संसर्गजन्य आजार पसरू नयेत म्हणून योग्य ती काळजी घ्या, असं डॉक्टरांकडून वेळोवेळी सांगितलं जातं; पण काळजी घेणं म्हणजे नेमकं काय करणं हे कित्येकदा आपल्याला कळत नाही. आपण आपल्या घरातूनच याची सुरुवात कशी करू शकतो याची माहिती आपण जाणून घेऊया म्हणजे आजारांना आपण लांब ठेवू शकू. ब-याचदा हात साबणाने स्वच्छ धुवावेत अशा अर्थाच्या जाहिराती आपण टीव्हीमध्ये पाहतो. हायजिन या वैद्यकीय भाषेत प्रचलित असलेल्या शब्दाचा अर्थ स्वच्छता असा होतो. हायजिन आणि स्वच्छता या दोन्ही संज्ञा एकमेकांत इतक्या गुंतलेल्या आहेत की त्या वेगळ्या काढणं शक्यच नाही. या प्रक्रियेत स्वच्छतेचा अर्थ असा होतो की आजार पसरवणा-या विषाणूंचा नायनाट करणे. मग ही स्वच्छता शरीराची असो, स्वत:ची वैयक्तिक असो, मानसिक, दातांची अशी कोणत्याही प्रकारची असो. या सगळ्यांचा संबंध लोकांच्या आरोग्याशी निगडित असतो. ही अशी वैद्यकीय संज्ञा आहे की ती आरोग्याचा प्रसार आणि जतन करण्याचं काम करते. वैद्यकीय शास्त्रानुसार हायजिन या संज्ञेखाली पुढील गोष्टी येतात » संसर्ग झालेल्या व्यक्तीला किंवा वस्तूंवरील विषाणूंचा प्रसार होणार नाही याकडे लक्ष दिलं जातं. » वैद्यकीय प्रक्रियेत वापरण्यात आलेल्या उपकरणांचं र्निजतुकीकरण करणे. » संसर्ग होणार नाही अशा वस्तू जसं की मास्क, गाऊन, टोपी, डोळ्यांवर आवरण आणि हातात ग्लोव्हज वापरणे. » जखमेला योग्य पद्धतीने बांधून ठेवणे. » वैद्यकीय कच-याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे. » ऑपरेशन रूममध्ये वेळोवेळी योग्य पद्धतीने हात धुणे आदी गोष्टी येतात. जेणेकरून संसर्गाचा प्रसार होणार नाही याची काळजी प्रामुख्याने घेतली जाते. असं असलं तरी मुळात घराची स्वच्छता तितकीच महत्त्वाची आहे. खरं म्हणजे कोणताही आजार पसरू नये किंवा त्याची सुरुवात होऊ नये याची सुरुवात घरातूनच होते. मग हळूहळू तो पसरत जातो. पाणी, पदार्थ, पाळीव प्राणी आणि संसर्ग झालेल्या व्यक्तीपासून घरात संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. कित्येक जणांना पाळीव प्राणी घरी पाळण्याची सवय असते. त्यामुळे श्वसनाचे कित्येक आजार बळावण्याची शक्यता असते. तसंच घरात विषाणू पसरण्याचं मुख्य कारण म्हणजे हात, ज्या ठिकाणी पदार्थ ठेवतो ते ठिकाण आणि वापरण्यात येणारी कपडी. विषाणू कपडय़ांबरोबरही पसरण्याची शक्यता अधिक असते. मुख्यत्वे टॉवेलमुळे. म्हणूनच घरातली काळजी घ्यायची असेल तर हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे, मग तुम्ही ते हात साबणाने धुवा किंवा अन्य कोणत्याही लिक्विड सोपने. अथवा पाण्याचा वापर न करता सॅनिटायझरने हातावरील विषाणू नष्ट करता येतात. ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता असते तेव्हा कित्येक जण सॅनिटायझरचा वापर करतात. मात्र काही ठिकाणी सॅनिटायझर मिळू शकत नाही अशा वेळी लोक साबणाऐवजी माती किंवा वाळूचा वापर करतात आणि तो मान्यही केला गेला आहे. आता आपण कशी स्वच्छता बाळगायची ते पाहूया. श्वसन स्वच्छता » सर्दी किंवा खोकला येत असेल तर स्वत:जवळ टिश्यू पेपर बाळगा आणि त्यावरच बाहेर पडणारी सर्दी किंवा कफ गोळा करण्याचा प्रयत्न करा. » या वापरलेल्या टिश्यूची लवकरात लवकर विल्हेवाट लावायचा प्रयत्न करा. » हात साबणाने किंवा अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझरने स्वच्छ करावेत. पदार्थाची स्वच्छता कोणत्याही पदार्थापासून विषबाधा होऊ नये म्हणून पदार्थाची स्वच्छता राखणे आवश्यक आहे. » कच्चे आणि शिजवलेले पदार्थ वेगवेगळे ठेवावेत. » योग्य तापमानाला पदार्थ शिजवावेत. काही पदार्थाना शिजायला वेळ लागतो. अशा वेळी पदार्थाला आवश्यक असलेला वेळ शिजायला द्यावा. » योग्य तापमानाला पदार्थ जतन करा. » आवश्यक तेवढा पाण्याचा विचार करा. पाणी वापरताना स्वच्छ, गाळलेलं पाणी वापरा. पाणी स्वच्छता जे पाणी पिण्यासाठी वापरण्यात येतं ते स्वच्छच असलं पाहिजे याकडे आपला कटाक्ष असला पाहिजे. तसंच योग्य प्रमाणात स्वच्छ पाणी प्यायल्यास आपण कित्येक आजारांना दूर करतो. » क्लोरीन किंवा आयोडिन यांसारख्या रासायनिक जंतुनाशकांचा वापर करा » पाणी उकळवा » पाणी गाळून घ्यावं » ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता असेल अशा ठिकाणी सोलार जंतुनाशकाचा वापरही तुम्ही करू शकता घर स्वच्छता पाणी, पदार्थ आणि हात याचबरोबर घरातील काही ठिकाणं म्हणजे बाथरूम, टॉयलेट सीट्स, फ्लश हँडल्स, दार, नळ, ओटा, बेसिन या स्वयंपाकघर आणि बाथरूममधल्या गोष्टींची स्वच्छतादेखील आवश्यक असते. कारण ही ठिकाणं स्वच्छ केली नाहीत तर त्या ठिकाणांपासून विषाणू पसरण्याची शक्यता अधिक असते. जेव्हा घरातील व्यक्तीला डायरिया असेल तेव्हा कित्येकदा विषाणू बाथरूममध्ये बेसिनवर, पडद्यावर, नळावर, पाणी साचलेल्या ठिकाणी लपून बसतात आणि त्याचा उपद्रव वाढण्याची शक्यता असते. असे विषाणू आपल्या डोळ्यांनाही दिसत नाहीत. मग ते आपल्या हातावाटे आपल्या शरीरात प्रवेश करतात. म्हणूनच बाथरूम आणि टॉयलेटची नियमित स्वच्छता राखणं आवश्यक आहे. टॉवेलसारख्या गोष्टींमुळे विषाणू पसरण्याची शक्यता अधिक असते हे आपण पाहिलंच आहे. प्रत्येक व्यक्तीचा टॉवेल, अंतर्वस्त्र, रुमाल, जेवण तयार करताना वापरण्यात येणारे नॅपकिन आदी गोष्टी वेगळ्या ठेवाव्यात. किंवा रोजच्या रोज साबणाने धुवाव्यात. कारण साबण आणि पाण्यामुळे त्यावरील विषाणू नाहीसे होण्यास मदत होते. त्या न धुता आपल्या संपर्कात आल्यास त्यावरील विषाणूंचा संसर्ग आपल्याला होण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच या गोष्टी वेळच्या वेळी तपासाव्यात. घरातल्या घरात काळजी घरातल्या ज्या मंडळींना संसर्ग झाला आहे त्यांच्याबाबतीत स्वच्छता अधिक राखली पाहिजे. त्यांचे कपडेदेखील वेगळे धुवावेत. त्यांना रोजच्या रोज स्वच्छ कपडे परिधान करायला द्यावेत. त्यांची खाण्या-पिण्याची भांडीही वेगळी ठेवावीत. इतकंच नव्हेतर त्यांची कपडे आणि भांडी धुताना ग्लोव्हजचा वापर केला तरीही चालतो. तसंच ते धुऊन झाल्यावर आपले हात साबणाने स्वच्छ धुवावेत. |