही अडचणीविना सहज चांगला आणि मन लावून अभ्यास करू शकाल. नियमित अंतराने थोडे थोडे खा जेवण, विशेषत: न्याहारी तर मुळीच चुकवू नका. परीक्षेदरम्यान तासन् तास बसायचे असल्याने आणि शारीरिक हालचालींच्या अभावी पोटाच्या समस्या उद्भवत असल्याने व त्यामुळे त्यांच्या अभ्यासामध्ये खंड उत्पन्न होऊ शकत असल्याने थोडेसे आणि सहज पचेल असेच खाणे खावे. भरपूर खाल्ल्याने किंवा पचण्यास जड पदार्थ खाण्याने झोप येऊ शकते. योग्य स्नॅक्स आणि पेयांची निवड करा उशिरापर्यंतचा अभ्यास, अपुरी झोप आणि ताण यांच्यामुळे शरीरातील अॅसिडची पातळी वाढते व त्यामुळे डोकेदुखी, तर कधीकधी उलटय़ा होऊन ताप येण्याचे प्रकार घडतात. हे टाळायचे असेल तर पुरेशी विश्रांती घेणे आणि पचायला सोपा असा आहार घेणे अत्यावश्यक असते. तुम्ही तात्पुरता जाग आणणारी चहा, कॉफीसारखी पेये टाळा, कारण तुम्ही झोप येऊ नये म्हणून कपमागून कप पीत राहाल आणि शरीरातील अॅसिडिटी तितक्याच प्रमाणात वाढत जाईल. अॅसिडच्या निर्मितीस कारणीभूत ठरणा-या चहा-कॉफीऐवजी तुम्ही नारळाचे पाणी, लस्सी, ताक, लिंबू सरबत किंवा कोकम सरबत घेणे इष्ट राहील. तऱ्हेतऱ्हेचे स्नॅक्स खाण्यापेक्षा फळं खा, अॅसिडिटीला नियंत्रणाखाली ठेवायचं असेल तर फळं खाण्यासारखा दुसरा चांगला उपाय नाही. िलबूवर्गीय फळं देखील आम्लारी धर्मी असल्याने फळं खाताना हात आखडता ठेवू नका. फळांमधून शरीराला ऊर्जा देणारी व्हिटॅमिन्स, मिनिरल्स आणि फ्रुक्टोज मिळतात. स्ट्रॉबेरी, जांभळी द्राक्षे अशा काही फळांमध्ये रेसवेराट्रोल असते. रेसवेराट्रोल तुमच्या दीर्घ आणि अल्पकालीन स्मरणशक्तीमध्ये सुधारणा करण्यात मदत करते. आहारात प्रथिनांचा समावेश करा आपला मेंदू प्रथिनांपासून बनला आहे आणि प्रथिनांचे प्रमाण जास्त असलेला आहार घेतल्याने तुमच्या शरीराला ऊर्जेचा सतत पुरवठा होत राहातो व त्यामुळे तुम्हाला पेंग येत नाही हे आपण पाहिले. दुग्धजन्य पदार्थ, मासे, अंडी, दाणे, द्विदल धान्ये, डाळी, दूध इ.चे नियमित तत्त्वावर सेवन केल्याने शरीरात टायरोसिन नावाचे अमायनो अॅसिड तयार होते. टायरोसिन रसायनांच्या माध्यमातून चेता पेशींना संदेश पाठवत राहाते आणि त्यामुळे मेंदूवर ताण असतानाही मेंदू सतर्क व जागृत राहतो. स्मरणशक्ती वाढवणारा आहार मासे, अक्रोड, फ्लॅक्ससीड्स, तीळ, सूर्यफुलांच्या बिया यांमध्ये ओमेगा ३-६-९ ही चरबीयुक्त आम्लं असतात. ही आम्लं मेंदूच्या विकासाकरिता आणि स्मरणशक्ती वाढवण्याकरिता उत्तम ठरतात. लोहयुक्त आहार घ्या मुलाला अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येत नसेल, त्याचे लक्ष लागत नसेल किंवा त्याला सतत झोप येत असेल, मुलाचे डोळे निळी झाक असलेल्या पांढरट बुब्बुळांचे असतील किंवा त्याची त्वचा फिकुटलेली असेल तर त्याच्या शरीरात लोहाची कमतरता आहे, असे समजावे. तुमच्या मुलांमध्ये अशी लक्षणं दिसून आल्यास त्याला पालक, मेथीसारख्या हिरव्या भाज्या, लिव्हर, हलिम / आळिव, सुके अंजीर, जर्दाळू, दाणे, बीन्स, खजूर असे लोह-युक्त खाणे द्यावे. फळे व भाज्या मनसोक्त खाव्यात फळे आणि भाज्यांमधून तुम्हाला व्हिटॅमिन सी, ए, बी१, बी५, पँटोथेनिक अॅसिड, झिंक, मॅग्नेशियम अशी सूक्ष्म पोषणमूल्ये मिळत असतात. ही पोषणमूल्ये अँटीअॅक्सिडण्ट्सारखी कामे करतात आणि ऑक्सिडीकरणाने होणारे शरीराचे नुकसान टाळतात. व्हिटॅमिन्स अॅड्रेनलाईन या संप्रेरकाच्या निर्मितीकरिता आणि या संप्रेरकाची काय्रे उत्तम चालण्याकरिता उपकारक ठरतात. अॅड्रेनलाईन हे संप्रेरक ताणाशी मुकाबला करणारे आणि मन शांत ठेवणारे संप्रेरक आहे. व्हिटॅमिन एने समृद्ध असलेल्या ब्रोकोली, पालक, गाजर, टोमॅटो अशा भाज्यांच्या सेवनामुळे मेंदूमधील पेशींचे नुकसान कमी होते. भरपूर पाणी प्या शरीरात पाण्याचे पुरेसे प्रमाण राखणे अत्यावश्यक असते. अनेक वेळा असं होतं की, मुले एखाद्या खोलीतील थंडाव्यात किंवा एसी असलेल्या खोलीत बसल्याने त्यांना तहान लागत नाही, पण दिवसाच्या अखेरीपर्यंत त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन शरीर व मेंदू दोघांनाही थकवा येतो, मरगळ, कधी कधी मळमळ जाणवते, गोंधळल्यासारखे होते. दररोज ८-१० ग्लास पाणी प्यायलेच पाहिजे आणि त्याच्या जोडीला लिंबू पाणी, नारळ पाणी, ताक इ.देखील घेत राहिले पाहिजे. बाहेरचे / चरबीयुक्त खाणे / जंक फूड टाळा स्वच्छतेच्या कारणास्तव मुलांनी रस्त्याच्या कडेला विकले जाणारे आणि बाहेरचे खाणे टाळावे. पिझ्झा, बर्गर या पदार्थामध्ये प्रचंड प्रमाणात कबरेदके आणि चरबी असते, त्यामुळे झोप येऊ शकते. असे खाणे टाळलेलेच बरे! शारीरिक हालचाल / व्यायाम अर्धा ते एक तास उठून चालल्या-फिरल्याने तुमचा मूडही सुधारतो आणि मेंदूही तरतरीत होतो. त्यामुळे परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असतील तर अभ्यासादरम्यान एखादा खेळ खेळण्याकरिता किंवा चालण्याकरिता वेळ काढाच! |