आपल्यापैकी कित्येकांना कोलेस्टेरॉलला बळी पडण्याची भीती वाटत असते. कारण याच्या पातळीत वाढ झाली की अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकतं. मात्र या आजाराचं मूळ कारण कोलेस्टेरॉल नसून ते ज्याद्वारे वहन केलं जातं, त्या डेन्सिटी लिपोप्रोटिन्समुळे होतं. म्हणूनच यावर नियंत्रण आणायचं असेल तर नेमकं काय केलं पाहिजे, हे जाणून घेऊ या. स्वप्ना. मध्यम बांध्याची तरुणी, खूप स्थूल नाही आणि खूप बारीकही नाही. तरीही काही काही कारणामुळे तिच्या रक्तात कोलेस्टेरॉलची पातळी वाढली असल्याचं समोर आलं. हे प्रमाण अधिक झाल्यास मधुमेहासारख्या आजारांना सामोरं जावं लागेल अशी धोक्याची सूचना मिळाल्यामुळे ती घाबरली आणि माझ्याकडे योग्य डाएट प्लानसाठी आली. तिला तिची कोलेस्टेरॉलची पातळी कमी करायची होती. कोलेस्टेरॉल या संज्ञेची अतिशय वाईट प्रसिद्धी आहे आणि आपल्यापैकी बहुतांश लोकांना आपण कोलेस्टेरॉलला बळी पडण्याची भीती असते. कारण याच्या पातळीत उच्च प्रमाणात वाढ झाली की अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकतं, ज्यामध्ये हृदयविकार, रक्तदाब आणि मधुमेहाचा समावेश असतो, पण तुम्हाला हे माहीत आहे का याचं कारण कोलेस्टेरॉल नसतं. यकृतामार्फत तयार केलं जाणारं लिपीड हे शरीराच्या अनेक प्रक्रियांसाठी आवश्यक असतं. उदा. मेंदूतील चेतापेशींसाठी इन्सुलेशन तयार करणं, पेशींची संरचना उपलब्ध करून देणं. हाय डेन्सिटी लिपोप्रोटिन्स(एच डी एल)ची कमी पातळी अनेक समस्यांना कारणीभूत ठरते. दुस-या बाजूला लो डेन्सिटी लिपोप्रोटिन्स धमन्यांच्या भित्तिकांवर थर साठतो, त्यामुळे रक्ताच्या प्रवाहात अडचण येते आणि त्यामुळे काíडयोवॅक्स्युलर आजार उद्भवतात. या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे की हृदयाचा विकास करण्यासाठी ते वहन करीत असलेले कोलेस्टेरॉल नाही तर हे कोलेस्टेरॉल ज्या लिपोप्रोटिन्समुळे वहन होते, त्या लिपोप्रोटिन्सच्या उच्च (एचडीएल) आणि कमी (एलडीएल) पातळ्या हृदय विकास करण्याचं काम करतात. जीवनशैलीमध्ये निरोगी बदल घडवून आणणे आणि हृदय विकाराची जोखीम वाढवणा-या अन्नपदार्थाचे सेवन कमी करणं आवश्यक आहे आणि हे कोणत्याही शरीरयष्टीच्या प्रत्येक व्यक्तीसाठी लागू होते. उच्च कोलेस्टेरॉल पातळ्यांमुळे कोणत्याही प्रकारची शरीरयष्टी अर्थात स्थूल किंवा बारीक असलेल्या व्यक्तिच्या हृदयात दोष निर्माण होतो. त्यामुळे तुमचं वजन, शारीरिक कृती आणि आहार यांना विचारात न घेता तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉलच्या पातळीची नियमित तपासणी होणे आवश्यक आहे. तुमच्यातील घातक कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी उच्च प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट्स आणि ट्रान्स फॅट्स असलेले अन्नपदार्थ सेवन करण्यावर मर्यादा आणा. अनेक पॅक्ड अन्नपदार्थ उदा. बटाटय़ाचे वेफर्स आणि बेकरी उत्पादने ज्यामध्ये मैद्यासारख्या रिफाइन धान्यांचा वापर होतो, त्यात फायबर कमी प्रमाणात असतो आणि ट्रान्स फॅट्स अधिक प्रमाणात असतात. या व्यतिरिकक्त तेलाचा पुन:पुन्हा वापर केल्यामुळे ट्रान्स फॅट्सच्या पातळीत वाढ होते. पुन्हा रेड मीट बरेचदा खाण्याने, म्हशीच्या दुधाचे पदार्थ, तूप आणि नारळाच्या तेलामुळे एलडीएल पातळी वाढते. या एलडीएलच्या पातळीत मोठय़ा प्रमाणावर सॅच्युरेटेड फॅट्स असतात. म्हणूनच त्याच्या ग्रहणावर मर्यादा आणावी आणि त्यांच्याऐवजी कोणतेही प्रक्रिया न केलेले पदार्थ वापरावेत. फायबरचे दोन प्रकार असतात, विद्राव्य आणि अविद्राव्य. विद्राव्य म्हणजे पटकन विरघळणारे आणि अविद्राव्य म्हणजे झटकन न विरघळणारे. म्हणूनच विद्राव्य फायबरचे ग्रहण वाढवावं. या दोन्ही प्रकारामध्ये हृदयाच्या आरोग्याचे फायदे असतात, पण विद्राव्य फायबर तुमच्या एलडीएल पातळीला कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे ओट्स, ओट्स ब्रान, फळे, शेंगभाज्या, डाळी आणि भाज्यांचा तुमच्या आहारात नियमित समावेश केला पाहिजे. आणखी एक महत्त्वाचा बदल तुम्ही करू शकता तो म्हणजे बटरसारख्या उच्च प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट्स असलेल्या पदार्थाऐवजी लो फॅट टेबल स्प्रेडचा म्हणजे ज्यामध्ये कमी फॅट असतं अशा पदार्थाचा वापर करावा. लो फॅट टेबल स्प्रेड आरोग्यासाठी चांगले असले तरी टेबल स्प्रेड निवड करताना शून्य टक्के कोलेस्टेरॉल आणि शून्य ट्रान्स फॅट्स असलेल्या पदार्थाची निवड करावी. इथे सांगावीशी वाटणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरी लो फॅट विकल्प असले तरीसुद्धा ते कमीच वापरावेत, कारण अति नेहमीच वाईट असतं. त्याचा अतिरिक्त वापर तुमच्या आरोग्याला धोकाच पोहोचवेल. म्हणजे नेमकं काय करायचं? » आपण कित्येकदा पॅकेज ज्यूस आणि जेलींचं सेवन करतो. त्याऐवजी ताजी फळं सेवन केली पाहिजेत. कारण ती जास्त सकस असतात आणि तो तुमच्या आरोग्यासाठी अतिशय चांगला पर्याय असू शकतो. » दररोज किमान ३० मिनिटं व्यायामदेखील पुरेसा आहे. त्यामुळे शक्य असल्यास दररोज चालावं. » सायकल चालवा, पोहा किंवा तुमचा आवडता खेळ खेळा ते देखील फायदेशीर ठरते. » एलिव्हेटर(लिफ्ट)च्या जागी पाय-यांचा वापर करावा. » अधिक वेळ टीव्ही पाहायला एकाच जागी बसू नये. टीव्ही पाहताना काही सीटअप्स काढण्यामुळे देखील फरक पडू शकेल. » लक्षात ठेवा की तुमचे आरोग्य ही तुमची जबाबदारी आहे. केवळ तुम्हीच त्याची उत्तम काळजी घेऊ शकता. |