|
मोसंबी
| मोसंबी हे लिंबू वर्गातील आंबट-गोड फळ आहे. हे अतिशय गुणकारी फळ असून त्यात ए, बी आणि सी जीवनसत्त्व आहेत.
मोसंबी हे लिंबू वर्गातील आंबट-गोड फळ आहे. हे अतिशय गुणकारी फळ असून त्यात ए, बी आणि सी जीवनसत्त्व आहेत. शर्करा आणि फॉस्फरसचं प्रमाण अधिक असतं. चवीला आंबट-गोड असल्याने अधिक गुणकारी असतं.
» रोगप्रतिकारशक्ती वाढत असल्यामुळे मुलांसाठी मोसंबी विशेष फायदेशीर आहे. » मोसंबीच्या रसाने शरीराला शीतलता प्राप्त होते. » हे पौष्टिक, स्वादिष्ट, रुचकर, पाचक, दीपक, हृदयास उत्तेजना देणारं, धातुवर्धक आणि रक्तसुधारक आहे. » याच्या सालीतून सुगंधी तेल मिळतं. तसंच मोसंबीच्या सालीचं चूर्ण फेसपॅकमध्ये वापरल्याने त्वचेवरील व्रण, मुरुम कमी होऊन सौंदर्य सुधारतं. » रस उत्साहवर्धक असल्याने अशक्त, आजारी, वृद्ध आणि बालकांसाठी विशेष उपयुक्त ठरतो. » अन्नपदार्थाचा स्वाद वाढण्यासाठी मोसंबीचा रस घालतात. » पथ्यकर असल्याने तापात किंवा आजारपणातही मोसंबीचा रस देता येतो. » रस गाळून प्यायल्यास कफदोष नाहीसा होतो. » अधिक श्रम, थकवा यामुळे घाम आल्यावर शरीरातील जलांश कमी होतो. अशा वेळी मोसंबीचा रस घेणे उत्तम ठरतं. » हृदयाला हितकर असल्याने छातीत धडधड, अस्वस्थता होत नाही. » भूक लागते; पण जेवायची इच्छा होत नाही अशा वेळी मोसंबीचा रस मीठ, जीरं आणि ओव्यासोबत घोट घोट घेतल्याने तोंडाला चव येते. » पित्ताची प्रकृती किंवा पित्ताचा त्रास असणा-य़ांनी मोसंबीचा वापर अधिक करणं चांगलं. » पचनशक्ती सुधारते. » मोसंबं खाल्ल्याने दात स्वच्छ होतात. » मलावरोधाची तक्रार असल्यास जेवणानंतर मोसंबी सेवन करावं. ही तक्रार दूर होते. » गॅसेसची समस्या असल्यास मोसंबीच्या रसात मिरपूड टाकून तो रस प्यावा. » वाळलेल्या मोसंबीच्या सालीचे चूर्ण केसांना लावल्याने केस दाट आणि मुलायम होतात. |
Read More »
हिवाळ्यातला औषधी आहार
| हिवाळा म्हटलं की भूक खूप लागते. वेळी अवेळी लागलेल्या भुकेमुळे बाहेर रस्त्यावर मिळणा-या तेलकट पदार्थाचं सेवन केलं जातं. मग काय डाएटची ऐशीतैशी झालीच म्हणून समजा. म्हणूनच या हिवाळ्यात नेमके कोणते औषधीपदार्थ सेवन करावेत याची माहिती.
ग्रीन टी
कोणत्याही वयोगटातील व्यक्तीसाठी ग्रीन टीचा पर्याय उत्तम आहे. आदर्श आहारात याचा समावेश केलेला आढळतो. ग्रीन टीच्या नियमित सेवनाने स्क्रीनम ब्रेस्ट किंवा फुप्फुसांचा कॅन्सर होण्याची शक्यता धुसर होते. उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचा ताणही या चहाच्या सेवनामुळे कमी होतो. इनफ्लुएन्झा किंवा तापात कमी झालेली शरीरातील ऊर्जा भरून काढण्याचं काम हा ग्रीन टी करतो. यात जीवनसत्त्व सी, जीवनसत्त्व बी आणि अँटिऑक्सिडंटचं प्रमाण अधिक असतं. म्हणूनच दिवसभरात जेवणानंतर दोन ते तीन वेळा याचं सेवन केल्यास उपयुक्त ठरतं.
तांबडा भोपळा
हिवाळ्यात मिळणा-या तांबडय़ा भोपळ्याचे विविध प्रकार आहेत. यात फॉलिड अॅसिडचा समावेश असतो जो गरोदर महिलेसाठी अतिशय उपयुक्त ठरतो. यातील पोषण मूल्यं पोटातील अभ्रकाच्या मेंदूचा विकास करण्यासाठी मदत करतं. याच्या सेवनाने महिलांना होणारा ब्रेस्ट कॅन्सर होत नाही. यात जीवनसत्त्व ए, जीवनसत्त्व सी, फायबर, फॉलिक अॅसिड, पोटॅशियम असल्याने याच्या फोडी किंवा जेवणापूर्वी स्टार्टर म्हणून याच्या सुपाचं सेवन करणं अधिक चांगलं असतं.
किवी
आपल्याकडे आता हे फळ बाजारात सर्रास मिळू लागलं आहे. यात जीवनसत्त्व सी, जीवनसत्त्व ई, फॉलिक अॅसिड, फायबर आणि पोटॅशियम यांचा समावेश असतो. याच्या सेवनाने तुमची त्वचा उजळते, रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहतं. तसंच पचनशक्ती सुधारण्याचं कामही हे फळ करतं.
बडिशेप
थंडीत बडिशेपचं सेवन केल्यामुळे सर्दी, खोकला, घसा सुजणे आदी विकारांपासून बचाव होतो. अँटिऑक्सिडंट असल्यामुळे वार्धक्याच्या खुणा दिसत नाहीत. याच्या सेवनाने मासिक पाळीदरम्यान होणा-या वेदना कमी होण्यास मदत होते. बडिशेपचे दाणे पाण्यात उकळून एक चमचा मध आणि हर्बल टीसोबत घेतल्यास याचा परिणाम दिसून येतो.
अंडी
अंडय़ातील पिवळा बलक हा त्यातील कोलेस्ट्रॉलमुळे परिचित आहे. पण त्याचं अतिसेवन टाळावंच. यात प्रोटिन, जीवनसत्त्व डी, जीवनसत्त्व ए आणि झिंक असल्यामुळे त्याचं प्रमाणात सेवन केल्यास ते शरीरासाठी उत्तम ठरतं. अंडं उकडून किंवा कसंही खाल्लंत तरीही ते तुमच्या आरोग्यासाठी हितकारक आहे.
मेथी
खास करून महिलांसाठी ही मेथी अतिशय हितवर्धक आहे. स्तनपान करणा-या महिलांसाठी अतिशय उत्तम आहे. लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी मेथी अतिशय गुणकारी आहे. चेह-याचा फेसपॅक म्हणूनही मेथी उपयुक्त ठरते. तसंच केसांची काळजी आणि कोंडा होत नाही. |
Read More »
चाचण्या नेमक्या कशासाठी?
| कोणताही आजार असो वा आजाराचं निदान करायचं झाल्यास डॉक्टर काही प्राथमिक चाचण्यांची यादी आपल्याला देतो. मात्र कधी कधी ही यादी पाहून काही घाबरून जातात. मात्र ही यादी पाहून घाबरून न जाता या प्राथमिक चाचण्या नेमक्या कशासाठी केल्या जातात, याची माहिती करून घेणं आवश्यक आहे. या चाचण्या संपूर्ण वैद्यकीय तपासणीसाठीदेखील आवश्यक असतात. अशा काही चाचण्यांची ही माहिती.
रुग्णाला कोणत्या प्रकारचा आजार झाला आहे, याचं निदान करण्यासाठी डॉक्टर प्रथम काही चाचण्या करायला सांगतात. या चाचण्यांमुळे डॉक्टरांना आजाराचं निदान करण्यास मार्गदर्शन मिळतं. या चाचण्या करायला सांगताच घाबरून जाणारे असतात आणि काही चोखंदळ माणसं प्रत्येक चाचणी नेमकी कशासाठी आहे हे डॉक्टरांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणारेही असतात. मात्र प्रत्येक वेळी डॉक्टरांना वेळ असतोच असं नाही. म्हणूनच काही ठरावीक चाचण्या नेमक्या कशासाठी केल्या जातात, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. अशा प्राथमिक पातळीवर केल्या जाणाऱ्या चाचण्यांची नावं आणि त्यांची माहिती आज आपण करून घेऊ या.
कॉम्प्रिहेन्सिव्ह वेलनेस प्रोफाइल
हा एक चाचण्यांचा समूह असून, यात लिपिड प्रोफाइल, संपूर्ण रक्त तपासणी, फ्लुएड्स आणि इलेक्ट्रोलाइट्स, थायरॉइड, लिव्हर, किडणी आणि कॅल्शियमच्या तपासणीचा समावेश असतो. आता प्रत्येक चाचणीतून नेमकं काय केलं जातं हे जाणून घेऊ या.
» लिपिड प्रोफाइल : ही एक रक्त तपासणी असून त्यात रक्तात जमा होणा-या विविध प्रकारच्या चरबीचं प्रमाण समजण्यासाठी डॉक्टरांना मदत होते. चरबी अर्थात कोलेस्ट्रॉल. यात एचडीएल कोलेस्ट्रॉल, एलडीएल कोलेस्ट्रॉल, रिस्क रेशिओ आणि ट्रायग्लिसराइड्सचं प्रमाण तपासलं जातं. एचडीएल कोलेस्ट्रॉल हा चरबीचा प्रकार असून तो शरीरासाठी आवश्यक असतो, तर एलडीएल कोलेस्ट्रॉल हा शरीरासाठी हानीकारक असतो. म्हणजे एलडीएल कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतो, परिणामी रक्तात गुठळ्या होणे, नसा बंद होणे आदी प्रकार उद्भवू शकतात. ट्रायग्लिसराइड हादेखील कोलेस्ट्रॉलचाच एक प्रकार असतो. ट्रायग्लिसराइड्स कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्यास हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते. रिस्क रेशिओतही या प्रत्येकाचं प्रमाण सरासरी प्रमाण समजतं. म्हणूनच डॉक्टर या प्रकारच्या चाचण्या करायला सांगतात.
» सीबीसी : कित्येकदा कोणत्याही प्राथमिक आजारासाठीदेखील डॉक्टर ही टेस्ट करण्याचा सल्ला देतात. उइउ म्हणजेच कम्प्लिट ब्लड काऊंट असं म्हटलं जातं. ही चाचणी रुग्णाला कोणत्या प्रकारचा आजार झाला आहे याचं मार्गदर्शन डॉक्टरांना करतं. उदाहरणच द्यायचं झालं तर या चाचणीमुळे रुग्णाची अॅनिमिया स्थिती, एखादा संसर्गजन्य आजार, ताप आदी आजारांचं निदान या चाचणीतून केलं जातं.
» फ्लूइड्स आणि इलेक्ट्रोलेट्स : ही चाचणी सर्वसाधारण माणसांपेक्षा जो रुग्ण गंभीर आजारी आहे, अशा रुग्णांसाठी दिली जाते. उदाहरणार्थ, अतिसार, डेंग्यूसारखे ताप इ. थोडक्यात आजारी रुग्णांचीच ही चाचणी केली जाते. कारण मुळात झालेल्या आजारामुळे त्यांच्या शरीरातील कमी किंवा अधिक झालेलं पोटॅशिअम, सोडिअम आणि क्लोराइडचं प्रमाण तपासण्यासाठी ही चाचणी केली जाते.
» थायरॉइड : थायरॉइड ही आपल्या शरीरातील अत्यावश्यक ग्रंथी आहे, मात्र या ग्रंथीचं प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी किंवा अधिक झाल्यास तिचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. हे प्रमाण अधिक असल्यास उच्च रक्तदाब होणे, सतत खाणे, छातीतील धडधड वाढणे आदी गोष्टी होतात, तर या ग्रंथींचं प्रमाण कमी झाल्यास सतत झोपून राहणे, सुस्त राहणे, वजन वाढणे अशा गोष्टी संभवतात. थोडक्यात शरीरातील स्फूर्ती कायम राखण्याचं काम ही ग्रंथी करते. टी ३, टी ४, टीएसएच अशा चाचण्या घेतल्या जातात. त्यातून शरीरात असणाऱ्या या ग्रंथीचं प्रमाण समजतं. त्यानुसार रुग्णाला योग्य ते उपचार देण्यास मदत होते.
» लिव्हर किंवा यकृत : किडणी किंवा यकृताचं काम सुरळीत होतंय की नाही हे तपासण्यासाठी अल्बुमिन, अल्कलाइन फॉस्फेट्स, एसजीओटी/पीटी, संपूर्ण बिलिरुबिन (रक्तातील घटक), संपूर्ण प्रोटिन आदी गोष्टींची चाचणी घेतली जाते. कावीळसारखा आजार यकृताचा आजार आहे. तसंच अति व्यसनाधीन माणसाचं यकृत व्यवस्थित आहे की नाही यासाठी या चाचण्या केल्या जातात. सर्वसामन्य माणसाचं यकृताचं कार्य तपासण्यासाठीदेखील ही चाचणी केली जाते.
» किडणी : किडणीचं कार्य सुरळीत आहे की नाही हे तपासण्यासाठीदेखील ब्लड युरिया नायट्रोजन आणि क्रिएटिनाइन या चाचण्या केल्या जातात. ब्लड युरिया नायट्रोजनमध्ये रक्तातील नायट्रोजनचं प्रमाण तपासलं जातं. क्रिएटिनाइन हा शरीरातील अनावश्यक घटक असतो. जो लघवीच्या मार्गे शरीराच्या बाहेर फेकला जातो. मात्र याचं प्रमाण अधिक झाल्यास तो शरीराबाहेर फेकला जात नाही. परिणामी किडणीच्या कार्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. म्हणून ही किडणीच्या आरोग्यासाठी ही चाचणी केली जाते.
» ग्लुकोज : मधूमेह असलेल्या रुग्णांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण तपासण्यासाठी ही चाचणी केली जाते. जेणेकरून रक्तातील साखरेचं प्रमाण वाढलं की कमी झालं हे कळतं.
» फेरिटिन : ही आयर्न चाचणी आहे. तुमच्या शरीरात असलेलं लोहाचं प्रमाण यामुळे स्पष्ट होतं. याची कमतरता असल्यास शरीरात लोहाची कमतरता असल्याचं निदान होतं. तसंच याचं प्रमाण अधिक असल्यास संसर्ग होण्याची किंवा यकृताचे आजार होण्याची शक्यता अधिक असते. गरजेपेक्षा अधिक प्रमाण वाढल्यास लुकेमिया कॅन्सरसारख्या आजारालाही सामोरं जावं लागतं.
» फिब्रिनोजेन : या चाचणीद्वारे रक्तप्रवाह सुरळीत आहे की नाही तसंच रक्तात गुठळ्या झाल्यास समजते. पेशी खराब झाल्यास, दाह होत असल्यास किंवा संसर्ग झाल्यास फिब्रिनोजेनच्या पातळीत वाढ होते. तसंच धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती, गरोदर महिला, तसंच काही औषधं घेणाऱ्या महिलांमध्ये याचं प्रमाण अधिक असतं.
» सीआरपी : सीआरपी म्हणजेच सी रिअॅक्टिव्ह प्रोटिन. या चाचणीद्वारे रुग्णाची भविष्यातील हृदयविकाराची शक्यता स्पष्ट होते. हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीचीदेखील ही चाचणी करून घेतली जाते. कारण याचं प्रमाण वाढल्यास मृत्यू ओढवण्याचीही शक्यता अधिक असते. ही शक्यता या चाचणीद्वारे स्पष्ट होते.
» हिमोग्लोबीन ए१ सी : रक्ताच्या एका कणातील साखरेचं प्रमाण समजण्यास या चाचणीची मदत होते. यालाच ए१ सी किंवा एचबीए१सी असंदेखील म्हटलं जातं.
» डीएचइए, टेस्टोटेरॉन, इस्ट्रेडिऑल, प्रोजेस्टेरॉन : स्त्री आणि पुरुष यांच्यातील हार्मोन्स या चाचणीद्वारे तपासलं जातं.
» व्हिटॅमिन डी : व्हिटॅमिन डी सांधे आणि हाडांच्या मजबुतीसाठी अत्यंत आवश्यक असतं. म्हणूनच याला सनशाइन व्हिटॅमिन असंदेखील म्हणतात. या चाचणीद्वारे शरीरातील कॅल्शिअमचं प्रमाण तपासलं जातं. कारण या जीवनसत्त्वामुळे आपण जे अन्नपदार्थ सेवन करतो त्यातून कॅल्शिअम शोषून घेण्याचं काम हे जीवनसत्त्व करतो.
» एक्स-रे : शरीरातील कोणत्या भागाला किती दुखापत झाली आहे किंवा त्याला सूज किती आली आहे, हाडाला काही फ्रॅक्र आहे का हे तपासण्यासाठी एक्स-रे किंवा क्ष-किरण चिकित्सा केली जाते.
» सीटी स्कॅन : हा देखील क्ष-किरण चिकित्सेचा भाग असून याद्वारे शरीराच्या आतील अवयवांची प्रतिमा मिळवली जाऊ शकते. उदाहरणार्थ मेंदू.
» सोनोग्राफी : यात पोट आणि ओटीपोटाचा आतील भाग बघितला जातो. कधी कधी एखादी गाठ असल्यास ती सोनोग्राफीद्वारे स्पष्ट होते.
» ईसीजी : एखाद्या रुग्णाला हृदयविकाराची शक्यता किती आहे हे जाणून घेण्यासाठी हृदयाचं कार्य कसं चालू आहे हे तपासणं आवश्यक आहे. यासाठी ही चाचणी केली जाते.
(शब्दांकन : अदिती पराडकर) |
Read More »
| |