तापमानात झालेला बदल, दूषित आणि साठवलेलं पाणी यामुळे पावसाळ्यात मोठया प्रमाणात व्हायरल इन्फेक्शन होतं, हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. हे सांसर्गिक आजार टाळण्यासाठी आपणच आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायला हवी. थोडीशी काळजी घेतली तर हे आजार टाळता येतात. कसं ते पाहू या. पावसाच्या पहिल्याच तडाख्याने असहय़ उन्हापासून सुटका मिळाली. ओल्या मातीचा हवाहवासा गंध, ढगांचा गडगडाट आणि पावसाच्या सरींचा आवाज यामुळे हवेत एक प्रकारचा ताजेपणा आला आणि पावसाच्या आगमनाची चाहूल लागली. गार वारे आणि बोचरी हवा यामुळे पावसाळ्यात सर्व प्रकारचे अन्न, पाणी आणि हवेतून होणारे संसर्ग फोफावतात. थोडीशी काळजी घेतल्याने या ऋतूत होणारे संसर्ग टाळणं शक्य होतं. कमी झालेली प्रतिकारशक्ती आणि जंतूंमुळे होणारे वाढते आजार ही मान्सूनची कारणे असून यामुळे संपूर्ण देशभरात अनारोग्याचे वातावरण तयार होतं. पाण्यामुळे होणारे आजार उदा. हेपेटायटीस ए, टायफॉईड, कॉलरा, पोट बिघडणे, लेप्टोस्पायरोसीस इ. मोठया प्रमाणावर होऊ शकतात आणि अनेक जणांना याची कल्पना नसते. लेप्टोस्पायरोसीसचा संसर्ग हा उंदराच्या मुतामध्ये असलेल्या लेप्टोस्पायरा जंतूपासून होतो. साठलेल्या पाण्यातून अनवाणी जाणाऱ्या माणसाला पायाला होणारी जखम किंवा छेद असेल तर किडनी किंवा लिव्हरचं कार्य बिघडू शकतं. दूषित पाणी प्यायल्यामुळे होणारे आजार पावसाळ्यात सर्वाना माहीत असून हे प्रामुख्याने सखोल भागातून जाणाऱ्या पाईपलाईन आणि लीकेजची शक्यता हे यामागील प्रमुख कारण आहे. दूषित पाण्यामुळे हगवण, कॉलरा, टायफॉईड आणि हेपेटायटीस ए आणि ई यासारखे आजार होतात. साठलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास मोठया प्रमाणावर होऊन मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया या आजारांमध्ये वाढ होते आणि रुग्णाच्या शरीराच्या तापमानात घट होते. तापमानात झालेला बदल, दूषित पाणी आणि साठलेले पाणी यामुळे पावसाळ्यात व्हायरल इन्फेक्शन मोठया प्रमाणावर होते. सर्दी, खोकला आणि ताप याबरोबरच आता एच1एन1 स्वाईन फ्लूचा प्रसार जगभरात मोठया प्रमाणावर होत आहे. हा सांर्सगिक आजार असून पावसाळी तापाप्रमाणे त्याचा प्रसार होतो. थोडीशी काळजी घेतली तरी आजार टाळता येतो. आपण आपली आणि कुटुंबीयांची अधिक काळजी घ्यायला हवी. रस्त्यावरील खाद्यपदार्थाचे सेवन करणे पावसाळ्यामध्ये रस्त्यावरील भजी, वडापाव, भेळ, पाणीपुरी, चाट इ. पदार्थामुळे तुम्हाला आजार होऊ शकतात. जर तुम्हाला रस्त्यावरील हे पदार्थ खायची आवड असेल तरी पावसाळ्यात उघडयावरचे हे पदार्थ खाणं टाळा. हेच पदार्थ घरी आरोग्यदायी पद्धतीने तयार करा आणि खा. बाहेरील पाणी आणि बर्फ खाणं टाळा उकळलेले, सीलबंद आणि शुद्ध पाणी प्या. कोणतेही पाणी वापरून तयार केलेला बर्फ वापरू नका. बाहेरची, न उकळलेल्या किंवा प्रक्रिया न केलेल्या पाण्यातील सरबतं पिणं व त्यात बर्फ घालून घेणं टाळा. ज्यूस, ताक, लिंबू सरबत इ. गोष्टी बाहेर पिणे टाळावं. लसीकरण काही संसर्ग टाळता येऊ शकतात. आपण वेळीच लसीकरण करून घेतलं तर हे साध्य होऊ शकतं व त्याकरता फार खर्च येत नाही. हेपेटायटीस ए व ई आणि एच1एन1 करता लस उपलब्ध आहे. विशेषत: लहान मुलांना ती दिली गेली पाहिजे. चिरून ठेवलेल्या भाज्या किंवा फळे खाऊ नका सोलून अथवा चिरून उघडयावर ठेवलेली फळं कधीच खाऊ नका. कोबी, पालक, मेथी यासारख्या भाज्यांबाबत विशेष काळजी घ्या. त्यामध्ये असलेली माती त्यातून येणारे जंतू यामुळे संसर्ग होऊ शकतो. पेर, पीच, पपया, केळी यांसारखी फळं मोठया प्रमाणावर उपलब्ध असून चविष्ट असतात. खाण्यापूर्वी ती स्वच्छ धुवून घ्यावीत. डासांपासून लांब राहा पावसाच्या सरींमुळे डासांना चालना मिळते आणि त्यातूनच मलेरिया व डेंग्यूसारखे आजार पसरतात. तुमचे घर आणि आजूबाजूचे वातावरण स्वच्छ व कचराविरहित ठेवा. तुमच्या आजूबाजूच्या परिसरात पाणी साठू देऊ नका. अंधार पडल्यावर दारे व खिडक्या बंद करा किंवा लाईट बंद करून पडदे बंद ठेवा. डासांशी थेट संपर्क येऊ नये म्हणून स्प्रेचा वापर करा. पूर्ण हात असलेले कपडे वापरण्याचा प्रयत्न करा, तसंच डास मारणारी कॉईल वापरा. मच्छरदाणी लावून झोपा. वारंवार हात धुवा वारंवार हात धुण्यासारख्या सवयी लावून घ्याव्यात. विशेषत: जेवणापूर्वी जेणेकरून सांसíगक आजार टाळता येतील. या हात धुण्याच्या सवयीमुळे पावसाळ्यात होणारे विविध आजार टाळण्यास मदत होईल. संतुलित आणि प्रोटिनयुक्त आहार घ्या ग्रीन टी, ताजी फळं, नट्स यामुळे सांसíगक आजाराशी लढा देता येतो. हे लक्षात ठेवा की संतुलित आणि प्रोटिनयुक्त आहारामुळे पावसाळ्यात प्रतिकारशक्ती वाढवता येते. आपले शरीर अनेक संसर्गाना अनुकूल असते. वेळेवर काळजी घेणं कधीही चांगलं असतं. यामुळे पावसाचा आनंद घेता येतो. घरीच खावं व शीतपेये घेण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून स्वच्छता पाळली जाईल. साधा ताप किंवा सर्दी झाल्यास डॉक्टरांकडे जा. संतुलित पोषक आहार व जीवनसत्त्वांच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे नियमितपणे घ्याव्यात. या साध्या सूचना पाळा आणि या पावसाळ्यात स्वत:च स्वत:चे डॉक्टर बना. |