होळी हा रंगांची उधळण करणारा सण! पण या होळीनिमित्त खेळल्या जाणा-या रंगांमुळे त्वचेची आग होणं, डोळ्यांची जळजळ होणं, तात्पुरता आंधळेपणा येणे अशा अनेक समस्या निर्माण होतात. रंगात मिसळण्यात आलेली रांगोळी किंवा मार्बल पावडरसारखे खरखरीत पदार्थ डोळ्यात गेल्यास डोळ्यांना गंभीर इजा होऊन दृष्टीवरही परिणाम होऊ शकतो. म्हणूनच होळी खेळताना काळजी घ्यायला हवी. होळी आणि रंगपंचमी या दोन्ही सणांना भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्त्व असून या दिवशी प्रत्येक जण आपल्या जीवनातील ताणतणाव विसरून एकमेकांवर सप्तरंगांची उधळण करताना आढळतात. रंगपंचमीचा आनंद रंगांच्या सोबतीने लुटण्याची मजा काही निराळीच असते; पण उत्साहाच्या नादात आजची तरुण पिढी बाजारात सहजपणे उपलब्ध असलेले आकर्षक रंग वापरतात. अशा रंगांमध्ये घातक रासायनिक मिलावट असल्यामुळे त्याचे दूरगामी दुष्परिणाम आपल्या संपूर्ण शरीरावर होतात. होळी व रंगपंचमीच्या निमित्ताने मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये त्वचा-केस व डोळे यावर तत्काळ उपचार पद्धती कशी करता येईल याबाबत नुकतंच एक चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. याविषयी अधिक माहिती देताना मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलचे केंद्रप्रमुख रवी हिरवाणी म्हणाले, ''होळी आणि रंगपंचमी खेळताना कळत नकळत अनेकदा चुकीमुळे अथवा उत्साहाच्या भरात हानिकारक रंग वापरले जातात. त्यामुळे ज्यांची त्वचा खूपच संवेदनशील (सेन्सेटिव्ह) असते अशांना त्वचेची अॅलर्जी, खाज सुटणं, त्वचेची सालपटं निघणं, भेगा पडणं यांसारखे त्रास जाणवतात. रंगांची होळीत उधळण करत असताना कान आणि डोळ्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. होळी खेळताना अचानक कुठून तरी फेकल्या गेलेल्या पाण्याच्या फुग्यामुळे डोळ्याच्या दुखापतीच्या समस्या निर्माण होऊ शकतात. रंगामुळे त्वचेची आग होणं, डोळ्यांची जळजळ होणं व डोळ्यांमध्ये रंग गेल्यामुळे तात्पुरता आंधळेपणा येणे अशा अनेक समस्या निर्माण होतात. अशा वेळी तात्काळ वैद्यकीय उपचार फार महत्त्वाचे असतात''. आजमितीला रंग जास्त उजळ दिसण्यासाठी रंगांमध्ये बूट पॉलिश, ऑईलपेंट किंवा हेअरडायही मिसळलं जातं. या सर्व बाबी आपल्या त्वचेवर दूरगामी परिणाम करू शकतात. यामुळे त्वचेचा कर्करोग, केस गळणे, त्वचेवर सफेद डाग पडणे, त्वचारोग अशा अनेक समस्याही उद्भवू शकतात. स्कारलेट रेड, क्रिस्टल व्हॉयलेट, ब्रिलियंट ग्रीन हे रंग कातडीस अपायकारक आहेत. ''रंगात मिसळण्यात आलेली रांगोळी किंवा मार्बल पावडरसारखे खरखरीत पदार्थ डोळ्यात गेल्यास डोळ्यांना गंभीर इजा होऊन दृष्टीवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रंगांची उधळण करणारा हा सण साजरा करताना सावधानता बाळगणे महत्त्वाचं आहे'', असं मत वोक्हार्ट हॉस्पिटलमधील सौंदर्यतज्ज्ञ डॉ. लीना जैन यांनी व्यक्त केले. वास्तविक पाहता रंगांच्या डब्यावर 'केवळ औद्योगिक उपयोगासाठी' असा स्पष्ट उल्लेख असतो. मात्र जल्लोषाच्या तयारीत असलेली मंडळी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. यंदा उत्साहात रंगपंचमी साजरी करा, मात्र आपली त्वचा व डोळ्यांची काळजी घ्या, असा सल्ला वोक्हार्ट हॉस्पिटलमधील त्वचाविकार तज्ज्ञांनी या चर्चासत्रात दिला आहे. होळी खेळा जेलच्या रंगांनी रंगांची उधळण असणा-या होळी सणाची जोरदार तयारी सुरू झाली असेल. रंग, पिचका-या, थंडाई आणि पुरणपोळी.. अश सगळ्या गोष्टींचं प्लानिंग सुरू झालं असेल. रंग घेताना बाजारात असलेल्या रंगांमध्ये बरेचदा आपल्याला रासायनिक केमिकल्स असलेले रंगच पाहायला मिळतात. मात्र यावर तोडगा काढून तुमची होळी अधिक आनंदात साजरी व्हावी यासाठी हायपरसिटीने जेलसारखे असणारे होळीचे रंग बाजारात आणले आहेत. याची निर्मिती नैसर्गिकरित्या करण्यात आली असून याच्या वापराने तुम्हाला अजिबात इजा पोहोचणार नाहीत. त्वचेसाठी अतिशय नाजूक असून त्यामुळे तुमच्या त्वचेला हानी पोहोचणार नाही. एका पाकिटाच्या खरेदीवर तुम्हाला एक पाकीट मोफत मिळणार आहे. इतकंच नाही तर लहान मुलांना खेळण्यासाठी हायपरसिटीने रंगीत आणि आकर्षक अशा पिचका-यादेखील बाजारात आणल्या आहेत. याशिवाय खास होळीचा पोशाख म्हणून प्रसिद्ध असलेला पांढरा कुर्तादेखील या ठिकाणी तुम्हाला मिळू शकेल. अशी खेळा होळी होळी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. ही होळी खेळताना तुम्ही रंगांचा वापर करणारच; पण त्या रंगामध्ये लेड, काच आणि अन्य काही केमिकल्स असतात. त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणूनच सुरक्षित होळी कशी खेळाल या संदर्भात टॉप्स ग्रुपने काही टिप्स दिल्या आहेत. » होळी खेळताना जुने, जाड किंवा जीर्ण झालेले कपडे वापरा म्हणजे खेळून झाले की ते लगेचच टाकून देता येतात. शक्यतो गडद आणि रंगीत कपडे घालावेत जेणेकरून ते स्वच्छ करण्याचा वेळ वाचतो. » सावधानतेने होळी खेळा. उगाचच वाट्टेल तशी होळी खेळू नका. इतरांनाही खेळायला देऊ नका. » पूर्ण हाताचे शर्ट किंवा टी-शर्ट परिधान करा आणि महिलांनी पूर्ण लेगिन्स घाला. जेणेकरून तुमच्या शरीराच्या नाजूक त्वचेवर त्याचा परिणाम होणार नाही. » भरपूर पाणी प्या, म्हणजे तुमची त्वचा निर्जलीकृत अर्थात पाण्याचा अंश असेल आणि कोणत्याही केमिकल्सचा तुमच्या शरीरावर परिणाम होणार नाही. » चेह-यावर रंग लागणार नाही ही तुमच्या दृष्टीने अशक्य गोष्ट असेल, मात्र कोणी रंग लावायला येणार आहे हे कळल्यावर तुमचे डोळे आणि ओठ मिटून घ्या. » होळी खेळायला जाण्यापूर्वी तुमच्या केसांना आणि हाता-पायांना भरपूर खोबरेल तेल किंवा अन्य कोणतंही तेल चोपडा. यामुळे रंगांमध्ये असणा-या हानिकारक रसायनांपासून तेल बचाव करेल. इतकंच नाही तर तुमच्या अंगांवरचा रंग काढण्यासाठीही यामुळे मदतच होईल. » चेह-यावरचा रंग काढण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. हा रंग काढतानाही डोळे आणि ओठ बंद ठेवावेत. » तुमच्या मुलांकडे लक्ष द्या. तुमची मुलं होळी खेळतात तेव्हा तिथे पालकांचं लक्ष असणं आवश्यक असतं. म्हणूनच एखाद्या जाणकार व्यक्तीने तिथे हजर राहणं आवश्यक असतं. » लहान मुलांचे डोळे अतिशय संवेदनशील असतात. काळजी घेऊनही डोळ्यात रंग गेल्यास भरपूर पाण्याच्या आधारे डोळे धुवावेत. लक्षात ठेवा डोळे चोळू नका. » होळीच्या दिवशी तुम्ही प्रवास करत असाल तर गाडीच्या काचा बंद करा. रंगपंचमीच्या दिवशी तर घराच्या बाहेर पडणं शक्यतो टाळावंच. कारण लोकांना कितीही सांगितलं तरीही ते फुगे मारण्याचं थांबत नाहीत. त्यामुळे कधी तुमच्या अंगावर रंगाने किंवा पाण्याने भरलेला फुगा पडेल हे सांगता येणार नाही. » होळी खेळताना हानिकारक रंगांचा वापर करू नका. कारण यामुळे केवळ तुमच्याबरोबर होळी खेळणा-यांनाच इजा पोहोचेल असं नाही तर तुमच्या सणाचा बेरंग व्हायला वेळ लागणार नाही. » नैसर्गिक रंगांचा वापर करावा. असे रंग बाजारात सहज उपलब्ध आहेत. तुम्ही घरच्या घरी देखील रंग तयार करू शकता. मेंदी पावडरच्या साहाय्याने तुम्ही हिरवा रंग तयार करू शकता. हळदीपासून पिवळा रंग तयार होतो तर रक्तचंदनापासून लाल रंग तयार व्हायला मदत होते. » तत्काळ मदत कुठून मिळेल याची एक यादी करून जवळ ठेवा. अगदी लहान मुलांचे डॉक्टर, जवळचे हॉस्पिटल्स आणि अॅम्बुलन्सचे नंबर पटकन हाताशी मिळतील असे ठेवा. » एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर अशा लोकांविरुद्ध किंवा इमारतीविरुद्ध देखील तुम्ही पोलिसांकडे तक्रार करू शकता. » होळीचं सेलिब्रेशन संपलं की मगच अंघोळ करावी. कारण सारखं सारखं अंग किंवा केस धुण्याने तुमचे केस खराब होण्याची शक्यता अधिक असते. शाम्पूच्या अतिरिक्त वापरामुळे केसांनाही हानी पोहोचण्याची शक्यता असते. |