प्राथमिक उपचाराची गरज कधीही, केव्हाही आणि कुठेही निर्माण होऊ शकते. कारण कधी कधी डॉक्टरांकडे पोहोचणं कठीण असतं. अशा वेळी आपल्याला माहीत असलेले प्राथमिक उपचारच कामी येतात. जे प्राण वाचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावता. अशा या प्राण वाचवणा-या प्राथमिक उपचारांविषयी जाणून घेऊ या. अचानक, कधी कोणावर कशी वेळ येईल हे काही आपल्याला सांगता येत नाही. म्हणजे आपण सहज बाहेर फिरायला म्हणून घराबाहेर पडतो. आणि पटकन आपल्यासोबत असलेल्या कोणाला तरी चक्कर येते किंवा कोणाला अचानक घाम फुटतो. किंवा कुठेतरी आगही लागू शकते. अगदीच कोणाचा पायही मुरगळून फ्रॅक्चर होऊ शकतं. अशा वेळी पटकन डॉक्टरांकडे जाणं शक्य नसतं. यालाच मेडिकल इमरजन्सी असं म्हणतात. म्हणजे त्या वेळी आपल्यासोबत असलेल्या व्यक्तीला तत्काळ उपचार मिळणं आवश्यक असतं. ही मेडिकल इमरजन्सी येते तेव्हा आपल्या कामी आपली बुद्धीच येते. जेणेकरून आपल्याला माहिती असलेल्या औषधांमुळे प्राथमिक उपचार घेणं आवश्यक असतं. कारण तो एक क्षण त्या व्यक्तीला उपचार देण्यासाठी अतिशय फायदेशीर असतो. म्हणूनच त्या वेळी नेमकं काय केलं पाहिजे म्हणजे त्या व्यक्तीला किंवा रुग्णाला डॉक्टरांकडे जाईपर्यंत त्वरित उपचार मिळतील, हे जाणून घेऊ या. हार्ट अॅटॅक आजकाल हार्ट अॅटॅकचं जसं वय उरलेलं नाही तसंच वेळही उरलेली नाही. कधीही कोणत्याही वेळेला आणि कोणालाही हार्ट अॅटॅक येऊ शकतो. लक्षणं » छातीत दुखणं आणि श्वास घेण्यात अडथळा निर्माण होतो. » खांदा, मान, हात, आणि पाठीकडे दुखणं सरकतं. » मळमळ होणे. » विनाकारण घाम येणे. » थकवा किंवा चक्कर येणे. प्राथमिक उपचार » तीनशे मिलिग्रॅम पाण्यात अॅस्प्रिनची गोळी विरघळून ते पाणी त्वरित रुग्णाला प्यायला द्यावं. » रुग्णाला जमिनीवर झोपवावं. » त्या व्यक्तीचा श्वासोच्छ्श्वास सुरळीत होतोय की नाही याची प्रथम तपासणी करून घ्यावी. नसेल तर त्याला कृत्रिम श्वासोच्छ्श्वास देण्याचा प्रयत्न करावा. » त्यानंतर अॅम्बुलन्सला फोन करा अथवा जवळच्या एखाद्या डॉक्टरकडे धाव घ्या. श्वान दंश कधी कधी रस्त्यावरून चालताना कुत्रा चावतो तर कधी रात्रीच्या वेळी पायावरून घूस किंवा उंदीर जाताना चावण्याची शक्यता असते. अशा वेळी काय करावं ? प्राथमिक उपचार » ज्या ठिकाणी प्राणी चावला असेल त्या ठिकाणी स्वच्छ पाणी आणि साबण लावून पाच मिनिटं स्वच्छ धुऊन काढा. म्हणजे चावलेल्या प्राण्याचं विष आत जाण्यापासून थांबू शकेल. » जखमेतून रक्त येत असेल तर त्या रक्ताला थांबवण्याचा प्रयत्न करावा. » जखमेवर सूज आली असल्यास त्यावर किमान दहा मिनिटं तरी बर्फ लावावा. » जखम झालेल्या ठिकाणी ताबडतोब पट्टी लावून जखम बांधून टाकावी. ब्रेन स्ट्रोक सेरेब्रोवेस्कुलर अॅक्सिडंटमध्ये मेंदूपर्यंत ऑक्सिजनयुक्त रक्त पोहोचवणा-या नलिका कमजोर होतात. यामुळे मेंदूला रक्तपुरवठा होत नाही. परिणामी ब्रेन स्ट्रोकचा सामना करावा लागतो. लक्षण » थकवा येणे, चेहरा, हात, पाय आणि शरीराच्या कोणत्याही भागातलं सेन्सेशन कमी होतं. » डोळ्यांसमोर अंधारी येते, विशेषत: एका डोळ्यानेच दिसत नाही. बुब्बुळं पसरतात. » जबरदस्त डोकेदुखी सहन करावी लागते. आणि बोलण्यात अडथळे निर्माण होतात. प्राथमिक उपचार » डोक्याखाली उशी ठेवून रुग्णाला झोपवावं. म्हणजे मेंदूचा रक्ताचा दबाव कमी होईल. » जर तो श्वास घेत असेल आणि त्या रुग्णाला काहीही समजत नसेल तर त्याला डाव्या कुशीवर करावं. म्हणजे त्याला ताजी हवा मिळेल आणि त्याला उलटी होईल. »त्याला कोणत्याही प्रकारचं पेय किंवा खाद्यपदार्थ देऊ नये. » त्या रुग्णाला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्याला अजिबात हलू देऊ नये. आगीपासून बचाव घरात कित्येकदा काम करताना किंवा तेल तसंच अन्य कोणते पदार्थ उडाल्याने आपला हात भाजू शकतो. किंवा समजा कुठे अचानक लागलेल्या आगीतून बाहेर पडायला थोडा वेळ लागतो. त्यात कधी कधी होरपळण्याची शक्यता असते. अशा वेळी काय करावं, पटकन कोणते उपचार करावेत. प्राथमिक उपचार » जखमेला पाच मिनिटं स्वच्छ पाण्याने धुवावं. त्यावर तेल लावू नये. » बरनॉल किंवा थंड वाटेल असं अन्य कोणतंही क्रीम लावणं आवश्यक आहे. किंवा तुमच्या जवळ जे काही लोशन असेल त्याचा वापर करावा. » मान किंवा चेह-याच्या जवळची त्वचा जळल्यामुळे रक्ताभिसरण कमी होतं. तसंच श्वास घ्यायला समस्या निर्माण होते. » होरपळलेल्या रुग्णाला सुती कपडे घालावेत. या रुग्णाला घाम आल्यास किंवा चक्कर किंवा ताप आल्यास किंवा त्याचं अंग थंड पडल्यास ताबडतोब वैद्यकीय मदत घ्यावी.जेणेकरून रुग्णाचे प्राण वाचवण्यात यश येईल. फ्रॅक्चर अचानक पडल्यामुळे किंवा पाय घसरल्याने काहीही कळायच्या अगोदर हात-पाय किंवा शरीराच्या कोणत्याही भागात असहनीय दुखायला लागतं किंवा सूज येते. यालाच फ्रॅक्चर असं म्हणतात. ज्या भागाला दुखापत झाली आहे तो भाग अजिबात हलू शकत नाही. कधी कधी तर चालणंदेखील मुश्कील होऊन जातं. प्राथमिक उपचार फ्रॅक्रच्या बाबतीत तीन गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक असतं. त्याला वैद्यकीय भाषेत एबीसी असं म्हणतात. ए म्हणजे एअर म्हणजे त्या रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होतो. दोन बी-ब्लिडिंग; यात शरीराच्या कोणत्याही भागातून रक्त येण्याची शक्यता असते. तीन सी- सक्र्युलेशन म्हणजे रक्तपुरवठा सुरळीत होतोय की नाही ते. या तीन गोष्टींकडे प्रथम लक्ष द्यावं लागतं. » अशा कोणत्याही प्रकारात जखमी झालेल्या व्यक्तीची नाडी तपासली जाते. हात किंवा पाय या ठिकाणी ठोके पडत नसतील तर त्या व्यक्तीला ताबडतोब शस्त्रक्रियेसारख्या उपचाराची आवश्यकता आहे हे समजावं. » ज्या ठिकाणी लागलं आहे त्याचा आजूबाजूचा भाग हाताने दाबून बघावा. रुग्णाला दाबल्यावर काहीही समजत नसेल तर ही नव्र्हस सिस्टीम किंवा स्पायनलला अर्थात मणक्याच्या हाडाला इजा झाली असं समजावं. » ताबडतोब वैद्यकीय मदत कशी मिळेल याकडे लक्ष द्यावं. तोपर्यंत ज्या ठिकाणी लागलं आहे त्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचा आधार न देता तो भाग हलवू नये. तसंच वैद्यकीय मदत मिळेपर्यंत त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचं पेय किंवा खाद्यपदार्थ देणंही टाळावं. » फ्रॅक्चर झालेल्या ठिकाणी कापडाची पट्टी बांधावी किंवा आजूबाजूला लाकडी पट्टी लावून हालचाल थांबवावी. |