सुंदर दिसावं असं कोणाला नाही वाटत! मग बाजारात मिळणारी विविध सौंदर्य प्रसाधनं वापरून सौंदर्य टिकवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यात कधी कधी फायदा होण्यापेक्षा नुकसानच होतं. पण काही घरगुती गोष्टींचा वापर केला तर आपण आपलं सौंदर्य टिकवू शकतो. अशाच काही घरगुती गोष्टींची ही माहिती. आपण सुंदर दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यामुळे सौंदर्य टिकवण्यासाठी वा खुलवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. अनेक रासायनिक क्रीम, साबणांचा वापर केला जातो मात्र त्यामुळे त्वचा खराब होऊ शकते. आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि वाढत्या ताणतणावांमुळे सौंदर्य टिकवण्याची गरज वाढत असल्याचं दिसतं. सारखं सारखं ब्यूटिपार्लरमध्ये जाणं आपल्याला शक्य नसतं. ब्यूटिपार्लरमध्ये धावपळ करण्यापेक्षा घरच्या घरी साध्या सोप्या उपायांच्या साहाय्याने सौंदर्य जपता येऊ शकतं. चेह-याप्रमाणेच हाता-पायांचे, डोळ्यांचे, केसाचे सौंदर्य आपण घरीच टिकवू शकतो. तेही कोणताही खर्च न करता! त्यामुळे सौंदर्य टिकवण्यासाठी वा खुलवण्यासाठी घरच्या घरीच करता येणारे सहज सोपे उपाय :- नितळ त्वचेसाठी » नितळ त्वचेसाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. » कोबीच्या रसात गंधक व क्लोरीन ही द्रव्य असतात. त्यामुळे त्वचेला नवं जीवन मिळतं. » ज्यांची त्वचा अत्यंत शुष्क झाली आहे, अशा मध्यमवयीन किंवा प्रौंढ स्त्रियांना अंडयाचा पिवळा बलक उपयोगी आहे तर ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांनी चेह-याला अंडयाचा पांढरा बलक लावावा. आणि ज्यांची त्वचा नॉर्मल आहे त्यांनी चेह-यावर प्रथम पांढरा बलकचा पॅक लावावा. तो » » » सुकल्यावर त्याच पॅकवरती पिवळ्या बलकाचा पॅक लावावा. म्हणजे हे दोन्ही बलक त्वचेमध्ये शोषून घेतले जातील. त्वचा मऊसर होईल. » आंबेहळद, जायफळ दुधात किंवा लिंबाचा रसात उगाळून त्याचा लेप करावा. हा लेप रक्तशुद्धी करणारा आहे. त्वचेवरील काळसरपणा किंवा डाग घालवण्यास या लेपाचा फार उपयोग होतो. » तांबडया मुळ्याचा रस व दही यांचं मिश्रण चेह-याला लावलं तर चेह-यावरचे मुरमांचे डाग कमी होतात. » टोमॅटोचा रस १ चमचा, काकडीचा रस एक चमचा, कोबीचा रस एक चमचा हे सर्व एकत्र करून चेह-याला लावल्यास काळे डाग व वर्तुळं कमी होतात. निरोगी केसांसाठी » लांबसडक, निरोगी, काळेभोर केस हे सौंदर्याच प्रतीक मानलं जातं. त्यामुळे त्यांची काळजी घेणं तितकंच गरजेचं असतं. » केसात कोंडा झाल्यास कोरफडीचा गर केसांना १० मिनिटं लावून ठेवावा व त्यानंतर केस धुवावेत. » केस धुवायच्या ४-५ तास अगोदर अर्धा कप लिंबाच्या रसात जराशी साखर मिसळून केसांमध्ये लावावी. » केसांना चमक येण्यासाठी मसूर डाळ पाण्यात वाटून केलेला लेप केसांना लावावा. » वापरलेली चहा पावडर पाण्यात उकळवून, गाळून त्या पाण्याने केस धुतल्याने केसांना चांगला रंग येतो व केस मजबूत व्हायला मदत होते. केस गळत असल्यास.. » सकाळी वाळलेला आवळा पाण्यात भिजवून ठेवावा. रात्री झोपताना आवळा वाटून केसांना लावून लेप करावा. एका तासाने कापडाने पुसून घ्यावेत. सकाळी अंघोळ करताना धुवून टाकावेत. » केस गळत असतील तर एक मध्यम आकाराचे डाळिंब सालीसकट मिक्सरमध्ये बारीक करावं. जास्वंदीचं फूल, १० -२० ब्राम्ही पानं, १ चमचा आवळा पावडर, मेंहदी पानं अंदाजे घ्यावीत. हे सर्व बारीक करून २०० ग्रॅम तिळाच्या तेलात लोखंडाच्या कढईत मंद गॅसवर तडतडेपर्यंत गरम करून कोमट असतानाच एका बाटलीत भरून ठेवावं व ते केसांना लावावं. टक्कल पडत असल्यास.. » दोन-तीन लसणाच्या पाकळ्या डोळ्यांना लावायच्या सुरम्याबरोबर वाटाव्यात. या चटणीला टक्कल पडलेल्या भागावर लावावं. जळजळ झाली तर आगोदर तूप किंवा लोणी लावून मग त्यावर हा लेप लावावा. २० ते ३० दिवस हा लेप दररोज करून लावावा. » दिवसातून २-३ वेळा कोथिंबिरीच्या रसाचा मसाज केल्याने काही दिवसांत फायदा होतो. डोळ्यांचे सौंदर्य.. » डोळ्यांखाली काळी वर्तुळं आली असल्यास दुधात बदाम उगाळून ते मिश्रण किंवा काकडीच्या साली डोळ्यांखाली लावाव्यात. » डोळ्यांना थंडावा मिळण्यासाठी काकडीचे काप, गार दुधाच्या पट्टया डोळ्यांवर ठेवाव्यात. हातापायांची काळजी.. » हातांचा काळेपणा घालवण्यासाठी बेसनाचं पीठ दुधात कालवून हातांना मसाज करावा. » पपईचा गर चोळल्यानेही काळेपणा कमी होऊ शकतो. » पायांना भेगा असल्यास ग्लिसरिन व लिंबूरसाचं मिश्रण भेगांना रोज लावल्यानेही फायदा होऊ शकतो. » लिंबू चोळल्याने नखांना चमक येते. » लिंबाचा रस हाताचा कोपरा व गुडघ्यांना चोळल्याने तिथल्या मृत पेशी निघून जातात आणि काळेपणा नाहीसा होतो. |